विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

दीड वर्षापूर्वी विजयनगरच्या साम्राज्याला भेट दिली आणि मन खिन्न झाले. तेथे गेल्यावर त्या भग्न अवस्थेतील इमारती पाहिल्या आणि त्या साम्राज्याच्या गतकाळातील वैभवाची कल्पना येऊन रात्री झोपेचे खोबरे झाले. रात्री सारखे डोळ्यासमोर त्यावेळी कसे असेल या कल्पनेची दृष्ये येऊ लागली व पहाट केव्हा होतेय आणि मी परत केव्हा त्या साम्राज्यात जातोय असे वाटू लागले. असे बेचैन होत चार दिवस काढले आणि पुण्याला परत आलो. परत आल्यावर मी झपाटल्यासारखे विजयनगरवर मिळतील ती पुस्तके वाचून काढली व नेहमीच्या सवयीनुसार टिपाही काढल्या. यात बहुतेक वेळा ते वैभव, साम्राज्य ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असेल अशा लोकांची प्रवास वर्णने मोठ्या चवीने वाचून काढली. त्यातून पेसच्या लिखाणाचे भाषांतरही करायला घेतले पण ते मागे पडले. त्या दरम्यान ज्यांनी भेटी दिल्या त्यांच्या विषयी माहिती गोळा झाली म्हणून म्हटले चला त्यांच्यावर तर अगोदर लिहू आणि मग पेसकडे बघू. या लेखमालिकेत मी तेथे काढलेली अनेक छायाचित्रेही टाकणार आहे. अगोदर नुसतीच छायाचित्रेच टाकणार होतो पण म्हटले जरा लिहावे ! आशा आहे तीही आपल्याला आवडतील. यातील वरचे हे पहिले चित्र प्रत्येक भागावर असेल. (थंबनेल स्वरूपात).

अगोदर विजयनगरच्या साम्रज्याबद्दल :
तेराव्या शतकात उत्तर भारतात मुसलमान साम्रज्याचा विस्तार झाला तेव्हापासून आपण इतिहासात डोकावूया. कारण त्याच्या मागे जायचे म्हणजे मला एक मोठे पुस्तक लिहावे लागेल. तर उत्तर भारत मुठीत आल्यावर मुसलमानांनी दक्षिणेकडे आपले हातपाय पसरायला सुरवात केली. विंध्यपर्वत ओलांडून त्यांनी दक्षिणेतील एकेक साम्राज्याचा नाश चालवला. ही क्रिया इतकी सावकाश चालली होती की त्यात लक्ष घातले तरच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकेल.

१२९३ मधे अल्लाऊद्दीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हाही त्याचा उद्देश फक्त संपत्तीची लुटमार एवढाच होता. या लुटालुटीच्या स्वा्र्‍यांमधे त्या काळात हे राजे अजून एक महत्वाचे काम उरकत आणि ते म्हणजे त्या प्रदेशाची तपशिलवार माहिती गोळा करणे. अल्लाऊद्दीन खिलजीनेही तेच केले. त्या माहितीत त्याला दक्षिणेत किती महापराक्रमी राजे महाराजे आहेत हे कळाले आणि त्यांच्या संपत्तीची मोजदाद करता येणे अशक्य आहे हेही कळाले. पुढे सिंहासनावर बसल्यावर त्याने पठाणी टोळ्यांचा बंदोबस्त करून दक्षिणेचा विचार करायला सुरवात केली. अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत हुशार व धोरणी व्यवस्थापक होता. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे दक्षिणेकडची राज्ये जिंकायची म्हणजे पदरात विस्तव बांधण्यासारखे आहे. (त्या काळात). त्यापेक्षा त्या प्रदेशातील राजे एकामेकांशी भांडत राहिले, युद्ध करत राहिले तर ते कमकुवत राहतील व जेव्हा तो शेवटचे आक्रमण करेल तेव्हा प्रबळ अशी सत्ता त्या तेथे उरलेली नसेल. यासाठी त्याने दक्षिणेकडे फक्त खंडणी वसुलीचे ध्येय ठेवले. यासाठी त्याने मलिक काफूर याला दक्षिणेकडे पाठवून देवगिरी व वरंगळ ही दोन राज्य काबीज करून मांडलिक केली व तो त्यांच्याकडून नियमीत खंडणी वसूल करू लागला.

दक्षिणेकडे त्या काळात अजून दोन प्रबळ सत्ता होत्या त्यांची नावे होती – होयसळ व पांड्य. होयसळ राजांची राजधानी होती सध्याचे म्हैसूर आहे त्याच्या आसपास तर पांड्य राजांची राजधानी होती मदूरा येथे. थोडक्यात पांड्यांवर हल्ला करण्यासाठी होयसळांचे राज्य पार करूनच जावे लागे. अल्लाऊद्दीनच्या फौजांनी होयसळांचा पराभव करून पांड्यांच्या मदूरा व रामेश्वरही लुटल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण या भागात अल्लाऊद्दीनचा पूर्ण अंमल (महसूल सोडून) कधीच बसला नाही असे मानायला जागा आहे.

लवकरच अल्लाऊद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यावर देवगिरीच्या यादवांनी राजा हरपाल देव याच्या अधिपत्याखाली खिलजींची सत्ता झुगारून दिली व स्वातंत्र्य पुकारले. अल्लाउद्दीनचा मुलगा मुबारक खान हा सिंहासनावर बसला. या चिरंजीवांना मुसलमान इतिहासकारही त्या सिंहासनाला लागलेला डाग असे समजत होते, हे म्हटले म्हणजे त्याच्या लिलांबद्दल जास्त काही लिहायला नको. वर उल्लेख झालेल्या मालिक काफूरने याच्या खुनाचा प्रयत्नही केला होता. चोवीस तास हा बायकांच्या गराड्यात व मद्याच्या धुंदीत असे. जनानखान्यातील एकसोएक सुंदर बायकांच्यात राहून राहूनही याचे खरे प्रेम त्याच्या एका खुस्रो खान नावाच्या गुलामावर होते. पण बहूदा हे एकतर्फी असावे. कारण याच गुलामाने त्याचा खून केला. ( हा खरे तर एक शूर गुजरातचा हिंदू महार होता व तो धर्म बदलून मुबारकच्या पदरी लागला. असे म्हणतात की याने मुबारकचा सूड उगवण्यासाठी हे सगळे केले व शेवटी त्याचा खून केला.) असो. या मुबारक खिलजीने हरपालचे बंड शमवून त्याला पदच्यूत केले व त्याच्या जागी पहिल्यांदाच मुसलमान अंमलदार नेमला. हे झाल्यावर मात्र दक्षिण भारत खडबडून जागा झाला. व पुढे काय वाढून ठेवले आहे याची सगळ्या सत्ताधिशांना कल्पना आली. पण मुबारकखानाचा खून झाला, खुस्रोचे राज्य फार कमी काळ टिकले व तुघलकांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. घियासुद्दीन आता दिल्लीच्या तख्तावर बसला. अर्थात त्यामुळे दिल्लीश्वराचे दक्षिणेवरचे लक्ष काही कमी झाले नाही कारण दक्षिणेतील संपत्तीची मोजदाद अगोदरच झाली होती. नशिबाने घियासूद्दीन काही दक्षिणेत आला नाही. त्याची कारकिर्द त्याचे तख्त संभाळण्यातच गेली. दिल्लीवरून आक्रमण होत नाही असे पाहून वरंगळच्या राजांनी मुसलमान अंमलदारांना हटविण्याचा प्रयत्न केला पण घियासौद्दीनचा मुलगा महंमद तुघलकाने त्यांना रोखलेच नाही तर त्याचा पूर्ण पाडाव केला व अल्लाउद्दीनला जे जमले नव्हते किंवा त्याने जे केले नव्हते ते याने करून दाखविले. या विजयाने उन्मादीत होऊन त्याने एकामागून एक राज्ये घशात घालायचा सपाटा लावला. वरंगळ नंतर त्याने अजून दक्षिणेकडे जात पांड्य राजावर आक्रमण केले व त्याचाही पराभव करून मदूरेला मुसलमानी अंमल बसवला. अल्लाउद्दीनने या राजांना जिंकले होते पण त्याने तेथे अंमल कधीच बसवला नाही. तो नुसती खंडणी गोळा करत असे. महंमद तुघलकाने (म्हणजेच उलुघ खान) ही चूक केली त्यामुळे त्या प्रदेशातील त्याच्या राज्याची देखभाल करणे त्याला कठीण जाऊ लागले. दक्षिणेकडे त्याचा एक आत्तेभाऊ त्याने ठेवला होता. त्याचे नाव होते बहाउद्दीन गुरशास्प. या बहाउद्दीननेच महंमदाविरुद्ध बंड केल्यामुळे त्याच्या कटकटी अजूनच वाढल्या. महंमद तुघलकाला वेडा महंमद म्हणायला आपण आपल्या शाळेतील इतिहासात शिकलो पण हा एक अत्यंत धोरणी, शहाणा पण अत्यंत क्रूर असा सुलतान होता. उत्तरेकडे सगळे लुटून झाले होते, व दक्षिणेकडे अमाप संपत्ती होती अशा परिस्थितीत त्याने देवगिरीला राजधानी हलवायचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य होता असे म्हणावे लागेल.
(नुकत्याच एका(च) देवळात सापडलेल्या संपत्तीवरून आपल्याला दक्षीणेकडे असलेल्या अनेक देवळातून असलेल्या संपत्तीची कल्पना येऊ शकेल).

