गुलबानो
….गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की. वडिलांनी गुलबानोला लाडाने वाढवले होते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा सख्त आदेशच होता म्हणा ना. ज्या दिवशी तिचे वडील अल्लाला प्यारे झाले त्या दिवसापासून तर महालात तिचे लाड इतके वाढले की विचारायलाच नको. अम्मा म्हणायची, ‘‘निगोडीच्या ह्रदयाला ठेच लागली आहे बरं ! तिला बापाची उणीव भासू देऊ नका. तिला असं सांभाळा की तिला तिच्या बापाच्या प्रेमाची आठवणच येणार नाही !’’
इकडे दादाजी म्हणजे बहादुर शाह जफ़रही नातीचे लाड करण्यात मागे हटत नव्हते. नवाब ज़ीनत महल त्यांची पट्टराणी होती. जवांबख्त हा तिचाच मुलगा होता. पण मिर्ज़ा दाराबख्तच्या अकाली निधनानंतर मिर्ज़ा फरुकला राज पुत्राची मनसब मिळाली आहे. पण या राजपुत्राचे जवांबख्तच्या हुशारी पुढे काही चालत नाही. शिवाय ज़िनत महल इंग्रजांबरोबर जवांबख्तला ती गादी मिळावी म्हणून कारस्थाने करतीये.. असा सगळा माहोल आहे. जवांबख्तचे लग्न एवढ्या थाटामाटात झाला की मोगलांच्या उतरत्या काळात त्या थाटामाटात दुसरे लग्न झाल्याचे कोणाला आठवत नाही. गालिब आणि ज़ौक मस्तीत शेरोशायरी करत होते आणि याच काळात त्यांच्यात त्या सुप्रसिद्ध चकमकी होत होत्या. ग़ालिबने लिहिले ‘‘मकता में आप पडी थी सुखने मुस्तरानाबात.. वरना मुझे खुदा न खास्ता उस्तादे शौक से कोई अदावत नही है !’’ मकताच्या आधी काही ओळी मी खरडल्या (ज्यात जौकवर बोचकारे काढणारी टीका होती) नाहीतर माझी काही त्यांच्याशी दुष्मनी नाही.
असा तो काळ होता. पण दुर्दैवाने जवांबख्त आणि ज़ीनत महल समोर कोणाचे काही चालत नव्हते. पण गुलबानोची गोष्टच वेगळी होती. या अनाथ मुलीच्या वाट्याला बादशहाचे जे प्रेम आले होते ते जवांबख्त व ज़ीनत महलच्या वाट्याला कधीच आले नाही. गुलबानोचे आयुष्य कशा तर्हेने चालले असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. सूख, मानमरातब आणि चैनीत आयुष्य व्यतीत करत असावी. मिर्ज़ा दाराबख्तची अजूनही मुलं होती पण गुलबानो आणि तिच्या आईवर त्यांचे जरा जास्तच प्रेम होते.
गुलबानोची आई एक डोमनी होती म्हणजे नाचणारी आणि मिर्ज़ाचे तिच्यावर अतोनात प्रेम होते. इतर राण्यांपेक्षाही जास्त. जेव्हा ते अल्लाला प्यारे झाले तेव्हा गुलबानो १२ वर्षांची असेल. मिर्ज़ांचे दफन दरगाह हज़रत मख़दूम नसीररुद्दीन चिराग येथे करण्यात आले जे दिल्लीपासून सहा मैल दूर जुन्या दिल्लीच्या उध्वस्त अवशेषात आहे. कित्येक महिने गुलबानो आपल्या आईला घेऊन बापाची कबर पाहण्यास जात असे. जेव्हा जाई तेव्हा कबरीला मिठी मारून रडत असे व म्हणे, ‘‘ अब्बा आम्हालाही आपल्या शेजारी झोपू द्या ना !. तुमच्या विना आमचा जीव रोज घाबरा होतोय !’’
