पानगळ !

नमस्कार!

मध्ये मी माझ्या तीन कथासंग्रहाबद्दल लिहिले होते. त्यातील बहुतेक कथा अनुवादित किंवा काही परकीय लेखकांच्या कथांवर आधारित आहेत. काही कथांची पार्श्र्वभूमी मी भारतीय करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यातील ही एक कथा.. याचा मूळ लेखक बहुधा ओ’हेन्री असावा… त्याच्या कथेचे नाव आठवत नाही द लिफ असे काहीतरी आहे – कथा ठीक आहे ..पण नंतर मला स्वतःलाच एवढी आवडली नाही .. लिहून बरीच वर्षे झाली…

पानगळ !

पाँडिचेरीची आपली एक स्वत:ची वेगळीच संस्कृती आहे. फ्रेंचांची वसाहत असल्यामुळे या भागात फ्रेंच आणि तामीळ संस्कृतीचे एक सुरेख मिश्रण आपल्याला आढळते. अजूनही बरीच फ्रेंच कुटूंबे येथे तग धरून आहेत. काही तरूणांनी येथील स्थानिक घरांशी घरोबा केल्यामुळे अजून एक मिश्र संस्कृती जन्माला आली आणि त्यात तामिळ सुसंस्कृतपणा आणि फ्रेंचांचा धाडसीपणा या गुणांचा एक सुरेख संगम आपल्याला यांच्या पुढच्या पिढ्यांमधे आढळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्रेंच लोकांची कलासक्तीही या पिढ्यांमधे पुरेपूर उतरली आहे. मी जे सांगतोय ती परिस्थिती साधारणत: १९४२-४३ सालातली. आता सगळी फ्रेंच कुटुंबे फ्रान्सला परतली आहेत, अर्थात एखादे कुटूंब हट्टाने येथे तग धरून राहिले असेल, नाही असे नाही पण जी काही कुटूंबे येथे राहीली आहेत त्याचे मुख्य कारण आहे येथील स्वस्ताई. आपण जर पाँडिचेरीला गेलात तर आपल्याला फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप असलेल्या अनेक इमारती अजूनही दिसतील. मला तर वाटते या दोन संस्कृतीच्या मिलापामुळे जी नवीन पिढी तयार झाली त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधेही बराच बदल झालेला असणार. शेवटी दोन्ही जिन्सचे गूण नवीन पिढीत उतरत असणारच ना !

पाँडिचेरीचे पुड्डूचेरी झाले तरीही या आगळ्या वेगळ्या संस्कृतीच्या या खुणा या शहराने अजूनही जपून ठेवल्या आहेत. त्यात ना कोणाचा धर्म आड आला ना विचार. पाँडिचेरीत, आपण जर इस्ट कोस्ट रोड पकडलात तर आपण एका छोट्याशा पण सुंदर ऐय्यननरप्पन देवळापाशी पोहोचाल त्याच्या शेजारी फार पूर्वी मोकळे मैदान आणि घनदाट झाडी होती. त्या नयनरम्य जागेत एक छोटीशी वस्ती वसलेली होती. १०/१५ वर्षापूर्वी एक फ्रेंच कलाकार फ्रान्स आणि पाँडिचेरीतील महागाईला कंटाळून या शांत वातावरणात वस्तीला आला आणि तेथेच राहिला. त्याने जी चित्रे तेथे जन्माला घातली त्यामुळे त्या गावाचे नाव जगप्रसिद्ध झाले आणि चित्रे विकत घेणार्‍यांचा राबता तेथे वाढला. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर त्या गिर्‍हाईकांसाठी रहाण्याच्या सोयी तयार झाल्या आणि इतर कलाकारांची पावले त्या गावाच्या दिशेला वळाली. कलाकारांसाठी तर हा स्वर्गच होता. इतर कलाकारांची गाठ पडायची, चर्चा झडायच्या तेथे सुरू झालेल्या हॉटेलचे नावही बघा – व्हिंचीज ग्रास आणि एका टपरीचे नाव ही फारच कलात्मक – “कट इअर”. हळू हळू या गावात कलाकारांचे बंगले, कलाकारांचे स्टुडिओ, तीन मजली अपार्टमेंटस्‍ अशा सोयी तयार झाल्या आणि या गावाचे नाव झाले “रेनेसांस” त्याचे झाले रेनेसांपूरम. रेनेसांपूरममधे आपण ज्या संस्कृतीचा वरती उहापोह केला आहे त्याचा प्रचंड प्रभाव पडला आहे हे आपण तेथे गेल्यावर आपल्याला जाणवेलच. सुंदर फ्रेंच स्थापत्यशास्त्राचे नमूने आपल्याला येथे ठायी ठायी दिसतील. इमारतींच्या गुळगुळीत भिंती, मोठ्या खिडक्या, त्याला असणार्‍या विशिष्ठ महिरपी..एखाद्या फ्रेंच खेडेगावात असल्याचा भास झाला नाही तरच नवल……

