नर्गिस नजर


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नर्गिस नजर

मिर्जा शाह रुख, बहादूर शाहच्या एका मुलाचे नाव होते. त्याच्या मुलीचे नाव होते शहजादी नर्गिस नजर. १८५७ चा जो गदारोळ झाला तेव्हा तिचे वय होते सतरा.
दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाने खास आणि मोती मशिदीच्या पश्चिमेला, गोरा बागेच्या पूर्वेला एक दगडी तलाव तुम्हाला दिसेल. या तलावात मधोमध एक सुंदर महाल उभा आहे. यात तलावात उत्तरेकडून पाणी वाहात येते. संगमरवरी पाटातून पाणी झुळझुळू वाहत येते आणि त्यातच मोठे मोठे दिवे उभे आहेत. याच्यावरून पाणी वाहत त्या तलावात येते. त्या पाटात मासे कोरले आहेत जे वाहत्या पाण्यामध्ये हलल्याचा भास होतो. हे आजही तुम्ही पाहू शकता. मिर्जा शाह रुख याच जलमहालात राहात होते. त्यांच्या पत्नीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांचे त्यांच्या मुलीवर म्हणजे ‘‘नर्गिस नजर’’ वर अतोनात प्रेम होते.

जलमहल काश्मिरी शाली, पर्शियामधून आणलेल्या पडद्यांनी व बनारसी रेशमाने खूपच सजवलेला होता. नर्गिस नजरला घर सजविण्याचा भयंकर शौक होता. या बाबतीत तिची अभिरुची ही अत्यंत उच्च दर्जाची होती. त्या काळात लाल किल्ल्यात सगळ्यात चांगला, सजवलेला महाल कुठला असे विचारले असते तर याच महालाकडे बोट दाखवावे लागले असते.

नर्गिस नजर सकाळी सूर्य उगवल्यावर उठायची. उन्हाळ्यात तिचा छपरी पलंग अंगणात टाकला जाई. फरशी संगमरवरी होती आणि पलंगाचे पाय व खांब सोन्याचे होते. त्यावर नक्षीतून हिरे माणके जडवलेली होती. मखमली चादरी होत्या, रेशमी तक्के होते. चार मऊ तक्के उशाला होते तर त्याच्याच शेजारी छोटे छोटे गोल चार तक्के होते ज्यांना गल-तकिया म्हटले जाई. हे तक्के गालाला टेकू देण्यासाठी होते. जर शहजादीचे मस्त उशीवरुन ओघळले तर तिच्या गालाला यांचा आधार मिळे. दोन मोठे मोठे तक्के दोन्ही बाजूला असत ज्याने शहजादी साहिबा आपल्या गुडघ्यांना आधार देई. शहजादी साहिबा झोपण्याआधी त्या तक्क्यांच्या जवळ मोगरा, जूही आणि पांढर्‍या चाफ्याची फुले ठेवली जात जेणेकरून शहजादी साहिबांना रात्रभर त्याचा सुवास येत राहील. शहजादी साहिबा जशी अंथरुणात शिरत तसे नाचणार्‍या, गाणार्‍या मुली येत व हलक्या आवाजात जाणे बजावणे करीत. ते ऐकत ऐकत मग बाईसाहेबांना झोप लागत असे. सकाळी सुद्धा या मुली पलंगाशेजारी येऊन गात असत आणि त्‍यांचे सुमधूर गाणे ऐकत शहजादी साहिबा परत एकदा पहाटेच्या साखरझोपेत गुडूप होत.

उठल्यावर शहजादी साहिबा काही लगेच उठत नसतच. त्‍या तश्याच त्‍या गाद्यागिरद्यांवर बसून शरीराला आळोखेपिळोखे देत बसत आणि आपल्या नाजूक ओठांवर हात ठेऊन जांभया देत. मग त्या गाणार्‍या मुली त्यांच्याशी हसत खेळत बोलून त्‍यांचे मन रिझविण्‍याचा प्रयत्न करीत. एक म्हणे,

‘‘हुजूर जांभई येतीये का? रुमाल आणू का?’’ दुसरी म्हणे, सरकार, अंगडाई पहायला मासेही पहा मधून मधून वर येत आहेत.’’ यावर नर्गिस नजर म्हणे,

‘‘ चल काहीतरीच ! कंटाळा आला तुझ्या या खोट्या बोलण्याचा !’’ मग ती मुलगी म्हणे,

‘‘मी खोटे बोलते? या आरश्याला विचारा. तोही तेच पाहतोय. याच्यात ही केस विखुरले आहेत बघा ना ! तेथेही कोणी तरी मेंदी लावलेल्‍या लांबसडक बोटांनी आपले केस सावरतंय ना ! तोही हे पाहण्यात मस्त झालाय… खरंच !’’