गुलबानो पंधरा वर्षांची झाली आणि तिचे एका सुंदर फुलपाखरात रुपांतर झाले. लहानपणीचा हट्टी स्वभाव व दंगामस्ती तर कमी झाली पण तारुण्यसुलभ नखरे मात्र अतोनात वाढले. इतके की महालातील मुले कायम तिच्या मागे पुढे करू लागले. पडदे लावलेल्या सोन्याच्या पलंगावर दिवसभर लोळत पडे. संध्याकाळी दिवे लागले की हिची पावले लगेच लोळण्यासाठी त्या पलंगाकडे वळत. अम्मा म्हणे,
‘‘झुंबरातून दिवे लागले की बानो पोहोचलीच पलंगावर.’’ यावर अंगाला आळोखे पिळोखे देत, जांभई देतात अस्ताव्यस्त झालेले केस सावरत ती म्हणे,
‘‘ तुला काय करायचंय ? लोळते, खाते पिते, वेळ घालवते. तुला त्रास तर देत नाही. तू उगीचच माझ्यावर जळतेस’’
‘‘ बानो मी जळत बिळत नाही गं ! मला तुझी काळजी वाटते. तुला जितका वाटतो तितका आराम कर ! खुदा तुला आरामात लोळण्याइतके सूख देवो. मला तरी दुसरे काय हवय? मी तर म्हणते जास्त झोपले की माणसे आजारी पडतात. तू संध्याकाळी लवकर झोपतेस तर पहाटे लवकर उठ. पण तू तर सकाळी दहा शिवाय उठत नाहीस. घरात उन्हं पडतात पार आणि नोकरांना मोठ्याने बोलण्याचीही चोरी ! तुझी झोपमोड झाली तर ! इतके कोणी झोपते का ? सांग बरं ! थोडेफार घरकामंही शिकायला पाहिजे की नको ? माशा अल्लाह आता तू जवान झाली आहेस. दुसर्याच्या घरात जायचे आहे ! अशा सवयी लागल्या तर कसं होणार तेथे तुझे?’’
गुलबानोला अम्माचे हे बोलणे ऐकून राग येई. ती म्हणे, ‘‘ तुला याशिवाय दुसरा विषयच नाही का? जा ! बोलू नकोस माझ्याशी. तुला मी नकोशी झाले आहे म्हणूनच मला दुसर्या घरी पाठवायची तयारी चालू आहे तुझी ! तसं असेल तर साफ साफ सांग म्हणजे मी दादा हजरतांच्या घरी राहायला जाते.
त्याच काळात मिर्ज़ा दावर शिकोह शहजादा, खिरज सुल्तानचा मुलगा, गुलबानोकडे येऊ जाऊ लागला होता. किल्ल्यात पडद्याची पद्धत पाळली जात नसे. शाही खानदानी लोक आपापसात पडदा पाळत नाहीतच म्हणा ! त्यामुळे मिर्जा बेधडक बानोकडे येत असे.
खरे तर बानो नात्याने त्याची सख्खी नसली तरी चुलत बहीण होती पण नंतर त्यांच्यातील प्रेम भावनेने एक वेगळेच नाते निर्माण झाले. मिर्ज़ा गुलबानोकडे बहिणीच्या नात्याने बघत असे तर बानो मात्र बहिणीच्या नात्यापेक्षाही वेगळ्या नजरेने बघत असावी.
एक दिवस सकाळी सकाळीच मिर्ज़ा गुलबानोकडे आला. त्याने पाहिले बानो सकाळ झाली तरी तिच्या लाडक्या पलंगावर झोपली होती. तिने अंगावर काळी शाल ओढली होती जी तिच्या अंगावरच अस्ताव्यस्त झाली होती. अंगाखाली गुलाबांच्या पाकळ्या सुकल्या होत्या. पाय उघडे पडले होते आणि ओठ विलग झाले होते. उशाला हात होता आणि उशी बाजूला पडली होती. दोन दासी पंख्याने माशा उडवीत शेजारी उभ्या होत्या.
दावर शिकोह चाचीशी गप्पा मारत बसला पण तिरक्या नजरेने गुलबानोच्या हालचालीही पहात होता. शेवटी चाचीला म्हणाला, ‘‘ काय चाची, हजरत बानो अजून झोपली आहे ? उन्हे इतक्यात डोक्यावर येतील. आता हिला उठवलंच पाहिजे !’’
‘‘बेटा बानोचा राग तुला माहिती आहे. तिला उठविण्याची कुणाची हिंम्मत होणार रे बेटा? कोणी उठवले तर महाल डोक्यावर घेईल.’’
दावर म्हणाला,
‘‘ थांबा मीच उठवतो तिला. बघुया काय करते ती !
‘चाची हसून म्हणाली, ‘‘ जा उठव ! तुला काही बोलणार नाही ती ! तू आवडतोस ना तिला! ’’
दावरने जाऊन तिच्या तळपायाला बोटांनी गुदगुल्या केल्या. बानोने एकदम पाय जवळ घेतले व डोळे उघडले. मासोळी सारख्या मोठाल्या डोळ्यात राग भरला होता. तिला वाटले की तिच्या दासीने काही चेष्टा केली की काय ! तिला शिक्षा देण्याच्या तयारीत असलेल्या बानोच्या दृष्टीस दावर पडला. ज्याच्या प्रेमात ती आकंठ बुडली होती तोच समोर पाहून ती लाजली. तिने लाजून शालिचा पदर केला व त्यात चेहेरा झाकून घेतला. ताडकन उठून बसली. अंगाला नाजुकसा कंप सुटला होता. इकडे दावरची अवस्था काही फार वेगळी नव्हती. ते सौंदर्य पाहून त्याचे होश उडाले. त्याची जणू शुद्धच हरपली.
त्याने स्वतःला सावरले व ओरडला, ‘‘ चाची हजरत बघ मी बानोला उठवलं !’’
