गुलबानो

गुलबानो

….गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की. वडिलांनी गुलबानोला लाडाने वाढवले होते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा सख्त आदेशच होता म्हणा ना. ज्या दिवशी तिचे वडील अल्लाला प्यारे झाले त्या दिवसापासून तर महालात तिचे लाड इतके वाढले की विचारायलाच नको. अम्मा म्हणायची, ‘‘निगोडीच्या ह्रदयाला ठेच लागली आहे बरं ! तिला बापाची उणीव भासू देऊ नका. तिला असं सांभाळा की तिला तिच्या बापाच्या प्रेमाची आठवणच येणार नाही !’’

इकडे दादाजी म्हणजे बहादुर शाह जफ़रही नातीचे लाड करण्यात मागे हटत नव्हते. नवाब ज़ीनत महल त्यांची पट्टराणी होती. जवांबख्त हा तिचाच मुलगा होता. पण मिर्ज़ा दाराबख्तच्या अकाली निधनानंतर मिर्ज़ा फरुकला राज पुत्राची मनसब मिळाली आहे. पण या राजपुत्राचे जवांबख्तच्या हुशारी पुढे काही चालत नाही. शिवाय ज़िनत महल इंग्रजांबरोबर जवांबख्तला ती गादी मिळावी म्हणून कारस्थाने करतीये.. असा सगळा माहोल आहे. जवांबख्तचे लग्न एवढ्या थाटामाटात झाला की मोगलांच्या उतरत्या काळात त्या थाटामाटात दुसरे लग्न झाल्याचे कोणाला आठवत नाही. गालिब आणि ज़ौक मस्तीत शेरोशायरी करत होते आणि याच काळात त्यांच्यात त्या सुप्रसिद्ध चकमकी होत होत्या. ग़ालिबने लिहिले ‘‘मकता में आप पडी थी सुखने मुस्‌तरानाबात.. वरना मुझे खुदा न खास्ता उस्तादे शौक से कोई अदावत नही है !’’ मकताच्या आधी काही ओळी मी खरडल्या (ज्यात जौकवर बोचकारे काढणारी टीका होती) नाहीतर माझी काही त्यांच्याशी दुष्मनी नाही.

असा तो काळ होता. पण दुर्दैवाने जवांबख्त आणि ज़ीनत महल समोर कोणाचे काही चालत नव्हते. पण गुलबानोची गोष्टच वेगळी होती. या अनाथ मुलीच्या वाट्याला बादशहाचे जे प्रेम आले होते ते जवांबख्त व ज़ीनत महलच्या वाट्याला कधीच आले नाही. गुलबानोचे आयुष्य कशा तर्‍हेने चालले असेल याची आपण फक्‍त कल्पनाच करू शकतो. सूख, मानमरातब आणि चैनीत आयुष्य व्यतीत करत असावी. मिर्ज़ा दाराबख्‍तची अजूनही मुलं होती पण गुलबानो आणि तिच्‍या आईवर त्यांचे जरा जास्तच प्रेम होते.

गुलबानोची आई एक डोमनी होती म्हणजे नाचणारी आणि मिर्ज़ाचे तिच्यावर अतोनात प्रेम होते. इतर राण्यांपेक्षाही जास्त. जेव्हा ते अल्लाला प्यारे झाले तेव्हा गुलबानो १२ वर्षांची असेल. मिर्ज़ांचे दफन दरगाह हज़रत मख़दूम नसीररुद्दीन चिराग येथे करण्यात आले जे दिल्लीपासून सहा मैल दूर जुन्या दिल्लीच्या उध्वस्त अवशेषात आहे. कित्येक महिने गुलबानो आपल्या आईला घेऊन बापाची कबर पाहण्यास जात असे. जेव्हा जाई तेव्हा कबरीला मिठी मारून रडत असे व म्हणे, ‘‘ अब्बा आम्हालाही आपल्या शेजारी झोपू द्या ना !. तुमच्या विना आमचा जीव रोज घाबरा होतोय !’’

गुलबानो पंधरा वर्षांची झाली आणि तिचे एका सुंदर फुलपाखरात रुपांतर झाले. लहानपणीचा हट्टी स्वभाव व दंगामस्ती तर कमी झाली पण तारुण्यसुलभ नखरे मात्र अतोनात वाढले. इतके की महालातील मुले कायम तिच्या मागे पुढे करू लागले. पडदे लावलेल्या सोन्याच्या पलंगावर दिवसभर लोळत पडे. संध्याकाळी दिवे लागले की हिची पावले लगेच लोळण्यासाठी त्या पलंगाकडे वळत. अम्मा म्हणे,

‘‘झुंबरातून दिवे लागले की बानो पोहोचलीच पलंगावर.’’ यावर अंगाला आळोखे पिळोखे देत, जांभई देतात अस्ताव्यस्त झालेले केस सावरत ती म्हणे,

‘‘ तुला काय करायचंय ? लोळते, खाते पिते, वेळ घालवते. तुला त्रास तर देत नाही. तू उगीचच माझ्यावर जळतेस’’

‘‘ बानो मी जळत बिळत नाही गं ! मला तुझी काळजी वाटते. तुला जितका वाटतो तितका आराम कर ! खुदा तुला आरामात लोळण्याइतके सूख देवो. मला तरी दुसरे काय हवय? मी तर म्हणते जास्त झोपले की माणसे आजारी पडतात. तू संध्याकाळी लवकर झोपतेस तर पहाटे लवकर उठ. पण तू तर सकाळी दहा शिवाय उठत नाहीस. घरात उन्हं पडतात पार आणि नोकरांना मोठ्याने बोलण्याचीही चोरी ! तुझी झोपमोड झाली तर ! इतके कोणी झोपते का ? सांग बरं ! थोडेफार घरकामंही शिकायला पाहिजे की नको ? माशा अल्लाह आता तू जवान झाली आहेस. दुसर्‍याच्या घरात जायचे आहे ! अशा सवयी लागल्या तर कसं होणार तेथे तुझे?’’

गुलबानोला अम्‍माचे हे बोलणे ऐकून राग येई. ती म्हणे, ‘‘ तुला याशिवाय दुसरा विषयच नाही का? जा ! बोलू नकोस माझ्याशी. तुला मी नकोशी झाले आहे म्हणूनच मला दुसर्‍या घरी पाठवायची तयारी चालू आहे तुझी ! तसं असेल तर साफ साफ सांग म्हणजे मी दादा हजरतांच्‍या घरी राहायला जाते.

त्याच काळात मिर्ज़ा दावर शिकोह शहजादा, खिरज सुल्‍तानचा मुलगा, गुलबानोकडे येऊ जाऊ लागला होता. किल्ल्यात पडद्याची पद्धत पाळली जात नसे. शाही खानदानी लोक आपापसात पडदा पाळत नाहीतच म्हणा ! त्यामुळे मिर्जा बेधडक बानोकडे येत असे.

खरे तर बानो नात्याने त्याची सख्खी नसली तरी चुलत बहीण होती पण नंतर त्यांच्यातील प्रेम भावनेने एक वेगळेच नाते निर्माण झाले. मिर्ज़ा गुलबानोकडे बहिणीच्या नात्याने बघत असे तर बानो मात्र बहिणीच्या नात्यापेक्षाही वेगळ्या नजरेने बघत असावी.

एक दिवस सकाळी सकाळीच मिर्ज़ा गुलबानोकडे आला. त्याने पाहिले बानो सकाळ झाली तरी तिच्या लाडक्या पलंगावर झोपली होती. तिने अंगावर काळी शाल ओढली होती जी तिच्या अंगावरच अस्ताव्यस्त झाली होती. अंगाखाली गुलाबांच्या पाकळ्या सुकल्या होत्या. पाय उघडे पडले होते आणि ओठ विलग झाले होते. उशाला हात होता आणि उशी बाजूला पडली होती. दोन दासी पंख्याने माशा उडवीत शेजारी उभ्या होत्या.

दावर शिकोह चाचीशी गप्पा मारत बसला पण तिरक्या नजरेने गुलबानोच्या हालचालीही पहात होता. शेवटी चाचीला म्हणाला, ‘‘ काय चाची, हजरत बानो अजून झोपली आहे ? उन्हे इतक्यात डोक्यावर येतील. आता हिला उठवलंच पाहिजे !’’

‘‘बेटा बानोचा राग तुला माहिती आहे. तिला उठविण्याची कुणाची हिंम्मत होणार रे बेटा? कोणी उठवले तर महाल डोक्यावर घेईल.’’
दावर म्हणाला,

‘‘ थांबा मीच उठवतो तिला. बघुया काय करते ती !

‘चाची हसून म्हणाली, ‘‘ जा उठव ! तुला काही बोलणार नाही ती ! तू आवडतोस ना तिला! ’’

दावरने जाऊन तिच्या तळपायाला बोटांनी गुदगुल्या केल्या. बानोने एकदम पाय जवळ घेतले व डोळे उघडले. मासोळी सारख्या मोठाल्या डोळ्यात राग भरला होता. तिला वाटले की तिच्या दासीने काही चेष्टा केली की काय ! तिला शिक्षा देण्याच्या तयारीत असलेल्या बानोच्या दृष्टीस दावर पडला. ज्याच्या प्रेमात ती आकंठ बुडली होती तोच समोर पाहून ती लाजली. तिने लाजून शालिचा पदर केला व त्यात चेहेरा झाकून घेतला. ताडकन उठून बसली. अंगाला नाजुकसा कंप सुटला होता. इकडे दावरची अवस्था काही फार वेगळी नव्हती. ते सौंदर्य पाहून त्याचे होश उडाले. त्याची जणू शुद्धच हरपली.

त्याने स्वतःला सावरले व ओरडला, ‘‘ चाची हजरत बघ मी बानोला उठवलं !’’

प्रेमाने पुढची पायरी गाठली. विरहाने रात्रीच्या झोपा उडाल्या. बानोच्या आईला संशय येऊ लागल्यावर तिने खबरदारी म्हणून दावरचे घरी येणे जाणे बंद करून टाकले.

———–

दरगाह हजरत चिराग दिल्लीच्या एका कोपर्‍यात एक सधन घरातील वाटावी अशी एक स्त्री फाटलेली चादर डोक्यावर ओढून भिकार्‍यासारखी बसली होती कण्हत होती. पाऊस धुवाधार पडत होता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे पाणी आडवेतिडवे त्‍या जागेला झोडपत होते. त्‍या भिकारणीचं अंथरुन जेथे होतं ती जागा त्‍या पावसाने पार ओली करुन टाकली.

ती बाई बहुधा आजारी होती. तिच्या बरगड्‍यात जीवघेणी कळ उठली व ती विव्‍हळली. अंग तापाने फणफणले होते व शरीर थंडीत थरथर कापत होते. तिचा त्‍या शरीरावर ताबाच राहिला नव्हता. ती त्‍या तापातच बरळत होती, मधेच ओरडली,

‘‘ गुलबदनऽऽ ए गुलबदन ! कुठे उलथली आहे मेली कोणास ठाऊक ! लवकर ये आणि मला शाल पांघर. बघ हवा आत येतीये. पडदे सोड ! रोशन तूच ये ! गुलबदन कुठे गेली आहे कोणास ठाऊक ! शेगडी घेऊन ये ! आणि जर माझ्या बरगड्‍यांना मालिश कर. मला श्‍वास घ्यायला त्रास होतोय गं !’’

जेव्हा तिच्‍या या आरडाओरड्यानेही कोणी तिच्‍या जवळ आले नाही तेव्हा मात्र तिने चादर बाजूला करुन इकडेतिकडे पाहिले. त्‍या अंधारल्या कमानीत गवताच्या बिछान्यावर ती एकटी पडली होती. सगळीकडे भयाण अंधार भरला होता व पावसाच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाही आवाज येत नव्हता. पाऊस तर असा पडत होता की तिला वाटले कयामतचा दिवस आला की काय. तेवढ्यात एक विज कडाडली आणि तिच्‍या नजरेस एक पांढरीशुभ्र कबर पडली. तिच्या बापाची.

स्वत:चे हे हाल पाहून तिने एक किंकाळी फोडली व म्हणाली,

‘‘ बाबाऽऽऽ मी तुमची गुलबानो ! उठा, मला ताप चढला आहे. माझ्या हाडात भयंकर वेदना… मला थंडी वाजतेय बाबा.. माझ्याकडे या फाटक्या चादरी शिवाय अंगावर ओढायला काही नाही.’’ स्फुंदत, आक्रोश करत ती म्हणत होती,

‘‘माझी आई कुठे गेली? मला महालातून हाकलून दिलंय ! बाबाऽऽऽ मला भीती वाटते. मला तुमच्या जवळ घ्या. मी दोन दिवसांपासून उपाशी आहे..हो ! कफनातून माझ्याकडे बघा. माझ्या शरीराला या ओल्या जमिनीतील खडे टोचताहेत… विटेची मी उशी केली आहे..

‘‘माझा सोन्याचा पलंग कुठे गेला? माझ्या शाली कुठे गेल्या ? अब्बा ऽऽऽ अब्बाऽऽ उठा ना ! किती वेळ झोपणार ? ’’ कसाबसा श्वास घेत तिने परत एकदा आक्रोश केला आणि तिची शुद्ध हरपली. तिने पापण्याआड पाहिले तिचे अब्बा मिर्ज़ा दाराबख्त तिला कबरीत उतरायला मदत करीत होते आणि रडत रडत म्हणत होते,

‘‘ आता ही कबरच हिचा सोन्याचा पलंग आणि याच्या भिंती त्याचे पडदे !’’

तिचे डोळे उघडले व बिचारी बानो स्वत:चे पाय चोळू लागली. मरण्याची वेळ जवळ आली होती. म्हणाली,

‘’ लो साहिब, आता मी मरते. माझ्या घशात कोण सरबताचे थेंब टाकणार? आणि कोण मला यासीन ऐकवणार ?. माझे मस्तक कोण मांडीवर घेणार ? हे अल्लाह, तुझ्याशिवाय आता माझे कोणी नाही. तुझा प्रेषितच माझा साथी आहे आणि हे औलिया माझे शेजारी.’’

शहजादी मेली आणि दुसर्‍या दिवशी गरिबांसाठी असलेल्या एका मोडकळीस आलेल्या कब्रस्तानात गाडली गेली.

आता तोच तिचा लाडका सोन्याचा छपरी पलंग, ज्यात ती अजून झोपली आहे आणि कयामतपर्यंत झोपणार आहे…

अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Posted in कथा | Leave a comment

सिनेमा….

…..परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? “चारशे” त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही. तो गेल्यावर मी अंथरुणावर पडलो आणि डोळे मिटले आणि मला माझ्या लहानपणीचा सिनेमा आठवला….

आमच्या गावात दोन प्रसंग रोज साजरे व्हायचे. पहिली म्हणजे रोज संध्याकाळी अंधार जेव्हा अरुंद रस्त्यांवर सावल्या लांब व्हायच्या तेव्हा रस्त्यावरील खांबावरील कंदील पेटविण्यात सरकारी माणूस यायचा. हा एक आणि दुसरा त्यानंतर लगेचच एक बैलगाडी सिनेमाची जाहिरात करण्यास येत असे तो. पहिल्या प्रसंगात गल्लीतील सगळी लहान मुले हजेरी लावायची आणि तेथे एकच दंगा उडायचा. तो माणूस सायकलवर यायचा, सायकल त्याच्या स्टँडवर मागे खेचून लावायचा. त्याच्या हँडलच्या खाली असलेला एक पितळ्याचा बिल्ला मला अजून आठवतोय. तो त्या सायकलचा कर भरल्याचा बिल्ला असायचा. मग तो शांतपणे सायकलला लावलेली शिडी खाली घ्यायचा. ही शिडी बांबूची असायची आणि त्याला किती पायर्‍या होत्या ते मला अजून आठवतंय. असो. ती शिडी तो मग शांतपणे फरफटत त्या दिव्याच्या खांबाशी फरफट न्यायचा आणि त्याला लावायचा. मग मात्र तेथे एकदम शांतता पसरायची. खिशातून आगकाडीची पेटी काढून तो त्यातील एक काडी पेटवायचा. एका हाताने कंदिलाची काच वरती करून तो ती वात पेटवायचा. इतका वेळ आम्ही सगळे श्वास रोखून त्याचे ते काम पहात असू. जणू काही कसला आवाज झाला तर ती पेटती काडी विझेल किंवा ती शिडी घसरेल.. तो ज्या एकाग्रतेने तो कंदील पेटवायचा त्याच एकाग्रतेने आम्ही तो सोहळा पहात असू. त्याने कंदिलाची काच खाली केली की मग मात्र तेथे एकच गोंधळ उडे. सामना जिंकण्यास एक धाव हवी आहे अशी त्यावेळेस परिस्थिती असायची. हे असे का? हे माहीत नाही.. बरं हा प्रकार रोजच व्हायचा तरी पण ती शांतता पसरणे आणि मग एकच गोंधळ होणे हे रोजच व्हायचे. मग कोणाच्या तरी घरून चहा येई (बहुतेक वेळा आमच्याच घरून) असाच प्रकार आठवड्यातून तो एकदा कंदिलाची वात कापायला किंवा काचेवरची काजळी रांगोळीने साफ करण्यासाठी यायचा तेव्हा व्हायचा…

हा कंदील रात्री कोण विझवत असे हे मात्र लहानपणी मला कधीच कळले नाही… आजी म्हणायची झाडावरच्या मुंजाला त्या प्रकाशाने झोप आली नाही की तो त्यावर फुंकर घालतो…त्या काळात रात्री वारा सुटला की मला मुंजाच फुंकर घालतो याची खात्री वाटे. तो मंद उजेड फेकणारा कंदील, त्याचा मिणमिणता प्रकाश, फडफडणारी वात आणि मुंजाची फुंकर हे कधीतरी मला पाहायला आवडेल हे मात्र खरे… पण आता ते शक्यच नाही म्हणा..

त्यानंतर सिनेमाच्या जाहिरातीची गाडी येत असे. या बैल गाडीला एकच बैल असे. गाडाच म्हणाना ! बैलाच्या अंगावर एक मळलेली झूल असे आणि त्याची शिंगे रंगवलेली असत. गळ्यात सतत वाजणार्‍या घंटा असत. मला शंका आहे की त्या बैलाला थोडा वेळ झाला की मान हलविण्यास शिकवले असावे. नाहीतर ठरावीक वेळाने त्या घंटा कशा वाजल्या असत्या.? (गाडी उभी असेल तेव्हा…) त्या गाडीला बांबूच्या तट्ट्यांनी शाकारलेले असायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाचे अत्यंत टुकार (हल्लीच्या तुलनेत) पोस्टर चिकटवलेले असायचे. चालू असलेल्या सिनेमाचेच पोस्टर लावायचे बंधन त्या गाडीवाल्यावर नव्हते आणि तंबूच्या मालकावरही नव्हते. कुठलेतरी पोस्टर लावले की झाले.. कारण आज कुठला सिनेमा आहे याची घोषणा स्वत: गाडीवान करायचा. आमच्या चौकात आला की तो गाडी उभा करायचा आणि एक पत्र्याचा भोंगा काढायचा. त्यातून बारशाला जसं बाळाच्या कानात कुर्र ऽऽ कुर्र ऽऽ असा आवाज करतात तसा आवाज तो त्या भोंग्यातून काढायचा. मुलांची झुंड तेथेच असायची. त्या गोंधळात ज्यांना ऐकू जायला पाहिजे त्यांना त्याची घोषणा ऐकू जावी म्हणून तो मुलांना गप्प करण्यासाठी प्रयत्न करायचा. अर्थात तो असफल झाल्यावर मग तो गोळ्यांचे अस्त्र बाहेर काढायचा मग मात्र जाहिरात पुढे जायची, “कुर्र ऽऽऽऽ कुर्र.ऽऽऽ… ऐका हो ऐकाऽऽऽ आज रात्री ऽऽऽ xxxx टॉकीजच्या रुपेरी पडद्यावर ऽऽ पहा खास लोकाग्रह परत समुंदरी डाकू…. लोकाग्रहास्तव हा शब्द त्याला म्हणता यायचा नाही मग तो त्याचा उच्चार लोकास्तव किंवा काहीही करायचा… मग त्यात काम करणार्‍या नट नट्यांची नावे जाहीर केली जायची. पहिली दोन नेहमीच प्रसिद्ध नट नट्यांची असायची… मी हा सिनेमा त्या तंबूत पाहिला. मला गोष्ट विशेष आठवत नाही. पण एक समुद्री चाचा आणि एक सुंदरी अशी काहीतरी गोष्ट होती… ( परवा गुगलवर शोध घेताना कळाले की त्यात नासीर खानने काम केले होते आणि त्यातील एक गाणे खाली टाकले आहे. नटी बहुधा फियरलेस नादिया/नादिरा असावी.) नवीन सिनेमा असेल तर घड्या घातलेली गाण्याची पुस्तके विकली जायची आणि जाहिराती वाटल्या जायच्या.

सिनेमाच्या तंबूतील वातावरणावर नंतर केव्हातरी लिहेन पण त्या काळात एकच प्रोजेक्टर वापरला जायचा आणि रीळ संपल्यावर ते रीळ गुंडाळून दुसरीकडे पाठवावे लागे. मग दुसरे रीळ लावल्यावर मग परत सिनेमा परत सुरू. पण, मधे हा जो वेळ असे त्यासाठी पडद्यावर कायम एक चित्र दिसत असे. गाईला चारा घालणार्‍या बाईचे ते चित्र मला अजूनही आठवतेय. जर हे रीळ न गुंडाळता तसेच पुढे पाठवले तर भयंकर मारामारी होण्याची भीती असे…. पडद्यावर केव्हाही प्रेक्षक दिसत असत. (सावल्या) पण त्याने काही भिघडायचे नाही म्हणा…

एकदा असंच सिनेमाला गेलो असताना (स्वतःच्या सतरंज्या घेऊन जाव्या लागत. सिनेमा बघण्याचे तसे कष्टाचे काम होते. खाण्याचा डबाही बरोबर घ्यावा लागे) तंबूचा मालक समोर आला. आम्ही सगळी शहरातील मंडळी आलेली पाहून तो त्याच्या डोअरकिपरकडे पाहून ओरडला, “अरे…. सावकार मंडळी आली आहेत. आत जा, जागा साफ कर, (म्हणजे बिड्यांची थोटके उचल) आणि धर्मेंद्रला म्हणावं आज जरा चांगलं काम कर !” तो हे इतके आत्मविश्वासाने म्हणत असे की आम्हाला ते खरंच वाटे….

आणि हो ! तिकीट होते फक्त १ आणा दोघांसाठी ! आम्हाला बहुतेक वेळा फुकटच !

– जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

” जिक्रेमीर “

नमस्कार!

मधेच एकदम झटका आल्यासारखे मीर तकी मीरच्या “जिक्रेमीर” या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करायला घेतले आणि पूर्णही केले. थोड्याच दिवसात ते मी छापणार आहे. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी कृपया प्रतिक्रियेत लिहावे म्हणजे त्या प्रमाणात प्रती छापता येतील. या पुस्तकासाठी लिहिलेले “मनोगत” खाली देत आहे..

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उर्दूमधे जी कॅलिग्राफी केली आहे ती आमच्या एका मित्राने. श्री”आभ्या” यांनी. त्यांनाही मनापासून धन्यवाद !

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जिक्रे मीर या पुस्तकाचे मनोगत…

फार पूर्वी मिर्झा ग़ालिबच्या खालील ओळी वाचल्या होत्या आणि त्याच वेळी माझ्या मनात मीरच्या काव्याबद्दल कुतुहल जागे झाले होते. त्या कुतुहलाचाच परिणाम म्हणजे हे मराठीत अनुवादित केलेले पुस्तक…‘‘ जिक्रे मीर’’

रेख़्ते के तुम्ही उस्ताद नही हो ‘ग़ालिब’
कहते है अगले ज़माने में कोई ‘मीर’ भी था..

मीरने ही आत्मकहाणी लिहिली फार्सीमधे. त्या काळात पुस्तके छापण्याची कला या प्रदेशात अवगत नव्हती. लोक आपल्याला आवडलेल्या पुस्तकांच्या नकला काढून घेत. ज्याला ते पुस्तक पाहिजे आहे तो ते स्वतः करत असे किंवा त्यासाठी काही खास माणसे असत त्यांच्याकडून करून घेत. पण या नकला लोकांच्या कपाटात पडून रहात. अशीच एक एक नकललेली प्रत इराणमधे मिळाली. इटावा येथे ख़ानबहादुर मौलवी बशिरुद्दीन अहमद यांच्या हाती एक फ़ारसी प्रत लागली. ती १९२८ साली छापण्यात आली. उर्दूमधे याचा अनुवाद फार नंतर झाला आणि १९५७ साली तो केला निसार अहमद फ़ारुकी यांनी. ज्या अनुवादावरून मी हा मराठीत अनुवाद केला आहे ते मूळ फार्सीतून हिंदीमधे आणले श्री. अजमल अजमली यांनी.

मीर तकी मीरच्या आयुष्यावर आणि काव्यावर सुफी पंथाचा लक्षात येण्याइतका प्रभाव होता. त्याचे बडील एक फ़कीर होते आणि त्यांनी मीरवर सुफी विचारांचे संस्कार केले. परमेश्वराची भक्ती (इष्क) आणि इतर प्राणीमात्रांवर प्रेम हे त्यांच्या शिकवणीचे सुत्र होते. म्हणून मीर म्हणतो, – इष्क नसते तर ना आम्ही असतो ना आमचे आयुष्य. मीरने त्याच्या आयुष्यात इतके अनुभव घेतले की त्याच्या कवितांचा शायरीचा गाभा हा करुणा हाच राहिला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक फटके खाल्ली. पण प्रत्येक फटका त्याला जमिनीवर पाडे आणि तो तेवढ्याच जोमाने पुढच्या प्रवासासाठी उठून उभा राही. त्याची शायरी वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याची शायरी जवळची वाटते कारण वाचक केव्हा ना केव्हा तरी त्या अनुभवातून गेलेला असतोच. मीरची भाषाही सर्व सामान्यांना कळेल अशी आहे. फार्सीत काव्य रचण्यापेक्षा त्याने हिंदी-उर्दूमधे शायरी केली त्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. उर्दू, हिंदी व काही फार्सी शब्द वापरून रचलेली त्याची शायरी वाचकाच्या ह्रदयाला भिडते याचे कारण ही भाषाच आहे हे नाकारुन चालणार नाही.

जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात उतरला त्याच काळात औरंगाबादला वली दख्खनी नावाचा एक शायर रहात होता. असं म्हणतात त्याने प्रथम उर्दूमधी गज़ल लिहिली आणि दिल्लीमधे लोपप्रिय केली पण उर्दूमधे काव्य रचण्याचे श्रेय मला वाटते अमीर खुस्रोला दिले पाहिजे. मीर तेकी मीरने वली दख्खनीप्रमाणे उर्दूमधे काव्य रचले आणि तोही त्या काळात प्रसिद्ध झाला.

मीरचा जन्म १७२२/२३ साली झाला. त्याच्या मृत्यूची तारीख निश्चित माहीत नाही पण जिक्रे मीरमधे त्याने शेवटची जी कहाणी लिहिली होती ती गुलाम कादीरने दिल्लीचा ताबा घेतला त्याची, ते साल होते १७८८. म्हणजे १७२२ ते १७८८ (६६) वर्षे तरी तो जगला होता याची खात्री आहे. मीरने त्या काळातील घडामोडीत त्रयस्थ राहून भाग घेतला व त्याच्या नोंदी केल्या. जिक्रे मीर म्हणज फक्त मीरची कहाणी नसून त्या काळातील दिल्ली. आग्रा व लखनौची कहाणी आहे. त्या काळात ज्या घडामोडी होत होत्या त्यात महत्वाच्या घटना सांगायच्या म्हणजे, मराठ्यांचे राज्य, अब्दालीची स्वारी, इंग्रजांचा शिरकाव, राजपूत व तशा अनेक राजांच्या लढाया. या धामधुमीत कलाकरांचे जे हाल झाले त्याचीही ही कहाणी आहे. खर तर जिक्रे मीरमधे मीरबद्दल फारच कमी लिहिले गेले आहे ना त्यात शेरोशायरी आहे. त्या काळातील घडामोडी प्रत्यक्ष पाहणाऱ्या माणसाने त्या घडामोडी लिहिल्या तेच जिक्रे मीरे चे महत्व आहे.

मीरच्या शायरीमधे ‘इष्क’ या शब्दाचा वारंवार उल्लेख होतो. सुफी पंथाच्या सर्वच शायरीमधे या इष्कला फारच महत्व आहे. या शब्दाचा थोडाफार उहापोह करणे वावगे ठरणार नाही. जिक्रे मीर मधेही मीरच्या वडिलांच्या उपदेशात इष्कचा उल्लेख वारंवार होतो. सामान्य भाषेत किंवा समजुतीप्रमाणे स्त्रीपुरुषांच्या शारीरीक जवळीकीने किंवा कदाचित मानसिक जवळीकीने जे नाते त्यांच्यात उत्पन्न होते त्याला ‘इष्क ’ म्हणतात. या इष्कात बुडून जाणे, इष्कात जगाचा विसर पडणे, इष्कात प्रेयसी किंवा प्रियकराशिवाय दुसऱ्या कशाचीही शुद्ध नसणे असे अनेक वाक्यप्रयोग आपण नेहमी वाचतो. थोडक्यात एकदा इष्क झाले की त्या माणसाला किंवा स्त्रीला या जगाचा विसर पडतो. इष्कात तो किंवा ती देहभान विसरून जाते. सुफी अध्यात्मात साधकाला परमेश्वराशी याच प्रकारचे इष्क होत असते आणि या इष्कात बुडणे हेच त्याचे इतिकर्तव्य असते.

‘‘….बाळा प्रेम (इष्क) कर ! प्रेमाशिवाय या जगात दुसरे काही महत्त्वाचे नाही. हा संसार टिकला आहे तो प्रेमामुळेच. प्रेम भावना नसती तर हा संसार नसता. प्रेम नसेल तर जीवन निरस होऊन जाते. प्रेम नसेल तर हे आयुष्य ओझे वाटते. प्रेमाने ह्रदय उचंबळून येणे योग्यच आहे. प्रेम निर्मिती करते आणि नष्टही करते. या जगात जे काही आहे ते प्रेमाचेच एक रूप आहे. अग्नी म्हणजे प्रेमाची आग आहे तर पाणी हे प्रेमाची गती आहे. माती ही प्रेमाचा थांबा आहे. हवा म्हणजे प्रेमाने आलेला अस्वस्थपणा आहे. मृत्यू म्हणजे प्रेमाची धुंदी आहे आणि प्रेमाची शुद्ध असणे म्हणजे जीवन. रात्र म्हणजे प्रेमाची निद्रा आहे दिवस म्हणजे प्रेमाचे जागे होणे. मुसलमान ही प्रेमाची सुंदरता आहे आणि काफ़िर म्हणजे प्रेमाचे भीतीदायक रूप. प्रेमाच्या जवळ असणे हे पुण्य आहे तर प्रेमाला दूर लोटले तर त्यातून पापच निर्माण होते. स्वर्ग ही प्रेमाची इच्छा आहे तर नरक प्रेमाचा रस. प्रेमाचे स्थान पूजेपेक्षाही वर आहे, ज्ञानापेक्षा वर आहे एवढेच काय तुम्हांवर जडलेल्या प्रेमापेक्षाही त्याची जागा वर आहे. भक्ती म्हणजे परमेश्वराला ओळखणे तर प्रेम सत्याची निरागसता ! परमेश्वराची आस म्हणजे स्वत:ला विसरणे व त्याच्या जवळिकीचा अनुभव घेणे ! जगातील सर्व गोष्टींपेक्षा प्रेमाची जागा सगळ्यात उंचावर आहे…..‘‘ मीरला तो सात आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी हा जो उपदेश केला त्यातील इष्कचा अर्थ हा आहे…

मीरच्या या आत्मकहाणीत त्याने त्याला वेड लागले त्याची कहाणी काव्यात सादर केली आहे. त्याला वेड लागले तेव्हा त्याचे वय होते अवघे १७. त्याचा मी या पुस्तकात अंतर्भाव केला आहे कारण ‘‘मला वेड लागले होते‘‘ हे सांगणे धाडसाचे आहे आणि त्याने ज्या छंदात ती कहाणी रचली आहे तो प्रकारही मला आवडला. हे वेड त्याला लागले त्याचे कारण त्याने या आत्मकहाणीत परिस्थितीचा दबाव असे दिले आहे पण काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की त्याचे हे वेड प्रेमभंगातून उदभवलेले होते. मला तेच कारण खरं वाटते कारण परिस्थितीने वेड लागण्याइतका मीर कमकुवत मनाचा नव्हता. पण प्रेमभंगाने मात्र अनेक कणखर मने दुंभंगलेली मी पाहिली आहेत आणि आपणही पाहिली असतील… या वेडात त्याला चंद्रावरून एक सुंदर युवती भेटण्यास येत असे असा भ्रम होत असे. अर्थात या परिकथेत विशेष काही नाही पण दुर्दैवाने या परीला मानवाचे सर्व गुण, दुर्गूण चिकटलेले होते. ती कधी प्रेम करत असे तर कधी पराकोटीचा द्वेष करीत असे. कधी हट्ट करत असे तर कधी मीरला लाथाडत असे. मीरचे वेड कालांतराने ओसरले पण प्रेमभंगाचे दुःख मात्र त्याला आयुष्याभर जाळत राहिले. त्याच्या काही काव्यातून ते आपल्याला स्पष्ट जाणवते..
उदा..
जब नाम तेरा लीजिये तब अष्क भर आवे ।
इस जिन्दगी करने को कहाँ से जिगर आवे?
अष्क आँखों से कब नही आता।
लहू आता है जब नही आता ॥
लगती नही पलक से पलक इन्तजार में ।
आँखे अगर यही है तो फिर ‘मीर’ सो चुका ॥

मीर जरी इस्लामधर्मीय असला तरी पक्का सुफी होता. (अर्थात सुफी धर्मगुरुंनी त्या काळात इस्लामच्या प्रसारामधे महत्वाची भूमिका बजावली होती हे नाकारण्यात अर्थ नाही. ते या प्रसारास कसे मदत करीत हे श्री सेतू माधवराव पगडी यांच्या ‘सुफी संप्रदाय’ या पुस्तकात वाचण्यास मिळते. भारतातील सुफी संत पक्के राजकारणी होते व सुलतान त्यांचा राज्यप्रसारासाठी व्यवस्थित उपयोग करून घेत व तेही सुलतानांचा धर्मप्रसारासाठी कामासाठी वापर करून घेत.)