तिसरी म्हणे,

‘‘ढगातून जशी सोनेरी किरणे बाहेर येतात तशी आमच्या शहजादीच्या लालचुटूक ओठातून त्यांच्या दंतपंक्ती दिसतात आणि या गालाचे काय सांगू ? केस विखरून चेहर्‍यावर असे आले आहेत की वाटतंय पौर्णिमेचा चंद्र ढगांआडून डोकावतोय की काय !’’
चौथी म्हणे,

‘‘ नाही ग ढगांनी चंद्रावर आक्रमण केले असावे पण चंद्राच्या तेजाने ते ढग हिच्या केसांसारखे विखूरलेले दिसतात.’’

नर्गिस नजर ही खुशामत ऐकून पांघरूणातून बाहेर येई व चवड्यांवर बसे. मग बाहेर येऊन दूध व बेसनाने हात पाय धूत असे. मग त्यानंतर जोडे बदलले जात, न्याहरी केली जाई, त्यानंतर घरात चक्कर मारुन सगळे ठीकठाक आहे की नाही याची खातरजमा ती स्वत: करायची. वेगवेगळ्या प्रकाराने वस्तूंची आदला बदल करून घर आवरण्यात तिला फार रस असे. दुपारच्या जेवणानंतर मग गाण्याचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी फुलांच्या बागेतील सैर ! रात्रीच्या जेवणाबद्दल तर बोलायलाच नको. मोठ्या थाटात मैत्रिणींबरोबर ते जेवण होई. वाद्ये वाजत, गाणे बजावणे, नाच याची नुसती रेलचेल असे.

ज्या रात्री बहादूर शाह बादशाह लाल किल्ल्यातून हुमायूंच्या मकबर्‍यात पळून गेले तेव्हाच सगळ्यांना आता कळून चुकले की आता इंग्रजांचा विजय अटळ आहे. तेव्हा नर्गिस नजर जलमहलच्या किनार्‍यावर उभी राहून आकाशातील चांदण्या निरखत उभी होती. पाण्यात तिचे प्रतिबिंब पडले होते आणि त्‍या सौंदर्याकडे पाहात तिला एक प्रकारची नशाच चढली होती.

तेवढ्यात तिचे अब्बा मिर्जा शाह रुख आत आले आणि म्हणाले,

‘‘नर्गिस बेटा अब्बा हजरत (बहादूरशाह जफर) बरोबर जाण्याची माझी इच्छा आहे. तुला पाहिजे असेल तर सवारीचा बंदोबस्त करतो. सकाळी तू पण ये.

नर्गिस नजर म्हणाली,

‘‘अब्बाजान तुम्ही सुद्धा लगेच निघू नका. रात्री माझ्याबरोबर चला. दादाजींबरोबर जाण्यात धोका आहे. इंग्रज त्यांच्या शोधात असणार आणि शेवटी जे कोणी त्यांच्या बरोबर सापडतील त्यांनाही गुन्हेगार ठरवले जाईल म्हणून म्हणते दादाजींच्या बरोबर हुमायुंच्या मकबर्‍याला जाणे उचित होणार नाही. त्यापेक्षा गाजीनगरला (गाझियाबाद) जाऊ या. तेथे माझ्‍या दाईचे घर आहे. असं ऐकलंय की ती जागा खूपच सुरक्षित आहे. वेष बदलून जायला लागेल. ही धामधूम संपेल तेव्हा परत इथे येता येईल. मिर्जा म्हणाले, ‘‘ठीक आहे. तू म्हणशील तसं. गाजीपूरला जाण्याची व्यवस्था करतो. तुझ्या बरोबर अजून कोणाला घेणार आहेस का?’’ नर्गिसने सांगितले,

‘‘ नाही, कोणी नाही. मी एकटीच येणार आहे. शिवाय नोकरांना बरोबर ठेवणेही बरोबर नाही आणि त्यांना तरी यायचे आहे की नाही कोणास ठाऊक !’’
मिर्जा हे ऐकून बाहेर गेले आणि नर्गिस नजर परत आपल्या आणि चंद्राच्या प्रतिबिंबात बुडून गेली.

थोड्या वेळाने नर्गिस नजरने तिच्या दासींना हाक मारली पण काही प्रतिसाद आला नाही. सगळे पळून गेले होते आणि नर्गिस नजर त्या जलमहालात आता एकटीच उरली होती. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्या हाकेला कोणी “ओ ” दिली नाही असे प्रथमच घडले होते. ती घाबरून आत पळाली. झुंबरं पेटली होती पण आत कोणीच नव्हते. आतील जिवघेण्या शांततेला नर्गिस नजर घाबरली आणि परत अंगणात आली. किल्ल्यात बराच गलबला चालला होता, सगळेजण मिळेल त्या मार्गाने किल्ल्याबाहेर पळत होते. तिने बराच वेळ तिच्या अब्बाची वाट पाहिली पण त्यांचा काही पत्ताच नव्हता. नर्गिस नजर घाबरून मुसमुसून रडू लागली. रात्री दोन वाजता महालाचा एक कारकून आला व म्हणाला,

‘‘साहिबे आलम (मिर्जा शाह रुख) यांनी सांगितलंय की ‘इंग्रजांचे हेर चारी दिशेला त्यांचा शोध घेत फिरत आहेत त्यामुळे मी येऊ शकणार नाही. तुझ्या बरोबर गाजीपूरलाही येऊ शकणार नाही. पण तुझी जाण्याची सगळी व्यवस्था केली आहे.’ तुम्हाला माझ्या बरोबर जायला सांगितले आहे आणि ते स्वत: वेष बदलून दुसरीकडे कुठेतरी जाणार आहेत.’’

नर्गिस नजरने घाबरून विचारले, ‘‘ पण कुठे जायचा विचार आहे त्यांचा ?
कारकून म्हणाला,

‘‘ मला माहीत नाही !’’ नर्गिस नजरने हुकूम दिला, ‘‘ ताबडतोब जा आणि सगळी माहिती करून ये ! ते माझ्याबरोबर गाजीनगरला का येत नाहीत?’’

तो कारकून गेला आणि आत जाण्याचा धीर न झाल्यामुळे ती अंगणात चकरा मारत राहिली. थोड्या वेळातच तो परत आला आणि त्याने बातमी सांगितली,

‘‘ अब्बा हजरत साईसच्या वेषात निघून गेले. कुठे गेले कोणालाच माहीत नाही. तुमच्यासाठी रथ तयार आहे.’’

नर्गिस नजरच्या डोळ्यात पाणी तरळले आणि थोड्याच क्षणात त्याच्या धारा लागल्या. तिच्या आयुष्यातील हुंदके देत रडण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. तिने एका संदुकित तिचे दागदागिने व जरुरी पुरते कपडे भरले. त्या नोकराने ते तिच्या हातातून घेतल्यावर ती विमनस्कपणे मागे वळून त्या सजवलेल्या जलमहलकडे पहात राहिली. म्हणाली,

‘‘ आता परत तू दृष्टीस पडशील का हे माहीत नाही. ही आपली शेवटची भेट.’’

रात्रीचे तीन वाजले होते. नर्गिस नजर रथात बसून गाजीनगरच्या दिशेला निघून गेली. सकाळी आठ वाजता तेथे पोहोचली. रस्त्यात एवढा गोंधळ होता की त्यांना कोणी अडवले नाही ना कोणी त्यांची विचारपूस केली. गाजीनगरमधे नर्गिस नजरच्या दाईचे घर बर्‍यापैकी प्रसिद्ध होते. ती त्‍या दाईच्‍या घरासमोर उतरल्याबरोबर ती दाई धावत घराबाहेर आली. तिने तिच्‍या हातातून सगळे सामान घेतले व तिला आत नेले. बसवले व तिचा चांगला पाहुणचार केला.

नर्गिस नजर दोन तीन दिवस तिच्या दाईच्या घरात आरामात राहिली पण तेवढ्यात बातमी आली की बादशाह पकडले गेले आहेत आणि शहजादीची हत्या झाली. त्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी अशीही बातमी आली की फौज गाजीनगर लुटण्यासाठी येत आहे. नर्गिस नजरने आपल्या दागिन्यांची पेटी त्‍या दाईकडून जमिनीत गाडली व येणार्‍या संकटाची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात शिखांच्या तुकड्यांनी शहरात प्रवेश केला व बंडखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या खबर्‍यांनी त्यांना सांगितले की बादशहाची नात त्या गावात आहे. दोन चार शिख तिच्या घरी आले आणि त्यांनी त्या दाईच्या घरातील सगळ्यांना अटक केली. नर्गिस नजर एका खोलीत लपली होती तिलाही दरवाजा तोडून ताब्यात घेण्यात आले. कसला पडदा आणि कसले काय ! तसेच बाहेर आणण्यात आले. त्यांच्या सरदाराने विचारले, ‘

‘ तू बादशहाची नात आहेस का ?’’ नर्गिस नजरने उत्तर दिले,

‘‘मी एका माणसाची मुलगी आहे. जर बादशहाची नात असते तर येथे या खोपटात कशाला आले असते ? आणि अशी पडद्याविना तुमच्या समोर आली असते का? तुम्ही हिंदुस्थानी आहात तुम्हाला बायकांना त्रास देण्यात शरम नाही वाटत? तो सरदार म्हणाला,

‘‘काय त्रास दिला आम्ही ? आम्हाला फक्त हे सांग की तू बादशहाची नात आहेस का नाही. आम्ही ऐकले आहे की तू बादशहाची नात आहेस आणि तुझ्या बापाने इंग्रजांच्या बायका पोरांच्या कत्तलीत भाग घेतला होता

.’’ नर्गिस म्हणाली, जसे पेरता तसे उगवते. जर माझ्या बापाने असे काही केले असेल तर त्याचा जाब त्यांना विचारा. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मारले तर मुळीच नाही.’’

हे ऐकून दुसरा तरुण शिख सैनिक म्हणाला,

‘‘ तू तर नुसत्या नजरेने घायाळ करतेस. तुला तलवारीची, खंजिराची काय गरज ?’’ हे ऐकून नर्गिस नजरने मोठ्या तडफेने त्याला उत्तर दिले. खरं तर परक्या पुरुषाशी बोलण्याचा तिच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग होता.

‘‘खामोश ! शहजादीसमोर अशी उद्धट भाषा वापरायची नसते. तुझी जबान उपटून काढू आम्ही. काय समजलास?’’

हे ऐकल्यावर त्या शिख सैनिकाने नर्गिस नजरचे केस पकडले व त्यांना जोरात झटका दिला. नर्गिस नजर कळवळली. तिच्या डोळ्यातून संताप आणि अश्रू एकदमच बाहेर पडले. तेवढ्यात शिख सरदाराने त्या सैनिकाला बाजूला केले आणि ओरडला,

‘‘ स्त्रियांशी असे वागणे बरोबर नाही. थांब!’’

हे ऐकून त्याने नर्गिस नजरचे केस सोडून दिले. दिल्लीला जाण्यासाठी भाड्यावर एक बैलगाडी मागवली गेली. त्यात नर्गिस नजरला बसविण्यात आले व बाकी सर्वांना पायी चालण्यास सांगण्यात आले. एका सैनिकाने विचारले,

‘‘ तुझे दागदागिने, पैसे कुठे आहेत?’’ नर्गिस म्हणाली, ‘‘ज्याला समजण्याची अक्कल आहे त्यांना समजेल की मीच दौलत आणि जडजवाहीर आहे. माझ्याकडे अजून काही नाही.’’ हे ऐकल्यावर ते शिख गप्प बसले.

हिंडन नदीजवळ एका गावातील जाटांनी व गूजरांनी शिखांवर गोळ्या झाडल्या व चकमकींना सुरुवात झाली. गावकऱ्यांची संख्या खूपच जास्त होती. थोड्याच वेळात त्यांनी सर्व शिख सैनिकांची कत्तल केली व आम्हाला घेऊन ते गावात पोहचले.

अडाण्‍यांनी नर्गिस नजरच्‍या अंगावर जे काही दोनचार दागदागिने होते ते उतरवले. एवढेच नाही तर तिचे रेशमी, किमती कपडेही उतरवले व तिच्‍या अंगावर एका चांभारणीचे मळलेले, फाटके कपडे चढवले. नर्गिस नजरने ढसाढसा रडत ते कपडे अंगावर चढवले. थोड्याच वेळात गावातील काही अडाणी मुसलमान आले व त्‍यांच्‍या पुढार्‍याने गूजर लोकांकडून नर्गिस नजरला विकत घेतले व त्‍यांच्‍या गावाला घेऊन गेले. हे लोक रांगड जातीचे होते तर काही तगा जातीचे मुसलमान होते. गावात पोहोचल्यावर त्‍या पुढार्‍याने जाहीर केले की या चांभारणीची शादी तो त्‍याच्‍या मुलाशी लाऊन देणार आहे. हा पुढारी म्‍हातारा होता पण त्याचा मुलगा अनाडी व वयाने लहान होता. तब्येतीने चांगला होता, तगडा होता. नर्गिस नजरने नाईलाजाने होकार दिला. गावाच्या काझीने त्‍यांचा निकाह लाऊन दिला आणि नर्गिस नजर त्‍या पुढार्‍याच्‍या घरात नवीन दुल्‍हन बनून आरामात राहू लागली. तीन चार महिने तुलनेने आरामात गेले.

इंग्रज सरकारच्या ताब्यात सगळा प्रदेश आला आणि त्यांचे खबरे गावोगावी पैशाच्या मोहाने खबर घेत फिरू लागले. कुठल्यातरी खबर्‍याने दिल्लीला अधिकाऱ्याला खबर पोहोचवली की मिर्जा बागी मिळत नाही पण त्याची मुलगी एका गावात एका घरात राहाते. त्‍या अधिकाऱ्याने लगेच त्‍या गावात त्याचे पोलीस पाठवले. मेरठवरून आलेल्या त्‍या पोलिसांनी गावाला वेढा घातला. नर्गिस नजर, तिच्‍या सासर्‍याला व नवर्‍याला पकडून दिल्लीला आणले गेले. त्‍या अधिकाऱ्याने नर्गिस नजरला खोदून खोदून बरेच प्रश्न विचारले पण त्यातून त्‍याच्‍या हातात काही लागले नाही. कारण तिला काहीच माहिती नव्हते. शेवटी त्याने निर्णय दिला की त्या दोघांनी बंडखोर मिर्जाच्या मुलीला आसरा दिला असल्यामुळे सरकार विरोधात गुन्हा केला आहे. त्या दोघांना त्याने १० वर्षांसाठी तुरुंगात पाठवून दिले व म्हणाला,

‘‘ या मुलीला दिल्लीमधे कुठल्यातरी मुसलमानाच्या हवाली करा.’’

नर्गिसला जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला कुठे राहायला आवडेल तेव्हा तिने सांगितले,

‘‘ माझ्या खानदानातील कोणी असेल तर त्यांच्याकडे सोडा !’’

नंतर चौकशी केल्यावर तैमूर खानदानाचे लोक अजूनही लपत छपत जंगलातून फिरत आहेत असे कळाले. दिल्लीमधे अजून कोणी आलेले नाही. हे समजल्यावर त्या अधिकाऱ्याने नर्गिस नजरला एका मुसलमान शिपायाच्या हवाली करण्यात आले. तो तिला घरी घेऊन गेला. त्‍या शिपायाची पत्नी दरवाजातच उभी होती. जेव्हा तिने पाहिले की नवरा एका सुंदर आणि जवान बाईला घरी घेऊन आलाय तेव्हा तिने त्याला थप्पड मारली व दोघांना धक्के मारुन बाहेर काढले.

नर्गिस नजरला आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तरी धक्का मारला होता. त्‍या शिपायाने एकंदर रागरंग पाहिला व तिला त्‍याच्‍या मित्राकडे घेऊन गेला. बुजूर्ग होते. नर्गिस नजरची कहाणी ऐकून त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी तिला ठेऊन घेतले. नर्गिस नजर एक रात्र तेथे आरामात राहिली. दुसर्‍या रात्री नर्गिस नजर झोपलेली असताना काही माणसांनी तिचे तोंड दाबून तिला उचलले. त्यांची पकड इतकी पक्की होती की तिच्या तोंडातून कसलाही आवाज निघाला नाही. ज्या गावात तिची शादी झाली होती त्याच गावाचे ते लोक होते. त्यांनी तिला उचलले व दिल्लीजवळ एका गावात नेऊन ठेवले. हे गावही तगा जातीच्या मुसलमानांचे होते. त्यांनी तिला झोपण्यासाठी एक चारपाई दिली. हे त्या पुढार्‍याचेच घर होते. पुढची तीन चार वर्षे नर्गिस त्याच घरात आरामात राहिली. ती अंगावर पडेल ते काम उरकत असे पण शेणाने घर सारवणे व म्‍हशींचे दूध काढणे तिला जमत नसे.

