प्राकृत…

कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला. त्याचे ‘डोन्ट स्लीप देअर आर स्नेक्स’ हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. असो. ज्या भाषा माहीत आहेत, त्यांचे वर्गीकरण चार खंडांमध्ये करता येते. एक – आफ्रिका खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, दोन – युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, तीन – प्रशांत महासागर खंडात बोलल्या जाणाऱ्या व चार – अमेरिकन खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा. युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांत सेमेटिक, कॉकेशस, युरल- अल्टाईक, एकाक्षरी, द्रविड इ.इ. व इंडोयुरोपीय भाषा येतात. इंडोयुरोपीय भाषां या उत्तर भारत, अफगाणिस्थान, इराण व युरोपमध्ये बोलल्या जातात. या भाषा केंटुम व शतम या दोन प्रकारांत विभागल्या गेल्या आहेत. केंटुम हा लॅटिन शब्द आहे व त्याचा अर्थ शत (१००) असाच होतो. शतममध्ये इलिरियन, बाल्टिक, स्लोव्हानिक, अर्मेनियन व इतर आर्य भाषांचा समावेश करण्यात येतो. अर्थात आता आर्य/अनार्य हा फरक निकालात निघण्याची वेळ आलेली असल्यामुळे आता या भाषांना काय म्हणावे हा एक प्रश्नच आहे. आर्य भाषांमध्ये प्रामुख्याने इराणी, दरद व इतर भारतीय भाषा येतात. असे म्हणतात की अवेस्ताची भाषा ही वेदांच्या भाषेशी बरीच मिळतीजुळती आहे. दरद भाषा पामीर व उत्तर पंजाबमध्ये येणाऱ्या प्रदेशात बोलली जात असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. बऱ्याच संस्कृत साहित्यात काश्मीरच्या आसपासच्या प्रदेशाला दरद या नावाने ओळखले जाई, ही खरी गोष्ट.
जर काळात विभागणी केली, तर भारतीय भाषांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल : इ.स. ५००पर्यंत बोलल्या जाणाऱ्या भाषा, नंतर ५०० ते ११०० या काळात बोलल्या जाणाऱ्या भाषा. हेच प्राकृत भाषांचे युग असे समजले जाते. आता या प्राकृतात त्या काळात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा, पाली भाषासहित गणल्या जातात. ११००नंतरचा काळ ते आत्तापर्यंत हा आधुनिक भारतीय भाषांचा काळ समजला पाहिजे. यात अपभ्रंश व त्याचे काही पोटविभाग मोडू शकतात.
या मध्ययुगीन भारतीय भाषांचे तीन भाग पाडले जातात. १) पाली, शिलालेखांमधे वापरली जाणारी प्राकृत, २) जैन आगमांमध्ये वापरली गेलेली अर्धमागधी व ३) ज्यात अश्वघोषाने प्राचीन नाटके लिहिली ती प्राचीन प्राकृत. दुसऱ्या भागात आपल्याला एका लेखात परिचय करून दिलेली गाथासप्तशती, गुणाढ्यची बृहत्कथा लिहिलेली आहे. याच काळात मला वाटते प्राकृतात व्याकरणाचा प्रवेश झाला. तिसऱ्या भागात अपभ्रंश नावाची भाषा येते, जी अपभ्रंशावरून तयार झाली असावी. असे म्हणतात की अपभ्रंशाची वाढ ही वैय्याकरणांच्या प्राकृतच्या क्लिष्ट नियमांमुळे झाली. शक्य आहे, कारण प्राकृतच्या वाढीत संस्कृतमधील जटिल व्याकरणाचा महत्त्वाचा सहभाग आहे. हेमचंद्राने बाराव्या शतकात प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथात जी अपभ्रंशची उदाहरणे दिली आहेत, त्यावरून अपभ्रंश ही त्या काळात बरीच प्रगल्भ झाली होती असे अनुमान काढता येते. पुढे जे संस्कृतचे झाले, तेच अपभ्रंशचे झाले. जशी वैय्याकरण्यांनी व्याकरणाचे नियम आणखी अवघड केले, तशी हीसुद्धा भाषा मागे पडली व त्याची अनेक सुटसुटीत रूपे जन्माला आली. त्याच आत्ताच्या मराठी, गुजराथी, बंगाली, सिंधी पंजाबी या भाषा.