पण मीर व त्याच्या वडिलांना परमेश्वराला भेटण्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब होतो आहे याच्याशी काही घेणे देणे नव्हते. म्हणून मीर म्हणतो –
उसके फ़रोगे हुस्न से झलकते है नूर ।
शमा हरम हो या कि दिया सोमनाथ का ॥
त्याच्या भक्तीच्या तेजाने हा प्रकाश सर्वत्र फाकला आहे
मग तो अल्लाच्या घरातील दिवा असो किंवा सोमनाथच्या मंदीरातील दिवा. ॥

मीरने एके ठिकाणी नादिरशाहाने दिल्ली जाळून बेचिराख केली, लुटली त्याचे अत्यंत ह्रदयद्रावक वर्णन केले आहे.. ते आता येथे लिहित नाही.. पुढे आपल्याला ते वाचण्यास मिळेलच. पण त्याच्या काव्यात ते वर्णन येथे वाचण्यास हरकत नसावी…
अब ख़राबा हुआ जहानाबाद ।
वरना हर इक क़दम पे यां घर था ॥

दिल वह नगर नहीं कि फिर आबाद हो सके,
पछताओगे, सुनो हो, यह बस्ती उजाड के ॥

दिल की आबादी की इस हद है खराबी कि न पुछ,
जाना जाता है कि राह से लष्कर गुज़रा. ॥

खुश न आई तुम्हारी चाल हमें ,
युँ न करना था पायमाल हमे .॥

शाहां कि कुहले जवाहिर थी जिनकी खाके पा,
उन्ही की आँ मे फिरती ल्लाइयाँ देखी ॥

दिली मे आज भीख भी मिलती नही उन्हे,
था कल तलक दिमाग़ जिन्हे ताजो-तख़्त का ॥

नाकाम रहने का तो तुम्हे ग़म है आज मीर,
बहुतों के काम हो गये है कल तमाम याँ ॥

दिल की वीरानी का क्या मजकूर है,
यह नगर सौ मरतबा लूटा गया ॥

त्याला ते पाहून वेदना झाल्या असतील त्या खालच्या ओळीत स्पष्ट दिसतात.

वो दस्त-ए-कौफनाक रहा है मेरा वतन
सुन कर जिसे खिस्र ने सफ़र से हज़्र किया ॥

माझ्या देशाचे भयानक वाळवंट झाले आहे,
ते पाहून खिज्रचाही थरकाप उडाला. ॥

तू है बेचारा गदा ‘मीर‘ तिरा किया मज़कूर
मिल गए ख़ाक मे याँ साहब अफ़सर कितने ॥

तू एक भिकारी मीर कोण तुला विचारतो !
इथे किती राव उमराव आणि साहेब राखेत मिळाले॥

शहा कि कोहल-ए-जवाहर थी ख़ाक-ए-पा जिन की
उन्हीं की आँखों में फिरते सलाइयाँ देखी॥

ज्याच्या पायाची धूळ अनेकांच्या डोळ्याचा सुरमा आहे,
पण त्याच्याच डोळ्यात सळया फिरताना मी पाहिल्या ॥

दिल्ली में आज भीक भी मिलती नही उन्हें,
था कल तलक दिमाग जिन्हें तख्त-ए-ताज का॥

आज दिल्लीमधे त्यांना भीकही मिळत नाही,
ज्यांना कालपर्यंत त्यांच्या सिंहासनाची आणि मुकुटाची घमेंड होती ॥

काही टिकाकार मीरला ‘‘आह‘‘ चा शायर व सौदाला ‘‘वाह‘‘ चा शायर म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नाही. मीरची शायरी ज्याने वाचली आहे त्याला असे आढळून येईल की त्याने काव्याच्या व भावनांच्या सर्व प्रांतात संचार केला होता.

मीरच्या काव्याच्या भाषेचे एक विशेष आहे ते म्हणजे ती अत्यंत सोप्पी, आणि त्यात हिंदी, फारसी आणि उर्दू भाषेतील शब्द अगदी चपखलपणे वापरले आहेत.
उदा.
सिरहाने मीर के अहिस्ता बोलो,
अभी अभी रोते रोते सो गया है ।

मीरच्या उशाशी हळू बोला
आत्ताच रडता रडता झोपी गेलाय।

किंवा

बावले से कब तलक बकते थे सब करते थे प्यार..
अकल की बातें किया क्या हम से नादानी हुई ।

अर्थहीन बडबड करत होतो तेव्हा सगळे करत होते प्रेम,
अक्कल वापरून बोललो काय आणि लक्षात आले, फार मोठी चूक झाली.

एका मैफिलीत कोणीतरी मीरला एक थोर शायर म्हणून संबोधले त्यावर मीर ने उत्तर दिले,

हमको शायर न कहो ‘मीर’ की साहब हमने,
दर्दो-गम कितने किये जमा तो दिवान किया ॥

मला शायर म्हणू नका. या आयुष्यात मी इतकी दुःखे पचवली आहेत की ती शब्दात सांगता सांगता त्याचे एक पुस्तक झाले बस्स…..

मला वाटते या ओळीच मीरबद्दल बरेच काही सांगून जातात. आता अजून लिहिण्यासारखे काही नाही… वाचकांनी पुढे वाचावे ही विनंती करून हे मनोगत संपवतो.

फ़कीराना आये सदा कर चले ।
मियां खुश रहो हम दुआ कर चले ॥

जयंत कुलकर्णी.

copyright: Jayant Kulkarni for all formats.

Posted in लेख | Leave a comment

प्राकृत…

प्राकृत…

कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला. त्याचे ‘डोन्ट स्लीप देअर आर स्नेक्स’ हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. असो. ज्या भाषा माहीत आहेत, त्यांचे वर्गीकरण चार खंडांमध्ये करता येते. एक – आफ्रिका खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, दोन – युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, तीन – प्रशांत महासागर खंडात बोलल्या जाणाऱ्या व चार – अमेरिकन खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा. युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांत सेमेटिक, कॉकेशस, युरल- अल्टाईक, एकाक्षरी, द्रविड इ.इ. व इंडोयुरोपीय भाषा येतात. इंडोयुरोपीय भाषां या उत्तर भारत, अफगाणिस्थान, इराण व युरोपमध्ये बोलल्या जातात. या भाषा केंटुम व शतम या दोन प्रकारांत विभागल्या गेल्या आहेत. केंटुम हा लॅटिन शब्द आहे व त्याचा अर्थ शत (१००) असाच होतो. शतममध्ये इलिरियन, बाल्टिक, स्लोव्हानिक, अर्मेनियन व इतर आर्य भाषांचा समावेश करण्यात येतो. अर्थात आता आर्य/अनार्य हा फरक निकालात निघण्याची वेळ आलेली असल्यामुळे आता या भाषांना काय म्हणावे हा एक प्रश्नच आहे. आर्य भाषांमध्ये प्रामुख्याने इराणी, दरद व इतर भारतीय भाषा येतात. असे म्हणतात की अवेस्ताची भाषा ही वेदांच्या भाषेशी बरीच मिळतीजुळती आहे. दरद भाषा पामीर व उत्तर पंजाबमध्ये येणाऱ्या प्रदेशात बोलली जात असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. बऱ्याच संस्कृत साहित्यात काश्मीरच्या आसपासच्या प्रदेशाला दरद या नावाने ओळखले जाई, ही खरी गोष्ट.

जर काळात विभागणी केली, तर भारतीय भाषांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल : इ.स. ५००पर्यंत बोलल्या जाणाऱ्या भाषा, नंतर ५०० ते ११०० या काळात बोलल्या जाणाऱ्या भाषा. हेच प्राकृत भाषांचे युग असे समजले जाते. आता या प्राकृतात त्या काळात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा, पाली भाषासहित गणल्या जातात. ११००नंतरचा काळ ते आत्तापर्यंत हा आधुनिक भारतीय भाषांचा काळ समजला पाहिजे. यात अपभ्रंश व त्याचे काही पोटविभाग मोडू शकतात.

या मध्ययुगीन भारतीय भाषांचे तीन भाग पाडले जातात. १) पाली, शिलालेखांमधे वापरली जाणारी प्राकृत, २) जैन आगमांमध्ये वापरली गेलेली अर्धमागधी व ३) ज्यात अश्वघोषाने प्राचीन नाटके लिहिली ती प्राचीन प्राकृत. दुसऱ्या भागात आपल्याला एका लेखात परिचय करून दिलेली गाथासप्तशती, गुणाढ्यची बृहत्कथा लिहिलेली आहे. याच काळात मला वाटते प्राकृतात व्याकरणाचा प्रवेश झाला. तिसऱ्या भागात अपभ्रंश नावाची भाषा येते, जी अपभ्रंशावरून तयार झाली असावी. असे म्हणतात की अपभ्रंशाची वाढ ही वैय्याकरणांच्या प्राकृतच्या क्लिष्ट नियमांमुळे झाली. शक्य आहे, कारण प्राकृतच्या वाढीत संस्कृतमधील जटिल व्याकरणाचा महत्त्वाचा सहभाग आहे. हेमचंद्राने बाराव्या शतकात प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथात जी अपभ्रंशची उदाहरणे दिली आहेत, त्यावरून अपभ्रंश ही त्या काळात बरीच प्रगल्भ झाली होती असे अनुमान काढता येते. पुढे जे संस्कृतचे झाले, तेच अपभ्रंशचे झाले. जशी वैय्याकरण्यांनी व्याकरणाचे नियम आणखी अवघड केले, तशी हीसुद्धा भाषा मागे पडली व त्याची अनेक सुटसुटीत रूपे जन्माला आली. त्याच आत्ताच्या मराठी, गुजराथी, बंगाली, सिंधी पंजाबी या भाषा.

आता एक अत्यंत वादाचा मुद्दा. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की प्राकृत हे संस्कृतचेच भ्रष्ट रूप आहे. पण आता हे ग्राह्य धरले जात नाही. मलाही तेवढे पटत नाही. अर्थात तेवढा आधिकार नसल्यामुळे मी ठामपणे वाद घालू शकत नाही, पण जर भाषांना सुधारण्यासाठी वैय्याकरण्यांनी व्याकरणांचे नियम अधिकाधिक केले व त्यात चुका होणार नाहीत अशी तजवीज केली हे जर मानले, तर सुधारणा कुठल्या भाषेत झाल्या हे पाहावे लागेल. अर्थातच हे व्याकरणाचे नियम प्राकृतला लावले जाऊन त्यातून संस्कृत तयार झाली असावी. वैदिक काळात बोली भाषा कुठली होती हे समजण्यास आता मार्ग नाही, पण बहुधा संस्कृत ग्रंथ सोडल्यास प्राकृतच बोलली जात असावी.

प्राकृत भाषेत निर्माण झालेल्या साहित्याचा परामर्श आता घ्यायला हरकत नाही. प्राकृतात दोन धर्मांचे साहित्य निर्माण झाले. बौद्ध साहित्य व जैन साहित्य. जरी त्यांचे तत्त्वज्ञान वेगळे असले, तरी ही दोन्ही साहित्य साधारणत: एकाच काळी निर्माण झाली. अर्थात त्यांचे विकसित होण्याचे मार्गही वेगळे होते. पाली साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: दोनशे-एक वर्षांत लिहिले गेले. त्यात मुख्यत: बुद्धाचे उपदेश होते. हे ग्रंथ राजगृह, वैशली व पाटलीपुत्र या राज्यांत रचले गेले. हे ग्रंथ रचले गेले तो काळ कुठला होता हा कदचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की सर्व बौद्ध मठातून बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी भारतातीलच काय, परदेशी भिख्खू उपस्थित असणार. त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या असणार. उदा. अवंती, कोशांबी, कनोज, साकाश्य, मथुरा या प्रांतातील मठवासीयांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या असणार, तर दक्षिण भागातील भाषाही वेगेवेगळ्या असणार. मठांमधे जे नियम पाळावे लागत, त्या संदर्भातील ग्रंथाचे नाव होते ‘विनय’. विनय रचताना व या नियमांचा अभ्यास करताना त्यांच्यात भाषेची सरमिसळ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरमिसळ अनेक शतके चालली होती हे लक्षात घ्यायला हवे. हे मूळ उपदेश होते कौशलच्या राजभाषेत व मगधाहून आलेल्या भिख्खूंच्या भाषेत. जे भिख्खू पश्चिम प्रदेशातून आले होते, त्यांच्या भाषेचा प्रभाव या कामावर पडणे शहज शक्य होते. हे साहित्य अशोकाच्या काळातच काही प्रमाणात लिपिबद्ध झाले होते. पण बहुतांश बौद्ध साहित्याची निर्मिती झाली सिंहलद्वीपमध्ये. हे काम पार पाडले होते ज्याने धर्मप्रसाराचे काम हाती घेतले होते तो राजपुत्र महेंद्र, अशोकाचा मुलगा. प्राचीन इतिहासातील या छोट्याछोट्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर पालीवर कुठल्या एका भूभागाचा अधिकार कसा काय मान्य केला जाईल? बौद्ध धर्मग्रंथ लिहिले गेले त्यात जी भाषा वापरली गेली, त्यावर इतर अनेक बोली भाषांचा प्रभाव पडला असणार हे कोणीही मान्य करेल. त्याचे प्रमाण किती हे आता कोणी सांगू शकत नाही. प्राकृत भाषेतील दुसरे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे जैन आगम साहित्य. भगवान महावीरांचा जन्मही पूर्वेकडेच झाला व अर्थातच त्यांचा उपदेश हाही पूर्वेतील भाषांमधे झाला असला पाहिजे. त्यांचा जन्म झाला वैशालीमध्ये, पण त्यांचे कार्यक्षेत्र होते मगध. जैन परंपरेनुसार भगवान महावीरांनी त्यांच्या पट्टशिष्यांना त्यांचा उपदेश सांगितला. त्यातील एक होता गणधर. याने या उपदेशांचे संकलन केले असे म्हणतात. हा उपदेश मगधातील प्रचलित भाषेत होता. बुद्धसुद्धा मगध देशात भ्रमण करीत होताच. त्याचा जन्म कोसलामध्ये झाला असे म्हणतात. त्याचे जे काही झाले, ते शिक्षणही तेथेच झाले. महावीर उत्तर मगधातील होत. त्यामुळे या दोन साहित्यांतील भाषेत का फरक आहे, हे लक्षात घेण्यास मदत होईल. महावीरांच्या निर्वाणानंतर जवळजवळ १५० वर्षांनी मगध-पाटलीपुत्रात भयानक दुष्काळ पडला व अनेक संतांना प्राण वाचविण्यासाठी देश सोडून जाणे भाग पडले. बरेच श्रमण मृत्युमुखी पडले. अशा नैसर्गिक आपत्तीत स्मृतिसंचित ग्रंथ नष्ट होतील या भीतीने त्यांना लिपीबद्ध करण्यात आले. त्यासाठी पाटलीपुत्रात जैन संतांची व श्रमणांची परिषद बोलाविण्यात आली व त्यात आगम साहित्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला व पार पाडण्यात आला. हा काळ होता साधारणत: इ.स.पूर्व चौथ्या शतकात. यानंतर जवळजवळ आठशे वर्षे आगम साहित्यामध्ये कसलाही बदल केला गेला नाही. दुसरी परिषद झाली मथुरेमध्ये चौथ्या शतकात. त्यानंतर तिसरी झाली दोनशे वर्षांनंतर. या परिषदेचे प्रमुख होते संत देवर्धिगणी. सहाव्या शतकात एक शेवटची परिषद झाली, त्यात सगळ्या उपलब्ध प्रतींचा मेळ घालून एक प्रत केली गेली. अर्थात यात सगळ्या प्रतींच्या भाषेचा प्रभाव पडला असणार. या आगम साहित्यात भगवान महावीरांचा उपदेश आहे व त्याची भाषा अर्धमागधी आहे असे मानले जाते. हे असे मानण्याचे मुख्य कारण आहे की खुद्द या प्रतीत तसे नमूद केले आहे. अर्धमागधीमध्ये जेव्हा हा उपदेश केला गेला व जेव्हा अर्धमागधी भाषेतया शेवटच्या आवृत्त्या निर्माण केल्या गेल्या, त्यामध्ये १००० वर्षे उलटून गेली होती. या उलट बौद्ध साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: ५०० वर्षांतच निर्माण झाले. त्यामुळे आगमांची भाषा ही पिटकांच्या भाषेपेक्षा नवीन असू शकेल. बरेच आगम साहित्य काळाच्या ओघात नष्ट पावले. जे काही उरले, त्यात फारशी सरमिसळ नाही. पालीइतकी तर मुळीच नाही. कारण बौद्ध धर्म जगभर पसरण्याचा तो काळ होता. बुद्ध विहारात अनेक प्रांतातील श्रमण ये-जा करीत असत हेही एक प्रमुख कारण होतेच. या झाल्या पाली व अर्धमागधी बोली भाषा.

ज्या अर्धमागधीबद्दल आपण बोलतोय, त्यात पूर्वेच्या भाषेचा प्रभाव आपल्याला जाणवतो; तर पाली भाषा प्राचीन आहे, पण त्यामध्ये मध्य प्रदेशातील भाषांचा प्रभाव जास्त जाणवतो. त्यामुळे या दोन्ही भाषांचा अभ्यास करणे कठीण होते. यामधे आपल्याला मदत करतात शिलालेखांतील भाषा. आपल्याला माहीतच आहे की हे शिलालेख अंदाजे इ.स.पू. २७० ते २५० या काळात खोदले गेले आहेत. या खोदलेल्या शिलालेखाच्या भाषांचा अभ्यास म्हणजेच बहुधा भारतातील प्राचीन भाषांचा पहिलावाहिला अभ्यास असावा. धम्माचा प्रसार व राज्याधिकाऱ्यांना त्याचा राज्यशकट हाकण्याचा दृष्टीकोन समजावा म्हणून सम्राट अशोकाने हे लेख खोदवून घेतले. त्यामुळे त्याची शैली एकच आहे, पण स्थानानुसार त्याची भाषा बदलत जाते. उदा. शाहबाजगढी मंसेरा येथे लिहिलेले लेख व गिरनार येथील लेख हे भाषिक दृष्टीकोनातून खूपच भिन्न आहेत. अर्थात हा फरक समजणे अवघड आहे. या शिलालेखांची भाषा ही राजभाषा किंवा अशोकाच्या दरबारातील भाषा असणार. राजभाषेमध्ये बोलीभाषेइतका फरक पडत नाही, कारण त्यात फारच कमी लोक बोलतात/लिहितात. भाषेच्या दृष्टीकोनातून अशोकाच्या शिलालेखांचेही चार भाग पाडता येतात. उत्तर-पश्चिमचे लेख, गिरनारचा लेख, गंगाजमुना ते महानदी या पट्ट्यातील लेख व दक्षिणेतील लेख. यातील दक्षिणेतील लेखांवर इतर भाषांचा काही प्रभाव पडला नाही, कारण ती भाषा सर्वस्वी वेगळी होती. गिरनार येथील लेखांवर गुजरातच्या बोली भाषांचा प्रभाव पडला. गोश्रुग गुहेत जे खरोष्टी लिपीतील धम्मपदे सापडली, त्याला धम्मपद प्राकृत याच नावाने ओळखले गेले. स्टाईनला मध्य आशियात खोतान येथे जी कागदपत्रे सापडली, ती चडोत-खरोष्टीमध्ये लिहिण्यात आली होती. ही भाषा पेशावर येथे बोलल्या जाणाऱ्या भाषेशी जवळीक दाखविते. गिरनार येथील लेखातील भाषा ही पालीशी साम्य दाखविते, कारण यावर मध्य भारतातील भाषांचा प्रभाव पडलेला दिसतो. प्राचीन नाटकांमधे तीन भाषा आढळतात. संस्कृत, शौरसेनी व मागधी. यातील प्रतिष्ठित संस्कृतमध्ये बोलताना दाखविले जात, सुशिक्षित स्त्रिया व अशिक्षित पुरुष शौरसेनीमध्ये व अशिक्षित – ज्यांची टर उडविली जाई, ते मागधीमध्ये व्यवहार करताना दाखविले जात. यातील शेवटच्या दोन्ही प्राकृतच आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अश्वघोषाने नाटके लिहिली, त्याचा काळ होता अंदाजे दुसरे शतक. या नाटकांची भाषा नंतरच्या नाटकांपेक्षा बरीच भिन्न आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात शौरसेनी, मागधी व अर्धमागधी यांचा उपयोग केलेला आढळतो. त्यानंतर भासाच्या नाटकात प्राचीन प्राकृताचे दर्शन घडते, तर मृच्छकटिकमध्ये सर्व प्राकृतांचे दर्शन घडते. भारताच्या बाहेर – विशेषत: अफगाणिस्तानच्या सीमेवर – जी प्राकृत बोलली जायची, तिला नियप्राकृत असे नाव होते. प्राकृतातही रूढीप्रियता होतीच व तिची पावलेही व्याकरणाच्या दृष्टीने संस्कृतच्या पावलावर पडत होती. खरे म्हणजे जेथे संस्कृतचा प्रभाव नव्हता, त्या भागात प्राकृत उमलली. थोडक्यात, आपण प्राकृताचे पुढील प्रकार पाहिले – १) शौरसेनी, २) मागधी, ३) अर्धमागधी व ४) अपभ्रंश.. आणखी सगळ्यात महत्त्वाची प्राकृत आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे महाराष्ट्री प्राकृत. महाराष्ट्री प्राकृत ही सगळ्यात श्रेष्ठ समजली जाई. दंडींनी एके ठिकाणी व्याकरणाचे काही नियम सांगताना म्हटले आहे, ‘इतर नियम हे महाराष्ट्रीप्रमाणे समजावेत.’ महाराष्ट्री ही काही फक्त कवींची भाषा होती असे समजण्याचे कारण नाही. गोदावरीच्या खोऱ्यात बोलली जाणारी सर्वात प्राचीन अशी भाषा आहे ती. त्याचेच आत्ताचे स्वरूप म्हणजे आपली मराठी.

बुद्ध आणि महावीर यांच्या काळात प्राकृत भाषेला राजमान्यता व जनमान्यता मिळाल्यावर चहूबाजूंनी तिची प्रगती होऊ लागली. आपण पाहिलेच आहे की अश्वघोषाच्या काळात तर त्यात साहित्य निर्मितीही होऊ लागली होती. अर्थात प्राकृताच्या या अनेक रूपांतून एका प्राकृताचे आगमन झाले. प्रथम शौरसेनी व नंतर महाराष्ट्री. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याचा महाराष्ट्राचा काही संबंध नाही. पण ते खोटे, प्रांतीय हेवेदाव्यातून प्रतिपादन केले गेले असे माझे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे की फक्त काही व्यंजनांचा लोप होत असल्यामुळे ती भाषा वेगळी झाली. पण ती व्यंजने येथेच का लोप पावली याचे उत्तर ते देत नाहीत. याचे कारण येथे ती भाषा बोलणारे लोक असावेत. शेवटी भाषा अशीच तर निर्माण होत असते. असो.

शौरसेनीची लक्षणे सांगताना वररुचीने प्राकृत प्रकाशमध्ये काय लिहिले आहे, ते आपण वर एके ठिकाणी पाहिलेच आहे. त्यात त्याने ‘उरलेले महाराष्ट्रीप्रमाणे’ असा उल्लेख केला आहे. म्हणून काही लोकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रीच प्राकृतचे मुख्य स्वरूप आहे. पण शौरसेनी ही त्यानंतर जन्माला आली. आचार्य दंडींनी त्यांच्या काव्यदर्शनमध्ये म्हटले आहे, ‘महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदु: ’. म्हणजे महाराष्ट्रात बोलली जाणारी महाराष्ट्रीच उत्कृष्ट प्राकृत आहे. पण याची पुढची ओळ आहे, ‘सागर: सूक्तिरत्नानां सेतुनन्धादि यन्मयम.’ म्हणजे ज्यात सेतुबन्धसारखे ग्रंथ रचले गेले आहेत, म्हणून ती श्रेष्ठ. अर्थात भाषा श्रेष्ठ इ.इ.वर माझा स्वत:चा विश्वास नाही. भाषा केवळ अचुक व्याकरणामुळे श्रेष्ठत्वाला पोहोचत नाही. मला वाटते त्यात होणाऱ्या संभाषणामुळे, साहित्य-काव्यामुळे ती त्या पदास पोहोचू शकते. म्हणूनच पुरुषोत्तमने आपल्या प्राकृतानुशासनमध्ये महाराष्ट्री आणि शौरसेनी एक कशी झाली आहे याबद्दल प्रतिप्रादन केले आहे. उद्योतनसुरीने पाययभाषा व मरहट्टय भाषा या दोन्ही वेगवेगळ्या आहेत असे प्रतिपादन केले आहे. महाराष्ट्रीमध्ये जे दोन महत्त्वाचे ग्रंथ रचले गेले – १) गाहाकोस म्हणजे गाथासप्तशती व २) गौडवहो म्हणजे गौडवध, त्यामुळे महाराष्ट्री व इतर प्राकृत यांच्यात संबंध दाखविण्याची गडबड सुरू झाली असावी, असे माझे मत आहे. सेतुबंधमध्ये ज्या भाषेत तो ग्रंथ रचला गेला, त्याबद्दल कसलाही उल्लेख नाही; परंतु तो महाराष्ट्रीमध्ये रचला गेला आहे असे आचार्य दंडींनी म्हटले आहे आणि त्यावर विश्र्वास ठेवण्यास हरकत नसावी.

वर आपण त्या काळातील परिस्थितीचा एक धावता आढावा घेतला. आता प्राकृत भाषेचे प्रकार पाहू. हे पुनरुक्तीचा धोका पत्करून लिहिले आहे. हा भाग डॉ. जगदीशचंद्र जैन यांच्या लेखनाचा जवळजवळ अनुवादच आहे. माझी काही मते त्यात आढळतील.

पाली व सम्राट अशोकाच्या धर्मलिप्या.

बुद्धघोषाने बौद्ध त्रिपिटक किंवा बुद्धवचनांच्या संदर्भात पाली या शब्दाचा वापर केला आहे. यालाच मागधी असेही म्हटले जाते. या भाषेचा प्रसार दक्षिणेतही झाला, कारण अशोकाच्या लेखात वापरली गेलेली भाषा आणि पाली यात बरीच समानता आढळते.
हे शिलालेख भारताबाहेरही आढळतात, जे खरोष्टीत कोरलेले आढळतात, हे आपण वर पाहिलेच आहे. पण याची भाषा प्राकृतच आहे.
भारतेतर प्राकृत अर्थात इतर ठिकाणी आढळणारी प्राकृत.

यात खरोष्टी लिपीत लिहिलेले प्राकृत धम्मपदतील १२ परिच्छेद आहेत, ज्यात बुद्धाचा उपदेश लिहिला आहे, खरोष्टीमध्ये लिहिलेले हे लेख चिनी तुर्कस्तानमध्ये सापडतात. या प्राकृताला नियाप्राकृत या नावाने ओळखले जाते.

अर्धमागधी

ज्याप्रमाणे बौद्ध त्रिपटकात वापरल्या गेलेल्या भाषेला पाली असे संबोधले गेले, तसेच जैन आगम साहित्यात वापरल्या गेलेल्या भाषेला अर्धमागधी असे संबोधले गेले. याला आर्ष भाषा म्हणजे ऋषींची भाषा असेही म्हणतात. ही भाषा खास जैनांच्या आगम साहित्यात आहे. याचे बहुतेक नियम वेगळे आहे. त्यामुळे बहुतेक संस्कृत नाटकात याचा वापर केला गेलेला दिसत नाही.

भरताने ‘नाट्यशास्त्र’ या त्याच्या प्रसिद्ध ग्रंथात ज्या सात भाषांचा उल्लेख केला आहे, त्यात अर्धमागधीचा उल्लेख केला आहे. उदा. मागधी, आवंती, प्राच्या, शौरसेनी, वान्हिका व दाक्षिणात्या या त्या उरलेल्या सहा भाषा. निशीथचूर्णीकाराने तर मगधातील अठरा भाषांना अर्धमागधी म्हणून संबोधले आहे. या भाषेत मागधी व प्राकृत या दोन्हींचा प्रभाव आढळल्यामुळे अभयदेव या भाषेला अर्धमागधी असे संबोधतो.

शौरसेनी

मथुरेच्या आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी ही भाषा. दिगंबर जैन संप्रदायाचे अनेक ग्रंथ या भाषेत आढळतात. काही तज्ज्ञ या भाषेला महाराष्ट्रीच्या आधीची मानतात, पण मी मानत नाही. कारण त्या काळात वरील सर्व भाषा भारताच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जात होत्या व त्यांची गाठ साहित्यातच पडत असे.

महाराष्ट्री

ही भाषा अत्यंत समृद्ध होती, त्यामुळेच यात सर्वोत्तम साहित्यनिर्मीती झाली असावी. या भाषेतील व्यंजने मोठ्या प्रमाणावर काढली गेल्यामुळे ही भाषा कर्णमधुर झाली. काव्यरचनेमध्ये त्यामुळे या भाषेचा वापर प्रामुख्याने केला गेला. आपण गाथासप्तशतीचे किंवा जयवल्लभाच्या वज्जालग्गाचे उदाहरण या संदर्भात घेऊ शकतो.

पैशाची

ही एक अत्यंत प्राचीन अशी प्राकृत बोलीभाषा आहे. म्हणजे जवळजवळ पाली, शिलालेख व अर्धमागधी यांच्याइतकी जुनी. मध्य आशियामध्ये, म्हणजे खोतान येथे सापडलेले काही लेख व कागद (हो, तेव्हा कागद होते) सापडले, त्यात खरोष्टी लिपीत पैशाचीमध्ये लिहिलेले आढळते. काही तज्ज्ञांच्या मते पैशाची ही पालीचेच एक रूप आहे. वररुचीने प्राकृतप्रकाशमध्ये पैशाचीचे मूळ शौरसेनी आहे असा उल्लेख केलेला आढळतो. रुद्रटाच्या काव्यालंकारवर लिहिलेल्या टीकेत नमिसाधूने या भाषेला पैशाचिक असे म्हटले आहे. हेमचंद्रने प्राकृतव्याकरण या ग्रंथात पैशाचीच्या नियमांबद्दल लिहिले आहे. त्रिविक्रमने शब्दानुशासनमध्ये व सिंहराजने प्राकृतरूपावतारमध्ये पैशाचीचा उल्लेख केलेला सापडतो, तर मार्कंडेयने प्राकृतसर्वस्वमध्ये कांचीदेशीय, पांड्य, पांचाल, गौड, मागध, व्राचड, दक्षिणात्य, शौरसेन, कैकेय, शाबर व द्राविड या नावाचे अकरा पिशाच देश सांगितले आहेत. अर्थात त्यानुसार येथे त्या काळात पैशाची बोलली जात असणार. मार्कण्डेयने फक्त तीन देशांचा या बाबतीत उल्लेख केला आहे, ते म्हणजे कैकेय, शौरसेन व पांचाल. रामशर्मा तर्कवागीशने प्राकृतकल्पतरूमध्ये कैकेय, शौरसेन, पांचाल, गौड, मागध व व्राचड पैशाचीचा उल्लेख केला आहे. लक्ष्मीधरच्या षड्भाषाचंद्रिकामध्ये पैशाची व चूलिका पैशाची ही भाषा राक्षस, पिशाच्च व खालच्या दर्जाचे लोक बोलत होते असा उल्लेख आहे. त्याने तर पैशाची बोलणाऱ्या देशांमध्ये बरीच भर घातली आहे, ती याप्रमाणे – पांड्य, केकय, बाल्हिक, सह्य, नेपाल, कुंतल, सुधेष्ण, भोज, गांधार, हैवक व कनोज. मला वाटते या प्राकृतात उच्च जमातीतील व्यक्तींना बोलण्यास परवानगी नव्हती. भोजदेवाच्या सरस्वतीकंठाभरणममध्ये तसा उल्लेख आढळतो. आचार्य दंडींनीही काव्यादर्शमध्ये पैशाची म्हणजे भूतभाषा असा उल्लेख केला आहे.
पण पैशाची ही संस्कृतला जास्त जवळची आहे, हे निर्विवाद. याच कारणामुळे अनेक दानपत्रे संस्कृतमध्ये आहेत का पैशाचीमध्ये, हे पटकन ओळखू येत नाही. गुणाढ्याची प्रसिद्ध बृहत्कथा पैशाची भाषेतील सगळ्यात प्राचीन साहित्य आहे. त्याची प्रत उपलब्ध नाही, पण त्याचे उल्लेख मात्र सापडतात.

