बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे
माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे.
ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच नैराश्य आले होते. ते भयंकर घाबरलेले होते. काही बाजारबुणगे आणि पालखी उचलणारे भोई हे सोडल्यास इतर कोणी स्वार ही बरोबर नव्हते. त्यांचा चेहरा उतरला होता आणि त्यांच्या पांढर्याशुभ्र दाढी वर माती आणि धूळ जमा झाली होती.
बादशाह तेथे आल्याची बातमी ऐकून नानासाहेब तेथे हजर झाले. त्यांनी पाहिले की मजारच्या दरवाजाला डोके टेकवून बादशाह बसले आहेत, चेहरा पडलेला, डोळ्यात चिंता आहे. ते दृष्य पाहून त्यांच्या जिवाची घालमेल झाली..डोळ्यात अश्रू तरळले पण आता वेळ नव्हता…पण त्यांना पाहिल्यावर त्यांच्या चेहर्यावर नेहमीप्रमाणे हसू पसरले. मग म्हणाले,
‘‘ मी तुला पहिल्यांदाच सांगितले होते की हे नालायक बंडखोर शिपाई अडेलतट्टू आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक आहे. स्वत: तर बुडतीलच पण मला घेऊन बुडतील. शेवटी तेच झाले. पळून जा… मी जरी मोह माया त्याग केलेला एक फकीर असलो तरी माझ्यात तेच रक्त आहे ज्याच्यात शेवटपर्यंत लढण्याची हिंमत आहे. माझ्या बापजाद्यांवर यापेक्षाही वाईट प्रसंग कोसळले पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पण मला तर माझ्या समोरच माझा अंत दिसतोय. दिल्लीच्या तख्तावरील मी तैमुरचा अखेरचा वंशज आहे यात आता काही शंका उरली नाही. मुघलांची सल्तनत शेवटचे आचके देत आहे…काही काळाचाच काय तो प्रश्न. मग मी विनाकारण खूनखराबा का करायला सांगू ? म्हणूनच मी किल्ला सोडून इथे निघून आलो. शेवटी हा मुलुख खुदाचा आहे, त्याला पाहिजे त्याला देईल नाहीतर बरबाद करेल. त्याची मर्जी. अनेक दशके आमच्या वंशाने हिंदुस्थानवर आपले चलन चालवले आता दुसर्याची पाळी असेल तर तसे होऊ देत. ते हुकमत चालवतील स्वत:ला बादशाह म्हणवून घेतील. ठीक आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. नाहीतरी आम्हीही दुसर्यांचे राज्य खालसा करून आमचे राज्य स्थापन केले आहे ना !’’
अत्यंत निराश मनाने हे उद्गार काढून त्यांनी एक पेटी नानासाहेबांच्या हातात दिली आणि म्हणाले,
‘‘ ही दौलत आता तुमच्या हवाली करतोय !’’
‘‘ अमीर तैमूरने जेव्हा कॉन्स्टनटाईनवर विजय मिळवला तेव्हा सुलतान जलदरम बायजीदच्या खजिन्यातून ही वस्तू त्यांच्या हातात पडली. याच्यात हुजूर हजरत मुहम्मदाच्या मुबारक दाढीतील पाच केस आहेत. हे आजवर आमच्या खानदानात अत्यंत पवित्र म्हणून सांभाळले गेले आहेत. आता माझ्याकडे ना जमिनीवर जागा आहे ना आकाशात ! आता ही पवित्र वस्तू घेऊन कुठे हिंडू? तुमच्या शिवाय आता यावर कोणाचा हक्क असेल असे मला वाटत नाही. तुम्हीच याचा सांभाळ करू शकता आणि तो तुमचाच हक्कही आहे. दिवस भयंकर आहेत, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय अशी ही वस्तू मी तुमच्या स्वाधीन करतोय. ती वस्तू आजवर आमच्या खानदानापासून कधीही दूर गेलेली नाही. त्याचा सांभाळ करा.’’
नानासाहेबांनी ती पेटी घेतली आणि दर्गा शरीफच्या खजिन्यात ठेऊन दिली. ती पेटी आजही तेथे आहे आणि इतर पवित्र वस्तूंप्रमाणे दर वर्षी सन हिजरीच्या तिसर्या महिन्यात श्रद्धाळूंसाठी दर्शनासाठी बाहेर काढली जाते.
बादशहा नानासाहेबांना म्हणाले की तीन दिवसांपासून जेवायला वेळच मिळाला नाही. तुमच्या घरी काही असेल तर घेऊन या. नानासाहेबांनी उत्तर दिले,
‘‘ आम्हीही मृत्यूच्या जबड्यात उभे आहोत. कुठल्याही क्षणी आमची कत्तल होऊ शकते. अन्न तर आता तयार करता येणार नाही. घरी जाऊन पाहतो काही आहे का ते. असल्यास लगेचच हजर करतो. मी तर म्हणतो तुम्हीच माझ्याबरोबर चला. जोपर्यंत मी आणि माझी मुले जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या केसाला बोटही लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही मेल्यावरच ते संभव आहे.’’
बादशाह म्हणाले,
‘‘ आपण हे म्हणताय हे आमच्यावर उपकार आहेत पण या जर्जर शरीरासाठी तुमच्या तरुण मुलांची कत्तल होणे हे मला बिलकूल मान्य नाही. दर्शन झाले आहे, अमानत तुमच्याकडे सोपवली आहे. आता औलियाच्या कृपेनेच त्याच्या लंगरमधे दोन घास मिळतात का ते पाहातो. मग हुमायुंच्या मकबर्याला जाईन म्हणतो. तेथे नशिबात जे असेल ते होईल.’’
नानासाहेब घरी आले आणि त्यांनी काही खाण्यास आहे का हे विचारले. त्यांना उत्तर मिळाले,
‘‘ पिठले व सिरका घातलेली चटणी आहे.”
त्यांनी एका तबकात रोटी, पिठले व चटणी घेतली. एका मखमली कापडात ते अन्न झाकले व बादशहाकडे घेऊन आले. बादशहाने पिठल्याबरोबर व चटणीबरोबर चण्याची रोटी खाल्ली व तीन तासाने पाणी प्राशन केले आणि त्या अन्नासाठी परमेश्वराचे आभार मानले.
त्यानंतर हुमायुंच्या मकबर्यावर गेले जेथे त्यांना अटक झाली.
दुसर्याच दिवशी त्यांची रवानगी रंगूनला झाली. तेथेही त्यांनी उरलेले आयुष्य दर्वेश्यासारखे व्यतीत केले…
अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी