फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.

असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.

अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.
” त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,
‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’
हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहीती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,
‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’
‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’
यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.
श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.

भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).
पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.
हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.
पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.
काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडीतांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.
त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती.
एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.
शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.
शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.
काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.
काश्यप मातंग.

त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जिवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जिवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जिवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले…..
काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली…
त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’…
दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे –
या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.
कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.
महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.
लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत… तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.
धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’. हीच माहीती नंतर अनेक चिनी पुस्तकातून आपल्याला आढळते पण त्याचे मूळस्थान हेच पुस्तक आहे. धर्मरक्षाबद्दल अभ्यास करताना आपल्याला याच चरित्रात्मक पुस्तकापासून सुरवात करावी लागेल.
धर्मरक्षचे पुर्वज हे युची जमातीचे होते. हे घराणे अनेक पिढ्या मध्य एशियातील चीनच्या सीमेवर असलेल्या डुनहुआंग या शहरात रहात होते. काही तज्ञांचे म्हणणे असेही आहे की हाही मगधाचा एक ब्राह्मण होता. खरे खोटे माहीत नाही. तो कुठला होता हे महत्वाचे नसून त्याने काय काम केले हे मह्त्वाचे आहे. हे शहर म्हणजे चीनची अती पश्चिमेकडील सैन्याची वसाहत होती. (ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात). काहीच काळानंतर रेशीममार्गावरील (सिल्करुटवरील) ते एक महत्वाचे व्यापारी केंद्र झाले. येथे आठ वर्षांचा असतानाच धर्मरक्षाने आपले घरदार सोडले व एका तो मठात दाखल झाला. तेथे त्याने एका गाओझुओ नावाच्या विदेशी श्रमणाकडे आसरा घेतला व शेवटी त्यालाच आपले गुरु मानले. धर्मरक्षचा हा गुरु बहुदा भारतीय असावा. हे नाव भारतीय श्रमणाचे कसे ? तर त्याचे उत्तर हे आहे की त्या काळात भारतीय किंवा विदेशी नावांचे चीनीकरण करण्याची पद्धत सर्रास रुढ होती. या चीनी नावांमुळे खरी नवे शोधण्यास बऱ्याच इतिहासकारांना बरेच कष्ट करावे लागले हे मात्र खरे !. तर या श्रमणाकडे आसरा घेतल्यावर धर्मरक्षने खडतर मेहनत घेतली. असे म्हणतात त्या वयात तो दिवसाला दहाहजार शब्द असलेले श्लोक म्हणायचा. तो मुळचाच अत्यंत बुद्धिमान व एकपाठी होता. त्या काळात म्हणजे अंदाजे काश्यप मातंगाच्या काळात चीनच्या राजधानीत मठ, देवळे, बुद्धाची चित्रे, हिनयान पंथांचे ग्रंथ यांचा बराच बोलबाला होता पण महायान पंथाच्या सुत्रांचा अभ्यास मात्र पश्चिमी प्रदेशात होत असे. किंबहुना ही ‘‘वैपुल्य सुत्रे’’ राजधानीत माहीत असावीत की नाही अशी परिस्थिती होती. बौद्ध धर्माचे खरे तत्वज्ञान व मुक्तीचा खरा मार्ग याच पंथाच्या शिकवणीत दडलेला आहे याची खात्री असणारा धर्मरक्ष मग त्याच्या अभ्यासासाठी बाहेर पडला. त्याच्या गुरु बरोबर पश्चिमेकडील देशविदेशांच्या यात्रेस त्याने प्रारंभ केला. असे म्हणतात त्या प्रवासादरम्यान त्याने ३६ भाषांचा व लिप्यांचा अभ्यास केला व त्यात लिहिलेल्या महायान सुत्रांचा खोलवर अभ्यासही केला. (यातील अतिशयोक्ती सोडली तर त्याने किती कष्ट घेतले हे यावरुन कळते. त्या काळात एवढ्या भाषा त्या भागात बोलल्या जायच्या का नाहीत याची शंकाच आहे) हा त्यातील कुठल्याही श्र्लोकाचे उत्तमपणे विवेचन करु शकत असे.
हे सगळे ग्रंथ घेऊन मग तो चीनला पोहोचला. ‘‘डुनहुआंग’’ ते टँगची राजधानी ‘‘चँग-ॲन’’ या प्रवासात त्याने या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरु केले. त्याने ज्या संस्कृत/पाली सुत्रांचे चिनी भाषेत भाषांतर केले त्याची यादी पाहिल्यास मन थक्क होते. भद्रकल्पिका, तथागतमहाकरुणानिर्देश, सद्धर्मपुंडरिक, ललितविस्तार, बुद्धचरितसुत्र, दशभुमीक्लेषचेदिकासुत्र, धर्मसमुद्रकोषसुत्र हे त्यातील काही ग्रंथ. एकूण ग्रंथ होते १४९. शिवाय त्याने अजुन एक महत्वाचे काम केले ते म्हणजे बुद्धाच्या जातक कथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बरं हे नुसते लिहून तो थांबला नाही तर गावोगावी, त्याच्या मठात त्याने या सुत्रांवर सतत प्रवचने दिली व धम्माचा प्रसार केला. चीनमधे जो काही बौद्धधर्म प्रारंभीच्या काळात पसरला त्याचे बरचसे श्रेय धर्मरक्षालाच जाते.
अखेरच्या काळात धर्मरक्षाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला व तो निर्जन जंगलात एकांतवासात रहाण्यास गेला. त्याच्या ज्ञानलालसेबद्दल एक दंतकथा याच काळात निर्माण झाली. तो ज्या नदीकिनारी रहात असे त्या नदीचे पाणी एक दिवस अचानक आटले. (एका माणसाने ते दुषीत केले असेही म्हणतात) ते पाहून धर्मरक्ष त्या जंगलात विलाप करीत भटकू लागला, ‘‘ही नदी अशी आटली तर मला जे काही थोडेफार पाणी लागते तेही मिळणे मुष्कील आहे.’’ हा आक्रोश ऐकताच ती नदी परत दुथडी भरुन वाहू लागली. अर्थात ही एक बोधकथा आहे म्हणून आपण त्यातून काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ व सोडून देऊ.
नंतरच्या काळात त्याने टँगची राजधानी चँग-ॲनच्या ‘निल‘ वेशीबाहेर एक मठ स्थापन केला व तेथे महायानाचा अभ्यास करीत आपले आयुष्य व्यतीत करु लागला. त्याच्या शिष्यांची संख्या आता न मोजता येईल एवढी झाली होती. पण त्याच काळात धर्मरक्ष सामान्यजनांमधे लोकप्रिय झाला तो एका घटनेमुळे…
त्याच्या विद्यार्थ्यांमधे एक श्रमण दाखल झाला होता. तो आठव्यावर्षीच श्रमण झाला होता याचाच अर्थ तो ज्ञानी असावा. ही घटना घडली तेव्हा त्याचे वय तेरा होते. त्याचे नाव होते झु-फाशेंग. चँग-ॲनमधे एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठीत गृहस्थ रहात असे. एक दिवस तो धर्मरक्षाच्या मठात आला. त्याची गाठ या झुशी पडली. त्या माणसाने धर्मरक्षाकडे दोन लाख नाणी मागितली. त्या मागणीला धर्मरक्ष उत्तर देणार तेवढ्यात त्या लहान मुलाने उत्तर दिले, ‘‘ तुम्हाला ते पैसे मिळतील !’’ ते ऐकून तो माणूस उद्या येतो असे म्हणून निघून गेला. फा-शेंग म्हणाला, ‘‘ त्या माणसाला ते पैसे खरेच पाहिजे होते यावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटते तो आपली परिक्षा घेण्यासाठी आला असावा.’’ धर्मरक्षाने त्यालाही असेच वाटले असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी तो माणुस आला व त्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत धर्माची दिक्षा घेतली.
जेव्हा क्सिओनू व क्सिॲन्बी टोळ्यांनी सम्राट हुईच्या राजधानीवर हल्ला केला त्या धामधुमीच्या काळात धर्मरक्षाने त्याच्या शिष्यांसह पूर्वेकडे पळ काढला. तेथे तो एका निसर्गरम्य कुन नावाच्या तळ्याकाठी पोहोचला. दुर्दैवाने झालेल्या दगदगीमुळे तो तेथे आजारी पडला व त्याने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते ७८.
हुई आणि हुआई सम्राटांच्या मधल्या युद्धाच्या धामधुमीच्या काळातही हे भाषांतराचे काम अडखळत का होईना चालू होते. फा-जू नावाचा एक श्रमण होता त्याने लोकस्थान सुत्राचे भाषांतर केले. हा कुठून आला होता, त्याचे भारतीय नाव काय होते हे अज्ञात आहे. तसाच एक श्रमण होता त्याचे नाव होते फाल-ली याने जवळजवळ १०० श्लोकांचे भाषांतर केले. हे दोघे आणि त्यांचे काम काळाच्या उदरात गडप झाले ते झालेच.
ही तत्वज्ञान व माहितीची देवाणघेवाण बघता, पूर्व आणि पश्चिम कधीच भेटणार नाहीत हे प्रसिद्ध वाक्य खोटे ठरते. हे प्रदेश भेटले आणि मध्य एशियात भेटले. त्यांच्यात वैचारिक व आर्थिक देवाणघेवाणही होत होती….
या सुरवातीच्या काळात हे जे ग्रंथांचे भाषांतर झाले ते एवढे अचुक नसायचे. चीनी भाषा ही भारतीय पंडितांना एकदम नवीन व अनाकलनीय होती. त्यांचा बराच वेळ हा ती भाषा शिकण्यातच जायचा. भारतीय पंडीत खऱ्या अर्थाने चिनी भाषा शिकले ते हुएन-त्संगच्या काळात. पण आपण चिनी भिक्षुंबद्दल नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हा विषय येथेच सोडून देऊ.
या दोन महत्वाच्या महंताबद्दल आपण वाचले पण एकदा राजाश्रय मिळाल्यावर भारतातून चीनमधे जाणाऱ्या बौद्ध महंतांची तुलनेने रीघच लागली. राजाने बांधून दिलेल्या श्र्वेताश्र्व मठात भाषांतराचे व धर्मप्रसाराचे काम मोठ्या नेटाने चालू झाले.
चिनी सम्राटांनी बौद्धधर्माला राजाश्रय दिल्यावर त्यांना भारतातून अजुन धर्मगुरुंची गरज भासू लागली व त्यांनी अनेक धर्मगुरुंना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांची नावे काही तिबेटच्या ग्रंथात आढळतात ती अशी- आर्यकाल, स्थाविरचिलू, काक्ष, श्रमण सउविनय. हे पहिल्या तुकडीत होते तर नंतर आलेल्यांची नावे होती, पंडीत धर्मकाल व त्याच्या बरोबर गेलेले अनेक भिक्षू ज्यांची नावे आज आपल्याला माहीत नाहीत. पण काही जणांची चिनी इतिहासातून कळतात – महाबल, धर्मकाल, विघ्न, त्साऊ लुयेन, त्साऊ ता-ली व धर्मफळ. १७२-१८३ या काळात अजुन एक पंडीत आला त्याचे नाव होते त्साऊ फा-सो. हे अर्थात त्याचे चिनी नाव आहे. त्याचे भारतीय नाव माहीत नाही. त्याने दोन ग्रंथाचे भाषांतर केले पण ते ७३० साली नष्ट झाले असा चिनी इतिहासात उल्लेख आहे. महाबल यानेही त्याच मठात राहून एका ग्रंथाचे भाषांतर केले तो मात्र अजुनही चिनी त्रिपिटकामधे आहे. यात बोधिस्त्वाच्या कल्पनेबद्दल बरीच चर्चा केली आहे. त्यातच बुद्धाच्या आयुष्याबद्दल बरीच माहीती मिळते.
तिसऱ्या शतकात धर्मपाल चीनला गेला. जाताना त्याने त्याच्याबरोबर कपिलावस्तूमधून काही संस्कृत ग्रंथ नेले. यानेही त्याच मठात आश्रय घेऊन त्या ग्रंथाचे भाषांतर केले. त्यात त्याला मदत झाली एका तिबेटी श्रमणाची. हा तिबेटी असला तरी त्याचे वास्तव्य अनेक वर्षे मध्य भारतात होते. याचे नाव आहे खान मानसिआन कदाचित खान हे त्या काळात आडनाव नसून पद होते हे लक्षात घेतल्यास ते खान मानसिंह असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथाचे नाव होते मध्यमासुत्र. हा दीर्घआगमामधील काही सुत्रे घेऊन रचला गेला.
या काळामधे हे सगळे पंडीत त्यांच्या कामात सतत सुधारणा करीत धर्मप्रसार करीत होते. उदा. धर्मकाल जेव्हा चीनमधे आला तेव्हा त्याला उमगले की चीनमधे विनयसुत्राबद्दल विशेष माहीती नाही. त्यात लिहिलेल्या नियम माहीत नसल्यामुळे बरेच प्रश्न उद्भवत होते. संघ नीट चालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता होती. प्रतिमोक्षसुत्रामधे हे सगळे नियम बुद्धानंतर सम्राट अशोकाने भरविलेल्या महापरिषदेने घालून दिलेले आपल्याला आढळतात. धर्मकालाने या नियमांचे भाषांतर करण्याचे काम प्रथम हाती घेतले व तडीस नेले. काळ होता इ.स. २५० हाच चिनी भाषेतील ग्रंथ विनयपिटीका. दुर्दैवाने हाही ग्रंथ ७३० साली नष्ट झाला अशी नोंद आढळते.
अंदाजे २२४ साली अजुन दोन पंडीत भारतातून चीनमधे आले. एक होता विघ्न आणि दुसरा होता लु-येन. हे एकमेकांचे मित्र होते. या पंडितांनी बरोबर धर्मपादसुत्र आणले व त्याचे भाषांतर केले – थान-पोक-किन. त्यांनी हे काम सुरु केले तेव्हा त्यांना चिनी भाषेचा विशेष गंध नव्हता पण त्याने डगमगून न जाता मोडक्यातोडक्या चिनी भाषेत त्यांनी हे काम नेटाने पुढे चालू ठेवले. पण त्यामुळे एक नुकसान झाले ते म्हणजे या भाषांतरात मूळ भाव उतरला नाही. हा ग्रंथ अजुनही चीनमधे काओ-सान-क्वान (प्रसिद्ध धर्मगुरुंच्या आठवणी) या ग्रंथात जपून ठेवलेला आहे. पंडीत विघ्नाच्या मृत्युनंतरही लु-येन याने हे काम चालू ठेवले व आणखी तीन ग्रंथाचे भाषांतर केले ज्यात बुद्धाने जी सुत्रे सांगितली ती लिहिली आहेत.
वर उल्लेख केलेला खान सान नी ही मुळचा तिबेटी पण भारतात स्थायीक झाला होता. तिबेटच्या पंतप्रधानाचा (खान्-कू) हा मुलगा. २४१ साली याने चीनचा रस्ता धरला व तो त्यावेळची राजधानी नानकिंग येथे पोहोचला. त्यावेळी तेथे वू घराण्याचे राज्य होते. सम्राट सन खुएनची या धर्मगुरुवर विशेष मर्जी बसली. त्याने त्यास नवीन मठ बांधण्याचा आदेश दिला. त्याने तो लगेच आमलात आणून त्या मठाला नाव दिले किएन-कू मठ. ज्या गावात हा मठ बांधला गेला त्या गावाचेही नाव ठेवण्यात आले बुद्धग्राम. याचे उद्घाटन खुद्द सम्राटांच्या हस्ते करण्यात आले. याही महंताने एकूण १४ ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यातील एक महत्वाचा होता शत परमिता सन्निपातसुत्र. हा म्हणजे आपल्या जातक कथा आहेत. दुसरा ग्रंथ होता संयुक्तावादनसुत्र. हा एक महायान पंथाचा ग्रंथ आहे. काळ होता २५१.
एक लक्षात येते की भारतातील धर्मगुरु हे सरळ चीनला अफगाणिस्थानमार्गे जात नसत. ते अगोदर मध्य एशियात जात व तेथून रेशीममार्गाने एखाद्या व्यापारी तांड्याबरोबर चीनला जात.
याखेरीज अजुनही काही धर्मप्रसारक भारतातून चीनला गेले त्यांची नावे –
कल्याणरुण, कल्याण, आणि गोरक्ष. यातील गोरक्षक हे नाव नाथपंथियांच्या साधूचे वाटते. याबाबतीत संशोधनाची गरज आहे. गोरक्षकनाथांचा काळ हा अकराव्या शतकाचा मानला जातो आणि हा पंडीत गेला दुसऱ्या शतकात. काही नाथपंथीयांनी बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती का यावर संशोधन होणे जरुरी आहे…. एका थोर धर्मप्रसारकाविषयी आपण वाचणार आहोत.
त्याचे नाव कुमारजिव….
कुमारजीव.
चीनमधील कुचा येथील कुमारजीवाचा सुंदर पुतळा.

कुमारजिवाचे काम खरोखरच आपल्याला आचंबित करणारे आहे. त्यांनी जवळजवळ १०० संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरु केलेल्या या कामात सामील होण्यासाठी दुसरी फळी उभारली. या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे काम मोठ्या जोमाने पुढे चालू ठेवले. हे त्यांचे यश फार मोठे म्हणावे लागेल. त्यांचे शिष्य नुसते हे काम करुन थांबले नाहीत तर सुप्रसिद्ध फा-इन सारख्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधे केला.
या काळातील काही बौद्ध धर्मगुरुंची ही नावे पहा –
धर्मरक्ष, गौतम संघदेव, बुद्धभद्र, धर्मप्रिय, विमलाक्ष व पुण्यत्राता. या सर्वांचे काम आपण थोडक्यात बघणार आहोत.
धर्मरक्ष ३८१ साली चीनेमधे आला व त्याने त्या अवघड भाषेचा अभ्यास करुन अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. उदा. १) मायाकाराभद्ररिद्धीमंत्र सूत्र २) नरकसूत्र, ज्यात बुद्धाने नरक या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ३ शिलगुणगंध सूत्र ४) श्रामण्यफळसूत्र.
याच्यानंतर आला गौतम संघदेव. हा एक काश्मीरचा श्रमण होता. याने ३८८ साली त्यावेळच्या चीनी राजधानीत, म्हणजे खान आन या शहरात पाऊल टाकले. त्यावेळी तेथे फु राजघराणे राज्य करीत होते. त्याने जवळजवळ ७ ग्रंथांचे भाषांतर केले. त्याने भाषांतर केलेल्या काही महत्वाच्या ग्रंथांची नावे आहेत – मध्यमागम सूत्र, हा एक हिनयान पंथाचा ग्रंथ आहे. दुसरा आहे अभिधर्मह्र्दयशास्त्र. ३९१ साली त्याने त्रिधर्मसूत्राचे भाषांतर केले.
३९८ साली चीनमधे आला बुद्धभद्र. हा शाक्य होता. साधारणत: त्याच काळात कुमारजीवाला पकडून चीनमधे आणण्यात आले. कुमारजीवाने याच बुद्धभद्राचा अनेक वेळा त्याच्या कामात सल्ला घेतला असे म्हणतात. या बुद्धभद्राला कुमारजीवाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचाच सहाध्यायी होता जगप्रसिद्ध फा-ईन. कुमारजीवाच्या मृत्युनंतर जेव्हा फा-ईन भारताचा प्रवास करुन चीनमधे परतला तेव्हा याने त्याच्याबरोबर संघासाठी नियमावली असणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे विनयपिटिका. २५० साली नियमावली नसल्यामुळे आपण पाहिले आहे की धर्मकालाने पहिला प्रतिमोक्ष हा ग्रंथ लिहिला होता. बुद्धभद्राने त्यातील काही भाग उचलून त्यावर सविस्तर भाष्य केले आणि एक नवीन ग्रंथ रचला ज्याचे नाव त्याने ठेवले – प्रतिमोक्षसंघिकामूल. संघ वाढत असल्यामुळे त्यात शिस्त आणण्यासाठी विनयग्रंथाची त्याकाळात फारच जरुरी भासल्यामुळे हे काम तत्परतेने उरकण्यात आले. बुद्धभद्राने चीनमधे ३१ वर्षे काम केले. तो भारतात परत आला नाही. त्याने चीनमधेच आपला प्राण ठेवला तेव्हा त्याचे वय होते ७१. त्याचे सात ग्रंथ आजही चीनमधे जपून ठेवले आहेत ते खालीलप्रमाणे – (तीन ग्रंथांची नावे आधी येऊन गेलेली आहेत)
१ महावैपुल्य सूत्र ज्यात खुद्ध बुद्धाची भाषणे दिली आहेत.
२ बुद्धध्यानसमाधीसागर सूत्र
३ मंजुश्री प्रणिधानपद सूत्र
४ धर्मताराध्यान सूत्र
बुद्धभद्राच्या थोडे आधी अजुन एक धर्मगुरु काबूलवरुन चीनमधे येऊन गेला त्याचे नाव होते संघभट. पण त्याच्याबद्दल आजतरी काहीच माहिती उपलब्ध नाही. अजून किती पंडीत चीनमधे या कामासाठी दाखल झाले असतील याची आज आपल्याला कल्पना नाही. कित्येक ग्रंथ कम्युनिस्ट राजवटीत नष्ट करण्यात आले असावेत किंवा कुठल्यातरी सरकारी ग्रंथालयात धूळ खात पडले असतील. ते जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा अजून बरीच माहिती उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात अजून एक महत्वाच्या कामास सुरुवात झाली ती म्हणजे चीनी धर्मगुरुंनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. ही कल्पना कुमारजीव यांच्या एका शिष्याची, फा-ईनची.
३८८ साली संघभटाने कात्यायनीपुत्र रचित विभासशास्त्राचे चीनी भाषेत भाषांतर केले जे चीनमधे पि-फो-शालून या नावाने ओळखले जाते. या ग्रंथाचे एकुण १८ भाग आहेत. त्याच वर्षी त्याने आर्य वसुमित्र बोधिसत्व संगितीशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर केले. ३८४ साली त्याने बुद्धचरितसूत्राचे भाषांतर केले. हा मूळ ग्रंथ संघरक्षाने रचिला होता.
३८२ साली अजून एका धर्मप्रिय नावाच्या श्रमणाने एका महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर केले ज्याचे नाव होते महाप्राज्ञपरिमित सूत्र. हे प्रसिद्ध दशसहस्रिका प्राज्ञ परिमिता या ग्रंथाचा काही भाग आहे.
थोडक्यात काय, भारतातून चीनकडे जाणाऱ्या पंडितांचा ओघ सारखा वाढत होता व त्यांनी तेथे अचाट काम केले. नवीन धर्माचा प्रसार करताना नवबौद्धांना संदर्भासाठी ग्रंथ लागतील हे ओळखून त्यांनी ग्रंथाच्या भाषांतराचे काम प्रथम हाती घेतले आणि अतोनात कष्टाने तडीस नेले. हे करताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे थांबविले नव्हते. त्यासाठी त्यांनी राजाच्या आश्रयाने मठ बांधले. तेथे संघांना आसरा दिला. त्यांच्यासाठी चीनी भाषेत नियमावली लिहिल्या.

या सर्व कामात भारताच्या मध्य भागातून अनेक पंडीत चीनला गेले पण काश्मीरातूनही अनेकजण गेले हे विसरुन चालणार नाही. हे वाचल्यावर एक विचार मनात येतो काश्मीरमधील सध्याच्या युवकांना हा इतिहास माहिती असेल का ? तो जर त्यांना सांगितला तर काही फरक पडेल का ?
(शक्यता कमीच आहे पण मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमात एका बाईने एका अतिरेक्याला सडेतोड उत्तर दिले होते…ती म्हणाली, आमचा अरबस्तानाशी कसलाही संबंध नाही. अरब हे आमच्या भूमिवरील आक्रमक होते. हिंदूशाहीचा राजा दाहीर हाच आमचा हिरो असायला हवा. आम्ही प्रथम हिंदू होतो, नंतर बौद्ध झालो व त्यानंतर ख्रिश्चन व मुसलमान हे आम्ही विसरु शकत नाही… असे उत्तर देणारी पिढी जेव्हा काश्मीरात तयार होईल तो दिवस भारताच्या व काश्मीर खोऱ्याच्या भाग्याचा.) असो.
आता आपण कुमारजीव या महान ग्रंथकर्त्याकडे वळू. कुमारजीवाचे पिता हे भारतीय होते अर्थात त्याचवेळेचा भारत ज्यात अफगाणिस्तानही मोडत होते. कुमारजीवाचे वडील ‘कुमारयाना’, काश्मिरमधे एका राज्याच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. त्यांच्यावर बौद्धधर्माचा एवढा प्रभाव पडला की पामीरच्या डोंगर रांगा पार करुन ते कुचाला गेले. तेथे ते आल्याची कुणकुण लागल्यावर तेथील राजाने त्यांची त्वरित राजगुरुपदी नेमणूक केली. त्याकाळी गुणवंतांची कदर अशा प्रकारे व्हायची. विद्वान पंडितांसाठी त्याकाळी युद्धं होत असत असा तो काळ. तर कुचाला हा राजगुरु असताना कुचाची राजकन्या, जिवाका त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. अर्थातच तो पुरा करण्यात आला. यांना जो पुत्र झाला त्याच्या नावात मातापित्यांचे नाव गुंफण्यासाठी त्याचे नाव ठेवण्यात आले कुमार + जिवाका. म्हणजेच कुमारजीवा. कुमारजीवाचे जन्म साधारणत: ३३४ त ३४४ या काळात झाला असावा. तो सात वर्षांचा असताना त्याची आई एका भिक्षुणीसंघात दाखल झाली. असे म्हणतात (जरा अतिशयोक्ती वाटते) की तो सात वर्षांचा असतानाच त्याची अनेक सूत्रे तोंडपाठ होती. तो नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला काश्मिरला नेले व शिक्षणासाठी शिक्षकांचा जो शिक्षक बंधुदत्त त्याच्याकडे सोपविले. या प्रवासादरम्यान त्यांना एक अरहत भेटला ज्याने कुमारजीवाचे भविष्य सांगितले असे म्हणतात. आजवर कुमारजीवाचा अभ्यास हिनयानाच्या सर्वास्तिवादी तत्वज्ञानाच्या अभ्यासापुरता मर्यादित होता. येथे त्याला वेदांचा व तंत्रविद्या, खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यास मिळाला व याचवेळी त्याची महायानाच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली. या शिक्षणाचा अजून एक फायदा त्याला झाला आणि तो म्हणजे त्याची ओळख अतिविशाल हिंदू ग्रंथविश्र्वाशी झाली. थोड्याच काळात तो त्यात पारंगतही झाला. महायानाची ओळख झाल्यावर तर त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की मी इतके दिवस दगडाला सोने समजत होतो. आता मात्र माझी ओळख खऱ्या सोन्याशी झाली आहे. (मला मात्र हे काही विशेष पटले नाही. खरे तर हिनयानपंथाचे तत्वज्ञान जास्त मूलभूत स्वरुपाचे आहे. मला तरी वाटते महायानात हिंदू तत्वज्ञान भरपूर घुसडलेले आहे. उदा. बोधिसत्वाची कल्पना. हे चूक असू शकेल !) गंमत म्हणजे त्याला या अभ्यासात यारकंदचा राजपुत्र सत्यसोमाची खूपच मदत झाली. गुगलअर्थवर यारकंद कुठे आहे हे जरुर पहावे.
काशघरला एक वर्ष काढल्यावर कुमारजीव कुचाला परतला. कुचामधे राजदरबाराच्या पाठिंब्याने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर मात्र तो जवळजवळ वीस वर्षे कुचामधे राहिला. हा काळ त्याने महायानाचे तत्व समजून घेण्यात व्यतीत केले. ते तत्वज्ञान पटल्यावर त्याने महायानपंथाचा स्वीकार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या गुरुंनाही हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे ठरविले. त्याला अशी आशा होती की गुरुंना पटल्यावर तेही या पंथाचा स्वीकार करतील. त्याने बंधुदत्तांना कुचास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या गुरुला महायानाची थोरवी सांगताना कुमारजीवाने त्यांच्या समोर शून्यतेची कल्पना व तत्व मांडले. ते सगळे शांतपणे ऐकल्यावर बंधुदत्तांनी सगळे शून्य आहे, किंवा सगळे विश्र्व शेवटी मिथ्या आहे हे म्हणणे म्हणजे फुकाची बडबड आहे असे म्हणणे मांडले. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा कथन केली –
एका विणकराकडे एक वेडसर माणूस आला व त्याने त्याला सगळ्यात तलम धागा विणण्यास सांगितला. तो पाहिल्यावर त्याने तो जाड असल्याचे त्या विणकराला सांगितले.
