राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद

नमस्कार!

फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहायला घेतले तेव्हा नुसत्या सनावळ्या लिहिण्यात काही अर्थ नव्हता, मला त्यातील महत्त्वाच्या व्यक्तिंवर लिहायचे होते. त्यांच्या विचारांचा समाजावर काय परिणाम झाला याबद्दल लिहायचे होते. त्यांनी काय चूका केल्या त्याबद्दल लिहायचे होते आणि शेवटी ही राज्यक्रांती का फसली हे वाचकांना समजावे अशी माझी इच्छा होती म्हणून यातील महत्त्वाच्या व्यक्तिंची चरित्रे आणि त्यातून उलगडला जाणारा इतिहास असे स्वरूप ठरवले. याच ढाच्यावर त्या काळातील एका लेखकाचे पुस्तकही सापडले. तो ढाचा आणि त्यात माझे विचार आणि इतर वाचन याची गोळाबेरीज म्हणजे हे पुस्तक. या घटनेने जगावर जो काही परिणाम केला त्याचा परामर्श घ्यायचा म्हणजे मोठेच पुस्तक लिहावे लागणार याची मला कल्पना होती. पुस्तक पूर्ण झाले आहे आणि दुसरे प्रुफ रिडींग सुरू आहे. त्याच वेळी प्रकाशक शोधण्याचे कामही सुरू आहेच. मला वाटते पुस्तक ४००/५०० पानांचे होईल. कदाचित जास्तीही! निश्चित नाही…असो.

प्रकरण ७

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद

१७९३च्या वसंतऋतूत विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने आपले काम सुरू केले,त्याचे नाव ठेवले गेले, ‘‘क्रांतीकारी न्यायाधिकरण’’ लवकरच हे न्यायाधिकरण इतर सरकारी खात्यांपेक्षा जास्त व्यस्त झाले. अजून फाशीची शिक्षा सर्रास देण्यात येत नव्हती. अंदाजे दोन दिवसाला एक या प्रमाणात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे, पण जसे युद्ध भडकले तशी ही संख्या वाढू लागली. जिहोन्डीन गटाच्या सदस्यांना या न्यायाधिकरणासमोर उभे करण्यात आले, त्या आधी थोडेच दिवस मारी ॲन्टोनेटचे डोके गिलोटीन खाली उडवण्यात आले. १० ऑगस्ट नंतर तिला, लुईला आणि तिच्या बरोबर असणाऱ्यांना ‘टेंपल’ नावाच्या इमारतीत तुरुंगात टाकले गेले होते. मारी ॲन्टोनेटने मुर्खपणाने तिच्या आयुष्यात (फ्रान्समध्ये) उन्मत्तपणे अनेक चुका केल्या होत्या, पण टेंपलमेध्ये जे हाल तिने भोगले त्याने तिची त्या पापांमधून जवळजवळ मुक्तता झाली, तिला सहानुभूती मिळू लागली. तिला फ्रान्समधून हद्दपार करण्याची शिक्षा देणे सहज शक्य होते, पाहिजे तर परत आली तर मृत्यूदंड, असेही कलम त्यात घालता आले असते, पण तिला गिलोटीन खाली ठार मारण्याची क्रूर शिक्षा दिल्यामुळे, तिला जगभर जास्तच सहानुभूती मिळू लागली. अर्थात, १७८९ मध्ये व्हर्साय येथे जमावाच्या तावडीत जर ती सापडली असती तर काय झाले असते याची कोणी कल्पना करू शकत नाही. त्यापेक्षा ही शिरच्छेदाची शिक्षा बरी होती म्हणायची. जनता आता तिला मनापासून शिव्याशाप देत होती. या राणीइतकी वाईट राणी आजवर फ्रान्सने पाहिली नाही असे लोक उघडपणे बोलू लागले. तिच्या वाईट राज्यकारभाराबद्दल तिला एकटीला दोषी धरता येत नाही. ती ज्या वातावरणात वाढली, घटनाक्रम, तिच्या सल्लागारांचे बदसल्ले आणि तिचे अप्रामाणिक सहकारी या सगळ्यांना दोष द्यावा लागेल. तिने जो काही काळ दरबारात फ्रान्सची राणी म्हणून काढला त्यात ती खऱ्या अर्थाने कधीच फ्रेंच झाली नाही. ती ऑस्ट्रियन होती आणि शेवटपर्यंत ऑस्ट्रियनच राहिली. तिच्या कारवाया पाहिल्यावर असे म्हणावेसे वाटते, की ती फ्रान्सच्या पारंपरिक शत्रूची, ऑस्ट्रियाची, फ्रान्सच्या दरबारातील एक निर्बुद्ध हेर होती. फ्रान्सची बहुतेक जनता या बाईला फ्रान्सची कट्टर शत्रू मानत होती. फ्रान्सच्या संस्कृतीचा सर्वनाश करणे हेच ऑस्ट्रियाचे ध्येय आहे असे जनता मानत असल्यामुळे या राणीची जनमानसात काय प्रतिमा असेल याची कल्पना आपण करू शकतो. ऑस्ट्रिया आणि इंग्लंडने मिळून फ्रान्सच्या नौदलाची आणि सैन्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आणि सात वर्षांच्या युद्धात फ्रान्सचे पंख कापले, पण फ्रान्सची जनता त्यांचा एवढा तिरस्कार करत नसे कारण ते शेवटी शत्रू होते. त्यांना सगळ्यात जास्त तिरस्कार फ्रान्समधील ऑस्ट्रियाच्या मित्रांचा वाटे.

