‘‘मा. का.’’

pen-on-paper10869108_lrg

स्थळ : श्रीनगर येथील गफार खान यांचे फार्म हाऊस
ऋतू : थंडीचा
साल : १९६०

पोस्टकार्डाचे दिवस होते. पहिले पोस्टकार्ड आले ते घाटीवरुन. त्यावर एका डोंगराचे सुंदर चित्र होते. पूर्वी अशा प्रकारची पोस्टकार्ड पाठविण्याची पद्धत होती हे तुम्हाला आठवत असेल. कार्डावर एकच ओळ सुवाच्च अक्षरात लिहिली होती

‘‘मला वाटतं तुम्हाला हे चित्र आवडेल म्हणून पाठवत आहे. तुम्हाला काश्मिर तसेही आवडते आणि तुमच्यात मला रस वाटला त्याला हेही एक कारण आहेच. मी तुमची सगळी पुस्तके वाचली आहेत पण मला सांगा तुम्ही खरेच माणसांना समजून घेऊन त्यांचे प्रश्र्न सोडवता का? त्यांचे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन कादंबरीत रंगवता का ? म्हणजे मला विचारायच आहे की तुम्हाला वास्तवात अशी माणसे खरीच भेटली अहेत की.. ? मला शंका आहे. हे पत्र म्हणजे तुमच्या एका चाहत्याचा पहिला नमस्कार समजा. मा.का.’’

इतर कादंबरीकारांप्रमाणे माधव काळ्यांनाही अनोळखी लोकांकडून किंवा वाचकांकडून पत्रे येत. त्यांना त्याची सवय होती. बहुतेक वेळा अशा पत्रात त्यांच्या लेखनाचे कौतुकच असायचे पण काही पत्रात कडवट टिकाही. पण दिलदार माधवराव काळे मात्र सगळ्या पत्रांना उत्तर द्यायचे. दुर्दैवाने या पत्रांना उत्तरे देण्यात त्यांची बरीच शक्ती खर्च होत असे आणि लिखाणाचा मौल्यवान वेळही. ‘मा.का.’ ने पत्रावर पत्ता लिहिला नव्हता त्यामुळे ‘‘चला ! वेळ वाचला !’’ म्हणून ते थोडेसे खुषच झाले. चित्रही थोडा वेळ पाहिल्यावर त्यांना त्यातील उणीवा जाणवल्या. त्यांना त्याचा कंटाळा आला आणि ते त्यांनी टरकावून कचर्‍याच्‍या टोपलीत फेकले. पण त्या पत्रकर्त्याने जी टिका केली होती आणि संशय व्यक्त केला होता त्याने त्यांच्या मनात उगीचच संभ्रम उत्पन्न झाला. तो विचार त्यांच्या मनातून काही जाईना…‘‘आपण खरंच आपल्या कादंबरीतील पात्रांना जाणून घेण्यात, त्यांचे प्रश्र्न सोडविण्यात कमी पडतो का?’’ हा विचार आता त्यांना सतावू लागला. ‘‘खर असावं ते’’ ते मनात म्हणाले. त्यांना जाणीव होती की त्यांच्या पात्रांचे स्वभाव म्हणजे त्यांच्याच स्वभावाची प्रतिबिंबे होती. पात्रे त्यांच्यासारखी असायची किंवा त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असायची. पात्रांचे व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वाचेच एक रुप असायचे किंवा एकदम त्याच्या विरुद्ध. बहुतेक ‘‘मा.का.’’ ने हे ओळखले होते. काळ्‍यांनी मनोमन प्रतिज्ञा केली, ‘‘जरा वस्तवातच रहायला पाहिजे यापुढे !’’

दहा दिवसांनी दुसरे पत्र आले. त्याच्यावर गोपालपूर पोस्टाचा शिक्का होता. ‘‘तुमचे गोपालपूरबद्दल काय मत आहे ? तुमच्यासारखेच तेही सीमेवर आहे. मला वाटते माझे हे म्हणणे तुम्हाला उद्धटपणाचे वाटणार नाही. म्हणजे तुमची केस सीमेवरची आहे असे मला म्हणायचे नाही. तुम्हाला माहीतच आहे मला तुमच्या कथा किती आवडतात त्या. काही लोकांना तर त्या दुसर्‍या जगातीलच वाटतात. मला वाटते तुम्‍ही एका कुठल्‍यातरी जगातच वावरावे. ते बरं राहील. माझा दुसरा सप्रेम नमस्कार घ्‍यावा. – मा. का.

