…. एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले. गावातील परंपरागत चालत आलेली वैद्यकी ते समर्थपणे चालवत होते असे त्यांच्या एकंदरीत अवतारावरून वाटत होते खरे.. माणूस तसा आढ्यतेखोर वाटला. त्यांनी सराईतपणे माझी नाडी तपासली व त्यांच्या पठडीतील नेहमीची औषधे दिली. चूर्ण व कसलातरी कपाळाला लावण्यासाठी लेप ! त्यांनी माझ्या यजमानांनी दिलेली नोट खिशात सारली व निर्विकारपणे मान वळवली. ते निघणार तेवढ्यात त्यांच्या मनात काय आले कोणास ठावूक. त्यांनी माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. कदाचित त्यांना गप्पा मारण्यासाठी सुशिक्षित माणूस त्या छोट्या गावात भेटला याचे अप्रूप असावे. माझ्या तापामुळे मलाही रात्री झोप लागेल का नाही याची शंकाच होती म्हणा. मी ही स्वार्थी विचार करून बोलणे वाढवले. थोड्याच वेळात यजमानांनी आतून चहा मागवला व आमची गप्पांची मैफील जमली. वैद्यराज आता मोकळेपणाने गप्पा मारू लागले. मला वाटले तसा माणूस आढ्यतेखोर नव्हता. आपण उगाचंच एखाद्या माणसाची तो दिसतो कसा याची परीक्षा करतो आणि आपला गैरसमज करून घेतो. माणूस तसा गप्पिष्ट होता आणि त्याच्या बोलण्याला थोडीशी विनोदाची झालर होती. रंगात आले की ते कोटाच्या खिशातून चांदीची तपकिरीची डबी काढत व एक चिमूट नाकपुडीत कोंबत.
हे जग विचित्र आहे.कधी कधी तुम्ही ज्यांच्या बरोबर आयुष्य काढता त्यांच्याशी तुम्ही किंवा ते तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत तर कधी कधी एखादा अनोळखी माणूस पाच दहा मिनिटातच मनमोकळेपणाने, मोठ्या विश्वासाने त्याचे मन तुमच्यापाशी मोकळे करतो. वैद्यराजांना माझ्यापाशी आपले मन मोकळे करावेसे का वाटले हे एक गूढच आहे. कदाचित अनोळखी माणसाचे उपद्रवमूल्य कमी असल्यामुळे असे घडत असावे, काय माहीत ? गप्पा खूपच रंगल्या आणि गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना मला सांगितली. घटना तशी साधी पण…. असो, मी त्यांच्याच शब्दात तुम्हाला सांगतो…
… तुम्हाला उदगीरचे प्रसिद्ध देशमुख वकील माहीत आहेत का ? शक्यता कमीच आहे पण यांना माहीत असतीलच. त्यांनी माझ्या यजमानांकडे बोट दाखवून म्हटले. पण माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. तर काय सांगत होतो, मला लख्ख आठवतंय, मी त्यावेळी त्यांच्याकडेच त्यांच्या भोकरच्या वाड्यावर बसलो होतो. त्या वेळेसही हिवाळा होता आणि रात्री थंडगार तर दिवसांना उन भाजून काढत होते. मी देशमुखांकडे त्यांच्याबरोबर रमी खेळत बसलो होतो. तसा इथे फारसा उद्योग नसतो. कोणालाच ! ते हसून म्हणाले. तेवढ्यात अचानक एका नोकराने मला बाहेर कोणाचा तरी नोकर आपल्यासाठी आलाय असे सांगितले. (त्यांना वारंवार अचानक हा शब्द वापरण्याची सवय होती आणि तो उच्चारताना ते स्वतःच दचकल्या सारखा अविर्भाव करायचे..हेही माझ्या लक्षात आलं)
‘‘कोण आहे ?’’ मी त्रासिक चेहऱ्याने विचारले.
‘‘दरवान म्हनतोय त्याने कोनाची तर चिठ्ठी आनली आहे, साहेब एखाद्या पेशंटची असंल’’
‘‘ घेऊन ये ती चिठ्ठी’’ मी म्हणालो.