अशाच एका स्टुडिओ अपार्टमेंट्च्या इमारतीमधे दुसर्‍या मजल्यावर दोन मैत्रिणींचा स्टुडिओ अपार्टमेंट होता. त्यांची नावे त्या दरवाजावर होती “ कोंकणा बॅनर्जी आणि अमेलिया. कोंकणा होती बंगालची आणि तेथे गुरूकूलमधून आली होती तर अमेलियाचा आजोबा पाँडिचेरीचा होता. अमेलिया लहानपणीच पॅरीसला गेली होती आणि आता परत पाँडिचेरीला परतली होती. त्यांची गाठ मागच्याच वर्षी “कट ईअर”मधे पडली होती आणि कला, सॅलाड, कॉफी पासून ते वाईनपर्यंत त्यांच्या आवडीनिवडी जुळल्यामुळे त्या आता चांगल्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या आणि दोघींनी मिळून एकच स्टुडिओ काढला होता.

त्या नोव्हेंबरमधे या शांत आणि कलासक्त गावाला एका अनाहूत पाहुण्याने भेट दिली – “ स्वाईन फ्लू” अर्थात त्यावेळी या पाहुण्याचे नावही माहीत नव्हते. माहीत होते ते फक्त त्याचे पराक्रम. सर्दी, पडसे, घसा दुखणे, ताप, जास्त ताप, तिसरा दिवस आणि खेळ खलास. थोड्याच दिवसात रेनेसांपुरममधे या पाहुण्याची दशहत पसरली. नाजूक अमेलिया आणि या पाहुण्याची कोठे तुलना होणार ? दोघांची भेट झाली आणि अमेलिया अंथरुणाला खिळली. त्या संध्याकाळी ती तिच्या अंथरूणावर मलूल होऊन, गळ्यापर्यंत पांघरूण ओढून खोलीच्या त्या फ्रेंच खिडकीबाहेर शुन्यात नजर लावून पडली होती.

दुसर्‍याच दिवशी कोंकणाला जिन्यात अमेलियाला तपासायला येणारे डॉक्टर भेटले. अमेलियाला तपासत असताना त्यांनी कोकणाला हाक मारली…जरा बाहेरच्या खोलीत ये….

“मला वाटते तिची बरं व्हायची शक्यता…………. दहात…..एक आहे. डॉ. थर्मामिटर झाडत म्हणाले. या डॉक्टरांना थर्मामिटर झाडताना बोलायची सवय का असते कोण जाणे. झटकत बोलताना ते फार तुच्छतापूर्वक बोलतात असे समोरच्याला उगीचच वाटते.

“ या निराशावादी रुग्णांनी आमच्या शास्त्र खोटे ठरवण्याचे ठरवलेले दिसते आहे.” ते हसून म्हणाले.

“तुझ्या या मैत्रिणीने तर मरायचेच ठरवले आहे. तिच्या मनाविरूद्ध काही भयंकर झाले आहे का ? काय आहे तिच्या मनात ?”

“हंऽऽऽऽऽ तिला एकदा हिमालय रंगवायचा आहे…..”

“ते एवढे महत्वाचे नाही. मी त्याबद्दल नाही बोलत. काही प्रेमभंग वगैरे……”

“प्रेम त्या इच्छेएवढे महत्वाचे………….. जाउदेत पण तसे काहीच नाही” कोंकणा.

