
दोन घटना ; एक दुसऱ्या महायुद्धातील आणि दुसरी आत्ताची.
आज करोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या आकड्याने १००००० चा आकडा पार केला. आणि जवळजवळ सर्व देशात तो पसरला आहे. या शिवाय जगाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर करोना व्हायरस किंवा भूकेने मेलेल्या लोकांची संख्या मला वाटते एकच होईल. परमेश्र्वराकडे मी प्रार्थना करतो की जगातील सर्व शास्त्रज्ञांना लवकरच यावरील लस शोधण्यात यश येऊ देत. कम्युनिस्ट आणि समाजवादावरील लस, हे प्रकरण संपले की आपोआपच निर्माण होईल याचा मला विश्र्वास आहे आणि सुबुद्ध माणूस ही लस स्वतःच टोचून घेईल. करोना व्हायरस हा चीनमुळे पसरला यात मला वाटते कोणाच्याच मनात आता शंका नसावी. अर्थात याला अपवाद असतील फक्त माओवादी आणि कम्युनिस्टांनी पोसलेले काही पत्रकार, राजकारणी आणि वरून कम्युनिस्ट आणि आतून भांडवलशाहीच्या आशिर्वादाने पोट भरणारे तथाकथित समाजवादी.. नुसते भारतातीलच नव्हे तर जगभरातील.
जगभरात खान मार्केटस् पसरली आहेत आणि त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो तो म्हणजे मानवशत्रू कम्युनिस्ट यांची तळी उचलून धरणे. या बाबतीतही हेच झाले आहे हे आपल्याला खालील माहिती वाचल्यावर लक्षात येईल. आता कोणी म्हणेल (नेहमीप्रमाणे) की अशा अनेक कॉन्स्पिरसी थेअरीज नेटवर पसरल्या आहेत पण मी जे खाली लिहिले आहे त्याचे सर्व पुरावे तुम्हाला शोधल्यास सापडतील. ज्याला या बाबतीत शंका आहे त्यांनी ती माहिती स्वतः शोधावी.
जेव्हा वुहान व्हायरसमुळे मरून पडलेल्या माणसांचे व्हिडिओ इंटरनेटवर पसरले तसे चीनच्या सिपीसीला काहीतरी हालचाल करणे भाग पडले. त्यांनी पहिले पाऊल उचलले ते म्हणजे हा व्हायरस वुहानच्या माशांच्या बाजारातून पसरला याची हाकाटी सुरुवात केली. सिपीसीच्या प्रतिनिधीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात हे प्रथम जाहीर केले. चीनमधील हुबेई प्रांताची वुहान ही राजधानी आहे आणि हे त्या प्रांतातील सगळ्यात मोठे शहर आहे. सर्वच बाबतीत. हुआनान सिफूड मार्केट हे वुहानच्या जिॲनघान भागात आहे. माशांची आणि सर्व प्रकारच्या जंगली प्राण्यांची खाण्यासाठी विक्री करणारा हा एक मोठा बाजार आहे. सिपीसीने (वुहान हेल्थ कमिशन) असे म्हणणे मांडले की ही साथ तेथे अचानक सुरु झाली आणि त्याची कुठलीही कल्पना कोणालाही नव्हती. ही साथ या बाजाराशी संबंधीत आहे असे काही मेडिकल इन्स्टिट्युटचे म्हणणे आहे असेही जाहीर करण्यात आले. हा रोग न्युमोनिया सदृष असल्यामुळे लोकांचा त्यावर विश्र्वास बसला.
३० डिसेंबरला सिपीसीने एक अंतर्गत सुचना जाहीर केली की अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास वुहान हेल्थ कमिशनच्या त्वरित निदर्शनास आणून द्यावे. ही सुचना झपाट्याने इंटरनेटवर पसरली. तोपर्यंत ही सुचना ही त्या खात्याची अंतर्गत बाब होती हे लक्षात घ्या. पण ती आता इंटरनेटवर पसरली आहे हे समजल्यावर घाईघाईने त्या खात्याने ३१ डिसेंबरला एक जाहीर सुचना छापली. त्यात त्या पसरलेल्या न्युमोनिया सदृष आजाराचा आणि त्या बाजाराचा संबंध आहे असे काही मेडिकल इन्स्टिट्युटचे म्हणणे आहे असे जाहीर करण्यात आले. पण त्याच नोटीशीमधे एक महत्वाची माहितीही पुरवली होती. ती म्हणजे हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आहे असा कुठलाही पुरावा आढळलेला नाही. कारण कुठल्याही वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना हा आजार जडलेला नाही. (हे वाक्यच धुळफेक करणारे आणि विनोदीही आहे)
१ जानेवारीला तो हुआनान बाजार बंद करण्याची नोटीस लागली आणि तो तातडीने बंद करण्यात आला. लगेच तो स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात आला. या योगे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले असावेत. (किंवा तो पर्यंत सिपीसीला वाटत होते की हे एवढ्यावरच थांबेल.) त्यानंतर झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत हेच सांगण्यात आले की वुहान मधील ज्याला ज्याला हा संसर्ग झाला आहे तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या बाजाराच्या संपर्कात आलेला आहे.
जानेवारीच्या २६ तारखेला इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीने असे जाहीर केले की जे नमुने गोळा करण्यात आले होते त्यातील ५८५ पैकी ३३ नमुन्यामधे नॉव्हेल करोना व्हायरस न्युक्लिक ॲसिड सापडले आहे आणि तो वेगळा करण्यात त्यांच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे आणि त्यावरून असं दिसत आहे की हा व्हायरस प्राण्यांतून संक्रमीत झाला आहे. या सगळ्या प्रचारातून वुहानच्या त्या बाजारातून हा व्हायरस पसरला आहे ही सरकारी भूमिका सर्वांना मान्य झाली होती. परंतु काही दिवसांनंतर एका जर्नलमधे (जर्नल सायन्स) प्रकाशित झालेली माहिती काहीतरी वेगळेच सांगत होती. या अहवालामधे लॅन्सेटमधे प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरचा दाखला दिला होता. लॅन्सेटमधे प्रसिद्ध झालेल्या या माहितीची तारीख होती १५ फेब्रुवारी २०२० आणि याचे शिर्षक होते ‘‘क्लिनिकल फिचर्स ऑफ पेशन्टस् इन्फेक्टेड विथ २०१९ नॉव्हेल कोरोना व्हायरस इन वुहान, चायना.’’ हा पेपर लिहिला होता प्रो.चाओलिन हुआंग, येमिंग वँग, प्रो. शिंगवँग ली, प्रो. लिली रेन, प्रो. जिअँनपिंग झाओ, यीहू, या पेपरची तारीख होती जानेवारी २४, २०२०. यामधे वुहानच्या त्या बाजारात या व्हायरसची लागण कशी झाली नसावी याचा उहापोह केला होता. या पेपरचा मुख्य लेखक होता जिन-तान हॉस्पिटलचा डेप्युटी डायरेक्टर प्रो. चाओलिन. या हॉस्पिटलला अज्ञात व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. एका पत्रकाराने त्याची या संदर्भात मुलाखात घेतली तेव्हा तो म्हणाला, ‘‘ हा लॅन्सेटमधील पेपर फार महत्वाचा आहे. यात कोरोना व्हायरसच्या पहिल्या पेशंटवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात काढलेले निष्कर्ष खालील प्रमाणे-
१ पहिल्या पेशंट १ डिसेंबरला सापडला आणि त्याच्यात जी लक्षणे आढळली त्याचा आणि हुआनच्या त्या बाजाराशी काहीही संबंध नव्हता,
२ साथ पसरल्यानंतर या पेशंटचा आणि इतर रुग्णांचा संबंध आला नव्हता.