आता एक अत्यंत वादाचा मुद्दा. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की प्राकृत हे संस्कृतचेच भ्रष्ट रूप आहे. पण आता हे ग्राह्य धरले जात नाही. मलाही तेवढे पटत नाही. अर्थात तेवढा आधिकार नसल्यामुळे मी ठामपणे वाद घालू शकत नाही, पण जर भाषांना सुधारण्यासाठी वैय्याकरण्यांनी व्याकरणांचे नियम अधिकाधिक केले व त्यात चुका होणार नाहीत अशी तजवीज केली हे जर मानले, तर सुधारणा कुठल्या भाषेत झाल्या हे पाहावे लागेल. अर्थातच हे व्याकरणाचे नियम प्राकृतला लावले जाऊन त्यातून संस्कृत तयार झाली असावी. वैदिक काळात बोली भाषा कुठली होती हे समजण्यास आता मार्ग नाही, पण बहुधा संस्कृत ग्रंथ सोडल्यास प्राकृतच बोलली जात असावी.
प्राकृत भाषेत निर्माण झालेल्या साहित्याचा परामर्श आता घ्यायला हरकत नाही. प्राकृतात दोन धर्मांचे साहित्य निर्माण झाले. बौद्ध साहित्य व जैन साहित्य. जरी त्यांचे तत्त्वज्ञान वेगळे असले, तरी ही दोन्ही साहित्य साधारणत: एकाच काळी निर्माण झाली. अर्थात त्यांचे विकसित होण्याचे मार्गही वेगळे होते. पाली साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: दोनशे-एक वर्षांत लिहिले गेले. त्यात मुख्यत: बुद्धाचे उपदेश होते. हे ग्रंथ राजगृह, वैशली व पाटलीपुत्र या राज्यांत रचले गेले. हे ग्रंथ रचले गेले तो काळ कुठला होता हा कदचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की सर्व बौद्ध मठातून बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी भारतातीलच काय, परदेशी भिख्खू उपस्थित असणार. त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या असणार. उदा. अवंती, कोशांबी, कनोज, साकाश्य, मथुरा या प्रांतातील मठवासीयांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या असणार, तर दक्षिण भागातील भाषाही वेगेवेगळ्या असणार. मठांमधे जे नियम पाळावे लागत, त्या संदर्भातील ग्रंथाचे नाव होते ‘विनय’. विनय रचताना व या नियमांचा अभ्यास करताना त्यांच्यात भाषेची सरमिसळ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरमिसळ अनेक शतके चालली होती हे लक्षात घ्यायला हवे. हे मूळ उपदेश होते कौशलच्या राजभाषेत व मगधाहून आलेल्या भिख्खूंच्या भाषेत. जे भिख्खू पश्चिम प्रदेशातून आले होते, त्यांच्या भाषेचा प्रभाव या कामावर पडणे शहज शक्य होते. हे साहित्य अशोकाच्या काळातच काही प्रमाणात लिपिबद्ध झाले होते. पण बहुतांश बौद्ध साहित्याची निर्मिती झाली सिंहलद्वीपमध्ये. हे काम पार पाडले होते ज्याने धर्मप्रसाराचे काम हाती घेतले होते तो राजपुत्र महेंद्र, अशोकाचा मुलगा. प्राचीन इतिहासातील या छोट्याछोट्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर पालीवर कुठल्या एका भूभागाचा अधिकार कसा काय मान्य केला जाईल? बौद्ध धर्मग्रंथ लिहिले गेले त्यात