“मग मला वाटते तिला भयंकर अशक्तपणा आलाय त्याचा परिणाम असावा हा. हे बघ मी माझ्यापरीने आमच्या शास्त्रात जे काही सांगितले आहे त्यानुसार प्रयत्न करतोय पण हिने आता चितेतील गोवर्‍याच मोजायच्या ठरवल्या असतील तर मी आणि वैद्यकीय शास्त्र तरी काय करणार ? औषधांचा बरे होण्यात फक्त पन्नास टक्केच सहभाग असतो.. तिने जर सावरून नवीन लागलेल्या सिनेमाची चौकशी केली तर मी म्हणेन तिची बरी व्हायची शक्यता १० त ………….५ होईल.”

कोंकणाला हसू आले. ’हा डॉक्टर काय प्रॉबेबलिटीने उपचार करतो की काय ”

डॉक्टर गेल्यावर मात्र भलतेसलते विचार मनात येऊन तिला रडूच कोसळले. रुमाल भिजल्यावर तिने तो धुण्याच्या कपड्यात फेकला आणि डोळे पुसत ती आपला इझेल घेऊन अमेलियाच्या खोलीत आली. वातावरण हलके करण्यासाठी तिने जुन्या हिंदी सिनेमातील एक छान तान घेतली आणि अमेलियाकडे नजर टाकली व दुसर्‍या टोकाला आपले काम चालू केले. ती एका जहिरात कंपनीसाठी एका तगड्या, रांगड्या शेतकर्‍याचे चित्र रंगवत होती. तिच्यासारख्या नवीन कलाकारांना अंगावर पडेल ती कामे करावीच लागतात. प्रसंगी आपली आवड बाजूला ठेवूनही. त्या समोरच्या कॅनव्हासवर पूर्ण ताकदीने पेन्सिलीच्या हळुवार रेषा उमटवत असताना तिला अस्पष्ट असा कण्हण्याचा आवाज आला. हातातील पेन्सील बाजूला ठेवून तिने पटकन पलंगाकडे धाव घेतली. अमेलियाचे डोळे सताड उघडे होते. तिच्या ह्रदयाचा ठोका चुकला. पण तिने खिडकीबाहेर नजर लावली होती आणि ती पुटपुटत उलट्या क्रमाने आकडे मोजत होती.

“बारा… अकरा……. दहा..नऊआठ…….सात………………….सहा…..”

कोंकणाने खिडकीबाहेर तिने जेथे नजर लावली होती तेथे बघितले. काय होते तेथे मोजण्यासारखे ? शेजारच्या इमारतीची एक भिंत आणि त्यावर एक सुकलेला कसलातरी कसाबसा चढलेला वेल. पानगळीत त्या वेलाची बहुतेक पाने गळून गेली होती. काही टोकाला होती तीही गळण्याच्या अवस्थेत होती.

“अमेलिया, काय मोजती आहेस तू ?”

“सात ! ती आता पटापट पडताएत. परवा जवळ जवळ शंभर होती. मोजतानाच माझी दमछाक झाली. ते बघ अजून एक पडले. आता फक्त सहाच राहिली.

“ काय सहा, काय पाच ? अमेलिया, जागी हो !”

मोठ्या कष्टाने अमेलिया म्हणाली

“ ती पाने ग ! त्या वेलीवरची पाने मोजतीए मी. शेवटच्या पानाबरोबर मी जाणार. हे मला परवाच कळले आहे. डॉक्टरांनी सांगितले नाही का तुला ?”

“काय वेडेपणा आहे हा ! त्या पानाचा आणि तुझा काय संबंध आहे का ? हा वेल तर तुला आवडत होता ना ? डॉक्टरांनी तर मला सकाळी सांगितले की तू आता बरी व्हायच्या मार्गावर आहेस. चल हा वेडेपणा आता बंद कर आणि मला माझे काम करूदे ! मी सूप करते ते पी गरम गरम. बरे वाटेल तुला. माझे हे काम झाले की त्या पैशात आपण तुला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू आणि तुझी आवडणारी वाईनही आणू !” कोंकणाने हसून सांगितले.

“वाईनची गरज भासेल असे वाटत नाही. नको त्यात पैसे खर्च करूस” अमेलिया खालच्या भकास स्वरात म्हणाली.

“मी ही खिडकी बंद करू का ? मला या उजेडाचा त्रास होतोय !”

“तू दुसर्‍या खोलीत नाही का करू शकत तुझे काम ? मला या पानांवर लक्ष ठेवायचे आहे”

“म्हणूनच मी ती बंद करणार आहे !”