३ डिसेंबर च्या १० तारखेला अजून तीन रुग्ण सापडले. त्यातील दोन रुग्णांचा वुहानमधील त्या बाजाराचा कसलाही संबंध नव्हता.
४ दिसेंबर १५ नंतर मात्र त्या बाजारातून अनेक रुग्णांची बातमी बाहेर आली.
५ त्या बाजारात कुठल्याही प्रकारची वटवाघुळे विकली जात नव्हती आणि तेथे एकही वटवाघुळ सापडले नाही असा अहवाल चीनी सिडीसी ने दिला आहे.
या पेपरमधे एकूण ४१ रुग्णांचा अभ्यास केला गेला आहे आणि त्यातील १४ रुग्णांचा त्या बाजाराशी कसलाही संबंध आला नव्हता.
जानेवारी २९ तारखेला लॅन्सेटमधेच जिन यिनतान हॉस्पिटलमधे असलेल्या कोरोनाने बाधित ९९ रुग्णांचा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की त्यातील ५० रुग्णांचा त्या मासळीबाजाराचा कसलाही संबंध आला नव्हता. न्यु इंग्लंड जर्नलच्या मतानुसार जानेवारी २२ अगोदर जे ४२५ रुग्ण सापडले होते त्यापैकी ४५ रुग्णांचा वुहानमधील त्या मासळीबाजाराचा कसलाही संबंध आला नव्हता. ज्या डॉक्टरांनी हा अहवाल दिला आहे हे चीनमधील वैद्यकीय तज्ञ आहेत. हा पेपर वाचल्यावर जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीतील साथीच्या रोगांचे एक तज्ञ, डॅनियल लुसी म्हणाले, ‘‘ या पेपरमधील माहिती जर खरी आहे गृहीत धरले तर कोरोनाचा पहिला रुग्ण नोव्हेंबरच्या सुरुवातीस सापडला असला पाहिजे.’’ कारण संसर्ग आणि त्याची लक्षणे दिसण्यात काही काळ जावा लागतो ज्याला आपण इनक्युबेशन पिरिअड म्हणतो. हे जर खरे असेल तर कोरोना शांतपणे पसरत होता आणि जेव्हा तो त्या मासळीबाजारात प्रकट झाला त्यावेळी त्याला तेथे येऊन बराच काळ उलटला असला पाहिजे.
नॅशनल हेल्थ कमिशनचे तज्ञ वुहानमधे ३१ डिसंबर २०१९ या दिवशी आले. या तज्ञांनी कोरोना व्हायरसची लागण कोणाला झाली आहे हे ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक अटी जाहीर केल्या. १) त्या रुग्णाचा वुहानच्या मासळीबाजाराशी संबंध आलेला असला पाहिजे. २) त्याला ताप असला पाहिजे आणि ३) जिनोम सिक्वेंसिंग प्रमाणे ते सिद्ध झाले असले पाहिजे. ही तिनही लक्षणे जर आढळली तर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे मानण्यात यावे असे जाहीर करण्यात आले. या मार्गदर्शक तत्वांनुसार तज्ञांचा दुसरा गट येईपर्यंत काम चालले होते. ही तारीख होती
जानेवारी १८. त्यात डॉ. जॉग नानशान हेही होते. या गटाने या मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा केली. प्रश्र्न असा होता की जर १४ रुग्णांचा संबंध त्या मासळी बाजाराशी आला नव्हता तरीही अशी अट का घालण्यात आली. याचाच अर्थ असा होतो की कोरानाचा दुसरा कुठलातरी स्त्रोत असला पाहिजे आणि तो दडपण्यासाठी ही सगळी धडपड चालली होती. हे म्हणजे तुमची हरवलेली किल्ली फक्त एकाच दिव्याखाली शोधा असं सांगण्यासारखे आहे.
गॉरडॉन चँग जो एशियन घडामोडींचा तज्ञ मानला जातो म्हणतो, ‘‘ आपल्याला माहिती आहे की चीनने जे रुग्णांचे आकडे जाहीर केले ते विश्र्वास ठेवण्यालायक नाहीत. बेजिंगने जवळजवळ सहा आठवडे कोरोना दडपून ठेवला होताआणि मग जेव्हा सिसीपीने जानेवारीच्या २० तारखेला कोरोना अधिकृतरित्या जाहीर केला तेव्हापासून मग त्यांनी माहिती दडपण्यास सुरुवात केली किंवा प्रचारी आकडे प्रसारित करण्यास सुरुवात केली. हे आपल्याला कशावरून समजले? कारण त्यांनी २६ जानेवारीला कोरोनासाठी जो सेंट्रल लिडींग ग्रुप स्थापन केला त्यात ९ माणसांची नेमणुक केली गेली. त्यात पार्टीचे गोबेल्सना नेमण्यात आले होते. उदा. या ग्रुपचा व्हाईस चेअरमनला कम्युमिस्ट प्रचार यंत्रणेचा सर्वेसर्वा समजले जातो. पार्टीला रुग्णांची काळजी नव्हती, कोरोनाची काळजी नव्हती. पुढे काय होणार आहे हे माहीत असल्यामुळे त्यांनी जगाला उत्तर देण्यासाठी असल्या नेमणूका केल्या. त्यांना माहिती दडपायची होती आणि जी काही बाहेर येईल त्यावर मजबूत नियंत्रण ठेवायचे होते. त्यांना कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यापेक्षा ते जास्त महत्त्वाचे वाटत होते. अर्थात चीनला हे काही नवीन नाही. माओच्या राज्यात एकंदरीत दोन कोटी प्रजा माओने ठार मारली. त्यानंतर तिआनमेनमधे काय झाले हेही आपल्याला माहीत आहे. यावर मी एक लेख लिहिणार आहे. असो. ज. रॉबर्ट स्पाल्डिंग सार्सच्या काळात चीनमधे होता. तो म्हणतो, ‘‘ मी त्या काळात चीन मधे होतो. नंतर आमची तेथून सुटका करण्यात आली पण तेव्हाही सिपीसीने सार्स दडपण्याचा अतोनात प्रयत्न केला. जेव्हा त्यांना ते अशक्य झाले तेव्हा मात्र त्यांनी आत्ताप्रमाणे खोटा प्रचार सुरु केला होता.’’ तुम्ही जर त्याकाळातील बातम्या वाचल्यात तर तुम्हाला कोरोनाच्या बातम्या वाचतोय की काय असा भ्रम होईल.
