सिनेमा….

…..परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? “चारशे” त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही. तो गेल्यावर मी अंथरुणावर पडलो आणि डोळे मिटले आणि मला माझ्या लहानपणीचा सिनेमा आठवला….

आमच्या गावात दोन प्रसंग रोज साजरे व्हायचे. पहिली म्हणजे रोज संध्याकाळी अंधार जेव्हा अरुंद रस्त्यांवर सावल्या लांब व्हायच्या तेव्हा रस्त्यावरील खांबावरील कंदील पेटविण्यात सरकारी माणूस यायचा. हा एक आणि दुसरा त्यानंतर लगेचच एक बैलगाडी सिनेमाची जाहिरात करण्यास येत असे तो. पहिल्या प्रसंगात गल्लीतील सगळी लहान मुले हजेरी लावायची आणि तेथे एकच दंगा उडायचा. तो माणूस सायकलवर यायचा, सायकल त्याच्या स्टँडवर मागे खेचून लावायचा. त्याच्या हँडलच्या खाली असलेला एक पितळ्याचा बिल्ला मला अजून आठवतोय. तो त्या सायकलचा कर भरल्याचा बिल्ला असायचा. मग तो शांतपणे सायकलला लावलेली शिडी खाली घ्यायचा. ही शिडी बांबूची असायची आणि त्याला किती पायर्‍या होत्या ते मला अजून आठवतंय. असो. ती शिडी तो मग शांतपणे फरफटत त्या दिव्याच्या खांबाशी फरफट न्यायचा आणि त्याला लावायचा. मग मात्र तेथे एकदम शांतता पसरायची. खिशातून आगकाडीची पेटी काढून तो त्यातील एक काडी पेटवायचा. एका हाताने कंदिलाची काच वरती करून तो ती वात पेटवायचा. इतका वेळ आम्ही सगळे श्वास रोखून त्याचे ते काम पहात असू. जणू काही कसला आवाज झाला तर ती पेटती काडी विझेल किंवा ती शिडी घसरेल.. तो ज्या एकाग्रतेने तो कंदील पेटवायचा त्याच एकाग्रतेने आम्ही तो सोहळा पहात असू. त्याने कंदिलाची काच खाली केली की मग मात्र तेथे एकच गोंधळ उडे. सामना जिंकण्यास एक धाव हवी आहे अशी त्यावेळेस परिस्थिती असायची. हे असे का? हे माहीत नाही.. बरं हा प्रकार रोजच व्हायचा तरी पण ती शांतता पसरणे आणि मग एकच गोंधळ होणे हे रोजच व्हायचे. मग कोणाच्या तरी घरून चहा येई (बहुतेक वेळा आमच्याच घरून) असाच प्रकार आठवड्यातून तो एकदा कंदिलाची वात कापायला किंवा काचेवरची काजळी रांगोळीने साफ करण्यासाठी यायचा तेव्हा व्हायचा…

हा कंदील रात्री कोण विझवत असे हे मात्र लहानपणी मला कधीच कळले नाही… आजी म्हणायची झाडावरच्या मुंजाला त्या प्रकाशाने झोप आली नाही की तो त्यावर फुंकर घालतो…त्या काळात रात्री वारा सुटला की मला मुंजाच फुंकर घालतो याची खात्री वाटे. तो मंद उजेड फेकणारा कंदील, त्याचा मिणमिणता प्रकाश, फडफडणारी वात आणि मुंजाची फुंकर हे कधीतरी मला पाहायला आवडेल हे मात्र खरे… पण आता ते शक्यच नाही म्हणा..