मागधी..

मगध जनपदाची ही भाषा. मगध जनपद म्हणजे बिहारच्या आसपासचा प्रदेश. ज्याप्रमाणे इतर प्राकृतात स्वतंत्रपणे साहित्यकृती आढळतात, तशा या प्राकृतात आढळत नाहीत. अर्थात काही संस्कृत नाटकात यातील काही वाक्ये आढळतात. मार्कण्डेयच्या प्राकृतसर्वस्वमध्ये ही भाषा राक्षस, भिक्षू, क्षपणक व चेट जमातीचे लोक बोलत असत. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की अंत:पुरात राहणारे, घोड्यांचा सांभाळ करणारे, किंवा आपत्तीत सापडलेले नायक ही भाषा बोलतात. दशरूपकार म्हणतात, खालच्या जातीतील जमाती ही भाषा बोलतात. शूद्रकाच्या मृच्छकटिकात संवाहक, शकारचा नोकर, वसंतसेनेचा नोकर कुंभीलक, चारुदत्ताचा नोकर वर्धमानक हे लोक या भाषेत संभाषण करतात. शाकुंतलमध्ये दोन शिपाई, कोळी याच भाषेत बोलताना आढळतात. मुद्राराक्षसात जैन साधू, दूताच्या किंवा चांडाळच्या रूपात आलेले सिद्धार्थ इ. मागधीमध्येच बोलतात. पुरुषोत्तमने या भाषेत शाकारी, चान्डाली व शाबरी या भाषा आहेत असे नमूद केले आहे.

या झाल्या विविध प्राकृत भाषा. त्यांची मजा घ्यायची असेल, तर प्राकृत साहित्याबद्दल व व्याकरणाबद्दल लिहायला पाहिजे. पण ते पुन्हा केव्हातरी…

-जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

मर्लिन मन्रो

५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली… कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं…. अर्थात कविता हा आपला प्रांत नाही… 🙂

परमेश्वरा !
या जिवाला येथे मर्लिन मन्रो म्हणून ओळखले जाते..
तिचे तेथे प्रेमाने स्वागत कर.
तिचे खरे नाव ते नव्हते,
पण त्याने तुला काही फरक पडत नाही.
कारण तुला तिचे नाव चांगलेच माहीत आहे.
हो ! तिच ती, जिच्यावर सहाव्या वर्षी बलात्कार झाला, 
आणि जिने सोळाव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला.
ती आज रंगरंगोटी शिवाय तुझ्यासमोर उभी आहे
तिच्या बरोबर तिचे बातमीदारही नसतील,
छायाचित्रकार नसतील आणि सह्या मागणाऱ्यांच्या झुंडी ही नसतील.
ती बिचारी त्या अंधार्‍या पोकळीला एकटीच सामोरी जात असेल.
तिला म्हणे ती चर्चमधे नागडी गेली असे स्वप्न पडले होते.
गर्दीची मस्तके चुकवत ती चोरपावलांनी चालत होती.
अर्थात तुला स्वप्नांचे अर्थ कोणापेक्षाही चांगले समजतात म्हणा !
चर्च काय, घर काय, आणि गुहा काय, गर्भाशयाएवढेच सुरक्षित असतात…
पण गर्भाशयात अजून वेगळे काहीतरी असतेच..
खाली लोटांगण घालणारे तिचे चाहते होते हे निश्चित.
अंधारात चाललेली प्रार्थना…
पण हे चर्च २० सेन्ट्युरी फॉक्सचा स्टुडिओ नाही..
हे संगमरवरी आणि सोन्याने मढव लेले मंदीर 
तिचे शरीर आहे.
ज्याच्यात तुझा पुत्र हातात आसूड घेऊन उभा असतो
आणि स्टुडिओच्या मालकांना हाकलतो.
हाच तो,
जो तुझ्या प्रार्थना मंदिराला चोरांचा अड्डा बनवतो.

परमेश्र्वरा !
पापाने आणि किरणोत्सराने बरबटलेल्या या जगात,
दोष या मुलीचा आहे असे तू खचितच म्हणणार नाहीस.
तिचा दोष असेल तर इतकाच,
दुकानात काम करणार्‍या सामान्य मुलींसारखे
तिलाही सिनेतारका व्हायचे होते.
तिची स्वप्ने सत्यात उतरली पण इस्टमन कलरमधे .
आम्ही तिला जी संहिता दिली त्याप्रमाणे तिने भूमिका केल्या.
आमच्याच आयुष्याचा कथा त्या. सगळ्याच विचित्र.
या ‘२० सेंचुरी’ मधे आमच्या अचाट नाटकासाठी,
परमेश्वरा ! 
तिला क्षमा कर आणि आम्हालाही क्षमा कर.
तिला बिचारीला प्रेमाची भूक लागली होती
आणि आम्ही तिला झोपेच्या गोळ्या देत होतो.
आम्ही काही संत नाही, 
तिच्या मनस्वी दुःखासाठी तिला मानसोपचारतज्ञाकडे आम्ही पाठवले.
तिला कॅमेऱ्याची भिती वाटू लागली आणि
रंगरंगोटीचा द्वेष. – प्रत्येक एंट्रीला ती नवीन रंगरंगोटी करु लागली.
तिच्या मनात आग धुमसत होती आणि
तिला स्टुडिओत रोजच उशीर होऊ लागला.
चित्रीकरणातही ती प्रणय दृष्यात डोळे मिटायची
डोळे उघडल्यावर तिला कळायचे ती प्रखर प्रकाशात उभी आहे.
ते प्रखर दिवे बंद केल्यावर ते तिचे घर पाडायचे.
अर्थात ते त्या सेटवरचे असायचे.
एखाद्या बोटीसारखे ती सिंगापूरला एक चुंबन घ्यायची, तर रिओमधे नाचायची
ड्युकच्या प्रासादांत मेजवानीसाठी हजेरी लावायची.
बिचारीच्या छोट्या घरातून हे सगळे तिला दिसायचे.
तिच्या अखेरचा चित्रपट शेवटच्या चुंबनाशिवायच संपला.
तिच्या बिछान्यावर ती मेलेली आढळली.
तिच्या हातात दूरध्वनी लोंबकळत होता.
ती कुणाला फोन करणार होती हे जगाला कधीच कळले नाही.
एखाद्याने जवळच्या मित्राला फोन करावा आणि ऐकू यावे
‘राँग नं’’ तसेच !
किंवा गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेला 
जसा नेमका बंद पडलेल्या फोनपाशी पोहोचतो तसे !

परमेश्वरा !
ज्याला तिला फोन करायचा होता
त्याला ती फोन करु शकली नाही. कदाचित तो कोणीच नसेल,
किंवा तो क्रमांक डिरेक्टरीत नसेल, काय माहीत!
पण तो फोन तू घ्यावास 
एवढीच प्रार्थना आहे…..

कवि: अर्नेस्तो कार्देनाल
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.

Posted in कविता | 2 Comments

वैद्यराज

…. एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले. गावातील परंपरागत चालत आलेली वैद्यकी ते समर्थपणे चालवत होते असे त्यांच्या एकंदरीत अवतारावरून वाटत होते खरे.. माणूस तसा आढ्यतेखोर वाटला. त्यांनी सराईतपणे माझी नाडी तपासली व त्यांच्या पठडीतील नेहमीची औषधे दिली. चूर्ण व कसलातरी कपाळाला लावण्यासाठी लेप ! त्यांनी माझ्या यजमानांनी दिलेली नोट खिशात सारली व निर्विकारपणे मान वळवली. ते निघणार तेवढ्यात त्यांच्या मनात काय आले कोणास ठावूक. त्यांनी माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. कदाचित त्यांना गप्पा मारण्यासाठी सुशिक्षित माणूस त्या छोट्या गावात भेटला याचे अप्रूप असावे. माझ्या तापामुळे मलाही रात्री झोप लागेल का नाही याची शंकाच होती म्हणा. मी ही स्वार्थी विचार करून बोलणे वाढवले. थोड्याच वेळात यजमानांनी आतून चहा मागवला व आमची गप्पांची मैफील जमली. वैद्यराज आता मोकळेपणाने गप्पा मारू लागले. मला वाटले तसा माणूस आढ्यतेखोर नव्हता. आपण उगाचंच एखाद्या माणसाची तो दिसतो कसा याची परीक्षा करतो आणि आपला गैरसमज करून घेतो. माणूस तसा गप्पिष्ट होता आणि त्याच्या बोलण्याला थोडीशी विनोदाची झालर होती. रंगात आले की ते कोटाच्या खिशातून चांदीची तपकिरीची डबी काढत व एक चिमूट नाकपुडीत कोंबत.

हे जग विचित्र आहे.कधी कधी तुम्ही ज्यांच्या बरोबर आयुष्य काढता त्यांच्याशी तुम्ही किंवा ते तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत तर कधी कधी एखादा अनोळखी माणूस पाच दहा मिनिटातच मनमोकळेपणाने, मोठ्या विश्वासाने त्याचे मन तुमच्यापाशी मोकळे करतो. वैद्यराजांना माझ्यापाशी आपले मन मोकळे करावेसे का वाटले हे एक गूढच आहे. कदाचित अनोळखी माणसाचे उपद्रवमूल्य कमी असल्यामुळे असे घडत असावे, काय माहीत ? गप्पा खूपच रंगल्या आणि गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना मला सांगितली. घटना तशी साधी पण…. असो, मी त्यांच्याच शब्दात तुम्हाला सांगतो…

… तुम्हाला उदगीरचे प्रसिद्ध देशमुख वकील माहीत आहेत का ? शक्यता कमीच आहे पण यांना माहीत असतीलच. त्यांनी माझ्या यजमानांकडे बोट दाखवून म्हटले. पण माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. तर काय सांगत होतो, मला लख्ख आठवतंय, मी त्यावेळी त्यांच्याकडेच त्यांच्या भोकरच्या वाड्यावर बसलो होतो. त्या वेळेसही हिवाळा होता आणि रात्री थंडगार तर दिवसांना उन भाजून काढत होते. मी देशमुखांकडे त्यांच्याबरोबर रमी खेळत बसलो होतो. तसा इथे फारसा उद्योग नसतो. कोणालाच ! ते हसून म्हणाले. तेवढ्यात अचानक एका नोकराने मला बाहेर कोणाचा तरी नोकर आपल्यासाठी आलाय असे सांगितले. (त्यांना वारंवार अचानक हा शब्द वापरण्याची सवय होती आणि तो उच्चारताना ते स्वतःच दचकल्या सारखा अविर्भाव करायचे..हेही माझ्या लक्षात आलं)

‘‘कोण आहे ?’’ मी त्रासिक चेहऱ्याने विचारले.

‘‘दरवान म्हनतोय त्याने कोनाची तर चिठ्ठी आनली आहे, साहेब एखाद्या पेशंटची असंल’’

‘‘ घेऊन ये ती चिठ्ठी’’ मी म्हणालो.

कुठल्यातरी पेशंटकडून ती चिठ्ठी आली होती. आता उठणे भागच होते. शेवटी अन्नदात्याचीच चिठ्ठी ती… एका विधवेची होती. ‘ माझी मुलगी मरायला टेकली आहे कृपा करून ताबडतोब निघून या. तुमच्यासाठी गाडी पाठवली आहे.’ ते ठीक होतं हो पण ती बाई वाड्यापासून जवळजवळ दहा एक मैल दूर होती. बाहेर अंधार दाटला होता आणि रस्त्याची हालत इतकी खराब होती की विचारूच नका. तिने पाठवलेल्या बैल गाडीची अवस्था पाहिल्यावर मला खात्री पटली की त्या बाईची परिस्थिती तशी बेताचीच असणार. क्षणभर जाण्यात काही लाभ आहे का असा विचार माझ्या मनाला आला हे मी नाकबूल करीत नाही. तसा विचार माझ्या मनात आला हे मी प्रामाणिकपणे सांगतो. ‘एक दोन रुपये मिळाले तरी खूप झाले.. कदाचित धोतर किंवा एखादी वस्तूही मिळेल फी म्हणून ’ मी मनात म्हटले. पण शेवटी माझ्यातील कर्तव्य भावनेने माझ्या स्वार्थी विचारांवर मात केली.. कर्तव्य बाबांनो कर्तव्य ! तुम्ही हसताय पण लक्षात घ्या माझ्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाच्या मनात प्रथम दोन वेळच्या अन्नाचा विचार येतो. मी टेबलावर पत्ते फेकले व देशमुखांना म्हणालो,

‘‘या बैलगाडीने गेलो तर दोन आठवड्याने पोहचेन. मी घरी जातो, औषधाची पोतडी भरतो तोपर्यंत तुम्ही महादूला तुमचा घोडा घेऊन पाठवाल का?’’ आमचे देशमुख म्हणजे भला माणूस आणि बहुधा त्यांना ते कुटुंबही माहीत असावे.’’

‘‘जावा तुम्ही बिनघोर! महादू येईल घोडा घेऊन. पण त्याला लगेचच परत पाठवा. उद्या त्याला उदगीरला जायचंय…’’ देशमुख म्हणाले.

मी त्या गाडीवानाला परत जाण्यास सांगितले आणि घाईघाईने घरी गेलो. आवश्यक वाटली तेवढी लेप, औषधे इ. पिशवीत भरली. महादू अचानक घोड्यावरून अवतरला. घोड्याच्या दुडक्या चालीने शेवटी आम्ही त्या घरापाशी येऊन पोहोचलो. ते आमची वाटच पाहात होते. आमचे स्वागत एका वयस्कर, गोर्‍यापान, सुंदर पण प्रेमळ वाटणार्‍या बाईंनी केले.

‘‘ वाचवा तिला ! ती वाचेल असं मला वाटत नाही’’ ती स्फुंदत स्फुंदत म्हणाली.

‘‘शांत व्हा ! कुठंय पेशंट?’’ मी तिची समजूत काढत विचारले.

‘‘ या इकडे या डॉक्टर !’’ ती मला डॉक्टरच म्हणाली याची मला क्षणभर मौज वाटली. नंतर ती मला याच नावाने संबोधित करत होती..

तिच्या मागून गेल्यावर माझ्या नजरेस एक स्वच्छ छोटी खोली पडली. कोपर्‍यात एक मंद दिवा तेवत होता आणि मधे एका पलंगावर साधारणतः वीस वर्षाची युवती ग्लानीत पहुडली होती. बिचारी तापाने फणफणली होती. तिचा श्वास अनियमित होत चालला होता. खोलीत अजून दोन मुली होत्या. त्या तिच्या बहिणी होत्या.त्याही त्या मुलीची अवस्था पाहून रडत होत्या.

‘‘ कालपर्यंत ती अगदी ठणठणीत होती. व्यवस्थित जेवलीही.सकाळी उठल्यावर तिने डोके ठणकतंय अशी तक्रार केली आणि संध्याकाळपर्यंत बघा तिची अवस्था काय झाली आहे….’’ रडत रडत त्यातील एक मुलगी म्हणाली.

‘‘ काळजी करू नका.’’ मी समजुतीच्या स्वरात म्हणालो. ‘‘शेवटी तिला बरं करणे हे आमचे कर्तव्यच आहे! असं म्हणून मी तिच्या पलंगापाशी गेलो. तिची नाडी तपासली आणि ताबडतोब ताप निवारक लेप लावण्यास सांगितले. काही चूर्णही दुधातून देण्यास सांगितले. इतका वेळ माझे त्या मुलीकडे लक्षच गेले नव्हते. पण आता औषधोपचार सुरु झाल्यावर मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले. पाहिले आणि काय सांगू… माझ्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. इतका सुंदर चेहरा मी माझ्या आयुष्यात आजवर पाहिलेला नव्हता. सौंदर्याची परिसिमाच होती म्हणा ना! तापामुळे तिचा गोरापान चेहरा फिक्कट पडला होता. त्यामुळे ती अधिकच गोरीपान दिसत होती. लेपामुळे चेहरा घामेजला होता आणि तिच्या रेखीव भुवयांवर घामाचे बिंदू जमा झाले होते. पण माझ्या मनात भरले ते तिचे सुंदर डोळे आणि तिच्या लांबसडक श्रांतपणे मिटलेल्या पापण्या.. तेवढ्यात तिने पापण्यांची मोहक हालचाल केली आणि डोळे उघडले. बाजूबाजूला नजर फिरवत तिने क्षीणपणे तिचे ओठ विलग केले. आपला हात स्वतःच्या चेहर्‍यावरून फिरवला… तिच्या बहिणींनी लगेचच तिच्या पलंगापाशी धाव घेतली..

‘‘ कशी आहेस आता ?’’ त्यांनी विचारले.

‘‘ठीक आहे !’’ एवढे बोलून तिने मान फिरवली व परत डोळे मिटले.

‘‘मला वाटतं आता पेशंटला एकटे सोडलेलं बरं !’’ मी म्हणालो. आम्ही सगळे हळूवार पावलांनी त्या खोलीबाहेर पडलो. बाहेरच्या खोलीत एका चुलीवर चहाचे भांडे उकळत होते. त्यांनी मला चहा दिला आणि केविलवाण्या आवाजात मी आजची रात्र तेथे राहेन का हे विचारले. मी तरी एवढ्या रात्री कुठे जाणार होतो ? मी ताबडतोब होकार दिला. अर्थात मी तेथे राहाण्याचे कबूल केले त्याला माझ्या पेशंटचे सौंदर्यही कारणीभूत होते हे नाकारण्यात अर्थ नाही. ज्या आजीने आमचे स्वागत केले होते ती सारखी स्फुंदत स्फुंदत ती जगेल का याची चौकशी करत होती.

‘‘कशाला रडताय आजी? ती जगणार आहे… रात्रीचे दोन वाजले.. मी तर म्हणतो आता तुम्ही जरा पडा आणि विश्रांती घ्या नाहीतर माझ्यावर तुमच्यावरच उपचार करण्याची वेळ यायची…’’ मी चेष्टेने म्हटले.

‘‘पण काही लागले तर उठवाल ना तुम्ही मला?’’

‘‘ हो ! हो ! काही काळजी करु नका’’ मी म्हणालो. त्या दोन मुलीही त्यांच्या खोलीत गेल्या. जाण्याअगोदर त्यांनी तेथेच पेशंटच्या खोलीच्या बाहेर एका पलंगावर माझा बिछाना घातला. मी बिछान्यावर पडलो पण माझा डोळा लागेना. खरे तर मी धावपळीने दमलो होतो पण माझ्या डोळ्यासमोर सारखा तो सुंदर चेहरा उभा राहू लागला. माझा पेशंट माझ्या डोक्यातून जाई ना ! शेवटी माझ्या विचारांना शरण जाऊन मी ताडकन उभा राहिलो आणि म्हटलं ‘जरा बघून येऊ तिच्याकडे.’ मी हळुवारपणे तिच्या खोलीचा दरवाजा आत लोटला. एका खुर्चीवर मोलकरीण तोंड उघडे टाकून मंदपणे श्वास घेत झोपली होती. तीही बिचारी दमली असणार ! दरवाज्याची चाहूल लागताच तिने अचानक डोळे उघडले आणि माझ्याकडे रोखून पाहिले.

‘‘कोण आहे? कोण आहे?’’ तिने विचारले.

‘‘घाबरू नका ! मी डॉक्टर आहे आणि तुला आता कसं वाटतंय हे पहायला आलोय !’’

‘‘तुम्ही डॉक्टर आहात का ?’’ तिने विचारले.

‘‘हो ! तुमच्या आईने मला बोलावणे पाठवले होते. आता मी औषध दिलंय आणि देवाच्या कृपेने एक दोन दिवसात तुम्ही हिंडू फिरू लागाल.’’

‘‘ मला मरायचे नाही डॉक्टर.. मला मरायचं नाही… कृपा करा…’’

‘‘तुम्ही असं काय बोलताय.. माझ्यावर विश्वास ठेवा..’’ मी म्हटले खरे पण ती परत ग्लानीत गेली. मी परत तिची नाडी तपासली. तिला परत ताप चढला होता. माझा हात लागताच तिने परत माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले..

‘‘मला इतक्यात मारायचं नाही. का ते मी तुम्हाला सांगते. सांगते मी…’’ ती बरळली.

‘‘मी सांगते पण कोणाला सांगू नका… सांगू नका.’’ असे म्हणून ती काहीतरी पुटपुटू लागली. ती इतकी भरभर बोलत होती मला त्यातील एक शब्दही समजत नव्हता. तेवढ्याशा श्रमाने ही ती दमली. तिने थकून उशीवर डोके टाकले व खुणेने मला सांगू लागली. तिने ओठावर बोट ठेवले.. ‘‘ कोणाला सांगू नका’’ या अर्थाने !
मी कसंबसं तिला शांत केले. तिच्या मोलकरणीला उठवले आणि खोलीबाहेर आलो.

(या वेळी वैद्यराजांनी खिशातून तपकिरीची डबी काढली व चिमूटभर तपकीर आपल्या नाकात कोंबली. त्या तपकिरीचा त्यांच्यावर थोडा परिणाम झालेला दिसला.)

‘‘दुसर्‍या दिवशी माझ्या औषधांचा अपेक्षित परिणाम मला दिसला नाही. तिची तब्येत अजूनच खालावलेली दिसली. आता काय करावे हा विचार करून करून मी दमलो. शेवटी मी अचानक तिला बरे वाटेपर्यंत तेथेच मुक्काम टाकण्याचा निर्णय घेतला. खरे तर माझे इतरही रुग्ण माझी वाट पहात होते. माझ्या सारख्या गरीब वैद्याला इतर गिऱ्हाईकांना दुखवून चालणार नव्हते तरीपण मी हा निर्णय घेतला कारण तिची प्रकृती गंभीर होती. आणि अगदी प्रामाणिकपणे खरं सांगायचं तर मला आता तिच्याबद्दल ओढ वाटू लागली होती. शिवाय मला ते सगळे कुटुंबच आवडायला लागले होते. त्या घराची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच दिसत होती पण ते कुटुंब सुशिक्षित होते. त्या घराचा कर्ता पुरुष पुण्यामुंबईकडे कुठल्याशा कॉलेजमधे प्रोफेसर होता म्हणे, पण त्यांचा मृत्यू अर्थातच दारिद्र्यात झाला असावा. त्यांनी त्यांच्या मुलींना चांगले शिकवलेले दिसत होते. घर पुस्तकांच्या कपाटांनी भरले होते पण त्याने पोट भरत नाही हे त्यांच्या लक्षात आले नसावे. त्यांनी मागे सोडले ती पुस्तके आणि हे दारिद्र्य. मी त्या मुलीची काळजी फारच आस्थेने घेत असल्यामुळे ते घर माझ्याकडे आपुलकीने पाहात होते असे आता मी म्हणू शकतो… बरं ते घर इतक्या आडवाटेला होते की औषधेही वेळेवर मिळायची मारामार…. आणि या मुलीची तब्येत तर दिवसेंदिवस ढासळत होती..दिवसेंदिवस ढासळत होती.

(ते क्षणभर बोलायचे थांबले. त्यांनी परत तपकीर ओढली आणि चहाचा एक घोट घेतला)

‘‘आता लपविण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला स्पष्टच सांगतो..पण कसं सांगावं हे मला कळत नाही. माझा पेशंट.. कसं सांगू, मला वाटलं माझा पेशंट माझ्या प्रेमात पडला होता. पण माझी खात्री होत नव्हती. खरेच पडली होती का ती माझ्या प्रेमात? का काही वेगळीच भावना होती तिच्या मनात? उपकाराची भावना तर नव्हती? कसं सांगू… (या येथे वैद्यराजांनी खाली जमिनीकडे नजर लावली. त्यांचा चेहरा लाल झाला..)

‘‘.. नाही प्रेमच होते ते. माणसाने स्वतःचे महत्त्व वाढवू नये हे उत्तम. पण मला वाटते ती माझ्या प्रेमातच पडली होती. ती सुशिक्षित होती. तिचे वाचन दांडगे होते आणि मी संस्कृत ही विसरत चाललो होतो. दिसण्याबद्दल बोलाल तर.. (येथे वैद्यराजांनी स्वतःकडे नजर टाकली) त्यात आमची तुलनाच होऊ शकत नाही. पण परमेश्वराच्या कृपेने मी मूर्ख नाही आणि मला समोरच्याच्या मनात काय चालले आहे हे चांगले उमजते. जरा विचार केल्यावर मला समजले की सरस्वती दांडेकर माझ्या प्रेमात पडली नव्हती तर तिच्या मनात माझ्याबद्दल मित्रत्वाची भावना होती. हो! सरस्वती दांडेकर नाव होते तिचे. अगदी मित्रत्वाची भावना नसेलच तर माझ्याबद्दल तिच्या मनात उपकारकर्त्याबद्दल जी भावना असते ती होती. कदाचित तिलाही प्रेम आणि ही भावना यात फरक करता येत नसावा. आता या सगळ्यात तुमचा गोंधळ उडाला तर मी तुम्हाला दोष देणार नाही. जरा विचारात वहावत गेलो मी ! मी जरा सगळे संगतवार सांगतो तुम्हाला.

( असे म्हणून त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि खालच्या आवाजात पुढे सांगण्यास सुरुवात केली.)

‘‘ हं ऽऽऽ तर मी कुठपर्यंत आलो होतो बरं… तिची प्रकृती ढासळत चालली होती. तुम्ही वैद्यकीय पेशात नाही म्हणून तुम्हाला कल्पना यायची नाही. वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो आणि रुग्णाची प्रकृती मात्र ढासळत असते. रोगावर विजय मिळवताना त्याच्या जिवाची कशी घालमेल होते याची तुम्हाला कशी कल्पना येणार? त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. क्षणभर तुम्हाला तुमचा अनुभव सोडून जातोय की काय असे वाटते. काही आठवत नाही आणि त्याच वेळी रुग्णाचा तुमच्यावरचा विश्वास उडू लागतो. मोठ्या नाखुषीनेच तो त्याला काय होतंय हे सांगत असतो. ते कळल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्याचवेळी तुमची हतबलता पाहात रुग्णाचे नातेवाईक हताश होत असतात. फारच भयंकर प्रसंग असतो तो.. तुम्ही विचार करत असता, ‘ या रोगावर काहीतरी औषध असलेच पाहिजे.. मग तुम्ही एका मागून एका औषधाचा मारा करून पाहाता. तुमचा इतका गोंधळ उडतो की तुम्ही औषधांना परिणाम करण्यासाठी पुरेसा अवधीही देत नाही. मग तुम्ही तुमचे वैद्यकीय ग्रंथ उलथेपालथे करता.. क्षणभर तुम्हाला वाटते.. हं ऽऽ मिळाला एकदाचा रामबाण उपाय पण दुसर्‍याच क्षणी तुमच्या लक्षात येते की नाही हे ते औषध असूच शकत नाही. कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे.. ही जबाबदारी मी एकटा घेऊ शकत नाही… असे विचार तुमच्या मनात डोकावू लागतात. एखाद्या औषधाचा एक गुणधर्म पकडला तर दुसरा एखाद अलगद तुमच्या पकडीतून सुटतो. मग कधी कधी तुम्ही एखादा उपचार नक्की करता आणि दैवाच्या भरवशावर सगळे सोडण्याचा निर्णय घेता.. पण इकडे तुमचा रुग्ण शेवटच्या घटका मोजत असतो. कदाचित तो रुग्ण मरतो पण त्याला तुम्ही जबाबदार नसता कारण तुम्ही विचारपूर्वक, शास्त्रानुसार उपचार केलेला असतो. असा सगळा गोंधळ उडतो. पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे तुमच्यावर लोकांनी कसलाही विचार न करता विश्वास टाकलेला असतो आणि तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरत नाही ही भावना तुम्हाला छळते तेव्हा. तुमच्या जिवाची घालमेल होत असते. या सरस्वतीच्या कुटुंबाने हा असाच विश्वास माझ्यावर टाकला होता. ते माझ्यावर विश्वास टाकून निर्धास्त झाले होते आणि त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे हे विसरले होते. मी ही माझ्या बाजूने त्यांना आशा दाखवत होतो पण खरे सांगायचे तर मी मनातून खचलो होतो. अडचणीत भर म्हणून औषधे आणण्यासाठी जो माणूस गेला होता त्याचा अजून पत्ताच नव्हता. मी पेशंटच्या खोलीतून बाहेरच आलो नव्हतो. मी तिला गोष्टी सांगितल्या, तिच्याबरोबर पत्ते खेळलो. रात्री मी तिच्या पलंगाशेजारी बसून असे. तिची आई डोळ्यात पाणी आणून माझे सारखे आभार मानत होती पण मी मात्र मनातल्या मनात म्हणत असे, ‘‘मी तुमच्या विश्वासाला पात्र नाही…’’ मी आता प्रामाणिकपणे कबूल करतो की मी माझ्या पेशंटच्या प्रेमात पडलो होतो कारण आता ते लपविण्यात तसा अर्थ नाही. सरस्वतीला मी आवडू लागलो होतो. बर्‍याच वेळा ती इतरांना खोलीबाहेर जाण्यास सांगायची आणि माझ्याशी गप्पा मारत बसायची. ती मला प्रश्न विचारायची. मी कुठे राहातो, माझे शिक्षण कुठे झाले, माझ्या घरात कोण कोण आहे…असे अनेक प्रश्न. तिने असे सतत बोलणे योग्य नव्हते पण मी तिला थांबवू शकलो नाही हेही खरंच आहे. कधी कधी ती डोळे मिटायची आणि मी माझे डोके हातात धरुन स्वतःला विचारायचो, ‘‘ अरे नराधमा काय करतो आहेस हे तू?’’ पण ती कधी कधी माझा हात हातात घ्यायची आणि माझ्याकडे रोखून पाहायची. मग मान वळवायची, निःश्वास टाकायची आणि म्हणायची,

‘‘तुम्ही एक चांगले आणि प्रेमळ माणूस आहात.. आमच्या शेजाऱ्यांसारखे नाही. तुमची ओळख आधी का नाही झाली?’’

‘‘सरस्वती शांत हो ! सगळं ठीक होणार आहे. तू परत हिंडू फिरू लागणार आहेस ! माझ्यावर विश्वास ठेव.’’

(त्यांनी त्यांचे डोळे बारीक केले, थोडासा विचार केला आणि म्हणाले),

‘‘त्यांचे शेजारच्यांशी विशेष संबंध नव्हते हेही सांगितले पाहिजे. त्यांचे शेजारी अडाणी होते आणि त्यांचे आणि या सुसंस्कृत कुटुंबाचे संबंध जुळणे शक्यच नव्हते आणि इतर श्रीमंत घरांशी लाचार होऊन संबंध ठेवणे हे त्या कुटुंबाला शक्य नव्हते. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ते एक अत्यंत सुशिक्षित, घरंदाज व सुसंस्कृत कुटुंब होते. त्यांच्याशी माझा संबंध आला हे मी माझे भाग्य समजतो. ती फक्त माझ्या हातून औषध घेई. तिला उठताही येत नसे मग माझ्या आधाराने ती उठून बसती होत असे. ती माझ्याकडे प्रेमाने रोखून पाही आणि माझ्या हातातून औषध घेई. बिचारी! तिला तसे पाहताना माझ्या ह्रदयात कालवाकालव होई… तिची तब्येत आता खालावत चालली होती. कुठल्याही क्षणी ती मरेल असे मला वाटत होते. नव्हे तिच्या वेदना पाहून लवकर मरावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करू लागलो. माझ्या मनात असे विचार घोळत असताना तिची आई आणि बहिणी मात्र माझ्याकडे आशेने पाहात..

‘‘ कशी आहे ती आता?’’ पण त्यांच्या प्रश्नात जीव नव्हता.

‘‘ठीक आहे ! ठीक आहे ! ’’ पण माझ्या उत्तरात ही काही दम नव्हता.

एके रात्री मी माझ्या पेशंट बरोबर तिच्या खोलीत बसलो होतो. ती मोलकरीण ही तेथेच एका खुर्चीत बसून डुलक्या काढत होती. पण त्यासाठी मी तिला दोष देणार नाही. तिचीही सरस्वतीच्या आजारपणात दमछाक झाली होती. त्या रात्री सरस्वती दांडेकरांची तब्येत फारच ढासळली होती. सारखी तळमळत कूस बदलत ती उसासे सोडत होती. शेवटी दमून ती निपचित पडली. कोपर्‍यात देवाऱ्ह्यात निरांजन मंद तेवत होते. तेथेच खाली एका टेबलावर खिडकीतून येणाऱ्या वार्‍याच्या मंद झुळकीने भगवद्‌गीतेची पाने फडफडत होती. मी तेथेच पलंगाला डोके टेकले. बहुधा मलाही डुलकी लागली असावी. अचानक कोणीतरी मला बाजूला हळूवारपणे स्पर्श करतंय असा भास झाला. मी वळून पाहिले तर सरस्वती माझ्याकडे टक लाऊन पहात होती. तिचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी विलग झाले होते आणि गाल तापाने फणफणल्यामुळे लालबुंद झाले होते. तिने खुणेनेच मोलकरणीला बाहेर जाण्यास सांगितले.