जानेवारीच्या १० तारखेला चीनने नॉव्हेल कोरोनाचा पूर्ण जिनोम सिक्वेन्स जाहीर केला. किंवा त्यांना तो करावा लागला असं म्हणा हवं तर. हा प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील सगळे विषाणूशास्त्रज्ञ त्याचे विश्लेषण करू लागले. जानेवारीच्या ७ तारखेला नॅशनल इंस्टिट्युट ऑफ कम्युनिकेबल डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन चे एक प्रोफेसर झँग यॉनझेन यांनी फुदान युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ यांच्या सहयोगाने एक रिसर्च पेपर ‘द नेचर’ या मसिकाकडे दाखल केला. हा ३ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. यात असे प्रतिपादन केले होते की हा विषाणू CoVZC45 आणि CoVZXC21 या दोन विषाणूंशी साधर्म्य दाखवतोय. हे दोन विषाणू झाउशान प्रांतातील वटवाघुळातून पिपल्स लिबरेशन आर्मीच्या शास्त्रज्ञांनी वेगळा केला होता. वुहानमधे सापडलेल्या कोरोना विषाणूमधे असलेले न्युक्लिओटाईड हे CoVZC45 या विषाणूनमधील न्युक्लिओटाईड ८९.१% जुळतात. एवढेच नाही तर त्यातील अमायनो ॲसिड (प्रोटिनमधे) हे १००% सारखे आहेत. जगातील इतर शस्त्रज्ञांनी मग ब्लास्ट नावाची संगणक प्रणाली वापरून उपलब्ध असलेल्या डाटावरून व्हायरल सिक्वेन्सचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासाचे निकाल झँगच्या संशोधनाशी तंतोतंत जुळले. चीनच्या सेंटर फॉर डिसिज कंत्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेतील अजून एका शास्त्रज्ञाने, ज्याचे नाव होते लु रॉजिआन आणि त्याच्या चमूने एक पेपर लॅन्सेटमधे प्रकाशित केला. तारीख होती ३० जानेवारी. त्यात त्यांनी असे प्रतिपादन केले होते की कोरोना विषाणू बाधीत रुग्णांमधे आढळलेले विषाणू हे झुशानमधे वटवाघुळातून बाजूला केलेल्या विषाणूंशी अत्यंत जवळचे साधर्म्य दाखवतात. (८८%) त्यात इतरही बरीच माहीती दिली आहे पण ती मला समजली नाही म्हणून मी येथे देत नाही. वटवाघुळातून हा विषाणू प्रथम शोधला इम्स्टिट्युट ऑफ मिलिटरी मेडिसीन नानजिंग कमांड येथील शास्त्रज्ञांनी. हे मुख्यालय आहे झुशान येथे. त्यांनी ५ जानेवारी २०१८ रोजी जो पेपर प्रसिद्ध केला त्या पेपरचे छायाचित्र दिले आहे. यात असे लिहिले की या मिलिटरीच्या शास्त्रज्ञांना झुशान शहरात सार्स सदृष अनेक विषाणू वटवाघुळात सापडले आहेत. त्याचे नामकरण झाले-झाउशान विषाणू. थोडक्यात काय शास्त्रज्ञांना आता समजले आहे की आत्ता सापडलेला विषाणू हा झाउशान विषाणू किंवा बॅट लाईक व्हायरस किंवा सार्स या विषाणूंसारखाच आहे. जो १८ साली चीनच्या मिलिटरीच्या शास्त्रज्ञांनी ( नानजिंग मिलिटरी रिसर्च इन्स्टिट्युट ) वटवाघुळांपासून वेगळा काढला होता. आता या विषाणूमधील साधर्म्य इतके कसे काय हा एक वादाचा विषय होऊ शकतो. विशेषतः जेव्हा एखादा विषाणू दुसऱ्या सावजावर उडी मारतो तेव्हा त्याच्या प्रोटीनच्या कवचात अनेक बदल होतात. त्यामुळे १००% साधर्म्य आढळणे अत्यंत दुर्मिळ आहे. मग या विषाणूत काही बदल केला गेला का ? जेणेकरून तो मूळ विषाषूसारखा होईल (तेवढाच घातक ) शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ही शक्यता नाकारता येत नाही. हे करता येणे शक्य आहे का? याचे उत्तर आहे रिव्हर्स इंजिनिअरींग करून हे करता येऊ शकेल. हा विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाला नसण्याची शक्यता जवळजवळ नाही कारण मग तो १०० % समान नसता. या विषाणूत जे काही उलटबदल झाले ते एखाद्या प्रयोगशाळेत झाले असण्याची शक्यता जास्त आहे.
जानेवारीच्या २१ तारखेला पाश्चर इन्स्टिट्युट, शांघाई, येथील शास्त्रज्ञांनी सायन्स चायना लाईफ सायन्सेस या मासिकात एक पेपर प्रकाशित केला. त्यात त्यांनी एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख केला आहे. या पेपरचे शिर्षक वाचल्यावर आपल्याला कळून येते की हे संशोधन कुठल्या दिशेने चालले होते. त्याचा अर्थ साधारणतः असा होतो, ‘‘सध्याच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वांगिण वाढ किंवा बदल आणि माणसाला त्याचा संसर्ग कसा होतो याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर असलेल्या प्रोटीनच्या तुऱ्याचे मॉडेलिंग.’’ त्यात त्यांनी एक बाब लक्षात आणून दिली आहे की जरी वुहान नॉव्हेल करोना विषाणू मधी एस-प्रोटीन आणि सार्सच्या याच प्रोटीनमधे फारसे साम्य नसले तरी त्यात काही ठिगळं अशी होती की ज्याच्यात १००% साम्य आढळळे आहे. हे तुरे किंवा इंग्रजीमधे त्यांना स्पाईक म्हणतात कोरोना विषाणूसाठी फार महत्वाचे आहेत कारण याच स्पाईक्सने तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. माणसाच्या पेशींवरही अशीच काही स्पाईक्स असतात आणि हे रिसेप्टर किंवा तुरे कुठल्या पेशींना त्याच्याची संयोग करू द्यायचा हे ठरवतात. थोडक्यात याला जर कुलुपाची उपमा दिली तर कोरोनाचे तुरे (एस प्रोटीन) हे त्या कुलुपाची किल्ली असतात. एकदा का ही किल्ली त्या कुलुपाला लागली की हा विषाणू पसरतो माणसाच्या पेशींचा नाश करतो. पण निसर्गाने इतर पेशी हल्ला करू नये म्हणून निसर्गात आढळणाऱ्या इतर विषाणूंकडे ही किल्ली दिलेली नाही. थोडक्यात एका गाडीची चावी दुसऱ्या गाडीला लागत नाही. ती लागण्यासाठी काय करावे लागेल ? त्या किल्लीत सुधारणा करावी लागेल. तेच काम २००७ पासून वुहानमधील संशोधानत चालले होते असं म्हणायला हरकत नाही.