त्यानंतर सिनेमाच्या जाहिरातीची गाडी येत असे. या बैल गाडीला एकच बैल असे. गाडाच म्हणाना ! बैलाच्या अंगावर एक मळलेली झूल असे आणि त्याची शिंगे रंगवलेली असत. गळ्यात सतत वाजणार्‍या घंटा असत. मला शंका आहे की त्या बैलाला थोडा वेळ झाला की मान हलविण्यास शिकवले असावे. नाहीतर ठरावीक वेळाने त्या घंटा कशा वाजल्या असत्या.? (गाडी उभी असेल तेव्हा…) त्या गाडीला बांबूच्या तट्ट्यांनी शाकारलेले असायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाचे अत्यंत टुकार (हल्लीच्या तुलनेत) पोस्टर चिकटवलेले असायचे. चालू असलेल्या सिनेमाचेच पोस्टर लावायचे बंधन त्या गाडीवाल्यावर नव्हते आणि तंबूच्या मालकावरही नव्हते. कुठलेतरी पोस्टर लावले की झाले.. कारण आज कुठला सिनेमा आहे याची घोषणा स्वत: गाडीवान करायचा. आमच्या चौकात आला की तो गाडी उभा करायचा आणि एक पत्र्याचा भोंगा काढायचा. त्यातून बारशाला जसं बाळाच्या कानात कुर्र ऽऽ कुर्र ऽऽ असा आवाज करतात तसा आवाज तो त्या भोंग्यातून काढायचा. मुलांची झुंड तेथेच असायची. त्या गोंधळात ज्यांना ऐकू जायला पाहिजे त्यांना त्याची घोषणा ऐकू जावी म्हणून तो मुलांना गप्प करण्यासाठी प्रयत्न करायचा. अर्थात तो असफल झाल्यावर मग तो गोळ्यांचे अस्त्र बाहेर काढायचा मग मात्र जाहिरात पुढे जायची, “कुर्र ऽऽऽऽ कुर्र.ऽऽऽ… ऐका हो ऐकाऽऽऽ आज रात्री ऽऽऽ xxxx टॉकीजच्या रुपेरी पडद्यावर ऽऽ पहा खास लोकाग्रह परत समुंदरी डाकू…. लोकाग्रहास्तव हा शब्द त्याला म्हणता यायचा नाही मग तो त्याचा उच्चार लोकास्तव किंवा काहीही करायचा… मग त्यात काम करणार्‍या नट नट्यांची नावे जाहीर केली जायची. पहिली दोन नेहमीच प्रसिद्ध नट नट्यांची असायची… मी हा सिनेमा त्या तंबूत पाहिला. मला गोष्ट विशेष आठवत नाही. पण एक समुद्री चाचा आणि एक सुंदरी अशी काहीतरी गोष्ट होती… ( परवा गुगलवर शोध घेताना कळाले की त्यात नासीर खानने काम केले होते आणि त्यातील एक गाणे खाली टाकले आहे. नटी बहुधा फियरलेस नादिया/नादिरा असावी.) नवीन सिनेमा असेल तर घड्या घातलेली गाण्याची पुस्तके विकली जायची आणि जाहिराती वाटल्या जायच्या.

सिनेमाच्या तंबूतील वातावरणावर नंतर केव्हातरी लिहेन पण त्या काळात एकच प्रोजेक्टर वापरला जायचा आणि रीळ संपल्यावर ते रीळ गुंडाळून दुसरीकडे पाठवावे लागे. मग दुसरे रीळ लावल्यावर मग परत सिनेमा परत सुरू. पण, मधे हा जो वेळ असे त्यासाठी पडद्यावर कायम एक चित्र दिसत असे. गाईला चारा घालणार्‍या बाईचे ते चित्र मला अजूनही आठवतेय. जर हे रीळ न गुंडाळता तसेच पुढे पाठवले तर भयंकर मारामारी होण्याची भीती असे…. पडद्यावर केव्हाही प्रेक्षक दिसत असत. (सावल्या) पण त्याने काही भिघडायचे नाही म्हणा…

एकदा असंच सिनेमाला गेलो असताना (स्वतःच्या सतरंज्या घेऊन जाव्या लागत. सिनेमा बघण्याचे तसे कष्टाचे काम होते. खाण्याचा डबाही बरोबर घ्यावा लागे) तंबूचा मालक समोर आला. आम्ही सगळी शहरातील मंडळी आलेली पाहून तो त्याच्या डोअरकिपरकडे पाहून ओरडला, “अरे…. सावकार मंडळी आली आहेत. आत जा, जागा साफ कर, (म्हणजे बिड्यांची थोटके उचल) आणि धर्मेंद्रला म्हणावं आज जरा चांगलं काम कर !” तो हे इतके आत्मविश्वासाने म्हणत असे की आम्हाला ते खरंच वाटे….

आणि हो ! तिकीट होते फक्त १ आणा दोघांसाठी ! आम्हाला बहुतेक वेळा फुकटच !

– जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s