मारी ॲन्टोनेटची आई मारी थेरेस ही ॲस्ट्रियाची एक कर्तबगार राणी होती. तिला एकूण १६ मुले झाली आणि त्यातील १३ जगली आणि मोठी झाली. मारी ॲन्टोनेट ही त्यातील सगळ्यात धाकटी मुलगी. मारी थेरेस मुलं मोठी होईपर्यंत त्याच्यांशी अत्यंत प्रेमळपणे वागायची, त्यांचे लाड करायची, पण नंतर मात्र तिच्यातील सम्राज्ञी आणि कावेबाज राजकारणी जागी व्हायची आणि त्या सगळ्या मुलांचा, मुलींचा वापर युरोपच्या राजकारणाच्या पटावरील प्यादी म्हणून केला जायचा. (अर्थात यात काही नवीन नाही. आपल्याकडेही राजकारणासाठी सोयरीक जुळवण्याची शेकड्याने उदाहरणे पडली आहेत). मारी ॲन्टोनेटने व्हिएना आणि आपल्या आईला मागे सोडले आणि अशाच एका राजकारणी चालीसाठी ती फ्रान्सला रवाना झाली. त्यानंतर तिच्या आईची आणि तिची परत भेट झाली नाही. फ्रान्सच्या आणि ऑस्ट्रियाच्या एका तहावर तिच्या आणि फ्रान्सच्या दुफांबरोबर झालेल्या विवाहाने शिक्कामोर्तब होणार होते. त्यावेळी तिचे वय होते १४ आणि लुईचे वय होते १५. (त्या काळात सिंहासनाचा वारस असलेल्या राजपूत्राला दुफां या बिरुदाने ओळखले जाई. याचा फ्रेंचमध्ये उच्चार जरी दुफां असला तेरी त्याचे स्पेलिंगप्रमाणे उच्चार होतो डाऊफिन, हा शब्द डॉल्फिन या शब्दाचे फ्रेंचकरण आहे. त्या घराण्याच्या कोट ऑफ आर्मसवर डॉल्फीनचे चित्र आहे, हा मासा सागरी विजय, बुद्धिमत्ता, सर्व सागरांवर आणि नद्यांवर याचा संचार असतो, हा जात्याच हुशार असतो, या सगळ्याचे प्रतिक म्हणून याला झेंड्यावर जागा देण्यात आली होती) लुईच्या आजोबांचा मृत्यू झाल्यावर (लुई – १५ वा), (म्हणजे यांचे लग्न होऊन जवळजवळ चार वर्षांनी) ते फ्रान्सच्या राजा आणि राणी या पदावर आरुढ झाले. (लुईचे वडील आधीच मरण पावले होते म्हणून हाच सिंहासनाचा वारस होता) लुईच्या तुटक निरस स्वभावाच्या आत्या, त्याचा भाऊ ‘काऊंट द प्रॉव्हेन्स’, लुईच्या दोन वहिनी, ही सगळी मंडळी ॲन्टोनेटचा द्वेष करायची. खरे तर त्यांना तिची भीती वाटायची, कारण त्यांना ऑस्ट्रियाच्या मैत्रीची भीती वाटायची. दरबारात ऑस्ट्रियाच्या बाजूने जे सरदार आणि अधिकारी होते त्यांच्या केंद्रस्थानी स्वतःला ठेवण्यात तिने यश मिळवले. अर्थात तिला ते सहज शक्यही होते. जे ऑस्ट्रियाचे शत्रू होते त्यांच्याशी तिने शत्रूत्व पत्करले. दरबारातील इतर सरदारांनी तिला आदर दाखवला नाही, कारण तिचा नवराच तिला आदर दाखवत नसे. त्याला राजदरबारातील कृत्रिम वातावरणापेक्षा शिकार आणि गावाकडील सरळ साधे आयुष्य जास्त आवडे. या आचरट बाईला आणि त्याला लग्नाच्या बेडीत का अडकवले आहे ते त्याला उमजत नव्हते, पण काहीही असले तरी तो तिच्या फटकळ स्वभावाला घाबरून असे, तिच्या टिंगल टवाळ्यांना घाबरत असे. जवळ जवळ सात वर्षे त्याने तिच्याबरोबर रतिक्रिडा केली नाही. अर्थात त्याला इतरही बरीच कारणे होती. लुईला त्याच्या पत्नीच्या सौंदर्याचा उबग आला. तिच्या मूर्ख चुकांमुळे आणि अत्यंत उधळ्या स्वभावाने त्याचे बरेच नुकसानही झाले. थोडक्यात काय राज्यक्रांती होईपर्यंत लुईने त्याच्या बायकोकडे ढुंकुनही पाहिले नव्हते, पण राज्यक्रांती सुरू झाली आणि त्याने तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागण्यास सुरुवात केली. मागे केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. दुर्दैवाने हे खरे असले तरी तो कायम तिच्यापुढे दबून वागला हेही खरं आहे.