जी भाषा वापरली गेली, त्यावर इतर अनेक बोली भाषांचा प्रभाव पडला असणार हे कोणीही मान्य करेल. त्याचे प्रमाण किती हे आता कोणी सांगू शकत नाही. प्राकृत भाषेतील दुसरे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे जैन आगम साहित्य. भगवान महावीरांचा जन्मही पूर्वेकडेच झाला व अर्थातच त्यांचा उपदेश हाही पूर्वेतील भाषांमधे झाला असला पाहिजे. त्यांचा जन्म झाला वैशालीमध्ये, पण त्यांचे कार्यक्षेत्र होते मगध. जैन परंपरेनुसार भगवान महावीरांनी त्यांच्या पट्टशिष्यांना त्यांचा उपदेश सांगितला. त्यातील एक होता गणधर. याने या उपदेशांचे संकलन केले असे म्हणतात. हा उपदेश मगधातील प्रचलित भाषेत होता. बुद्धसुद्धा मगध देशात भ्रमण करीत होताच. त्याचा जन्म कोसलामध्ये झाला असे म्हणतात. त्याचे जे काही झाले, ते शिक्षणही तेथेच झाले. महावीर उत्तर मगधातील होत. त्यामुळे या दोन साहित्यांतील भाषेत का फरक आहे, हे लक्षात घेण्यास मदत होईल. महावीरांच्या निर्वाणानंतर जवळजवळ १५० वर्षांनी मगध-पाटलीपुत्रात भयानक दुष्काळ पडला व अनेक संतांना प्राण वाचविण्यासाठी देश सोडून जाणे भाग पडले. बरेच श्रमण मृत्युमुखी पडले. अशा नैसर्गिक आपत्तीत स्मृतिसंचित ग्रंथ नष्ट होतील या भीतीने त्यांना लिपीबद्ध करण्यात आले. त्यासाठी पाटलीपुत्रात जैन संतांची व श्रमणांची परिषद बोलाविण्यात आली व त्यात आगम साहित्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला व पार पाडण्यात आला. हा काळ होता साधारणत: इ.स.पूर्व चौथ्या शतकात. यानंतर जवळजवळ आठशे वर्षे आगम साहित्यामध्ये कसलाही बदल केला गेला नाही. दुसरी परिषद झाली मथुरेमध्ये चौथ्या शतकात. त्यानंतर तिसरी झाली दोनशे वर्षांनंतर. या परिषदेचे प्रमुख होते संत देवर्धिगणी. सहाव्या शतकात एक शेवटची परिषद झाली, त्यात सगळ्या उपलब्ध प्रतींचा मेळ घालून एक प्रत केली गेली. अर्थात यात सगळ्या प्रतींच्या भाषेचा प्रभाव पडला असणार. या आगम साहित्यात भगवान महावीरांचा उपदेश आहे व त्याची भाषा अर्धमागधी आहे असे मानले जाते. हे असे मानण्याचे मुख्य कारण आहे की खुद्द या प्रतीत तसे नमूद केले आहे. अर्धमागधीमध्ये जेव्हा हा उपदेश केला गेला व जेव्हा अर्धमागधी भाषेतया शेवटच्या आवृत्त्या निर्माण केल्या गेल्या, त्यामध्ये १००० वर्षे उलटून गेली होती. या उलट बौद्ध साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: ५०० वर्षांतच निर्माण झाले. त्यामुळे आगमांची भाषा ही पिटकांच्या भाषेपेक्षा नवीन असू शकेल. बरेच आगम साहित्य काळाच्या ओघात नष्ट पावले. जे काही उरले, त्यात फारशी सरमिसळ नाही. पालीइतकी तर मुळीच नाही. कारण बौद्ध धर्म जगभर पसरण्याचा तो काळ होता. बुद्ध विहारात अनेक प्रांतातील श्रमण ये-जा करीत असत हेही एक प्रमुख कारण होतेच. या झाल्या पाली व अर्धमागधी बोली भाषा.