‘‘डॉक्टर खरं सांगा मी मरायला टेकली आहे का ? कृपा करा आणि मी जगणार आहे हे मला सांगू नका.

‘‘सरस्वती ऐक…’’ मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे बोलणे मधेच तोडले.

‘‘दया करा आणि मला खरं काय ते सांगा. मला खोटी आशा लाऊ नका. मी मरणार आहे हे एकदा निश्चित झाले की मी तुम्हाला सगळं सांगण्यास मोकळी झाले. मी तुमच्या पुढे पदर पसरते, जे काही खरं आहे ते सांगा. मी मुळीच झोपले नव्हते. मी इतका वेळ तुमच्याकडेच पाहात विचार करत होते. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही मला फसवणार नाही याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने खरं काय ते कळणे फार महत्त्वाचे आहे… सांगा…खरं काय ते सांगा. मला काय झाले आहे आणि माझ्या जिवाला धोका आहे का ?’’ ती कळवळून विचारत होती आणि आता मला ती चिडलेली वाटत होती.

‘‘सरस्वती, मी तुझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही. तुझ्या जिवावरचं संकट अजून टळलेले नाही पण परमेश्वरावर विश्वास ठेव तो तुला यातून सुखरूप बाहेर काढेल.

‘‘म्हणजे मी मरणार आहे ! मरणार आहे मी !’’ ते ऐकून मला क्षणभर वाटले की तिला याचा आनंद होतो आहे की काय! तिचा चेहऱ्यावरही अचानक तेज झळकले आणि मी सावध झालो. हे लक्षण काही ठीक नव्हते..

‘‘सरस्वती घाबरू नकोस…’’ मी समजुतीच्या स्वरात म्हणालो.

‘‘छे ! छे ! मी मरणाला अजिबात घाबरत नाही. पण आता मला जे सांगायचे आहे ते मी मनमोकळेपणाने सांगू शकते. माझ्यासाठी तुम्ही जे काही केले, त्यासाठी मी तुमची आभारी आहे. ‘तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही’ असं म्हणण्यात आता अर्थ नाही. माझा तुमच्यावर जीव जडला आहे. माझे प्रेम आहे तुमच्यावर.’’
मी भारावून तिच्याकडे पाहत राहिलो. तुम्हाला खरेच सांगतो ते ऐकून मला काही सुचेना.

‘‘ऐकलं का? मी तुमच्यावर प्रेम करते…’’ मी तुझ्या योग्यतेचा नाही असं मी म्हणणार तेवढ्यात तिने माझे डोके तिच्या थरथरत्या हातात धरले आणि माझ्या कपाळाचे हळूवारपणे चुंबन घेतले. माझ्या तोंडातून अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. खरं सांगतो. मी गुडघ्यावर बसलो आणि पलंगावरच्या उशीत माझे डोके घुसळले. ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिची बोटे हळूवारपणे माझ्या केसातून फिरवत, ती मुक्तपणे अश्रू ढाळत होती. मी तिला शांत करण्याच्या नादात काय काय बडबडलो देवाला माहीत.’’

‘‘तू सगळ्यांना जागं करशील! जरा हळू बोल..’’ मी म्हटले.

‘‘ बास करा ! कोणाला काय वाटायचं ते वाटू देत. त्याने आता काही फरक पडत नाही. मी मरायला टेकले आहे. आणि तुम्ही कशाला आणि का घाबरताय? खाली मान घालण्याची गरज नाही…’’ ती तारस्वरात जवळजवळ किंचाळलीच. ‘‘ हंऽऽऽ कदाचित तुमचे माझ्यावर प्रेम नसेल.. तुम्ही मला त्या योग्यतेची समजत नसाल. तसं असेल तर मला क्षमा करा.’’

‘‘सरस्वती काय म्हणतेस तू? मलाही तू आवडतेस, मीही प्रेम करतो तुझ्यावर…’’

तिने डोळे विस्फारून माझ्या डोळ्यात पाहिले. पुढच्याच क्षणी तिने मला तिच्या बाहूपाशात कवटाळले व माझ्यावर चुंबनांचा वर्षाव केला. मी प्रामाणिकपणे सांगतो त्या क्षणी मला वेड लागायचेच बाकी होते. मला वाटले ही आता मरणार. बहुतेक ती तापाच्या ग्लानीत काय वाटेल ती बडबडत होती. हा विचार माझ्या मनात आल्यावर मी सावरलो. विचार करू लागलो. जर आज ती मरणाच्या दारात उभी नसती तर तिच्या मनात माझ्याबद्दल हीच प्रेमभावना जागृत झाली असती का? हा प्रश्न स्वतःला दोनदा विचारल्यावर अंतर्मनातून त्याचे उत्तर नकारार्थी आले. वयाच्या विसाव्या वर्षी प्रेमाचा अनुभव न घेता या जगातून निघून जायचे ही कल्पनाच तिला छळत असावी बहुधा आणि म्हणूनच कदाचित ती कळत न कळत माझ्या प्रेमात पडली असावी… समजले का तुम्हाला मी त्या वेळी काय विचार केला ते ? पण त्यावेळेस मात्र तिने मला घट्ट मिठी मारली होती आणि ती मला सोडत नव्हती.

‘‘सरस्वती ऽऽ सोड मला दया कर माझ्यावर आणि स्वतः वरही. कोणी पाहिले तर काय म्हणतील तुझ्या घरचे ! जरा विचार कर. ’’

‘‘का ? मरणाच्या दारात उभे असलेल्यांनी कसला विचार करायचा? मी जर यातून जगले असते तर या मिठीची कदाचित मला माझीच शरम वाटली असती. पण आता का म्हणून मला शरम वाटावी..’’

‘‘अरे पण कोण म्हणतंय की तू मरणार आहेस म्हणून!.’’ मी म्हटले पण माझा आवाज फसवा होता.

‘‘तुम्ही मला फसवू शकत नाही. तुम्ही कोणालाच फसवू शकत नाही. तुमचा चेहराच सांगतोय खरं काय आहे ते….’’

‘‘सरस्वती तू बरी होणार आहेस… मी तुला बरं करणार आहे.. तू तुझ्या आईच्या आशिर्वादावर विश्र्वास ठेव बरं ! तू बरी झाल्यावर आपण परत एकत्र येणार आहोत आणि सुखाने जगणार आहोत.’’ मी म्हणालो.

‘‘नाही आता मला जगायचंच नाही. तसं मला वचन द्या !’’ माझ्यासाठी हा सगळा दैवाचा निष्ठूर खेळ होता. माझ्या पहिल्याच प्रेमाची अशी वाताहात लागली होती. तिने तेवढ्यात माझे नाव विचारले.

‘‘जनार्दन !’’ मी सांगितले. तिने ते ऐकले आणि मंदपणे हसत स्वतःशीच काहीतरी पुटपुटली. बहुधा त्याचा अर्थ असावा. हं ऽऽऽ ती आख्खी रात्र मी तिच्या मिठीत घालवली. पहाटेच मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो. सकाळी, उजाडल्यावर मी तिच्या खोलीत परत डोकावले. त्या पलंगावर पडलेला हाडाचा सापळा पाहून मी चरकलो. मी ओळखलंच नाही तिला. तीन दिवसात कशी झाली होती तिची अवस्था! मी त्या प्रसंगाला कसे तोंड दिले हे आज माझे मलाच कळत नाही. तीन दिवस आणि तीन रात्री माझ्या पेशंटचा जीव अजूनही या जगात घुटमळत होता. शेवटच्या रात्री मी तिच्या जवळ बसलो होतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो की देवा रे! सोडव तिला या यातनांतून आणि जमल्यास मलाही. अचानक तिची आई तेथे आली. मी तिला आदल्या रात्रीच ती वाचण्याची शक्यता फार कमी आहे हे सांगितले होते. सरस्वतीने जेव्हा तिच्या आईला पाहिले तेव्हा ती म्हणाली,

‘‘बरं झाले तू आलीस ते. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांना लग्नाचे वचन दिले आहे.’’

‘‘डॉक्टर काय म्हणते आहे ती ? खरंय का हे?’’ तिच्या आईने मला खडसावून विचारले. ते शब्द कानात शिरताच मी खडबडून जागा झालो. माझ्या मनात राग, संताप, स्वाभिमान, करुणा अशा अनेक भावनांचा डोंब उसळला. मी झटक्यात उत्तर दिले,

‘‘ती तापात बरळत आहे. तिला ती काय बोलते आहे त्याची शुद्ध नाही…’’

‘‘अरेच्चा तुम्ही काही क्षणांपूर्वी वेगळेच बोलत होतात आणि तुम्ही माझी अंगठी ही घेतलीत ना ! माझी आई प्रेमळ आहे आणि तिला सगळे समजते.. आपल्याला उदार अंतःकरणाने ती क्षमा करेल आणि आपल्या विवाहास मुळीच आक्षेप घेणार नाही. तुम्हाला खोटं बोलण्याची गरज नाही. ’’ ती तारस्वरात म्हणाली. ‘‘ मी थोड्याच वेळात मरणार आहे त्यामुळे मला खोटं बोलण्याची गरज नाही. तुमचा हात माझ्या हातात द्या.’’

ते ऐकताच मी उडी मारुन खोलीबाहेर पळालो. तिच्या आईने अर्थातच सगळे समजून घेतले असणार.

‘‘मी तुमची उत्सुकता फार काळ ताणणार नाही आणि खरं सांगायचे तर त्या प्रसंगाची आठवणही माझ्यासाठी दुःखद आहे. दुसर्‍या दिवशी माझ्या पेशंटचा मृत्यू झाला. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो!’’

पण मरण्याआधी तिने तिच्या कुटुंबियांना तिच्या खोलीत मला आणि तिला एकटे सोडण्यास सांगितले.

‘‘मला क्षमा करा. या सगळ्या गोंधळाला मीच जबाबदार आहे.. माझा आजार जबाबदार आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा मी आजवर एवढे प्रेम कुणावर केलेले नाही आणि मी आजारी पडले नसते तरी मी तुमच्यावरच प्रेम केले असते. मला विसरू नकोस आणि ती अंगठी तुझ्याकडेच ठेव.’’

वैद्यराजांनी डोळ्यातील अश्रू लपवीत तोंड फिरवले. मी त्यांचा हात पकडला.

‘‘हंऽऽऽ ठीक आहे.’’ त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला. ‘‘ आपण दुसर्‍या कुठल्यातरी विषयावर बोलू या का? का पैसे लावून रमी खेळू या? आता भावनांचा विस्फोट होणे मला परवडणारे नाही. मी नंतर एका व्यापाराच्या मुलीशी भरपूर हुंडा घेऊन लग्न केले आणि आता त्या बाईला आणि पोरांना सांभाळत उरलेले आयुष्य व्यतीत करतोय. माझी बायको तापट स्वभावाची आहे आणि तिला जर हे कळले तर आमचा संसार टिकणार नाही. हं ऽऽऽ बरं, वाटू का पाने…?
मग आम्ही रमी खेळत बसलो. वैद्यराज जनार्दन माझे दहा/वीस रुपये जिंकले आणि जिंकल्याच्या आनंदात ते पैसे खिशात टाकून घरी गेले.

मूळ लेखक : इव्हान तुर्गेनीव्ह
स्वैर अनुवाद: जयंत कुलकर्णी.

Posted in कथा | Leave a comment

वॉल्डन !

For wordpress post

नमस्कार !

मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण  २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास खालील माहितीचा उपयोग करावा.

पुस्तकाचे नाव : वॉल्डन व  हेन्री डेव्हिड थोरो यांचे संक्षिप्त चरित्र.

एकूण पाने : ४५०

किंमत : रु. ५५०. भारतात घरपोच.
Please contact me at jayantckulkarni(at)gmail(dot)com

आपला,
जयंत कुलकर्णी.

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 2 Comments

बौद्धधर्मप्रसारक…

फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

Untitled-1

गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.

Kushanmap

असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.

Coin_of_Kanishka_I

अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.

” त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,

‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’

हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहीती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,

‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’

‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’

यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.

श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.

White Horse Temple 1

भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).

पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.

हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.

पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.

काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडीतांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.

त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती.
एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.
शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.
शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.

काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.

काश्यप मातंग.

Kashyap-Matang

त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जिवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जिवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जिवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले…..

काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली…

त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’…

दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे –

या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.

कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.

महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.

लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत… तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.

धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’. हीच माहीती नंतर अनेक चिनी पुस्तकातून आपल्याला आढळते पण त्याचे मूळस्थान हेच पुस्तक आहे. धर्मरक्षाबद्दल अभ्यास करताना आपल्याला याच चरित्रात्मक पुस्तकापासून सुरवात करावी लागेल.

धर्मरक्षचे पुर्वज हे युची जमातीचे होते. हे घराणे अनेक पिढ्या मध्य एशियातील चीनच्या सीमेवर असलेल्या डुनहुआंग या शहरात रहात होते. काही तज्ञांचे म्हणणे असेही आहे की हाही मगधाचा एक ब्राह्मण होता. खरे खोटे माहीत नाही. तो कुठला होता हे महत्वाचे नसून त्याने काय काम केले हे मह्त्वाचे आहे. हे शहर म्हणजे चीनची अती पश्चिमेकडील सैन्याची वसाहत होती. (ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात). काहीच काळानंतर रेशीममार्गावरील (सिल्करुटवरील) ते एक महत्वाचे व्यापारी केंद्र झाले. येथे आठ वर्षांचा असतानाच धर्मरक्षाने आपले घरदार सोडले व एका तो मठात दाखल झाला. तेथे त्याने एका गाओझुओ नावाच्या विदेशी श्रमणाकडे आसरा घेतला व शेवटी त्यालाच आपले गुरु मानले. धर्मरक्षचा हा गुरु बहुदा भारतीय असावा. हे नाव भारतीय श्रमणाचे कसे ? तर त्याचे उत्तर हे आहे की त्या काळात भारतीय किंवा विदेशी नावांचे चीनीकरण करण्याची पद्धत सर्रास रुढ होती. या चीनी नावांमुळे खरी नवे शोधण्यास बऱ्याच इतिहासकारांना बरेच कष्ट करावे लागले हे मात्र खरे !. तर या श्रमणाकडे आसरा घेतल्यावर धर्मरक्षने खडतर मेहनत घेतली. असे म्हणतात त्या वयात तो दिवसाला दहाहजार शब्द असलेले श्लोक म्हणायचा. तो मुळचाच अत्यंत बुद्धिमान व एकपाठी होता. त्या काळात म्हणजे अंदाजे काश्यप मातंगाच्या काळात चीनच्या राजधानीत मठ, देवळे, बुद्धाची चित्रे, हिनयान पंथांचे ग्रंथ यांचा बराच बोलबाला होता पण महायान पंथाच्या सुत्रांचा अभ्यास मात्र पश्चिमी प्रदेशात होत असे. किंबहुना ही ‘‘वैपुल्य सुत्रे’’ राजधानीत माहीत असावीत की नाही अशी परिस्थिती होती. बौद्ध धर्माचे खरे तत्वज्ञान व मुक्तीचा खरा मार्ग याच पंथाच्या शिकवणीत दडलेला आहे याची खात्री असणारा धर्मरक्ष मग त्याच्या अभ्यासासाठी बाहेर पडला. त्याच्या गुरु बरोबर पश्चिमेकडील देशविदेशांच्या यात्रेस त्याने प्रारंभ केला. असे म्हणतात त्या प्रवासादरम्यान त्याने ३६ भाषांचा व लिप्यांचा अभ्यास केला व त्यात लिहिलेल्या महायान सुत्रांचा खोलवर अभ्यासही केला. (यातील अतिशयोक्ती सोडली तर त्याने किती कष्ट घेतले हे यावरुन कळते. त्या काळात एवढ्या भाषा त्या भागात बोलल्या जायच्या का नाहीत याची शंकाच आहे) हा त्यातील कुठल्याही श्र्लोकाचे उत्तमपणे विवेचन करु शकत असे.

हे सगळे ग्रंथ घेऊन मग तो चीनला पोहोचला. ‘‘डुनहुआंग’’ ते टँगची राजधानी ‘‘चँग-ॲन’’ या प्रवासात त्याने या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरु केले. त्याने ज्या संस्कृत/पाली सुत्रांचे चिनी भाषेत भाषांतर केले त्याची यादी पाहिल्यास मन थक्क होते. भद्रकल्पिका, तथागतमहाकरुणानिर्देश, सद्‌धर्मपुंडरिक, ललितविस्तार, बुद्धचरितसुत्र, दशभुमीक्लेषचेदिकासुत्र, धर्मसमुद्रकोषसुत्र हे त्यातील काही ग्रंथ. एकूण ग्रंथ होते १४९. शिवाय त्याने अजुन एक महत्वाचे काम केले ते म्हणजे बुद्धाच्या जातक कथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बरं हे नुसते लिहून तो थांबला नाही तर गावोगावी, त्याच्या मठात त्याने या सुत्रांवर सतत प्रवचने दिली व धम्माचा प्रसार केला. चीनमधे जो काही बौद्धधर्म प्रारंभीच्या काळात पसरला त्याचे बरचसे श्रेय धर्मरक्षालाच जाते.

अखेरच्या काळात धर्मरक्षाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला व तो निर्जन जंगलात एकांतवासात रहाण्यास गेला. त्याच्या ज्ञानलालसेबद्दल एक दंतकथा याच काळात निर्माण झाली. तो ज्या नदीकिनारी रहात असे त्या नदीचे पाणी एक दिवस अचानक आटले. (एका माणसाने ते दुषीत केले असेही म्हणतात) ते पाहून धर्मरक्ष त्या जंगलात विलाप करीत भटकू लागला, ‘‘ही नदी अशी आटली तर मला जे काही थोडेफार पाणी लागते तेही मिळणे मुष्कील आहे.’’ हा आक्रोश ऐकताच ती नदी परत दुथडी भरुन वाहू लागली. अर्थात ही एक बोधकथा आहे म्हणून आपण त्यातून काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ व सोडून देऊ.

नंतरच्या काळात त्याने टँगची राजधानी चँग-ॲनच्या ‘निल‘ वेशीबाहेर एक मठ स्थापन केला व तेथे महायानाचा अभ्यास करीत आपले आयुष्य व्यतीत करु लागला. त्याच्या शिष्यांची संख्या आता न मोजता येईल एवढी झाली होती. पण त्याच काळात धर्मरक्ष सामान्यजनांमधे लोकप्रिय झाला तो एका घटनेमुळे…

त्याच्या विद्यार्थ्यांमधे एक श्रमण दाखल झाला होता. तो आठव्यावर्षीच श्रमण झाला होता याचाच अर्थ तो ज्ञानी असावा. ही घटना घडली तेव्हा त्याचे वय तेरा होते. त्याचे नाव होते झु-फाशेंग. चँग-ॲनमधे एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठीत गृहस्थ रहात असे. एक दिवस तो धर्मरक्षाच्या मठात आला. त्याची गाठ या झुशी पडली. त्या माणसाने धर्मरक्षाकडे दोन लाख नाणी मागितली. त्या मागणीला धर्मरक्ष उत्तर देणार तेवढ्यात त्या लहान मुलाने उत्तर दिले, ‘‘ तुम्हाला ते पैसे मिळतील !’’ ते ऐकून तो माणूस उद्या येतो असे म्हणून निघून गेला. फा-शेंग म्हणाला, ‘‘ त्या माणसाला ते पैसे खरेच पाहिजे होते यावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटते तो आपली परिक्षा घेण्यासाठी आला असावा.’’ धर्मरक्षाने त्यालाही असेच वाटले असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी तो माणुस आला व त्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत धर्माची दिक्षा घेतली.

जेव्हा क्सिओनू व क्सिॲन्बी टोळ्यांनी सम्राट हुईच्या राजधानीवर हल्ला केला त्या धामधुमीच्या काळात धर्मरक्षाने त्याच्या शिष्यांसह पूर्वेकडे पळ काढला. तेथे तो एका निसर्गरम्य कुन नावाच्या तळ्याकाठी पोहोचला. दुर्दैवाने झालेल्या दगदगीमुळे तो तेथे आजारी पडला व त्याने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते ७८.

हुई आणि हुआई सम्राटांच्या मधल्या युद्धाच्या धामधुमीच्या काळातही हे भाषांतराचे काम अडखळत का होईना चालू होते. फा-जू नावाचा एक श्रमण होता त्याने लोकस्थान सुत्राचे भाषांतर केले. हा कुठून आला होता, त्याचे भारतीय नाव काय होते हे अज्ञात आहे. तसाच एक श्रमण होता त्याचे नाव होते फाल-ली याने जवळजवळ १०० श्लोकांचे भाषांतर केले. हे दोघे आणि त्यांचे काम काळाच्या उदरात गडप झाले ते झालेच.

ही तत्वज्ञान व माहितीची देवाणघेवाण बघता, पूर्व आणि पश्चिम कधीच भेटणार नाहीत हे प्रसिद्ध वाक्य खोटे ठरते. हे प्रदेश भेटले आणि मध्य एशियात भेटले. त्यांच्यात वैचारिक व आर्थिक देवाणघेवाणही होत होती….

या सुरवातीच्या काळात हे जे ग्रंथांचे भाषांतर झाले ते एवढे अचुक नसायचे. चीनी भाषा ही भारतीय पंडितांना एकदम नवीन व अनाकलनीय होती. त्यांचा बराच वेळ हा ती भाषा शिकण्यातच जायचा. भारतीय पंडीत खऱ्या अर्थाने चिनी भाषा शिकले ते हुएन-त्संगच्या काळात. पण आपण चिनी भिक्षुंबद्दल नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हा विषय येथेच सोडून देऊ.

या दोन महत्वाच्या महंताबद्दल आपण वाचले पण एकदा राजाश्रय मिळाल्यावर भारतातून चीनमधे जाणाऱ्या बौद्ध महंतांची तुलनेने रीघच लागली. राजाने बांधून दिलेल्या श्र्वेताश्र्व मठात भाषांतराचे व धर्मप्रसाराचे काम मोठ्या नेटाने चालू झाले.

चिनी सम्राटांनी बौद्धधर्माला राजाश्रय दिल्यावर त्यांना भारतातून अजुन धर्मगुरुंची गरज भासू लागली व त्यांनी अनेक धर्मगुरुंना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांची नावे काही तिबेटच्या ग्रंथात आढळतात ती अशी- आर्यकाल, स्थाविरचिलू, काक्ष, श्रमण सउविनय. हे पहिल्या तुकडीत होते तर नंतर आलेल्यांची नावे होती, पंडीत धर्मकाल व त्याच्या बरोबर गेलेले अनेक भिक्षू ज्यांची नावे आज आपल्याला माहीत नाहीत. पण काही जणांची चिनी इतिहासातून कळतात – महाबल, धर्मकाल, विघ्न, त्साऊ लुयेन, त्साऊ ता-ली व धर्मफळ. १७२-१८३ या काळात अजुन एक पंडीत आला त्याचे नाव होते त्साऊ फा-सो. हे अर्थात त्याचे चिनी नाव आहे. त्याचे भारतीय नाव माहीत नाही. त्याने दोन ग्रंथाचे भाषांतर केले पण ते ७३० साली नष्ट झाले असा चिनी इतिहासात उल्लेख आहे. महाबल यानेही त्याच मठात राहून एका ग्रंथाचे भाषांतर केले तो मात्र अजुनही चिनी त्रिपिटकामधे आहे. यात बोधिस्त्वाच्या कल्पनेबद्दल बरीच चर्चा केली आहे. त्यातच बुद्धाच्या आयुष्याबद्दल बरीच माहीती मिळते.

तिसऱ्या शतकात धर्मपाल चीनला गेला. जाताना त्याने त्याच्याबरोबर कपिलावस्तूमधून काही संस्कृत ग्रंथ नेले. यानेही त्याच मठात आश्रय घेऊन त्या ग्रंथाचे भाषांतर केले. त्यात त्याला मदत झाली एका तिबेटी श्रमणाची. हा तिबेटी असला तरी त्याचे वास्तव्य अनेक वर्षे मध्य भारतात होते. याचे नाव आहे खान मानसिआन कदाचित खान हे त्या काळात आडनाव नसून पद होते हे लक्षात घेतल्यास ते खान मानसिंह असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथाचे नाव होते मध्यमासुत्र. हा दीर्घआगमामधील काही सुत्रे घेऊन रचला गेला.

या काळामधे हे सगळे पंडीत त्यांच्या कामात सतत सुधारणा करीत धर्मप्रसार करीत होते. उदा. धर्मकाल जेव्हा चीनमधे आला तेव्हा त्याला उमगले की चीनमधे विनयसुत्राबद्दल विशेष माहीती नाही. त्यात लिहिलेल्या नियम माहीत नसल्यामुळे बरेच प्रश्न उद्‌भवत होते. संघ नीट चालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता होती. प्रतिमोक्षसुत्रामधे हे सगळे नियम बुद्धानंतर सम्राट अशोकाने भरविलेल्या महापरिषदेने घालून दिलेले आपल्याला आढळतात. धर्मकालाने या नियमांचे भाषांतर करण्याचे काम प्रथम हाती घेतले व तडीस नेले. काळ होता इ.स. २५० हाच चिनी भाषेतील ग्रंथ विनयपिटीका. दुर्दैवाने हाही ग्रंथ ७३० साली नष्ट झाला अशी नोंद आढळते.

अंदाजे २२४ साली अजुन दोन पंडीत भारतातून चीनमधे आले. एक होता विघ्न आणि दुसरा होता लु-येन. हे एकमेकांचे मित्र होते. या पंडितांनी बरोबर धर्मपादसुत्र आणले व त्याचे भाषांतर केले – थान-पोक-किन. त्यांनी हे काम सुरु केले तेव्हा त्यांना चिनी भाषेचा विशेष गंध नव्हता पण त्याने डगमगून न जाता मोडक्यातोडक्या चिनी भाषेत त्यांनी हे काम नेटाने पुढे चालू ठेवले. पण त्यामुळे एक नुकसान झाले ते म्हणजे या भाषांतरात मूळ भाव उतरला नाही. हा ग्रंथ अजुनही चीनमधे काओ-सान-क्वान (प्रसिद्ध धर्मगुरुंच्या आठवणी) या ग्रंथात जपून ठेवलेला आहे. पंडीत विघ्नाच्या मृत्युनंतरही लु-येन याने हे काम चालू ठेवले व आणखी तीन ग्रंथाचे भाषांतर केले ज्यात बुद्धाने जी सुत्रे सांगितली ती लिहिली आहेत.

वर उल्लेख केलेला खान सान नी ही मुळचा तिबेटी पण भारतात स्थायीक झाला होता. तिबेटच्या पंतप्रधानाचा (खान्-कू) हा मुलगा. २४१ साली याने चीनचा रस्ता धरला व तो त्यावेळची राजधानी नानकिंग येथे पोहोचला. त्यावेळी तेथे वू घराण्याचे राज्य होते. सम्राट सन खुएनची या धर्मगुरुवर विशेष मर्जी बसली. त्याने त्यास नवीन मठ बांधण्याचा आदेश दिला. त्याने तो लगेच आमलात आणून त्या मठाला नाव दिले किएन-कू मठ. ज्या गावात हा मठ बांधला गेला त्या गावाचेही नाव ठेवण्यात आले बुद्धग्राम. याचे उद्‌घाटन खुद्द सम्राटांच्या हस्ते करण्यात आले. याही महंताने एकूण १४ ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यातील एक महत्वाचा होता शत परमिता सन्निपातसुत्र. हा म्हणजे आपल्या जातक कथा आहेत. दुसरा ग्रंथ होता संयुक्तावादनसुत्र. हा एक महायान पंथाचा ग्रंथ आहे. काळ होता २५१.

एक लक्षात येते की भारतातील धर्मगुरु हे सरळ चीनला अफगाणिस्थानमार्गे जात नसत. ते अगोदर मध्य एशियात जात व तेथून रेशीममार्गाने एखाद्या व्यापारी तांड्याबरोबर चीनला जात.

याखेरीज अजुनही काही धर्मप्रसारक भारतातून चीनला गेले त्यांची नावे –
कल्याणरुण, कल्याण, आणि गोरक्ष. यातील गोरक्षक हे नाव नाथपंथियांच्या साधूचे वाटते. याबाबतीत संशोधनाची गरज आहे. गोरक्षकनाथांचा काळ हा अकराव्या शतकाचा मानला जातो आणि हा पंडीत गेला दुसऱ्या शतकात. काही नाथपंथीयांनी बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती का यावर संशोधन होणे जरुरी आहे…. एका थोर धर्मप्रसारकाविषयी आपण वाचणार आहोत.
त्याचे नाव कुमारजिव….

कुमारजीव.
चीनमधील कुचा येथील कुमारजीवाचा सुंदर पुतळा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कुमारजिवाचे काम खरोखरच आपल्याला आचंबित करणारे आहे. त्यांनी जवळजवळ १०० संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरु केलेल्या या कामात सामील होण्यासाठी दुसरी फळी उभारली. या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे काम मोठ्या जोमाने पुढे चालू ठेवले. हे त्यांचे यश फार मोठे म्हणावे लागेल. त्यांचे शिष्य नुसते हे काम करुन थांबले नाहीत तर सुप्रसिद्ध फा-इन सारख्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधे केला.

या काळातील काही बौद्ध धर्मगुरुंची ही नावे पहा –
धर्मरक्ष, गौतम संघदेव, बुद्धभद्र, धर्मप्रिय, विमलाक्ष व पुण्यत्राता. या सर्वांचे काम आपण थोडक्यात बघणार आहोत.

धर्मरक्ष ३८१ साली चीनेमधे आला व त्याने त्या अवघड भाषेचा अभ्यास करुन अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. उदा. १) मायाकाराभद्ररिद्धीमंत्र सूत्र २) नरकसूत्र, ज्यात बुद्धाने नरक या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ३ शिलगुणगंध सूत्र ४) श्रामण्यफळसूत्र.

याच्यानंतर आला गौतम संघदेव. हा एक काश्मीरचा श्रमण होता. याने ३८८ साली त्यावेळच्या चीनी राजधानीत, म्हणजे खान आन या शहरात पाऊल टाकले. त्यावेळी तेथे फु राजघराणे राज्य करीत होते. त्याने जवळजवळ ७ ग्रंथांचे भाषांतर केले. त्याने भाषांतर केलेल्या काही महत्वाच्या ग्रंथांची नावे आहेत – मध्यमागम सूत्र, हा एक हिनयान पंथाचा ग्रंथ आहे. दुसरा आहे अभिधर्मह्र्दयशास्त्र. ३९१ साली त्याने त्रिधर्मसूत्राचे भाषांतर केले.

३९८ साली चीनमधे आला बुद्धभद्र. हा शाक्य होता. साधारणत: त्याच काळात कुमारजीवाला पकडून चीनमधे आणण्यात आले. कुमारजीवाने याच बुद्धभद्राचा अनेक वेळा त्याच्या कामात सल्ला घेतला असे म्हणतात. या बुद्धभद्राला कुमारजीवाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचाच सहाध्यायी होता जगप्रसिद्ध फा-ईन. कुमारजीवाच्या मृत्युनंतर जेव्हा फा-ईन भारताचा प्रवास करुन चीनमधे परतला तेव्हा याने त्याच्याबरोबर संघासाठी नियमावली असणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे विनयपिटिका. २५० साली नियमावली नसल्यामुळे आपण पाहिले आहे की धर्मकालाने पहिला प्रतिमोक्ष हा ग्रंथ लिहिला होता. बुद्धभद्राने त्यातील काही भाग उचलून त्यावर सविस्तर भाष्य केले आणि एक नवीन ग्रंथ रचला ज्याचे नाव त्याने ठेवले – प्रतिमोक्षसंघिकामूल. संघ वाढत असल्यामुळे त्यात शिस्त आणण्यासाठी विनयग्रंथाची त्याकाळात फारच जरुरी भासल्यामुळे हे काम तत्परतेने उरकण्यात आले. बुद्धभद्राने चीनमधे ३१ वर्षे काम केले. तो भारतात परत आला नाही. त्याने चीनमधेच आपला प्राण ठेवला तेव्हा त्याचे वय होते ७१. त्याचे सात ग्रंथ आजही चीनमधे जपून ठेवले आहेत ते खालीलप्रमाणे – (तीन ग्रंथांची नावे आधी येऊन गेलेली आहेत)

१ महावैपुल्य सूत्र ज्यात खुद्ध बुद्धाची भाषणे दिली आहेत.
२ बुद्धध्यानसमाधीसागर सूत्र
३ मंजुश्री प्रणिधानपद सूत्र
४ धर्मताराध्यान सूत्र

बुद्धभद्राच्या थोडे आधी अजुन एक धर्मगुरु काबूलवरुन चीनमधे येऊन गेला त्याचे नाव होते संघभट. पण त्याच्याबद्दल आजतरी काहीच माहिती उपलब्ध नाही. अजून किती पंडीत चीनमधे या कामासाठी दाखल झाले असतील याची आज आपल्याला कल्पना नाही. कित्येक ग्रंथ कम्युनिस्ट राजवटीत नष्ट करण्यात आले असावेत किंवा कुठल्यातरी सरकारी ग्रंथालयात धूळ खात पडले असतील. ते जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा अजून बरीच माहिती उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात अजून एक महत्वाच्या कामास सुरुवात झाली ती म्हणजे चीनी धर्मगुरुंनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. ही कल्पना कुमारजीव यांच्या एका शिष्याची, फा-ईनची.

