फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार!

सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले… तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे… त्यातील एक क्रांतीकारक डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie) हा माझ्या आवडत्या व्यक्तिरेखांपैकी एक. दुसरा आहे डॅन्टॉन. हे पुस्तक केव्हा पूर्ण होईल ते मला सांगता येणार नाही, परंतु ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्यातील कथा ऐकाव्या लागणार… 🙂 पुस्तक ७० % पूर्ण झाले आहे…पण अजून बरेच राहिले आहे..

कॅमिली डिमुलाने त्याच्या पत्नीस, तुरुंगातून लिहिलेले शेवटचे निरोपाचे पत्र. दोन तीन दिवसांनी गिलोटीनखाली त्याचे शीर धडावेगळे होणार होते हे लक्षात घ्या. हे पत्र माझ्या पुस्तकातून घेतले आहे.

१ एप्रिल सकाळी ८ वाजता.

निद्रेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. एकदा माणूस झोपला की तो सगळ्या काळज्यातून मुक्त होतो. आपण बंधनाता आहोत हे तो विसरतो. ही माझ्यावर परमेश्वराने दयाच केली म्हणायची. काही क्षणापूर्वीच मी तुला स्वप्नात पाहिले. मी स्वप्नातच सगळ्यांना अलिंगन दिले. तुला, होरेसला आणि तुझ्या आईला. तुम्ही सगळे घरातच होता, पण आपल्या लहानग्याला त्या स्वप्नात जंतुंसंसर्गाने दृष्टी गमवावी लागली आणि झालेल्या अतीव दुःखाने मला जाग आली.

मी परत माझ्या कोठडीत आलो तेव्हा पहाट उगवली होती आणि फटफटले होते. तू दिसली नाहीस आणि तुझे बोलणेही मला ऐकू न आल्यामुळे मी उठलो. म्हटले तुझ्याशी जरा बोलावे आणि नाही जमले, तर निदान काही लिहावे तरी., पण मी जेव्हा खिडकी उघडली तेव्हा मला सत्य परिस्थितीची जाणीव झाला आणि मी हताश झालो. या भिंती, दरवाजे आणि कड्याकुलपांनी आपल्यात कित्येक योजने अंतर निर्माण केलंय याची तुला कल्पना नाही. माझ्या मनाला आणि विचारांना प्रचंड निराशेने घेरले. मी माझ्या अश्रूत विरघळून गेलो. मी जिवंतपणी या माझ्या थडग्यात ओक्साबोक्षी रडलो. ल्युसिला! ल्युसिला! कुठे आहेस तू? काय करू मी?

काल संध्याकाळी मी जेव्हा तुझ्या आईला उद्यानात पाहिले तेव्हाही मला असेच उचंबळून आले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. मी जमिनीवर कोसळलो. मी हात जोडले. जणुकाही मी तिच्याकडे क्षमेची भीक मागतोय. तिने तुला ही हकिकत संगितली असणार. माझ्याकडे पाहताना तिला रडू फुटले, पण मला तिचे अश्रू दिसू नयेत म्हणून तिने आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला. जेव्हा तू परत येशील तेव्हा तिला तुझ्या जवळ बसायला सांग म्हणजे मला तू पटकन दिसशील. त्यात काही धोका आहे असं मला वाटत नाही.

माझा चष्मा काही ठीक नाही. मला वाटते तू माझ्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी आणला होता तसा नवीन चष्मा आणावास हे बरं. चांदीचा नको. स्टीलचाच आण कारण तो नाकावर नीट बसतो. १५ नंबरचा चष्मा माग. त्या दुकानदाराला ते बरोबर समजेल. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लोला, मी तुझ्याकडे तुझ्या निरंतर प्रेमाची मागणी करतोय. तुझे एक चित्र मला पाठव. ज्या माणसाला त्याच्या देशबांधवांच्या प्रती एवढी सहानुभूती वाटायची त्या माणसाबद्दल तुझ्या चित्रकाराला निश्चितच सहानुभूती वाटेल व तो तुला दिवसातून दोनदा चित्र रंगवण्यासाठी बोलावेल आणि ते चित्र पूर्ण करेल. या भयंकर जागेत ज्या दिवशी मला तुझे चित्र मला मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. आनंदाचा आणि आनंदात धुंद होण्याचा दिवस. ते चित्र मिळेपर्यंत मला तुझ्या केसांची एक बट पाठव जी मी माझ्या हृदयाशी जपून ठेवीन.

