शहजादी

Ladies_cabul1848b

शहजादी

मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता. मी आवाज दिल्यावर म्हातारी मुलाजिमा बाहेर आली आणि शहजादी साहिबांनी मला आत बोलावून घेतले.
घराचे आंगण खूपच छोटे होते. एक दोन चारपाई जेमतेम मावल्या असत्या एवढेच. दालन तर इतके छोटे होते की त्यात दोन चारपाईसुद्धा मावल्या असत्या की नाही शंकाच आहे. त्या दालनाच्या दक्षिणेस एक छोटी कोठी ही आहे.

मी आत गेलो. शहजादी साहिबा एका पोतेर्‍यावर बसल्या होत्या. एका बाजूला एक चारपाई होती व तिच्या समोर हे पोते अंथरले होते. त्‍या वर बसून शहजादी साहिबा पितळी छोट्या खलबत्त्यात आपले पान कुटीत होती. हे पोते ही बरेच जीर्ण व जागोजागी फाटलेले दिसत होते. ठिगळं लावलेली एक पांढरी चादर ही त्‍या वर अंथरलेली दिसत होती. एक छोटा तक्‍क्‍या होता पण बराच मळलेला. शहजादी साहिबांसमोर एक राख भरलेले मातीचे भांडे ठेवले होते पिकदाणी म्हणून. उजव्या बाजूला पानाचे तबक होते. त्याची कल्हई उडालेली होती पण स्वच्छ होते. त्‍यावर पानाचा एकही डाग नव्हता. दालनाच्या कड्या व कोयंडे पुरातन होत्‍या आणि खारींनी व घुशींनी खाली जमीन ठिकठिकाणी उकरून ठेवली होती.

शहजादी साहिबांचे केस आता पूर्णपणे पिकले आहेत. पापण्या व भुवयाही पांढर्‍याशुभ्र झाल्या आहेत. तरुणपणी त्‍या निश्‍चितच उंचापुर्‍या असणार पण आता त्‍या पार वाकल्‍या आहेत. त्‍यांचे कपडे स्वच्छ होते पण ठिकठिकाणी ठिगळं लावलेली दिसत होती. त्‍यांचे बोलणेही अत्यंत स्पष्ट व आवाजही खणखणीत आहे. वागण्या बोलण्यात अजूनही खानदानी आदब व मिठ्ठास भरली आहे. भाषा उच्च दर्जाची उर्दू ! पण आता वृद्धत्वामुळे चेहर्‍यावर सुरकुत्यांचे जाळे पडले आहे आणि आता शरीरही थकले आहे. त्‍या आत्मविश्वासाने व गंभीरपणे बोलतात. त्‍यांच्‍या या अशा बोलण्याने व उर्दू वरील प्रभावामुळे समोरच्यावर त्यांची छाप पडतेच.

त्यांच्या समोर जाऊन मी त्यांना अभिवादन केले तर म्हणाल्या,

‘‘ जिते रहो ! मियां माझे दृष्टी खराब झाली आहे तेव्हा पासून दरगाह शरिफमधे हजेरी नाही लावू शकले. तुला कधी पाहिले नाही पण तुझे नाव खूप ऐकले आहे. जेव्हा बडी बी ने सांगितले की ख्वाजा साहिब आले आहेत आणि त्यांना मला भेटायचे आहे तेव्हा मला फार आनंद झाला. मी तिला म्हटले सुद्धा , ‘ज्यांचे नाव अनेक वेळ ऐकले होते त्यांची आता प्रत्यक्ष भेट होणार ! त्यांना माझ्या खानदानाबद्दल पुष्कळच आदर वाटत असे.’ आता डोळ्याच्या खाचा झाल्यात आणि आता हातपायही थकलेत… बोला, काय काम काढलंत या बुढीकडे ?’’
मी म्हटले,

‘‘ ते तर मी सांगतोच पण मला प्रथम हे सांगा तुम्हाला येथे काही त्रास तर नाही ? ही जागा तर फारच लहान आहे. आणि छतावरही बर्‍याच ठिकाणे गळतंय दिसते. भोकेही पडलेली दिसतात छपराला. त्यातूनही माती गळत असणार !’’

“अरे मियां तू निदान काळजीने विचारलेस तरी. देवानेच महाल आणि किल्ला हिसकावून घेतल्यावर आता जे काही आहे ते चांगलच म्हणायच. महिन्याला दीड रुपया भाडे आहे. त्यात यापेक्षा काय चांगले मिळणार मियां ! वरुन माती पडतेच आणि रात्री चारपाच वेळा चादर झटकावी लागते. एक काळ असा होता की लाल किल्ल्यात मी माझ्या महालात झोपत होते. त्‍या वेळेस छतावर एका चिमणीने घरटे केले होते आणि तिच्‍या घरट्‍याचे काही गवत माझ्या पलंगावर पडल्यावर मला रात्रभर झोप आली नव्हती. आता येथे रात्रभर माती पडते आणि मला ते सगळे सहन करावे लागते.’’

मी विचारले, ‘‘ सरकार काही पेन्शन देत नाही का ?

‘‘देते ना ! महिन्‍याला दहा रुपये. उशीरा का होईना पण मिळते.

‘‘इतर काही उत्‍पन्‍न…? मी विचारले.

‘‘जी हां ! एक घर आहे ज्‍याचे महिन्‍याला सात रुपये भाडे येते. मी प्रथम त्यातच राहात होते जेव्हा लक्षात आले की १० रुपयात घर चालणार नाही तेव्हा ते भाड्‍याने दिले आहे आणि या स्‍वस्‍त भाड्‍याच्‍या घरात राहतेय. तेवढेच पैसे होतात. आता आम्ही दोन माणसे राहतो येथे. एक ही बडी बी आणि एक मी. घराचे भाडे आणि आमचा दोघींचा व पान सुपारीचा खर्च या सतरा रुपयात भागवतो कसाबसा.’’ शहजादी साहिबांनी सांगितले.

‘‘ तुम्ही जर आपल्या आठवणी मला जर सांगितल्या तर लिहून त्या छापाव्यात अशी माझी इच्छा आहे. मला तुमच्या खानदानाबाबत नेहमीच कुतूहल आणि आदर वाटत आलेला आहे आणि तुमच्या खानदानातील अनेक मान्यवर स्त्री पुरुषांच्या आठवणी मी लिहिल्या आहेत ज्यात सध्याची परिस्थितीबद्दल मी लिहिले आहे…’’
हे ऐकताच त्यांचे पान कुटणारे हात थांबले. त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या,

‘‘ नको मियां गल्लीबोळातून, घराघरातून माझ्या नावाची चर्चा व्हावी असं मला मुळीच वाटत नाही.’’

मी म्हटले, ‘‘मी तुमचे नाव कुठेच लिहिणार नाही फक्त हकिकत छापेन. मग ?

‘‘हकिकत तरी काय असणार ? दोन वाक्यात संपते ती. हम बादशाह थे आणि आता फकिर आहोत. संपले. अजून काही विचारशील तर अजून एक वाक्य त्यात घालता येईल – आता आमची मौत जवळ आली आहे. बस्स संपले आमचे हालात.’’ त्या म्हणाल्या.

‘‘ म्हणूनच म्हणतोय आपली कहाणी सांगा मी तुमचे नाव कुठेही छापणार नाही. आणि तुमचा पत्ताही छापणार नाही.

शहजादी साहिबांना इतका राग आला की त्या बर्‍याच वेळ काही बोलल्याच नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरील ते भाव मी शब्दात पकडू शकत नाही. नंतर पानदान जवळ ओढून त्यांनी माझ्यासाठी एक बारके पान बनवले आणि सांगू लागल्या –