३८८ साली संघभटाने कात्यायनीपुत्र रचित विभासशास्त्राचे चीनी भाषेत भाषांतर केले जे चीनमधे पि-फो-शालून या नावाने ओळखले जाते. या ग्रंथाचे एकुण १८ भाग आहेत. त्याच वर्षी त्याने आर्य वसुमित्र बोधिसत्व संगितीशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर केले. ३८४ साली त्याने बुद्धचरितसूत्राचे भाषांतर केले. हा मूळ ग्रंथ संघरक्षाने रचिला होता.

३८२ साली अजून एका धर्मप्रिय नावाच्या श्रमणाने एका महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर केले ज्याचे नाव होते महाप्राज्ञपरिमित सूत्र. हे प्रसिद्ध दशसहस्रिका प्राज्ञ परिमिता या ग्रंथाचा काही भाग आहे.

थोडक्यात काय, भारतातून चीनकडे जाणाऱ्या पंडितांचा ओघ सारखा वाढत होता व त्यांनी तेथे अचाट काम केले. नवीन धर्माचा प्रसार करताना नवबौद्धांना संदर्भासाठी ग्रंथ लागतील हे ओळखून त्यांनी ग्रंथाच्या भाषांतराचे काम प्रथम हाती घेतले आणि अतोनात कष्टाने तडीस नेले. हे करताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे थांबविले नव्हते. त्यासाठी त्यांनी राजाच्या आश्रयाने मठ बांधले. तेथे संघांना आसरा दिला. त्यांच्यासाठी चीनी भाषेत नियमावली लिहिल्या.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सर्व कामात भारताच्या मध्य भागातून अनेक पंडीत चीनला गेले पण काश्मीरातूनही अनेकजण गेले हे विसरुन चालणार नाही. हे वाचल्यावर एक विचार मनात येतो काश्मीरमधील सध्याच्या युवकांना हा इतिहास माहिती असेल का ? तो जर त्यांना सांगितला तर काही फरक पडेल का ?

(शक्यता कमीच आहे पण मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमात एका बाईने एका अतिरेक्याला सडेतोड उत्तर दिले होते…ती म्हणाली, आमचा अरबस्तानाशी कसलाही संबंध नाही. अरब हे आमच्या भूमिवरील आक्रमक होते. हिंदूशाहीचा राजा दाहीर हाच आमचा हिरो असायला हवा. आम्ही प्रथम हिंदू होतो, नंतर बौद्ध झालो व त्यानंतर ख्रिश्चन व मुसलमान हे आम्ही विसरु शकत नाही… असे उत्तर देणारी पिढी जेव्हा काश्मीरात तयार होईल तो दिवस भारताच्या व काश्मीर खोऱ्याच्या भाग्याचा.) असो.

आता आपण कुमारजीव या महान ग्रंथकर्त्याकडे वळू. कुमारजीवाचे पिता हे भारतीय होते अर्थात त्याचवेळेचा भारत ज्यात अफगाणिस्तानही मोडत होते. कुमारजीवाचे वडील ‘कुमारयाना’, काश्मिरमधे एका राज्याच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. त्यांच्यावर बौद्धधर्माचा एवढा प्रभाव पडला की पामीरच्या डोंगर रांगा पार करुन ते कुचाला गेले. तेथे ते आल्याची कुणकुण लागल्यावर तेथील राजाने त्यांची त्वरित राजगुरुपदी नेमणूक केली. त्याकाळी गुणवंतांची कदर अशा प्रकारे व्हायची. विद्वान पंडितांसाठी त्याकाळी युद्धं होत असत असा तो काळ. तर कुचाला हा राजगुरु असताना कुचाची राजकन्या, जिवाका त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. अर्थातच तो पुरा करण्यात आला. यांना जो पुत्र झाला त्याच्या नावात मातापित्यांचे नाव गुंफण्यासाठी त्याचे नाव ठेवण्यात आले कुमार + जिवाका. म्हणजेच कुमारजीवा. कुमारजीवाचे जन्म साधारणत: ३३४ त ३४४ या काळात झाला असावा. तो सात वर्षांचा असताना त्याची आई एका भिक्षुणीसंघात दाखल झाली. असे म्हणतात (जरा अतिशयोक्ती वाटते) की तो सात वर्षांचा असतानाच त्याची अनेक सूत्रे तोंडपाठ होती. तो नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला काश्मिरला नेले व शिक्षणासाठी शिक्षकांचा जो शिक्षक बंधुदत्त त्याच्याकडे सोपविले. या प्रवासादरम्यान त्यांना एक अरहत भेटला ज्याने कुमारजीवाचे भविष्य सांगितले असे म्हणतात. आजवर कुमारजीवाचा अभ्यास हिनयानाच्या सर्वास्तिवादी तत्वज्ञानाच्या अभ्यासापुरता मर्यादित होता. येथे त्याला वेदांचा व तंत्रविद्या, खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यास मिळाला व याचवेळी त्याची महायानाच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली. या शिक्षणाचा अजून एक फायदा त्याला झाला आणि तो म्हणजे त्याची ओळख अतिविशाल हिंदू ग्रंथविश्र्वाशी झाली. थोड्याच काळात तो त्यात पारंगतही झाला. महायानाची ओळख झाल्यावर तर त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की मी इतके दिवस दगडाला सोने समजत होतो. आता मात्र माझी ओळख खऱ्या सोन्याशी झाली आहे. (मला मात्र हे काही विशेष पटले नाही. खरे तर हिनयानपंथाचे तत्वज्ञान जास्त मूलभूत स्वरुपाचे आहे. मला तरी वाटते महायानात हिंदू तत्वज्ञान भरपूर घुसडलेले आहे. उदा. बोधिसत्वाची कल्पना. हे चूक असू शकेल !) गंमत म्हणजे त्याला या अभ्यासात यारकंदचा राजपुत्र सत्यसोमाची खूपच मदत झाली. गुगलअर्थवर यारकंद कुठे आहे हे जरुर पहावे.

काशघरला एक वर्ष काढल्यावर कुमारजीव कुचाला परतला. कुचामधे राजदरबाराच्या पाठिंब्याने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर मात्र तो जवळजवळ वीस वर्षे कुचामधे राहिला. हा काळ त्याने महायानाचे तत्व समजून घेण्यात व्यतीत केले. ते तत्वज्ञान पटल्यावर त्याने महायानपंथाचा स्वीकार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या गुरुंनाही हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे ठरविले. त्याला अशी आशा होती की गुरुंना पटल्यावर तेही या पंथाचा स्वीकार करतील. त्याने बंधुदत्तांना कुचास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या गुरुला महायानाची थोरवी सांगताना कुमारजीवाने त्यांच्या समोर शून्यतेची कल्पना व तत्व मांडले. ते सगळे शांतपणे ऐकल्यावर बंधुदत्तांनी सगळे शून्य आहे, किंवा सगळे विश्र्व शेवटी मिथ्या आहे हे म्हणणे म्हणजे फुकाची बडबड आहे असे म्हणणे मांडले. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा कथन केली –

एका विणकराकडे एक वेडसर माणूस आला व त्याने त्याला सगळ्यात तलम धागा विणण्यास सांगितला. तो पाहिल्यावर त्याने तो जाड असल्याचे त्या विणकराला सांगितले.

‘‘पैशाची काळजी करु नकोस. मला तलमात तलम धागा विणून दाखव !’’

विणकराने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो धागा पाहिल्यावर त्या माणसाने तो जाड असल्याचे सांगितले. विणकराला राग आला पण त्याने तो आवरला व त्याला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी विणलेला धागा पाहून त्या माणसाने तोही जरा जाडसर असल्याचे सांगितल्यावर विणकराला आला राग. हवेत बोट दाखवून तो म्हणाला,

‘‘तो बघ तुला पाहिजे तसा धागा तेथे आहे.’’ हवेत काहीच न दिसल्यामुळे त्याने विचारले, ‘‘ कुठे आहे तो धागा? मला तर दिसला नाही’’

‘‘तो इतका तलम झाला आहे की नुसत्या नजरेस दिसणे शक्यच नाही’’ विणकराने उत्तर दिले.

त्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले.

‘‘या धाग्याचे एक वस्त्र विणून मला उद्या दे. ते मला राजाला भेट द्यायचे आहे’’ असे म्हणून त्या माणसाने त्याचे पैसे मोजले व तो तेथून निघून गेला.

आता हे स्पष्टच आहे की असा कोणताही धागा तेथे नव्हता व त्याचे पैसे मोजायचेही काही कारण नव्हते त्याचप्रमाणे महायानातील शून्यता या कल्पनेत/तत्वज्ञानात काहीच अर्थ नाही व त्यात वेळ घालविण्यात काही कारण नाही हे स्पष्ट आहे.’’

हे मात्र मला पटले पण कुमारजीवाला मात्र स्वत:च्या गुरुचे मतपरिवर्तन करण्यात नंतरच्या काळात यश मिळाले. त्याच्या म्हणण्यास मान्यता देऊन त्याच्या गुरुंनी महायानपंथाची शिकवण स्वीकारली.

३७९ साली एक सेंग-जुन नावाचा चीनी महंत कुचाला आला होता. त्याने कुमारजीवाची माहिती चीनच्या राजाला (सम्राट जिन. राजधानी : चँगॲन) एका अहवालात पाठविली. सम्राटाने तो अहवाल वाचून कुमारजीवाला चीनमधे आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळजवळ दोन दशके प्रयत्न करुन तो निराश झाला. हे प्रयत्न विफल झाले त्याला कारण होते सम्राटाचाच एक सेनापती लु-कुआंग. या सेनापतीने कुमारजीवाचे महत्व न ओळखता आल्यामुळे त्याला अटक करुन सतरा वर्षे तुरुंगात टाकले. (हा बौद्धधर्मिय नव्हता. तो धर्माच्या विरुद्ध होता का नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. काही जणांचे असेही म्हणणे आहे त्या काळात तो इतका ताकदवान झाला होता की त्याने जवळजवळ राजा विरुद्ध बंडच पुकारले होते.) राजदरबारातून कुमारजीवाला राजधानीत पाठविण्याचे सारखे आदेश निघत होते. इकडे कुमारजीवाने सर्वस्तीवादी विनयाचा अभ्यास सुरु केला होता. यावेळी त्याच्याबरोबर होता पंजाबमधील (किंवा उत्तर भारत म्हणूया) एक पंडीत ज्याचे नाव होते विमलाक्ष. (हा एक उत्तर भारतीय भिक्खू होता ज्याने कुचाच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. जेव्हा चिन्यांनी ३८३ मधे कुचावर हल्ला करुन ते काबीज केले तेव्हा याने तेथून पळ काढला. नंतर जेव्हा त्याला कुमारजीव चँगॲनमधे आहे हे कळले तेव्हा तोही चँगॲनला गेला. कुमारजीवाचा मृत्यु झाल्यावर याने तेथे बरेच काम केले. हा त्याच्या ७७व्या वर्षी तेथेच मृत्यु पावला)

३६६-४१६ या काळात त्सिन् घराण्याची सत्ता चँगॲनवर प्रस्थापित झाली. याचा एक राजा याओ त्सिंग हा बौद्धधर्माचा फार मोठा चाहता होता. त्याने या धर्माला उदार राजाश्रय दिला होता. असे म्हणतात त्याच्या काळात त्याने ३००० श्रमणांना सांभाळले होते. याच्या दरबारात प्रवेश मिळाल्यावर कुमारजीवाचे भाग्य उजळले. या राजाने त्याला त्याच्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची आज्ञा दिली व बौद्धधर्माचा चीनमधील मार्ग मोकळा झाला. एकदा राजाश्रय मिळाल्यावर कुमारजीवाने भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. त्याने जवळजवळ ९८ ते १०० बौद्ध संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. त्यातील काहींची नावे आपण अगोदरच पाहिली आहेत. त्याने स्वत: काही ग्रंथ रचले का नाही याबद्दल आजतरी काही माहिती उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. कुमारजीवाची मातृभाषा ना संस्कृत होती ना चीनी. तरीही त्याने हे भाषांतराचे काम पार पाडले याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित कुचामधे असताना त्याला चीनी भाषेची तोंडओळख झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे खरे मानले तरीही त्याने फार अवघड काम पार पाडले असेच म्हणावे लागेल.. संस्कृतमधून चीनी भाषेत भाषांतर करताना त्याने स्वत:ची एक स्वतंत्र शैली निर्माण केली त्यामुळे ती सगळी भाषांतरे ही चीनी भाषेतील मूळ लेखनच वाटते. असे म्हणतात की त्याची शैली ही ह्युएनत्संगपेक्षा श्रेष्ठ आहे. वरील ९८ ग्रंथाचे ४२५ भाग आहेत. यावरुन हे काम किती प्रचंड असेल याची कल्पना येते. यातील ४९ ग्रथांची नावे चीनी त्रिपिटिकात लिहून ठेवली आहेत त्याची नावे येथे विस्तारभयापोटी देत नाही. ही यादी आपण जर नीट पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की यात तांत्रिकविद्येवरील एकही ग्रंथ नाही. ह्युएनत्संगच्या काळात मात्र या विषयावरील ग्रंथांचा चीनमधे बराच बोलबाला झाला. त्याने अश्र्वघोष व नागार्जुन यांची चरित्रं लिहिली, ती चीनमधे बरीच लोकप्रिय झाली. कुमारजीवाची लोकप्रियता इतकी वाढली की असे म्हणतात त्या काळात त्याच्याकडे १००० श्रमण शिकत होते. फा-ईन हा त्याचाच एक शिष्य. याने भारतात जाऊन बुद्धाच्या सर्व पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या व कुमरजीवाच्या आज्ञेने त्याचे प्रवासवर्णन लिहिले. त्यानेही अनेक ग्रंथ भारतातून चीनमधे नेले. आपल्या शिष्याची किर्ती पाहण्यास कुमारजीवाचा गुरु विमलाक्ष चीनमधे आला पण दुर्दैवाने विमलाक्षाच्या आधी कुमारजीवाचा मृत्यु झाला. विमालाक्षाने आपल्या शिष्याचे काम पुढे नेले व ‘दशाध्याय विनय निदान’ नावाच्या ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. हेही वयाच्या ७७व्या वर्षी चीनमधे मरण पावले.
कुमारजीवाच्या काळात काश्मिरमधून अजून एक पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव होते पुण्यत्रात. यानेही कुमारजीवाच्या प्रभावाखाली दशाध्यायविनय व सर्वस्तिवाद् विनय या दोन ग्रंथांचे भाषांतर केले.

एक लक्षात येते की काश्मिर भागातून अनेक श्रमण चीनमधे येतजात होते व तेथे अगोदरच स्थायिक झालेल्या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करीत होते. आता त्यांच्यापैकी काहींची नावे व त्यांचे काम पाहुया..

काश्मिरमधून या काळात जे काही पंडीत चीनमधे गेले त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१ बुद्धयास २ धर्मयास ३ धर्मक्षेम ४ बुद्धाजिवा आणि ५ धर्ममित्र.

बुद्धयासाने आकाशगर्भबोधिसत्व, दीर्घ आगाम व धर्मगुप्त विनयाचे सूत्राचे भाषांतर केले. ज्या चिनी इतिहासात या सर्व बौद्ध पंडितांचा उल्लेख किंवा व्यवस्थित नोंद केलेली आढळते. याचे नाव फो-थो-ये-शो असे आहे.

याच्या मागोमाग काश्मिरमधून आला पंडित धर्मयास. साधारणत: ४०७ साली. याने आठ वर्षात सव्याकरण सूत्र व सारिपुत्ताअभिमधर्म सूत्रांचे भाषांतर केले. ही सगळी त्रिपिटकात सामावलेली आहेत.

४१४ साली धर्मक्षेमाने चीनमधे पाऊल ठेवले. जरी तो काश्मिरातील पंडितांबरोबर चीनमधे आला असला तरी तो कश्मिरी नव्हता. तो होता मध्य भारतातील. चीनी सम्राटाने (सम्राट त्सू-खू-मान-सून्, उत्तर लिॲन घराणे) याला बौद्ध ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी खास आमंत्रण दिले होते म्हणजे हा किती ज्ञानी असेल याची कल्पना येते. त्यानेही भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. थोड्याच काळात त्याची किर्ती दूरवर पसरली आणि त्याला वी घराण्याच्या राजाकडून बोलाविणे आले. त्याने त्याला बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिले. पहिल्या राजानी परवानगी नाकारल्यावर या दोन सम्राटांमधे जी हाणामारी झाली त्यात बिचाऱ्या धर्मक्षेमास आपले प्राण गमवावे लागले. तो वीच्या राज्यात जात असताना त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले व त्याला ठार मारले गेले. त्याने भाषांतर केलेल्या अनेक ग्रंथांपैकी बारा शिल्लक आहेत. त्यातील काही महत्वाचे असे –
१ महविपूल सूत्र २ महाविपूलमहासानिपत्त सूत्र ३ महापरिनिर्वाण सूत्र

काश्मिरमधून अजुन एक पंडीत आला ज्याचे नाव होते बुद्धजिवा. हा साधारणत: ४२३ साली आला असावा. त्यानेही दोन महत्चाचे ग्रंथ चीनी भाषेत आणले ते म्हणजे महाशासक विनय आणि प्रतिमोक्ष महिशासक.

यानंतर या काळात काश्मिरमधून आलेला शेवटचा पंडीत होता धर्ममित्र. हा आला साधारणत: त्याच काळामधे. त्याने ४२३ ते ४४१ या काळात बरेच काम केले त्यातील महत्वाचे होते आकाशगर्भबोधीसत्वधारिणी सूत्र. हा वयाच्या ८२व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला.

आता आपण एका महत्वाच्या व लोकप्रिय पंडीताकडे वळूया.

काश्मिर ज्याला त्या काळात चिनी भाषेत कि-पिन असे नाव होते ( आत्ता आहे का हे माहीत नाही ) त्याने एक अत्यंत अनुभवी धर्मप्रसारक चीनमधे पाठविला. तो म्हणजे गुणवर्मन. हा धर्मप्रसाराच्या कामात अत्यंत वाकबगार होता. असे म्हणतात त्याने चीनला जाण्याआधी आख्खी जावा बेटे बौद्ध केली होती. जावा बेटात त्याने शुन्यापासून सुरुवात केली होती त्यामानाने चीनमधील काम सोपे होते. चीनमधील धर्मप्रसाराचे काम तसे सुरळीत चालले होते फक्त मधून मधून ताओ व कनफुशियसचा अनुयायी असणारा एखादा राजा गादीवर आला की बौद्धांवर अत्याचार व्हायचे. पण त्याच काळात बौद्धांची संख्या वाढली होती हेही नाकारता येत नाही. या कामास बुद्धाच्या भूमीवरुन सतत मदत मिळत होती हेही खर्ं. अशा काळात गुणवर्मनसारखा पंडीत चीन येथे आल्यावर बौद्धधर्मप्रसारकांची ताकद अजुन वाढली.

हा स्वत: काश्मिरच्या राजघराण्यातील होता. (काही जणांचे म्हणणे तो गांधारातील होता असेही आहे) दुर्दैवाने जरी यांचे घराणे काश्मिरवर अनेक वर्षे राज्य करीत असले तरी याचा जन्म झाल तेव्हा याच्या आजोबांना (हरिभद्र) त्यांच्या उपद्रवी मुल्यांमुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याकाळात राजेशाही असली तरी कशा प्रकारची होती हे या उदाहरणावरुन समजून यावे. प्रत्यक्ष राजाला हद्दपार करण्याची क्षमता त्या काळात मंत्रीगण व जनता बाळगून होते. मला वाटते पाचशे राजकर्त्यांना हाकलून देण्यापेक्षा हे सोपे असावे. त्यामुळे याचा जन्म जंगलातच झाला. गुणवर्मनाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला एक कोंबडा मारायला सांगितला. त्याने हे धम्माविरुद्ध आहे हे सांगितल्यावर साहजिकच त्याच्या आईला राग आला. ती म्हणाली,

‘‘ तू मार त्याला. जे काही पाप लागेल ते मी माझ्या शिरावर घेते. व त्यासाठी काही शिक्षा असेल तर तीही मी भोगेन.’’ दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर असेल, गुणवर्मनाचे बोट दिव्यावर भाजले. त्याने आईकडे धाव घेतली.

‘‘ माझ्या हाताची आगाआग होती आहे. या वेदना जरा तू घेतेस का ?’’

‘‘अरे हे तुझे शारीरिक दुखणे आहे. ते मी कसे घेऊ शकेन ?’’
हे ऐकल्यावर गुणवर्मनाने तिला तिच्या बोलण्याची आठवण करुन दिली.

असे म्हणतात जेव्हा गुणवर्मन १८ वर्षाचा झाला तेव्हा कोणीतरी भविष्यवाणी केली की तो लवकरच राजाधिपती होईल. नंतर दक्षिणेकडे जाईल व एक सन्यासी होईल. आणि खरोखरच ही भविष्यवाणी खरी ठरली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व तो श्रमण झाला. विसाव्या वर्षी त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला. लोक त्याल त्रिपिटकावरील अधिकारी पुरुष मानू लागले. तो तीस वर्षांचा असताना काश्मिरच्या राजाचा मृत्यु झाला. त्याच्या मंत्रीमंडळाने गुणवर्मन हा राजघराण्यातीलच असल्यामुळे त्यालाच राज्याभिषेक करायचे ठरविले. अर्थातच गुणवर्मनाने त्या मागणीला नम्रतापूर्वक नकार दिला व काश्मिर सोडले. तेथून तो श्रीलंकेला गेला. तेथे धम्माच्या कामाला त्याने वाहून घेतले व जावा बेटांवर पोहोचला. त्या काळात चीनी भाषेत जावा बेटांना चो-पो असे म्हणत. फा-ईनने थोडे आधी या बेटाना भेट दिली होती. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे की या बेटांवर हिंदू धर्माची पताका फडकत होती. गुणवर्मनाने मोठ्या कल्पकतेने व कष्टाने बौद्ध धर्माचा प्रचार केला व हिंदू धर्माचे प्राबल्य जवळजवळ नष्ट केले. जावामधे कलिंगाच्या राजांनी राज्यविस्तार केला होता. ( जावाच्या एका लोककथेत गुजराथमधील एका राजाने येथे सत्ता प्रस्थापित केली असाही उल्लेख आहे. ७५ साली. जेव्हा जावाबेटांवर न्यायपाल किंवा नायपाल नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा तेथे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते ज्याचे वर्णन अनेक चीनी बौद्ध धर्मगुरुंनी केले आहे. ते होते सुवर्णद्विप नावाच्या बेटावर. नालंदा विद्यापिठात प्रवेश करण्याआधी या संस्थेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागत असे. हे बहुदा गुणवर्मनने स्थापन केले असावे. खात्री नाही…)

गुणवर्मन येण्याआधी म्हणे जावाच्या राजाच्या आईला स्वप्न पडले होते की कोणी थोर महंत उद्या जावाच्या किनाऱ्यावर लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुणवर्मनची बोट तेथे लागली. तिच्या आग्रहाखातर राजा गुणवर्मनच्या स्वागतासाठी किबाऱ्यावर गेला आणि तिच्याच आग्रहाखातर त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. त्याने राजाज्ञा केली की
१ बौद्ध महंताचा अनादर कोणी करु नये.
२ कुठल्याही प्राण्याची हिंसा करु नये.
३ गरिबांना दानधर्म करावा.

यानंतर काहीच काळानंतर सारे जावा बौद्धधर्मीय झाले. जावामधील या यशानंतर गुणवर्मनाची किर्ती बौद्धजगतात पसरली. अर्थात चीनी श्रमणांच्या कानावर त्याची किर्ती पडली असणारच. ४२४ साली चीनी बौद्धजन आणि महंत वेन सम्राटाकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली की त्यांनी गुणवर्मनाला साँग प्रदेशात बौद्धधर्माच्या प्रसारासाठी बोलावून घ्यावे. त्याने त्याच्या त्या प्रदेशातील सरदारांना तशी आज्ञा केली. गुणवर्मन कसा नानकिंगला पोहोचला याची माहीती चीनी ग्रंथातून दिली गेली आहे. तो हिंदू-नंदी नावाच्या जहाजातून चीनच्या दिशेने रवाना झाला. त्याचे जहाज भरकटून दुसरीकडेच कुठेतरी लागले असे म्हणतात. आता ही व यासारखी सविस्तर माहिती चीनमधील कुठल्या ग्रंथातून मिळते हे पहाणे वावगे ठरणार नाही. खाली त्या ग्रंथांची नावे व काळ दिला आहे.

१ चू सानत्संग ची ची : लेखक : सेंग् यू, काळ : ५१५
२ शेन सेंग चुआन : लेखक : अज्ञात, काळ : १४१७
३ फा युआन चू लिन: लेखक : ताऊ शिह, काळ: ६६८
४ कू यिन ई चिंग तूची: लेखक: शिंग माई, काळ: ६६४
५ काय युआन चे चियाओ लू : लेखक : त्शे चिंग, काळ: ७३० ( याच काळात अनेक भाषांतरे नष्ट झाली आहेत.
६ चेंग युआन सिन तिंग चे चियाओ मूलू : लेखक: युआन चाओ, काळ: ७००
७ लि ताय सानपाओची : लेखक: फेईचँगफँग, काळ: ५९७
८ ता टँग नी तिएन लू : लेखक : ताऊ हुआन, काळ‘ ७००
९ फॅन-ई-मिंग-ई-ची : लेखक : फायुन, काळ : १२००
१० फुत्झूतुंग ची : लेखक : ची, पान काळ: १३००
११ चिशेन चाऊ सानपाओ कान तुंग लू : लेखक अज्ञात, काळ : १३००

म्हणजे चीनी दरबारातून या सर्व बौद्ध महंतांची चरित्रे लिहून ठेवण्यात आली. आहेत. मला वाटते आपल्याकडे ही लिहिलेली असावीत व बरिचशी नालंदाला लावलेल्या आगीत नष्ट झाली असवीत. अर्थात सगळ्यात जुने जे पुस्तक आहे त्यातीलच बरीचशी माहिती नंतरच्या पुस्तकात आढळते. असो.

चीनी सम्राटाला गुणवर्मन चीनच्या किनाऱ्याला लागल्याची खबर मिळताच त्याने त्याच्या सरदारांना त्याला कसलाही त्रस होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली व त्याला त्वरित राजधानीस पाठविण्यास सांगितले. त्याचा हा रस्ता चे-हिंग नावाच्या राज्यातून जात होता. येथे गुणवर्मन एक वर्षभर राहिला. या प्रदेशाचा राजा/सरदार मरायला टेकला होता. गुणवर्मनाने त्याला धम्म सांगून त्याचे चित्त थाऱ्यावर आणले असे म्हणतात.

सम्राट गुणवर्मनला भेटण्यास अतिशय आतुर झाल्यामुळे त्याने त्याला ताबडतोब नानकिंगला येण्याची विनंती केली. ४३१ मधे (महिना माहीत नाही) गुणवर्मन नानजिंगला पोहोचला. वेन घराण्याच्या सम्राटाने स्वत: पुढे जाऊन त्याचे स्वागत केले. भेटल्यावर सम्राटाने त्याला काही प्रश्र्न विचारले. त्यातील एक असा होता,

‘‘ बुद्धाच्या शिकवणीनुसार मी अहिंसेचे पालन करतो पण काही वेळा मला त्याचे पालन करता येत नाही. अशा वेळी काय करावे हे मला कळत नाही. कुपया याबाबत मार्गदर्शन करावे.’’

त्याने त्याचे काय प्रबोधन केले ते मला माहीत नाही परंतू राजाचे समाधान झाले असावे कारण लगेचच गुणवर्मन यांची राहण्याची सोय जेतवन विहारात केली. या येथे राहून गुणवर्मन यांनी लगेचच बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. प्रथम त्यांनी विहारामधे सद्धर्म पुंडरिक सूत्र व दक्षाभूमी सूत्रावर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याच्याच एका शिष्याने त्यांना ती प्रवचने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे सुचविल्यावर त्यांनी एकूण तीस भागात ती लिहिली व प्रसिद्ध केली. त्यातील दोन त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली आहेत. त्याच काळात त्या विहारात एक इश्र्वर नावाचा महंत शा-सिन नावाचा एक ग्रंथ लिहित होता पण काही अडचणींमुळे त्याने ते काम अर्धवट सोडले होते. गुणवर्मन यांनी ते काम पूर्ण करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे शेवटचे १३ भाग त्यांनी पूर्ण केले असे म्हणतात.

गुणवर्मन यांच्या काळात बौद्ध भिक्षुणींचा एक प्रश्र्न सोडविण्यात आला. त्याची हकिकत अशी :
जेव्हा गुणवर्मन नानजिंगला पोहोचला तेव्हा ज्या विहारात त्यांची सोय करण्यात आली होती तेथे एका बांबूच्या बेटापाशी त्याचे मन अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तेथेच आपली दिक्षाभूमी उभारली. या दिक्षाभूमीवर ते चीनी जनतेला बौद्धधर्माची दिक्षा देत असत. (चीनी महंतांनी गुणवर्मन या नावाचा अर्थ लावला तो असा : ज्याने गुणांचे चिलखत परिधान केले आहे असा. या माणसाने खरोखरीच गुणांचे चिलखत परिधान केले होते. सम्राटाच्या एवढ्या जवळ असून त्याच्या हातून कधीही काहीही वावगे घडले नाही.) ४२९ साली आठ भिक्षुणी श्रीलंकेवरुन एका जहाजातून नानजिंगला अवतरल्या. त्यांनी यिंगफू नावाच्या मठात आश्रय घेतला. तीन वर्षे त्या तेथेच होत्या. त्या काळात त्यांनी चीनी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले. त्यांनी स्थानिक भिक्षुणींना विचारले,

‘‘ येथे पूर्वी कधी भिक्षुणी आल्या होत्या का ?’’

‘‘ श्रमण व भिक्षू आले होते पण भिक्षुणी प्रथमच आल्या आहेत’’

हे उत्तर ऐकल्यावर त्या भिक्षुणी चमकल्या. कारण स्त्रियांना दिक्षा देण्यासाठी भिक्षुणी आणि महंत दोन्हीची गरज असते.

‘‘जर तुमच्या गुरुंना पूर्वी दिक्षा मिळाली असेल तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे होते.’’

त्या भिक्षुणींना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांना त्यांची दिक्षा वैध नाही कळल्यावर अतोनात दु:ख झाले. त्यांनी गुणवर्मन यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गुणवर्मन यांनी त्या स्त्रियांना दिक्षा देण्याची तयारी दाखविली व नंदी जहाजाच्या नाखव्याला श्रीलंकेतून अजून भिक्षुणींना घेऊन येण्याची विनंती केली. तसेच या ज्या श्रीलंकेवरुन आठ जणी आल्या होत्या त्यांना चीनी भाषेचा अभ्यास करण्यास सांगितले म्हणजे त्यांनी चीनी स्त्रियांशी बोलून त्या दिक्षा घेण्यास सक्षम आहेत का हे कळेल. असे म्हणतात नंदी जहाज दहा वर्षांनंतर अजून दहा भिक्षुणींना घेऊन नानजिंगला परतलं आणि आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तिनशे चीनी स्त्रियांना दिक्षा देण्यात आली. अशा रितीने चीनी भिक्षुणींचा संघ अस्तित्वात आला. आता या संघासाठी नियम करणे आले. यिंग-फाऊ मठाच्या भिक्षुणी गुणवर्मन यांच्याकडे आल्या आणि त्यांनी प्रर्थना केली. आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तेही काम पूर्ण करण्यात आले. (या गोष्टीमधे काळाचा जरा गोंधळ झाला आहे असे मला वाटते)

जेव्हा गुणवर्मन प्रवचनांमधे ताओ आणि कनफ्युशियस यांच्या तत्वज्ञानातील उदाहरणे देत असे तेव्हा काही श्रमणांनी त्यांना विचारले, ‘‘ हे कसे काय ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘ चीनी सामान्यजनांना ज्या भाषेत कळते तीच भाषा वापरायला पाहिजे नाहीतर बहिऱ्यांसमोर पाच स्वर आळविल्यासारखे किंवा आंधळ्यांसमोर पाच रंगाचे वर्णण केल्यासारखे होईल.’’

याने भाषांतर केलेल्या ग्रंथाची संख्या जास्त नसली तरी त्याच्या कनवाळूपणामुळे तो सामान्यजनात फार लोकप्रिय होता. नानजिंगला असताना तो महायान पंथातील दोन सूत्रांवर प्रवचने देत असे. एक होते अवात्माशकसूत्र आणि दुसरे दशभूमिकासूत्र.

एक दिवस प्रवचने देऊन झाल्यावर हा ज्ञानी पंडीत आपल्या निवासस्थानी परत गेला. त्याच्या मागे त्याचे शिष्य काही शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी गेले असता गुणवर्मन त्यांना मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या समोर एक ३० श्लोकांचे सूत्र पडले होते ज्यात ‘‘ हे सूत्र माझ्या निधनानंतर भारतात व चीनमधे प्रसिद्ध करावे अशी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी यांचे वय होते सदुसष्ठ….