कुठल्यातरी पेशंटकडून ती चिठ्ठी आली होती. आता उठणे भागच होते. शेवटी अन्नदात्याचीच चिठ्ठी ती… एका विधवेची होती. ‘ माझी मुलगी मरायला टेकली आहे कृपा करून ताबडतोब निघून या. तुमच्यासाठी गाडी पाठवली आहे.’ ते ठीक होतं हो पण ती बाई वाड्यापासून जवळजवळ दहा एक मैल दूर होती. बाहेर अंधार दाटला होता आणि रस्त्याची हालत इतकी खराब होती की विचारूच नका. तिने पाठवलेल्या बैल गाडीची अवस्था पाहिल्यावर मला खात्री पटली की त्या बाईची परिस्थिती तशी बेताचीच असणार. क्षणभर जाण्यात काही लाभ आहे का असा विचार माझ्या मनाला आला हे मी नाकबूल करीत नाही. तसा विचार माझ्या मनात आला हे मी प्रामाणिकपणे सांगतो. ‘एक दोन रुपये मिळाले तरी खूप झाले.. कदाचित धोतर किंवा एखादी वस्तूही मिळेल फी म्हणून ’ मी मनात म्हटले. पण शेवटी माझ्यातील कर्तव्य भावनेने माझ्या स्वार्थी विचारांवर मात केली.. कर्तव्य बाबांनो कर्तव्य ! तुम्ही हसताय पण लक्षात घ्या माझ्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाच्या मनात प्रथम दोन वेळच्या अन्नाचा विचार येतो. मी टेबलावर पत्ते फेकले व देशमुखांना म्हणालो,
‘‘या बैलगाडीने गेलो तर दोन आठवड्याने पोहचेन. मी घरी जातो, औषधाची पोतडी भरतो तोपर्यंत तुम्ही महादूला तुमचा घोडा घेऊन पाठवाल का?’’ आमचे देशमुख म्हणजे भला माणूस आणि बहुधा त्यांना ते कुटुंबही माहीत असावे.’’
‘‘जावा तुम्ही बिनघोर! महादू येईल घोडा घेऊन. पण त्याला लगेचच परत पाठवा. उद्या त्याला उदगीरला जायचंय…’’ देशमुख म्हणाले.
मी त्या गाडीवानाला परत जाण्यास सांगितले आणि घाईघाईने घरी गेलो. आवश्यक वाटली तेवढी लेप, औषधे इ. पिशवीत भरली. महादू अचानक घोड्यावरून अवतरला. घोड्याच्या दुडक्या चालीने शेवटी आम्ही त्या घरापाशी येऊन पोहोचलो. ते आमची वाटच पाहात होते. आमचे स्वागत एका वयस्कर, गोर्यापान, सुंदर पण प्रेमळ वाटणार्या बाईंनी केले.
‘‘ वाचवा तिला ! ती वाचेल असं मला वाटत नाही’’ ती स्फुंदत स्फुंदत म्हणाली.
‘‘शांत व्हा ! कुठंय पेशंट?’’ मी तिची समजूत काढत विचारले.
‘‘ या इकडे या डॉक्टर !’’ ती मला डॉक्टरच म्हणाली याची मला क्षणभर मौज वाटली. नंतर ती मला याच नावाने संबोधित करत होती..
तिच्या मागून गेल्यावर माझ्या नजरेस एक स्वच्छ छोटी खोली पडली. कोपर्यात एक मंद दिवा तेवत होता आणि मधे एका पलंगावर साधारणतः वीस वर्षाची युवती ग्लानीत पहुडली होती. बिचारी तापाने फणफणली होती. तिचा श्वास अनियमित होत चालला होता. खोलीत अजून दोन मुली होत्या. त्या तिच्या बहिणी होत्या.त्याही त्या मुलीची अवस्था पाहून रडत होत्या.
‘‘ कालपर्यंत ती अगदी ठणठणीत होती. व्यवस्थित जेवलीही.सकाळी उठल्यावर तिने डोके ठणकतंय अशी तक्रार केली आणि संध्याकाळपर्यंत बघा तिची अवस्था काय झाली आहे….’’ रडत रडत त्यातील एक मुलगी म्हणाली.
‘‘ काळजी करू नका.’’ मी समजुतीच्या स्वरात म्हणालो. ‘‘शेवटी तिला बरं करणे हे आमचे कर्तव्यच आहे! असं म्हणून मी तिच्या पलंगापाशी गेलो. तिची नाडी तपासली आणि ताबडतोब ताप निवारक लेप लावण्यास सांगितले. काही चूर्णही दुधातून देण्यास सांगितले. इतका वेळ माझे त्या मुलीकडे लक्षच गेले नव्हते. पण आता औषधोपचार सुरु झाल्यावर मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले. पाहिले आणि काय सांगू… माझ्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. इतका सुंदर चेहरा मी माझ्या आयुष्यात आजवर पाहिलेला नव्हता. सौंदर्याची परिसिमाच होती म्हणा ना! तापामुळे तिचा गोरापान चेहरा फिक्कट पडला होता. त्यामुळे ती अधिकच गोरीपान दिसत होती. लेपामुळे चेहरा घामेजला होता आणि तिच्या रेखीव भुवयांवर घामाचे बिंदू जमा झाले होते. पण माझ्या मनात भरले ते तिचे सुंदर डोळे आणि तिच्या लांबसडक श्रांतपणे मिटलेल्या पापण्या.. तेवढ्यात तिने पापण्यांची मोहक हालचाल केली आणि डोळे उघडले. बाजूबाजूला नजर फिरवत तिने क्षीणपणे तिचे ओठ विलग केले. आपला हात स्वतःच्या चेहर्यावरून फिरवला… तिच्या बहिणींनी लगेचच तिच्या पलंगापाशी धाव घेतली..