‘‘पैशाची काळजी करु नकोस. मला तलमात तलम धागा विणून दाखव !’’
विणकराने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो धागा पाहिल्यावर त्या माणसाने तो जाड असल्याचे सांगितले. विणकराला राग आला पण त्याने तो आवरला व त्याला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी विणलेला धागा पाहून त्या माणसाने तोही जरा जाडसर असल्याचे सांगितल्यावर विणकराला आला राग. हवेत बोट दाखवून तो म्हणाला,
‘‘तो बघ तुला पाहिजे तसा धागा तेथे आहे.’’ हवेत काहीच न दिसल्यामुळे त्याने विचारले, ‘‘ कुठे आहे तो धागा? मला तर दिसला नाही’’
‘‘तो इतका तलम झाला आहे की नुसत्या नजरेस दिसणे शक्यच नाही’’ विणकराने उत्तर दिले.
त्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले.
‘‘या धाग्याचे एक वस्त्र विणून मला उद्या दे. ते मला राजाला भेट द्यायचे आहे’’ असे म्हणून त्या माणसाने त्याचे पैसे मोजले व तो तेथून निघून गेला.
आता हे स्पष्टच आहे की असा कोणताही धागा तेथे नव्हता व त्याचे पैसे मोजायचेही काही कारण नव्हते त्याचप्रमाणे महायानातील शून्यता या कल्पनेत/तत्वज्ञानात काहीच अर्थ नाही व त्यात वेळ घालविण्यात काही कारण नाही हे स्पष्ट आहे.’’
हे मात्र मला पटले पण कुमारजीवाला मात्र स्वत:च्या गुरुचे मतपरिवर्तन करण्यात नंतरच्या काळात यश मिळाले. त्याच्या म्हणण्यास मान्यता देऊन त्याच्या गुरुंनी महायानपंथाची शिकवण स्वीकारली.
३७९ साली एक सेंग-जुन नावाचा चीनी महंत कुचाला आला होता. त्याने कुमारजीवाची माहिती चीनच्या राजाला (सम्राट जिन. राजधानी : चँगॲन) एका अहवालात पाठविली. सम्राटाने तो अहवाल वाचून कुमारजीवाला चीनमधे आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळजवळ दोन दशके प्रयत्न करुन तो निराश झाला. हे प्रयत्न विफल झाले त्याला कारण होते सम्राटाचाच एक सेनापती लु-कुआंग. या सेनापतीने कुमारजीवाचे महत्व न ओळखता आल्यामुळे त्याला अटक करुन सतरा वर्षे तुरुंगात टाकले. (हा बौद्धधर्मिय नव्हता. तो धर्माच्या विरुद्ध होता का नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. काही जणांचे असेही म्हणणे आहे त्या काळात तो इतका ताकदवान झाला होता की त्याने जवळजवळ राजा विरुद्ध बंडच पुकारले होते.) राजदरबारातून कुमारजीवाला राजधानीत पाठविण्याचे सारखे आदेश निघत होते. इकडे कुमारजीवाने सर्वस्तीवादी विनयाचा अभ्यास सुरु केला होता. यावेळी त्याच्याबरोबर होता पंजाबमधील (किंवा उत्तर भारत म्हणूया) एक पंडीत ज्याचे नाव होते विमलाक्ष. (हा एक उत्तर भारतीय भिक्खू होता ज्याने कुचाच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. जेव्हा चिन्यांनी ३८३ मधे कुचावर हल्ला करुन ते काबीज केले तेव्हा याने तेथून पळ काढला. नंतर जेव्हा त्याला कुमारजीव चँगॲनमधे आहे हे कळले तेव्हा तोही चँगॲनला गेला. कुमारजीवाचा मृत्यु झाल्यावर याने तेथे बरेच काम केले. हा त्याच्या ७७व्या वर्षी तेथेच मृत्यु पावला)
३६६-४१६ या काळात त्सिन् घराण्याची सत्ता चँगॲनवर प्रस्थापित झाली. याचा एक राजा याओ त्सिंग हा बौद्धधर्माचा फार मोठा चाहता होता. त्याने या धर्माला उदार राजाश्रय दिला होता. असे म्हणतात त्याच्या काळात त्याने ३००० श्रमणांना सांभाळले होते. याच्या दरबारात प्रवेश मिळाल्यावर कुमारजीवाचे भाग्य उजळले. या राजाने त्याला त्याच्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची आज्ञा दिली व बौद्धधर्माचा चीनमधील मार्ग मोकळा झाला. एकदा राजाश्रय मिळाल्यावर कुमारजीवाने भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. त्याने जवळजवळ ९८ ते १०० बौद्ध संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. त्यातील काहींची नावे आपण अगोदरच पाहिली आहेत. त्याने स्वत: काही ग्रंथ रचले का नाही याबद्दल आजतरी काही माहिती उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. कुमारजीवाची मातृभाषा ना संस्कृत होती ना चीनी. तरीही त्याने हे भाषांतराचे काम पार पाडले याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित कुचामधे असताना त्याला चीनी भाषेची तोंडओळख झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे खरे मानले तरीही त्याने फार अवघड काम पार पाडले असेच म्हणावे लागेल.. संस्कृतमधून चीनी भाषेत भाषांतर करताना त्याने स्वत:ची एक स्वतंत्र शैली निर्माण केली त्यामुळे ती सगळी भाषांतरे ही चीनी भाषेतील मूळ लेखनच वाटते. असे म्हणतात की त्याची शैली ही ह्युएनत्संगपेक्षा श्रेष्ठ आहे. वरील ९८ ग्रंथाचे ४२५ भाग आहेत. यावरुन हे काम किती प्रचंड असेल याची कल्पना येते. यातील ४९ ग्रथांची नावे चीनी त्रिपिटिकात लिहून ठेवली आहेत त्याची नावे येथे विस्तारभयापोटी देत नाही. ही यादी आपण जर नीट पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की यात तांत्रिकविद्येवरील एकही ग्रंथ नाही. ह्युएनत्संगच्या काळात मात्र या विषयावरील ग्रंथांचा चीनमधे बराच बोलबाला झाला. त्याने अश्र्वघोष व नागार्जुन यांची चरित्रं लिहिली, ती चीनमधे बरीच लोकप्रिय झाली. कुमारजीवाची लोकप्रियता इतकी वाढली की असे म्हणतात त्या काळात त्याच्याकडे १००० श्रमण शिकत होते. फा-ईन हा त्याचाच एक शिष्य. याने भारतात जाऊन बुद्धाच्या सर्व पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या व कुमरजीवाच्या आज्ञेने त्याचे प्रवासवर्णन लिहिले. त्यानेही अनेक ग्रंथ भारतातून चीनमधे नेले. आपल्या शिष्याची किर्ती पाहण्यास कुमारजीवाचा गुरु विमलाक्ष चीनमधे आला पण दुर्दैवाने विमलाक्षाच्या आधी कुमारजीवाचा मृत्यु झाला. विमालाक्षाने आपल्या शिष्याचे काम पुढे नेले व ‘दशाध्याय विनय निदान’ नावाच्या ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. हेही वयाच्या ७७व्या वर्षी चीनमधे मरण पावले.
कुमारजीवाच्या काळात काश्मिरमधून अजून एक पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव होते पुण्यत्रात. यानेही कुमारजीवाच्या प्रभावाखाली दशाध्यायविनय व सर्वस्तिवाद् विनय या दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
एक लक्षात येते की काश्मिर भागातून अनेक श्रमण चीनमधे येतजात होते व तेथे अगोदरच स्थायिक झालेल्या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करीत होते. आता त्यांच्यापैकी काहींची नावे व त्यांचे काम पाहुया..
काश्मिरमधून या काळात जे काही पंडीत चीनमधे गेले त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१ बुद्धयास २ धर्मयास ३ धर्मक्षेम ४ बुद्धाजिवा आणि ५ धर्ममित्र.
बुद्धयासाने आकाशगर्भबोधिसत्व, दीर्घ आगाम व धर्मगुप्त विनयाचे सूत्राचे भाषांतर केले. ज्या चिनी इतिहासात या सर्व बौद्ध पंडितांचा उल्लेख किंवा व्यवस्थित नोंद केलेली आढळते. याचे नाव फो-थो-ये-शो असे आहे.
याच्या मागोमाग काश्मिरमधून आला पंडित धर्मयास. साधारणत: ४०७ साली. याने आठ वर्षात सव्याकरण सूत्र व सारिपुत्ताअभिमधर्म सूत्रांचे भाषांतर केले. ही सगळी त्रिपिटकात सामावलेली आहेत.
४१४ साली धर्मक्षेमाने चीनमधे पाऊल ठेवले. जरी तो काश्मिरातील पंडितांबरोबर चीनमधे आला असला तरी तो कश्मिरी नव्हता. तो होता मध्य भारतातील. चीनी सम्राटाने (सम्राट त्सू-खू-मान-सून्, उत्तर लिॲन घराणे) याला बौद्ध ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी खास आमंत्रण दिले होते म्हणजे हा किती ज्ञानी असेल याची कल्पना येते. त्यानेही भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. थोड्याच काळात त्याची किर्ती दूरवर पसरली आणि त्याला वी घराण्याच्या राजाकडून बोलाविणे आले. त्याने त्याला बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिले. पहिल्या राजानी परवानगी नाकारल्यावर या दोन सम्राटांमधे जी हाणामारी झाली त्यात बिचाऱ्या धर्मक्षेमास आपले प्राण गमवावे लागले. तो वीच्या राज्यात जात असताना त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले व त्याला ठार मारले गेले. त्याने भाषांतर केलेल्या अनेक ग्रंथांपैकी बारा शिल्लक आहेत. त्यातील काही महत्वाचे असे –
१ महविपूल सूत्र २ महाविपूलमहासानिपत्त सूत्र ३ महापरिनिर्वाण सूत्र
काश्मिरमधून अजुन एक पंडीत आला ज्याचे नाव होते बुद्धजिवा. हा साधारणत: ४२३ साली आला असावा. त्यानेही दोन महत्चाचे ग्रंथ चीनी भाषेत आणले ते म्हणजे महाशासक विनय आणि प्रतिमोक्ष महिशासक.
यानंतर या काळात काश्मिरमधून आलेला शेवटचा पंडीत होता धर्ममित्र. हा आला साधारणत: त्याच काळामधे. त्याने ४२३ ते ४४१ या काळात बरेच काम केले त्यातील महत्वाचे होते आकाशगर्भबोधीसत्वधारिणी सूत्र. हा वयाच्या ८२व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला.
आता आपण एका महत्वाच्या व लोकप्रिय पंडीताकडे वळूया.
काश्मिर ज्याला त्या काळात चिनी भाषेत कि-पिन असे नाव होते ( आत्ता आहे का हे माहीत नाही ) त्याने एक अत्यंत अनुभवी धर्मप्रसारक चीनमधे पाठविला. तो म्हणजे गुणवर्मन. हा धर्मप्रसाराच्या कामात अत्यंत वाकबगार होता. असे म्हणतात त्याने चीनला जाण्याआधी आख्खी जावा बेटे बौद्ध केली होती. जावा बेटात त्याने शुन्यापासून सुरुवात केली होती त्यामानाने चीनमधील काम सोपे होते. चीनमधील धर्मप्रसाराचे काम तसे सुरळीत चालले होते फक्त मधून मधून ताओ व कनफुशियसचा अनुयायी असणारा एखादा राजा गादीवर आला की बौद्धांवर अत्याचार व्हायचे. पण त्याच काळात बौद्धांची संख्या वाढली होती हेही नाकारता येत नाही. या कामास बुद्धाच्या भूमीवरुन सतत मदत मिळत होती हेही खर्ं. अशा काळात गुणवर्मनसारखा पंडीत चीन येथे आल्यावर बौद्धधर्मप्रसारकांची ताकद अजुन वाढली.
हा स्वत: काश्मिरच्या राजघराण्यातील होता. (काही जणांचे म्हणणे तो गांधारातील होता असेही आहे) दुर्दैवाने जरी यांचे घराणे काश्मिरवर अनेक वर्षे राज्य करीत असले तरी याचा जन्म झाल तेव्हा याच्या आजोबांना (हरिभद्र) त्यांच्या उपद्रवी मुल्यांमुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याकाळात राजेशाही असली तरी कशा प्रकारची होती हे या उदाहरणावरुन समजून यावे. प्रत्यक्ष राजाला हद्दपार करण्याची क्षमता त्या काळात मंत्रीगण व जनता बाळगून होते. मला वाटते पाचशे राजकर्त्यांना हाकलून देण्यापेक्षा हे सोपे असावे. त्यामुळे याचा जन्म जंगलातच झाला. गुणवर्मनाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला एक कोंबडा मारायला सांगितला. त्याने हे धम्माविरुद्ध आहे हे सांगितल्यावर साहजिकच त्याच्या आईला राग आला. ती म्हणाली,
‘‘ तू मार त्याला. जे काही पाप लागेल ते मी माझ्या शिरावर घेते. व त्यासाठी काही शिक्षा असेल तर तीही मी भोगेन.’’ दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर असेल, गुणवर्मनाचे बोट दिव्यावर भाजले. त्याने आईकडे धाव घेतली.
‘‘ माझ्या हाताची आगाआग होती आहे. या वेदना जरा तू घेतेस का ?’’
‘‘अरे हे तुझे शारीरिक दुखणे आहे. ते मी कसे घेऊ शकेन ?’’
हे ऐकल्यावर गुणवर्मनाने तिला तिच्या बोलण्याची आठवण करुन दिली.
असे म्हणतात जेव्हा गुणवर्मन १८ वर्षाचा झाला तेव्हा कोणीतरी भविष्यवाणी केली की तो लवकरच राजाधिपती होईल. नंतर दक्षिणेकडे जाईल व एक सन्यासी होईल. आणि खरोखरच ही भविष्यवाणी खरी ठरली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व तो श्रमण झाला. विसाव्या वर्षी त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला. लोक त्याल त्रिपिटकावरील अधिकारी पुरुष मानू लागले. तो तीस वर्षांचा असताना काश्मिरच्या राजाचा मृत्यु झाला. त्याच्या मंत्रीमंडळाने गुणवर्मन हा राजघराण्यातीलच असल्यामुळे त्यालाच राज्याभिषेक करायचे ठरविले. अर्थातच गुणवर्मनाने त्या मागणीला नम्रतापूर्वक नकार दिला व काश्मिर सोडले. तेथून तो श्रीलंकेला गेला. तेथे धम्माच्या कामाला त्याने वाहून घेतले व जावा बेटांवर पोहोचला. त्या काळात चीनी भाषेत जावा बेटांना चो-पो असे म्हणत. फा-ईनने थोडे आधी या बेटाना भेट दिली होती. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे की या बेटांवर हिंदू धर्माची पताका फडकत होती. गुणवर्मनाने मोठ्या कल्पकतेने व कष्टाने बौद्ध धर्माचा प्रचार केला व हिंदू धर्माचे प्राबल्य जवळजवळ नष्ट केले. जावामधे कलिंगाच्या राजांनी राज्यविस्तार केला होता. ( जावाच्या एका लोककथेत गुजराथमधील एका राजाने येथे सत्ता प्रस्थापित केली असाही उल्लेख आहे. ७५ साली. जेव्हा जावाबेटांवर न्यायपाल किंवा नायपाल नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा तेथे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते ज्याचे वर्णन अनेक चीनी बौद्ध धर्मगुरुंनी केले आहे. ते होते सुवर्णद्विप नावाच्या बेटावर. नालंदा विद्यापिठात प्रवेश करण्याआधी या संस्थेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागत असे. हे बहुदा गुणवर्मनने स्थापन केले असावे. खात्री नाही…)
गुणवर्मन येण्याआधी म्हणे जावाच्या राजाच्या आईला स्वप्न पडले होते की कोणी थोर महंत उद्या जावाच्या किनाऱ्यावर लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुणवर्मनची बोट तेथे लागली. तिच्या आग्रहाखातर राजा गुणवर्मनच्या स्वागतासाठी किबाऱ्यावर गेला आणि तिच्याच आग्रहाखातर त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. त्याने राजाज्ञा केली की
१ बौद्ध महंताचा अनादर कोणी करु नये.
२ कुठल्याही प्राण्याची हिंसा करु नये.
३ गरिबांना दानधर्म करावा.
यानंतर काहीच काळानंतर सारे जावा बौद्धधर्मीय झाले. जावामधील या यशानंतर गुणवर्मनाची किर्ती बौद्धजगतात पसरली. अर्थात चीनी श्रमणांच्या कानावर त्याची किर्ती पडली असणारच. ४२४ साली चीनी बौद्धजन आणि महंत वेन सम्राटाकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली की त्यांनी गुणवर्मनाला साँग प्रदेशात बौद्धधर्माच्या प्रसारासाठी बोलावून घ्यावे. त्याने त्याच्या त्या प्रदेशातील सरदारांना तशी आज्ञा केली. गुणवर्मन कसा नानकिंगला पोहोचला याची माहीती चीनी ग्रंथातून दिली गेली आहे. तो हिंदू-नंदी नावाच्या जहाजातून चीनच्या दिशेने रवाना झाला. त्याचे जहाज भरकटून दुसरीकडेच कुठेतरी लागले असे म्हणतात. आता ही व यासारखी सविस्तर माहिती चीनमधील कुठल्या ग्रंथातून मिळते हे पहाणे वावगे ठरणार नाही. खाली त्या ग्रंथांची नावे व काळ दिला आहे.
१ चू सानत्संग ची ची : लेखक : सेंग् यू, काळ : ५१५
२ शेन सेंग चुआन : लेखक : अज्ञात, काळ : १४१७
३ फा युआन चू लिन: लेखक : ताऊ शिह, काळ: ६६८
४ कू यिन ई चिंग तूची: लेखक: शिंग माई, काळ: ६६४
५ काय युआन चे चियाओ लू : लेखक : त्शे चिंग, काळ: ७३० ( याच काळात अनेक भाषांतरे नष्ट झाली आहेत.
६ चेंग युआन सिन तिंग चे चियाओ मूलू : लेखक: युआन चाओ, काळ: ७००
७ लि ताय सानपाओची : लेखक: फेईचँगफँग, काळ: ५९७
८ ता टँग नी तिएन लू : लेखक : ताऊ हुआन, काळ‘ ७००
९ फॅन-ई-मिंग-ई-ची : लेखक : फायुन, काळ : १२००
१० फुत्झूतुंग ची : लेखक : ची, पान काळ: १३००
११ चिशेन चाऊ सानपाओ कान तुंग लू : लेखक अज्ञात, काळ : १३००
म्हणजे चीनी दरबारातून या सर्व बौद्ध महंतांची चरित्रे लिहून ठेवण्यात आली. आहेत. मला वाटते आपल्याकडे ही लिहिलेली असावीत व बरिचशी नालंदाला लावलेल्या आगीत नष्ट झाली असवीत. अर्थात सगळ्यात जुने जे पुस्तक आहे त्यातीलच बरीचशी माहिती नंतरच्या पुस्तकात आढळते. असो.
चीनी सम्राटाला गुणवर्मन चीनच्या किनाऱ्याला लागल्याची खबर मिळताच त्याने त्याच्या सरदारांना त्याला कसलाही त्रस होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली व त्याला त्वरित राजधानीस पाठविण्यास सांगितले. त्याचा हा रस्ता चे-हिंग नावाच्या राज्यातून जात होता. येथे गुणवर्मन एक वर्षभर राहिला. या प्रदेशाचा राजा/सरदार मरायला टेकला होता. गुणवर्मनाने त्याला धम्म सांगून त्याचे चित्त थाऱ्यावर आणले असे म्हणतात.
सम्राट गुणवर्मनला भेटण्यास अतिशय आतुर झाल्यामुळे त्याने त्याला ताबडतोब नानकिंगला येण्याची विनंती केली. ४३१ मधे (महिना माहीत नाही) गुणवर्मन नानजिंगला पोहोचला. वेन घराण्याच्या सम्राटाने स्वत: पुढे जाऊन त्याचे स्वागत केले. भेटल्यावर सम्राटाने त्याला काही प्रश्र्न विचारले. त्यातील एक असा होता,
‘‘ बुद्धाच्या शिकवणीनुसार मी अहिंसेचे पालन करतो पण काही वेळा मला त्याचे पालन करता येत नाही. अशा वेळी काय करावे हे मला कळत नाही. कुपया याबाबत मार्गदर्शन करावे.’’
त्याने त्याचे काय प्रबोधन केले ते मला माहीत नाही परंतू राजाचे समाधान झाले असावे कारण लगेचच गुणवर्मन यांची राहण्याची सोय जेतवन विहारात केली. या येथे राहून गुणवर्मन यांनी लगेचच बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. प्रथम त्यांनी विहारामधे सद्धर्म पुंडरिक सूत्र व दक्षाभूमी सूत्रावर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याच्याच एका शिष्याने त्यांना ती प्रवचने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे सुचविल्यावर त्यांनी एकूण तीस भागात ती लिहिली व प्रसिद्ध केली. त्यातील दोन त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली आहेत. त्याच काळात त्या विहारात एक इश्र्वर नावाचा महंत शा-सिन नावाचा एक ग्रंथ लिहित होता पण काही अडचणींमुळे त्याने ते काम अर्धवट सोडले होते. गुणवर्मन यांनी ते काम पूर्ण करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे शेवटचे १३ भाग त्यांनी पूर्ण केले असे म्हणतात.
गुणवर्मन यांच्या काळात बौद्ध भिक्षुणींचा एक प्रश्र्न सोडविण्यात आला. त्याची हकिकत अशी :
जेव्हा गुणवर्मन नानजिंगला पोहोचला तेव्हा ज्या विहारात त्यांची सोय करण्यात आली होती तेथे एका बांबूच्या बेटापाशी त्याचे मन अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तेथेच आपली दिक्षाभूमी उभारली. या दिक्षाभूमीवर ते चीनी जनतेला बौद्धधर्माची दिक्षा देत असत. (चीनी महंतांनी गुणवर्मन या नावाचा अर्थ लावला तो असा : ज्याने गुणांचे चिलखत परिधान केले आहे असा. या माणसाने खरोखरीच गुणांचे चिलखत परिधान केले होते. सम्राटाच्या एवढ्या जवळ असून त्याच्या हातून कधीही काहीही वावगे घडले नाही.) ४२९ साली आठ भिक्षुणी श्रीलंकेवरुन एका जहाजातून नानजिंगला अवतरल्या. त्यांनी यिंगफू नावाच्या मठात आश्रय घेतला. तीन वर्षे त्या तेथेच होत्या. त्या काळात त्यांनी चीनी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले. त्यांनी स्थानिक भिक्षुणींना विचारले,
‘‘ येथे पूर्वी कधी भिक्षुणी आल्या होत्या का ?’’
‘‘ श्रमण व भिक्षू आले होते पण भिक्षुणी प्रथमच आल्या आहेत’’
हे उत्तर ऐकल्यावर त्या भिक्षुणी चमकल्या. कारण स्त्रियांना दिक्षा देण्यासाठी भिक्षुणी आणि महंत दोन्हीची गरज असते.
‘‘जर तुमच्या गुरुंना पूर्वी दिक्षा मिळाली असेल तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे होते.’’
त्या भिक्षुणींना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांना त्यांची दिक्षा वैध नाही कळल्यावर अतोनात दु:ख झाले. त्यांनी गुणवर्मन यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गुणवर्मन यांनी त्या स्त्रियांना दिक्षा देण्याची तयारी दाखविली व नंदी जहाजाच्या नाखव्याला श्रीलंकेतून अजून भिक्षुणींना घेऊन येण्याची विनंती केली. तसेच या ज्या श्रीलंकेवरुन आठ जणी आल्या होत्या त्यांना चीनी भाषेचा अभ्यास करण्यास सांगितले म्हणजे त्यांनी चीनी स्त्रियांशी बोलून त्या दिक्षा घेण्यास सक्षम आहेत का हे कळेल. असे म्हणतात नंदी जहाज दहा वर्षांनंतर अजून दहा भिक्षुणींना घेऊन नानजिंगला परतलं आणि आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तिनशे चीनी स्त्रियांना दिक्षा देण्यात आली. अशा रितीने चीनी भिक्षुणींचा संघ अस्तित्वात आला. आता या संघासाठी नियम करणे आले. यिंग-फाऊ मठाच्या भिक्षुणी गुणवर्मन यांच्याकडे आल्या आणि त्यांनी प्रर्थना केली. आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तेही काम पूर्ण करण्यात आले. (या गोष्टीमधे काळाचा जरा गोंधळ झाला आहे असे मला वाटते)
जेव्हा गुणवर्मन प्रवचनांमधे ताओ आणि कनफ्युशियस यांच्या तत्वज्ञानातील उदाहरणे देत असे तेव्हा काही श्रमणांनी त्यांना विचारले, ‘‘ हे कसे काय ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘ चीनी सामान्यजनांना ज्या भाषेत कळते तीच भाषा वापरायला पाहिजे नाहीतर बहिऱ्यांसमोर पाच स्वर आळविल्यासारखे किंवा आंधळ्यांसमोर पाच रंगाचे वर्णण केल्यासारखे होईल.’’
याने भाषांतर केलेल्या ग्रंथाची संख्या जास्त नसली तरी त्याच्या कनवाळूपणामुळे तो सामान्यजनात फार लोकप्रिय होता. नानजिंगला असताना तो महायान पंथातील दोन सूत्रांवर प्रवचने देत असे. एक होते अवात्माशकसूत्र आणि दुसरे दशभूमिकासूत्र.
एक दिवस प्रवचने देऊन झाल्यावर हा ज्ञानी पंडीत आपल्या निवासस्थानी परत गेला. त्याच्या मागे त्याचे शिष्य काही शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी गेले असता गुणवर्मन त्यांना मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या समोर एक ३० श्लोकांचे सूत्र पडले होते ज्यात ‘‘ हे सूत्र माझ्या निधनानंतर भारतात व चीनमधे प्रसिद्ध करावे अशी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी यांचे वय होते सदुसष्ठ….
….त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा अंत्यविधी दिक्षाभूमीवर भारतीय पद्धतीने करण्यात आला. नाहीतर तो सामान्यपणे दिक्षाभूमीपुढे करण्यात येतो…
यानंतरच्या काळातही बरेच महत्वाचे महंत चीनमधे आले…उदा. गुणभद्र, धर्मजात यास, खिऊ-ना-फी-ती व चाऊ फा कियू…. त्यांच्याबद्दल पुढील भागात…
या भागासाठी श्री बोस यांच्या लिखाणाचा व इतर रिसर्च पेपर्सचा आधार घेण्यात आला आहे.
गुणवर्मन जावाबेटातून चीनमधे आले त्यानंतर अंदाजे चार वर्षांनी मध्य भारतातून गुणभद्राने चीनमधे पाऊल ठेवले. याचा जन्म एका ब्राह्मणकुटुंबात झाला होता. याने महायान पंथाचा इतका खोलवर अभ्यास केला होता की लोक त्याला ‘‘महायान’’ या टोपणनावानेच ओळखू लागले. याचा चीनमधे येण्याचा काळ चीनी ग्रंथात ४३५ असा नमूद केला आहे. याने आठ वर्षात ७८ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. दुर्दैवाने यातील फक्त २८ ग्रंथ वाचले व उरलेले काळाच्या ओघात नष्ट झाले. हा पंडित वयाच्या ७८ व्या वर्षी चीनेमधेच मृत्यु पावला. याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे. ही नावे मी देत आहे कारण पुढे कधी कोणाला ही नावे लागली तर ती एके ठिकाणी सापडावीत.
१ श्रीमालादेवीसिंहनाद
२ संधीनिर्मोचनसूत्र
३ रत्नकारंदकव्युहसूत्र
४ लंकावतातसूत्र
५ कर्माच्या आड येणारे अडथळे दूर कसे करावेत या संबंधी मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ..