ज्या अर्धमागधीबद्दल आपण बोलतोय, त्यात पूर्वेच्या भाषेचा प्रभाव आपल्याला जाणवतो; तर पाली भाषा प्राचीन आहे, पण त्यामध्ये मध्य प्रदेशातील भाषांचा प्रभाव जास्त जाणवतो. त्यामुळे या दोन्ही भाषांचा अभ्यास करणे कठीण होते. यामधे आपल्याला मदत करतात शिलालेखांतील भाषा. आपल्याला माहीतच आहे की हे शिलालेख अंदाजे इ.स.पू. २७० ते २५० या काळात खोदले गेले आहेत. या खोदलेल्या शिलालेखाच्या भाषांचा अभ्यास म्हणजेच बहुधा भारतातील प्राचीन भाषांचा पहिलावाहिला अभ्यास असावा. धम्माचा प्रसार व राज्याधिकाऱ्यांना त्याचा राज्यशकट हाकण्याचा दृष्टीकोन समजावा म्हणून सम्राट अशोकाने हे लेख खोदवून घेतले. त्यामुळे त्याची शैली एकच आहे, पण स्थानानुसार त्याची भाषा बदलत जाते. उदा. शाहबाजगढी मंसेरा येथे लिहिलेले लेख व गिरनार येथील लेख हे भाषिक दृष्टीकोनातून खूपच भिन्न आहेत. अर्थात हा फरक समजणे अवघड आहे. या शिलालेखांची भाषा ही राजभाषा किंवा अशोकाच्या दरबारातील भाषा असणार. राजभाषेमध्ये बोलीभाषेइतका फरक पडत नाही, कारण त्यात फारच कमी लोक बोलतात/लिहितात. भाषेच्या दृष्टीकोनातून अशोकाच्या शिलालेखांचेही चार भाग पाडता येतात. उत्तर-पश्चिमचे लेख, गिरनारचा लेख, गंगाजमुना ते महानदी या पट्ट्यातील लेख व दक्षिणेतील लेख. यातील दक्षिणेतील लेखांवर इतर भाषांचा काही प्रभाव पडला नाही, कारण ती भाषा सर्वस्वी वेगळी होती. गिरनार येथील लेखांवर गुजरातच्या बोली भाषांचा प्रभाव पडला. गोश्रुग गुहेत जे खरोष्टी लिपीतील धम्मपदे सापडली, त्याला धम्मपद प्राकृत याच नावाने ओळखले गेले. स्टाईनला मध्य आशियात खोतान येथे जी कागदपत्रे सापडली, ती चडोत-खरोष्टीमध्ये लिहिण्यात आली होती. ही भाषा पेशावर येथे बोलल्या जाणाऱ्या भाषेशी जवळीक दाखविते. गिरनार येथील लेखातील भाषा ही पालीशी साम्य दाखविते, कारण यावर मध्य भारतातील भाषांचा प्रभाव पडलेला दिसतो. प्राचीन नाटकांमधे तीन भाषा आढळतात. संस्कृत, शौरसेनी व मागधी. यातील प्रतिष्ठित संस्कृतमध्ये बोलताना दाखविले जात, सुशिक्षित स्त्रिया व अशिक्षित पुरुष शौरसेनीमध्ये व अशिक्षित – ज्यांची टर उडविली जाई, ते मागधीमध्ये व्यवहार करताना दाखविले जात. यातील शेवटच्या दोन्ही प्राकृतच आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अश्वघोषाने नाटके लिहिली, त्याचा काळ होता अंदाजे दुसरे शतक. या नाटकांची भाषा नंतरच्या नाटकांपेक्षा बरीच भिन्न आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात शौरसेनी, मागधी व अर्धमागधी यांचा उपयोग केलेला आढळतो. त्यानंतर भासाच्या नाटकात प्राचीन प्राकृताचे दर्शन घडते, तर मृच्छकटिकमध्ये सर्व प्राकृतांचे दर्शन घडते. भारताच्या बाहेर – विशेषत: अफगाणिस्तानच्या सीमेवर – जी प्राकृत बोलली जायची, तिला नियप्राकृत असे नाव होते. प्राकृतातही रूढीप्रियता होतीच व तिची पावलेही व्याकरणाच्या दृष्टीने संस्कृतच्या पावलावर पडत होती. खरे म्हणजे जेथे संस्कृतचा प्रभाव नव्हता, त्या भागात प्राकृत उमलली. थोडक्यात, आपण प्राकृताचे पुढील प्रकार पाहिले – १) शौरसेनी, २) मागधी, ३) अर्धमागधी व ४) अपभ्रंश.. आणखी सगळ्यात महत्त्वाची प्राकृत आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे महाराष्ट्री प्राकृत. महाराष्ट्री प्राकृत ही सगळ्यात श्रेष्ठ समजली जाई. दंडींनी एके ठिकाणी व्याकरणाचे काही नियम सांगताना म्हटले आहे, ‘इतर नियम हे महाराष्ट्रीप्रमाणे समजावेत.’ महाराष्ट्री ही काही फक्त कवींची भाषा होती असे समजण्याचे कारण नाही. गोदावरीच्या खोऱ्यात बोलली जाणारी सर्वात प्राचीन अशी भाषा आहे ती. त्याचेच आत्ताचे स्वरूप म्हणजे आपली मराठी.
बुद्ध आणि महावीर यांच्या काळात प्राकृत भाषेला राजमान्यता व जनमान्यता मिळाल्यावर चहूबाजूंनी तिची प्रगती होऊ लागली. आपण पाहिलेच आहे की अश्वघोषाच्या काळात तर त्यात साहित्य निर्मितीही होऊ लागली होती. अर्थात प्राकृताच्या या अनेक रूपांतून एका प्राकृताचे आगमन झाले. प्रथम शौरसेनी व नंतर महाराष्ट्री. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याचा महाराष्ट्राचा काही संबंध नाही. पण ते खोटे, प्रांतीय हेवेदाव्यातून प्रतिपादन केले गेले असे माझे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे की फक्त काही व्यंजनांचा लोप होत असल्यामुळे ती भाषा वेगळी झाली. पण ती व्यंजने येथेच का लोप पावली याचे उत्तर ते देत नाहीत. याचे कारण येथे ती भाषा बोलणारे लोक असावेत. शेवटी भाषा अशीच तर निर्माण होत असते. असो.
शौरसेनीची लक्षणे सांगताना वररुचीने प्राकृत प्रकाशमध्ये काय लिहिले आहे, ते आपण वर एके ठिकाणी पाहिलेच आहे. त्यात त्याने ‘उरलेले महाराष्ट्रीप्रमाणे’ असा उल्लेख केला आहे. म्हणून काही लोकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रीच प्राकृतचे मुख्य स्वरूप आहे. पण शौरसेनी ही त्यानंतर जन्माला आली. आचार्य दंडींनी त्यांच्या काव्यदर्शनमध्ये म्हटले आहे, ‘महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदु: ’. म्हणजे महाराष्ट्रात बोलली जाणारी महाराष्ट्रीच उत्कृष्ट प्राकृत आहे. पण याची पुढची ओळ आहे, ‘सागर: सूक्तिरत्नानां सेतुनन्धादि यन्मयम.’ म्हणजे ज्यात सेतुबन्धसारखे ग्रंथ रचले गेले आहेत, म्हणून ती श्रेष्ठ. अर्थात भाषा श्रेष्ठ इ.इ.वर माझा स्वत:चा विश्वास नाही. भाषा केवळ अचुक व्याकरणामुळे श्रेष्ठत्वाला पोहोचत नाही. मला वाटते त्यात होणाऱ्या संभाषणामुळे, साहित्य-काव्यामुळे ती त्या पदास पोहोचू शकते. म्हणूनच पुरुषोत्तमने आपल्या प्राकृतानुशासनमध्ये महाराष्ट्री आणि शौरसेनी एक कशी झाली आहे याबद्दल प्रतिप्रादन केले आहे. उद्योतनसुरीने पाययभाषा व मरहट्टय भाषा या दोन्ही वेगवेगळ्या आहेत असे प्रतिपादन केले आहे. महाराष्ट्रीमध्ये जे दोन महत्त्वाचे ग्रंथ रचले गेले – १) गाहाकोस म्हणजे गाथासप्तशती व २) गौडवहो म्हणजे गौडवध, त्यामुळे महाराष्ट्री व इतर प्राकृत यांच्यात संबंध दाखविण्याची गडबड सुरू झाली असावी, असे माझे मत आहे. सेतुबंधमध्ये ज्या भाषेत तो ग्रंथ रचला गेला, त्याबद्दल कसलाही उल्लेख नाही; परंतु तो महाराष्ट्रीमध्ये रचला गेला आहे असे आचार्य दंडींनी म्हटले आहे आणि त्यावर विश्र्वास ठेवण्यास हरकत नसावी.
वर आपण त्या काळातील परिस्थितीचा एक धावता आढावा घेतला. आता प्राकृत भाषेचे प्रकार पाहू. हे पुनरुक्तीचा धोका पत्करून लिहिले आहे. हा भाग डॉ. जगदीशचंद्र जैन यांच्या लेखनाचा जवळजवळ अनुवादच आहे. माझी काही मते त्यात आढळतील.
पाली व सम्राट अशोकाच्या धर्मलिप्या.
