
नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,
आज अजून एक पुस्तक आपल्या हातात देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा आहे इन्क्विझिशनचा इतिहास. हे प्रकरण युरोपमध्ये कसे सुरू झाले आणि त्याचे लोण भारतात कसे पोहोचले याचा इतिहास आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर कळेल. इस्लाम धर्म काय किंवा ख्रिश्चन धर्म काय, त्याच्या प्रसारासाठी राज्यसत्तांनी या धर्मांना भरपूर मदत केली. प्रसंगी युद्धेही केली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जर हिंदू राजे प्रबळ असते तर असले प्रकार होते ना! असो. मी कारणमिमांसा करत नाही. ती आपल्याला करायची आहे.
खाली माझ्या मनोगतातील काही परिच्छेद देत आहे….
नमस्कार !
मनोगत लिहिण्याआधी पोर्तुगीजांनी भारताच्या काही भागावर कसा कब्जा केला त्याचा इतिहास थोडक्यात सांगणे मला वाटते, गैर ठरणार नाही. अगोदर तो सांगतो –
पोर्तुगालमधील सर्व ज्यू नागरिकांना बाटवल्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजे ७ जुलै १४९७ या दिवशी वास्को द गामा याने लिस्बनच्या बंदरातून फक्त १४८ खलाशांना घेऊन भारतासाठी प्रस्थान ठेवले. जरी माणसांची संख्या कमी असली तरी त्याच्या काफिल्यामध्ये तीन जहाजे आणि अजून एक बोट होती, ज्यात तीन वर्षे पुरेल एवढे अन्न इत्यादि साहित्य भरलेले होते. त्याला केप ऑफ गुड होपेला वळसा मारून भारताला जायचे होते. १८ मार्च १४९८ या दिवशी त्याला मलबारच्या किनाऱ्यावरील कालिकत हे शहर दिसले. ही पहिली पोर्तुगीज मंडळी जी भारताच्या किनाऱ्यावर उतरली. २९ ऑगस्टला तो समुद्री मार्गाने अंदाजे ३२० मैल प्रवास करून गोव्याला पोहोचला. तेथून तो १० जुलै १४९९ ला लिस्बनला पोहोचला. त्याच्या बोटीत काळे मिरे, लवंगा, जायफळ, दालचिनी, मौल्यवान खडे आणि इतर सामान ठासून भरले होते. ते सामान पाहून पोर्तुगीज राजाचे डोळे विस्फारले आणि नंतर भारतासाठी अनेक मोठ्या सागरी मोहिमा आखण्यात आल्या. १५०२ मध्ये वास्को द गामाने त्याची भारतासाठी दुसरी सफर १५०२ मध्ये केली. यावेळी त्याच्या काफिल्यात १५ जहाजे होती, भारताच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने काही कारण नसताना दहशतीसाठी कालिकतवर तोफांचा भडिमार केला आणि त्यानंतर कोचीन आणि क्रांगनूरची शिबंदी मजबूत केली १५०५ मध्ये फ्रान्सिस्को द अल्मेडाची पोर्तुगीज इंडियाचा व्हाईसरॉयपदी नेमणूक झाली आणि तो २२ जहाजे आणि २५०० सैनिक/खलाशी घेऊन कोचीनला उतरला. तेथे त्याने एक दगडी किल्ला बांधला. २ फेब्रुवारी १५०९ या दिवशी दिव येथे अल्मेडाच्या आरमाराची मुसलमान आरमाराशी भीषण सागरी युद्ध झाले ज्यात अल्मेडाने शत्रूचे आरमार बुडवून नष्ट केले आणि सागरावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. अल्मेडानंतर १५०९ साली अफान्सो द अल्बुकेर व्हाईसरॉय झाला. १० नोव्हेंबर १५१० या दिवशी त्याने अदिलशाहचा पराभव करून गोवा जिंकले व गोव्यास राजधानी म्हणून घोषित केले. त्याच वर्षी त्याने त्या बेटावर तटबंदी बांधली आणि किल्ला बांधून तेथे आपली शिबंदी मजबूत केली. १५१५ साली याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा गोव्यामध्ये ल्युसो-इंडियन लोकांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती. त्यानंतर जवळजवळ १०० वर्षे पोर्तुगीजांचे समुद्रावर आणि मसाल्याच्या व्यापारावर वर्चस्व होते. हा व्यापार इतका प्रचंड झाला, की पोर्तुगालचा राजा मॅन्युएलने स्वतःला “लॉर्ड ऑफ द नॅव्हिगेशन, कॉन्क्वेस्ट अँड कॉमर्स ऑफ इंदिया, पर्शिया अँड इथोपिया”असे घोषित केले. राजाने मसाल्याचा सगळा व्यापार स्वतःच्या अखत्यारीत आणला. राजा मॅन्युएल अशारितीने युरोपमधील सगळ्यात धनाढ्य राजा झाला. पुढे काय झाले हा इतिहास आहे… २ मार्च १५६० या दिवशी सेंट झेव्हियरच्या कृपेने भारतात इन्क्विझिशनची स्थापना झाली. त्यानंतर काय झाले हे वाचकांना कळेलच…