आता हे जे सगळे पेपर्स प्रकाशित झाले होते त्यातील धोका सिपीसीच्या लक्षात येऊ लागला होता. साऊथ छायना मॉर्निंग पोस्ट मधील फेब्रुवारी २८च्या बातमीनुसार शांघाई पी ३ प्रयोगशाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला. याच प्रयोगशाळेने वुहान कोरोना विषाणूचा पहिला जिनोम सिक्वेनस जगाला दाखवला होता. त्यामुळे या विषाणूवरचे तेथील संशोधन जवळजवळ बंद पडले. प्रो. झँग यॉन्गझेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ जानेवारीला हा पेपर प्रसिद्ध केला होता ते याच प्रयोगशाळेतून. हा पेपर ५ जानेवारीलाच तयार झाला होता. (चाईशिनमधे आलेल्या बातमीनुसार) त्याच दिवशी शांघाई पब्लिक हेल्थ क्लिनिकल सेंटरने हे संशोधन नॅशनल हेल्थ कमिशनच्या नजरेस आणून दिले आणि हा विषाणू पसरू नये म्हणून काहीतरी उपाय करावा हे सुचवले. त्यांच्याकडून ११ तारखेपर्यंत काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी हे संशोधन व्हायरॉलॉजिकल.ऑर्ग या स्थळावर तो प्रदर्शित करण्याचे ठरवले. जगाला ही माहिती देणारी ही पहिलीच संस्था ठरली. हुबेई हेल्थ कमिटीने मग सगळ्या रक्ताचे नमुने, त्याच्या संबंधित असलेली माहिती (डाटा) नष्ट करण्याचा आदेश दिला. एवढेच नाही तर या संदर्भात कुठलाही पेपर प्रकाशित करण्यावर बंदी घातली. त्यानंतर मात्र हे प्रकरण वरच्या पातळीवर हाताळले जाऊ लागले आणि चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने एक आदेश जारी केला. त्यानुसार (पत्र क्र. २०२०/३) वरील सुचना देशभर रवाना करण्यात आल्या. यानंतर मात्र करोनाच्या प्रकरणात धावपळ करणारी चीनी शास्त्रज्ञ मंडळी एकदम शांत पडली.
सिपीसी आपल्यापासून काय लपविण्याचा प्रयत्न करते आहे? त्यांनी सहा आठवडे ही बातमी दडपली. नंतर हा विषाणू चीनभर पसरू दिला आणि एवढेच नव्हे तर तो जगभरही पसरत असताना सिपिसीने सतत खोट्यानाट्या बातम्या हेतुपुरस्कर पसरवल्या. हे कृत्य अत्यंत बेजबाबदार आणि जगासाठी धोकादायक आहे. चीनी जनता आणि त्यांच्याबरोबर सारी पृथ्वी संकटात सापडली आहे. हा विषाणू माणसांपर्यंतच मर्यादित राहिला तर ठीक आहे. जर तो जनावरात पसरला तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही आणि तो पसरणारच नाही अशी ग्वाही कोणी देत नाही. हा विषाणू आता पृथ्वीतलावरून जाणार नाही हे निश्चित. तो परत परत मुटेट होऊन येणार. प्रत्येक वेळा जेव्हा त्याची साथ पसरेल आणि माणसे मरतील त्या माणसांच्या खुनासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनालाच जबाबदार धरले जाईल किंवा जबाबदार धरले पाहिजे. याला आपणही जबाबदार आहोत. विशषतः पश्चिमी राष्ट्रे. या राष्ट्रांनी चीनच्या आर्थिक मदतीला भुलून त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी तरूण शास्त्रज्ञ पाठवले. त्यांच्या युनिव्हर्सिटींबरोबर संशोधनाचे कार्यक्रम आखले. त्यांच्या उद्योग जगताकडून देणग्या स्विकारल्या (ज्या खरेतर सरकारीच होत्या). आणि मुख्य म्हणजे या सगळ्या कार्यक्रमात कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. पुढे काय होणार आहे याची तमा बाळगली नाही. काही शास्त्रज्ञ वारंवार सावधानतेचे इशारे देत असताना यांनी वर्तमानपत्रे आणि चीनी पुरस्कृत मिडियाचा वापर करून त्यांना गप्प बसवले त्यांचा आवाज दाबून टाकला. आपण आत्ता आपल्या येथे जे पाहतोय ते हेच आहे. आपल्या येथील तथाकथित समाजवादी विचारसरणीची वर्तमानापत्रे आणि त्यांचे पत्रकार सध्या हेच काम करताना दिसतात. कम्युनिस्टांची विचारसरणी ही एका हुकुमशहाची विचारसरणी आहे आणि ती पार शेवटपर्यंत झिरपली आहे. प्रत्येक कम्युनिस्ट हा हुकुमशहाच असतो, फॅसिस्ट असतो हे इतिहासात अनेक वेळा सिद्ध होऊनही सामान्य लोक त्या तत्वज्ञानाला बळी पडतात हे एक शोकांतिका आहे. असो. हे जरा विषयांतर झाले आहे…
आता आपण एका संशोधिकेच्या काळ्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणार आहोत. आपण जर इंटरनेटवर शोध घेतलात तर आपल्याला या बाईबद्दल बरीच माहिती मिळू शकेल. हिचे नाव आहे ‘‘शी झेंगली’’ शी हे हिचे आडनाव आहे. ही एक विषाणूशास्त्रज्ञ आहे आणि वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीमधे संशोधन करते. चीनची जी व्हायरॉलॉजीची जी कमीटी आहे त्याची ती एक वरिष्ठ सदस्य आहे. ती चायनीज जर्नल ऑफ व्हायरॉलॉजीची संपादकही आहे. तिने अनेक वर्षेवटवाघुळांवर आणि कोरोना विषाणूंवर संशोधन करण्यात घालवली आहेत. जवळ जवळ तिनशे विषाणू तिने शोधले आहेत जे वटवाघुळापासून तयार होतात. याच बाईने सार्सचा विषाणू शोधला होता. वर ज्या किल्लीचा उल्लेख झाला आहे ती किल्ली याच बाईने प्रथम शोधून काढली. याच शास्त्रज्ञाने २०१५ साली एक तिच्या संशोधनाबद्दल पेपर वाचला होता त्यात कृत्रिमरित्या विषाणू कसा तयार करता येईल याचा उहापोह केला होता. ती ज्या प्रयोगशाळेत काम करत होती त्या प्रयोगशाळेत या प्रकारच्या संशोधनासाठी लागणारी सर्व उपकरणे होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या काळात या प्रयोगशाळेत ज्या काही सोयी आहेत तशा जगात कुठल्याही विषाणूंच्या प्रयोगशाळेत नाहीत असेही बोलले जात होते.
शी झेंगलीने एक नाही तर वटवाघूळे आणि विषाणू यावर चार पेपर प्रसिद्ध केले होते. हे वाचताना सामान्य वाचकांना असे वाटण्याची शक्यता आहे की हे सगळे पेपरद्वारे प्रकाशित करण्याची या शास्त्रज्ञांना परवानगी कशी मिळते ? ज्या लोकांना अशा प्रयोगशाळेत काम केले आहे त्यांना याचे उत्तर माहीत असेल. एक म्हणजे पेपर पसिद्ध करणे हा एक मानाचा भाग असतो. त्यात जर तो एखाद्या आंतराष्ट्रिय मासिकात प्रसिद्ध झाला तर अजूनच, दुसरे म्हणजे बऱ्याच वेळा ही शास्त्रे एखाद्या देशात फार कमी जणांना कळत असतात मग हे संशोधन खरेच झाले आहे का हे कळण्यासाठी तो पेपर प्रसिद्ध करणे हा सगळ्यात सोपा मार्ग कारण मग त्यावर जगभर त्यावर चर्चा केली जाते. प्रश्र्न विचारले जातात आणि ढोंग असेल तर लगेचच उघडे पडते. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे त्या प्रयोगशाळेस मिळणारे पैसे हे या पेपर्सवर अवलंबून असतात. चवथे कारण म्हणजे त्या शास्त्रज्ञाची वैयक्तिक महत्वाकांक्षा. तर २०१० साली शी झेंगली सार्सच्या विषाणूवर संशोधन करत असताना ती हा विषाणू माणसात पसरू शकतो का याचाही अभ्यास करत होती. त्यात मग एस-प्रोटीनचा अभ्यास करण्यात आला आणि मग सिंथेटिक विषाणू हे नवीन शास्त्र जगाला माहीत झाले. या तिच्या संशोधनातून शी झिंगलीला माणसात करोना विषाणूला प्रवेश करायचा झाला तर त्या एस प्रोटीनमधे काय बदल करावे लागतील हे माहीत झाले होते आणि ते कसे करायचे याचेही संशोधन तिने केले होते. २०१३ साली तिने आणि तिच्या गटाने अजून एक पेपर ‘‘द नेचर’’ मधे प्रसिद्ध केला ज्यात तिने एका नवीन संशोधनाची चर्चा केली होती. काय होते ते संशोधन? तिने वटवाघूळातून तीन प्रकारचे विषाणू बाजूल काढण्यात यश मिळवले होते आणि चीनी हॉर्सशू वटवाघुळ हे अशा प्रकारच्या अनेक विषाणूंचा खजिनाच आहे हेही तिने त्यात म्हटले होते. याच संशोधनादरम्यान सार्स प्रकारच्या विषाणूंना माणसाच्या पेशीत प्रवेश करण्यासाठी माध्यमाची गरज नाही असेही सिद्ध झाले. मग २०१५ मधे तिने आणि तिच्या सहाय्यकांनी ब्रिटिश जर्नल नेचर मेडिसीन या नियत्कालिकात एक पेपर प्रसिद्ध केला त्यात त्यांनी प्रयोगशाळेत विषाणू कसा तयार करता येईल याचा उहापोह केला आहे. सार्स विषाणूचे विभाजन करण्यात यश मिळवल्यावर जाती-प्रजातीतील विषाणूंच्या संक्रमणाचा मार्ग मोकळा झाला. यात वापरल्या जाणारे उंदीर हे हिमनगाचे एक टोक होते. त्यांनी नंतर या विषाणूचा माकडांवर प्रयोग करून पाहिला. याचा उद्देश एकच होता की या तयार केलेल्या विषाणूंचा माणसावर काय परिणाम होतो याच अभ्यास करणे. हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ माजली.
पाश्चर इन्स्टिट्युट पॅरिसयथे काम करणारे प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ सिमॉन वेन हॉबसन म्हणाले, ‘‘ काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत नवीन विषाणू जन्मास घातले आहेत, जे माणसांच्या पेशीत वाढू शकतात. हा विषाणू जर प्रयोगशाळेतून उघड्या जगात निसटला तर तो कसा पसरेल हे कोणालाही वर्तवणे शक्य नाही.’’ त्यांची ही भविष्यवाणी किती खरी ठरली आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच आहे. यामागचे कारण स्पष्ट आहे. निसर्गात जेवढे विषाणू आहेत त्यापासून इतर जातीप्रजातींना संरक्षणाचे कवच निसर्गानेच दिलेले आहे. (कुठलाही नैसर्गिकरित्या पसरलेला विषाणू करोना एवढ्या वेगाने पसरत नाही.) त्यात तुम्ही ढवळाढवळ केली पण त्यातून तयार होणाऱ्या भस्मासुरापासून संरक्षणाचे कवच मात्र तुम्ही दिले नाहीत किंवा देऊ शकला नाहीत. अर्थात या संकटाच्या सुचनेची ली झेंगली यांनी तमा बाळगली नसावी किंवा तिच्या मालकांनी म्हणा हवी तर. कारण नोव्हेंबरमधे १४ तारखेला या बाईने अजून एक पेपर प्रसिद्ध केला व त्यावर एक भाषणही दिले. हा मात्र चीनमधेच केला. याचा विषय होता, ‘‘बॅट करोना व्हायरस अँड इटस् क्रॉस- स्पिसिज इन्फेक्शन.’’ २०१४ साली ऑक्टोबरमधे या प्रकारच्या संशोधनातील धोक्याची जाणीव होताच ओबामा यांनी या प्रकारच्या संशोधनाला होणारी मदत थांबवली. याच वेळी शी झेंगलीचेही अनुदान थांबले. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट मात्र लक्षात आली ती म्हणजे ही जी अमेरिका, युरोप आणि चीनमधील प्रयोगशाळांमधे माहितीची देवाणघेवाण चालली होती त्यामुळे चीनमधील सर्व प्रयोगशाळांना युरोप आणि अमेरिका येथील माहितीची द्वारे उघडी झाली. पण असे दुसऱ्याबाजूने झाले असे म्हणता येत नाही कारण चीनमधे लोकशाही नाही आणि एकाधिकारशाहीमुळे तेथे संपूर्ण निर्बंध घालता येतात आणि त्याबद्दलची माहिती बाहेर येणे फार कठीण आहे.
आता चीनने अमेरिकेला या विषाणूसाठी जबाबदार धरले आहे. हे नको असेल तर अमेरिकेला सर्व माहिती जगासमोर ठेवावीच लागेल आणि मला वाटते आता जे खटले आंतरराष्ट्रिय न्यायालयात चालतील त्यात ही माहिती आपल्याला कळेल आणि अजून कायकाय गोष्टी बाहेर पडतील देव जाणे. २३ तारखेला कोरोनाच स्फोट झाला आणि सिपीसी ने या विषाणूची जबाबदारी त्या मासळीबाजारावर ढकलण्याचा चंग बांधला यात शी झेंगलीचीही मदत घेण्यात आली. कशी? तिने एक तज्ञ म्हणू सांगितले की हा विषाणू नैसर्गिकरित्या त्या मासळीबाजारात तयार झाला आहे. हे जर खरे असेल तर तेथील शास्त्रज्ञांना आणो वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी का बोलावण्यात आले ? डॉ लीचा मृत्यू का झाला आणि डॉ आयफेन का नाहीशी झाली याची उत्तरे सिपीसीने दिली पाहिजेत. पण ती मिळणार नाहीत कारण तेथे सिपीसी आणि कम्युनिझमची एकाधिकारशाही आहे. अशा राष्ट्राशी संबंध ठेवायचे का नाही हे आत जगाला ठरवावे लागेल. काही शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू वुहानमधी पी४ या प्रयोगशाळेतून आला ही आता एक कॉन्स्पिरसी थेअरी राहिलेली नाही. आता त्याची खात्री पटली आहे. किंवा आता असं म्हणावे लागेल की ही कॉन्स्पिरसी थेअरी आहे हे त्यांना सिद्ध करावे लागेल. या घटनेनंतर या संस्थेची दारे इतर देशातील शास्त्रज्ञांना खुली केली पाहिजेत. मला तर वाटते ज्या प्रमाणे जगातील कुठल्याही (करारात सामील असलेल्या) अणुशक्ती केन्द्रात एका संस्थेच्या (इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी) सदस्यांना तपासणीसाठी जाता येते तशीच काहीतरी प्रक्रिया/नियम विषाणू प्रयोगशाळांना लावावा. आता खालील घटनाक्रम काय सांगतो ?
– कोरोना विषाणूच स्फोट झाल्यावर वुहानची विषाणू प्रयोगशाळा गप्प झाली. खरेतर या प्रयोगशाळेने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जगाबरोबर प्रयत्न करणे अपेक्षित होते.
– जानेवारी २ : वुहान पी४ प्रयोगशाळा : वुहान इंस्टिट्युटच्या डायरेक्टर जनरलने इ-मेल द्वारे खालील आदेश पाठवला.- विषय होता न्युमोनिया सदृष अज्ञात विषाणूबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती उघड करण्याबाबत. त्यातत म्हटले होते, ‘‘नॅशनल हेल्थ कमिशनच्या आदेशानुसार या साथीबद्दल आणि विषाणूबद्दल कुठलीही माहिती (डाटा) स्वतःच्या वेबवर, इंटरनेटवर, छापलेल्या मिडियावर त्यात सरकारी मिडियाही आला, किंवा बाहेरील प्रयोगशाळा ज्यांच्याशी सहकार्याचा करार आहे उघड करण्यास बंदी घालण्यात आली आहे.’’ याच्यावर सही आहे डॉ. यान-यी वँग यांची.
– जानेवारी २१ : वुहान पी ४ प्रयोगशाळा : अमेरिकेने कोरोनाच्या रुग्णांवर प्रयोग करण्यासाठी फुकट दिलेले रेमडेसिविर या औषधाचे चीनी शास्त्रज्ञांनी वुहान इंन्स्टि. ऑफ व्हायरॉलॉजी मधे पेटंट घेण्यात आले.
– फेब्रुवारी ३ : वुहान पी४ प्रयोगशाळा : डॉ. वू शिआवा यांनी धोक्याची घंटा वाजवली. आणि मुख्य म्हणजे त्यात त्यांनी स्वतःचे नाव वापरले होते. त्यात त्यांनी शी झेंगलीने ज्या प्रयोगशाळेत हे काम केले होते त्याची सुरक्षिता आणि कारभार बेभरवशाचा आहे असे म्हटले (व्हिसल ब्लोअर) त्यातून हा विषाणू निसटला असण्याची शंका व्यक्त केली होती. त्यात त्यांनी असेही म्हटले होते की हे काम आता त्या प्रयोगशाळेत कोणीही करू शकत होते.
– फेब्रुवारी ४ : वुहान पी४ प्रयोगशाळा : डुओयीचे चेअरमन शू बो यांनीही त्यांचे खरे नाव वापरून एक जतावणी दिली की या प्रयोगशाळेत नवी विषाणू जन्माला घालण्याचे काम चालले असावे. आणि साथ पसरण्यास त्या प्रयोगशाळेतील विषाणू कारणीभूत असावा.
– फेब्रुवारी ७ : वुहान पी४ प्रयोगशाळा : पिपल्स लिबरेशन आर्मीच्या उच्चपदी काम करणाऱ्या विषाणूअस्त्राच्या तज्ञ जनरल चेन वी यांना वुहानमधील ही प्रयोगशाळा ताब्यात घेतली.
– फेब्रुवारी १४ : वुहान पी४ प्रयोगशाळा : चीनचे प्रमुख शि जिनपिंग यांनी चीनच्या सुरक्षा धोरणात बायोसिक्युरिटी अंतर्भूत करण्याचा आदेश काढला. बायोसिक्युरिटीचा कायदा अमलात आणण्याचाही आदेश.
– फेब्रुवारी १५ : वुहान पी४ प्रयोगशाळा : चीनच्या इंटरनेटवर कोरोनाचा पहिला रुग्ण हुआंग यानलिंग हिचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. इन्स्टिट्युटने ही बातमी फेटाळली पण तिची सर्व माहिती इंटरनेटवरून काढून टाकण्यात आली. ही मायक्रोबायोलॉजिस्ट पेशंट झिरो होती असे काही लोकांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी १७ : वुहान पी४ प्रयोगशाळा : या प्रयोगशाळेतील एक संशोधक चेन क्वानजिॲओ हिने उघडपणे या प्रयोगशाळेचा एक डायरेक्टर वँग यानयी याच्यावर हा विषाणू पसरविण्याचा जाहीर आरोप केला.
ही जी प्रयोगशाळा आहे ही एका फ्रेंच प्रयोगशाळेच्या सहकार्याने बांधण्याचे ठरवले होते. पण जेव्हा त्याचे बांधकाम संपत आले तेव्हा ते काम या फ्रेंच कंपनीकडून काढून घेण्यात आले आणि ते एका चीनी कंपनीला देण्यात आले. ही कंपनी पिपल्स लिबरेशन आर्मीची कंपनी होती असे म्हणतात किंवा तिच्या मर्जीतील असावी. त्यामुळे या इमारतीत चीनी आर्मीसाठी एक खास विभाग सुरू करण्यात आला. तेव्हाच फ्रेंच कंपनीला येथे बायोकेमिकल शस्त्रांत्राचे संशोधन सुरू असल्याची शंका आली होती. या सर्व इन्स्टिट्युटचे प्रमुख सिपीसीच्या अत्यंत जवळचे मानले जातात. काहींचे पुर्वज तर सत्तेतही होते. यांच्या मालकीचे औषधांचे कारखाने आहेत आणि या कंपन्यांनी करोनावरील अनेक औषधांच्या पेटंटसाठी अर्ज केले आहेत. या सगळ्या संस्थांमधून आर्मीचे जनरल्स काय करतात हे एक उघड गुपीत आहे. यावर अधिक माहितीसाठी ‘‘अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर‘’ हे छोटे पुस्तक वाचावे. एका चीनी माणसानेच लिहिले आहे. या विषयातील एक तज्ञ डॉ फ्रान्सिस बॉईल ज्यांनी अमेरिकेचा ‘‘बायालॉजिकल वेपन अँटी टेररिझमचा’’ कायदा लिहिला ते म्हणतात, ‘‘ ज्या नॉव्हेल करोना विषाणूला सध्या आपण तोंड देतोय ती एक अतिप्रगत, आक्रमक जैविक हत्यारप्रणाली आहे.’’ आता या सगळ्याचा अर्थ काय आहे हे कोणी सांगायला नको. जोपर्यंत चीन मधे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सत्तेवर आहे तोपर्यंत या जगात याच्यापुढे शांतता प्रस्थापित होणे कठीण आहे….. असो आता खाली इतिहासातील अजून एका घटनेकडे लक्ष वेधतो…
घटना आहे दुसऱ्या महायुद्धातील. ही वाचा आणि मग विचार करा या दोन घटनांमधे काय साम्य आहे ते…कारणे काहीही असतील पण त्याचा परिणाम एकच आहे.. खालील परिच्छेद माझ्याच पुस्तकातील आहेत..