‘‘ कशी आहेस आता ?’’ त्यांनी विचारले.
‘‘ठीक आहे !’’ एवढे बोलून तिने मान फिरवली व परत डोळे मिटले.
‘‘मला वाटतं आता पेशंटला एकटे सोडलेलं बरं !’’ मी म्हणालो. आम्ही सगळे हळूवार पावलांनी त्या खोलीबाहेर पडलो. बाहेरच्या खोलीत एका चुलीवर चहाचे भांडे उकळत होते. त्यांनी मला चहा दिला आणि केविलवाण्या आवाजात मी आजची रात्र तेथे राहेन का हे विचारले. मी तरी एवढ्या रात्री कुठे जाणार होतो ? मी ताबडतोब होकार दिला. अर्थात मी तेथे राहाण्याचे कबूल केले त्याला माझ्या पेशंटचे सौंदर्यही कारणीभूत होते हे नाकारण्यात अर्थ नाही. ज्या आजीने आमचे स्वागत केले होते ती सारखी स्फुंदत स्फुंदत ती जगेल का याची चौकशी करत होती.
‘‘कशाला रडताय आजी? ती जगणार आहे… रात्रीचे दोन वाजले.. मी तर म्हणतो आता तुम्ही जरा पडा आणि विश्रांती घ्या नाहीतर माझ्यावर तुमच्यावरच उपचार करण्याची वेळ यायची…’’ मी चेष्टेने म्हटले.
‘‘पण काही लागले तर उठवाल ना तुम्ही मला?’’
‘‘ हो ! हो ! काही काळजी करु नका’’ मी म्हणालो. त्या दोन मुलीही त्यांच्या खोलीत गेल्या. जाण्याअगोदर त्यांनी तेथेच पेशंटच्या खोलीच्या बाहेर एका पलंगावर माझा बिछाना घातला. मी बिछान्यावर पडलो पण माझा डोळा लागेना. खरे तर मी धावपळीने दमलो होतो पण माझ्या डोळ्यासमोर सारखा तो सुंदर चेहरा उभा राहू लागला. माझा पेशंट माझ्या डोक्यातून जाई ना ! शेवटी माझ्या विचारांना शरण जाऊन मी ताडकन उभा राहिलो आणि म्हटलं ‘जरा बघून येऊ तिच्याकडे.’ मी हळुवारपणे तिच्या खोलीचा दरवाजा आत लोटला. एका खुर्चीवर मोलकरीण तोंड उघडे टाकून मंदपणे श्वास घेत झोपली होती. तीही बिचारी दमली असणार ! दरवाज्याची चाहूल लागताच तिने अचानक डोळे उघडले आणि माझ्याकडे रोखून पाहिले.
‘‘कोण आहे? कोण आहे?’’ तिने विचारले.
‘‘घाबरू नका ! मी डॉक्टर आहे आणि तुला आता कसं वाटतंय हे पहायला आलोय !’’
‘‘तुम्ही डॉक्टर आहात का ?’’ तिने विचारले.
‘‘हो ! तुमच्या आईने मला बोलावणे पाठवले होते. आता मी औषध दिलंय आणि देवाच्या कृपेने एक दोन दिवसात तुम्ही हिंडू फिरू लागाल.’’
‘‘ मला मरायचे नाही डॉक्टर.. मला मरायचं नाही… कृपा करा…’’
‘‘तुम्ही असं काय बोलताय.. माझ्यावर विश्वास ठेवा..’’ मी म्हटले खरे पण ती परत ग्लानीत गेली. मी परत तिची नाडी तपासली. तिला परत ताप चढला होता. माझा हात लागताच तिने परत माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले..
‘‘मला इतक्यात मारायचं नाही. का ते मी तुम्हाला सांगते. सांगते मी…’’ ती बरळली.
‘‘मी सांगते पण कोणाला सांगू नका… सांगू नका.’’ असे म्हणून ती काहीतरी
पुटपुटू लागली. ती इतकी भरभर बोलत होती मला त्यातील एक शब्दही समजत
नव्हता. तेवढ्याशा श्रमाने ही ती दमली. तिने थकून उशीवर डोके टाकले व
खुणेने मला सांगू लागली. तिने ओठावर बोट ठेवले.. ‘‘ कोणाला सांगू नका’’ या
अर्थाने !
मी कसंबसं तिला शांत केले. तिच्या मोलकरणीला उठवले आणि खोलीबाहेर आलो.
(या वेळी वैद्यराजांनी खिशातून तपकिरीची डबी काढली व चिमूटभर तपकीर आपल्या नाकात कोंबली. त्या तपकिरीचा त्यांच्यावर थोडा परिणाम झालेला दिसला.)
