आरण्यक…

..मला एखादे पुस्तक आवडले की मी ते वाचता वाचता त्याचा अनुवादच करून टाकतो. म्हणजे मला राहवतच नाही… खालील परिच्छेद असाच एक वरील पुस्तकातील आहे…

एकूण पाने : २६१

किंमत : ३५०. घरपोच (पोस्टाने)

ज्यांना हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्यांनी कृपया मला मेसेज करावा.

आरण्यक…….

चंद्रप्रकाशात आसमंत न्हाऊन निघाला आणि थंडी पार हाडात मुरली. पौष गेला. मी लवटोलियाच्या कचेरीच्या तपासणीसाठी गेलो होतो. रोज झोपायला रात्रीचे अकरा वाजायचेच. एके दिवशी मी जेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडलो. पाहिले तर त्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत एक स्त्री त्या चंद्रप्रकाशात कचेरीच्या कुंपणाजवळ उभी होती. अशा वेळी, जेव्हा आकाशातून बर्फासारखे थंड दव टिपकण्यास सुरुवात झाली होती.

‘‘कोण उभे आहे रे तिकडे?’’ मी आमच्या पटवारीला विचारले.

‘‘हुजूर ती ना? कुंता आहे.’’ काल मला भेटली होती. तुम्ही आज येणार आहे कळल्यावर तिने मला विचारले की तिची मुले उपाशी आहेत. जर मी उद्या येऊन मालकांच्या ताटातील उरलेसुरले घेऊन गेले तर चालेल का? मी अर्थातच हो म्हटले. म्हणून ती आज आली आहे आणि तुमचे जेवण होण्याची वाट पाहात बसली आहे.

मी हे बोलत होतो तवढ्यात बलुआ टेहलूने माझे सारे राहिलेले उष्टे गोळा करून त्या बाईच्या पितळेच्या भांड्यात घातले. ते मिळताच ती तेथून चालती झाली.माझ्या त्या भेटीत मी लवटोलियाला आठ दहा दिवस राहिलो. प्रत्येक रात्री ती बिचारी मला विहिरीजवळ माझे जेवण होण्याची वाट पाहात थांबायची. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही तिच्या अंगावर एका साडीशिवाय दुसरे काही नसायचे.

शेवटी मी कुतुहलाने पटवारीला विचारलेच, ‘‘ ही कुंता जी रोज भात घेऊन जाते ती आहे तरी कोण? या जंगलात ती कुठे राहाते? काय करते? दिवसा तर ती कधी मला दिसत नाही!’’‘‘सांगतो हुजूर! हे पातेलं जरा आत ठेऊन येतो.’’ पटवारी म्हणाला.

त्या दिवशी संध्याकाळी जेवणानंतर खोलीत घमेल्यात एक छोटीशी अगटी पेटवली होती, त्याच्याच जवळ एका खुर्चीत काही हिशेब पाहात होतो. शेवटी मनाशी म्हटले ‘चला बास झाले काम आता. कंटाळा आला.’ मी सगळी आवरा आवर केली, पटवारीला हाका मारली आणि कुंताची कहाणी ऐकण्यास बसलो.

‘‘ऐका हुजूर’’ पटवारी म्हणाला. ‘‘दहा वर्षांपूर्वी या भागात एक देवीसिंह नावाच्या रजपूताची भयंकर दहशत होती. या भागातील सगळे गणगोत,शेतकरी, कुळे, कुरणांचे भाडेकरी सगळे त्याच्यापुढे चळाचळा कापत. त्याचा दराराच तेवढा होता. शिवाय सगळे त्याच्या मिंध्यात होते कारण त्याचा धंदा होता सावकारीचा. तो चढ्या व्याजाने कर्ज देर्इ कारण मुद्दलासकट व्याज वसूल करण्याची त्याची ताकद होती. त्यासाठी त्यने दहा पंधरा पहेलवान पाळले होते. सध्याचा सावकार रासबिहारीसिंह जसा आहे तसा तो दहा वर्षांपूर्वी होता.हा देवीसिंह जौनपूर जिल्ह्यातून पूर्णियात येऊन स्थायिक झाला होता. जेव्हा आला तव्ही त्याची जेवण्याची भ्रांत होती. पण हळूहळू त्याने सावकारीचे बस्तान बसवले आणि येथील घााबरट गणगोतांवर व शेतकऱ्यांवर दहशत बसवली. येथे स्थिरावल्यावर चार पाच वर्षांनी तो चैन करायला बनारसला गेला होता. तेथे एका नाचणारीणीच्या कोठ्यावर गाणे ऐकायला गेला असताना तिच्या मुलीच्या प्रेमात पडला. तेव्हा तिचे वय असेल पंधरा/सोळा. देवीसिंहने तिला पळवून येथे आणले. तेव्हा त्याचे वय असेल सत्तावीस/अठ्ठावीस. देवीसिंहने तिच्याशी लग्न केले. पण जेव्हा त्याच्या बिरादरीच्या लोकांना कळले की ती एका तवायफची मुलगी आहे तेव्हा त्यांनी त्याला बिरदरीबाहेर काढले. त्याला वाळीत टाकले. देवीसिंहला पैशाची कमी नव्हती. त्याने या सामाजिक बहिष्काराची फिकीर केली नाही. बिरादरीचा आदेश पायाखाले तुडवला. पण जर धंदा चालू नसेल तर साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? हुजूर, ऐषारामासाठी पैसे उडाले आणि या रासबिहारीच्या कोर्टकचेरीच्या लफड्यात उरलेले पैसे संपले. देवीसिंह कंगाल झाला. नंतर चार पाच वर्षांनीच त्याचा देहांत झाला. ही कुंता त्याची विधवा आहे हुजूर. आत्ता दिसते त्याच्यावर जाऊ नका हुजूर. एकेकाळी तिचे सौंदर्य आरसपानी होते आणि ऐट तर विचारू नका हुजूर! लवटोलियाहून कुशी आणि कल्बालियाच्या संगमावर ती स्नानासाठी मोत्याच्या झालरी लावलेल्या मेण्यात बसून जायची. एकेकाळी साखरेची चिमूट जिभेवर टाकल्याशिवाय ही बाई पाणी प्यायची नाही. आता तिची काय अवस्था झाली आहे पाहा. सगळ्यात वाईट म्हणजे हुजूर तिला जातीची प्रतिष्ठा नाही कारण ती एका नाचणारीणीची मुलगी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ना तिच्या नवऱ्याच्या बिरादारीचे लोक ना स्थानिक गणगोत तिला आपले मानत नाहीत. गहू काढून झाला की शेतात फिरायचे व पडलेले गव्हाचे दाणे वेचायचे, हे एवढेच अन्न तिला आणि तिच्या अर्धभुकेल्या लहानग्यांना मिळते. तेही सहा महिन्यासाठी. मग परत तिची आणि तिच्या मुलांची उपासमार होते. कधी खायला मिळते कधी नाही. पण मी तिला कधीही भीक मागताना पहिलेले नाही हुजूर! तुम्ही येथे जमीनदाराचे मॅनेजर म्हणून आला आहात म्हणजे तुम्ही इथले राजेच आहात. मला वाटते तुमच्या ताटातील उरलेसुरले तिला मी वाढले तर तुम्ही मला आणि तिला माफ कराल.’’

‘‘तिच्या आईचा काही पत्ता लागला का?’’ मी विचारले.

‘‘मी त्या बाईला कधी पाहिलेले नाही सरकार.’’ पटवारी म्हणाला.

‘‘ना कुंताने तिच्या आईची कधी चौकशी केली. बिचारी खडतर कष्ट उपसून तिच्या मुलांचे पालनपोषण करते खरं. आत्ता ती अशी दिसते पण बिचारी कोमेजून गेली आहे. पूर्वी ती सुंदर दिसायची. एवढी सुंदर स्त्री या भागात कोणी पाहिली नव्हती हुजूर. आता तिचे वय झाले. शिवाय विधवा झाल्यावर तिच्या सौंदर्याला उतरती कळा लागली ती लागलीच. पण अत्यंत प्रामाणिक आणि शांत आहे ही कुंता. पण येथे कोणी तिच्याकडे ढुंकुनही पाहात नाही. ते तिचा तिरस्कार करतात आणि तिची हेटाळणी करतात. बहुधा ती एका नाचणारीणीची मुलगी आहे हे त्या मागचे कारण असावे.’’

‘‘ते ठीक आहे पटवारी, पण ती एवढ्या रात्री एकटी या जंगलातून हिंडत असते त्याची तिला भीती नाही वाटत? लवटोलिया येथून दोनएक मैल असेल ना!’’ मी विचारले.

‘‘ पण घाबरली तर तिचे पोट कसे भरणार? तिला तर या जंगलातून दिवसरात्र एकटीलाच प्रवास करावा लागतो. तिचे असे कोण आहे या जगात जो तिची काळजी घेईल हुजूर?’’ पटवारी म्हणाला.

हे सगळे झाले पौष महिन्यात. वेळेवर पैसे देण्याचा थोडाफार दबाव कुळांवर टाकून झाल्यावर मी मुख्य कचेरीला परतलो. माघ महिन्यात मधेच मला परत लवटुलियाला जावे लागले. मला एका चराऊ कुरणाचा नवीन दराने भाडेपट्टीकरार करायचा होता.थंडी अजून कमी झाली नव्हती. दिवसभर जे पश्‍चिमेचे वारे चालायचे ते संध्याकाळी दुप्पट वेगाने वाहायचे आणि त्याच्याबरोबर बोचरी थंडी आणायचे. एक दिवस मी कचेरी सोडली आणि भटकत भटकत कचेरीच्या उत्तरेस फेरफटका मारण्यास गेलो. बोराचे जंगल बरेच माजले होते. जिकडे पाहावे तिकडे बोराची वने दृष्टीस पडत होती. छपरा आणि मुजफ्फरपूरच्या कलवार जातीच्या व्यापाऱ्यांनी हे जंगल भाडेपट्टीवर घेतले होते. तेथे रेशमाच्या आळ्या पाळून ते बऱ्यापैकी पैसा कमवत होते. त्या बोरवनात मी थोडासा भरकटलो. तेवढ्यात माझ्या कानावर एका बाईचा आक्रोश पडला. पाठोपाठ मुलांचा आरडा ओरडा आणि माणसांचे शिव्याशाप माझ्या कानावर पडले. मी जरा पुढे जाऊन पाहिले तर रेशमाच्या व्यापाऱ्यांच्या नोकरांनी एका बाईला केस पकडून फरफटवत चालवले होते. तिच्या अंगावरचे कपडे फाटलेे होते आणि मागे मागे दोन तीन मुलं टाहो फोडत चालली होती. एका नोकराच्या हातात एक टोकरी होती आणि त्यात पिकलेली बोरे. मला पाहताच ते सगळा चचापले आणि सारवासारव करू लागले,

‘‘ हुजूर आम्ही हिला पटवारीकडे घेऊन चललो होतो. आमच्या झाडांची बोरे तोडत होती. बरे झाले तुम्ही आलात सरकार !’’

मी प्रथम काय केले तर त्या नोकरांना दरडावले व त्या स्त्रिला त्यांच्या हातून सोडवले. तोपर्यंत ती बाई लाजेने एका बोराच्या झाडामागे लपली होती. तिची ती अवस्था पाहून मला तिची कीव आली. ते दृष्य पाहून मला फार वाईट वाटले. ते नोकर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सोडण्यास बिलकुल तयार नव्हते. मी त्यांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला,

‘‘ या गरीब बाईने बोरे तिच्या मुलांसाठी वेचली तर तुमचे एवढे मोठे काय नुकसान होणार आहे की तुम्ही हिला पटवारीच्या ताब्यात द्यायला निघाला आहात? तुमच्या रेशमाचे काही नुकसान होणार आहे का एवढ्याशा बोरांनी? सोडून द्या तिला.’’ मी म्हणालो.‘‘

त्यातील एक जण म्हणाला, ‘‘ सरकार आपण या बाईला ओळखत नाही. हिचे नाव आहे कुंता. लवटोलियामधे राहते आणि पक्की चोर आहे. मागच्याच वर्षी हिला आम्ही बोरे तोडताना रंगे हात पकडले होते. आता मात्र तिला धडा शिकविल्याशिवाय आम्ही….’’कुंता ! नाव ऐकून मी चक्रावून गेलो. तिला मी ओळखू तर शकलो नाही कारण एकतर मी तिला रात्री पाहिले होते आणि तिच्यात बराच बदलही झाला होता. ती आता अधिकच कृष झाली होती.मी त्या नोकरांना धमकावले आणि तिची सुटका केली. बिचारी शरमेने करपून गेली होती. मुलाबाळांना घेऊन तिने पळ काढला. त्या गडबडीत बिचारीची बोराने भरलेली परडी तेथेच राहिली. कदाचित शरम वाटल्यानेही तिने ती तेथेच सोडली असेल.. मला माहीत नाही. मी त्यातील एका नोकरास ती टोकरी कचेरीत पोहोचविण्यास सांगितले. ते तेवढ्यानेही खूष झाले. त्यांना वाटले, चला काही नाही तर तिची टोकरी तरी जप्त होईल! खिन्न मनाने मी कचेरीस परत आलो. आल्यावर मी पटवारीला ही कहाणी सांगितली आली नाराज होत म्हणालो,

‘‘ बनवारीलाल, तुमच्या भागातील लोक एवढे निष्ठूर कसे काय?’’

बनवारीच्या चेहऱ्यावर विषाद पसरला. त्याचा चेहऱ्यावर त्याला लागलेली बोचणी स्पष्ट दिसत होती. तो एक भला माणूस होता आणि त्याच्या मनात इकडच्या लोकांबद्दल प्रेम, दया होती हे मला माहीत होते. त्याने त्याच रात्री ती बोराची टोकरी आणि बोरे काढायचा आकडा एका शिपायाबरोबर तिच्या घरी, लवटोलियाला पाठवून दिला.त्या रात्री आणि नंतर मात्र कुंता जेवण घेण्यास कचेरीवर कधीच आली नाही. बहुधा चोरी करताना पकडले गेल्यामुळे शरमेने तिला मला तोंड दाखवावेसे वाटले नसेल… –

विभूतीभूषण बंदोपाध्याय.-

अनुवाद : जयंत कुलकर्णी.

ज्या समाजात जातींना एवढे अवास्तव महत्व दिले जाते, त्या समाजात ‘जातच नसणे’ याचा भयंकर अनुभव कुंताला आला असेल…

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल.... Bookmark the permalink.

Leave a comment