माझ्या प्रिय ल्युसिला! आपल्या प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची मला आठवण येतेय!. मला आठवतंय जेव्हा एखादा माणू केवळ तुझ्याकडून आलाय यासाठी मला फार महत्त्वाचा वाटे. कालच ज्या माणसाने माझे पत्र तुला पोहोचते केले तो परत आल्यावर मी त्याला विचारले, ‘‘तू तिला पाहिलेस का?’’ त्याने होकारार्थी उत्तर दिल्यावर क्षणभर मला तू तेथेच उभी आहेस असा भास झाला. तो बिचारा सरळ साधा माणूस आहे, कारण तो माझी पत्रे तपासत नाही. माझ्या कानावर आलंय की हा माणूस मला दिवसातून दोनदा भेटणार आहे. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. आपल्या प्रेमाच्या दिवसात आपले निरोप पोहोचते करणारे जेवढे मला प्रिय होते तेवढाच हा माणूसही मला प्रिय आहे, कारण तो आपल्या अडचणींच्या काळात आपले निरोप पोहोचते करतोय.

आज मला खोलीच्या एका भिंतीत एक भेग पडलेली आढळली. मी त्याला कान लावल्यावर कोणाचातरी विव्हळण्याचा आवाज मला ऐकू आला. मी त्याला बोलते केले. त्याने माझे नाव विचारल्यावर मी त्याला माझे नाव सांगितले. ते ऐकल्यावर तो किंचाळलाच, ‘‘अरे देवा’’ एवढे बोलून त्याने पलंगावर अंग टाकल्याचा आवाज मला आला. त्याच क्षणी मी त्याचा आवाज ओळखला. तो फॅब्रे द इग्लाटिना होता.

‘‘हो मी फॅब्रे द इग्लाटिनाच आहे.’’ तो मला म्हणाला.

‘‘पण तू? आणि इथे? कसं शक्य आहे? म्हणजे प्रतिक्रांती झाली की काय?

पण भीतीमुळे आम्ही पुढे जास्त काही बोललो नाही. जर आम्ही पकडलो गेलो असतो तर आम्हाला दुसऱ्या खोल्यात हलवून त्यांनी आमची ही छोटीशी चैनही आमच्यापासून हिसकावून घेतली असती आणि आम्हाला अजून छोट्या कोठड्यातून ठेवण्यात आले असते. ते अर्थातच आम्हाला परवडणारे नाही कारण त्याच्या कोठडीला ती उबदार ठेवण्याची सोय आहे आणि माझी खोली तशी आरमदायी आहे. तुला सांगतो प्रिये, एकांतवासाची कोठडी म्हणजे काय असते याची तुला कल्पना येणार नाही. तुम्हाला का पकडण्यात आले आहे याचे कारण माहीत नसते, तुमची चौकशी होत नाही. तुम्हाला रहस्यमयरित्या नुसते पकडून कुठेतरी कोठडीत डांबले जाते. भयंकर! तुम्हाला वाचण्यास एक पानही मिळत नाही. ही कोठडी म्हणजे जिवंतपणीचे मरण! तुम्ही एक शवपेटीत बंद आहात हे समजण्यासाठीच जणु तुम्ही जिवंत असता.

ते म्हणतात तुम्ही जर निष्पाप असाल तर तुम्ही शांत आणि धीराचे असता. पण प्रिये, माझ्या प्राणप्रिये, माझा निष्पापपणा बहुतेक वेळा मला दुर्बळ बनवतो कारण मी एक पिता आहे, एक नवरा आहे, एक मुलगा आहे. जर माझा विश्वासघात पिट किंवा कोबूने केला असता तर एकवेळ मी समजू शकलो असतो, पण रॉबेस्पिएअरने माझ्या अटकेच्या आदेशावर सही केली, ज्या प्रजासत्ताकासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले त्याने माझा विश्वासघात करावा ! माझ्या प्रामाणिकपणाचे हेच का बक्षीस?