‘‘दुसर्या दिवशी माझ्या औषधांचा अपेक्षित परिणाम मला दिसला नाही. तिची तब्येत अजूनच खालावलेली दिसली. आता काय करावे हा विचार करून करून मी दमलो. शेवटी मी अचानक तिला बरे वाटेपर्यंत तेथेच मुक्काम टाकण्याचा निर्णय घेतला. खरे तर माझे इतरही रुग्ण माझी वाट पहात होते. माझ्या सारख्या गरीब वैद्याला इतर गिऱ्हाईकांना दुखवून चालणार नव्हते तरीपण मी हा निर्णय घेतला कारण तिची प्रकृती गंभीर होती. आणि अगदी प्रामाणिकपणे खरं सांगायचं तर मला आता तिच्याबद्दल ओढ वाटू लागली होती. शिवाय मला ते सगळे कुटुंबच आवडायला लागले होते. त्या घराची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच दिसत होती पण ते कुटुंब सुशिक्षित होते. त्या घराचा कर्ता पुरुष पुण्यामुंबईकडे कुठल्याशा कॉलेजमधे प्रोफेसर होता म्हणे, पण त्यांचा मृत्यू अर्थातच दारिद्र्यात झाला असावा. त्यांनी त्यांच्या मुलींना चांगले शिकवलेले दिसत होते. घर पुस्तकांच्या कपाटांनी भरले होते पण त्याने पोट भरत नाही हे त्यांच्या लक्षात आले नसावे. त्यांनी मागे सोडले ती पुस्तके आणि हे दारिद्र्य. मी त्या मुलीची काळजी फारच आस्थेने घेत असल्यामुळे ते घर माझ्याकडे आपुलकीने पाहात होते असे आता मी म्हणू शकतो… बरं ते घर इतक्या आडवाटेला होते की औषधेही वेळेवर मिळायची मारामार…. आणि या मुलीची तब्येत तर दिवसेंदिवस ढासळत होती..दिवसेंदिवस ढासळत होती.
(ते क्षणभर बोलायचे थांबले. त्यांनी परत तपकीर ओढली आणि चहाचा एक घोट घेतला)
‘‘आता लपविण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला स्पष्टच सांगतो..पण कसं सांगावं हे मला कळत नाही. माझा पेशंट.. कसं सांगू, मला वाटलं माझा पेशंट माझ्या प्रेमात पडला होता. पण माझी खात्री होत नव्हती. खरेच पडली होती का ती माझ्या प्रेमात? का काही वेगळीच भावना होती तिच्या मनात? उपकाराची भावना तर नव्हती? कसं सांगू… (या येथे वैद्यराजांनी खाली जमिनीकडे नजर लावली. त्यांचा चेहरा लाल झाला..)
‘‘.. नाही प्रेमच होते ते. माणसाने स्वतःचे महत्त्व वाढवू नये हे उत्तम. पण मला वाटते ती माझ्या प्रेमातच पडली होती. ती सुशिक्षित होती. तिचे वाचन दांडगे होते आणि मी संस्कृत ही विसरत चाललो होतो. दिसण्याबद्दल बोलाल तर.. (येथे वैद्यराजांनी स्वतःकडे नजर टाकली) त्यात आमची तुलनाच होऊ शकत नाही. पण परमेश्वराच्या कृपेने मी मूर्ख नाही आणि मला समोरच्याच्या मनात काय चालले आहे हे चांगले उमजते. जरा विचार केल्यावर मला समजले की सरस्वती दांडेकर माझ्या प्रेमात पडली नव्हती तर तिच्या मनात माझ्याबद्दल मित्रत्वाची भावना होती. हो! सरस्वती दांडेकर नाव होते तिचे. अगदी मित्रत्वाची भावना नसेलच तर माझ्याबद्दल तिच्या मनात उपकारकर्त्याबद्दल जी भावना असते ती होती. कदाचित तिलाही प्रेम आणि ही भावना यात फरक करता येत नसावा. आता या सगळ्यात तुमचा गोंधळ उडाला तर मी तुम्हाला दोष देणार नाही. जरा विचारात वहावत गेलो मी ! मी जरा सगळे संगतवार सांगतो तुम्हाला.
( असे म्हणून त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि खालच्या आवाजात पुढे सांगण्यास सुरुवात केली.)