मारी ॲन्टोनेटला व्हिएन्नातून, म्हणजे तिच्या आईकडून काय करायचे, कसे वागायचे याच्या सतत सूचना यायच्या. फ्रान्सच्या दरबारात ऑस्ट्रियाचा एक मर्सी नावाचा मुत्सद्दी राजदूत होता, त्याच्या सगळ्या सूचना ती पाळायची. ऑस्ट्रियाचे हितसंबंध जपणे हे तिने आपले कर्तव्यच मानले होते. तिने तिच्या नवऱ्यावर प्रभाव टाकण्याचा बराच प्रयत्न केला, अर्थात त्यात तिला फारसे यश मिळाले नाही. फ्रान्सच्या दरबारातील ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांना फ्रान्समध्ये प्रशासकीय अधिकार मिळावेत यासाठी हे सगळे प्रयत्न चालले होते, जेणे करून ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या दरबारात काय चालले आहे याची इत्थंभूत वित्तंबातमी कळावी. जेव्हा तिचे या कामाकडे दुर्लक्ष होत असे, तेव्हा लगेचच व्हिएन्नामधून तिला ताकीद मिळे आणि मर्सी येऊन तिला तिची कर्तव्ये समजावून सांगत असे.

जर मारी ॲन्टोनेटला तिच्या आईसारखी बुद्धी असती, तर ती युरोपच्या चांगल्या वाईट राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती झाली असती, पण तिचा स्वभाव पडला उच्छृंखल, उधळा, मौजमस्तीत रमणारा. अर्थात हा स्वभाव टिकला राज्यक्रांती होईपर्यंत. त्यानंतर मात्र तिचे रुपांतर एका प्रौढ गंभीर स्त्रीमध्ये झाले, म्हणजे लग्नानंतर जवळजवळ २० वर्षांनी! ती उच्चपदावर बसलेली एक अडाणी स्त्री होती. तिला ना राजकारणात रस होता ना राणीच्या कर्तव्यांमध्ये, ना फ्रान्सच्या संस्कृतीमध्ये, ना जनतेच्या सुखदुःखात आणि मुख्य म्हणजे तिला स्वतःत बदल करण्याची मुळीच इच्छा नव्हती. लाडात वाढल्यामुळे ती हटवादी झाली होती आणि ती लहरी होती, भविष्याबद्दल बेफिकीर असणाऱ्या या बाईला ऐषारामात जगण्याची चटक लागली होती. तिची आई सोडून तिचा कोणावरही विश्वास नव्हता. आईबद्दल तिला नितांत आदर वाटत असे आणि तिची प्रत्येक आज्ञा पाळण्याची ती आटोकाट प्रयत्न करत असे. जेव्हा लुईने तिच्या अवास्तव मागण्या धुडकावल्या आणि प्रशासकीय गुपिते, योजना तिला सांगण्यास नकार दिला, तेव्हा मात्र तिने त्रागा करण्यास सुरुवात केली. जेव्हा लुईने मर्सीचे सगळे सल्ले धुडकावून लावले तेव्हा मात्र तिची खात्री झाली की तिचा नवरा एक तर मूर्ख असला पाहिजे किंवा तिच्या शत्रूंनी त्याचे कान भरले असले पाहिजेत.