मी जेव्हा येथे आलो तेव्हा मला हेरॉल्ट द शेशल्स, सायमन,फेरॉक्स इ. मंडळी दिसली, पण त्यांना एकांतवासाची कोठडी नसल्यामुळे ते एवढे काही दुःखी दिसत नव्हते. मी या रिपब्लिकसाठी जेवढ्या शिव्याशाप सहन केले तेवढ्या शिव्या कोणीही खाल्या नसतील. मी जनतेसाठी अनेकांशी वैर पत्करले, क्रांतीच्या काळात गरीबी पत्करली. मला तू सोडून जगात कोणाचीही क्षमा मागण्याची गरज नाही. माझी लायकी नसतानाही तू मला क्षमा केली आहेस कारण तू मला माझ्या गुणदोषांसहीत पत्करले आहेस. जे माझे मित्र म्हणवतात, त्याच रिपब्लिकन्स मंडळींनी मला तुरुंगात डांबले आहे. मला एकांतवासाची कोठडी दिली आहे जणु काही मी एक कारस्थानी गुन्हेगार आहे. सॉक्रेटिसने विषाचा प्याला पिला, पण तुरुंगात त्याला त्याचे मित्र आणि पत्नी भेटत तरी होते. तुला सोडून राहणे किती अवघड आहे याची तुला कल्पना नाही. एखादा अट्टल गुन्हेगाराला जर जबरी शिक्षा द्यायची असेल तर त्याला त्याच्या ल्युसिलापासून तोडावे. त्यापेक्षा मृत्यू परवडला असे तो निश्‍चित म्हणेल. मला खात्री आहे ल्युसिला, एखाद्या गुन्हेगाराला तू कधीच आपला पती म्हणून स्विकारणार नाहीस आणि मी फ्रान्सच्या प्रजेच्या सुखासाठी धडपडतो म्हणूनच तुझे माझ्यावर प्रेम आहे याचीही मला जाणीव आहे. मी फ्रान्सच्या जनतेसाठीच जगतोय म्हणून मी तुझ्या प्रेमाला पात्र आहे.

ते मला हाका मारत आहेत. या क्षणी क्रांतीच्या न्यायालयाचे आधिकारी माझी चौकशी करण्यासाठी येणार आहेत. ते मला फक्त एकच प्रश्न विचारतील. काळजी करू नकोस. ते विचारतील, ‘‘तू प्रजासत्ताकाच्या विरुद्ध कट कारस्थाने केलीस का?’’ असे विचारून ते प्रजासत्ताकाचा अपमान करत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण मी स्वतःच प्रजासत्ताचे शुद्ध रूप आहे ! माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला जाणीव आहे. माझ्या ल्युसिलाचा, लोला आता मला निरोप दे! लाडके, माझ्या वडिलानाही मी त्यांची आठवण काढली आहे हे सांग. हा समाज कृतघ्न आहे, रानटी आहे. माणसाच्या कृतघ्नतेचे आणि रानटीपणाचे एवढे उत्तम उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. माझ्या आयुष्याचे अंतीम क्षण तुझा अपमान करणार नाहीत. माझी भीती साधार खरी ठरली आहे आणि माझे भाकीतही खरे ठरले म्हणायचे! मी एका स्वर्गिय गुण आणि सौंदर्य लाभलेल्या स्त्रीशी लग्न केलंय. मी आजवर एक चांगला पती, एक चांगला मुलगा होतो आणि मी एक चांगला बापही झालो असतो. ज्यांना स्वातंत्र्याची चाड आहे अशा सर्व प्रामाणिक रिपब्लिकन माणसांना आज माझ्याबद्दल वाईट वाटतंय, माझ्याबद्दल आदर वाटतोय. मी वयाच्या तिसाव्या वर्षी मरणार आहे, पण गेली पाच वर्षे, क्रांतीच्या अनेक कड्यावरून मी न पडता चाललो हे एक आश्‍चर्यच मानले पाहिजे. या क्षणी तरी मी जिवंत आहे.

