स्वर्गमंडप….खिद्रापूर

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर

बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली. सकाळी ६ वाजता निघायचे होते कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात फोटो काढायची संधी सोडायची नव्हती.

सकाळी उजाडता उजाडता खिद्रापूरला पोहोचलो. अरेच्चा देऊळ कोठेच दिसेना. ना कळस ना मोकळी जागा. पण दोन घराच्या मधे एक दरवाजा दिसला आणि वर गजराजांच्या मूर्ती स्वागताला हजर होत्या.
गजराज :

आत नजर टाकली आणि डोळ्यावर विश्वास बसेना.
बाहेरून दिसले देवळाचे काही भाग…

चला, मनात म्हटले ट्रीप वाया निश्चितच जाणार नाही. खिद्रापूरचे देऊळ आहे शंकराचे आणि त्याच्या अनेक नावापैकी एक घेऊन तो या देवळात आहे. “कोपेश्वर” अर्थात नेहमीप्रमाणे याच्या मागे ही दंतकथा आहेच. शिवमंदीरात आपल्याला अगोदर दिसतो तो नंदी. काळयाकुळकुळीत पाषाणातील सुबक मूर्तीला नमस्कार करूनच आपण शिवाच्या दर्शनाला जातो. पण येथे बघतो तर नंदी गायब. त्याचेही उत्तर खालील दंतकथेत दडले आहे. प्रजापतीला १६ मुली होत्या. त्यातील सर्वात धाकटी होती सती. शंकराच्या नादी लागू नको हा सगळ्यांचा सल्ला धुडकावून तिने शंकराला वरले. प्रजापतीला हे बिलकुल पसंत नव्हते. त्याने वाजपेय यज्ञ करायचा ठरवले व जाणूनबुजून आपल्या जावयला आमंत्रण दिले नाही. कटकट नको म्हणून स्वत:च्या कन्येलाही बोलावले नाही. शंकराला बोलाविणे नसल्यामुळे त्याचा तेथे जायचा प्रश्नच उरला नाही पण सतीला माहेरची आठवण येऊन तिने त्या यज्ञाला जायचा हट्ट धरला. शंकराने त्या स्त्रीहट्टाला शरण जावून तिला परवानगी दिली पण जाताना बरोबर नंदीला दिले. म्हणून या शंकराच्या निवासस्थानी नंदी नाही. हे यज्ञाचे ठिकाण होते कृष्णा नदीच्या पलिकडे. माहेरी गेल्यावर सतीचा अपमान झाला व तिच्या पतीचीही येथेच्छ निंदा करण्यात आली. ती सहन न होऊन सतीने तेथेच त्या यज्ञात जीव दिला. हे वृत्त कळताच शंकराचा क्रोध अनावर झाला. त्याने विरभद्राला त्या यज्ञाचा विध्वंस करायचे आवाहन केले. त्या वेळेस त्याने आपल्या जटा रागाने जमिनीवर आदळल्या ज्याने पृथ्वी कंप पावली इ..इ.. म्हणून हा “कोपेश्वर”.

संकेश्वरचा शंखनाथ, रायबागचा बकनाथ व कोपेश्वराचे दर्शन एका दिवसात केले असता स्वर्गप्रवेश आरक्षित आहे.

खालचे चित्र आपण माझ्या एका संगीतविषयक लेखात बघितले आहे.
गाभारा आणि त्याच्या पुढे सभामंडप किंवा रंगमंडप अशी रचना भारतातील बहुतेक देवळाची आहे.
गाभारा व सभामंडप.

काहीच देवळात अजून एका मंडपाची रचन केलेली आढळते ती म्हणजे “स्वर्गमंडप”. उदा. गोंदेश्वरलाही (सिन्नर) स्वर्गमंडप आहे. पण कोपेश्वरचा स्वर्गमंडप हा भारतातील सगळ्या स्वर्गमंडपात उजवा मानला जातो.
स्वर्गमंडप एका बाजूने…

हा स्वर्गमंडप खाली चित्रात दाखवलेल्या अशा ४८ खांबांवर उभा आहे.

चारही दिशांना चार दरवाजे आहेत. स्वर्गमंडपात अनेक आश्चर्ये बघायला मिळतात. पहिले नजरेत भरते ते म्हणजे वर छताला असलेले १३ फूट व्यासाची एक खिडकी.
छतातील गवाक्ष :

त्याच्याच बरोबर खाली एक गोल बरोबर १३ फूट व्यासाची गोल शिळा आहे. या दोन्हीचा मध्य बरोबर जुळलेला आहे. ही जी खालची शिळा आहे त्याच्या बाजूने गोलाकार १२ खांब आहेत ज्यावर हे वरचे खिडकी असलेले छत पेलेलेले आहे. या बारा खांबांच्या मागे अजून १६ खांबांचे वर्तूळ आहे. या सगळ्या खांबांनी ते छत आणि त्या मंडपाचा काही भाग पेलला आहे.

याच्या मागे अजून ८ खांबांचे वर्तूळ आहे. यातील प्रत्येकी दोन खांब चार दरवाजांच्या तुळया पेलण्यासाठी उभे केले आहेत. थोडक्यात या ४८ खांबांवर हा स्वर्ग उभा आहे. आणि आपण जर या मधल्या शिळेवर झोपलो तर आपल्याला स्वर्गात असल्याचा भास होतो. ( अर्थात स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही असे म्हणतात आणि आपल्याला कोण हो स्वर्गात घेणार ? पण स्वर्गात जे असते ते सुंदर, भव्य, दिव्य असते असे आपण मानतो त्यानुसार ……आणि रंभा, उर्चशीही या देवळात आहेतच.)
स्वर्गमंडपातील खांब :

कुठल्याही देवळाचे (प्राचीन) काही भाग पडतात ते खालील प्रमाणे –
सगळ्यात खालची शिळा ज्यावर मंदीर उभे असते ती खुरशिळा. (जसे जनावरांचे खूर तसे) त्यावर जे जोते असते त्यावर बहुतेक वेळा हत्तींची शिल्पे असतात. हे हत्ती या मंदिराचे वजन झेलतात अशी कल्पना. त्या जोत्याला म्हणतात गजपट्ट. त्यावर मग मंदिराच्या भिंती उभ्या केल्या जातात. यावर नर नारी, देव देवता, प्राणी पक्षी, कहाण्या, कोरल्या जातात किंवा मूर्ती स्वरूपात गुंतवल्या असतात. या पट्ट्याला म्हणतात नरपट्ट. म्हणजे माणसांची जागा. या नरपट्ट्य़ामधे तीन बाजूला गाभार्‍यात उघडणारी गवाक्षे असतात त्याला म्हणतात देवकोष्ट. म्हणजे समजा एका बाजूचा विचार केला तर अशी रचना असते.
कुंड – त्यावर गोमुख किंवा मकरमुख
त्याच्याच पातळीवर खुरशिळा.
मग वजन पेलणारे गजपट्ट.
गजपट्ट :

त्या नंतर नरपट्ट. याच नरपट्ट्यामधे तीन बाजूला देवकोष्ट. चौथ्या बाजूला आत शिरायचे द्वार असल्यामुळे तेथे हे नसते.
नरपट्ट्मधील नक्षीकाम :

गजपट्टाच्या पातळीवर गाभारा.
देवकोष्ट :

मग छत व शिखर (असल्यास).

कोपेश्वर मंदिराचा सभामंडपही विशाल असून त्यात ४२ खांब आहेत. वर म्हटल्याप्रमाणे यात नंदीची मूर्ती नाही. येथून अर्थातच आपण गाभार्‍यात प्रवेश करता. मला वाटते हा एकमेव गाभारा आहे जेथे शैव आणि वैष्णव या दोघांची श्रद्धास्थाने एकत्र आहेत. कोपेश्वर आणि विष्णूचे रुप धोपेश्वर. शिवाचे दर्शन घेण्या अगोदर विष्णूचे दर्शन घ्यावेच लागते.
गाभार्‍यातील पिंड व धोपेश्वर.

शिल्पकला :
शिल्पकले बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. पण मी काही शिल्पांची छायाचित्रे आपल्यासाठी टाकत आहे, त्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल.

प्रियकराला पत्र लिहिण्यात गुंग झालेली सुंदरी. अशी तीन शिल्पे आहेत. पत्राची सुरवात आणि शेवट असे दाखवले आहे. म्हटल चला या सुंदर स्त्रीच्या हस्ते आपले नाव लिहून घेऊयात 🙂

एक शिल्प

शिल्पातील सगळ्यात सुंदर स्त्री….

आशा आहे आपल्याला हे आवडले असेल आणि आपण हा नितांत सुंदर शिल्पकलेचा ठेवा बघायला जाल.

अजूनही बरीच छायाचित्रे आहेत पण विस्तारभयाने येथे टाकली नाहीत. भारतीय मूर्तीशास्त्र आणि शिल्पकला याचीही बरीच माहिती या निमित्ताने गोळा केली आहे, (थोडाफार आभ्यासही केला आहे), ती परत केव्हातरी…….

पूर्व-पश्चिम लांबी : १५२ फूट
रूंदी : १०४ फूट.
याचा आराखडा ACAD वर काढायला दिला आहे. तो आल्यावर याच धाग्यात टाकेन !
पूर्ण देऊळ

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवास वर्णने. Bookmark the permalink.

5 Responses to स्वर्गमंडप….खिद्रापूर

  1. Dilip V Subhedar says:

    Interesting…

  2. Parag Purandare says:

    Khup chan photo aani mahiti. Aamchya barobar Khidrapurla yal ka ?

  3. chandrashekhara says:

    हे खिद्रापूर आहे तरी कोठे? कोणत्या रस्त्याने जायचे व पुण्याहून किती किमी अंतरावर आहे. माहिती दिली तर बरे होईल.

    • जयंत says:

      आपल्याला मेल पाठवला आहे. त्यात अंतर द्यायचे रहिले आहे. जाउन येउन ५५० किमी झाले.
      धन्यवाद !

  4. Devidas Kapse says:

    सर फोटो पण टाकायला पाहिजे होते .

Leave a comment