याच काळात त्याच्या एका सेनापतीने, जलाल-उद्दीन-हसनशा याने तामीळ प्रदेशही अंमलाखाली आणला. या शूर सरदारालाच महंमदाने मदूरेचा सुभेदार म्हणून नेमले. (आपण माझा इब्न बतूतवरचा लेख वाचला असेल तर आपल्या लक्षात आले असेल की याच्या मुलीचे इब्न बतूतशी लग्न झाले होते व त्यामुळे तो अडचणीत आला होता) याचा मुलगा इब्राहीम हा महंमद तुघलकचा खजिनदार होता. या बाप लेकांनी मुहंमद तुघलकाविरूद्ध बंड करून मदूरेच्या राज्याचे स्वातंत्र्य जाहीर केले. अर्थातच इब्राहीमला ठार करण्यात आले व मुहंमद तुघलकाने या जलाल-उद्दीनवर आक्रमण केले.

या सगळ्या धामधूमीच्या काळात कुठल्या ना कुठल्यातरी मुसलमान सत्तेची ठाणी सगळ्या रस्त्यांवर बसत व सामान्य हिंदू जनतेला त्याचा फार उपद्रव होई. होयसळमधे बल्लाळराजाला हे सर्व दिसत होते पण त्याची ताकद त्यावेळेस कमी असल्यामुळे त्याने गप्प रहायचे पसंत केले पण त्याची आतून तयारी चाललीच होती. त्याची राजधानी कन्ननूरच्या जवळ होती. आपल्या रयतेला मुसलमान सेनेच्या हालचालींमुळे अतोनात त्रास होतो असे कारण पुढे करून त्याने आपली राजधानी सुलतानाच्या परवानगीने तिरूवण्णामलई येथे हलविली. ती जागा आडमार्गावर असल्यामुळे त्याला तेथे स्वत:ची सैनिकी ताकद वाढवून मुसलमान अंमलदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. तो तेथे योग्य संधीची वाट बघत तयारीत बसला. लवकरच त्याला अशी संधी मिळणार होती…….

महंमद तुघलकच्या लहरी व अक्रस्ताळी क्रूर स्वभावामुळे त्याने असंख्य शत्रू निर्माण केले होते. मुसलमानांच्यातच त्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी मुसलमान अंमलदारांनीच बंडे पुकारली. बहाउद्दीन गुरशास्प याने त्याला फार त्रास दिला. उत्तरेत सिंध गुजरात, बंगाल या प्रांताच्या सुभेदारांनी बंड केल्यावर मात्र त्याचे सिंहासन डळमळीत झाले. त्या काळी सुभेदार म्हणजे फार मोठे पद व अधिकार असे. (सुभेदार हे फार मोठ्ठा हुद्द होता. त्याच्या विभागाचा राजाच जणू हे लक्षात घेतले म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की सुभेदारांचे बंड म्हणजे काय चीज असेल ते) या सगळ्या गोंधळामुळे तुघलकाचे लक्ष दक्षिणेकडून उडून उत्तरेकडे केंद्रीत झाले. हा काळ होता १३३५ सालच्या आसपासचा. हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा. आत्ताच काही केले तर… नाही तर कधीच नाही असा काळ…..या वेळी जर ही संधी हिंदू राजांनी घालवली असती तर मात्र भारतात हिंदू राहिले असते की नाही हे सांगता आले नसते….असा, महत्वाचा हा काळ…..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पण त्यावेळच्या परिस्थितीकडे जर आपण दृष्टी टाकली तर आपल्याला दिसेल की दक्षिणेत मुसलमानांची स्थिती तुलनेने भक्कम होती. मदूरेला मुसलमानी सत्तेची मुळे रुजली होती. पांड्य राजे नामशेष झाले होते व होयसळ सुलतानाचे मांडलिक होते. पण आतून आग धगधत होती. वरून जरी हे होयसळ मांडलिक होते तरी नाईलाजाने ते तसे रहात होते. त्यांच्या सभोवती मुसलमानी सत्तांचा फास आवळत चालला होता व त्यावेळचा होयसळांचा राजा वीरबल्लाळ प्रत्याघात करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होता. या राजाची राजधानी हळेबीडला असल्यापासून त्याने सबूरीचे धोरण स्वीकारून संरक्षणाची तयारी चालवली होती हे आपल्याला दिसून येईल. थोडक्यात मुसलमानांचे मांडलिकत्व स्वीकारल्यास त्यांची आपल्यावर नजर राहणार नाही व आपल्याला सैन्याची जमवाजमव करायला वेळ मिळेल असे त्याचे गणित होते. त्याने पहिल्यांदा आपली सीमा सुरक्षित करण्याकडे लक्ष पुरवले.