मी माझ्या आठ ग्रंथांच्या उशीवर आज शांतपणे माझे मस्तक ठेवून विसावलो आहे. त्यात मी जे विचार मांडले आहेत त्यातून मी माझ्या देशबांधवांना जुलुमी सरकारपासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय. सत्तेची धुंदी सर्व माणसांना चढते हे सत्य आहे. डेनिस सायराकुस म्हणतो ते यांच्या बाबतीत किती खरे आहे, ‘‘जुलूम हा एक सुंदर एपिटाफ आहे’’

हे अभागी विधवे तू स्वतःचे थोडे सांत्वन कर, कारण तुझ्या गरीब बिचाऱ्या कॅमिलीचा एपिटाफ यापेक्षा कितीतरी चांगला आहे. त्याच्या थडग्यावरील ओळी जुलुमी सत्ताधीशांना ठार मारणाऱ्या ब्रुटस आणि कॅटोच्या थडग्यावरील ओळी आहेत. माझ्या प्रिय ल्युसिला! खरे तर माझा जन्म कविता लिहिण्यासाठी, दुःखी जनतेचे रक्षण करण्यासाठी, तुला आणि तुझ्या आईला सुखी ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्या वडिलांसाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी झाला होता. मी अशा प्रजासत्ताक देशाचे स्वप्न पाहिले होते ज्याचा सारे विश्व आदर करेल. माणूस एवढा अन्यायी आणि रानटी असेल असे मला मुळीच वाटले नव्हते. माझ्या लिखाणातील उपहासात्मक, बोचऱ्या विनोदाने किंवा टीकेने माझे कर्तृत्व झाकाळून गेले आहे असे मानणे मला वाटते बरोबर नाही, पण मला कल्पना आहे त्या उपहासाने माझा बळी घेतला आणि माझ्या डॅन्टॉनबरोबरच्या माझ्या मैत्रीचाही मी बळी आहे.. डॅन्टॉन आणि फिलिप या माझ्या मित्रांबरोबर मला ठार मारणार आहेत यासाठी मी माझ्या मारेकऱ्यांचे आभार मानतो.

माझे सहकारी इतके भेदरट निघतील असे मला वाटले नव्हते. त्यांनी कुठल्या कुठल्या अफवांवर विश्वास ठेवून मला वाऱ्यावर सोडले हे मला माहीत नाही, पण हे सत्य आहे की आम्ही मृत्यूला कवटाळतोय ते आम्ही मोठ्या धैर्याने देशद्रोह्यांवर टीका केली त्यासाठी आणि आम्ही सत्यावर प्रेम केलं म्हणून. आम्ही शेवटचे खरे प्रजासत्ताकवादी म्हणून मरणार आहोत याचे सारे जग साक्षी आहे.

माझ्या प्रियतमे मला क्षमा कर. ज्या क्षणी आपण एकमेकांपासून दूर झालो, त्याच क्षणी खरेतर माझे खरे आयुष्य संपले. मी आता फक्त माझ्या आठवणींवर जगतोय. तुला विसरण्यापेक्षा स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवलेले बरे. माझी ल्युसिला, माझी लोला, मी तुला प्रार्थना करतोय, की मला हाका मारू नकोस. तू मला साद घालू नकोस कारण त्याने मी माझ्या थडग्यात छिन्नविछिन्न होतो. आपल्या लहानग्यासाठी काहीतरी करणे तुला भाग आहे. आता तुला आपल्या होरेससाठीच जगायचे आहे. त्याला माझ्याबद्दल सांग. इतर लोक सांगणार नाहीत ते सत्य त्याला सांग. मी असतो तर त्याच्यावर किती प्रेम केले असते ते त्याला सांगशील. माझ्यावर अत्याचार होत असले तरी देवाच्या अस्तित्त्वावर माझा विश्वास आहे. माझ्या रक्ताने माझ्या चुका धुतल्या जातील, माझी दुर्बलता धुतली जाईल आणि परमेश्वर माझ्या सदगुणांचा आणि माझ्या स्वातंत्र्यावरील प्रेमाचा गौरव करेल. प्रिये, लाडके एक दिवस मी तुला परत भेटेन! ल्युसिला, माझी ॲनेट! मी मृत्यूबद्दल संवेदनशील आहे, सगळेच असतात, पण मॄत्यू माझी सर्व अपराधांपासून सुटका करेल माझे दुर्दैव हाच माझा अपराध आहे.

मी तुझा निरोप घेतो! लोला! माझ्या आत्म्या, माझे जिवन, या पृथ्वीतलावरील माझी स्वर्गदेवता, मी तुला माझ्या चांगल्या मित्रांच्या स्वाधीन करून जात आहे. ही माणसे सदाचारी आहेत, प्रामाणिक आहेत.