जरी मारी ॲन्टोनेट राणी असली तरी राजदरबारी तिचे शत्रू तिचा सतत अपमान करत असत. शिवाय वृत्तपत्रे तिच्या विरुद्ध सतत चिथवणारे लेख आणि पत्रके छापत होती. जनता तिच्यावर नाखूश होती. तिचा नखरेलपणा, उच्छृंखल वागणे, तिचे नृत्याचे वेड, मुखवटे घालून होणारे नृत्याचे कार्यक्रम, नाटके, आणि रंगेल वागणे या सगळ्याने फ्रान्सच्या जनतेला धक्का बसला. जरी नागरिकांनी १८व्या शतकातील बुरसटलेल्या अमीर उमरावांवर कितीही टीका केली तरी या बाबतीत मात्र त्यांना राणीचे हे बेधुंद वागणे अजिबात पसंत नव्हते. फ्रान्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असताना, तिची उधळपट्टी, जुगाराच्या टेबलावर पैसे उधळणे हे जनतेच्या डोळ्यावर आले नसते तरच नवल. आजवर फ्रान्समध्ये राजांच्या रखेल्या असे वागत असत. राणीकडून त्याच प्रकारचे बेताल वागणे जनतेने प्रथमच अनुभवले. असे वागून ती कर्जबाजारी झाली आणि वारंवार अडचणीत सापडली. मर्सीने तिचे हिशेब तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की बाईसाहेबांनी जवळजवळ ५ लाख लिव्हाचे देणे करून ठेवले होते. आता ही असली बातमी राजदरबारी गुप्त राहू शकत नाही आणि तेथून बाहेर पसरण्यास कितीसा वेळा लागणार? जनता कुजबुजू लागली की राणीचे हे कर्ज नेकरने सरकारी खजिन्यातूनच भरले असणार! हे अर्थातच खोटे होते कारण लुईने स्वतःच्या खाजगीतून हे कर्ज फेडले होते, पण शेवटी अप्रत्यक्षपणे ते पैसे सरकारनेच भरले असे म्हणावे लागते. बरे एकदा नाही दोनदा हे कर्ज फेडण्यात आले. तिची काही अयोग्य व्यक्तिंशी चांगली घसट होती, उदा.. ड्युक द लोझां, एवढेच नाही तर फार्सन नावाचा एक स्विडीश कर्नल तिचा प्रियकरही होता. हा एक प्रकारचा व्याभिचारच होता पण तिच्या प्रियकराचे आणि तिचे प्रेम मरेपर्यंत टिकून होते हे विशेष.

ॲन्टोनेटने राजाच्या मंत्र्यांशी उभा दावा मांडला, तो स्वतःसाठी आणि स्वतःच्या फालतू भाटांसाठी. ती तिच्या परिचितांसाठी सढळ हाताने खर्च करत असे आणि त्यामुळे अनेक भानगडी उपस्थित झाल्या. मालजारबला द्याव्या लागलेल्या राजिनाम्यात तिचा हात होता, टुर्गो प्रामाणिकपणे त्याचे कर्तव्य पार पाडू लागल्यावर तिला त्याची अडचण होऊ लागली तेव्हा तिने त्याची रवानगी बस्टीलला करण्याचा हट्ट पार पाडला. ती निर्बुद्धपणे स्वतःलाच फसवत राहिली आणि तिच्या मूर्ख सल्लागारांनीही तिची सतत फसवणूक केली. अशा सल्लागारांवर विश्वास ठेवण्याची चुक तिला फार महाग पडणार होती. जर मारी ॲन्टोनेट सामान्य नागरिक असती तर ती एक उत्तम नटी झाली असती, पण ती उच्चपदावर होती आणि तिच्या कर्तव्यांकडे तिचे दुर्लक्ष होत होते. जनतेशी नाळ जुळण्यासाठी तिला फार काळ द्यावा लागला आणि दुर्दैवाने त्याला फार उशीर झाला. त्यातच हिऱ्याच्या हाराचे एक प्रकरण झाले त्याने तिची प्रतिमा अजूनच मलीन झाली. (हे प्रकरण तुम्हाला इंटरनेटवर सापडेल. – अफेअर ऑफ द डायमंड नेकलेस. या प्रकरणात तिच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप झाला होता. दुसऱ्याच कोणीतरी तिच्या नावाने तो नेकलेस खरेदी केला होता.. अशी काहीतरी ती कहाणी आहे.) त्यात रोहान नावाचा एक कार्डिनलही सापडला, पण प्रकरण शेवटी राणीवर शेकले. इतके शेकले की काही काळ निदर्शनांच्या भितीने ॲन्टोनेटने पॅरिसच्या बाहेरच मुक्काम टाकला.