….त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा अंत्यविधी दिक्षाभूमीवर भारतीय पद्धतीने करण्यात आला. नाहीतर तो सामान्यपणे दिक्षाभूमीपुढे करण्यात येतो…

यानंतरच्या काळातही बरेच महत्वाचे महंत चीनमधे आले…उदा. गुणभद्र, धर्मजात यास, खिऊ-ना-फी-ती व चाऊ फा कियू…. त्यांच्याबद्दल पुढील भागात…
या भागासाठी श्री बोस यांच्या लिखाणाचा व इतर रिसर्च पेपर्सचा आधार घेण्यात आला आहे.

गुणवर्मन जावाबेटातून चीनमधे आले त्यानंतर अंदाजे चार वर्षांनी मध्य भारतातून गुणभद्राने चीनमधे पाऊल ठेवले. याचा जन्म एका ब्राह्मणकुटुंबात झाला होता. याने महायान पंथाचा इतका खोलवर अभ्यास केला होता की लोक त्याला ‘‘महायान’’ या टोपणनावानेच ओळखू लागले. याचा चीनमधे येण्याचा काळ चीनी ग्रंथात ४३५ असा नमूद केला आहे. याने आठ वर्षात ७८ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. दुर्दैवाने यातील फक्त २८ ग्रंथ वाचले व उरलेले काळाच्या ओघात नष्ट झाले. हा पंडित वयाच्या ७८ व्या वर्षी चीनेमधेच मृत्यु पावला. याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे. ही नावे मी देत आहे कारण पुढे कधी कोणाला ही नावे लागली तर ती एके ठिकाणी सापडावीत.
१ श्रीमालादेवीसिंहनाद
२ संधीनिर्मोचनसूत्र
३ रत्नकारंदकव्युहसूत्र
४ लंकावतातसूत्र
५ कर्माच्या आड येणारे अडथळे दूर कसे करावेत या संबंधी मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ..

एक लक्षात घ्यावे लागेल की हे सर्व पंडीत लहानपणापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सुरवातीस जरी पाठांतरावर भर असायचा तरी थोड्याच काळानंतर त्या सूत्रांचा त्यांनी सखोल अर्थ शोधला असणार. शिवाय नंतर संघात जी वादविवाद करण्याची एक विशिष्ट पद्धत होती/असते त्यामुळे या सर्व श्रमणांची मते चांगली ढवळून निघायची. शिवाय एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वसामान्य भिख्खू होते तसे अत्यंत बुद्धीमान श्रमणही होतेच. आणि जे ब्राह्मण पंडीत ज्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यांना सर्व ज्ञान कसे जतन करायचे याचे चांगलेच ज्ञान होते.

गुणभद्रानंतर चीनमधे आला चाऊ फा कीन. याचे भारतीय नाव माहीत नाही. याने सहा ग्रंथांचे भाषांतर केले पण ते नंतर कुठेही सापडले नाहीत ना त्यावरील टीका सापडली. एका ठिकाणी हे ग्रंथ ७३० साली नष्ट झाले अशी नोंद आढळते. या ७३० साली असे काय घडले होते की बरेच बौद्ध ग्रंथ या वर्षी नष्ट झाले असा उल्लेख आढळतो. यावर कोणीतरी संशोधन केले पाहिजे.

४८१ साली अजून एक भारतीय पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव धर्मजालायास्स. हाही मध्य भारतातून आला. याचे भाषांतरातील योगदान विशेष नाही. पण याने एका ग्रंथाचे भाषांतर केले त्याचे नाव आहे अमितार्थसूत्र.
यानंतर पाचव्या शतकातील शेवटचा पंडीत जो चीनमधे आला त्याचे नाव होते गुणवृद्धी. हाही मध्यभारतातून आला होता. याने तीन वर्षात तीन ग्रंथांचे सहा भागात भाषांतर केले. त्यातील दोनच आज माहीत आहेत. १ सुदत्तसूत्र २ एक सूत्र ज्यात शंभर सूत्रांचा तौलनिक अभ्यास केला आहे.

आपण प्रथम पाहिले की काश्मिर व आफगाणिस्थानमधून हे पंडीत जात होते.
(अफगाणिस्थानमधे काहीच काळापूर्वी जे मेस आयनाक नावाचे शहर सापडले त्याबद्दल वाचल्यावर पूर्ण अफगाणिस्थान हा कसा बौद्धधर्मिय होता आणि तेथे अमेक बौद्धमठ कसे होते याची कल्पना यावी. याबद्दल विकीवर माहिती उपलब्ध आहे. व त्यावर एक माहितीपटही आहे. तो जरुर बघावा.) नंतर मध्यभारतातून ते जाऊ लागले. आता याच्या पुढच्या काळात दक्षिण भारतातून काही पंडीत जाणार होते. पहिला होता धर्मरुची. यांनी कुमारजिवांना त्यांच्या कामात मदत केली आणि स्वत: दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ श्रद्धाबलधानावतार मुद्रा सूत्र आणि २ सर्व बुद्धविषय अवतार सूत्र.. हा मठांच्या नियमांचा तज्ञ होता. हे नियम चीनमधील इतर मठांतून शिकविण्यासाठी फिरताना हा चँगॲनमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाने त्याच्याबद्दल परत काहीही ऐकू आले नाही….

रत्नमती…

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यानंतर मध्यभारतातून रत्नमती नावाचा पंडीत चीनमधे आला. याने तीन ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील एक होता, महायानोत्तरतंत्रशास्त्र. चीनमधील तांत्रिक पंथाचा हा पहिला उल्लेख आहे. याचा अर्थ हा चीनमधे येण्याआधी या शास्त्राचा चीनमधे चंचूप्रवेश झाला असणार. आपल्या प्रसिद्ध ह्युएनत्संगला या विषयात फार रस होता. याबरोबर धारिणींचा व तंत्रमंत्रांचा चीनीजनमानसात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही. याने भाषांतर केलेला दुसरा ग्रंथ होता सद्धर्मपुंडरिकसूत्र शास्त्र.

त्याच वर्षी अजून एक थोर भाषांतरकार चीनमधे आला. त्याचे नाव होते बोधीरुची. हा उत्तर भारतातून चीनला गेला असे म्हणतात. पण याने भाषांतरावर जास्त भर न देता धर्मप्रसाराच्या कामाला वाहून घेतले. तरीसुद्धा त्याने २७ वर्षात ३० भाषांतरे केली आणि त्यातील जवळजवळ सगळी आज उपलब्ध आहेत. अर्थात चीमनमधे. त्यातील काहींची नावे आहेत, १ लंकावतारासूत्र २ गयाशिर्ष ३ रत्नकुट ४ विद्यामात्रासिद्धिसूत्र ५ सताक्षरासूत्र.

५२४ साली बुद्धशांत नावाचा एक पंडीत चीनमधे आला त्याने चीनमधे अंदाजे २५ वर्षे व्यतीत केली असावीत असा अंदाज आहे. त्याने भाषांतर केलेले काही ग्रंथ आहेत, १ धशधर्मक २ अशोकदत्तव्याकरण ३ सिंहनाडीकासूत्र.. यानंतर प्राचीन नगरी बनारसमधून एक पंडीत चीनला गेला. त्याचे नाव होते गौतम प्राज्ञऋषी. याने तीन वर्षात १८ भाषांतरे केली. यातील बरीच ७३० सालापर्यंत उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे पण आता फक्त १३ ग्रंथांचाच उल्लेख सापडतो. त्याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे आहेत, १ व्यासपरीप्रिच्छा २ विमलदत्तापरिप्रिच्छा ३ एकश्लोकशास्त्र व चौथे अष्ठबुद्धकसूत्र.

त्या काळात राजा, राजापूत्र, राण्या, सरदार, श्रीमंत व्यापारी यांनी बौद्धधर्म स्विकारुन संघात प्रवेश घेतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आता राजाने राज्य कारभार सोडून संन्यास घ्यावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल कदाचित पण बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव प्रचंड होता याबद्दल दुमत असायचे कारण नाही. सर्वसंसार परित्याग करुन हे महान लोक सहजपणे श्रमण होत व धम्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत. याचे एक उदाहरण म्हणजे उद्यानच्या राजाच्या एका मुलाने सिंहासनाचा त्याग करुन संघाची वाट धरली होती. हे राज्य सध्याच्या गिलगिट भागात असावे. या राजपुत्राचे नाव होते उपशुन्य. त्याने नंतर चीनची वाट धरली. त्याने एकूण पाच ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील दोन आहेत, १ विमलकिर्तीनिर्देश २ सुविक्रांतविक्रमी सूत्र. याच भागातून अजून एक पंडीत चीनला गेला त्याचे नाव होते, विमोक्षप्रज्ञऋषी. हा कपिलवस्तूतील एका शाक्य कुटुंबातील होता. याने गौतमप्रज्ञऋषी नावाच्या दुसऱ्या एका महंताबरोबर पाच ग्रंथांवर काम केले. त्यातील दोन आहेत, १ विवादसमानशास्त्र २ त्रिपूर्णसूत्रोपदेश

सहावे शतक :
या काळात नरेंद्रयास, जिनगुप्त व त्यांचे आचार्य जिनयास्स व ज्ञानभद्र या महंतांनी चीनच्या बौद्धधर्मावर बराच प्रभाव टाकला. किंबहुना असे म्हणवे लागेल की जे काही बौद्धधर्माचे स्वरुप आज चीनमधे दिसते त्याचा पाया या महंतांनीच घातला. या काळात बौद्धधर्मप्रसारकांना चीनमधे फार छळ सहन करावा लागला. त्याकाळात चीनमधे अनेक घराणी विविध प्रदेशांवर राज्य करुन गेली. क्वचितच एखादे घराणे दीर्घकाळ राज्य करीत असे. धम्मद्वेष्टा राजा गादीवर आला की हे महंत अज्ञातवासात जात असत, लपून बसत व बौद्धधर्माचा पाठिराखा गादीवर आल्यावर परत आपले काम जोमात सुरु करीत.
यानंतर एक महत्वाचा महंत चीनमधे आला त्याचे नाव होते परमार्थ. या बौद्ध धर्मगुरुबद्दल बरीच माहिती चीनी ग्रंथात आढळते. हा नानजिंगला अंदाजे ५४८ साली आला. तो चीनमधे २१ वर्षे राहिला. तेवढ्या काळात त्याने एकूण ४० भाषांतरे केली. हा अंदाजे ५६९ साली मृत्यु पावला तेव्हा त्याचे वय होते ७१. भाषांतरामधे त्याचा क्रमांक चौथा लागतो. पहिले तीन आपण पाहिलेच आहेत. त्याने भाषांतरीत केलेल्या ग्रंथांवर प्रवचने दिली ती त्याच्या एका शिष्याने लिहून ठेवली. गंमत म्हणजे ती अस्सल चीनी भाषेत असल्यामुळे ती मूळ भाषांतरांपेक्षा मोठी झाली आहेत पण ती अचूक आहेत असे म्हणता येईल.

याचे अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे त्याने चीनी भाषिकांना समजेल अशी भाषा त्याच्या प्रवचनात व लेखनात वापरण्यास सुरुवात केली. त्याची काही उदाहरणे आपण नंतर वाचूयात. अगोदर तो कोण होता, कुठला होता हे आपण पाहू.
परमार्थ याचा एक लाडका चीनी शिष्य होता, ज्याचे नाव होते हुई-काई. याच्या भाच्याने परमार्थाचे एक चरित्र लिहिले होते. याच्यातून थोडीफार जी माहिती मिळते त्यातून हे स्पष्ट होते की हा चीनी नव्हता तर भारतीय होता. याचे पुर्वाश्रमीचे नाव होते कुलनाथ. याचा जन्म झाला होता मध्यभारतातील उज्जैनमधे. हा जन्माने ब्राह्मण असून त्याचे गोत्र भारद्वाज होते. त्या ग्रंथात लिहिले आहे की त्याची नितिमत्ता अत्यंत उंच दर्जाची होती. त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. साहित्य, जादू, चित्रकला व हस्तकलेमधे याने चांगले प्राविण्य मिळविले होते. परमार्थाने तारुण्यात काय केले याबद्दल कुठेही विशेष माहिती मिळत नाही. परंतू तो काळ त्याने निव्वळ अभ्यासात व्यतीत केला असावा. अनेक देश विदेशांचा प्रवास करीत त्याने फुनानमधे मुक्काम ठोकला. फुनान म्हणजे आत्ताचे दक्षिण व्हिएटनाम. (मेकाँग नदीचे खोरे) हा भाग त्याकाळात पूर्णपणे हिंदू होता. त्याकाळी चीनमधे राज्य करीत असलेल्या लिअँग घराण्याच्या वू नावाच्या राजाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अतोनात संपत्ती खर्च केली होती.

सम्राट वू

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशोदेशीचे अनेक बुद्धिमान महंत तो स्वखर्चाने चीनला आणत असे. या सम्राटाला जन्म-मृत्युच्या चक्रात अडकण्याची प्रचंड भिती वाटत असे. महायानामधे यावर काहीतरी उपाय सापडेल या आशेने त्याने अशा महंतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच शोधात फुनानमधून त्याला हे रत्न हाती लागले. ही माहिती खरी असावी कारण हा ग्रंथ ५९७ साली लिहिण्यात आला होता म्हणजे परमार्थ चीनला आल्यानंतर जेमतेम साठ वर्षांनी. या लेखकाचे नाव होते पाओ-कुई. याचाही मृत्यु परमार्थाच्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी झाला. त्यामुळे या लेखकाने लिहिलेली ही माहिती बऱ्यापैकी विश्र्वसनीय आहे. अलिकडे सापडलेल्या काही ग्रंथात परमार्थच्या चीनच्या प्रवासाची माहिती आढळते. त्यात सम्राट वूने मगधाच्या दरबारात काही प्रतिनिधी सूत्रे व ग्रंथ मिळविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळेस त्या प्रतिनिधींची गाठ कुलनाथाशी पडली. त्याने प्रथम चीनला जाण्यास ठाम नकार दिला पण बऱ्याच प्रयत्नांनंतर तो त्याच्या एका शिष्याबरोबर चीनला जाण्यासाठी जहाजात चढला. त्या शिष्याचे नावही दिले आहे – गौतम. त्यावेळेस त्याने मगध सम्राटाकडून लाकडात कोरलेली बुद्धाचे एक प्रतिमा चीनी सम्राटासाठी बरोबर घेतली. असे म्हणतात या प्रतिमेची नक्कलच मग सर्वदूर बुद्धाचे चित्र म्हणून प्रसारीत झाली.

परमार्थ नान्हाईला २५ सप्टेंबर ५४४६ या दिवशी पोहोचला. नान्हाई म्हणजे हल्लीचे कॅन्टन किंवा ग्वाझाऊ. ज्याचा चिनी अर्थ आहे तांदूळाचे शहर. जेव्हा तो दरबारात पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वत: सम्राट पुढे आला. एवढेच नव्हे तर आपल्याला वाचून आश्र्चर्य वाटेल, सम्राटाने परमार्थाला साष्टांग नमस्कार घातला. सम्राटाचे वय त्यावेळेस होते ८५. असे आजवर चीनमधे कधीच घडले नव्हते. त्यानंतर सम्राटाने परमार्थाशी एका मठात (पाओ-युन) चर्चा केली. दुर्दैवाने परमार्थाला सम्राटाविरुद्ध चाललेल्या बंडाळीची कल्पना आली नाही. टोबा जमातीच्या हौ-चिंग नावाच्या एका नेत्याने सम्राटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या रणधुमाळीत सम्राट वूची उपासमार करुन त्याचे हत्या करण्यात आली. त्या अगोदर परमार्थाला जेमतेम दहा महिने राजाश्रय मिळाला असेल नसेल. त्याने नानकिंगमधून पळ काढला व तो नानकिंगच्या आग्नेय दिशेला १५०० मैलावर असलेल्या सिॲओ पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे फुचुन प्रांताचा अधिपती असलेल्या लु-युआन-चे नावाच्या सरदाराने त्याला आश्रय दिला. यानेही नुकताच बौद्धधर्म स्विकारला होता. तेथे राजाश्रय मिळाल्यावर परमार्थाने परत एकदा आपले भाषांतराचे काम सुरु केले. त्यावेळेस अशा धामधुमीच्या कालातही त्याच्या हाताखाली वीस तज्ञ काम करीत होते यावरुन या कामाचे महत्व लक्षात येते. दुर्दैवाने यातील बरेच ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाले आहेत.

ज्या बंडखोराने वू सम्राटाची हत्या केली होती, अनेक मठ उध्वस्त केले होते त्याला आता बौद्धजनांचा पाठिंबा आवश्यक वाटू लागला. बौद्ध जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्याला बौद्धधर्मियांमधे मान आहे अशा परमार्थाला राजधानीत येण्याचे आमंत्रण दिले. नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता. यात हाऊ-चिंगचा दुसराही एक उद्देश होता. परमार्थाला जवळ ठेवून त्याच्यावर लक्षही ठेवता येणार होते व बौद्धधर्माचा अभ्यास त्याच्या दरबारी चालू आहे असा देखावाही ऊभा करत येणार होता. असो. परमार्थ राजधानीत पोहोचला. चारवर्षापूर्वी त्याने याच दरबारात मानाने पाऊल ठेवले होते. चार महिने हाऊ चिंगच्या दरबारात स्थानबद्धतेत काढल्यावर परत एकदा सत्ताबदल व रक्तपात परमार्थास पाहण्यास मिळाला. त्यानंतर सम्राट युआनच्या काळात मात्र परमार्थाने शहाणपणा करुन दरबार सोडला व नानकिंग शहरात चेंग-कुआनच्या मठात आसरा घेतला. तेथे त्याने सुवर्णप्रभाससूत्राचे भाषांतर केले. नंतरच्या काळात त्याने चीनमधे बराच प्रवास केला. त्याचे वर्णन करणे शक्य आहे पण वाचकांना कदाचित ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे म्हणून ते येथे देत नाही. पण प्रवासात पाओशिएन मठात त्याने मैत्रेयसूत्राचे व अजून एका सूत्राचे भाषांतर केले. दहा वर्षे प्रवास केल्यानंतर परमार्थाला आता घरी जाण्याची ओढ लागली असावी…. त्याच्या चरित्रात लेखक लिहितो…

‘‘ बौद्धधर्माचा एवढा प्रचंड अभ्यास केल्यानंतर, त्याच्या प्रसारासाठी एवढी पायपीट व समुद्र पार केल्यानंतर हळुहळु त्याला उमगले की त्याला जे पाहिजे होते ते या शिकवणीत मिळत नाही. बौद्धधर्माची शिकवण अपूर्ण आहे हे उमगताच तो खचला. खिन्नतेने त्याच्या विचारांवर मात केली. त्याने लंकासुखाला (मलेशियाला) जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी व शिष्यांनी त्याला तेथेच राहाण्याचा इतका आग्रह केला की त्यांचे मन त्याला मोडवेना. त्याने जहाजात चढण्याचा निर्णय रद्द केला व परत एकदा भाषांतराच्या कामाला लागला…. चीन सोडण्याचा विचार नंतर त्याच्या मनात अजून एकदा आला व त्यावेळी तो एका छोट्या बोटीतून प्रवासाला लागलाही पण त्याच्या दुर्दैवाने ती बोट उलट फिरलेल्या वाऱ्यामुळे परत किनाऱ्याला लागली. शेवटी शेवटी तर या सगळ्याचा कंटाळा येऊन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कँटनच्या उत्तरेला असलेल्या पर्वतात तो आत्महत्या करण्यास गेला असता त्याचा एक शिष्य अभिकोषधर्मावर प्रवचन देत होता. त्याला हे कळल्यावर त्याने डोंगरात धाव घेतली. असे म्हणतात तेथे खरोखरच पाठ शिवणीचा खेळ झाला. त्या प्रांताच्या राज्याधिकाऱ्यानेही काही सैनिक पाठविले व स्वत: तेथे हजर झाला. त्याने तर त्याच्यापुढे चक्क लोटांगण घातले व शेवटी काही दिवसांनी परमार्थाची मानसिक स्थिती मूळपदावर आली. दुर्दैवाने या आलेल्या झटक्यानंतर त्याचा अत्यंत लाडका शिष्य, हुई-काई एका आजारात मृत्युमुखी पडला. तो धक्का सहन न होऊन परमार्थही आजारी पडला व त्या आजारपणातच त्याचा अंत झाला. तेव्हा त्याचे वय होते ७१. दिवस होता १२ फेब्रुवारी ५६९. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार कँटनच्या बाहेर उरकण्यात आला व तेथे एक त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्तूपही उभारण्यात आला…

परमार्थाचे चीनीबौद्धधर्मातील व चीनी बौद्धजिवनातील योगदान काय यावर आपण थोडीशी माहिती घेऊ.
चीनमधे सहाव्या शतकात बरीच जुनीपुराणी माहिती गोळा करुन ग्रंथ लिहिण्यात आले.. एकाचे नाव होते काओ-सेंग-शुआन..म्हणजे थोर बौद्ध भिख्खूंची चरित्रे. यात या महंतांच्या तत्वज्ञाची माहिती तर आहेच पण ते सामान्य माणूस म्हणून कसे होते याबद्दलही माहिती आहे. दुसरा होता सु-काओ-सेंग चुआन, हा या ग्रंथाचा दुसरा भाग होता. या दोन्ही ग्रंथांवर फ्रेंच तज्ञांनी अतोनात कष्ट घेऊन काम केले आहे. आज या महंत/पंडीतांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती या ग्रंथांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे बेतलेली आहे.

लिअँग आणि चेन घराण्याची सत्ता असताना जी काही राजकीय उलथापालथ झाली त्यात परमार्थाने उच्चवर्गातील चीनी बुद्धिवंतांना योगाचाराची दिक्षा दिली. त्यांच्यामधे योगाचाराची गोडी निर्माण केली. त्याचा प्रभाव पार ह्युएनत्संगपर्यंत टिकला. आपल्याला कल्पना असेलच ह्युएनत्संगने योगाचाराचे एक विद्यापीठच काढले होते. हिंदूंचा योगाभ्यास आणि बौद्धांचा योगाचारामधे बराच फरक आहे. पण योगाचाराचा पाया योगाभ्यासच आहे असे मला वाटते. कारण चौथ्या-पाचव्या शतकात दोन ब्राह्मण बंधूंनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यांचा योगाभ्यास झालेला असणार. त्यांची नावे होती आसंग व वसूबंधू. यातील वसूबंधू हा पहिला योगाचारी म्हणून ओळखला जातो. चीनला जाण्याआधी परमार्थावर या दोघांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला असणार. (परमार्थांचा जन्म वसूबंधू नंतर १५० वर्षांनी झाला) किंवा म्हणूनच त्याला योगाचारात रस निर्माण झाला असावा. शिवाय वल्लभींच्या राज्यात तोपर्यंत योगाचाराच्या एका विद्यापीठाची अगोदरच स्थापना झाली होती. आपल्याकडे परंपरा जपण्याची तेव्हाची पद्धत लक्षात घेता परमार्थावर वसूबंधूचा प्रभाव पडणे सहज शक्य आहे. एक लक्षात घेतले पाहिजे हे तिघेही योगाचारी होण्याआधी महायानी होतेच. परमार्थाला ‘जाणीवेतून केलेले कर्म आणि त्या दोन्हीचे अध्यात्मिक साक्षात्काराशी असलेले नाते’ याचे विश्र्लेषण करण्यात अत्यंत रस होता. तो विचारे, ‘‘जर मनुष्य स्वभाव मूळत: चांगला आहे व प्रत्येकजण अध्यात्मिक साक्षात्कारास पात्र आहे तर मग मनुष्यप्राणी यावर विश्र्वास का ठेवत नाही आणि साक्षात्कारी माणसांसारखे का वागत नाहीत?’’ महायनाच्या मुळापाशी हाच प्रश्र्न आहे आणि ज्यावर परमार्थाने आयुष्यभर विचार केला. शेवटी काय झाले हे आपण पाहिलेच आहे. योगाचारामुळे त्याच्यावर चीनमधे भरपूर टीकाही झाली पण शेवटी ताओवाद्यांना व कनफ्युशियस तत्वज्ञानी यांच्यावरही योगाचाराचा थोडासा का होईना प्रभाव पडलाच. हे यश परमार्थाचेच म्हणावे लागेल. हे तत्वज्ञान परदेशातील लोकांना सांगणे किती अवघड आहे हे आपणाला माहितच आहे. उदा. पाश्चिमात्य तत्वज्ञानात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे जो बघतो ते सब्जेक्ट आणि जे दिसते ते ऑब्जेक्ट. पण योगाचारामधे ग्राहक आणि ग्राह्य ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत आकलक आणि आकलन. तुम्ही एखादी वस्तू बघितलीत पण त्याचे आकलन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एखादा रंगांधळा लाल रंगाला करडा रंग म्हणतो तर तुम्ही लाल….मला हे थोडक्यात चांगले समजवून सांगता येणे अवघड आहे. पण हा सर्व चित्ताच्या पटलावरील प्रतिमांचा खेळ आहे असे योगाचारी त्या काळात मानत. उदा मी डोळे मिटले मग माझ्यापुरता समोरचा डोंगर अस्तित्वात नाही…इ.इ.इ. आत्ताचे माहीत नाही. त्यातही बराच बदल झालाच असेल. असो. तर असे हे तत्वज्ञान त्या धामधुमीच्या काळात चीनी बुद्धिमान लोकांना समजवून सांगणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करु शकतो. शिवाय हे सगळे चीनी भाषेत.

उज्जैनचा हा ब्राह्मण श्रमण होतो. धम्माचा अभ्यास करतो. त्यातूनही अवघड अशा योगाचाराचा अभ्यास करुन परदेशी जातो, व तेथे भव्य, दिव्य कार्य करतो…याचे काय स्मारक उज्जैन मधे आहे? त्याचे कोणी वंशज आहेत का? त्याच्या तारुण्यातील वर्षांचा हिशेब लागत नाही तो लागेल का ? असे अनेक प्रश्र्न माझ्या मनात येतात. मीही कल्पनेने त्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो…..

यानंतर चीनमधे आला नरेंद्रयास्स.
नरेंद्रयास्स यांचे चरित्र आपल्याला चीनी सिऊ काओ सेंग त्सुआन या ग्रंथात वाचण्यास मिळते. हा उद्यानचा रहिवासी होता. याने भारतभर प्रवास केला होता. तो श्रीलंकेलाही जाऊन आला. त्यानंतर त्याने चीनला जाण्याचे ठरविले. पाच सहाय्यकांबरोबर त्याने हिंदूकुश पर्वत रांगा चढण्यास सुरुवात केली. लवकरव त्यांच्या समोर दोन रस्ते उभे ठाकले. एक रस्ता जो अत्यंत कठीण होता तो माणसांसाठी होता आणि जो सोपा होता त्यावर राक्षसांचा वास होता. म्हणजे बहुदा चोर, दरोडेखोरंच्या टोळ्या यांचा वास असावा. बरेच वाटसरू, व्यापारी सोपा मार्ग पकडत व लुटले जात किंवा मारले जात. या फाट्यावर एका राजाने वैश्रमणाचा एक भव्य पुतळा उभा केला होता. हा पुतळा ज्या दिशेला बोट दाखवित असे तो मार्ग बरोबर असा संकेत होता. यांच्याबरोबर जे श्रमण होते त्यातील एकाने नजरचुकीने चुकीचा मार्ग पकडला. अवलोकितेश्र्वराची प्रार्थना करुन जेव्हा त्याने त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत त्या रस्त्यावर सापडले. त्या काळात त्या भागात तूर्की वंशाच्या लोकांच्या चीनी लोकांशी चकमकी चालू होत्या. त्या संकटांवर मात करुन तो चीनच्या राजधानीत पोहोचला अंदाजे ५५६ मधे. त्यावेळेस त्याचे वय होते ४०. चीनमधे आल्यावर त्याने तिएन-पिंग मठात राहण्यास सुरुवात केली व अर्थातच भाषांतराचे काम हाती घेतले. असे कित्येक ग्रंथ अहेत जे भारतातून नष्ट झाले होते पण चीनमधे शाबूत होते. त्या चीनी ग्रंथांचे फ्रेंच अभ्यासकांनी फ्रेंच भाषेत भाषांतर केले जे परत संस्कृतमधे भाषांतरीत करण्यात आले आहेत. नरेंद्रयास्साने ज्या ग्रंथांचे भाषातर केले त्यातील काही – १ पो-सुकिएन चे सुन मेइ किंग २ युई त्संग किंग ३ युईतेंग सान मी किंग…व अजून चार आहेत. दुर्दैवाने तार्तार वंशीय चाऊ घराण्याची सत्ता आल्यावर हे सगळे चित्र पालटले. त्यावेळचा चाऊ राजा हा बुद्धाचा द्वेष करीत असे. सम्राट वौ’ने बुद्धधर्म चीनमधून हद्दपारच केला असे म्हणायला हरकत नाही. सगळे धर्मगुरु, श्रमण, पंडीत त्यामुळे अज्ञातवासात गेले किंवा परत आपल्या मूळस्थानी गेले. सुदैवाने त्यानंतर गादीवर आलेले सुई घराणे हे बौद्धधर्माचे आश्रयदाते असल्यामुळे परत एकदा धर्माने चीनमधे जोर धरला. परत आलेल्या श्रमणांनी आपल्याबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ आणले होते त्याचे भाषांतर करण्यासाठी नरेंद्रयस्साचे नाव पुढे आले. त्याला अज्ञातवासातून सन्मानाने परत राजधानीमधे बोलाविण्यात आले व नवीन ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी तीस श्रमणांना त्याच्या हाताखाली देण्यात आले. या सहाय्यकांच्या मदतीने त्याने तीन वर्षात आठ ग्रंथांचे भाषांतर केले. मी जेव्हा ग्रंथ म्हणतो तेव्हा पानांची संख्या हा आधार न धरता विषय हा आधार धरला आहे. काही शेकडो पानांचे असतील तर काही थोड्या पानांचे असावेत. या चमूने केलेले भाषांतर तेवढे समाधानकारक नसल्यामुळे अजून एका पंडीताला शोधून काढण्यात आले. हाही त्या काळात भूमिगत झाला होता. त्याचे नाव होते जिनगुप्त. त्यावेळेस नरेंद्रयास्स कुआन झी मठात रहात होता.

जिनगुप्त येईपर्यंत भाषांतराचे काम स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर चारच वर्षांनी या थोर माणसाचा मृत्यु झाला. थोर यासाठी की त्याने अत्यंत कठीण काळात बौद्धधर्माची पताका फडकत ठेवली होती. भुमिगत राहून एखाद्या क्रांतीकारकांसारखे त्याने श्रमणांचे जाळे विणले. त्याने हे जे मोठे काम केले त्यासाठी त्याच्या असमाधानकारक भाषांतराला क्षमा केली पाहिजे……

चीनी बुद्धाची प्रतिमा..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

” मी मागे वळून बघतो तेव्हा मी ज्या प्रसंगातून गेलो ते आठवून मलाच घाम फुटतो. कल्पना करता येणार नाही अशा संकटाना तोंड देत मी अनेक खडतर मार्गाने धोकादायक जागी प्रवास केला. हे करताना मी कधीच स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही कारण माझ्यासमोर एक निश्चित ध्येय होते. व ते साध्य करण्यासाठी मी सरळमार्गांचाच वापर केला…. जे मला मिळवायचे आहे त्याच्या दहा हजाराव्वा हिस्सातरी मिळेलच अशा आशेने मी ज्याठिकाणी मृत्यु अटळ आहे अशा ठिकाणीही त्याला मोठ्या धैर्याने सामोरा गेलो……
….फा-शिएन.

फा-शिएनचे हे वाक्य भारतीय पंडितांनाही लागू पडते.

५५७ साली भारतातून चार पंडीत चीनला पोहोचले. म्हणजे निघाले होते दहा पण त्यातील चार जण जिवंतपणे चीनला पोहोचले. त्यांची नावे होती –
१ ज्ञानभद्र २ जिनायास्स ३ यशोगुप्त आइ ४ जिनगुप्त. पहिले दोन शेवटच्या दोघांचे आचार्य होते. वर म्हटल्याप्रमाणे या चौघांनी दहाजणांचा एक चमू तयार केला व चीनसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानभद्राने चीनमधे आल्यावर विशेष कार्य केलेले आढळत नाही. त्याने फक्त एकाच ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले ते म्हणजे पंचविद्याशास्त्र. यात त्याने त्याच्या शिष्यांची मदत घेतली अशी नोंद चीनी इतिहासात आढळते.

जिनयास्स : आचार्य जिनयास्सांनी त्यांच्या शिष्यांच्या मदतीने सहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील फक्त दोन ग्रंथांची नावे सध्या ज्ञात आहेत. १ महामेघसूत्र २ महायानाभिस्मय सूत्र. यशोगुप्ताने आपल्या आचार्यांच्या हाताखाली दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ अवलोकितेश्र्वरासमुखाधारिणी हा भारताच्या कुठल्या भागातून गेला होता ते कळत नाही. तो जेथून आला त्याचे नाव चीनी इतिहासात लिहिले आहे, पण हे ‘यिऊ-पो’ कोठे आहे हे समजत नाही.