“तुझे काम झाले की सांग मला. मी वाट पहाते आहे त्या शेवटच्या पानगळीची. कंटाळा आलाय मला आता या वाट पहाण्याचा”

“आता जरा डोळे मिटून गप्प पडशील तर बरं होईल” कोंकणा रागावून म्हणाली.

“मी खालच्या बेहरामजीला घेऊन येते. त्याचेही एक स्केच करायचे आहे याच कामासाठी. आलेच मी” असे म्हणून कोंकणा बाहेर पडली.

म्हातारा बेहरामजीसुद्धा एक कलाकार होता. त्याच्या कलेचा दर्जा काय ? हा एक संशोधनाचा विषय. त्या संशोधनाअंती तो त्या गावात एक चेष्टेचा विषय झाला होता हे मात्र खरे. आयुष्यातील साठ वर्षं ओलांडल्यावर त्याला आपण एक कलाकार आहोत याचा साक्षात्कार झाला होता आणि त्याने ते सिद्ध करण्यासाठी मायकेल एन्जेलोसारखी दाढीही ठेवली होती. बेहरामजी एक अप्रसिद्ध, हारलेला, अतिसामान्य कलाकार होऊन गेला असेही पुढे कोणी लिहिण्याचे धाडस करणार नाही एवढा तो सामान्य होता. अर्थात या सगळ्या मतांचा/चेष्टेचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता आणि पुढे होईल असे वाटतही नव्हते. बेहरामजीचा स्वत:वर प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळे आपल्या हातून एक दिवस भव्य दिव्य कलाकृती जन्म घेईल याची त्याला खात्री होती. अर्थात ती तयार करायला त्याने अजून सुरवात केली नव्हती ही गोष्ट अलाहीदा. त्याचा चरितार्थ चालवायला तो मॉडेल म्हणून काम करत असे आणि त्याच्या स्वभावामुळे तो सर्व कलाकारांना प्रियही होता. जरा जास्तच झाल्यावर तो त्याच्या भव्यदिव्य कलाकृतीबद्दल बडबडायचा पण त्याच्या खोलीत एझेलवर लावलेल्या कॅनव्हासवर त्याने रंगाचा एक साधा ओरखाडाही उठवला नव्हता. त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामुळे मृदू स्वभावाच्या माणसांवर त्याची करडी छाप पडायची हीच काय ती जमेची बाजू.

कोंकणा बेहरामजीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तो त्या अंधार्‍या खोलीत त्याच्या कॅनव्हास समोर उभा होता. तोच कॅनव्हास जो गेले कित्येक वर्षात तसाच कोरा होता आणि वाट बघत होता. कोंकणाने अमेलिया कशाची वाट बघते आहे ते सांगितल्यावर बेहरामजीने हात झाडले आणि तो त्याच्या मजेशीर पारशी वळणाच्या बोलीत म्हणाला “ काय बोलते तुम्ही ? साला जगामंधी असे काय असते काय. अरे माणूस पान पडल्यावर मेला तर काय होनार ? साला मी तर असले कायबी एकले नाय. तिच्यासाठी साला कामच करायचा दिल करत नाय आता. काय वेडा हाय काय ती ? पण चांगला हाय हां ती डिकरी….”

“बेहरामजी ती आजारी आहे. तुला यायचे नसेल तर येऊ नकोस पण असे बोलू नकोस बाबा. मी तसेच काळजीत आहे.” कोंकणाने नाराजी दर्शविली.

“अरे तू रागवू नको बाबा. मीबी तेच म्हनतो ना. साला ही जागाच खराब हाय. माझा हे चित्र झाला ना की ते विकून आपण हे गाव सोडून एका चांगला गावात जाऊ. काय ! चल आता जाउ तुझ्या घरामंदी.”

ते दोघे कोंकणाच्या स्टुडिओत आले तेव्हा अमेलिया गाढ झोपली होती. खिडकीचे पडदे ओढून तिने बेहरामजीला पायाचा आवाज न करण्याची खुण करुन तिच्या मागे यायला सांगितले. त्या खोलीतून त्या दोघांनी एकामेकांकडे बघितले आणि कोंकणाने शांतपणे खिडकी उघडली. दोघेही स्तब्धपणे त्या वेलाकडे बघत राहिले. मनातील खळबळ कोणीच बोलेना. कदाचित त्या वेलाकडे बघत ते अमेलियाच्या आयुष्याचा विचार करत असावेत किंवा त्यांच्याही मनावर त्या पानांची गुढ गडद छाया पडली असेल. शांतता होती हे खरे. बेहरामजीने न बोलता (हे कधी होत नाही) आपली जागा घेतली आणि कोंकणाने आपले काम सुरू केले. रात्रभर वारा भणाणत वहात होता आणि दुरवर कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते. मनावर दडपण आणणारे वातावरण !