बुद्धघोषाने बौद्ध त्रिपिटक किंवा बुद्धवचनांच्या संदर्भात पाली या शब्दाचा वापर केला आहे. यालाच मागधी असेही म्हटले जाते. या भाषेचा प्रसार दक्षिणेतही झाला, कारण अशोकाच्या लेखात वापरली गेलेली भाषा आणि पाली यात बरीच समानता आढळते.
हे शिलालेख भारताबाहेरही आढळतात, जे खरोष्टीत कोरलेले आढळतात, हे आपण वर पाहिलेच आहे. पण याची भाषा प्राकृतच आहे.
भारतेतर प्राकृत अर्थात इतर ठिकाणी आढळणारी प्राकृत.
यात खरोष्टी लिपीत लिहिलेले प्राकृत धम्मपदतील १२ परिच्छेद आहेत, ज्यात बुद्धाचा उपदेश लिहिला आहे, खरोष्टीमध्ये लिहिलेले हे लेख चिनी तुर्कस्तानमध्ये सापडतात. या प्राकृताला नियाप्राकृत या नावाने ओळखले जाते.
अर्धमागधी
ज्याप्रमाणे बौद्ध त्रिपटकात वापरल्या गेलेल्या भाषेला पाली असे संबोधले गेले, तसेच जैन आगम साहित्यात वापरल्या गेलेल्या भाषेला अर्धमागधी असे संबोधले गेले. याला आर्ष भाषा म्हणजे ऋषींची भाषा असेही म्हणतात. ही भाषा खास जैनांच्या आगम साहित्यात आहे. याचे बहुतेक नियम वेगळे आहे. त्यामुळे बहुतेक संस्कृत नाटकात याचा वापर केला गेलेला दिसत नाही.
भरताने ‘नाट्यशास्त्र’ या त्याच्या प्रसिद्ध ग्रंथात ज्या सात भाषांचा उल्लेख केला आहे, त्यात अर्धमागधीचा उल्लेख केला आहे. उदा. मागधी, आवंती, प्राच्या, शौरसेनी, वान्हिका व दाक्षिणात्या या त्या उरलेल्या सहा भाषा. निशीथचूर्णीकाराने तर मगधातील अठरा भाषांना अर्धमागधी म्हणून संबोधले आहे. या भाषेत मागधी व प्राकृत या दोन्हींचा प्रभाव आढळल्यामुळे अभयदेव या भाषेला अर्धमागधी असे संबोधतो.
शौरसेनी
मथुरेच्या आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी ही भाषा. दिगंबर जैन संप्रदायाचे अनेक ग्रंथ या भाषेत आढळतात. काही तज्ज्ञ या भाषेला महाराष्ट्रीच्या आधीची मानतात, पण मी मानत नाही. कारण त्या काळात वरील सर्व भाषा भारताच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जात होत्या व त्यांची गाठ साहित्यातच पडत असे.
महाराष्ट्री
ही भाषा अत्यंत समृद्ध होती, त्यामुळेच यात सर्वोत्तम साहित्यनिर्मीती झाली असावी. या भाषेतील व्यंजने मोठ्या प्रमाणावर काढली गेल्यामुळे ही भाषा कर्णमधुर झाली. काव्यरचनेमध्ये त्यामुळे या भाषेचा वापर प्रामुख्याने केला गेला. आपण गाथासप्तशतीचे किंवा जयवल्लभाच्या वज्जालग्गाचे उदाहरण या संदर्भात घेऊ शकतो.