तेरा एप्रिल १९४१ला जपानने सोव्हिएट रशियाशी अनाक्रमणाच्या तहावर सह्या केल्या होत्या. जपानचा या “टोरा” पर्यंतच्या प्रवासास त्याच दिवशी सुरूवात झाली होती. या तहाचे मुख्य कारण दोन्हीही देशांसाठी समान होते : दोन आघाड्यांवर युद्ध टाळणे. जपानने चीनवर सप्टेंबर १९३१ सालीच आक्रमण केले होते आणि रुझवेल्टच्या सरकारला जपानच्या अतिपूर्व देशांवर सत्ता गाजवण्याच्या प्रयत्नांची काळजी वाटत होती. जपानने फ्रान्सच्या इंडो-चायनाच्या वसाहती ताब्यात घेतल्यावर ब्रिटन आणि अमेरिकेने चोवीस जुलै १९४१ रोजी जपानची त्यांच्या देशातील मालमत्ता गोठवली, जप्त केली. या कारवाईने जपानला पुरेशी ताकीद मिळेल व जपान विचार करून प्रत्युत्तर देईल व चर्चेला प्रारंभ होईल असा या देशांचा होरा होता पण जपानचे सरकार हे प्रखर राष्ट्रवादी असलेल्या सेनादलाच्या कह्य्यात होते व विलक्षण दुराभिमानी असलेल्या या देशाला जागतिक वस्तूस्थितीची जाणीव नव्हती. त्यांनी या इशार्याकडे हेतूपुर:सर दुर्लक्ष केले. ही मालमत्ता गोठवल्यावर काहीच दिवसांनी अमेरिकेच्या सरकारने जपानला तेल निर्यात करायला बंदी घातली. जपान त्या काळात अमेरिकेतून त्यांच्या एकूण गरजेच्या पंचाहत्तर टक्के तेल आयात करत असल्यामुळे जपानला याचा फटका बसलाच. आपली वर्तणूक सुधारण्याऐवजी जपानने त्याच्या तेलासाठी इतरत्र म्हणजे आग्नेय देशांकडे, विशेषत: बर्मा आणि डच ईस्ट इंडीज म्हणजे आत्ताचे इंडोनेशीया यांच्याकडे मागणी नोंदवायला सुरवात केली.. हे तेल जपान त्याच्या विस्तारवादी धोरणासाठीच वापरणार हे निश्चित असल्यामुळे जपानला तेलाचा पुरवठा करायची अमेरिकेची ना नैतिक जबाबदारी होती ना कायदेशीर. जपानला मात्र या तेलबंदीमुळे अमेरिकेवर हल्ला करणे अत्यंत आवश्यक वाटत होते. (निर्यातीवर निर्बंध घातल्यावर काय होऊ शकते हे यावरून कळते. वीस पंचवीस ट्रिलियन डॉलरच्या नुकसानभरपाईचे खटले चालू झाल्यावर किंवा त्यांचा निकाल लागल्यावर चीनवर जपानवर घातले होते तसे निर्बंध लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
यानंतर मात्र अमेरिकेने प्रलोभन-दंडनीतीचे धोरण अवलंबले. एकीकडे अमेरिकेचा मुख्य सचीव कॉर्डेल हल याने त्याच्या कार्यालयात जपानच्या राजदूताबरोबर जवळजवळ शंभर तास चर्चा केली तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टने सतरा ऑगस्टला एका भाषणात जपानची जाहीरपणे कानउघडणी केली की जपानने जर एशियामधे ढवळाढवळ करायचे थांबवले नाही तर अमेरिकेला त्या विभागातील त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल. ही पोकळ धमकी नाही हे दर्शवण्यासाठी अमेरिकेने त्यांचे पॅसीफिक फ्लीट कॅलिफोर्नियातून पर्ल हार्बर येथे हलवले. चीनचे कोमिंगटान नॅशनॅलिस्ट जनरल चॅंग काय-शेकच्या नेतृत्वाखाली जपान विरुद्ध लढत होते त्यांचीही मदत वाढविण्यात आली आणि त्याच बरोबर पस्तीस B-17 बाँबर्स फिलिपाईन्सला हलविण्यात आली. आता तेथून ते जपानवर हल्ले चढवू शकत होते. फिलिपाईन्स अमेरिकेच्याच संरक्षणाखाली असल्यामुळे हे करण्यात त्यावेळी त्यांना काही अडचण आली नाही. (अमेरीकी व चीनी लष्कराच्या हालचाली अशाच झाल्या आहेत.)