‘‘ हं ऽऽऽ तर मी कुठपर्यंत आलो होतो बरं… तिची प्रकृती ढासळत चालली होती. तुम्ही वैद्यकीय पेशात नाही म्हणून तुम्हाला कल्पना यायची नाही. वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो आणि रुग्णाची प्रकृती मात्र ढासळत असते. रोगावर विजय मिळवताना त्याच्या जिवाची कशी घालमेल होते याची तुम्हाला कशी कल्पना येणार? त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. क्षणभर तुम्हाला तुमचा अनुभव सोडून जातोय की काय असे वाटते. काही आठवत नाही आणि त्याच वेळी रुग्णाचा तुमच्यावरचा विश्वास उडू लागतो. मोठ्या नाखुषीनेच तो त्याला काय होतंय हे सांगत असतो. ते कळल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्याचवेळी तुमची हतबलता पाहात रुग्णाचे नातेवाईक हताश होत असतात. फारच भयंकर प्रसंग असतो तो.. तुम्ही विचार करत असता, ‘ या रोगावर काहीतरी औषध असलेच पाहिजे.. मग तुम्ही एका मागून एका औषधाचा मारा करून पाहाता. तुमचा इतका गोंधळ उडतो की तुम्ही औषधांना परिणाम करण्यासाठी पुरेसा अवधीही देत नाही. मग तुम्ही तुमचे वैद्यकीय ग्रंथ उलथेपालथे करता.. क्षणभर तुम्हाला वाटते.. हं ऽऽ मिळाला एकदाचा रामबाण उपाय पण दुसर्याच क्षणी तुमच्या लक्षात येते की नाही हे ते औषध असूच शकत नाही. कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे.. ही जबाबदारी मी एकटा घेऊ शकत नाही… असे विचार तुमच्या मनात डोकावू लागतात. एखाद्या औषधाचा एक गुणधर्म पकडला तर दुसरा एखाद अलगद तुमच्या पकडीतून सुटतो. मग कधी कधी तुम्ही एखादा उपचार नक्की करता आणि दैवाच्या भरवशावर सगळे सोडण्याचा निर्णय घेता.. पण इकडे तुमचा रुग्ण शेवटच्या घटका मोजत असतो. कदाचित तो रुग्ण मरतो पण त्याला तुम्ही जबाबदार नसता कारण तुम्ही विचारपूर्वक, शास्त्रानुसार उपचार केलेला असतो. असा सगळा गोंधळ उडतो. पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे तुमच्यावर लोकांनी कसलाही विचार न करता विश्वास टाकलेला असतो आणि तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरत नाही ही भावना तुम्हाला छळते तेव्हा. तुमच्या जिवाची घालमेल होत असते. या सरस्वतीच्या कुटुंबाने हा असाच विश्वास माझ्यावर टाकला होता. ते माझ्यावर विश्वास टाकून निर्धास्त झाले होते आणि त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे हे विसरले होते. मी ही माझ्या बाजूने त्यांना आशा दाखवत होतो पण खरे सांगायचे तर मी मनातून खचलो होतो. अडचणीत भर म्हणून औषधे आणण्यासाठी जो माणूस गेला होता त्याचा अजून पत्ताच नव्हता. मी पेशंटच्या खोलीतून बाहेरच आलो नव्हतो. मी तिला गोष्टी सांगितल्या, तिच्याबरोबर पत्ते खेळलो. रात्री मी तिच्या पलंगाशेजारी बसून असे. तिची आई डोळ्यात पाणी आणून माझे सारखे आभार मानत होती पण मी मात्र मनातल्या मनात म्हणत असे, ‘‘मी तुमच्या विश्वासाला पात्र नाही…’’ मी आता प्रामाणिकपणे कबूल करतो की मी माझ्या पेशंटच्या प्रेमात पडलो होतो कारण आता ते लपविण्यात तसा अर्थ नाही. सरस्वतीला मी आवडू लागलो होतो. बर्याच वेळा ती इतरांना खोलीबाहेर जाण्यास सांगायची आणि माझ्याशी गप्पा मारत बसायची. ती मला प्रश्न विचारायची. मी कुठे राहातो, माझे शिक्षण कुठे झाले, माझ्या घरात कोण कोण आहे…असे अनेक प्रश्न. तिने असे सतत बोलणे योग्य नव्हते पण मी तिला थांबवू शकलो नाही हेही खरंच आहे. कधी कधी ती डोळे मिटायची आणि मी माझे डोके हातात धरुन स्वतःला विचारायचो, ‘‘ अरे नराधमा काय करतो आहेस हे तू?’’ पण ती कधी कधी माझा हात हातात घ्यायची आणि माझ्याकडे रोखून पाहायची. मग मान वळवायची, निःश्वास टाकायची आणि म्हणायची,
‘‘तुम्ही एक चांगले आणि प्रेमळ माणूस आहात.. आमच्या शेजाऱ्यांसारखे नाही. तुमची ओळख आधी का नाही झाली?’’
‘‘सरस्वती शांत हो ! सगळं ठीक होणार आहे. तू परत हिंडू फिरू लागणार आहेस ! माझ्यावर विश्वास ठेव.’’