पैशाची
ही एक अत्यंत प्राचीन अशी प्राकृत बोलीभाषा आहे. म्हणजे जवळजवळ पाली, शिलालेख व अर्धमागधी यांच्याइतकी जुनी. मध्य आशियामध्ये, म्हणजे खोतान येथे सापडलेले काही लेख व कागद (हो, तेव्हा कागद होते) सापडले, त्यात खरोष्टी लिपीत पैशाचीमध्ये लिहिलेले आढळते. काही तज्ज्ञांच्या मते पैशाची ही पालीचेच एक रूप आहे. वररुचीने प्राकृतप्रकाशमध्ये पैशाचीचे मूळ शौरसेनी आहे असा उल्लेख केलेला आढळतो. रुद्रटाच्या काव्यालंकारवर लिहिलेल्या टीकेत नमिसाधूने या भाषेला पैशाचिक असे म्हटले आहे. हेमचंद्रने प्राकृतव्याकरण या ग्रंथात पैशाचीच्या नियमांबद्दल लिहिले आहे. त्रिविक्रमने शब्दानुशासनमध्ये व सिंहराजने प्राकृतरूपावतारमध्ये पैशाचीचा उल्लेख केलेला सापडतो, तर मार्कंडेयने प्राकृतसर्वस्वमध्ये कांचीदेशीय, पांड्य, पांचाल, गौड, मागध, व्राचड, दक्षिणात्य, शौरसेन, कैकेय, शाबर व द्राविड या नावाचे अकरा पिशाच देश सांगितले आहेत. अर्थात त्यानुसार येथे त्या काळात पैशाची बोलली जात असणार. मार्कण्डेयने फक्त तीन देशांचा या बाबतीत उल्लेख केला आहे, ते म्हणजे कैकेय, शौरसेन व पांचाल. रामशर्मा तर्कवागीशने प्राकृतकल्पतरूमध्ये कैकेय, शौरसेन, पांचाल, गौड, मागध व व्राचड पैशाचीचा उल्लेख केला आहे. लक्ष्मीधरच्या षड्भाषाचंद्रिकामध्ये पैशाची व चूलिका पैशाची ही भाषा राक्षस, पिशाच्च व खालच्या दर्जाचे लोक बोलत होते असा उल्लेख आहे. त्याने तर पैशाची बोलणाऱ्या देशांमध्ये बरीच भर घातली आहे, ती याप्रमाणे – पांड्य, केकय, बाल्हिक, सह्य, नेपाल, कुंतल, सुधेष्ण, भोज, गांधार, हैवक व कनोज. मला वाटते या प्राकृतात उच्च जमातीतील व्यक्तींना बोलण्यास परवानगी नव्हती. भोजदेवाच्या सरस्वतीकंठाभरणममध्ये तसा उल्लेख आढळतो. आचार्य दंडींनीही काव्यादर्शमध्ये पैशाची म्हणजे भूतभाषा असा उल्लेख केला आहे.
पण पैशाची ही संस्कृतला जास्त जवळची आहे, हे निर्विवाद. याच कारणामुळे अनेक दानपत्रे संस्कृतमध्ये आहेत का पैशाचीमध्ये, हे पटकन ओळखू येत नाही. गुणाढ्याची प्रसिद्ध बृहत्कथा पैशाची भाषेतील सगळ्यात प्राचीन साहित्य आहे. त्याची प्रत उपलब्ध नाही, पण त्याचे उल्लेख मात्र सापडतात.
मागधी..
मगध जनपदाची ही भाषा. मगध जनपद म्हणजे बिहारच्या आसपासचा प्रदेश. ज्याप्रमाणे इतर प्राकृतात स्वतंत्रपणे साहित्यकृती आढळतात, तशा या प्राकृतात आढळत नाहीत. अर्थात काही संस्कृत नाटकात यातील काही वाक्ये आढळतात. मार्कण्डेयच्या प्राकृतसर्वस्वमध्ये ही भाषा राक्षस, भिक्षू, क्षपणक व चेट जमातीचे लोक बोलत असत. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की अंत:पुरात राहणारे, घोड्यांचा सांभाळ करणारे, किंवा आपत्तीत सापडलेले नायक ही भाषा बोलतात. दशरूपकार म्हणतात, खालच्या जातीतील जमाती ही भाषा बोलतात. शूद्रकाच्या मृच्छकटिकात संवाहक, शकारचा नोकर, वसंतसेनेचा नोकर कुंभीलक, चारुदत्ताचा नोकर वर्धमानक हे लोक या भाषेत संभाषण करतात. शाकुंतलमध्ये दोन शिपाई, कोळी याच भाषेत बोलताना आढळतात. मुद्राराक्षसात जैन साधू, दूताच्या किंवा चांडाळच्या रूपात आलेले सिद्धार्थ इ. मागधीमध्येच बोलतात. पुरुषोत्तमने या भाषेत शाकारी, चान्डाली व शाबरी या भाषा आहेत असे नमूद केले आहे.
या झाल्या विविध प्राकृत भाषा. त्यांची मजा घ्यायची असेल, तर प्राकृत साहित्याबद्दल व व्याकरणाबद्दल लिहायला पाहिजे. पण ते पुन्हा केव्हातरी…
-जयंत कुलकर्णी.