दुर्दैवाने रुझवेल्टच्या सरकारी बाबूंना विशेषत: अर्थमंत्रलयाचे सचिव डीन एचेसन याला जपानच्या शोवा राजघराण्याचा स्वाभिमान यात डिवचला गेला असेल याची कल्पना आली नाही किंवा आली असली तरी ते एवढे महत्वाचे असेल असे त्याला वाटले नसेल. ( अमेरिकेतील बाबुंनाही चीन ही काय चीज आहे हे माहीत असेल ही शंकाच आहे. किंवा माहीत असले तरी अर्थिक फायद्यासाठी सगळे चालवून घेतले जात असेल. माहीत नाही) या राजघराण्याने अमेरिकेचे हे कृत्य युद्धाला चिथावणी आहे असे समजून पाऊले टाकायला सुरवात केली. गेली दहा वर्षे जपान चीनमधे युद्ध करत होता तरीही अमेरिकेतील धोरणे ठरविणार्यांना जपान हा एक धोकादायक देश आहे व त्याच्याकडे गांभिर्याने बघायला पाहिजे असे वाटत नव्हते. सगळ्यात हद्द झाली ती म्हणजे कित्येक अधिकार्यांचा व पुढार्यांचा असा समज होता की जपानी वैमानिकांच्या मिचमिच्या डोळ्यांमुळे ते इतक्या दूरवर त्यांची विमाने उडवू शकणार नाहीत. एका इतिहासकाराने लिहिले “अमेरिकेच्या नेतृत्वाने फालतू वंशभेदाच्या कल्पनांनी जपान पर्ल हार्बरवर तीन हजार चारशे मैल दूर हल्ला करूच शकणार नाहीत असा फाजील आत्मविश्वास बाळगला होता. अमेरिकन नौदलाचा निवृत्त सचिव जोसेफस डॅनियल्स याने म्हटले “जपानचे नौदल आता आपल्या पॅसीफिक तळांवर अचानक हल्ला करेल याची भीती कोणालाच राहिली नव्हती. रेडिओमुळे आता “आश्चर्य, धक्का” इत्यादी बंद झाले आहे.” हा फाजील आत्मविश्वास फक्त अमेरिकेलाच होता असे मानायची काही गरज नाही: १९४१च्या एप्रिलमधे ब्रिटनच्या हवाईदलाचा प्रमुख सर चार्ल्स पोर्टल याने परराष्ट्र खात्याच्या सचिवाला- एंथनी एडनला सांगितले की तो जपानच्या हवाईदलाला इटलीच्या हवाईदलापेक्षाही कमी दर्जाचे मानतो.
सतरा ऑक्टोबरला ले. जनरल हिडेकी टोजो (ज्याचे टोपणनाव रेझर होते) हा हवाईदल आणि नौदलाच्या पाठिंब्यावर टोकियोमधे सत्तेवर आला आणि तणाव दूर व्हायची शक्यता मावळू लागली. त्यानंतर तीनच आठवड्यात राजाच्या सैन्यदलाच्या मुख्यालयात पर्ल हार्बरवर हल्ल्याची योजना तयार झाली सुद्धा. त्याच बरोबर फिलिपाईन्स, मलाया, डच ईस्ट इंडीज, थायलॅंड, बर्मा व पश्चिम पॅसीफिक विभागातही आक्रमण करून ती बेटे काबीज करायच्या योजना तयार झाल्या. या विभागाला जपाननी सदर्न रिसोर्सेस एरिया असे नाव दिले होते पण प्रत्यक्षात त्याला ते ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरीटी स्फिअर असे संबोधत. म्हणजे हा जपानच्या सभोवताली पसरलेला प्रदेश जपानसाठी कच्चा माल पुरवणार होता पण त्या विभागातील देशांना ही त्यांच्या प्रगतीची संधी आहे असे भासविण्यात येणार होते. हे सगळे प्रदेश ताब्यात आल्यावर या योजनेचा दुसरा भाग या प्रदेशांचे अमेरिकेपासून व तिच्या दोस्त राष्ट्रांपासून संरक्षण कसे करायचे यासाठी खर्ची घातला होता. या योजनेचा तिसरा भाग होता शत्रूच्या दळणवळण व्यवस्थेवर निर्णायकी हल्ले करणे जेणेकरून तो जपानचे अतीपूर्वेतील अधिकार मान्य करेल. या मुख्यालयातील काही तज्ञांचे तर असेही म्हणणे होते की जपानने ऑस्ट्रेलिया व भारतावरही हल्ला करावा व जर्मनीशी मध्यपूर्वेत हातमिळवणी करावी. जपाननी सदर्न रिसोर्सेस एरिया ही कल्पना आणि हिटलरची लेबेनस्रॉमची कल्पना यात बरेच साम्य होते. या योजनांमधे ब्लिट्झक्रिग सारखे अचानक व जलद आक्रमण करून अमेरिकेचे पॅसीफिक नौदल निष्प्रभ करायचे, असे डावपेच होतेच. या सुचना धोकादायक होत्या व जवळ जवळ रद्दच होणार होत्या परंतू यावर चाललेल्या एका वादळी बैठकीत एड्मिरल यामामोटो याने पर्ल हार्बरवर जपानच्या इज्जतीसाठी जर हल्ला केला नाही तर राजिनामा देईन अशी धमकी दिल्यावर या योजनेला जीवदान मिळाले. जनरल टोजोने सत्ता ग्रहण केल्यावर या सगळ्याच योजनेला पूर्ण मान्यता मिळाली.
कुठलीही योजना परिपूर्ण नसते या उक्तीला धरून या योजनेतही काही तृटी होत्याच. पहिली म्हणजे ओआहू येथील हे बंदर अत्यंत उथळ होते. म्हणजे बोटी बुडाल्या तरी त्या रसतळास न जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. जर त्या रसतळास गेल्या नाहीत तर परत उपयोगात आणता येणार होत्या. गुप्तहेरांच्या बातमीनुसार पर्ल हार्बरवर कुठल्याही प्रकारच्या पुरवठा करणार्या व तेलाच्या नौका नव्हत्या म्हणजे जपानवर हल्ला करायचे अमेरिकेचे कुठलेही नियोजन नव्हते हे सिद्ध होत होते त्यामुळे स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केला असेही जागतिक स्तरावर म्हणता येणार नव्हते आणि या प्रकारच्या खिंडीत गाठून केलेल्या हल्ल्याने अमेरिका चर्चेला तयार होईल असे वाटणे हाच एक मोठा भ्रम होता. या योजनेच्या तयारीत भाग घेतलेल्या एडमिरल ओनिशी ताकिजिरो याने त्यावेळी एका महत्वाच्या बाबीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते “अमेरिकेचा राष्ट्राभिमान एवढा कडवा आहे की युद्ध घोषीत न करता जर हा हल्ला झाला तर त्या देशाबरोबर चर्चेची सगळी दारे कायमची बंद होतील”. अमेरिकेची मेन नावाची युद्धनौका १८९८ साली क्युबाच्या किनार्यावर बुडली/बुडविण्यात आली त्या नंतर काय झाले यावरून तरी जपानने धडा घेणे आवश्यक होते. पण जपानच्या सगळ्यात जास्त प्रतिष्ठा लाभलेल्या सेनानीच्या या युद्धकाळात दिलेल्या राजिनाम्याच्या धमकीपुढे नमून नॅव्हल स्टाफ आणि सरकारने अखेरीस यामामोटोची योजना स्विकारली. …
चीन बद्दल फाजील विश्र्वास बाळगणाऱ्यांना काय किंमत चुकवावी लागणार आहे हे काळच ठरवेल
हे असे होईल का माहीत नाही. पण होऊ नये अशी मनोमन इच्छा आहे. अर्थात सामान्य माणसांच्या इच्छेला या जगात विचारतो कोण? ही सगळी माहीती दिली आहे. यावरून निष्कर्ष काय काढायचे आहेत ते ज्याचे त्याने काढावेत. काही वेळ reading between the lines ही करावे लागणार आहे… तेवढे कष्ट तुम्ही घ्याल याची खात्री आहे… तीन तारखे पर्यंत चीनच्या कृपेने वेळ आहेच 🙂
– जयंत कुलकर्णी.