(त्यांनी त्यांचे डोळे बारीक केले, थोडासा विचार केला आणि म्हणाले),
‘‘त्यांचे शेजारच्यांशी विशेष संबंध नव्हते हेही सांगितले पाहिजे. त्यांचे शेजारी अडाणी होते आणि त्यांचे आणि या सुसंस्कृत कुटुंबाचे संबंध जुळणे शक्यच नव्हते आणि इतर श्रीमंत घरांशी लाचार होऊन संबंध ठेवणे हे त्या कुटुंबाला शक्य नव्हते. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ते एक अत्यंत सुशिक्षित, घरंदाज व सुसंस्कृत कुटुंब होते. त्यांच्याशी माझा संबंध आला हे मी माझे भाग्य समजतो. ती फक्त माझ्या हातून औषध घेई. तिला उठताही येत नसे मग माझ्या आधाराने ती उठून बसती होत असे. ती माझ्याकडे प्रेमाने रोखून पाही आणि माझ्या हातातून औषध घेई. बिचारी! तिला तसे पाहताना माझ्या ह्रदयात कालवाकालव होई… तिची तब्येत आता खालावत चालली होती. कुठल्याही क्षणी ती मरेल असे मला वाटत होते. नव्हे तिच्या वेदना पाहून लवकर मरावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करू लागलो. माझ्या मनात असे विचार घोळत असताना तिची आई आणि बहिणी मात्र माझ्याकडे आशेने पाहात..
‘‘ कशी आहे ती आता?’’ पण त्यांच्या प्रश्नात जीव नव्हता.
‘‘ठीक आहे ! ठीक आहे ! ’’ पण माझ्या उत्तरात ही काही दम नव्हता.
एके रात्री मी माझ्या पेशंट बरोबर तिच्या खोलीत बसलो होतो. ती मोलकरीण ही तेथेच एका खुर्चीत बसून डुलक्या काढत होती. पण त्यासाठी मी तिला दोष देणार नाही. तिचीही सरस्वतीच्या आजारपणात दमछाक झाली होती. त्या रात्री सरस्वती दांडेकरांची तब्येत फारच ढासळली होती. सारखी तळमळत कूस बदलत ती उसासे सोडत होती. शेवटी दमून ती निपचित पडली. कोपर्यात देवाऱ्ह्यात निरांजन मंद तेवत होते. तेथेच खाली एका टेबलावर खिडकीतून येणाऱ्या वार्याच्या मंद झुळकीने भगवद्गीतेची पाने फडफडत होती. मी तेथेच पलंगाला डोके टेकले. बहुधा मलाही डुलकी लागली असावी. अचानक कोणीतरी मला बाजूला हळूवारपणे स्पर्श करतंय असा भास झाला. मी वळून पाहिले तर सरस्वती माझ्याकडे टक लाऊन पहात होती. तिचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी विलग झाले होते आणि गाल तापाने फणफणल्यामुळे लालबुंद झाले होते. तिने खुणेनेच मोलकरणीला बाहेर जाण्यास सांगितले.
‘‘डॉक्टर खरं सांगा मी मरायला टेकली आहे का ? कृपा करा आणि मी जगणार आहे हे मला सांगू नका.
‘‘सरस्वती ऐक…’’ मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे बोलणे मधेच तोडले.
‘‘दया करा आणि मला खरं काय ते सांगा. मला खोटी आशा लाऊ नका. मी मरणार आहे हे एकदा निश्चित झाले की मी तुम्हाला सगळं सांगण्यास मोकळी झाले. मी तुमच्या पुढे पदर पसरते, जे काही खरं आहे ते सांगा. मी मुळीच झोपले नव्हते. मी इतका वेळ तुमच्याकडेच पाहात विचार करत होते. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही मला फसवणार नाही याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने खरं काय ते कळणे फार महत्त्वाचे आहे… सांगा…खरं काय ते सांगा. मला काय झाले आहे आणि माझ्या जिवाला धोका आहे का ?’’ ती कळवळून विचारत होती आणि आता मला ती चिडलेली वाटत होती.
‘‘सरस्वती, मी तुझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही. तुझ्या जिवावरचं संकट अजून टळलेले नाही पण परमेश्वरावर विश्वास ठेव तो तुला यातून सुखरूप बाहेर काढेल.
‘‘म्हणजे मी मरणार आहे ! मरणार आहे मी !’’ ते ऐकून मला क्षणभर वाटले की तिला याचा आनंद होतो आहे की काय! तिचा चेहऱ्यावरही अचानक तेज झळकले आणि मी सावध झालो. हे लक्षण काही ठीक नव्हते..
‘‘सरस्वती घाबरू नकोस…’’ मी समजुतीच्या स्वरात म्हणालो.