इन्क्विझिशन ही एक युरोपमधील धार्मिक न्यायदानाची प्रक्रिया असल्यामुळे त्याला मराठीत योग्य असा प्रतिशब्द नाही म्हणून पुस्तकात तोच शब्द वापरला आहे. पूर्वी “धर्मसमीक्षण संस्था” हा शब्द वापरला जायचा, पण या संस्थेमध्ये फक्त धर्माचे समीक्षण चालत असे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
प्रथम मी हे का लिहिले हे सांगणे मला आवश्यक वाटते. हे वाचल्यावर वाचकांना वाटेल, की हा सगळा प्रकार नव्याने बाटलेल्या ख्रिश्चनांबाबत झाला आहे मग आपल्याला काय त्याचे? पण डेलॉनने एका ठिकाणी स्पष्ट केले आहे, की जेवढ्या ख्रिश्चनांवर हे खटले चालवले जायचे तेवढेच इतर धर्मियांवर चालवले जायचे. मुख्यतः हिंदूंवर. एके ठिकाणी तो म्हणतो या इतर जणात जादूटोण्यासाठी अटक केलेल्यांची संख्याही जास्त असायची. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की वेताळाची पूजा हा प्रकारही जादूटोण्यात गणला जायचा. त्यांचे काय झाले असावे हे मी सांगण्याची गरज नाही. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे अशक्य केले जायचे आणि मग बाटवले जायचे हे एक उघड गुपित आहे. सगळ्यात जास्त अन्याय या ख्रिश्चन मंडळींनी केले ते ब्राह्मणांवर आणि लहान मुलांवर ते कसे ते तुम्हाला वाचल्यावर कळेलच. इस्लामी अतिरेक्यांचा ह्युमन शिल्ड असा जो प्रकार हल्ली बोलण्यात येतो त्याच्यात आणि या लहान मुलांना त्यांच्या मातापित्यांनी आणि नातेवाईकांनी धर्मांतर करावे म्हणून ओलीस धरणे, यात फारसा फरक मला वाटत नाही. का ते तुम्हाला ते सविस्तर वाचल्यावर कळेलच. आता इस्लामचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, तुम्ही जर या दोन्ही धर्मांचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला उमजेल, की या दोन्ही धर्मांच्या मूळतत्त्वांमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही धर्मांनी आपली जमात वाढवण्यासाठी जगभर अत्याचार केले. राज्यसत्ता आणि धार्मिक सत्ता एकत्र आली, की मानवजातीवर काय भीषण परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही धर्म.
हे पुस्तक वाचताना मला मीच अनुवादीत केलेल्या फ्रान्झ काफ्काच्या “द ट्रायल” या पुस्तकाची आठवण येत होती. त्यातही नायकाला त्याला का अटक झाली आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. नला तर वाटते, काफ्काने ट्रायल लिहिण्याआधी डेलॉनचा वृत्तांत वाचला असावा आणि इन्क्विझिशनच्या तत्त्वांचा सामाजिक कादंबरी लिहिताना वापर केला असावा. शिवाय इन्क्विझिशन आणि इस्लाममधील ब्लास्फेमीचे कायदे यात मला कमालीचे साम्य आढळले. असो.
पोर्तुगीज ख्रिश्चनांनी वंशवादही भरपूर जोपासला होता हेही आपल्याला कळून येईल. गोऱ्या ख्रिश्चन कैद्यांना वेगळी, चांगली वागणूक मिळे, तर स्थानिक नागरिकांना वेगळी हीन वागणूक मिळे. उदा. तुरुंगात गोऱ्यांना गाद्या मिळत, तर स्थानिकांना फरशीवर झोपावे लागे. तेथे मात्र येशूपुढे सर्व समान या तत्त्वांचा त्यांना विसर पडे. यावरून मला दुसऱ्या महायुद्धातील एक घटना आठवली. जेव्हा दोस्तांचे सैन्य पॅरिसच्या वेशीवर पोहोचले तेव्हाची ही घटना आहे..
“…दरम्यान व्हॅटिकॅनमधील ब्रिटिश राजदूत सर ओस्बोर्न याने परराष्ट्र मंत्रालयाला २६ जानेवारी १९४४ रोजी एक विचित्र बातमी दिली, ‘व्हॅटिकॅनच्या कार्डिनल सचिवाने मला बोलावून रोममधे दोस्तांचे फक्त गोरे सैन्यच तैनात असेल अशी आशा व्यक्त केली.` त्याने घाईघाईने पोपची बाजूही सावरायचा प्रयत्न केला, ‘ पोपला रंगभेद मान्य नाही, पण ही विनंती मान्य करता येऊ शकेल असे वाट इ. इ.` हा भेदभाव जे सैनिक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्यांच्या बाबतीत घडला हेही लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंमध्ये जातीभेद आहे (आता होता असं म्हणायला हवं) हे मान्यच आहे. तो वाईट आहे हेही मान्य आहे, पण या पोपच्या वंशभेदाबद्दल फार कुठे चर्चा झालेली आढळत नाही. एका स्थानिक हुशार ख्रिश्चन माणसाला धर्मगुरू होण्यास पोर्तुगीजांनी केवळ तो पूर्वाश्रमीचा ब्राह्मण होता म्हणून कसे अडथळे आणले हेही वाचणे मजेशीर आहे…. असो अधिक लिहित नाही… आपण पुस्तक वाचावे ही विनंती.
- – जयंत कुलकर्णी