प्रेमाने पुढची पायरी गाठली. विरहाने रात्रीच्या झोपा उडाल्या. बानोच्या आईला संशय येऊ लागल्यावर तिने खबरदारी म्हणून दावरचे घरी येणे जाणे बंद करून टाकले.
———–
दरगाह हजरत चिराग दिल्लीच्या एका कोपर्यात एक सधन घरातील वाटावी अशी एक स्त्री फाटलेली चादर डोक्यावर ओढून भिकार्यासारखी बसली होती कण्हत होती. पाऊस धुवाधार पडत होता. सोसाट्याच्या वार्यामुळे पाणी आडवेतिडवे त्या जागेला झोडपत होते. त्या भिकारणीचं अंथरुन जेथे होतं ती जागा त्या पावसाने पार ओली करुन टाकली.
ती बाई बहुधा आजारी होती. तिच्या बरगड्यात जीवघेणी कळ उठली व ती विव्हळली. अंग तापाने फणफणले होते व शरीर थंडीत थरथर कापत होते. तिचा त्या शरीरावर ताबाच राहिला नव्हता. ती त्या तापातच बरळत होती, मधेच ओरडली,
‘‘ गुलबदनऽऽ ए गुलबदन ! कुठे उलथली आहे मेली कोणास ठाऊक ! लवकर ये आणि मला शाल पांघर. बघ हवा आत येतीये. पडदे सोड ! रोशन तूच ये ! गुलबदन कुठे गेली आहे कोणास ठाऊक ! शेगडी घेऊन ये ! आणि जर माझ्या बरगड्यांना मालिश कर. मला श्वास घ्यायला त्रास होतोय गं !’’
जेव्हा तिच्या या आरडाओरड्यानेही कोणी तिच्या जवळ आले नाही तेव्हा मात्र तिने चादर बाजूला करुन इकडेतिकडे पाहिले. त्या अंधारल्या कमानीत गवताच्या बिछान्यावर ती एकटी पडली होती. सगळीकडे भयाण अंधार भरला होता व पावसाच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाही आवाज येत नव्हता. पाऊस तर असा पडत होता की तिला वाटले कयामतचा दिवस आला की काय. तेवढ्यात एक विज कडाडली आणि तिच्या नजरेस एक पांढरीशुभ्र कबर पडली. तिच्या बापाची.
स्वत:चे हे हाल पाहून तिने एक किंकाळी फोडली व म्हणाली,
‘‘ बाबाऽऽऽ मी तुमची गुलबानो ! उठा, मला ताप चढला आहे. माझ्या हाडात भयंकर वेदना… मला थंडी वाजतेय बाबा.. माझ्याकडे या फाटक्या चादरी शिवाय अंगावर ओढायला काही नाही.’’ स्फुंदत, आक्रोश करत ती म्हणत होती,
‘‘माझी आई कुठे गेली? मला महालातून हाकलून दिलंय ! बाबाऽऽऽ मला भीती वाटते. मला तुमच्या जवळ घ्या. मी दोन दिवसांपासून उपाशी आहे..हो ! कफनातून माझ्याकडे बघा. माझ्या शरीराला या ओल्या जमिनीतील खडे टोचताहेत… विटेची मी उशी केली आहे..
‘‘माझा सोन्याचा पलंग कुठे गेला? माझ्या शाली कुठे गेल्या ? अब्बा ऽऽऽ अब्बाऽऽ उठा ना ! किती वेळ झोपणार ? ’’ कसाबसा श्वास घेत तिने परत एकदा आक्रोश केला आणि तिची शुद्ध हरपली. तिने पापण्याआड पाहिले तिचे अब्बा मिर्ज़ा दाराबख्त तिला कबरीत उतरायला मदत करीत होते आणि रडत रडत म्हणत होते,
‘‘ आता ही कबरच हिचा सोन्याचा पलंग आणि याच्या भिंती त्याचे पडदे !’’
तिचे डोळे उघडले व बिचारी बानो स्वत:चे पाय चोळू लागली. मरण्याची वेळ जवळ आली होती. म्हणाली,
‘’ लो साहिब, आता मी मरते. माझ्या घशात कोण सरबताचे थेंब टाकणार? आणि कोण मला यासीन ऐकवणार ?. माझे मस्तक कोण मांडीवर घेणार ? हे अल्लाह, तुझ्याशिवाय आता माझे कोणी नाही. तुझा प्रेषितच माझा साथी आहे आणि हे औलिया माझे शेजारी.’’
शहजादी मेली आणि दुसर्या दिवशी गरिबांसाठी असलेल्या एका मोडकळीस आलेल्या कब्रस्तानात गाडली गेली.
आता तोच तिचा लाडका सोन्याचा छपरी पलंग, ज्यात ती अजून झोपली आहे आणि कयामतपर्यंत झोपणार आहे…
अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी