#PsychologyofMoney

पैशाचे मानसशास्त्र (भाग – १)
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन.
गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो
आता पुस्तकाबद्दल -श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही. त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय… अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल. उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो – दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. – तुमची प्रकृती आणि पैसा.तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे – गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे.
गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.
चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही.
आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा)आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल…आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे…
– जयंत कुलकर्णी.