‘‘ मियां १८५७ सालच्‍या लधाईत माझे वय १०-११ असेल. आम्‍ही किल्ल्यात राहात होतो. बादशाह सलामत आमच्‍या घरावर नाराज होते. पण आमचा पगार महिन्याच्या महिन्याला मिळत असे. माझे तीन भाऊ होते आणि मी एकच बहीण. माझ्या वडिलांनी उतरत्या वयात माझी आई जिवंत असतानाही अजून एक लग्न केले होते. माझी आई तिच्‍या सवतीशी खूप भांडत असे आणि आम्हीही आमच्‍या आईची बाजू घेऊन तिच्याशी भांडत असू. पण माझ्‍या सावत्र आईचे माझ्यावर खूप प्रेम होते. खरे तर मी माझ्या दोन्ही आयांची लाडकी होते. आमच्या घरात नोकर चाकर भरपूर होते. बंडाच्या आधीच सहा महिने माझी सावत्र आई आजारी पडली आणि अल्लाला प्यारी झाली. माझे दोन भाऊही त्याच वेळी त्या साथीत मेले. जेव्हा बंड झाले तेव्हा मी, माझा एक भाऊ, अब्बा हजरत आणि अम्मा एवढेच उरलो होतो.

“बादशाह सलामत किल्ल्यातून निघून हुमायूंच्या मकबरेत राहण्यास ला गेले. बाकीचे लोकही किल्ल्या बाहेर निघून इतरत्र पांगले व किल्ला रिकामा झाला. पण आमचे घर इतर इमारतींपासून बर्‍याच अंतरावर होते आणि खूपच भक्कम होते. बहुधा ती इमारत सगळ्यात जुनी असावी. अब्‍बा हजरत म्‍हणाले,

‘‘एवढी सुरक्षित जागा सोडून कुठे जाणार ? इथेही मरायचे आणि बाहेर गेले तरी मरायचेच. बाहेर कुत्र्याच्या मौतीने मरण येणार त्यापेक्षा घरातच थांबू. जे खुदाच्या मनात असेल ते या घरातच होईल.’’

बादशाह सलामत गेल्यावर दोन दिवस आमच्याकडे कोणी फिरकले नाही. नोकर चाकर सगळे पळून गेले होते. आम्ही घराचे दरवाजे बंद करून घेतले. घराला मोठमोठे दरवाजे होते व त्याला कवाडं होती, ती लावायलाच दोन तीन माणसे लागत. तिसर्‍या दिवशी बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. खूप माणसे आपापसात काहीतरी मोठ्‍या आवाजात बोलत होती. थोड्‍याच वेळात दरवाजे तोडण्‍याचे आवाज ऐकू यायला लागले. माझ्‍या भावाचे वय त्यावेळी सोळा असेल. अब्‍बांनी व अम्‍माने हातपाय धुतले व माझ्‍या भावाला सांगितले, ‘‘ चल तूही वजू करून घे (हातपाय धुवून घे) आपली मरण्याची वेळ जवळ आली आहे. शेवटचा नमाज़ पढायला पाहिजे. चल !’’ ते ऐकून माझ्‍या ह्रदयात कालवाकालव झाली. मी धावत जाऊन अम्‍माला बिलगले. तिने मला कुरवाळले व रडत रडत माझ्‍या केसातून हात फिरवला. म्‍हणाली,

‘‘ घाबरू नकोस, अल्‍लाह आपल्याला मदत करेल. तोच काहीतरी सुटकेचा मार्ग दाखवेल.”

त्यानंतर सगळ्यांनी हातपाय धुतले व प्रार्थनेसाठी सतरंजी अंथरली. खाली मान झुकवून आम्‍ही अल्‍लाहची प्रार्थना केली व मदतीचा याचना केली. तिकडे दरवाजे तोडण्याचे आवाज येतच होते. आमच्या सगळ्यांचे डोळे मिटलेले असतानाच दहा पंधरा गोरे व दहाबारा शिख सैनिक संगिनी लावलेल्या बंदुका घेऊन आत शिरले. अब्बा व भाईजान एकदम उठून उभे राहिले. अब्बांनी मला उचलून कडेवर घेतले व चादरीने माझा चेहरा झाकला. एका शिखाने अब्बांना विचारले,

‘‘तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात ?’’ अब्बांनी उत्तर दिले,

‘‘ हे माझे घर आहे आणि मी येथेच राहातो. शाहआलमची औलाद आहे !’’

त्या शिखाने त्याच्या इंग्रज साहेबाला हे समजावले. त्या इंग्रजी साहेबांच्यामधे आणि त्या शिख सैनिकात काहीतरी बोलणे झाले जे मला काही समजले नाही. तो शिख सैनिक माझ्या अब्बांना म्हणाला,

‘ साहेब विचारताहेत की बादशाह तर पळून गेला, इतर जणही पळून गेले मग तुम्ही का नाही पळून गेला?’’ अब्बा हजरतने सांगितले,

‘‘शाहआलम आमच्यावर काही कारणाने नाराज असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन गेले नाहीत आणि आम्ही त्यांच्या मागे गेलो नाही. आम्ही या धामधुमीत कसलाही भाग घेतला नाही आणि आम्हाला विश्वास आहे की इंग्रज सरकार निष्पापांना त्रास देणार नाही. आम्ही निष्पाप आहोत म्हणून पळालो नाही.’’

त्या इंग्रज अधिकाऱ्याने सांगितले की तुम्हाला टेकडीवर यावे लागेल. तेथे आम्‍ही तुमची चौकशी करू. जर तुम्ही निर्दोष असला तर तुमच्या जिवास काही धोका नाही. अब्‍बांनी सांगितले की त्‍यांच्‍या बरोबर त्यांची बीबी आणि मुलगी आहे आणि येथे गाडी घोडा काही नाही. यांना पायी चालण्याची सवय नाही. इंग्रज अधिकाऱ्याने उत्तर दिले की या धामधुमीत तुमच्या सवारीची व्यवस्था करणे शक्‍य नाही. इथेच थांबलात तर आम्‍ही तर तुम्हाला सोडून जाऊ पण दुसरी कुठली तुकडी आली तर ती तुमच्याशी असेच वागेल याची मी खात्री देऊ शकत नाही. कदाचित तुम्ही काही बोलण्याआधीच तुम्हाला ठार मारतील. म्‍हणून तुम्‍ही आत्ताच येथून रवाना झालेले बरं! रस्त्यावर काही घोडा गाडी मिळाली तर यांची व्यवस्था करू नाहीतर यांना चालवावे लागेल.

अब्‍बांनी असहाय्य होऊन निघण्याची तयारी केली. त्यांनी काही किमती दागदागिने बरोबर घेतले. इतर सगळे सामान तेथेच सोडले आणि त्‍या फौजेबरोबर बाहेर आले. अम्‍मा हजरत नेहमी आजारीच असायची. मला माझ्‍या भावाने कडेवर घेतले. आता घराचे परत दर्शन होणार नाही म्‍हणून आम्‍ही आमच्‍या महालावर एकदा शेवटची नजर फिरवली. अर्थात तेच खरे झाले. आम्हाला त्‍या वास्तूचे परत दर्शन झालेच नाही.

आम्‍ही घराबाहेर आल्‍यावर तो इंग्रज व ते शीख सैनिक घोड्यांवर स्वार झाले व दौडत निघून गेले. आमच्या बरोबर त्याने दोन शीख घोडेस्वार दिले व आम्हाला सगळ्यांना टेकडीवर त्यांचा तळ पडला होता तेथे जाण्यास सांगितले. किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत तर ते घोडेस्वार आमच्या बरोबर हळूहळू चालले पण बाहेर आल्यावर मात्र त्यांनी आम्हाला घाई करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ते अम्मा व आब्बा हजरतांना काही बोलले नाहीत. अम्माला चालणे मुश्कील जात होते. दर दहा पावलांना ती खाली बसत होती. त्यांचे शरीर आता थरथरु लागले. अम्मा थांबल्यावर त्या स्वारांनाही थांबावे लागे. आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो आणि त्यातील एक जण म्हणाला की असे चाललात तर संध्याकाळ होईल. तुम्ही जरा भरभर पावले का उचलत नाही? अब्बांनी नम्रतेने उत्तर दिले,

‘‘मेरे भाई, तुम्ही बघताच आहात की माझ्याबरोबर एक आजारी स्त्री आणि एक लहान मुलगी आहे. ही बाई आयुष्यात आत्तापर्यंत कधी रस्त्यावर चालली नाही. आम्ही हे मुद्दाम करत नाही. या दोघींमुळे असहाय्य आहोत.भरभर चालायचे असले तरी चालता येत नाही.’’

हे ऐकल्यावर ते चूप झाले पण तेवढ्यात माझ्या भावाच्या तोंडून निघून गेले,

‘‘तुम्ही तर हिंदुस्थानी आहात, तुम्हाला यांची दया येत नाही का ?’’ यावर एक शिख म्हणाला,

‘‘आम्ही काय करणार ? आम्ही तर हुकुमाचे ताबेदार आहोत. यावर माझा भाऊ म्हणाला, ‘‘ त्यांनी यांच्यावर जबरदस्ती करा असा हुकुम तर नाही दिला ना !’’

“आम्ही कुठली जबरदस्ती केली यांच्यावर?’’ त्याने विचारले.

‘‘ पण आता जबरदस्ती करावी लागणार असं दिसतंय कारण तुम्ही जाणून बुजून हळूहळू चालताय. तुमचा काहीतरी यात डाव दिसतोय.’’

असं म्हणून एकाने त्याचा घोडा आमच्या पाठीमागे आणला व तो आम्हाला ढकलू लागला. अम्मा हजरत त्या घोड्याला पाठीमागे पाहून घाबरली. त्यांना फीट येत असत. त्यांना एकदम फीट आली व ती धाडकन खाली पडली व जोरजोरात ओरडू लागली. हे पाहून ते दोन्ही स्वार एकदम चूप झाले. थोड्या वेळाने तो शिख स्वार अब्बाला म्हणाला, ‘‘ मी पायी चालतो. तुम्ही या आजारी बाईला घेऊन घोड्यावर स्वार व्हा.’’ शेवटी अब्बा हजरतने अम्माला उचलले व घोड्यावर बसले. त्‍या बिचार्‍या शिख स्‍वाराला मात्र त्‍या टेकडापर्यंत चालत जावे लागले. मी पण भाईजानच्‍या कडेवरुन पहाडावर पोहोचली. तेथे सगळीकडे इंग्रजांची फौज पसरली होती. आम्हाला एका तंबूत ठेवण्यात आले. त्या शिख स्वाराने लंगरमधून आमच्यासाठी रोटी आणून दिली. ती रात्र आम्ही त्याच तंबूत काढली.

दुसर्‍या दिवशी त्‍या फौजेच्‍या जनरलसमोर आम्‍हाला उभे करण्यात आले. दिल्‍लीतील त्‍याचा कोणी हेर त्‍याच्‍या बाजूला उभा होता. त्याने त्‍या माणसाला विचारले,

‘‘ यांना ओळखतोस का?’’ यावर त्याने आमच्याकडे पाहात उत्तर दिले,

‘‘ हो साहिब ! हे बादशाहच्‍या खानदानाचे आहेत आणि किल्‍ल्‍यातच राहतात. जेव्हा लाल किल्ल्यात अंग्रेज बायका मुलांची कत्तल होत होती त्यात याने भाग घेतला होता. हे ऐकताच त्या जनरलचा चेहरा लालबुंद झाला. त्याने रागाने आब्बाकडे पाहिले. आब्बा हजरतने सांगितले,

‘‘ हा माणूस खोटे बोलतोय. हा माझ्याकडे नोकर होता आणि चोरी करताना हा अनेक वेळा पकडला गेलाय आणि त्यासाठी त्याने मारही खाल्ला आहे. शेवटी मी याला हाकलून दिले होते. त्याचा सूड म्हणून हा कुभांड रचतोय. तुम्ही त्याला एवढेच विचारा की बादशाह माझ्यावर अनेक वर्षं नाराज होते की नाही आणि मला केव्हा पासून दरबारात येण्यास बंदी होती, तेही याला विचारा.’’

त्या माणसाने यावर सांगितले, ‘‘ मी यांच्याकडे नोकर होतो हे बरोबर आहे. पण मी कसलीही चोरी केली नव्हती. पगार कमी होता म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि बादशाह यांच्यावर नाराज होते हेही ठीक आहे पण जेव्हा दंगल सुरु झाली तेव्हा त्यांना खूष करण्यासाठी याने परत दरबारात ये जा सुरु केली होती. शिवाय जे लोक कत्तलीच्या विरुद्ध होते त्यांच्या विरुद्ध यांनी बरीच भाषणे ठोकली. त्यांनी जमावाला भडकावले की सापाला आणि त्यांच्या पिल्लांना सोडणे हे इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. त्यांना ठेचलेच पाहिजे. हे ऐकूनच जमावाने इंग्रजी बायका पोरांची कत्तल केली.’’