एक लक्षात घ्यावे लागेल की हे सर्व पंडीत लहानपणापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सुरवातीस जरी पाठांतरावर भर असायचा तरी थोड्याच काळानंतर त्या सूत्रांचा त्यांनी सखोल अर्थ शोधला असणार. शिवाय नंतर संघात जी वादविवाद करण्याची एक विशिष्ट पद्धत होती/असते त्यामुळे या सर्व श्रमणांची मते चांगली ढवळून निघायची. शिवाय एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वसामान्य भिख्खू होते तसे अत्यंत बुद्धीमान श्रमणही होतेच. आणि जे ब्राह्मण पंडीत ज्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यांना सर्व ज्ञान कसे जतन करायचे याचे चांगलेच ज्ञान होते.
गुणभद्रानंतर चीनमधे आला चाऊ फा कीन. याचे भारतीय नाव माहीत नाही. याने सहा ग्रंथांचे भाषांतर केले पण ते नंतर कुठेही सापडले नाहीत ना त्यावरील टीका सापडली. एका ठिकाणी हे ग्रंथ ७३० साली नष्ट झाले अशी नोंद आढळते. या ७३० साली असे काय घडले होते की बरेच बौद्ध ग्रंथ या वर्षी नष्ट झाले असा उल्लेख आढळतो. यावर कोणीतरी संशोधन केले पाहिजे.
४८१ साली अजून एक भारतीय पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव धर्मजालायास्स. हाही मध्य भारतातून आला. याचे भाषांतरातील योगदान विशेष नाही. पण याने एका ग्रंथाचे भाषांतर केले त्याचे नाव आहे अमितार्थसूत्र.
यानंतर पाचव्या शतकातील शेवटचा पंडीत जो चीनमधे आला त्याचे नाव होते गुणवृद्धी. हाही मध्यभारतातून आला होता. याने तीन वर्षात तीन ग्रंथांचे सहा भागात भाषांतर केले. त्यातील दोनच आज माहीत आहेत. १ सुदत्तसूत्र २ एक सूत्र ज्यात शंभर सूत्रांचा तौलनिक अभ्यास केला आहे.
आपण प्रथम पाहिले की काश्मिर व आफगाणिस्थानमधून हे पंडीत जात होते.
(अफगाणिस्थानमधे काहीच काळापूर्वी जे मेस आयनाक नावाचे शहर सापडले त्याबद्दल वाचल्यावर पूर्ण अफगाणिस्थान हा कसा बौद्धधर्मिय होता आणि तेथे अमेक बौद्धमठ कसे होते याची कल्पना यावी. याबद्दल विकीवर माहिती उपलब्ध आहे. व त्यावर एक माहितीपटही आहे. तो जरुर बघावा.) नंतर मध्यभारतातून ते जाऊ लागले. आता याच्या पुढच्या काळात दक्षिण भारतातून काही पंडीत जाणार होते. पहिला होता धर्मरुची. यांनी कुमारजिवांना त्यांच्या कामात मदत केली आणि स्वत: दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ श्रद्धाबलधानावतार मुद्रा सूत्र आणि २ सर्व बुद्धविषय अवतार सूत्र.. हा मठांच्या नियमांचा तज्ञ होता. हे नियम चीनमधील इतर मठांतून शिकविण्यासाठी फिरताना हा चँगॲनमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाने त्याच्याबद्दल परत काहीही ऐकू आले नाही….
रत्नमती…

यानंतर मध्यभारतातून रत्नमती नावाचा पंडीत चीनमधे आला. याने तीन ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील एक होता, महायानोत्तरतंत्रशास्त्र. चीनमधील तांत्रिक पंथाचा हा पहिला उल्लेख आहे. याचा अर्थ हा चीनमधे येण्याआधी या शास्त्राचा चीनमधे चंचूप्रवेश झाला असणार. आपल्या प्रसिद्ध ह्युएनत्संगला या विषयात फार रस होता. याबरोबर धारिणींचा व तंत्रमंत्रांचा चीनीजनमानसात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही. याने भाषांतर केलेला दुसरा ग्रंथ होता सद्धर्मपुंडरिकसूत्र शास्त्र.
त्याच वर्षी अजून एक थोर भाषांतरकार चीनमधे आला. त्याचे नाव होते बोधीरुची. हा उत्तर भारतातून चीनला गेला असे म्हणतात. पण याने भाषांतरावर जास्त भर न देता धर्मप्रसाराच्या कामाला वाहून घेतले. तरीसुद्धा त्याने २७ वर्षात ३० भाषांतरे केली आणि त्यातील जवळजवळ सगळी आज उपलब्ध आहेत. अर्थात चीमनमधे. त्यातील काहींची नावे आहेत, १ लंकावतारासूत्र २ गयाशिर्ष ३ रत्नकुट ४ विद्यामात्रासिद्धिसूत्र ५ सताक्षरासूत्र.
५२४ साली बुद्धशांत नावाचा एक पंडीत चीनमधे आला त्याने चीनमधे अंदाजे २५ वर्षे व्यतीत केली असावीत असा अंदाज आहे. त्याने भाषांतर केलेले काही ग्रंथ आहेत, १ धशधर्मक २ अशोकदत्तव्याकरण ३ सिंहनाडीकासूत्र.. यानंतर प्राचीन नगरी बनारसमधून एक पंडीत चीनला गेला. त्याचे नाव होते गौतम प्राज्ञऋषी. याने तीन वर्षात १८ भाषांतरे केली. यातील बरीच ७३० सालापर्यंत उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे पण आता फक्त १३ ग्रंथांचाच उल्लेख सापडतो. त्याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे आहेत, १ व्यासपरीप्रिच्छा २ विमलदत्तापरिप्रिच्छा ३ एकश्लोकशास्त्र व चौथे अष्ठबुद्धकसूत्र.
त्या काळात राजा, राजापूत्र, राण्या, सरदार, श्रीमंत व्यापारी यांनी बौद्धधर्म स्विकारुन संघात प्रवेश घेतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आता राजाने राज्य कारभार सोडून संन्यास घ्यावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल कदाचित पण बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव प्रचंड होता याबद्दल दुमत असायचे कारण नाही. सर्वसंसार परित्याग करुन हे महान लोक सहजपणे श्रमण होत व धम्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत. याचे एक उदाहरण म्हणजे उद्यानच्या राजाच्या एका मुलाने सिंहासनाचा त्याग करुन संघाची वाट धरली होती. हे राज्य सध्याच्या गिलगिट भागात असावे. या राजपुत्राचे नाव होते उपशुन्य. त्याने नंतर चीनची वाट धरली. त्याने एकूण पाच ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील दोन आहेत, १ विमलकिर्तीनिर्देश २ सुविक्रांतविक्रमी सूत्र. याच भागातून अजून एक पंडीत चीनला गेला त्याचे नाव होते, विमोक्षप्रज्ञऋषी. हा कपिलवस्तूतील एका शाक्य कुटुंबातील होता. याने गौतमप्रज्ञऋषी नावाच्या दुसऱ्या एका महंताबरोबर पाच ग्रंथांवर काम केले. त्यातील दोन आहेत, १ विवादसमानशास्त्र २ त्रिपूर्णसूत्रोपदेश
सहावे शतक :
या काळात नरेंद्रयास, जिनगुप्त व त्यांचे आचार्य जिनयास्स व ज्ञानभद्र या महंतांनी चीनच्या बौद्धधर्मावर बराच प्रभाव टाकला. किंबहुना असे म्हणवे लागेल की जे काही बौद्धधर्माचे स्वरुप आज चीनमधे दिसते त्याचा पाया या महंतांनीच घातला. या काळात बौद्धधर्मप्रसारकांना चीनमधे फार छळ सहन करावा लागला. त्याकाळात चीनमधे अनेक घराणी विविध प्रदेशांवर राज्य करुन गेली. क्वचितच एखादे घराणे दीर्घकाळ राज्य करीत असे. धम्मद्वेष्टा राजा गादीवर आला की हे महंत अज्ञातवासात जात असत, लपून बसत व बौद्धधर्माचा पाठिराखा गादीवर आल्यावर परत आपले काम जोमात सुरु करीत.
यानंतर एक महत्वाचा महंत चीनमधे आला त्याचे नाव होते परमार्थ. या बौद्ध धर्मगुरुबद्दल बरीच माहिती चीनी ग्रंथात आढळते. हा नानजिंगला अंदाजे ५४८ साली आला. तो चीनमधे २१ वर्षे राहिला. तेवढ्या काळात त्याने एकूण ४० भाषांतरे केली. हा अंदाजे ५६९ साली मृत्यु पावला तेव्हा त्याचे वय होते ७१. भाषांतरामधे त्याचा क्रमांक चौथा लागतो. पहिले तीन आपण पाहिलेच आहेत. त्याने भाषांतरीत केलेल्या ग्रंथांवर प्रवचने दिली ती त्याच्या एका शिष्याने लिहून ठेवली. गंमत म्हणजे ती अस्सल चीनी भाषेत असल्यामुळे ती मूळ भाषांतरांपेक्षा मोठी झाली आहेत पण ती अचूक आहेत असे म्हणता येईल.
याचे अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे त्याने चीनी भाषिकांना समजेल अशी भाषा त्याच्या प्रवचनात व लेखनात वापरण्यास सुरुवात केली. त्याची काही उदाहरणे आपण नंतर वाचूयात. अगोदर तो कोण होता, कुठला होता हे आपण पाहू.
परमार्थ याचा एक लाडका चीनी शिष्य होता, ज्याचे नाव होते हुई-काई. याच्या भाच्याने परमार्थाचे एक चरित्र लिहिले होते. याच्यातून थोडीफार जी माहिती मिळते त्यातून हे स्पष्ट होते की हा चीनी नव्हता तर भारतीय होता. याचे पुर्वाश्रमीचे नाव होते कुलनाथ. याचा जन्म झाला होता मध्यभारतातील उज्जैनमधे. हा जन्माने ब्राह्मण असून त्याचे गोत्र भारद्वाज होते. त्या ग्रंथात लिहिले आहे की त्याची नितिमत्ता अत्यंत उंच दर्जाची होती. त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. साहित्य, जादू, चित्रकला व हस्तकलेमधे याने चांगले प्राविण्य मिळविले होते. परमार्थाने तारुण्यात काय केले याबद्दल कुठेही विशेष माहिती मिळत नाही. परंतू तो काळ त्याने निव्वळ अभ्यासात व्यतीत केला असावा. अनेक देश विदेशांचा प्रवास करीत त्याने फुनानमधे मुक्काम ठोकला. फुनान म्हणजे आत्ताचे दक्षिण व्हिएटनाम. (मेकाँग नदीचे खोरे) हा भाग त्याकाळात पूर्णपणे हिंदू होता. त्याकाळी चीनमधे राज्य करीत असलेल्या लिअँग घराण्याच्या वू नावाच्या राजाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अतोनात संपत्ती खर्च केली होती.
सम्राट वू

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशोदेशीचे अनेक बुद्धिमान महंत तो स्वखर्चाने चीनला आणत असे. या सम्राटाला जन्म-मृत्युच्या चक्रात अडकण्याची प्रचंड भिती वाटत असे. महायानामधे यावर काहीतरी उपाय सापडेल या आशेने त्याने अशा महंतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच शोधात फुनानमधून त्याला हे रत्न हाती लागले. ही माहिती खरी असावी कारण हा ग्रंथ ५९७ साली लिहिण्यात आला होता म्हणजे परमार्थ चीनला आल्यानंतर जेमतेम साठ वर्षांनी. या लेखकाचे नाव होते पाओ-कुई. याचाही मृत्यु परमार्थाच्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी झाला. त्यामुळे या लेखकाने लिहिलेली ही माहिती बऱ्यापैकी विश्र्वसनीय आहे. अलिकडे सापडलेल्या काही ग्रंथात परमार्थच्या चीनच्या प्रवासाची माहिती आढळते. त्यात सम्राट वूने मगधाच्या दरबारात काही प्रतिनिधी सूत्रे व ग्रंथ मिळविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळेस त्या प्रतिनिधींची गाठ कुलनाथाशी पडली. त्याने प्रथम चीनला जाण्यास ठाम नकार दिला पण बऱ्याच प्रयत्नांनंतर तो त्याच्या एका शिष्याबरोबर चीनला जाण्यासाठी जहाजात चढला. त्या शिष्याचे नावही दिले आहे – गौतम. त्यावेळेस त्याने मगध सम्राटाकडून लाकडात कोरलेली बुद्धाचे एक प्रतिमा चीनी सम्राटासाठी बरोबर घेतली. असे म्हणतात या प्रतिमेची नक्कलच मग सर्वदूर बुद्धाचे चित्र म्हणून प्रसारीत झाली.
परमार्थ नान्हाईला २५ सप्टेंबर ५४४६ या दिवशी पोहोचला. नान्हाई म्हणजे हल्लीचे कॅन्टन किंवा ग्वाझाऊ. ज्याचा चिनी अर्थ आहे तांदूळाचे शहर. जेव्हा तो दरबारात पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वत: सम्राट पुढे आला. एवढेच नव्हे तर आपल्याला वाचून आश्र्चर्य वाटेल, सम्राटाने परमार्थाला साष्टांग नमस्कार घातला. सम्राटाचे वय त्यावेळेस होते ८५. असे आजवर चीनमधे कधीच घडले नव्हते. त्यानंतर सम्राटाने परमार्थाशी एका मठात (पाओ-युन) चर्चा केली. दुर्दैवाने परमार्थाला सम्राटाविरुद्ध चाललेल्या बंडाळीची कल्पना आली नाही. टोबा जमातीच्या हौ-चिंग नावाच्या एका नेत्याने सम्राटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या रणधुमाळीत सम्राट वूची उपासमार करुन त्याचे हत्या करण्यात आली. त्या अगोदर परमार्थाला जेमतेम दहा महिने राजाश्रय मिळाला असेल नसेल. त्याने नानकिंगमधून पळ काढला व तो नानकिंगच्या आग्नेय दिशेला १५०० मैलावर असलेल्या सिॲओ पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे फुचुन प्रांताचा अधिपती असलेल्या लु-युआन-चे नावाच्या सरदाराने त्याला आश्रय दिला. यानेही नुकताच बौद्धधर्म स्विकारला होता. तेथे राजाश्रय मिळाल्यावर परमार्थाने परत एकदा आपले भाषांतराचे काम सुरु केले. त्यावेळेस अशा धामधुमीच्या कालातही त्याच्या हाताखाली वीस तज्ञ काम करीत होते यावरुन या कामाचे महत्व लक्षात येते. दुर्दैवाने यातील बरेच ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाले आहेत.