शेवटचा पण महत्वाचा पंडीत आहे – जिनगुप्त किंवा ज्ञानगुप्त.

जिनगुप्त

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या पंडितांबद्दल माहिती मिळते ती ताओ-सिआन नावाच्या लेखकाने ६५० साली प्रकाशित केलेल्या एका ग्रंथात. या ग्रंथाचे नाव आहे सियु-काओ-सेंग-चाऊआन. इतर ग्रंथांतून माहिती गोळा करुन त्याचे चरित्र लिहिले असा उल्लेख त्याने त्या ग्रंथात केला आहे. म्हणजे हा पंडीत महत्वाचा असला पाहिजे. जिनगुप्तांनी एकूण ३६ ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील सगळ्यात महत्वाचे आहेत बुद्धचरित व सद्धर्मपुंडरिकासूत्र. बुद्धचरित लिहून त्याने कुमारजीव आणि इतरांबरोबर स्थान मिळविले असे म्हणायला हरकत नाही. हा अफगाणिस्तानमधील (सध्याचे पाकिस्तान) पेशावरचा एक श्रमण होता. त्याच्या घराण्याचे नाव होते कंभू. जातीने हा क्षत्रिय असून त्याच्या वडिलांचे नाव होते वज्रसार. घरातील सगळ्यात लहान असलेल्या या मुलात पहिल्यापासूनच विरक्तीचा भाव दिसू लागला होता. असे म्हणतात वयाच्या सातव्या वर्षीच त्याने वडिलांकडे श्रमण होण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याच्या वडिलांनी ती दिली. त्यांची परवानगी घेऊन त्याने महावन मठात प्रवेश घेतला. तेथेच त्याला आचार्य ज्ञानभद्र आणि जिनयास्स यांची शिकवण लाभली. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचे भवितव्य घडले. तो २७ वर्षांचा असतानाच त्याच्या आचार्यांनी चीनला धम्म प्रसारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या शिष्यांनाही बरोबर घेतले. त्यांचा मार्ग बिकट व खडतर होता. त्यांनी रस्त्यात कपिचा नावाच्या शहरात एक वर्ष मुक्काम केला. या खडतर प्रवासात जिनगुप्ताने आपल्या आचार्यांची चांगली काळजी घेतली. खोतान पार करुन ते अखेरीस ५५७ साली चीनला पोहोचले. दुर्दैवाने दहापैकी हे चारचजण तग धरु शकले. ५५९-५६० याच काळात केव्हातरी जिनगुप्त चँगॲनला आला व चाओतांग मठात राहिला. राजधानीत स्थानिकांत मिळून मिसळून राहिल्यामुळे तो लवकरच चीनी शिकला. त्या काळात चँगॲनला मिंग घराण्याचे राज्य होते. त्यांनी या चौघांसाठी एक नवीन मठ बांधला. त्याच मठात हे चौघे भाषांतराचे काम करु लागले. त्यांनी भाषांतर केलेल्या अवघड ग्रंथाची नावे आहेत – कनकवर्णऋषी परिप्रच्छसूत्र आणि अवलोकितेश्र्वर सूत्र.

जिनगुप्ताच्या न्यायी स्वभावामुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि प्रथमच एका भारतीय माणसाला एका सुभ्याचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या जबाबदारीतून वेळ काढून त्याने अजून दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
दुर्दैवाने याच सुमारास चाऊ घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी बौद्धधर्माचा राजाश्रय काढून घेतला. नुसता काढून घेतला नाही तर बौद्धांना चीनमधून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या राजकीय धुमाळीत अनेक पंडितांना, मठवासियांना चीनमधून हुसकावून लावण्यात आले. जिनगुप्तही या वादळाला पाठ देत मध्य एशियात पोहोचले. (सध्याचा उगुर प्रांत). त्याचवेळी भारतातून काही चीनी भिक्खू चीनला परतत होते. चीनी राज्यसत्ता बौद्धांच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे कुठे जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. त्यांची आणि जिनगुप्ताची त्याच प्रांतात गाठ पडली. त्यांनी भारतातून जवळजवळ २०० ग्रंथ आणले होते. त्यांनी जिनगुप्तास त्यांचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांना प्रथम जिनगुप्त हा साधासुधा श्रमण आहे असे वाटले पण लवकरच त्यांना त्याचे ज्ञान किती सखोल आहे हे कळले. त्यांनी त्याला धम्माचा प्रसार करु असे वचन दिले. ५८१ साली धम्मावर दाटलेले काळे ढग हटले आणि राज्यसत्ता सुई घराण्याच्या हातात गेली. हे घराणे बौद्धधर्माचे मोठे पाठिराखे होते. तात्कालिन राजाने ताबडतोब एक समिती नेमली व भाषांतराचे काम सुरु करण्याची अनुमती दिली. या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद नरेंद्रयास्स यांना देण्यात आले होते असा उल्लेख सापडतो. या समितीचे काम समाधानकारक न वाटल्यामुळे इतर भिक्खूंनी सम्राटाची गाठ घेतली व त्याला जिनगुप्तास उगुरमधून बोलाविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन सम्राटाने ताबडतोब तसे आज्ञापत्र रवाना केले. इकडे जिनगुप्तासही चीनला परतायचे वेध लागले होते. ते आज्ञापत्र मिळताच तो लगबगीने चीनला परतला. तो आल्यावर त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्याला सहाय्य करण्यासाठी धर्मगुप्त व दोन चीनी श्रमणांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर दहा चीनी श्रमणांची हे भाषांतर तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली. यांचे काम त्या भाषांतरात मूळचा भाव जपला जात आहे की नाही हे तपासण्याचे होते. ते यासाठी जिनगुप्तांशी चर्चा करीत व आवश्यक त्या सुधारणा करीत. यामुळे भाषांतरे बरीच अचुक होऊ लागली. एवढेच नाही तर भाषांतराची शैली मूळ चीनी वाटावी यासाठी अजून दोन साहित्यिक श्रमणांचीही नेमणूक करण्यात आली. हा असा शास्त्रशुद्ध भाषांतराचा प्रकार चीनमधे प्रथमच होत होता. लवकरच जिनगुप्ताची नेमणूक तेंग घराण्याच्या राजगुरुपदी करण्यात आली आणि बौद्धधर्माची पताका परत एकदा फडकू लागली. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या एकंदरीत ३७ भरते व त्यात एकूण १६६ प्रकरणे अंतर्भूत होती. त्यातील काहींची नावे अशी-
१ बुद्धचरित्र २ फा-किऊ ३ वी-तो ४ राष्ट्रपालपरिपृच्छसूत्र ५ भद्रपालश्रेष्ठीपरिपृच्छ सूत्र आणि इतर. ( सगळी नावे उपलब्ध आहेत पण विस्तारभयापोटी येथे देत नाही.)

सम्राट चाऊने जिनगुप्तास काही भारतीय खगोलशास्त्रांवरील ग्रंथांचे भाषांतर करण्यास सांगितले. त्यात एकूण २०० प्रकरणांचे भाषांतर करण्यात आले. साल होते ५९२ ! भारतातून चीनमधे या मार्गाने आणि प्रकाराने कुठले कुठले ज्ञान-विज्ञान गेले हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जिनगुप्ताचा सहाशे साली ७८व्या वर्षी मृत्यु झाला. जिनगुप्ताने धम्मासाठी खूपच हालआपेष्टा काढल्या पण धम्मापासून तो कधीही ढळला नाही आणि ना त्याच्या मनात भारतात परत जायचा कधी विचार आला.

५०० ते ६०० या काळात भारतातून नाव घेण्याजोगे अजून तीन धर्मगुरु चीनला गेले. १ गौतम धर्मज्ञान. हा पूर्वी चीनला गेलेल्या गौतमाऋषींचा सगळ्यात थोरला मुलगा. अर्थातच तो बनारसचा होता. चीनमधे गेल्यावर त्यावेळच्या सम्राटाने त्याच्यावर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या ज्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एकदा तर तो एका प्रांताचा सुभेदारही झाला. त्याने एक ग्रंथ चीनी भाषेत लिहिला ज्याचा विषय होता – विविध प्रकारच्या कर्माचे होणारे विविध परिणाम.
दुसरा धर्मगुरु होता विनितऋषी. हा उद्यानदेशीचा श्रमण ५८२ साली चीनला पोहोचला व त्याने दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ गयशीर्षसूत्र आणि २ महायानवैपुल्यधारिणीसूत्र.

या शतकातील चीनला जाणारा शेवटचा श्रमण होता धर्मगुप्त. हाही जिनगुप्त ज्या मार्गाने चीनला आला त्याच मार्गाने चीनमधे आला. त्याने एकूण दहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील काहींची नावे – १ वज्रछेदिकाप्रज्ञपरिमितासूत्र २ निदानसूत्र ३ निदानशास्त्र…

ह्युएनत्संग व इ-शिंगचा काळ ( ६००-७००)

या शतकात पहिला श्रमण चीनला पोहोचला त्याचे नाव होते प्रभाकरमित्र. मध्यभारतातील एका क्षत्रिय कुटुंबातील या श्रमणाने चीनमधे पाऊल ठेवले त्यावेळेस थान घराण्याचे राज्य चालू होते. त्याने तीन ग्रंथाचे भाषांतर केले व चीनमधे वयाच्या ६९व्या वर्षी देह ठेवला. त्याने लिहिलेल्या ग्रंथाची नावे – रत्नताराधारिणीसूत्र २ प्रज्ञाप्रदीपशास्त्रटिका ३ सुत्रालंकारटिका. हा चीनला गेला त्यानंतर दोनच वर्षांनी ह्युएनत्संगने त्याच्या भारतयात्रेस सुरुवात केली. अंदाजे ६५२ साली एका नवीन पंडीताने चीनला भेट दिली. त्याचे नाव होते अतिगुप्त. याला दोन वर्षात एकाच ग्रंथाचे भाषांतर करता आले. – धारिणीसंग्रहसूत्र. यानंतर चीनला गेला ‘नाडी’ नावाचा पंडीत. याने भारत, श्रीलंका येथे फिरुन १५०० हिनयान व महायान पंथाचे बौद्ध ग्रंथ जमा केले होते. याच पंडीताला चीनी सम्राटाने कुठलेतरी औषध शोधण्यासाठी परदेशी पाठविले होते. चीनमधे परतल्यावर त्याने तीन ग्रंथ लिहिले. १ सिंहव्युहराजाबोधिसत्वपरिपृच्छसूत्र २ विमलज्ञानबोधिसत्व ३ माहीत नाही…

यानंतर अजून एका दिवाकर नावाच्या पंडिताने मध्यभारतातून चीनमधे पाऊल ठेवले. त्याने बारा वर्षे चीनमधे काढली ज्या काळात त्याने १८ ग्रंथांचे भाषांतर केले. यानंतर गेला रत्नचित. हा काश्मिरचा रहिवासी होता. ६९३-७०६ या काळात त्याने सात ग्रंथांचे भाषांतर केले. तो वयाच्या १००व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला. . दुसऱ्याचे नाव होते धर्मऋषी किंवा धर्मरुची. हा काश्यप गोत्र असलेला पंडीत दक्षिण भारतातून आला होता. चालुक्यांच्या दरबारात असलेल्या चीनी राजदूताने विनंती केल्यावर सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी अजून एका थोर पंडिताने चीनमधे प्रवेश केला. चीनी सम्राटाने याचे नाव बदलून बोधीरुची असे ठेवले.याने जवळजवळ ५३ ग्रंथांवर टिका लिहिली. आज दुर्दैवाने यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. अजून एक गंमत म्हणजे असे म्हटले जाते की मृत्युसमयी त्याचे वय १५६ होते.

आठव्या शतकात प्रमिती नावाचा एक श्रमण मध्यभारतातून चीनला गेला. हाही एक उत्तम भाषांतरकार होता. ( याने परवानगी नसताना काही ग्रंथ नालंदामधून चीनला नेले असे मी कुठेतरी वाचलेले स्मरते. पण खात्री नाही) त्याने एकाच ग्रंथाचे भाषांतर केले पण ते उत्तम होते. त्याचे नाव लांबलचक होते. – महा-बुद्धोश्निश-तथागत-गुह्य-हेतू-साक्षातक्रिता-प्रसन्नार्थ-सर्व-बोधीसत्वकार्या-सुरंगमसूत्र.

याच्यानंतर वज्रबोधी नावाचा पंडीत चीनमधे गेला.
वज्रबोधी…

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

केरळचा हा ब्राह्मण ७१९ साली चीनला पोहोचला आणि त्याने चार पुस्तकांचे भाषांतर केले. असे म्हणतात शाओलिन मठात यानेच चीनी मार्शल आर्टचा पाया घातला. निश्चित नाही. ( हा योगसामर्थ्याने त्याचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असे असा प्रवाद आहे.) हा ७१व्या वर्षी हा चीनमधे मरण पावला.

नंतर एक पंडीत नालंदामधून पाठवला गेला. त्याचे नाव होते शुभाकरसिंह. याने बरोबर चार ग्रंथ आणले होते ज्याचे त्याने भाषांतर केले. हाही त्याच्या वयाच्या ९९व्या वर्षी चीनमधे मृत्यु पावला.

यानंतर अमोघवज्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध व महत्वाचा पंडीत चीनमधे गेला.
अमोघवज्र

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

याचे गुरु होते वर उल्लेख झालेले वज्रबोधी. याने भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे जो काही तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. याने अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. याने नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.

वज्रबोधी होते दक्षिण भारतातील, अमोघवज्र होता उत्तर भारतातील. म्हणजे त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादि. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.

७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वत:ला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात मला वटते हा एकमेव पंडीत होता ज्याने एवढे भव्यदिव्य काम केले. तो स्वत: तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत आहे. त्यावरुन त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

१ महामयुरीविद्या रागिणी २ कुंडीधारिणी ३ मारिचीधर्म ४ मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र ५ गाताअनंतामुख धारिणी. ६ सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी ७ महर्षी सूत्र ८ महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र. ९ गांगुलीविद्या १० रत्नमेघ धारिणी ११ सालिसंभवसूत्र १२ राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता १३ महामेघसूत्र १४ घनव्युहसूत्र १५ पर्णसवारी धारिणी. १६ वैश्रमणदिव्यराजा सूत्र १७ मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया १८ पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख १९ अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी २० अष्ट मंडलसूत्र २१ चक्षूरविशोधन विद्या धारिणी २२ सर्व रोगप्रसन्न धारिणी २३ गवलप्रसनन धारिणी २४ योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी २५ एकाकुधार्या धारिणी २६ अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र २७ नीतिशास्त्र सूत्र २८ तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी २९ ओ-लो-तो-लो धारिणी ३० अश्निशचक्रवर्ती तंत्र ३१ बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र ३२ बोधीमंदव्युह धारिणी ३३ प्रज्ञापारमिताअर्धसटीका ३४ वज्रशेखरयोगा सूत्र ३५ महाप्रतिसार धारिणी ३६ गरुडगर्भराजा तंत्र ३७ वज्र-कुमार-तंत्र ३८ सामंतनिदानसूत्र ३९ महायान-निदानसूत्र ४० हारितीमात्रिमंत्रकल्प ४१ सर्व धारिणींची एक सुत्री….

एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग… यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करुन घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करुन अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.

नवव्या शतकात म्हणजे ८०० ते ९०० या काळात भारतातून चीनला जाणाऱ्या पंडितांची संख्या अचानक कमी का झाली ते कळत नाही. मी जो दशकुमारचरितमचा अनुवाद केला, त्यात मला बौद्धधर्माबद्दल फार चांगले लिहिलेले आढळत नाही. अर्थात ते हिंदू पंडिताने लिहिले असल्यामुळे मी समजू शकतो. पण कदाचित सामान्य माणसाच्या नजरेतून धम्म उतरत चालला होता हे निश्चित. या शतकात एकही पंडीत भारतातून चीनमधे गेला नाही. कदाचित असेही कारण असेल की त्यांना चीनमधून कोणी बोलावले नसेल ….

हळूहळू भारतातून चीनला जाणाऱ्या बौद्ध श्रमणांची व पंडीतांच्या संख्येला ओहोटी लागत होती. पुढच्या शतकात चीनी इतिहासात भारतातून ९७२ साली फक्त तीन पंडीत आल्याची नोंद सापडते. त्यांची भारतीय नावेही माहीत नाहीत. १ कोचे २ फुकीं ३ चेने-ली.

९७३ साली धर्मदेव नावाचा अजून एक महान पंडीत चीनमधे आला. त्याची कीर्ति त्यावेळच्या सम्राटापर्यंत (सुंग घराणे) पोहोचल्यावर त्याला दरबारात बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला. याच काळात लाकडावर ग्रंथ कोरुन त्यापासून पुस्तके छापण्याची प्रक्रिया चालू झाली. एकूण १३०,००० फळ्या तयार करण्यात आल्या ज्यापासून मग त्रिपिटकाची पुस्तके छापण्यात आली. धर्मदेवाने ९७३ साली भाषांतराचे काम सुरु केले आणि ९८१ पर्यंत त्याने ४६ ग्रंथांचे भाषांतर केले. या भाषांतरातही धारिणींचा भरणा आहे कारण त्याकाळात त्रांत्रिकमार्गाचा पगडा चीनी जनमानसावर बसला होता. धर्मदेवाने अजून एका लोकप्रिय ग्रंथाचे भाषांतर केले – सुखावती-व्युह. या महायानी ग्रंथात स्वर्गाचे वर्णन आहे. धर्मदेवाचा मृत्यु १००१ साली झाला. या महान पंडीतालाही मरणोत्तर अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले.

९७५ साली पश्र्चिम भारतातून एक मंजुश्री नावाचा राजपूत्र चीनमधे श्रमण बनून गेला व त्याने नुकत्याच निवर्तलेल्या चीनी सम्राटाला श्रद्धांजली वाहिली असा एक उल्लेखही सापडतो. हा चीनमधे आल्यावर सिअँग-कोनो मठात राहिला होता. तेथे त्याच्या स्वभावामुळे तो खूपच लोकप्रिय झाला. इतर भिक्खूंना मत्सर वाटल्यामुळे त्यांनी सम्राटाला जाऊन सांगितले की त्याला भारतात परत जायचे आहे. या राजपुत्राला अजून चीनी समजत नसल्यामुळे त्याच्यात चीनी सम्राटात संवाद होऊ शकला नाही. सम्राटाने भारतात जाण्याचा आदेश काढल्यावर मंजुश्रीची चडफड झाली पण दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याने भारताचा रस्ता पकडला असे म्हणतात पण तो भारतात आला नाही. तो कुठे नाहीसा झाला याबद्दल इतिहासात उल्लेख नाही.

९८० साली अजून दोन पंडीत काश्मिरमधून चीनला गेले. एकाचे नाव होते दानपाल आणि दुसऱ्याचे चीनी नाव होते – तिनशीत्साई. पण दुसऱ्या एका ग्रंथात तो जालंदर येथील एका मठाचा श्रमण होता असाही उल्लेख होता. त्याने जवळजवळ वीस वर्षे चीनमधे काम केले. त्याने भाषांतर केलेल्या ग्रथात एक महत्वाचा ग्रंथ होता ज्याचे नाव होते धर्मपद. याचे भाषांतर मंगोलि भाषेतही झाले आहे. याचा मृत्यु १००० साली झाला.

दानपाल उद्यान देशातून चीनला गेला होता. त्यानेही तेथे बरेच काम केले. हा दरबारात असताना सुंग सम्राटाला पश्चिम भारतातील एका राजाचे पत्र आले. एका श्रमणाने ते आणले होते. ते त्याने याला वाचण्यास सांगितले अशी नोंद आहे. त्या पत्रात तो राजा म्हणतो, ‘‘ मी असे ऐकले आहे की चीनमधे परमेश्र्वराचा अंश असलेला एक राजा राज्य करतो. मी स्वत: आपल्याला भेटण्यास येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो. कोअँगयिन (ज्या श्रमणाने ते पत्र आणले होते त्याचे नाव ) याने आपल्या कृपेने तथागताच्या रत्नजडीत सिंहासनावर कास्याची दक्षिणा चढविली आहे. त्याच्या बरोबर मी आपल्यासाठी तथागताचा अवशेष पाठवीत आहे… पत्रातील चीनमधील इतर पंडितांचे पत्तेही वाचण्यात आले अशी नोंद आहे. या पंडिताने १११ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले असे मानले जाते. धारिणी चीनमधे लोकप्रिय होण्यामागे याच्या भाषांतराचा मोठा सहभाग होता.

सुंग घराण्याच्या इतिहासात अजून एका श्रमणाची नोंद आहे ज्यात हा श्रमण स्वत:बद्दल सांगतो, ‘‘ मी तॉ-लो-मेनचा श्रमण आहे. माझे नाव यँक-चो आहे. भारतातील लि-टे नावाच्या देशातून मी आलो. या देशाचा राजा या-लो-ऑन-टे असे आहे. माझे गाव अ-जों-इ-टो ( अजंठा?) आहे आणि माझ्या पत्नीचे नाव मो-हि-नी आहे.’’ श्रमण असून विवाहीत कसा हे समजत नाही.

यानंतर ९९० साली नालंदामधून अजून एक श्रमण चीनमधे आला. त्याचे नाव होते पाऊकिटो. त्याने बुद्धाचे काही अवशेष सम्राटासाठी आणले होते अशी नोंद सापडते. ९९५ साली मध्य भारतातून एक श्रमण चीनमधे आला त्याचे नाव होते कालकांती. त्याने भूर्जपत्रावर लिहिलेले काही ग्रंथ चीनमधे आणले. नंतर ९९७ साली राहुल नावाचा एक श्रमण पश्चिम भारतातून चीनला गेला. त्यानेही काही पवित्र ग्रंथ चीनच्या सम्राटाला अर्पण केले. त्या शतकातील शेवटचा श्रमण होता नि-वी-नी. यानेही काही ग्रंथ बरोबर नेले पण त्याचे पुढे काय झाले याची इतिहासात नोंद नाही.

१०००-११०० या शतकात या सगळ्या प्रकाराला ओहोटी लागली. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे भारतावर झालेले आक्रमण. त्यामुळे भारतात बुद्धाचा अहिंसेचा संदेश मला वाटते लोकांच्या पचनी पडेनासा झाला. तसेच इस्लाम धर्माच्या वादळी आक्रमक हिंसाचाराने मध्य आशिया व्यापून टाकला. चीनला जाण्याच्या मार्गावर अनेक श्रमणांची कत्तल झाली व त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्यासाचा यात बळी गेला. १००४ साली मगधाहून धर्मरक्षाने चीनला भेट दिली. त्याने काही ग्रंथ बरोबर नेले होते. त्यांचे भाषांतर करुन त्याने वयाच्या ९६व्या वर्षी चीनमधेच देह ठेवला. अधूनमधून एखादा श्रमण चीनला जात होता, नाही असे नाही पण ती परंपरा खंडीत होण्याच्या मार्गावर होती हे नाकारण्यात अर्थ नाही.

शेवटचा श्रमण, ज्ञानश्री चीनमधे गेला १०५३ साली. त्यानंतर त्या ज्ञानाच्या मार्गावर अंध:कार पसरला तो पसरलाच…
या सर्व श्रमणांनी चीनला काय दिले? मुख्य म्हणजे त्यांनी चीनला धर्म दिला. चित्रकला, मुर्तिकला, दिली. चीनमधील कित्येक गुहांमधे असलेली चित्रे भारतातील अजंठाच्या चित्रकलेशी साम्य दाखवतात. हळूहळू ज्ञानी पंडीत नामशेष झाले. इतके नामशेष झाले की मंगोल बादशहा (चीनच्या प्रांताचा) कुबलाईखानला काही ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी बौद्ध धर्मगुरु/पंडीत पाहिजे होता. त्याला शोधून एकही तसा माणूस भारतात सापडला नाही….

(चेंगिजखान स्वत: बौद्ध नव्हता पण त्याला बौद्ध धर्माची पूर्ण कल्पना होती. त्याचा लडाखमधील लामांशी सतत संपर्क असे. तो त्यांना त्याच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगे. चेंगिजखानचे कित्येक सरदार, मंत्री हे बौद्ध होते व असे म्हणतात त्यांनी त्याच्या काळातच एक पाच मजली बौद्ध मठ बांधण्यास घेतला होता. कुबलाईखान हा त्याचा नातू. ज्याने आपले लहानपण त्याच्या आजोबांबरोबर घालविले, तो नंतर चीनचा सम्राट झाला त्याने त्यामुळे बौद्धधर्माला उदार आश्रय दिला होता. असो. चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी….)

चीनी बुद्ध साल ५८१-६१७.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन करुन ही लेखमालिका संपली असे जाहीर करतो.
प्राचीन दिपांकर बुद्धाला वंदन असो.
वैदुर्यप्रभास बुद्धाला वंदन असो.
शाक्यमूनी बुद्धाला वंदन असो.
भूत वर्तमान व भविष्यकाळांच्या बुद्धाला वंदन असो.
आनंदी बुद्धाला वंदन असो.
विरोचन बुद्धाला वंदन असो.
रामध्वजराजा बुद्धाला वंदन असो
मैत्रेय बुद्धाला वंदन असो.
अमिताभ बुद्धाला वंदन असो
सत्याचा मार्ग दाखवणार्‍या बुद्धाला वंदन असो.
अमर वज्र बुद्धाला वंदन असो
रत्नप्रभास बुद्धाला वंदन असो.
नागराज बुद्धाला वंदन असो.
वरूण बुद्धाला वंदन असो.
नारायण बुद्धाला वंदन असो.
पुण्यपूष्प बुद्धाला वंदन असो
मणिध्वज बुद्धाला वंदन असो.
मैत्रीबाला बुद्धाला वंदन असो.
व्युहराजा बुद्धाला वंदन असो.

जयंत कुलकर्णी

समाप्त.

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

Bahadur_Shah_II

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे.

ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच नैराश्य आले होते. ते भयंकर घाबरलेले होते. काही बाजारबुणगे आणि पालखी उचलणारे भोई हे सोडल्यास इतर कोणी स्वार ही बरोबर नव्हते. त्यांचा चेहरा उतरला होता आणि त्यांच्या पांढर्‍याशुभ्र दाढी वर माती आणि धूळ जमा झाली होती.

बादशाह तेथे आल्याची बातमी ऐकून नानासाहेब तेथे हजर झाले. त्यांनी पाहिले की मजारच्‍या दरवाजाला डोके टेकवून बादशाह बसले आहेत, चेहरा पडलेला, डोळ्यात चिंता आहे. ते दृष्‍य पाहून त्‍यांच्‍या जिवाची घालमेल झाली..डोळ्‍यात अश्रू तरळले पण आता वेळ नव्हता…पण त्यांना पाहिल्यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे हसू पसरले. मग म्हणाले,

‘‘ मी तुला पहिल्यांदाच सांगितले होते की हे नालायक बंडखोर शिपाई अडेलतट्टू आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक आहे. स्वत: तर बुडतीलच पण मला घेऊन बुडतील. शेवटी तेच झाले. पळून जा… मी जरी मोह माया त्याग केलेला एक फकीर असलो तरी माझ्यात तेच रक्त आहे ज्याच्यात शेवटपर्यंत लढण्याची हिंमत आहे. माझ्या बापजाद्यांवर यापेक्षाही वाईट प्रसंग कोसळले पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पण मला तर माझ्या समोरच माझा अंत दिसतोय. दिल्लीच्या तख्तावरील मी तैमुरचा अखेरचा वंशज आहे यात आता काही शंका उरली नाही. मुघलांची सल्तनत शेवटचे आचके देत आहे…काही काळाचाच काय तो प्रश्न. मग मी विनाकारण खूनखराबा का करायला सांगू ? म्हणूनच मी किल्ला सोडून इथे निघून आलो. शेवटी हा मुलुख खुदाचा आहे, त्याला पाहिजे त्याला देईल नाहीतर बरबाद करेल. त्याची मर्जी. अनेक दशके आमच्या वंशाने हिंदुस्थानवर आपले चलन चालवले आता दुसर्‍याची पाळी असेल तर तसे होऊ देत. ते हुकमत चालवतील स्‍वत:ला बादशाह म्हणवून घेतील. ठीक आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. नाहीतरी आम्हीही दुसर्‍यांचे राज्य खालसा करून आमचे राज्य स्थापन केले आहे ना !’’

अत्यंत निराश मनाने हे उद्‌गार काढून त्यांनी एक पेटी नानासाहेबांच्‍या हातात दिली आणि म्हणाले,

‘‘ ही दौलत आता तुमच्या हवाली करतोय !’’

‘‘ अमीर तैमूरने जेव्हा कॉन्‍स्‍टनटाईनवर विजय मिळवला तेव्हा सुलतान जलदरम बायजीदच्‍या खजिन्‍यातून ही वस्तू त्‍यांच्‍या हातात पडली. याच्यात हुजूर हजरत मुहम्मदाच्‍या मुबारक दाढीतील पाच केस आहेत. हे आजवर आमच्‍या खानदानात अत्यंत पवित्र म्हणून सांभाळले गेले आहेत. आता माझ्याकडे ना जमिनीवर जागा आहे ना आकाशात ! आता ही पवित्र वस्तू घेऊन कुठे हिंडू? तुमच्या शिवाय आता यावर कोणाचा हक्क असेल असे मला वाटत नाही. तुम्हीच याचा सांभाळ करू शकता आणि तो तुमचाच हक्कही आहे. दिवस भयंकर आहेत, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय अशी ही वस्तू मी तुमच्या स्वाधीन करतोय. ती वस्तू आजवर आमच्या खानदानापासून कधीही दूर गेलेली नाही. त्याचा सांभाळ करा.’’

नानासाहेबांनी ती पेटी घेतली आणि दर्गा शरीफच्या खजिन्यात ठेऊन दिली. ती पेटी आजही तेथे आहे आणि इतर पवित्र वस्तूंप्रमाणे दर वर्षी सन हिजरीच्या तिसर्‍या महिन्यात श्रद्धाळूंसाठी दर्शनासाठी बाहेर काढली जाते.

बादशहा नानासाहेबांना म्हणाले की तीन दिवसांपासून जेवायला वेळच मिळाला नाही. तुमच्या घरी काही असेल तर घेऊन या. नानासाहेबांनी उत्तर दिले,

‘‘ आम्हीही मृत्यूच्या जबड्यात उभे आहोत. कुठल्याही क्षणी आमची कत्तल होऊ शकते. अन्न तर आता तयार करता येणार नाही. घरी जाऊन पाहतो काही आहे का ते. असल्यास लगेचच हजर करतो. मी तर म्हणतो तुम्हीच माझ्याबरोबर चला. जोपर्यंत मी आणि माझी मुले जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या केसाला बोटही लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही मेल्यावरच ते संभव आहे.’’

बादशाह म्हणाले,
‘‘ आपण हे म्हणताय हे आमच्यावर उपकार आहेत पण या जर्जर शरीरासाठी तुमच्या तरुण मुलांची कत्तल होणे हे मला बिलकूल मान्य नाही. दर्शन झाले आहे, अमानत तुमच्याकडे सोपवली आहे. आता औलियाच्या कृपेनेच त्याच्या लंगरमधे दोन घास मिळतात का ते पाहातो. मग हुमायुंच्या मकबर्‍याला जाईन म्हणतो. तेथे नशिबात जे असेल ते होईल.’’

नानासाहेब घरी आले आणि त्यांनी काही खाण्यास आहे का हे विचारले. त्यांना उत्तर मिळाले,

‘‘ पिठले व सिरका घातलेली चटणी आहे.”

त्यांनी एका तबकात रोटी, पिठले व चटणी घेतली. एका मखमली कापडात ते अन्न झाकले व बादशहाकडे घेऊन आले. बादशहाने पिठल्‍याबरोबर व चटणीबरोबर चण्याची रोटी खाल्ली व तीन तासाने पाणी प्राशन केले आणि त्या अन्नासाठी परमेश्वराचे आभार मानले.

त्यानंतर हुमायुंच्या मकबर्‍यावर गेले जेथे त्यांना अटक झाली.

दुसर्‍याच दिवशी त्यांची रवानगी रंगूनला झाली. तेथेही त्यांनी उरलेले आयुष्य दर्वेश्‍यासारखे व्यतीत केले…

अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

काळी मांजर

काळी मांजर

मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही. पण उद्या मी मरणार आहे आणि आज मला माझ्या हृदयावरील ओझे दूर सारायलाच पाहिजे. मला ज्या काही घटना ज्या माझ्या आयुष्यात घडल्या त्या जगापुढे थोडक्यात मांडायच्या आहेत आणि त्या मांडताना मी त्याच्यावर कसल्याही टिपण्या करणार नाही. या घटनांचा मी धसका घेतला. त्यांनी माझे आयुष्य उध्वस्त केले, माझा छळ केला तरी पण मी त्या घटनांचा अर्थ समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. माझ्यासाठी त्या घटना भयानक होत्या पण कदाचित, कदाचित काही जणांना तसे न वाटण्याचा संभव नाकारता येणार नाही. पुढे कधीतरी कोणी हुशार माणूस या घटनांचा तर्क सुसंगत अर्थ लावेल ही व माझा भ्रमनिरास करेल ही पण त्यासाठी मला या घटना जरा सविस्तरच लिहाव्या लागतील. मी भितभितच हे लिहितो आहे. वास्तव लिहितो आहे.