‘‘छे ! छे ! मी मरणाला अजिबात घाबरत नाही. पण आता मला जे सांगायचे आहे
ते मी मनमोकळेपणाने सांगू शकते. माझ्यासाठी तुम्ही जे काही केले, त्यासाठी
मी तुमची आभारी आहे. ‘तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही’ असं म्हणण्यात
आता अर्थ नाही. माझा तुमच्यावर जीव जडला आहे. माझे प्रेम आहे तुमच्यावर.’’
मी भारावून तिच्याकडे पाहत राहिलो. तुम्हाला खरेच सांगतो ते ऐकून मला काही सुचेना.
‘‘ऐकलं का? मी तुमच्यावर प्रेम करते…’’ मी तुझ्या योग्यतेचा नाही असं मी म्हणणार तेवढ्यात तिने माझे डोके तिच्या थरथरत्या हातात धरले आणि माझ्या कपाळाचे हळूवारपणे चुंबन घेतले. माझ्या तोंडातून अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. खरं सांगतो. मी गुडघ्यावर बसलो आणि पलंगावरच्या उशीत माझे डोके घुसळले. ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिची बोटे हळूवारपणे माझ्या केसातून फिरवत, ती मुक्तपणे अश्रू ढाळत होती. मी तिला शांत करण्याच्या नादात काय काय बडबडलो देवाला माहीत.’’
‘‘तू सगळ्यांना जागं करशील! जरा हळू बोल..’’ मी म्हटले.
‘‘ बास करा ! कोणाला काय वाटायचं ते वाटू देत. त्याने आता काही फरक पडत नाही. मी मरायला टेकले आहे. आणि तुम्ही कशाला आणि का घाबरताय? खाली मान घालण्याची गरज नाही…’’ ती तारस्वरात जवळजवळ किंचाळलीच. ‘‘ हंऽऽऽ कदाचित तुमचे माझ्यावर प्रेम नसेल.. तुम्ही मला त्या योग्यतेची समजत नसाल. तसं असेल तर मला क्षमा करा.’’
‘‘सरस्वती काय म्हणतेस तू? मलाही तू आवडतेस, मीही प्रेम करतो तुझ्यावर…’’
तिने डोळे विस्फारून माझ्या डोळ्यात पाहिले. पुढच्याच क्षणी तिने मला तिच्या बाहूपाशात कवटाळले व माझ्यावर चुंबनांचा वर्षाव केला. मी प्रामाणिकपणे सांगतो त्या क्षणी मला वेड लागायचेच बाकी होते. मला वाटले ही आता मरणार. बहुतेक ती तापाच्या ग्लानीत काय वाटेल ती बडबडत होती. हा विचार माझ्या मनात आल्यावर मी सावरलो. विचार करू लागलो. जर आज ती मरणाच्या दारात उभी नसती तर तिच्या मनात माझ्याबद्दल हीच प्रेमभावना जागृत झाली असती का? हा प्रश्न स्वतःला दोनदा विचारल्यावर अंतर्मनातून त्याचे उत्तर नकारार्थी आले. वयाच्या विसाव्या वर्षी प्रेमाचा अनुभव न घेता या जगातून निघून जायचे ही कल्पनाच तिला छळत असावी बहुधा आणि म्हणूनच कदाचित ती कळत न कळत माझ्या प्रेमात पडली असावी… समजले का तुम्हाला मी त्या वेळी काय विचार केला ते ? पण त्यावेळेस मात्र तिने मला घट्ट मिठी मारली होती आणि ती मला सोडत नव्हती.
‘‘सरस्वती ऽऽ सोड मला दया कर माझ्यावर आणि स्वतः वरही. कोणी पाहिले तर काय म्हणतील तुझ्या घरचे ! जरा विचार कर. ’’
‘‘का ? मरणाच्या दारात उभे असलेल्यांनी कसला विचार करायचा? मी जर यातून जगले असते तर या मिठीची कदाचित मला माझीच शरम वाटली असती. पण आता का म्हणून मला शरम वाटावी..’’
‘‘अरे पण कोण म्हणतंय की तू मरणार आहेस म्हणून!.’’ मी म्हटले पण माझा आवाज फसवा होता.
‘‘तुम्ही मला फसवू शकत नाही. तुम्ही कोणालाच फसवू शकत नाही. तुमचा चेहराच सांगतोय खरं काय आहे ते….’’
‘‘सरस्वती तू बरी होणार आहेस… मी तुला बरं करणार आहे.. तू तुझ्या आईच्या आशिर्वादावर विश्र्वास ठेव बरं ! तू बरी झाल्यावर आपण परत एकत्र येणार आहोत आणि सुखाने जगणार आहोत.’’ मी म्हणालो.
‘‘नाही आता मला जगायचंच नाही. तसं मला वचन द्या !’’ माझ्यासाठी हा सगळा दैवाचा निष्ठूर खेळ होता. माझ्या पहिल्याच प्रेमाची अशी वाताहात लागली होती. तिने तेवढ्यात माझे नाव विचारले.