चार वर्षांनंतर तिचा नवरा तुरुंगातून सुटून आला. त्याला उरलेली शिक्षा माफ झाली होती. तो नर्गिसला घेऊन त्‍याच्‍या मूळ गावी जाऊन राहिला जेथे त्यांनी उरलेले आयुष्य व्यतीत केले. कसे ते सांगायची गरजच नाही. त्यांना मुलेही झाली. १९११ साली नर्गिस नजर अल्लाला प्यारी झाली…..

नर्गिस नजर सांगायची, ‘‘ जेव्हा मी दिल्लीजवळ तगा मुसलमानाच्या घरात आले तेव्हा पावसाचे दिवस होते. ढगांचा गडगडाट सुरु होता आणि विजा कडमडत होत्‍या. मी एकटी त्‍या खोपटात एका डुगडुगणार्‍या चारपाईवर मळलेली चादर ओढून पडले होते. डोळे मिटले आणि स्वप्नात पाहिले की माझ्‍या जलमहालात सोन्याच्या पलंगावर झोपली आहे. जूही आणि चाफ्याची फुले व रेशमी तक्केही माझ्‍या बाजूला आहेत आणि गाणार्‍या मुली गोड आवाजात हळू गात आहेत आणि त्याची एक अनोखी मजा येते आहे. तेवढ्यात मी एका दासीला आवाज दिला आणि क्षणात माझ्‍या पलंगाचा पडदा वर गेला आणि तिने पळत येऊन मला कवटाळले व लाडाने आलिंगन दिले. मी तिला लाडात येऊन एक थप्पड मारली. ती जोरजोरात हसायला लागली आणि मी स्वप्नातून बाहेर आले.

सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. या स्वप्नाने आणि जलमहलच्या आठवणींनी मी बेचैन झाले. मला काही सुचेना. मी दरवाजात चादर ओढून कशीबशी आधार घेत उभी राहिले. पाऊस धुवाधार पडत होता, विजा चमकत होत्या. त्याच्या प्रकाशात अंगणातील पाणी एकदम चमकून उठे व परत अंधारात गुडूप होई. मला क्षणभर असे वाटले की मी जलमहलच्या अंगणातच तलावातील चंद्राच्या प्रतिबिंबांचे खेळ पाहाती आहे. जेव्हा माझ्यावर संकटे कोसळली तेव्हा मी घाबरले नव्हते आणि मला कधी माझे जूने दिवस आठवले नाहीत पण आज काय झाले होते कोणास ठाऊक मला जलमहलच्या सारख्या आठवणी येत होत्या. हेही आठवत होते की मी हिंदुस्थानच्या बादशहाची नात आहे आणि माझ्या वडिलांची लाडकी आहे. मी सतरा वर्षापर्यंत शहजादी होते आणि आज एक निर्धन अनाथ मोलकरीण आहे. माझ्याकडे त्यावेळी किल्ल्यातील सगळ्यात सुंदर कपडेलत्ते होते आणि प्रत्येक गोष्ट कशी स्वच्छ असायची. मला त्याची आवडच होती.

पुरलेल्या दागिन्यांची जागा जेव्हा मी गुपचूप उकरली तेव्हा मला तेथे काही सापडले नाही. कोणी चोरले माहीत नाही. मागच्या जमान्यातील एकही गोष्ट आता माझ्याकडे शिल्लक नाही. फक्त मीच आहे आणि ती सुद्धा बदललेली आणि खचलेली.

हा विचार मनात आल्यावर माझे अवसान गळाले व मी चक्कर येऊन खाली पडले. सकाळपर्यंत तशीच दरवाज्यात पडले होते.

सकाळी जाग आली तेव्हा मी नेहमीची मोलकरीण होते. माझे नाव नागू होते.
मला सगळे त्याच नावाने हाका मारत.
समोर तीच चूल होती ज्यावर मी भाकर्‍या बडवते आणि घरातील सगळी कामे मला इतर मोलकरणींबरोबर करावी लागतात.

माझ्‍या मनात विचार आला, ‘‘जे काही पाहिले होते ते एक स्‍वप्‍न होते आणि जे काही ऐकले ती एक कहाणी….

अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s