त्याच्या राज्याच्या उत्तरेला सीमेवर तुंगभद्रा नदी होती तर पूर्वेला महत्वाचा कंपलीचा किल्ला. तुंगभद्राच्या उत्तर किनार्‍यावर अजून एक मजबूत किल्ला होता. त्याचे नाव होते आनेगुंदी. म्हणजे तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर आनेगुंदी व दक्षिण तीरावर कंपलीचा किल्ला अशी रचना होती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

महंमद तुघलकाच्या राज्यात एकदमच बंडाळी सुरू झाल्यामुळे त्याचा कडक अंमल जरा ढिला झाला. त्यातच त्याच्या पर्शिया व अफगाणीस्तानच्या आक्रमणच्या तयारीत त्याचा खजिना पूर्ण रिता झाला होता. या संधिचा वीरबल्लळ याने फायदा उठवायचे ठरविले. अर्थात स्वातंत्र्य पुकारण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षे पुढे अडचणीही तेवढ्याच जबरी होत्या. पहिली म्हणजे त्याच्या दोन बाजूला मुसलमानी सत्ताच होत्या. एक देवगिरी व दुसरी मदूरेची. स्वातंत्र्य पुकारल्यावर दोन बाजूला हे दोन शत्रू लगेचच तयार झाले असते. कदाचित एका हिंदू राजा विरूद्ध हे दोन्ही मुसलमान बंड विसरून एकत्रही झाले असते. हे लक्षात घेता त्याला या दोन सुलतानांच्या एकामेकातील दळणवळण तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने चोखपणे या दोन सत्तांमधे चौक्यांचे जाळे उभारले. इब्न बतूतने त्याच्या रिहालामधे या नाकेबंदीचा उल्लेख केलेला आहे. त्याने तर असे लिहिले आहे की या हिंदू राजाची मदूरेला वेढा घालण्याची तयारी होत आली होती.

जेव्हा मदूरेच्या सुभेदाराने सुलतानाविरूद्ध बंड पुकारले तेव्हा आता आपली संधी जवळ आली असे वीर बल्लाळला वाटू लागले. पण एकदम अविचाराने हालचाल न करता तो सुलतान महंमद काय करतो याची वाट बघू लागला. महंमदचे लक्ष आता उत्तरेकडे पक्के लागले हे लक्षात येताच वीरबल्लाळ मदूरेवर चाल करून गेला. यानंतर त्या काळाचा विचार केल्यास त्याने एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्याने राजत्याग केला, स्वत:च्या मुलाला सिंहासनावर बसविले व स्वत:ला लढायांना वाहून घेतले. यावरून त्याला या मुसलमानांच्या विरूद्ध पुकारलेल्या युद्धाचे किती महत्व वाटत असेल हे लक्षात येते. या लढायांमधे त्याने मुसलमानांना मदूरेपर्यंत मागे रेटले व मदूरेवर हल्ला करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार सैन्य गोळा केले. यात पंचवीस हजार मुसलमानही सामील होते. हे कदाचित देवगिरीपासून फुटलेले भाडोत्री सैनिक असावेत. आता त्याच्या आणि मदूरेमधे मुसलमानांचे त्रिचनापल्ली हे एकच ठाणे उरले होते. दुर्दैवाने या युद्धात वीरबल्लाळ मारल गेला व त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले. हा होयसळांना मोठ्ठाच धक्का होता.

इतिहासात वरंगळच्या दोन भावांनी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली असे जे इतिहासात सांगितले जाते ते तपासून बघितले पाहिजे. वीरबल्लाळच्या धडपडींमुळे या साम्राज्याचा पाया यानेच घातला असावा असे मला वाटते. अर्थात हे आपण इतिहासकारांवर सोडून पुढे जाउया. वीरबल्लाळच्या मृत्यूनंतर जो राजा गादीवर आला तो दोन तीन वर्षातच मरण पावला. कशाने हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्याने व त्यानंतरच्या राजांनी व त्याच्या प्रधानांनी उत्तर सीमा मजबूत करायचे काम मोठ्या जोमात केले हे मात्र खरे. याच प्रयत्नात कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर अशाच एका मजबूत तटबंदीची गरज भासू लागली असावी व विजयनगरचा उदय झाला असावा.

कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेला १३२८ साली व त्याच्या आसपासचा काळ हा विजयनगरच्या स्थापनेचा काळ असे समजायला हरकत नाही. १३४० पर्यंत हरिहर व बुक्क यांची नावे विशेष उजेडात येत नव्हती हेही लक्षात घेण्यासारखे आहे. विजयनगरची तटबंदी उभारण्याचा काळ हाच या साम्राज्याच्या स्थापनेचा काळ समजायला हरकत नाही. १३२७/२८ च्या आसपासचा काळ !

१३२७ सालापासून पुढे सतत अनेक वर्षे या हिंदू राजांनी हा लढा चालू ठेवून हिंदूंचा प्रतिकार जागृत ठेवला याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे घ्येय होते. त्यासाठी दक्षिणेत ठिकठिकाणी उगवलेली मुसलमानी सत्तेची बेटे बुडविणे हाच एक मार्ग होता. हे ध्येय त्यांनी शेवटी पन्नास वर्षांनी साध्य केले असे मानायला हरकत नाही. मदूरेच्या मुसलमान सुभेदाराला संपविले तेव्हा या कार्याचा एक महत्वाचा भाग संपला. दुसरे एक लक्षात घेतले पाहिजे की जरी तुघलक उत्तरेत अडकले होते तरी त्यांचे मात:बर सरदार अजूनही दक्षिणेत प्रबळ होते व त्यांची ताकद वाढतच चालली होती. किंबहुना तेही स्वतंत्र होण्याच्या मागे लागले होतेच. उत्तरेकडे गुलबर्गा येथे बहामनी सुलतानाच्या कहाण्या कानावर येत असल्यामुळे उत्तर सीमा बळकट करायचे काम चालू झाले. यातच महंमद तुघलकानंतर दिल्लीच्या तख्तावर आलेल्या फिरोजशाने उत्तर हिंदूस्तान हेच आपले कार्यक्षेत्र ठरविल्यामुळे त्याने दक्षिणेकडे दुर्लक्ष केले. त्याचा फायदा घेऊन बहामनी सुलतानाने आपले राज्य दक्षिणेकडे वाढवायचे ठरवले. अर्थात त्यात वावगे काहीच नव्हते. कोणीही असेच करेल. पण त्यामुळे विजयनगरची उत्तर सीमा सुरक्षीत करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य हरिहर, बुक्क व त्यांचे तीन भाऊ करत होते.

होयसळांकडून या पाच भावांकडे सत्ता कशी आली हा एक संशोधनाचा विषय आहे व यासंबंधी अनेक प्रवाद चर्चिले जातात. पण हे बंधू होयसळांच्या पदरी सरदार असावेत व नंतर त्यांच्या हातात ही सत्ता आली किंवा त्यांनी ती घेतली या प्रवादावर विश्वास ठेवायला हरकत नाही. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्‍यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्‍यावरचे बेळगाव ही सरहद्द सांभाळत होते. सध्याचा दक्षिण महाराष्ट्र हा हरिहरच्या ताब्यात होता व तो उत्तरेच्या मुसलमानांना थोपवून धरत होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्यम नावाचे राज्य पूर्वकिनार्‍यावर होते. मधला भाऊ बुक्क जो इतिहासात पसिद्ध आहे हा विशेष कर्तबगार असून त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजून दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता.

इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते व मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते ताठ मानेने राज्य करत होते. त्या काळातील परिस्थितीचे आकलन ज्यांना आहे त्यांना हे काम किती अवघड होते याची कल्पना येऊ शकेल.

उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद…..

क्रमश:…..

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, छायाचित्रे, लेख. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s