‘‘जनार्दन !’’ मी सांगितले. तिने ते ऐकले आणि मंदपणे हसत स्वतःशीच काहीतरी पुटपुटली. बहुधा त्याचा अर्थ असावा. हं ऽऽऽ ती आख्खी रात्र मी तिच्या मिठीत घालवली. पहाटेच मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो. सकाळी, उजाडल्यावर मी तिच्या खोलीत परत डोकावले. त्या पलंगावर पडलेला हाडाचा सापळा पाहून मी चरकलो. मी ओळखलंच नाही तिला. तीन दिवसात कशी झाली होती तिची अवस्था! मी त्या प्रसंगाला कसे तोंड दिले हे आज माझे मलाच कळत नाही. तीन दिवस आणि तीन रात्री माझ्या पेशंटचा जीव अजूनही या जगात घुटमळत होता. शेवटच्या रात्री मी तिच्या जवळ बसलो होतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो की देवा रे! सोडव तिला या यातनांतून आणि जमल्यास मलाही. अचानक तिची आई तेथे आली. मी तिला आदल्या रात्रीच ती वाचण्याची शक्यता फार कमी आहे हे सांगितले होते. सरस्वतीने जेव्हा तिच्या आईला पाहिले तेव्हा ती म्हणाली,
‘‘बरं झाले तू आलीस ते. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांना लग्नाचे वचन दिले आहे.’’
‘‘डॉक्टर काय म्हणते आहे ती ? खरंय का हे?’’ तिच्या आईने मला खडसावून विचारले. ते शब्द कानात शिरताच मी खडबडून जागा झालो. माझ्या मनात राग, संताप, स्वाभिमान, करुणा अशा अनेक भावनांचा डोंब उसळला. मी झटक्यात उत्तर दिले,
‘‘ती तापात बरळत आहे. तिला ती काय बोलते आहे त्याची शुद्ध नाही…’’
‘‘अरेच्चा तुम्ही काही क्षणांपूर्वी वेगळेच बोलत होतात आणि तुम्ही माझी अंगठी ही घेतलीत ना ! माझी आई प्रेमळ आहे आणि तिला सगळे समजते.. आपल्याला उदार अंतःकरणाने ती क्षमा करेल आणि आपल्या विवाहास मुळीच आक्षेप घेणार नाही. तुम्हाला खोटं बोलण्याची गरज नाही. ’’ ती तारस्वरात म्हणाली. ‘‘ मी थोड्याच वेळात मरणार आहे त्यामुळे मला खोटं बोलण्याची गरज नाही. तुमचा हात माझ्या हातात द्या.’’
ते ऐकताच मी उडी मारुन खोलीबाहेर पळालो. तिच्या आईने अर्थातच सगळे समजून घेतले असणार.
‘‘मी तुमची उत्सुकता फार काळ ताणणार नाही आणि खरं सांगायचे तर त्या प्रसंगाची आठवणही माझ्यासाठी दुःखद आहे. दुसर्या दिवशी माझ्या पेशंटचा मृत्यू झाला. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो!’’
पण मरण्याआधी तिने तिच्या कुटुंबियांना तिच्या खोलीत मला आणि तिला एकटे सोडण्यास सांगितले.
‘‘मला क्षमा करा. या सगळ्या गोंधळाला मीच जबाबदार आहे.. माझा आजार जबाबदार आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा मी आजवर एवढे प्रेम कुणावर केलेले नाही आणि मी आजारी पडले नसते तरी मी तुमच्यावरच प्रेम केले असते. मला विसरू नकोस आणि ती अंगठी तुझ्याकडेच ठेव.’’
वैद्यराजांनी डोळ्यातील अश्रू लपवीत तोंड फिरवले. मी त्यांचा हात पकडला.
‘‘हंऽऽऽ ठीक आहे.’’ त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला. ‘‘ आपण दुसर्या
कुठल्यातरी विषयावर बोलू या का? का पैसे लावून रमी खेळू या? आता भावनांचा
विस्फोट होणे मला परवडणारे नाही. मी नंतर एका व्यापाराच्या मुलीशी भरपूर
हुंडा घेऊन लग्न केले आणि आता त्या बाईला आणि पोरांना सांभाळत उरलेले
आयुष्य व्यतीत करतोय. माझी बायको तापट स्वभावाची आहे आणि तिला जर हे कळले
तर आमचा संसार टिकणार नाही. हं ऽऽऽ बरं, वाटू का पाने…?
मग आम्ही रमी खेळत बसलो. वैद्यराज जनार्दन माझे दहा/वीस रुपये जिंकले आणि जिंकल्याच्या आनंदात ते पैसे खिशात टाकून घरी गेले.
मूळ लेखक : इव्हान तुर्गेनीव्ह
स्वैर अनुवाद: जयंत कुलकर्णी.