लहानपणापासूनच माझा स्वभाव कोमल व निर्मळ होता. माझ्या या स्वभावाची व माझ्या कोमलपणाची माझे मित्र टर उडवायचे जे मला अजून आठवतंय. मला प्राण्यांविषयी विशेष ममत्व वाटत असे. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी बरेच प्राणी पाळले होते. माझा बराच वेळ मी या प्राण्यांबरोबर घालवायचो. त्यांना कुरवाळताना आणि खायला घालताना मला सगळ्यात जास्त आनंद वाटायचा. मला प्राण्यांबद्दल वाटणारे हे प्रेम माझ्या तरुण वयातही तसेच राहिले. प्राण्यांबरोबर असलो की मला कशाचीही शुद्ध नसायची. ज्यांनी कुत्री पाळली आहेत त्यांना या प्रेमभावनेबद्दल काही विशेष सांगण्याची गरज नाही. ज्या माणसाने मनुष्यप्राण्याच्या स्वार्थी प्रेमाची चव चाखली आहे त्याच्या बाबतीत तर प्राण्याचे निःस्वार्थी प्रेम त्याच्या ह्रदयाला जाऊन भिडते.

मी इतर मित्रांपेक्षा जरा लवकरच लग्न केले. नशीबाने माझ्या बायकोचा स्वभाव माझ्या स्वभावाशी जुळणारा असल्यामुळे मी मनोमन खुश होतो. माझे प्राणी प्रेम पाहून तिने माझ्यासाठी ताबडतोब माझ्यासाठी पाळीव प्राणी घरात आणले. मला अगदी माझ्या आईची आठवण झाली. तीही माझ्यासाठी माझ्या लहानपणी असेच प्राणी पाळायची. केवळ माझ्यासाठी. आमच्याकडे लवकरच पक्षी, सोनेरी मासे, एक मस्त कुत्रा, ससे, एक छोटे माकड हे प्राणी आले आणि एक काळेभोर मांजर ही आले.
या मांजराकडे पाहताना डोळ्यात भरायचा तो त्याचा आकार. इतर मांजरापेक्षा त्याचा आकार जरा मोठाच होता. पण होते मात्र भलतेच गोंडस. मांजर तसाच एक चतूर, बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातोच म्हणा. पण हे त्याबाबतीत अत्यंत विलक्षण होते. माझी बायको अजिबात अंधश्रद्धाळू नाही किंवा तिचा कुठल्याही अंधश्रद्धांवर विश्वासही नाही. पण त्या काळ्या बोक्याच्या बुद्धिमत्तेचे वर्णन करताना ती नेहमी एका दंतकथेतील एका समजुतीचे उदाहरण देई. ‘चेटकीणी काळ्या मांजरांचे रुप घेऊन या जगात वावरतात.’ कधी कधी लाडात आल्यावर ती त्या मांजराला चेटकीण म्हणूनही हाका मारत असे. बोका आणि चेटकीण हे कसे काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मी तुम्हाला दोष देणार नाही. (माझ्याही मनात हा प्रश्न आला होता) पण कथेप्रमाणे सर्व काळी मांजरे चेटकीणी असतात असे असल्यामुळे मी तिला या बाबतीत माफ केले होते. अर्थात मी ते एवढे काही गंभीरपणे घेत नसे आणि तीही बहुतेक वेळा कौतुकाने किंवा चेष्टेने असे म्हणत असे. मीही ही गंमत आत्ताच आठवली म्हणून सांगितली. बाकी काही नाही बरं का !

या मांजराचे नाव होते ‘‘मन्या’’. थोड्याच काळात मन्याची आणि माझी गट्टी जमली. माझा लाडका झाला तो. तो फक्त माझ्याच हातून अन्न खात असे आणि फक्त मीच त्याला ते भरवीत असे. मी कुठेही जाऊ देत तो कायम माझ्या पायात घुटमळत माझ्याबरोबरच चालत असे. कधी कधी तो माझ्या मागून रस्त्यावरही येऊन मला लाज आणत असे. मी महत्प्रयासाने कसेबसे त्याला परत घरी पाठवे.

आमची ही गट्टी बरेच वर्षे टिकली. पण माझ्या स्वभावात हळूहळू फरक पडत चालला होता. मला कबुली देण्याची शरम वाटते याला कारणीभूत होते माझे दारूचे व्यसन. मी पक्का दारुडा बनत चाललो होतो. दिवसेंदिवस मी जास्त मनस्वी होत चाललो होतो. मी मधेच एकदम उदास व्हायचो. कटकट करायचो आणि दुसर्‍याला काय वाटेल याची फिकीर करणे मी केव्हाच सोडून दिले होते. माझ्‍या बायकोला शिव्या देण्यात मला आसूरी आनंद व्हायचा आणि कधी कधी मी तिच्यावर हातही टाकायचो किंवा फारच राग आला तर लाथेने तुडवायचोही. असा राग मला दारू झोकल्‍यावर नेहमीच येत असे. माझ्‍या पाळलेल्‍या प्राण्यांना माझ्‍या स्वभावातील हा बदल जाणवला असणारच कारण मी त्यांच्याशीही आता तसंच वागायला लागलो होतो. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि एवढेच नाही तर त्यांचा दुरुपयोग ही करायला लागलो. पण मन्याला मात्र माझ्याकडून जरा वेगळी वागणूक मिळायची. बहुधा माझ्या अंतर्मनात त्याच्याबद्दल थोडासा जिव्हाळा शिल्लक असावा. मी कुत्रा, पक्षी, माकडांना आता क्रूरतेनं वागवायला लागलो पण मन्याला अजूनही मी चांगले वागवायचो. उदा. माकड, ससे, कुत्रा जर माझ्या वाटेत आले तर मी निर्दयपणे त्यांना लाथेने उडवायचो पण मन्याला ? छे ! तसे काही माझ्या हातून होत नसे. पण हळू हळू जसे दिवस उलटायला लागले तसा दारूने माझा ताबा घेतला. दारू हे कसे व्यसन आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. आता मन्यालाही माझ्या रागाचा प्रसाद मिळू लागला. तोही आता म्हातारा झाला होता पण अजून चलाख होता. एकदा मी असाच त्याला गंमत म्हणून लाथेने उडवला तर पठ्ठ्या खिडकीत बसलेली चिमणी तोंडात पकडून खाली पायावर उतरला. मला आता गंमत म्हणूनही बायकोला, त्या मुक्या प्राण्यांना लाथा घालण्यात अतिशय आसूरी आनंद होई.

एकदा एका रात्री गुप्ताच्या गुत्त्यावर गावठी झोकून घरी आलो. हल्ली मला तीच दारू परवडायची. शिवाय गुप्ताचा गुत्ता पहाटेच उघडायचा त्यामुळे पहाटे ही दारूची सोय व्हायची. आता ओळख झाल्यामुळे तो माझ्यासाठी गुत्ता केव्हाही उघडायचा. असो मी काय सांगत होतो बरं… हंऽऽ मी त्या रात्री घरी आलो तेव्हा मला वाटले की मन्या मला टाळतोय. माझ्यापासून दूर पळतोय. मी त्याला धरला. तो घाबरला. त्याने ओठ मागे सारले व तो माझ्यावर फिस्कारला. त्याने माझ्या हाताचा चावा घेतला. थोडेसेच रक्त आले पण त्याने माझ्यातील सैतान जागा झाला. माझे डोकेच फिरले. मी स्वत:ला विसरलो. मला कळेना मला काय होतेय ते. माझ्या नसानसातून कुठलीतरी पाशवी शक्ती वाहते आहे असे मला वाटू लागले. माझे रक्त आतल्या आत उकळू लागले. त्याची सुटण्याच्या धडपडी कडे छद्मीपणे हसत मी त्याचा गळा माझ्या पंजात धरला व खिशातील चाकू काढला. मी त्याला एक थप्पड दिली व त्याचा एक डोळा बाहेर काढला. हे सगळे लिहिताना माझ्या अंगावर काटा उभा राहतोय आणि शरमेने माझी मान खाली जातेय.

दुसर्‍या दिवशी जेव्हा दारू उतरली तेव्हा माझे हललेले डोकेही ताळ्यावर आले. रात्रीचा प्रसंग आठवून माझ्‍या अंगावर शहारा आला. मी केलेल्या क्रूर कर्माने माझे मन पश्चात्तापात होरपळून निघाले पण या सगळ्या भावना थोड्याच वेळ टिकल्या. मग मात्र मी ती कटू आठवण विसरण्यासाठी काल उरलेल्या दारूत परत एकदा स्वत:ला बुडवून टाकले.

थोड्याच दिवसात तो बोका बरा झाला. त्याच्या एका डोळ्याच्या रिकाम्या खोबणीने तो भयानक दिसत होता खरा, पण बहुधा आता त्याला कसल्याही वेदना होत नसाव्यात. नेहमीप्रमाणे तो घरात हिंडत फिरत होता पण माझी चाहूल लागली की तो जिवाच्या आकांताने पळ काढत असे. माझ्या मनात थोड्याफार भावना शिल्लक असल्यामुळे, जो प्राणी माझा एकेकाळी लाडका होता तो आता माझा तिरस्कार करतोय हे पाहून मला थोडे दु:ख झाले. पण या दु:खाची जागा लगेचच त्राग्याने घेतली. मी चिणकारलो. नंतर अटळ असल्याप्रमाणे माझा विकृतपणा उफाळून आला. या असल्या भयानक भावनेचा कुठल्याही तत्त्वज्ञानात अभ्यास आजवर झालेला नसेल. पण मला वाटते माणसातील इतर प्रवृत्तींसारखी ही एक प्रवृत्ती असावी. पण कुठल्याही श्वापदात ती आढळत नाही. बहुधा माणसाने त्याच्या निर्मितीबरोबरच ती बरोबर आणली असावी. हीच प्रवृत्ती बर्‍याच वेळा माणसाला हुकूम सोडते आणि मग घडू नयेत त्‍या गोष्टी घडतात. नाहीतर माणसाला नको ते कर्म केल्यावर मी असे का केले हा प्रश्न का बरे पडला असता ? मी असे म्हणतो कारण माणसाच्या प्रवृत्ती मोठ्या विचित्र असतात. उदा. एखादा कायदा आपल्या भल्यासाठीच केला आहे हे समजताच माणसाचा हात तो मोडण्यासाठी का बरं शिवशिवतात ? ही एक प्रकारची विकृत भावनाच नाही का ? थोडक्यात याच विकृतीने शेवटी माझ्यावर ताबा मिळवला. मनात खोल कुठेतरी एक अशीच तीव्र इच्छा आली की काहीतरी केले पाहिजे. कोणालातरी इजा करायला पाहिजे. ही इच्छा तीव्र होत होत इतकी तीव्र झाली की मी त्या बोक्याचा समाचार घेण्याचे ठरवले. एका थंडगार पहाटे मी तेवढ्या थंडपणे एक फास मन्याच्या गळ्यात अडकवला आणि पश्चात्तापाने दग्ध होत समोरच्या झाडाच्या फांदीवर त्याला टांगला. तो तडफड करीत होता आणि इकडे माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या कारण मला माहीत होते की या प्राण्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला फासावर लटकविण्यासारखा त्याच्या हातून कसलाही गुन्हा घडलेला नाही. मी रडत होतो कारण मला कल्पना होती की माझ्या हातून एक भयंकर पाप घडत आहे. इतके भयंकर की त्यासाठी परमेश्वर कितीही दयाळू असला तरी त्याने माझी रवानगी नरकात केली असती. शंकाच नाही !

त्याच रात्री मला झोपेतून जाग आली ती आगीच्या धगीने. माझ्या घराच्या फाटक्या पडद्यांना आग लागली होती. थोड्याच वेळात ती आग भडकली आणि सगळे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मी, माझी बायको व आमचा एक म्हातारा नोकर, जो या दिवसातही आम्हाला सोबत देत होता कसेबसे वाचलो. आगीत माझे जे काही होते ते सगळे जळून त्याचे भस्म झाले. मला नैराश्य आले. मी खचलो.

दोन घटनांचा बादरायण संबंध लावण्या इतका काही मी दूधखुळा नाही किंवा मूर्ख ही नाही. पण मी सगळ्या घटनांची साखळी तुम्हाला सांगण्याचे ठरवले असल्यामुळे काही निसटू नये म्हणून हे सगळे सविस्तर सांगणे भाग आहे. माझ्या हातून घडलेली हत्या आणि घराला लागलेली आग याचा काही संबंध तर नसावा? असा एक विचार माझ्या मनात आला खरा. मी अर्थातच तो बाजूला सारला. दुसर्‍या दिवशी मी जळून खाक झालेल्या माझ्‍या घराच्या अवशेषांना भेट दिली. सगळ्या भिंती पडल्या होत्‍या पण फक्‍त एक मात्र उभी होती. ही भिंत माझ्या शयनगॄहाची होती आणि या भिंतीला टेकून माझा पलंग होता.. मी पलंगावर या भिंतीकडे डोके करून झोपत असे. भिंतीला नुकत्याच केलेल्या गिलाव्यामुळे तिचा आगीपासून थोडा का होईना बचाव झाला होता. मी तेथे पोहोचलो तेव्हा त्या भिंती भोवती बरेच लोक जमले होते व त्या भिंतीचा एक भाग संमिश्र नजरेने न्याहाळत होते. ‘‘विचित्रच !’’ असे कधी पाहिले नव्हते बुवाऽऽ’’ अरेच्चा !’’ असे अनेक शब्द त्या जमावातून उत्स्फुर्तपणे उमटत होते. मी जवळ गेलो आणि पाहिले तर त्या भिंतीवर एका मोठ्या मांजराचे शिल्प कोरलेले दिसले. सर्व बारकाव्यांसहीत कोरलेले ते शिल्प मला फारच आवडले. पण त्याच्या गळ्यात एक फासही अडकवलेला मला दिसला…

मी हे भूत पाहिले, हो भूतच म्हणायला हवे… आणि मी कमालीचा हादरलो. माझा थरकापच उडाला. पण थोड्याच वेळात मी सावरलो. मला आठवले की मन्याला बागेत फाशी देण्यात आले होते. आग लागल्यावर त्या बागेत बरीच गर्दी जमली होती. त्यातीलच एकाने ते लटकते मांजर काढून खिडकीतून माझ्या खोलीत फेकले असणार. बहुधा मला उठविण्यासाठी किंवा …जाळण्यासाठी. त्या आगीच्या धगीने व कोसळणार्‍या इतर भिंतींनी बहुतेक मन्‍याचा चेंदामेंदा होऊन ते या भिंतीला चिकटले असणार. बहुधा गिलाव्‍यातील चुना आणि मांजराच्या प्रेतातील अमोनियाचा संयोग होऊन त्याचे ते शिल्प तयार झाले असावे.

ते शिल्प कसे तयार झाले असावे याबद्दल मी माझ्या मनाची समजूत काढली खरी पण माझ्या मनात जी पाल चुकचुकायची ती चुकचुकलीच. ते शिल्प पाहिल्यावर मला धक्का बसायचा तो बसलाच. पण माझ्या मनात पश्चात्तापाची भावना त्यावेळी तरी आलेली नव्हती. मी निर्लज्जपणे माझ्या गुत्त्याच्या आसपास अजून एखादे मांजर मिळते आहे का हे पाहू लागलो. एक दोन पिल्ले मला सापडली पण मला मन्यासारखी दिसणारी मांजरे पाहिजे होती.

एका रात्री मी माझ्या पापाच्या खपल्या काढत बसलो बसलो असतानाच माझे लक्ष एका काळ्या वस्तूकडे गेले. माझ्या घरात आता इतर फर्निचर नव्हतेच. होत्या त्या फक्त दारूच्या बाटल्या. माझ्या दारूच्या बाटल्यांवर बसलेल्या त्या काळ्या वस्तूकडे मी जरा लक्षपूर्वक पाहिले व जवळ गेलो. एक मोठी काळी मांजर ! अगदी मन्या एवढी नव्हती पण बर्‍यापैकी मोठी. मी तिला हात लावून माझी खात्री करून घेतली. मन्‍याची हुबेहुब प्रतिकृती फक्त एकच फरक होता. मन्याच्या अंगावर एकही पांढरा केस नव्हता तर या मांजराच्या पोटावर व छातीवर पांढरेशुभ्र केस होते.

मी त्याला हात लावल्या लावल्या ते उठले व गुरगुरत त्याने माझ्या हातावर डोके घुसळलं. एकंदरीत त्याला माझ्या कुरवाळण्याने आनंद झालेला दिसला. मला पाहिजे होते तसेच मांजर ! मी लगेचच त्याला उचलले व माझ्या नवीन मालकाला भेटून ते विकत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली पण त्या मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याच्याकडे तसले मांजर नव्हते आणि त्याने असले मांजर कधी पाहिलेही नव्हते.

मी त्याच्या डोक्यावर बोटांनी कुरवाळले व खाली सोडले. पण आश्चर्य पहा, मी घरी निघालो तेव्हा त्या मांजराला माझ्याबरोबर यायचे होते. मी अर्थातच त्याला परवानगी दिली. मी चालू लागल्यावर तेही माझ्या पायात घुटमळत चालू लागले. मीही मधून मधून थांबून त्याच्या डोक्यावर थोपटत होतो व त्याच्या आयाळीला कुरवाळत होतो. घरी पोहोचेपर्यंत ती पार माणसाळली होती. तिला पाहिल्या पाहिल्या माझी बायकोही त्या मांजराच्या प्रेमातच पडली.

माझे म्हणाल तर थोड्याच काळात माझ्या मनात नेहमीप्रमाणे त्या मांजराबद्दल घृणा निर्माण झाली. मला प्रथम जे वाटले होते त्याच्या हे बरोबर उलटेच झाले. हे का झाले हे मी सांगू शकणार नाही. त्या मांजराला जेवढा मी आवडे तेवढीच जास्त घृणा मला त्याच्याबद्दल वाटू लागली. हळू हळू माझ्या या भावनेचे तिरस्कारात रुपांतर कधी झाले हे मलाच कळले नाही. मी त्या मांजराला टाळू लागलो. मला त्याला पाहिल्याबरोबर मन्याची आठवण येई व माझ्या त्या भयंकर कृत्याची. मला नंतर नंतर माझीच घृणा वाटू लागली. पण त्यामुळे मी त्याला मारहाण करण्याचे धाडस दाखवू शकलो नाही. वाचले बिचारे ! काही आठवडे असेच गेले आणि मी त्या मांजराकडे द्वेषाने पाहायला लागलो व ते दिसले की मी तेथून पळ काढू लागलो. जणू ते मांजर म्हणजे प्लेगचा उंदीरच आहे.

माझ्या द्वेषाच्या मागे अजून एक कारण होते ते मी लिहिण्यास विसरलो. ते म्हणजे ज्या दिवशी मी त्या मांजराला घरी आणले त्याच दिवशी मला कळले होते की त्यालाही मन्यासारखा एक डोळा नव्हता. पण या सगळ्या प्रकारात हे मांजर माझ्या बायकोचे जास्तच लाडके झाले. मी तुम्हाला पूर्वीच सांगितले आहे की भूतदया हा माझ्या बायकोच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गूण आहे आणि त्या गुणाने मला भरपूर आनंदही दिलाय.

जसा मला या मांजराविषयी वाटणारा द्वेष वाढत गेला तसे माझ्या लक्षात आले की त्यालाही मी अधिकच आवडू लागलो. मी जाईन तेथे ते माझ्या मागे मागे येत असे. पण त्याच्या या मागे येण्यात एक प्रकारचा उर्मटपणा भरला होता. ते ठाम पावले टाकत माझ्यामागे थोडे अंतर ठेऊन पाठलाग केल्यासारखे माझ्या मागे मागे येई. मी काय म्हणतोय ते कदाचित वाचकांना समजणार नाही.. मे बसलो की ते माझ्या खुर्चीखाली मुटकुळी करून बसे किंवा माझ्या मांडीवर उडी मारून बसे व मला चाटत असे. मी उठून चालायला लागलो की ते एकदम माझ्या पायात येई व मला खाली पाडण्याचा प्रयत्न करी. कधी कधी माझ्या कपड्यात त्याची ती अणकुचीदार नखे खुपसून मला पकडण्याचा प्रयत्न करे तर कधी कधी पार माझ्या छातीपर्यंत चढून बसे. मला त्यावेळेस त्याला फटका मारून खाली पाडावे अशी तीव्र इच्छा होई पण मी स्वत:ला ते करण्यापासून रोखत असे. त्याला कारणे दोन – एक म्हणजे माझ्या हातून घडलेल्या पापाची बोच आणि दुसरे म्हणजे (खरं सांगण्यास हरकत नाही) माझी छाती ते मांजर फोडेल अशी मला उगीचच भिती वाटायची. मला त्या मांजराची आता भितीच वाटू लागली होती..

या भीतीचे स्वरुप मला सांगता येणार नाही. म्हणजे एखाद्या खड्ड्यावरुन उडी मारताना इजा होईल म्हणून वाटते तसली ही भीती नव्हती. कशी होती त्याचेही वर्णन मी करू शकणार नाही. आत्ता या अत्यंत धोकादायक कैद्यांसाठी असलेल्या कोठडीतही मला सांगण्यास शरम वाटते – त्या मांजराने मला हळूहळू भरीस पाडले आणि मी भ्रमिष्ट होत गेलो. माझ्या बायकोनेही दोन तीन वेळा मला सावध करण्याचा प्रयत्न केला. या मांजराच्या छातीवर असलेले पांढरे केस मन्याच्या अंगावर नव्हते. ही दोन्ही मांजरे वेगवेगळी आहेत हे पटविण्याचा प्रयत्न तिने प्रामाणिकपणे केला. नाही असं नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते की या मांजराच्या पोटावर आणि छातीवर पांढर्‍या रंगाचा एक पट्‍टा होता पण आता त्याला एक आकार येऊ लागला होता. तो कशाचा होता हे सांगण्याचा नुसता विचारही जरी माझ्‍या मनात आला तरी माझ्‍या जीवाचा थरकाप उडतो. माझी छाती धडधडू लागते. त्‍या आकारात मला फाशीचे तख्‍त दिसू लागले. फाशीचे तख्‍त… वेदना आणि मृत्यूचे एक भयानक यंत्र…
आता मात्र माझी परिस्थिती कुठल्याही मनुष्य प्राण्याची होणार नाही एवढी वाईट झाली होती. एका प्राण्याने, ज्याचा एक बांधव मी ठार मारला होता त्यानेच माझी ही अवस्था केली होती. माझी झोप उडाली. दिवसा ते मला एकटे सोडत नसे आणि रात्री मी दचकून किंचाळत उठे. त्याचा गरम उष्ण श्वास माझ्या नाकाशी मला जाणवे तर छातीवर त्याचे वजन. छाती वरील वजनाची मला काळजी नव्हती पण माझ्या ह्रदयावर पडलेल्या त्याच्या मणामणाच्या ओझ्याने माझा जीव रात्री बेरात्री गुदमरू लागला. हळूहळू मला निद्रानाश जडला..

या अमानवी छळाने माझ्यात जो काही चांगुलपणा शिल्लक होता त्याचीही वाट लावली. माझ्या मनात दुष्ट विचारांना काहीच अटकाव राहिला नाही. अत्यंत दुष्ट व घाणेरडे विचार सतत माझ्या मनात पिंगा घालू लागले. माझी मन:स्थिती उदास आणि अधिक उदास यात हेलकावे खाऊ लागली. मला वारंवार नैराश्याचे झटके येऊ लागले. मला सगळ्या जगाचा तिरस्कार वाटू लागला. मला क्रोधाचे तीव्र झटके येऊ लागले व या सगळ्याचा त्रास अर्थातच माझ्या सोशीक पत्नीला झाला. ती बिचारी निमुटपणे सगळं सहन करीत दिवस कंठत होती.

एक दिवस ती माझ्याबरोबर आमच्या तळघरातील घरात उतरली. आता आम्हाला या जुनाट इमारतीचे दमट घाणेरडे तळघरच परवडत होते. हे मांजर आमच्या मागे मागे येत होतेच. त्याने एकदम माझ्या पायात उडी मारली व मला जवळजवळ पायऱ्यांवरून ढकलूनच दिले. माझे डोके सणकले. ‘सालं मुद्दामच करतोय हा !’’ मी किंचाळलो. त्याची वाटणारी भीती वगैरे विसरून, भडकून मी माझ्‍या हातातील कुर्‍हाड त्‍या मांजरावर घातली पण ती त्याला लागलीच नाही. माझ्‍या बायकोने मधे हात घातल्याने वाचले सालं ते मांजर ! तिच्‍या या हस्तक्षेपामुळे माझा रागाचा पारा इतका चढला की पुढच्याच क्षणी मी कुर्‍हाड तिच्‍या हातातून हिसकावून घेतली आणि तिच्याच डोक्‍यात घातली. त्याच क्षणी ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. मेली !

हे बीभत्स कृत्य झाल्यावर आता ते प्रेत लपवणे आलेच. शेजार्‍यांच्‍या दृष्टीस न पडता, दिवसा ढवळ्‍या किंवा रात्री बेरात्री सुद्धा ते तेथून हलविणे शक्यच नव्हते. माझ्‍या मनात त्‍या प्रेताचे विल्हेवाट लावण्याच्या योजना लगेचच तया होऊ लागल्या. प्रथम मला वाटले त्या प्रेताचे बारीक तुकडे करून ते घरातच जाळावेत. तळ घरातच खड्डा करून ते प्रेत तेथेच पुरून टाकावे असाही विचार माझ्या मनात तरळून गेला. नंतर मी ते प्रेत मागच्या विहिरीत फेकून द्यावे असे ठरवले. पण तीही कल्पना मला विशेष पटली नाही. नंतर ते प्रेत एका पेटीत भरून हमालांकरवी ती मालाची पेटी बाहेर हलवावी असाही एक विचार माझ्या मनात आला पण तोही विचार मी दूर सारला. शेवटी एक कल्पना मला पसंत पडली. मी ते प्रेत भिंतीत चिणून टाकण्याचे ठरवले. पूर्वी गुन्हेगारांना भिंतीत चिणून ठार मारत तसे..

या कामासाठी ते तळघर अत्यंत योग्य होते. त्याच्या भिंती ओल आल्यामुळे ढिसूळ झाल्या होत्या आणि त्याचा गिलावाही ठिकठिकाणी पाझरत होता. त्यामुळे तो गिलावा अजून ओलसर होता. शिवाय एका भिंतीत एक फडताळ विटांनी बुजवलेले मला आढळले. त्या विटा सहज निघण्यासारख्या होत्या. त्या काढून ते प्रेत आत चिणून त्या विटा परत लावणे हे जमण्यासारखे होते. फक्त नंतर इतर भिंतींच्या गिलाव्यास जुळणारा गिलावा केला की काम भागणार होते. कोणाच्या बापालाही हे कळणे शक्य नव्हते. मी मनातल्या मनात एक शीळ घातली…

माझी ही गणितं काही चुकणार नव्हती आणि चुकली ही नाहीत. एका पहारीने मी त्या सगळ्या विटा बाहेर काढल्या. आत भिंतीला ते प्रेत काळजीपूर्वक टेकवून उभे केले व विटांनी ते चिणून टाकले. नंतर जी पडझड झाली होती त्याची दुरुस्ती केली व सगळीकडे नजर फिरवली. ‘आता गिलावा केला की झालं.’’ मी मनाशी म्हटले. नंतर मी गिलाव्याचे सगळे सामान गोळा केले व फरक ओळखू येणार नाही असा गिलावा त्या भिंतीला करून टाकला. मी परत परत त्या भिंतीची सगळ्या कोनातून तपासणी केली. समाधान झाल्यावर मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता कोणालाही येथे काही झाले आहे असे ओळखता आले नसते. खाली पडलेला कण न्‌ कण मी वेचला व खाली कसलाही कचरा राहाणार नाही याची काळजी घेतली. ‘‘ चला येथे तरी माझे कष्ट वाया गेले नाहीत म्हणायचे !’’ मी समाधानाने म्हणालो.

ज्या प्राण्याने मला या संकटात टाकले त्याचा आता शोध मला घ्यायचा होता. त्याला ठार मारल्या शिवाय माझ्या जिवाला शांती लाभली नसती. ते मांजर तेव्हा माझ्या समोर आले असते तर मी त्याचा त्याच क्षणी मुडदा पाडला असता. पण त्याने चलाखपणे माझ्या हिंस्रपणाला घाबरून पोबारा केला होता. ते मांजर गेल्यामुळे मला आता सुटल्यासारखे वाटत होते. कसे वाटत होते हे सांगणे शब्दांच्या पलिकडचं आहे. त्या रात्री ते घरी फिरकले नाही. म्हणजे त्या रात्री तरी ते आले नव्हते. मी निवांतपणे शांत व गाढ झोपलो. हो ! जरी माझ्या शिरावर खुनाचे ओझे असले तरीही !

दुसरा दिवस गेला आणि तिसराही. मी आता जरा मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. त्या राक्षसाने घाबरून माझी कायमची रजा घेतलेली दिसत होती. आता मला त्याचा शोध घेण्यात अर्थ नाही याची खात्री वाटू लागली. ते मांजर आसपास नाही याचा मला हर्षवायू व्हायचा तो काय बाकी होता. माझ्या काळ्या कृत्याचा आता मला पश्चात्ताप वाटेनासा झाला. पण काळजी म्हणून मी परत एकदा त्याला सगळीकडे शोधले पण ते काही दिसले नाही. काही लोकांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते मांजर काही सापडले नाही. ‘‘चला एकंदरीत चांगले दिवस आले म्हणायचे’’ मी मनात म्हटले.

खुनाच्या चवथ्या दिवशी अचानक पोलीस आले आणि त्यांनी सगळ्या तळ घराची व इमारतीची कडक तपासणी केली. मी केलेल्या कामाबद्दल मला खात्री असल्यामुळे मी त्या तपासणीची विशेष काही फिकीर केली नाही. त्या पोलीस अधिकार्‍यांनी मलाही त्‍यांच्‍या बरोबर त्‍यांच्‍या तपासणीच्या कामात सामील करून घेतले. त्यांनी घराचा एकही कोपरा सोडला नाही. चार पाच वेळा इमारत व वरची खोली तपासून झाल्यावर अखेरीस ते तळघरात उतरले. माझ्या चेहर्‍यावरील एक सुरुकुतीही हलली नाही. माझ्‍या ह्रदयाचे ठोके नेहमीप्रमाणे संथगतीने पडत होते. एखाद्या शांत झोपलेल्या माणसाप्रमाणे. मी हाताची घडी घालून शांतपणे त्यांच्या मागे मागे फिरत होतो. शेवटी त्यांचे समाधान झाल्यावर ते जाण्यास निघाले. माझा आनंद माझ्या चेहर्‍यावर मावेना. मनातून मला माझ्‍या कामगिरीच्या अगदी फुशारक्या मारायचा मोह होत होता पण मी तो मोठ्या कष्टाने आवरला.

‘‘ साहेबांनो !’’ शेवटी मी म्हणालोच. ‘‘ निघालात की काय तुम्‍ही ? संशय घ्यायचे तुमचे कामच आहे. त्याबद्दल मला बिलकूल वाईट वाटले नाही. या घराची बांधणी जुनी व भक्कम आहे. बघा ना याच्या भिंती कशा भरभक्कम आहेत त्‍या !’’मी काय बोलतोय याकडे माझे लक्षच नव्हते. ते निघाले आहेत या कल्पनेनेच मी मनमोकळेपणाने बोलत होतो. असे म्‍हणून मी हातातील काठीने त्‍या भिंतीवर ठोकले. हाय रे माझ्‍या कर्मा ती तीच भिंत होती ज्यात मी माझ्‍या बायकोला गाडले होते. मी काठीने त्या भिंतीवर ठोकले. त्या निरव शांततेत त्या ठोकण्याचा आवाज केवढातरी मोठा भासला. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून आतून एक घुसमटणारा आवाज आला. एखादे लहान मुल किंचाळत रडताना येतो तसा. थोड्याच क्षणात त्याचे रुपांतर एका ह्रदयाला घरे पडणार्‍या किंकाळ्यात झाले. मला का कोणास ठाऊक त्‍या किंकाळ्यात विजयोत्‍सवाच्‍या आरोळीचा भास झाला….

माझ्‍या मनात त्‍या वेळी काय विचार आले याबद्दल बोलण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. धडपडत मी विरुद्ध दिशेच्या भिंतीकडे धाव घेतली. जिने चढणारी माणसे एका क्षणासाठी स्तब्ध उभी राहिली. ते ऐकून त्यांच्या अंगावर काटाच आला असणार. पुढच्या क्षणी दहा पंधरा हात त्या भिंतीवर तुटून पडले. अखेरीस ती भिंतच कोसळली. त्यांच्या समोर एक कुजलेले व ताठरलेले प्रेत उभे होते. त्या प्रेताच्या डोक्यावर शेपटी हलवत, दात विचकत, लाल तोंडाचा, ज्या प्राण्याने मला या खुनासाठी प्रवृत्त केले होते तो प्राणी फिसकारत बसला होता. त्याच्या आवाजाने मी केलेल्या खुनाची बातमी जगाला ओरडून सांगितली… मी एका राक्षसालाच भिंतीत चिणण्याचा प्रयत्न केला होता…..

अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : एडगर ॲलन पो.

Posted in कथा | Leave a comment