या घटना आणि काही अनेक अफवांनी, ती त्रस्त झाली. त्यातच ऑस्ट्रियाविरोधी गटाने पसरवलेल्या अश्लाघ्य अफवांनी (ती समलिंगी होती अशी अफवा पसरविण्यात आली होती) जनतेच्या मनात या दुर्दैवी स्त्रीबद्दल भयंकर गैरसमज पसरला. त्याच काळात राज्यक्रांतीने जोर पकडला होता आणि राजघराण्याविषयी जनमानसात भयंकर द्वेष पसरला होता. ॲन्टोनेट क्रांतीचा तिरस्कार करायची आणि तिला त्याची भीतीही वाटायची. तिला राज्यघटना, संविधान, लोकशाहीवादी या सगळ्या गोष्टींचा मनापासून तिटकारा होता. ती म्हणायची, ‘‘या अनागोंदी माजलेल्या देशात राहण्यापेक्षा मी कुठलेही धोके पत्करण्यास तयार आहे..’’ तिला जनतेचे मन कधीच समजले नाही, ना तिला सैन्याबद्दल काही ममत्व होते. तिला क्रांतीचे मूळतत्त्वच समजले नव्हते त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच नव्हता. तिला असे वाटत होते, की जर ऑस्ट्रियाच्या सेना फ्रान्सम्ध्ये घुसल्या तर जनता आनंदाने त्या सेनेला शरण जाईल, या जनतेचा उर्मटपणा म्हणा किंवा शौर्य हे भीतीतून आले आहे अशी तिने स्वतःची भ्रामक समजूत करून घेतली होती. तिने स्वतःला, तिच्या नवऱ्याला अणि मुलाबाळांना वाचवण्यासाठी जे काही उद्योग केले त्याने जनतेचे तिच्याबद्दलचे मत अजूनच कलुषित झाले. सरकारच्या खजिन्यात सतत येत असलेल्या तुटीमुळे शेवटी लुईला ‘‘मि. डेफिसीट’’ असे नाव पडले आणि तिला ‘‘मादाम डेफिसीट’’. कारण या तुटीत तिच्या उधळ्या स्वभावाचाही सहभाग होताच. पुढे लुईने संसदेत जो नकाराधिकार वापरण्याचा सपाटा लावला, त्यामुळे त्याला लोक ‘‘मि. व्हेटो’’ असे म्हणू लागले आणि तिला ‘‘मादाम व्हेटो’’. जनसामान्यांनी ॲन्टोनेटला फ्रान्सची, समानतेची, स्वातंत्र्याची शत्रू म्हणून जाहीर करून टाकले.