ते ऐकून तो जनरल रागाने काळा निळा झाला. त्याने आब्बाचे काही ऐकले नाही. आब्बा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करीत होते पण ते ऐकतच नव्हते. ओरडले,
‘‘यांना ताबडतोब गोळ्या घाला. यांनी आमच्या बायका पोरांची कत्तल केली पण आम्ही यांच्यावर दया करतो. या दोन स्त्रियांना छावणीबाहेर सोडून द्या. त्यांना जायचे तेथे जाऊ देत.’’

गोरे आणि देशी शिपाई पुढे झाले आणि त्यांनी भाईजानचे व अब्बा हजरतचे हात मागे बांधले. अब्बा हजरत माझ्याकडे पाहून रडू लागले पण भाईजान चुपचाप उभे होते. अम्माने एक किंकाळी फोडली व बेशुद्ध पडली. मी आब्बांकडे त्यांना मिठी मारण्यासाठी धावत सुटले पण तेवढ्यात एका शिपायाने मला धक्का मारुन अम्माच्या पायात ढकलले. मी पाहिले, ते शिपाई अब्बांना व माझ्या भावाला फरफटत थोडे दूर घेऊन गेले. त्यांच्या समोर चारपाच शिपाई आपल्या बंदुका घेऊन उभे राहिले. शेजारीच तो जनरलही उभा होता. तो काहीतरी ओरडला. शिपायांनी बंदुका खांद्याला लावल्या व नेम घेतला. त्याच वेळी मला अब्बाजानचा आवाज आला,

‘‘लो बेटी अल्लाह तुझे रक्षण करो ! आम्ही आता या दुनियेतून जातो.’’ त्यानंतर माझ्या भावाचा आवाज माझ्या कानावर पडला,

‘‘ अम्मा, अम्मा, मी तुला असं पाहू शकत नाही. सलाम, अम्मा, मीही चाललो !’’

बंदुकींचा आवाज झाला आणि बराच धूर झाला. मी पाहिले की भाईजान व अब्बा खाली मातीत पडले होते. मी धाय मोकलून रडत होते आणि घाबरल्यामुळे तोंडातून शब्दही उमटत नव्हता. तेवढ्यात अम्मा शुद्धीवर आली. मला अजून आठवतंय, मी तिला म्हटले,

‘‘भाईजान व अब्बाजान को मार डाला ! मार डाला ! बघ ते तेथे मातीत तडफडत पडले आहेत. त्यांच्या डोक्यातून रक्त उसळतंय ! आता ते गेलेऽऽऽ मला आता कधीच भेटणार नाहीतऽऽ. अब्बाने मला शेवटी हाक मारली होती व भैय्याने पण तुला ! अम्मा, अम्मा आता काय होणार? आता आपल्यालाही मारणार का? का परत कैदेत टाकणार ?’’ अम्मा जमिनीला हात टेकत कशीबशी उठली व तिने एकवार अब्बा आणि भाईजानकडे निरखून पाहिले. त्यांची तडफड आता पूर्ण थांबली होती. ते पाहून तिच्या हातापायातील अवसानच गळाले. खाली पडली आणि किंचाळली,

‘‘ माझा बेटाऽऽऽ माझा बेटाऽऽऽ माझा लालऽऽ माझी सोळा वर्षांची मेहनत, माझा शेवटचा आधार, माझा दुल्हा माझ्यापासून हिरावून घेतला. संपल ! सगळं संपल आता. अल्लाह ही हकिकत आहे का स्वप्न ? माझा सरताज येथे धुळीस मिळालाय आणि माझ्या मुलाच्या रक्तात भिजलाय ! हे दोघे तर दंगल सुरु झाल्यावर घराच्या बाहेरही पडले नव्हते. अरेऽऽऽ कसला सूड घेतलास रे माझ्यावर ! माझी तुला दया नाही का आली? तुला माझ्या मुलीचीही दया नाही आली आणि आम्हाला बेसहारा सोडून दिलेसऽऽऽ.’’

अम्मा रडत होती तेवढ्यात फौजेचे देशी शिपाई आले. माझे व अम्माचे हात पकडून त्यांनी आम्हाला ओढत बाजूला नेले. जाताना आमची दृष्टी त्या दोन प्रेतांवर पडली. गोळ्या त्यांच्या छातीवर व चेहर्‍यावर लागल्या होत्‍या. निपचित पडले होते. त्‍यांचे विद्रूप चेहरे रक्‍तात झाकले गेले होते. ना अम्मा चालू शकत होती ना मी. बक्र्‍यांना ओढतात तसे ते आम्हाला ओढत ओढत नेत होते. टेकडीवर आमचे पाय रक्तबंबाळ झाले. त्यावेळेस आमचे काय हाल झाले हे मी शब्दात सांगू शकत नाही. मला नाही वाटत कोणाच्या नशीबात असं काही कधी आले असेल !’’

छावणीच्‍या बाहेर आल्यावर त्‍या शिपायांनी आम्हाला तेथेच सोडून दिले. अम्‍मा तर बेशुद्ध पडली होती. मी तिच्या शेजारी रडत बसले होते. एक गवत कापणारा डोक्यावर गवताची पेंडी घेऊन तिकडून चालला होता. मला पाहिल्यावर त्याने डोक्यावरून गवताची पेंडी खाली उतरवली व माझ्याकडे आला. तो हिंदू होता हे मला पक्के आठवतंय. त्याने अम्माकडे पाहिले आणि म्हणाला की ही बाई मेली आहे. मला तेथेच सोडून तो छावणीत गेला व एकदोन मुसलमानांना घेऊन आला. त्यांनी पण हेच सांगितले की ही बाई मेली आहे. त्यांनी माझ्या व अम्माच्या अंगावरील सगळे दागिने उतरवले व सरकार जमा केले. त्यानंतर त्यांनी एक खड्डा खणला व त्यात अम्माला गाडून टाकले. दोन माणसांनी मला उचलले व अजमेरी दरवाज्यावर सोडून दिले. तेथे मी एकटी बसून रडत बसले असताना खानिमच्या बाजारात काही मुसलमान सोनार आपल्या स्त्रियांना घेऊन आले. ते कुतुब साहिबच्या दर्शनाला चालले होते. ते मला त्यांच्या बरोबर घेऊन गेले. जेव्हा दिल्लीमधे सगळे सुरळीत झाले तेव्हा ते सोनारही परत दिल्लीत आले आणि त्यांनी मला माझ्या काही नातेवाईकांच्या हवाली केले. या शहजाद्यांबरोबर मी लहानाची मोठी झाले. त्यांच्यातीलच एकाशी माझी शादी झाली. शादीनंतर माझी पेन्शन सुरु झाली. परमेश्वराने मला अनेक मुले दिली पण त्यातील एकही जिवंत राहिले नाही. शेवटी माझा नवराही मेला. आता चार वर्षांपासून माझ्या डोळ्यांनाही दिसत नाही…

ऐकलीस का माझी कहाणी ? माझ्या रोमारोमातून तुला फक्त उसासेच ऐकू येतील, या जगात आल्यावर मी माझ्या आयुष्याची पहिली दहा वर्षे सुखासमाधानात काढली व उरलेली सत्तर वर्षे हालअपेष्टात. आता कबरीत पाय सोडून बसले आहे. आज मेले काय आणि उद्या मेले काय ! ही बिचारी बडी बी भेटली आहे…त्यामुळे ठीक चालले आहे म्हणायचे. बाजारातून जरुरी पुरते सामान आणते आणि दिवसभर माझ्या आसपास बसून असते. आमचे शेवटचे दिवस एकमेकींच्या सोबतीने कसेबसे ढकलतोय खरं….

अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, कथा. Bookmark the permalink.

1 Response to शहजादी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s