ज्या बंडखोराने वू सम्राटाची हत्या केली होती, अनेक मठ उध्वस्त केले होते त्याला आता बौद्धजनांचा पाठिंबा आवश्यक वाटू लागला. बौद्ध जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्याला बौद्धधर्मियांमधे मान आहे अशा परमार्थाला राजधानीत येण्याचे आमंत्रण दिले. नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता. यात हाऊ-चिंगचा दुसराही एक उद्देश होता. परमार्थाला जवळ ठेवून त्याच्यावर लक्षही ठेवता येणार होते व बौद्धधर्माचा अभ्यास त्याच्या दरबारी चालू आहे असा देखावाही ऊभा करत येणार होता. असो. परमार्थ राजधानीत पोहोचला. चारवर्षापूर्वी त्याने याच दरबारात मानाने पाऊल ठेवले होते. चार महिने हाऊ चिंगच्या दरबारात स्थानबद्धतेत काढल्यावर परत एकदा सत्ताबदल व रक्तपात परमार्थास पाहण्यास मिळाला. त्यानंतर सम्राट युआनच्या काळात मात्र परमार्थाने शहाणपणा करुन दरबार सोडला व नानकिंग शहरात चेंग-कुआनच्या मठात आसरा घेतला. तेथे त्याने सुवर्णप्रभाससूत्राचे भाषांतर केले. नंतरच्या काळात त्याने चीनमधे बराच प्रवास केला. त्याचे वर्णन करणे शक्य आहे पण वाचकांना कदाचित ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे म्हणून ते येथे देत नाही. पण प्रवासात पाओशिएन मठात त्याने मैत्रेयसूत्राचे व अजून एका सूत्राचे भाषांतर केले. दहा वर्षे प्रवास केल्यानंतर परमार्थाला आता घरी जाण्याची ओढ लागली असावी…. त्याच्या चरित्रात लेखक लिहितो…
‘‘ बौद्धधर्माचा एवढा प्रचंड अभ्यास केल्यानंतर, त्याच्या प्रसारासाठी एवढी पायपीट व समुद्र पार केल्यानंतर हळुहळु त्याला उमगले की त्याला जे पाहिजे होते ते या शिकवणीत मिळत नाही. बौद्धधर्माची शिकवण अपूर्ण आहे हे उमगताच तो खचला. खिन्नतेने त्याच्या विचारांवर मात केली. त्याने लंकासुखाला (मलेशियाला) जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी व शिष्यांनी त्याला तेथेच राहाण्याचा इतका आग्रह केला की त्यांचे मन त्याला मोडवेना. त्याने जहाजात चढण्याचा निर्णय रद्द केला व परत एकदा भाषांतराच्या कामाला लागला…. चीन सोडण्याचा विचार नंतर त्याच्या मनात अजून एकदा आला व त्यावेळी तो एका छोट्या बोटीतून प्रवासाला लागलाही पण त्याच्या दुर्दैवाने ती बोट उलट फिरलेल्या वाऱ्यामुळे परत किनाऱ्याला लागली. शेवटी शेवटी तर या सगळ्याचा कंटाळा येऊन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कँटनच्या उत्तरेला असलेल्या पर्वतात तो आत्महत्या करण्यास गेला असता त्याचा एक शिष्य अभिकोषधर्मावर प्रवचन देत होता. त्याला हे कळल्यावर त्याने डोंगरात धाव घेतली. असे म्हणतात तेथे खरोखरच पाठ शिवणीचा खेळ झाला. त्या प्रांताच्या राज्याधिकाऱ्यानेही काही सैनिक पाठविले व स्वत: तेथे हजर झाला. त्याने तर त्याच्यापुढे चक्क लोटांगण घातले व शेवटी काही दिवसांनी परमार्थाची मानसिक स्थिती मूळपदावर आली. दुर्दैवाने या आलेल्या झटक्यानंतर त्याचा अत्यंत लाडका शिष्य, हुई-काई एका आजारात मृत्युमुखी पडला. तो धक्का सहन न होऊन परमार्थही आजारी पडला व त्या आजारपणातच त्याचा अंत झाला. तेव्हा त्याचे वय होते ७१. दिवस होता १२ फेब्रुवारी ५६९. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार कँटनच्या बाहेर उरकण्यात आला व तेथे एक त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्तूपही उभारण्यात आला…
परमार्थाचे चीनीबौद्धधर्मातील व चीनी बौद्धजिवनातील योगदान काय यावर आपण थोडीशी माहिती घेऊ.
चीनमधे सहाव्या शतकात बरीच जुनीपुराणी माहिती गोळा करुन ग्रंथ लिहिण्यात आले.. एकाचे नाव होते काओ-सेंग-शुआन..म्हणजे थोर बौद्ध भिख्खूंची चरित्रे. यात या महंतांच्या तत्वज्ञाची माहिती तर आहेच पण ते सामान्य माणूस म्हणून कसे होते याबद्दलही माहिती आहे. दुसरा होता सु-काओ-सेंग चुआन, हा या ग्रंथाचा दुसरा भाग होता. या दोन्ही ग्रंथांवर फ्रेंच तज्ञांनी अतोनात कष्ट घेऊन काम केले आहे. आज या महंत/पंडीतांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती या ग्रंथांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे बेतलेली आहे.
लिअँग आणि चेन घराण्याची सत्ता असताना जी काही राजकीय उलथापालथ झाली त्यात परमार्थाने उच्चवर्गातील चीनी बुद्धिवंतांना योगाचाराची दिक्षा दिली. त्यांच्यामधे योगाचाराची गोडी निर्माण केली. त्याचा प्रभाव पार ह्युएनत्संगपर्यंत टिकला. आपल्याला कल्पना असेलच ह्युएनत्संगने योगाचाराचे एक विद्यापीठच काढले होते. हिंदूंचा योगाभ्यास आणि बौद्धांचा योगाचारामधे बराच फरक आहे. पण योगाचाराचा पाया योगाभ्यासच आहे असे मला वाटते. कारण चौथ्या-पाचव्या शतकात दोन ब्राह्मण बंधूंनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यांचा योगाभ्यास झालेला असणार. त्यांची नावे होती आसंग व वसूबंधू. यातील वसूबंधू हा पहिला योगाचारी म्हणून ओळखला जातो. चीनला जाण्याआधी परमार्थावर या दोघांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला असणार. (परमार्थांचा जन्म वसूबंधू नंतर १५० वर्षांनी झाला) किंवा म्हणूनच त्याला योगाचारात रस निर्माण झाला असावा. शिवाय वल्लभींच्या राज्यात तोपर्यंत योगाचाराच्या एका विद्यापीठाची अगोदरच स्थापना झाली होती. आपल्याकडे परंपरा जपण्याची तेव्हाची पद्धत लक्षात घेता परमार्थावर वसूबंधूचा प्रभाव पडणे सहज शक्य आहे. एक लक्षात घेतले पाहिजे हे तिघेही योगाचारी होण्याआधी महायानी होतेच. परमार्थाला ‘जाणीवेतून केलेले कर्म आणि त्या दोन्हीचे अध्यात्मिक साक्षात्काराशी असलेले नाते’ याचे विश्र्लेषण करण्यात अत्यंत रस होता. तो विचारे, ‘‘जर मनुष्य स्वभाव मूळत: चांगला आहे व प्रत्येकजण अध्यात्मिक साक्षात्कारास पात्र आहे तर मग मनुष्यप्राणी यावर विश्र्वास का ठेवत नाही आणि साक्षात्कारी माणसांसारखे का वागत नाहीत?’’ महायनाच्या मुळापाशी हाच प्रश्र्न आहे आणि ज्यावर परमार्थाने आयुष्यभर विचार केला. शेवटी काय झाले हे आपण पाहिलेच आहे. योगाचारामुळे त्याच्यावर चीनमधे भरपूर टीकाही झाली पण शेवटी ताओवाद्यांना व कनफ्युशियस तत्वज्ञानी यांच्यावरही योगाचाराचा थोडासा का होईना प्रभाव पडलाच. हे यश परमार्थाचेच म्हणावे लागेल. हे तत्वज्ञान परदेशातील लोकांना सांगणे किती अवघड आहे हे आपणाला माहितच आहे. उदा. पाश्चिमात्य तत्वज्ञानात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे जो बघतो ते सब्जेक्ट आणि जे दिसते ते ऑब्जेक्ट. पण योगाचारामधे ग्राहक आणि ग्राह्य ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत आकलक आणि आकलन. तुम्ही एखादी वस्तू बघितलीत पण त्याचे आकलन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एखादा रंगांधळा लाल रंगाला करडा रंग म्हणतो तर तुम्ही लाल….मला हे थोडक्यात चांगले समजवून सांगता येणे अवघड आहे. पण हा सर्व चित्ताच्या पटलावरील प्रतिमांचा खेळ आहे असे योगाचारी त्या काळात मानत. उदा मी डोळे मिटले मग माझ्यापुरता समोरचा डोंगर अस्तित्वात नाही…इ.इ.इ. आत्ताचे माहीत नाही. त्यातही बराच बदल झालाच असेल. असो. तर असे हे तत्वज्ञान त्या धामधुमीच्या काळात चीनी बुद्धिमान लोकांना समजवून सांगणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करु शकतो. शिवाय हे सगळे चीनी भाषेत.
उज्जैनचा हा ब्राह्मण श्रमण होतो. धम्माचा अभ्यास करतो. त्यातूनही अवघड अशा योगाचाराचा अभ्यास करुन परदेशी जातो, व तेथे भव्य, दिव्य कार्य करतो…याचे काय स्मारक उज्जैन मधे आहे? त्याचे कोणी वंशज आहेत का? त्याच्या तारुण्यातील वर्षांचा हिशेब लागत नाही तो लागेल का ? असे अनेक प्रश्र्न माझ्या मनात येतात. मीही कल्पनेने त्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो…..
यानंतर चीनमधे आला नरेंद्रयास्स.
नरेंद्रयास्स यांचे चरित्र आपल्याला चीनी सिऊ काओ सेंग त्सुआन या ग्रंथात वाचण्यास मिळते. हा उद्यानचा रहिवासी होता. याने भारतभर प्रवास केला होता. तो श्रीलंकेलाही जाऊन आला. त्यानंतर त्याने चीनला जाण्याचे ठरविले. पाच सहाय्यकांबरोबर त्याने हिंदूकुश पर्वत रांगा चढण्यास सुरुवात केली. लवकरव त्यांच्या समोर दोन रस्ते उभे ठाकले. एक रस्ता जो अत्यंत कठीण होता तो माणसांसाठी होता आणि जो सोपा होता त्यावर राक्षसांचा वास होता. म्हणजे बहुदा चोर, दरोडेखोरंच्या टोळ्या यांचा वास असावा. बरेच वाटसरू, व्यापारी सोपा मार्ग पकडत व लुटले जात किंवा मारले जात. या फाट्यावर एका राजाने वैश्रमणाचा एक भव्य पुतळा उभा केला होता. हा पुतळा ज्या दिशेला बोट दाखवित असे तो मार्ग बरोबर असा संकेत होता. यांच्याबरोबर जे श्रमण होते त्यातील एकाने नजरचुकीने चुकीचा मार्ग पकडला. अवलोकितेश्र्वराची प्रार्थना करुन जेव्हा त्याने त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत त्या रस्त्यावर सापडले. त्या काळात त्या भागात तूर्की वंशाच्या लोकांच्या चीनी लोकांशी चकमकी चालू होत्या. त्या संकटांवर मात करुन तो चीनच्या राजधानीत पोहोचला अंदाजे ५५६ मधे. त्यावेळेस त्याचे वय होते ४०. चीनमधे आल्यावर त्याने तिएन-पिंग मठात राहण्यास सुरुवात केली व अर्थातच भाषांतराचे काम हाती घेतले. असे कित्येक ग्रंथ अहेत जे भारतातून नष्ट झाले होते पण चीनमधे शाबूत होते. त्या चीनी ग्रंथांचे फ्रेंच अभ्यासकांनी फ्रेंच भाषेत भाषांतर केले जे परत संस्कृतमधे भाषांतरीत करण्यात आले आहेत. नरेंद्रयास्साने ज्या ग्रंथांचे भाषातर केले त्यातील काही – १ पो-सुकिएन चे सुन मेइ किंग २ युई त्संग किंग ३ युईतेंग सान मी किंग…व अजून चार आहेत. दुर्दैवाने तार्तार वंशीय चाऊ घराण्याची सत्ता आल्यावर हे सगळे चित्र पालटले. त्यावेळचा चाऊ राजा हा बुद्धाचा द्वेष करीत असे. सम्राट वौ’ने बुद्धधर्म चीनमधून हद्दपारच केला असे म्हणायला हरकत नाही. सगळे धर्मगुरु, श्रमण, पंडीत त्यामुळे अज्ञातवासात गेले किंवा परत आपल्या मूळस्थानी गेले. सुदैवाने त्यानंतर गादीवर आलेले सुई घराणे हे बौद्धधर्माचे आश्रयदाते असल्यामुळे परत एकदा धर्माने चीनमधे जोर धरला. परत आलेल्या श्रमणांनी आपल्याबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ आणले होते त्याचे भाषांतर करण्यासाठी नरेंद्रयस्साचे नाव पुढे आले. त्याला अज्ञातवासातून सन्मानाने परत राजधानीमधे बोलाविण्यात आले व नवीन ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी तीस श्रमणांना त्याच्या हाताखाली देण्यात आले. या सहाय्यकांच्या मदतीने त्याने तीन वर्षात आठ ग्रंथांचे भाषांतर केले. मी जेव्हा ग्रंथ म्हणतो तेव्हा पानांची संख्या हा आधार न धरता विषय हा आधार धरला आहे. काही शेकडो पानांचे असतील तर काही थोड्या पानांचे असावेत. या चमूने केलेले भाषांतर तेवढे समाधानकारक नसल्यामुळे अजून एका पंडीताला शोधून काढण्यात आले. हाही त्या काळात भूमिगत झाला होता. त्याचे नाव होते जिनगुप्त. त्यावेळेस नरेंद्रयास्स कुआन झी मठात रहात होता.
जिनगुप्त येईपर्यंत भाषांतराचे काम स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर चारच वर्षांनी या थोर माणसाचा मृत्यु झाला. थोर यासाठी की त्याने अत्यंत कठीण काळात बौद्धधर्माची पताका फडकत ठेवली होती. भुमिगत राहून एखाद्या क्रांतीकारकांसारखे त्याने श्रमणांचे जाळे विणले. त्याने हे जे मोठे काम केले त्यासाठी त्याच्या असमाधानकारक भाषांतराला क्षमा केली पाहिजे……
चीनी बुद्धाची प्रतिमा..


” मी मागे वळून बघतो तेव्हा मी ज्या प्रसंगातून गेलो ते आठवून मलाच घाम फुटतो. कल्पना करता येणार नाही अशा संकटाना तोंड देत मी अनेक खडतर मार्गाने धोकादायक जागी प्रवास केला. हे करताना मी कधीच स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही कारण माझ्यासमोर एक निश्चित ध्येय होते. व ते साध्य करण्यासाठी मी सरळमार्गांचाच वापर केला…. जे मला मिळवायचे आहे त्याच्या दहा हजाराव्वा हिस्सातरी मिळेलच अशा आशेने मी ज्याठिकाणी मृत्यु अटळ आहे अशा ठिकाणीही त्याला मोठ्या धैर्याने सामोरा गेलो……
….फा-शिएन.
फा-शिएनचे हे वाक्य भारतीय पंडितांनाही लागू पडते.
५५७ साली भारतातून चार पंडीत चीनला पोहोचले. म्हणजे निघाले होते दहा पण त्यातील चार जण जिवंतपणे चीनला पोहोचले. त्यांची नावे होती –
१ ज्ञानभद्र २ जिनायास्स ३ यशोगुप्त आइ ४ जिनगुप्त. पहिले दोन शेवटच्या दोघांचे आचार्य होते. वर म्हटल्याप्रमाणे या चौघांनी दहाजणांचा एक चमू तयार केला व चीनसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानभद्राने चीनमधे आल्यावर विशेष कार्य केलेले आढळत नाही. त्याने फक्त एकाच ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले ते म्हणजे पंचविद्याशास्त्र. यात त्याने त्याच्या शिष्यांची मदत घेतली अशी नोंद चीनी इतिहासात आढळते.
जिनयास्स : आचार्य जिनयास्सांनी त्यांच्या शिष्यांच्या मदतीने सहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील फक्त दोन ग्रंथांची नावे सध्या ज्ञात आहेत. १ महामेघसूत्र २ महायानाभिस्मय सूत्र. यशोगुप्ताने आपल्या आचार्यांच्या हाताखाली दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ अवलोकितेश्र्वरासमुखाधारिणी हा भारताच्या कुठल्या भागातून गेला होता ते कळत नाही. तो जेथून आला त्याचे नाव चीनी इतिहासात लिहिले आहे, पण हे ‘यिऊ-पो’ कोठे आहे हे समजत नाही.
शेवटचा पण महत्वाचा पंडीत आहे – जिनगुप्त किंवा ज्ञानगुप्त.
जिनगुप्त

या पंडितांबद्दल माहिती मिळते ती ताओ-सिआन नावाच्या लेखकाने ६५० साली प्रकाशित केलेल्या एका ग्रंथात. या ग्रंथाचे नाव आहे सियु-काओ-सेंग-चाऊआन. इतर ग्रंथांतून माहिती गोळा करुन त्याचे चरित्र लिहिले असा उल्लेख त्याने त्या ग्रंथात केला आहे. म्हणजे हा पंडीत महत्वाचा असला पाहिजे. जिनगुप्तांनी एकूण ३६ ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील सगळ्यात महत्वाचे आहेत बुद्धचरित व सद्धर्मपुंडरिकासूत्र. बुद्धचरित लिहून त्याने कुमारजीव आणि इतरांबरोबर स्थान मिळविले असे म्हणायला हरकत नाही. हा अफगाणिस्तानमधील (सध्याचे पाकिस्तान) पेशावरचा एक श्रमण होता. त्याच्या घराण्याचे नाव होते कंभू. जातीने हा क्षत्रिय असून त्याच्या वडिलांचे नाव होते वज्रसार. घरातील सगळ्यात लहान असलेल्या या मुलात पहिल्यापासूनच विरक्तीचा भाव दिसू लागला होता. असे म्हणतात वयाच्या सातव्या वर्षीच त्याने वडिलांकडे श्रमण होण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याच्या वडिलांनी ती दिली. त्यांची परवानगी घेऊन त्याने महावन मठात प्रवेश घेतला. तेथेच त्याला आचार्य ज्ञानभद्र आणि जिनयास्स यांची शिकवण लाभली. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचे भवितव्य घडले. तो २७ वर्षांचा असतानाच त्याच्या आचार्यांनी चीनला धम्म प्रसारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या शिष्यांनाही बरोबर घेतले. त्यांचा मार्ग बिकट व खडतर होता. त्यांनी रस्त्यात कपिचा नावाच्या शहरात एक वर्ष मुक्काम केला. या खडतर प्रवासात जिनगुप्ताने आपल्या आचार्यांची चांगली काळजी घेतली. खोतान पार करुन ते अखेरीस ५५७ साली चीनला पोहोचले. दुर्दैवाने दहापैकी हे चारचजण तग धरु शकले. ५५९-५६० याच काळात केव्हातरी जिनगुप्त चँगॲनला आला व चाओतांग मठात राहिला. राजधानीत स्थानिकांत मिळून मिसळून राहिल्यामुळे तो लवकरच चीनी शिकला. त्या काळात चँगॲनला मिंग घराण्याचे राज्य होते. त्यांनी या चौघांसाठी एक नवीन मठ बांधला. त्याच मठात हे चौघे भाषांतराचे काम करु लागले. त्यांनी भाषांतर केलेल्या अवघड ग्रंथाची नावे आहेत – कनकवर्णऋषी परिप्रच्छसूत्र आणि अवलोकितेश्र्वर सूत्र.
जिनगुप्ताच्या न्यायी स्वभावामुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि प्रथमच एका भारतीय माणसाला एका सुभ्याचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या जबाबदारीतून वेळ काढून त्याने अजून दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
दुर्दैवाने याच सुमारास चाऊ घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी बौद्धधर्माचा राजाश्रय काढून घेतला. नुसता काढून घेतला नाही तर बौद्धांना चीनमधून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या राजकीय धुमाळीत अनेक पंडितांना, मठवासियांना चीनमधून हुसकावून लावण्यात आले. जिनगुप्तही या वादळाला पाठ देत मध्य एशियात पोहोचले. (सध्याचा उगुर प्रांत). त्याचवेळी भारतातून काही चीनी भिक्खू चीनला परतत होते. चीनी राज्यसत्ता बौद्धांच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे कुठे जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. त्यांची आणि जिनगुप्ताची त्याच प्रांतात गाठ पडली. त्यांनी भारतातून जवळजवळ २०० ग्रंथ आणले होते. त्यांनी जिनगुप्तास त्यांचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांना प्रथम जिनगुप्त हा साधासुधा श्रमण आहे असे वाटले पण लवकरच त्यांना त्याचे ज्ञान किती सखोल आहे हे कळले. त्यांनी त्याला धम्माचा प्रसार करु असे वचन दिले. ५८१ साली धम्मावर दाटलेले काळे ढग हटले आणि राज्यसत्ता सुई घराण्याच्या हातात गेली. हे घराणे बौद्धधर्माचे मोठे पाठिराखे होते. तात्कालिन राजाने ताबडतोब एक समिती नेमली व भाषांतराचे काम सुरु करण्याची अनुमती दिली. या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद नरेंद्रयास्स यांना देण्यात आले होते असा उल्लेख सापडतो. या समितीचे काम समाधानकारक न वाटल्यामुळे इतर भिक्खूंनी सम्राटाची गाठ घेतली व त्याला जिनगुप्तास उगुरमधून बोलाविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन सम्राटाने ताबडतोब तसे आज्ञापत्र रवाना केले. इकडे जिनगुप्तासही चीनला परतायचे वेध लागले होते. ते आज्ञापत्र मिळताच तो लगबगीने चीनला परतला. तो आल्यावर त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्याला सहाय्य करण्यासाठी धर्मगुप्त व दोन चीनी श्रमणांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर दहा चीनी श्रमणांची हे भाषांतर तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली. यांचे काम त्या भाषांतरात मूळचा भाव जपला जात आहे की नाही हे तपासण्याचे होते. ते यासाठी जिनगुप्तांशी चर्चा करीत व आवश्यक त्या सुधारणा करीत. यामुळे भाषांतरे बरीच अचुक होऊ लागली. एवढेच नाही तर भाषांतराची शैली मूळ चीनी वाटावी यासाठी अजून दोन साहित्यिक श्रमणांचीही नेमणूक करण्यात आली. हा असा शास्त्रशुद्ध भाषांतराचा प्रकार चीनमधे प्रथमच होत होता. लवकरच जिनगुप्ताची नेमणूक तेंग घराण्याच्या राजगुरुपदी करण्यात आली आणि बौद्धधर्माची पताका परत एकदा फडकू लागली. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या एकंदरीत ३७ भरते व त्यात एकूण १६६ प्रकरणे अंतर्भूत होती. त्यातील काहींची नावे अशी-
१ बुद्धचरित्र २ फा-किऊ ३ वी-तो ४ राष्ट्रपालपरिपृच्छसूत्र ५ भद्रपालश्रेष्ठीपरिपृच्छ सूत्र आणि इतर. ( सगळी नावे उपलब्ध आहेत पण विस्तारभयापोटी येथे देत नाही.)
सम्राट चाऊने जिनगुप्तास काही भारतीय खगोलशास्त्रांवरील ग्रंथांचे भाषांतर करण्यास सांगितले. त्यात एकूण २०० प्रकरणांचे भाषांतर करण्यात आले. साल होते ५९२ ! भारतातून चीनमधे या मार्गाने आणि प्रकाराने कुठले कुठले ज्ञान-विज्ञान गेले हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जिनगुप्ताचा सहाशे साली ७८व्या वर्षी मृत्यु झाला. जिनगुप्ताने धम्मासाठी खूपच हालआपेष्टा काढल्या पण धम्मापासून तो कधीही ढळला नाही आणि ना त्याच्या मनात भारतात परत जायचा कधी विचार आला.
५०० ते ६०० या काळात भारतातून नाव घेण्याजोगे अजून तीन धर्मगुरु चीनला गेले. १ गौतम धर्मज्ञान. हा पूर्वी चीनला गेलेल्या गौतमाऋषींचा सगळ्यात थोरला मुलगा. अर्थातच तो बनारसचा होता. चीनमधे गेल्यावर त्यावेळच्या सम्राटाने त्याच्यावर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या ज्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एकदा तर तो एका प्रांताचा सुभेदारही झाला. त्याने एक ग्रंथ चीनी भाषेत लिहिला ज्याचा विषय होता – विविध प्रकारच्या कर्माचे होणारे विविध परिणाम.
दुसरा धर्मगुरु होता विनितऋषी. हा उद्यानदेशीचा श्रमण ५८२ साली चीनला पोहोचला व त्याने दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ गयशीर्षसूत्र आणि २ महायानवैपुल्यधारिणीसूत्र.
या शतकातील चीनला जाणारा शेवटचा श्रमण होता धर्मगुप्त. हाही जिनगुप्त ज्या मार्गाने चीनला आला त्याच मार्गाने चीनमधे आला. त्याने एकूण दहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील काहींची नावे – १ वज्रछेदिकाप्रज्ञपरिमितासूत्र २ निदानसूत्र ३ निदानशास्त्र…
ह्युएनत्संग व इ-शिंगचा काळ ( ६००-७००)
या शतकात पहिला श्रमण चीनला पोहोचला त्याचे नाव होते प्रभाकरमित्र. मध्यभारतातील एका क्षत्रिय कुटुंबातील या श्रमणाने चीनमधे पाऊल ठेवले त्यावेळेस थान घराण्याचे राज्य चालू होते. त्याने तीन ग्रंथाचे भाषांतर केले व चीनमधे वयाच्या ६९व्या वर्षी देह ठेवला. त्याने लिहिलेल्या ग्रंथाची नावे – रत्नताराधारिणीसूत्र २ प्रज्ञाप्रदीपशास्त्रटिका ३ सुत्रालंकारटिका. हा चीनला गेला त्यानंतर दोनच वर्षांनी ह्युएनत्संगने त्याच्या भारतयात्रेस सुरुवात केली. अंदाजे ६५२ साली एका नवीन पंडीताने चीनला भेट दिली. त्याचे नाव होते अतिगुप्त. याला दोन वर्षात एकाच ग्रंथाचे भाषांतर करता आले. – धारिणीसंग्रहसूत्र. यानंतर चीनला गेला ‘नाडी’ नावाचा पंडीत. याने भारत, श्रीलंका येथे फिरुन १५०० हिनयान व महायान पंथाचे बौद्ध ग्रंथ जमा केले होते. याच पंडीताला चीनी सम्राटाने कुठलेतरी औषध शोधण्यासाठी परदेशी पाठविले होते. चीनमधे परतल्यावर त्याने तीन ग्रंथ लिहिले. १ सिंहव्युहराजाबोधिसत्वपरिपृच्छसूत्र २ विमलज्ञानबोधिसत्व ३ माहीत नाही…
यानंतर अजून एका दिवाकर नावाच्या पंडिताने मध्यभारतातून चीनमधे पाऊल ठेवले. त्याने बारा वर्षे चीनमधे काढली ज्या काळात त्याने १८ ग्रंथांचे भाषांतर केले. यानंतर गेला रत्नचित. हा काश्मिरचा रहिवासी होता. ६९३-७०६ या काळात त्याने सात ग्रंथांचे भाषांतर केले. तो वयाच्या १००व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला. . दुसऱ्याचे नाव होते धर्मऋषी किंवा धर्मरुची. हा काश्यप गोत्र असलेला पंडीत दक्षिण भारतातून आला होता. चालुक्यांच्या दरबारात असलेल्या चीनी राजदूताने विनंती केल्यावर सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी अजून एका थोर पंडिताने चीनमधे प्रवेश केला. चीनी सम्राटाने याचे नाव बदलून बोधीरुची असे ठेवले.याने जवळजवळ ५३ ग्रंथांवर टिका लिहिली. आज दुर्दैवाने यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. अजून एक गंमत म्हणजे असे म्हटले जाते की मृत्युसमयी त्याचे वय १५६ होते.