ऑस्ट्रियाने आणि त्याच्या मित्रदेशांनी फ्रान्सवर आक्रमण करावे यासाठी चाललेल्या कारस्थानात ॲन्टोनेटचा सहभाग आहे अशी शंका व्यक्त होत होती, पण आता जनतेची याबाबतीत खात्रीच पटली. १० ऑगस्टनंतर, देशातून राज घराणे पळाले तरच प्राण वाचतील अशी परिस्थिती निर्माण झाली. तिचे राजकारणातील अज्ञान आणि कुठलीही स्पष्ट भूमिका न घेण्याने तिचे फार नुकसान झाले. तिला असे वाटत होते, की एमिग्रेस (फ्रान्समधून पलायन केलेले सरदार आणि इतर लोक. यात लुईचा सख्खा भाऊही होता.) मंडळींचे युरोपातील अस्तित्त्व मिटवले आणि त्यांच्या कटकारस्थानांचा एकदा बिमोड केला, की परदेशी ताकदींच्या हस्तक्षेपाने फ्रान्समधील यादवी टळू शकेल आणि जनमानस परत एकदा राजाच्या चरणी एकनिष्ठ होईल. तिला एमिग्रेस मंडळींचा आणि साँक्युलॉट वर्गाचा तेवढाच तिरस्कार होता, कारण हे वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी आणि चालत आलेल्या सुखसोयींसाठी राजाचा बळी देण्यास निघाले होते. यातील विरोधाभास लक्षात घ्या. मारी ॲन्टोनेटला एमिग्रेसचा मनस्वी तिटकारा वाटत असे, तर जनता, राणी आणि लुई एमिग्रेसना आतून सामील असल्याचा आरोप करत होती. साँक्युलॉट राजाचा आणि राणीचा सतत अपमान करत असत आणि त्यांनी मित्र देशांना दुखावले होते, एवढेच नाही तर जे जे संविधानिक होते ते सगळे उध्वस्त करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. त्यांच्या दडपणाखाली लुईला त्याच्या सुधारणांच्या योजना राबवणे अशक्य झाले. राज्यक्रांती झाली आणि ॲन्टोनेट धैर्याने त्याला सामोरी गेली. तिचे व्यक्तिमत्व आता जास्त परिपक्व झाले. त्या गोंधळाच्या काळात ती लुईपेक्षा जास्त कावेबाजपणे आणि चतुराईने वागली. त्याच काळात मिहाबू आणि बार्नेव्ह तिला मदत करण्यास तयार होते पण फाजील आत्मविश्वासाने तिने त्या दोघांनाही फसवले. तिने त्या काळात ज्या प्रकारे लुईची आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेतली त्यासाठी तिचे कौतुक केल पाहिजे. त्यासाठी तिच्या काही गुन्ह्यांसाठी तिला क्षमा केली पाहिजे असे काही इतिहासकारांचे म्हणणे पडते.

मारी ॲन्टोनेट, लुई आणि त्याच्या कुटुंबास ‘‘टेम्पल’’च्या इमारतीत नजर कैदेत ठेवले गेले. ही इमारत पूर्वी लुईच्या भावाची म्हणजे काऊंट दक्ट्वाची मालमत्ता होती. ॲन्टोनेट, दुफां आणि त्यांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावर दोन प्रशस्त खोल्या देण्यात आल्या. लुईला वरचा मजला देण्यात आला तर खालच्या मजल्यावर मादाम एलिझाबेथची सोय करण्यात आली. (लुईची बहीण) ही राजघराण्यातील मंडळी नजरकैदेत जरी असली तरी त्यांच्या सेवेस बाराच्या आसपास नोकर देण्यात आले, पण काहीच दिवसात कम्युनच्या वकिलाने या ऐषारामी सोयींना हरकत घेतली. तो म्हणाला, ‘‘ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना अशा सुखसोयी पुरवणे अडचणीचे ठरेल.’’ नंतर त्याने ॲन्टोनेटला काही दासी पाहिजेत का? असे विचारले, पण त्या प्रश्नावर तिने फणकाऱ्याने उत्तर दिले, की तिला सोबतीला फक्त राजाची बहीण पुरेशी आहे. सहा दिवासांनंतर नोकर चाकरांना सुट्टी देण्यात आली आणि राजकन्या आणि डचेसची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सुरुवातीला लुई आणि त्याच्या मुलाबाळांना राजघराण्यातील व्यक्तींना मिळते तशीच वागणूक मिळत होती. उदा.त्यांना वीस प्रकारचे पदार्थ जेवणात मिळत होते, लुईला मद्य मिळत होते, खोलीमध्ये चांगले फर्निचर ठेवण्यात आल होतेे, पुस्तके ठेवण्यात आली होती. आता त्यांचे हे विशेषाधिकार कमी करण्यात आले. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. लुईला एक नोकर देण्यात आला जो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हेरही होता. कैद्यांना बागेत एकत्र फिरण्याची परवानगी होती जेथे त्यांना पहारेकऱ्यांकडून बाहेरच्या बातम्या मिळू शकत होत्या.

लुईची रवानगी गिलोटीनच्या वधस्थळावर झाली आणि मारी ॲन्टोनेट घाबरली, पण तिला अजूनही आशा वाटत होती, की तिला फार तर देशाबाहेर हाकलतील, तिचा शिरच्छेद करणार नाहीत….

क्रमशः

– जयंत कुलकर्णी

May be an image of 2 people

All reactions:

76Asha Subhedar, Mandar Dharmadhikari and 74 others

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, कथा. Bookmark the permalink.

Leave a comment