सकाळी कोंकणा उठली तेव्हा तिला अमेलिया डोळे सताड उघडे ठेवून पडद्याकडे भकास नजरेने पहात होती.

“उघड ती खिडकी, बघू दे मला” अमेलिया किंचाळली.

हताश होत कोंकणाने खिडकी उघडली.

काल सुटलेल्या वादळी पावसातही त्या वेलावर एक पान तग धरून होते. एकच शेवटचे पान. पिवळसर हिरवे आणि सुकलेले.

“हे शेवटचे पान. काल रात्री वार्‍यात ते पडले नाही हे नवलच आहे. पण आज ते पडेल आणि मी या जगात नसेन.” अमेलिया रडक्या पण ठाम स्वरात म्हणाली.

“अग तुला असे बोलताना काहीच कसे वाटत नाही ? माझातरी विचार कर थोडा ! कोंकणालाही रडू कोसळले.

पण अमेलियाने उत्तर दिले नाही. माणसाला या लांबच्या गुढ प्रवासाला निघताना फार एकटे वाटत असावे. आणि येथे तर अमेलियाने एका वाळक्या पानाशी आपले आयुष्य जोडले होते. हे नाते इतर नात्यांपेक्षा तिला आता फारच घट्ट वाटत होते.

दिवस असाच उदासवाणा पार पाडला. संधिप्रकाशातही ते पान त्यांना दिसत होते. रात्र होताच वारे सुटले आणि कोंकणाने खिडक्या बंद केल्या. उजाडल्यावर अमेलियाने परत चिडचिड करत ती खिडकी उघडण्याची आज्ञा केली.

ते पान अजून तसेच तेथेच होते.

अमेलियाने एक दिर्घ श्वास घेतला आणि त्या पानाला प्रेमाने नजरेने कुरवाळले. मग तिने कोंकणाला हाक मारली.

“ कोंकी, मी खरच फार दुष्ट आहे ! माझा दुष्टपणा उघडकीस यावा म्हणूनच ते पान तेथे अजून तग धरून आहे. फारच वाईट वागले मी तुझ्याशी. मला थोडीशी कॉफी देतेस का ? आणि एक आरसाही दे. जरा मला हात दे, आणि बसते कर मला. मला तुझ्याकडे जरा डोळे भरून बघू देत. तुझी माफी मागायची म्हणजे गुन्हाच ठरेल.”

थोड्याच वेळात अमेलियाच्या ओठातून तिची इच्छा बाहेर पडली

“ एखाद्या दिवशी मी हिमालय रंगवणार हे निश्चित”.

दुपारी डॉक्टर आले आणि कोंकणाची अमेलियाच्या बडबडीपासून सुटका झाली. डॉक्टरांना सोडायला ती जिन्यापर्यंत गेली. डॉ. म्हणाले “ मला वाटते तिला आता कसला धोका उरला नाही. थोडी काळजी घेतलीत तर ठणठणीत होईल ती.”

त्या दुपारी कोंकणा अमेलियाच्या पलंगापाशी आली आणि तिने तिला परत बसते केले.

“अमेलिया मला तुला काहितरी सांगायचे आहे.

“कालच बेहरामजी गेला. तो म्हणे गेले दोन दिवस त्या विचित्र तापाने आजारी होता. सफाईवाल्याला तो त्याच्या खोलीत जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचे कपडे वाळूने माखले होते आणि तो थंडगार पडला होता. कुठे गेला होता तो रात्री कोणास ठावूक. त्यांना एक शिडी आणि हिरव्या पिवळ्या रंगाने माखलेले पॅलेटही सापडले. तुला आश्चर्य वाटत होते ना की ते पान का पडले नाही? ऐक,

त्या रात्री ते पान पडल्यावर तो त्या भिंतीवर ते पान रंगवत होता.”

– जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

1 Response to पानगळ !

  1. prafful bhalshankar says:

    pangal apratim ,,,, dusree shabda nahi

Leave a comment