आठव्या शतकात प्रमिती नावाचा एक श्रमण मध्यभारतातून चीनला गेला. हाही एक उत्तम भाषांतरकार होता. ( याने परवानगी नसताना काही ग्रंथ नालंदामधून चीनला नेले असे मी कुठेतरी वाचलेले स्मरते. पण खात्री नाही) त्याने एकाच ग्रंथाचे भाषांतर केले पण ते उत्तम होते. त्याचे नाव लांबलचक होते. – महा-बुद्धोश्निश-तथागत-गुह्य-हेतू-साक्षातक्रिता-प्रसन्नार्थ-सर्व-बोधीसत्वकार्या-सुरंगमसूत्र.
याच्यानंतर वज्रबोधी नावाचा पंडीत चीनमधे गेला.
वज्रबोधी…

केरळचा हा ब्राह्मण ७१९ साली चीनला पोहोचला आणि त्याने चार पुस्तकांचे भाषांतर केले. असे म्हणतात शाओलिन मठात यानेच चीनी मार्शल आर्टचा पाया घातला. निश्चित नाही. ( हा योगसामर्थ्याने त्याचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असे असा प्रवाद आहे.) हा ७१व्या वर्षी हा चीनमधे मरण पावला.
नंतर एक पंडीत नालंदामधून पाठवला गेला. त्याचे नाव होते शुभाकरसिंह. याने बरोबर चार ग्रंथ आणले होते ज्याचे त्याने भाषांतर केले. हाही त्याच्या वयाच्या ९९व्या वर्षी चीनमधे मृत्यु पावला.
यानंतर अमोघवज्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध व महत्वाचा पंडीत चीनमधे गेला.
अमोघवज्र

याचे गुरु होते वर उल्लेख झालेले वज्रबोधी. याने भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे जो काही तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. याने अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. याने नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.
वज्रबोधी होते दक्षिण भारतातील, अमोघवज्र होता उत्तर भारतातील. म्हणजे त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादि. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.
७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वत:ला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात मला वटते हा एकमेव पंडीत होता ज्याने एवढे भव्यदिव्य काम केले. तो स्वत: तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत आहे. त्यावरुन त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना येऊ शकेल.
१ महामयुरीविद्या रागिणी २ कुंडीधारिणी ३ मारिचीधर्म ४ मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र ५ गाताअनंतामुख धारिणी. ६ सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी ७ महर्षी सूत्र ८ महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र. ९ गांगुलीविद्या १० रत्नमेघ धारिणी ११ सालिसंभवसूत्र १२ राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता १३ महामेघसूत्र १४ घनव्युहसूत्र १५ पर्णसवारी धारिणी. १६ वैश्रमणदिव्यराजा सूत्र १७ मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया १८ पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख १९ अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी २० अष्ट मंडलसूत्र २१ चक्षूरविशोधन विद्या धारिणी २२ सर्व रोगप्रसन्न धारिणी २३ गवलप्रसनन धारिणी २४ योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी २५ एकाकुधार्या धारिणी २६ अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र २७ नीतिशास्त्र सूत्र २८ तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी २९ ओ-लो-तो-लो धारिणी ३० अश्निशचक्रवर्ती तंत्र ३१ बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र ३२ बोधीमंदव्युह धारिणी ३३ प्रज्ञापारमिताअर्धसटीका ३४ वज्रशेखरयोगा सूत्र ३५ महाप्रतिसार धारिणी ३६ गरुडगर्भराजा तंत्र ३७ वज्र-कुमार-तंत्र ३८ सामंतनिदानसूत्र ३९ महायान-निदानसूत्र ४० हारितीमात्रिमंत्रकल्प ४१ सर्व धारिणींची एक सुत्री….
एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग… यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करुन घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करुन अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.
नवव्या शतकात म्हणजे ८०० ते ९०० या काळात भारतातून चीनला जाणाऱ्या पंडितांची संख्या अचानक कमी का झाली ते कळत नाही. मी जो दशकुमारचरितमचा अनुवाद केला, त्यात मला बौद्धधर्माबद्दल फार चांगले लिहिलेले आढळत नाही. अर्थात ते हिंदू पंडिताने लिहिले असल्यामुळे मी समजू शकतो. पण कदाचित सामान्य माणसाच्या नजरेतून धम्म उतरत चालला होता हे निश्चित. या शतकात एकही पंडीत भारतातून चीनमधे गेला नाही. कदाचित असेही कारण असेल की त्यांना चीनमधून कोणी बोलावले नसेल ….
हळूहळू भारतातून चीनला जाणाऱ्या बौद्ध श्रमणांची व पंडीतांच्या संख्येला ओहोटी लागत होती. पुढच्या शतकात चीनी इतिहासात भारतातून ९७२ साली फक्त तीन पंडीत आल्याची नोंद सापडते. त्यांची भारतीय नावेही माहीत नाहीत. १ कोचे २ फुकीं ३ चेने-ली.
९७३ साली धर्मदेव नावाचा अजून एक महान पंडीत चीनमधे आला. त्याची कीर्ति त्यावेळच्या सम्राटापर्यंत (सुंग घराणे) पोहोचल्यावर त्याला दरबारात बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला. याच काळात लाकडावर ग्रंथ कोरुन त्यापासून पुस्तके छापण्याची प्रक्रिया चालू झाली. एकूण १३०,००० फळ्या तयार करण्यात आल्या ज्यापासून मग त्रिपिटकाची पुस्तके छापण्यात आली. धर्मदेवाने ९७३ साली भाषांतराचे काम सुरु केले आणि ९८१ पर्यंत त्याने ४६ ग्रंथांचे भाषांतर केले. या भाषांतरातही धारिणींचा भरणा आहे कारण त्याकाळात त्रांत्रिकमार्गाचा पगडा चीनी जनमानसावर बसला होता. धर्मदेवाने अजून एका लोकप्रिय ग्रंथाचे भाषांतर केले – सुखावती-व्युह. या महायानी ग्रंथात स्वर्गाचे वर्णन आहे. धर्मदेवाचा मृत्यु १००१ साली झाला. या महान पंडीतालाही मरणोत्तर अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
९७५ साली पश्र्चिम भारतातून एक मंजुश्री नावाचा राजपूत्र चीनमधे श्रमण बनून गेला व त्याने नुकत्याच निवर्तलेल्या चीनी सम्राटाला श्रद्धांजली वाहिली असा एक उल्लेखही सापडतो. हा चीनमधे आल्यावर सिअँग-कोनो मठात राहिला होता. तेथे त्याच्या स्वभावामुळे तो खूपच लोकप्रिय झाला. इतर भिक्खूंना मत्सर वाटल्यामुळे त्यांनी सम्राटाला जाऊन सांगितले की त्याला भारतात परत जायचे आहे. या राजपुत्राला अजून चीनी समजत नसल्यामुळे त्याच्यात चीनी सम्राटात संवाद होऊ शकला नाही. सम्राटाने भारतात जाण्याचा आदेश काढल्यावर मंजुश्रीची चडफड झाली पण दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याने भारताचा रस्ता पकडला असे म्हणतात पण तो भारतात आला नाही. तो कुठे नाहीसा झाला याबद्दल इतिहासात उल्लेख नाही.
९८० साली अजून दोन पंडीत काश्मिरमधून चीनला गेले. एकाचे नाव होते दानपाल आणि दुसऱ्याचे चीनी नाव होते – तिनशीत्साई. पण दुसऱ्या एका ग्रंथात तो जालंदर येथील एका मठाचा श्रमण होता असाही उल्लेख होता. त्याने जवळजवळ वीस वर्षे चीनमधे काम केले. त्याने भाषांतर केलेल्या ग्रथात एक महत्वाचा ग्रंथ होता ज्याचे नाव होते धर्मपद. याचे भाषांतर मंगोलि भाषेतही झाले आहे. याचा मृत्यु १००० साली झाला.
दानपाल उद्यान देशातून चीनला गेला होता. त्यानेही तेथे बरेच काम केले. हा दरबारात असताना सुंग सम्राटाला पश्चिम भारतातील एका राजाचे पत्र आले. एका श्रमणाने ते आणले होते. ते त्याने याला वाचण्यास सांगितले अशी नोंद आहे. त्या पत्रात तो राजा म्हणतो, ‘‘ मी असे ऐकले आहे की चीनमधे परमेश्र्वराचा अंश असलेला एक राजा राज्य करतो. मी स्वत: आपल्याला भेटण्यास येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो. कोअँगयिन (ज्या श्रमणाने ते पत्र आणले होते त्याचे नाव ) याने आपल्या कृपेने तथागताच्या रत्नजडीत सिंहासनावर कास्याची दक्षिणा चढविली आहे. त्याच्या बरोबर मी आपल्यासाठी तथागताचा अवशेष पाठवीत आहे… पत्रातील चीनमधील इतर पंडितांचे पत्तेही वाचण्यात आले अशी नोंद आहे. या पंडिताने १११ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले असे मानले जाते. धारिणी चीनमधे लोकप्रिय होण्यामागे याच्या भाषांतराचा मोठा सहभाग होता.
सुंग घराण्याच्या इतिहासात अजून एका श्रमणाची नोंद आहे ज्यात हा श्रमण स्वत:बद्दल सांगतो, ‘‘ मी तॉ-लो-मेनचा श्रमण आहे. माझे नाव यँक-चो आहे. भारतातील लि-टे नावाच्या देशातून मी आलो. या देशाचा राजा या-लो-ऑन-टे असे आहे. माझे गाव अ-जों-इ-टो ( अजंठा?) आहे आणि माझ्या पत्नीचे नाव मो-हि-नी आहे.’’ श्रमण असून विवाहीत कसा हे समजत नाही.
यानंतर ९९० साली नालंदामधून अजून एक श्रमण चीनमधे आला. त्याचे नाव होते पाऊकिटो. त्याने बुद्धाचे काही अवशेष सम्राटासाठी आणले होते अशी नोंद सापडते. ९९५ साली मध्य भारतातून एक श्रमण चीनमधे आला त्याचे नाव होते कालकांती. त्याने भूर्जपत्रावर लिहिलेले काही ग्रंथ चीनमधे आणले. नंतर ९९७ साली राहुल नावाचा एक श्रमण पश्चिम भारतातून चीनला गेला. त्यानेही काही पवित्र ग्रंथ चीनच्या सम्राटाला अर्पण केले. त्या शतकातील शेवटचा श्रमण होता नि-वी-नी. यानेही काही ग्रंथ बरोबर नेले पण त्याचे पुढे काय झाले याची इतिहासात नोंद नाही.
१०००-११०० या शतकात या सगळ्या प्रकाराला ओहोटी लागली. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे भारतावर झालेले आक्रमण. त्यामुळे भारतात बुद्धाचा अहिंसेचा संदेश मला वाटते लोकांच्या पचनी पडेनासा झाला. तसेच इस्लाम धर्माच्या वादळी आक्रमक हिंसाचाराने मध्य आशिया व्यापून टाकला. चीनला जाण्याच्या मार्गावर अनेक श्रमणांची कत्तल झाली व त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्यासाचा यात बळी गेला. १००४ साली मगधाहून धर्मरक्षाने चीनला भेट दिली. त्याने काही ग्रंथ बरोबर नेले होते. त्यांचे भाषांतर करुन त्याने वयाच्या ९६व्या वर्षी चीनमधेच देह ठेवला. अधूनमधून एखादा श्रमण चीनला जात होता, नाही असे नाही पण ती परंपरा खंडीत होण्याच्या मार्गावर होती हे नाकारण्यात अर्थ नाही.
शेवटचा श्रमण, ज्ञानश्री चीनमधे गेला १०५३ साली. त्यानंतर त्या ज्ञानाच्या मार्गावर अंध:कार पसरला तो पसरलाच…
या सर्व श्रमणांनी चीनला काय दिले? मुख्य म्हणजे त्यांनी चीनला धर्म दिला. चित्रकला, मुर्तिकला, दिली. चीनमधील कित्येक गुहांमधे असलेली चित्रे भारतातील अजंठाच्या चित्रकलेशी साम्य दाखवतात. हळूहळू ज्ञानी पंडीत नामशेष झाले. इतके नामशेष झाले की मंगोल बादशहा (चीनच्या प्रांताचा) कुबलाईखानला काही ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी बौद्ध धर्मगुरु/पंडीत पाहिजे होता. त्याला शोधून एकही तसा माणूस भारतात सापडला नाही….
(चेंगिजखान स्वत: बौद्ध नव्हता पण त्याला बौद्ध धर्माची पूर्ण कल्पना होती. त्याचा लडाखमधील लामांशी सतत संपर्क असे. तो त्यांना त्याच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगे. चेंगिजखानचे कित्येक सरदार, मंत्री हे बौद्ध होते व असे म्हणतात त्यांनी त्याच्या काळातच एक पाच मजली बौद्ध मठ बांधण्यास घेतला होता. कुबलाईखान हा त्याचा नातू. ज्याने आपले लहानपण त्याच्या आजोबांबरोबर घालविले, तो नंतर चीनचा सम्राट झाला त्याने त्यामुळे बौद्धधर्माला उदार आश्रय दिला होता. असो. चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी….)
चीनी बुद्ध साल ५८१-६१७.

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन करुन ही लेखमालिका संपली असे जाहीर करतो.
प्राचीन दिपांकर बुद्धाला वंदन असो.
वैदुर्यप्रभास बुद्धाला वंदन असो.
शाक्यमूनी बुद्धाला वंदन असो.
भूत वर्तमान व भविष्यकाळांच्या बुद्धाला वंदन असो.
आनंदी बुद्धाला वंदन असो.
विरोचन बुद्धाला वंदन असो.
रामध्वजराजा बुद्धाला वंदन असो
मैत्रेय बुद्धाला वंदन असो.
अमिताभ बुद्धाला वंदन असो
सत्याचा मार्ग दाखवणार्या बुद्धाला वंदन असो.
अमर वज्र बुद्धाला वंदन असो
रत्नप्रभास बुद्धाला वंदन असो.
नागराज बुद्धाला वंदन असो.
वरूण बुद्धाला वंदन असो.
नारायण बुद्धाला वंदन असो.
पुण्यपूष्प बुद्धाला वंदन असो
मणिध्वज बुद्धाला वंदन असो.
मैत्रीबाला बुद्धाला वंदन असो.
व्युहराजा बुद्धाला वंदन असो.
जयंत कुलकर्णी
समाप्त.