होरेस, बाबा, ल्युसिला आता मी तुमचा कायमचा निरोप घेतो. माझ्या आयुष्याचा किनारा आता मला दूर जाताना दिसतोय. मला ल्युसिला तू अजून दिसतेस, माझी लाडकी ल्युसिला अजून किनाऱ्यावर माझा निरोप घेत उभी असलेली मला दिसतेय! माझ्या बांधलेल्या हातानी मी तुला मिठी मारण्याचा प्रयत्न करतोय. माझी तडफड होतेय आणि माझे निर्जीव डोळे तुला पाहण्याचा अजूनही प्रयत्न करत आहेत….

कॅमी..

(रॉबेस्पिअर हा कॅमिली डिमुलाचा शाळकरी मित्र होता आणि शिवाय कॅमिलीचा मुलगा होरेस, त्याचा मानसपुत्र होता.)

मृत्यू :

दुपारी अधिकारी त्याला गिलोटीनसाठी तयार करण्यासाठी आले. तो कोपऱ्यात अंग दुमडून बसला. एखादे चवताळलेले जनावर जसे आक्रमक होते, तसा तो त्या अधिकाऱ्यांशी झगडला. गिलोटीनला घेऊन जाण्यासाठी जी गाडी येते त्यात मृत्यूच्या वाटेवर असतानाही त्याने त्यांच्याशी झटापट केली. त्याला घोडदळाने, पायदळाने, तोफदळाने आणि नॅशनल गार्डच्या सैनिकांनी घेरले असताना त्याने त्याची बंधने तोडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे कपडे वैफल्यग्रस्त होऊन रागाने टराटरा फाडले. त्याने त्याची छाती, मान उघडी टाकली. त्याने जमलेल्या जमावाकडे मदतीची याचना केली ‘‘तुमच्या मित्राला हे ठार मारणार आहेत! मला मदत करा.’’

कॅमिली डिमुलां! ८९ साली त्याने देशभक्तांना हातात बंदुका घेण्याचे आवाहन केले होते. आता जमलेल्या जमावाने त्याला साधी ओळख दाखवण्यासही नकार दिला. ज्या माणसांसाठी त्याने आपले आयुष्य खर्ची घातले ती माणसे आता त्याला वाचवणार का? त्याची झटापट पाहून एका सैनिकाने त्याला गाडीच्या तक्तपोशीला बांधून टाकण्याची धमकी दिली. त्या धमकीने तो शांत झाला आणि त्याने सभोवताली नजर फिरवली. मृत्यू त्याच्या इतक्या जवळ आलाय यावर त्याचा विश्वास बसेना. तेवढ्यात त्याची नजर गिलोटीनकडे गेली. गिलोटीनचे पाते मावळणाऱ्या सूर्याच्या लालसर प्रकाशात लालभडक दिसत होते. प्लेस द ल रेव्होल्युशनच्या चौकात जमलेल्या त्या प्रचंड समुदायामध्ये त्याची कृष आकृती मधोमध उठून दिसत होती. फारच केविलवाणे दृष्य होते ते! (या चौकाचे मूळ नाव होते कॉन्कॉर्ड चौक. जेव्हा या चौकात गिलोटीनखाली माणसे मारण्यात आली तेव्हा त्याचे नाव झाले रेव्होल्युशन चौक) त्याने तेथेही झटापट केली. तो प्रचंड घाबरला होता. जेव्हा तो गिलोटीनच्या पात्याखाली आला तेव्हा त्याच्या मित्रांच्या रक्ताने माखलेले ते पाते त्याला दिसले आणि तो एकदम शांत झाला. त्याचे आवसान परत आले. तो म्हणाला, ‘‘स्वातंत्र्यलढा सुरू करण्यासाठी हे बक्षीस योग्यच आहे.’’ मग त्या घरंगळत येणाऱ्या पात्याखाली त्याचे मुंडके उडले. त्याचा मृत्यू झाला, पण त्या क्षणापर्यंत तो स्वतःचा मालक होता. मरताना त्याने त्याच्या लाडक्या बायोकोच्या केसाची ती बट हातात घट्ट धरली होती…

ल्युसिला आणि डिलॉन यांची मस्तके काही दिवसांने गिलोटीनखाली धडावेगळी झाली. या सगळ्या नाट्याचा उबग आलेली ल्युसिला मात्र अत्यंत धीराने, न डगमगता, मृत्यूला सामोरी गेली.

  • जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल.... Bookmark the permalink.

Leave a comment