हे पत्र वाचल्यावर काळ्यांनी खिडकीबाहेर नजर लावली. ते कुठेतरी शुन्यात बघू लागले. पण त्यांच्या मनात पत्र लेखकाबद्दल विचार घोळू लागले. पत्रव्यवहार करणारा होता, की करणारी होती ? अक्षर तर एखाद्या पुरुषाचे असावे तसे दिसत होते. निष्काळजी पण थोडेसे व्यवहारी आणि टिकाही एखाद्या पुरुषाने करावी तशी वाटत होती. पण ज्या प्रकारे चौकशा चालल्या होत्या त्यावरुन तरी ती पत्रलेखिका असेल असे वाटत होती ( ती ‘ती‘ असावी अशी सूप्त इच्छा क्षणभर त्यांच्या मनात डोकावून गेली, पण क्षणभरच ) स्त्रिया जसे तुम्हाला गोड बोलून खुष करतात आणि त्याच वेळी तुमच्या मनात संभ्रमही उत्पन्न करतात अगदी तसेच. त्यांनी ते विचार मनातून झटकून टाकले. ओळखीच्या माणसांवर विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता तर ‘हिच्या बद्दल काय एवढा विचार करायचा ?’ पण या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याबद्दल सरळ सरळ त्यांनाच लिहावे आणि तेही असे, याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. ‘‘दुसर्‍या जगातील लेखन म्‍हणे !’’ पण त्याच संभ्रमात त्‍यांनी त्‍यांच्‍या कादंबरीची शेवटची दोन प्रकरणे, जी त्‍यांनी नुकतीच लिहून संपवली होती ती परत एकदा वाचून काढली. आता त्यांना त्‍या प्रकरणांचा पाया जरा ढिसूळ वाटला खरा. कदाचित इतर लेखकांप्रमाणे त्यांचीही दुसर्‍या जगात प्रवेश करण्‍याची अजून तयारी नव्‍हती. ‘‘इथे कसे जरा आपल्या मनासारखं वागता येते’’ ते हसून म्हणाले. पण त्याने काही फरक पडतो का ? त्यांनी ते चित्र असलेले पोस्टकार्ड उचलले आणि शेकोटीत टाकले व लिहायला बसले. पण त्यांच्या मनातील विचारांचा ओघ तुटक झाला आणि झरणीतून उमटणारे कागदावरील शब्द अडखळू लागले. जणू काही त्यांच्या विचारांच्या भोवती स्व-टिकेचा खंदक खणालय. जसे जसे दिवस जाऊ लागले तशी त्यांना त्यांच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाची जाणीच होऊ लागली. त्याने त्यांचे चित्त विचलीत तर झालेच पण त्यांना असे वाटू लागले की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ताबा कोणीतरी घेतलाय आणि त्याच्या चिंध्या उडवतोय. त्यांच्या लेखनात एकसुत्रीपणा राहिला नाही. त्यात सरळसरळ दोन प्रवाह दिसू लागले. एकमेकांस कधीही न भेटणारे. त्यांच्यात दिलजमाई करण्याचे त्यांनी बरेच प्रयत्न केले पण छे ! जेवढे निकराचे प्रयत्न ते करीत तेवढे कमी लिखाण त्यांच्या हातून होऊ लागले. ‘‘काही हरकत नाही’’ त्यांनी विचार केला, ‘‘मला वाटतं मला नवनवीन कथाबीज सापडतेय. या दोन प्रवाहामधील विसंगतीचा परस्परसंबंध लावला तर अनेक लेखकांना झाला तसा या विसंगतीचाही मलाही फायदा होईल.’’

तिसर्‍या पोस्‍टकार्डावर तालच्या एका देवळाचे चित्र होते.
‘‘मला माहीत आहे तुम्‍हाला भव्य देवळांमधे फारच रस आहे. मला खात्री आहे तुम्हाला मेगालोमॅनियाने ग्रासलेले नाही पण कधी कधी लहान देवळे ही जास्त लाभदायक असतात. मी उत्तरेकडे सरकताना मला बरीच देवळे लागत आहेत. सध्‍या तुम्‍ही लिहिण्‍यात गर्क आहात की एखाद्या नवीन कल्‍पनेच्‍या शोधात आहात ?.’’ सप्रेम नमस्कार !- मा. का.

आता ही गोष्ट खरी होती की काळ्यांना भव्य देवळात फारच रस वाटत असे. काश्मिरमधील देवळाबद्दल त्यांनी त्यांच्या एका प्रवासवर्णात अगदी खुलासेवार लिहिलेही होते. (त्यांनी ती जी कादंबरी काश्मिरच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती त्यामुळेच तर त्यांची ओळख गफार खान बरोबर झाली होती. नंतर दोस्ती झाल्यावर ते अनेक वेळा त्यांच्या फार्म हाऊसवर लेखनासाठी मुक्काम टाकत. मोठा रइस आणि दिलदार माणूस) आणि हेही खरे होते त्यांना देवळाची भव्यता जास्त भावे. छोट्या छोट्या देवळांची त्यांना मग तमा वाटत नसे. पण मा.का. ला हे कसे माहीत असणार ? आणि तो मेगालोमॅनियाचा उल्लेख ? खरंच असेल का तसे ? आणि मा.का. आहे तरी कोण ?

‘‘मा. का.’’ वाचून वाचून ते नाव त्यांच्या डोक्यात इतके पक्के बसले होते की त्यांच्या नावाचीही आद्याक्षरेही तीच आहेत हे आज प्रथमच त्यांच्या लक्षात आले. ही आद्याक्षरे त्यांनी प्रथमच पाहिली होती असे नाही. तशी ती सामान्य होती आणि बर्‍याच लोकांची असतीलही. त्‍यांना या योगायोगाची मोठी गंमत वाटली. त्यांच्या मनात विचार आला, ‘‘मीच तर मला पत्रे लिहित नाही ना?’’ काही लोक असं करतात म्हणे. विशेषत: दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लोक किंवा रुग्ण म्हणा. अर्थात ते त्यांच्यापैकी नव्हते याची त्यांना खात्री होती. पण त्यांच्या लेखनात जी भेग पडली होती त्याचे स्पष्टीकरण कसे देणार? ती भेग आता त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या लिखाणात उतरण्यास सुरुवात झाली होती. एका परिच्छेदात स्वल्पविराम, उपवाक्ये खचलेल्या अवस्थेत लोळत पडलेली असायची तर लगेचच दुसर्‍या परिच्‍छेदात छोटी छोटी पण तिक्ष्‍ण जखमा करणारी वाक्‍यांची रेलचेल असायची. एक क्रियापद आणि एक पूर्णविराम म्‍हणजे खेळ खलास.

त्‍यांनी चाळा म्‍हणून परत त्‍या हस्‍ताक्षराकडे नजर टाकली. अत्‍यंत सामान्‍य, कोणाचेही असावे तसे साधेसुधे हस्‍ताक्षर. कोणीही या हस्‍ताक्षरामागे लपून लिहू शकतो. लाखो लोकांचे हस्‍ताक्षर असेच असेल. कोणाचे म्‍हणून म्‍हणणार ? पण त्‍या हस्‍ताक्षरात आणि त्‍यांच्‍या हस्‍ताक्षरात असलेले साम्‍य त्‍यांना चकित करुन गेले. ते पोस्‍टकार्ड ते शेकोटीत टाकणार तेवढ्‍यात त्‍यांनी विचार बदलला. ‘‘कोणाला तरी दाखवावे ते पत्र’’ ते मनाशी म्‍हणाले.

संध्याकाळी पेल्यात मद्य ओतता ओतता त्यांचा मित्र ते पत्र पाहिल्यावर म्हणाला,
‘‘मित्रा, एवढी काही काळजी करु नकोस. सगळे स्पष्ट आहे. या स्त्रीला वेड लागलंय. लिहिणारी ‘लिहिणारीच’ आहे याची मला खात्री आहे. मला वाटतं तुझे लेखन वाचून ती तुझ्या प्रेमात पडलेली दिसते ! आणि तुला गटविण्याचा तिचा प्रयत्न चाललेला दिसतोय. लक्ष देऊ नकोस. आज काल काय आहे, पेपरात ज्यांची नावे झळकतात त्यांना अशा वेड्या लोकांची पत्रे येतात. जर तुला त्या पत्रांचा त्रास होत असेल तर उत्तर सोपे आहे. न वाचता ती जाळून टाक ! मी तर म्हणतो हे लोक थोडेसे मनोरुग्णही असतात. काय सांगावे ?’’

ते ऐकून काळ्यांना क्षणभर धीर आला. एक स्त्री ! सशाच्या काळजाची. ‘‘तिला माझे लेखन आवडते. त्याचा एवढा त्रास काय करुन घ्यायचा ? खरं तर हा मामला थोडासा गोड आहे आणि गुदगुल्या करणारा आहे.’’ हा विचार त्यांच्या मनात आला आणि ते तिचा विचार करु लागले. दिसायला कशी असेल ती ? असेल थोडी हेकट. त्याने काय फरक पडतो ? पण त्यांच्या अंतर्मनात त्यांचा मेंदू अजुनही तर्क लढवत होता. ‘‘समजा ही बाई मनोरुग्ण आहे आणि तुच तुला पत्रं लिहित आहेस तर मग तू स्वत: मनोरुग्ण आहेस असे सिद्ध होत नाही का ?’’

त्यांनी तो विचार मनातून झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. ते पत्र त्यांनी नष्ट करायचे ठरवले पण त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर त्यांना ते जपून ठेवावे असेही वाटत होते. ते पत्र म्हणजे त्यांचाच एक भाग आहे असे त्यांना वाटत होते. शेवटी त्या विचाराला शरण जात त्यांनी ते भयंकर पत्र भिंतीवरच्या घड्याळामागे लपवले. त्यांना आता ते दिसत नव्हते पण ते तेथे आहे हे त्यांना माहीत होते.

ते पत्र आता डोळ्यासमोर नाही या कल्पनेने त्यांना बरं वाटलं खरं पण ही पोस्टकार्डे आता त्यांच्या जीवनाची महत्वाची अंग बनली आहेत हे त्यांना मनोमन मान्य करावेच लागले. त्या पोस्टकार्डांनी त्यांच्या मनात एक वेगळा कप्पा तयार केला होता आणि दुर्दैवाने तो कप्पा उघडल्यावर त्यांना त्रासच होत असे. आता तर त्यांचे अस्तित्व आणि पुढच्या पत्राची वाट पहाणे हे एकमेकात असे गुंतत चालले होते की बस्सऽऽ…

हे सगळे कळत असताना सुद्धा पुढच्या पोस्टकार्डाने ते उडालेच. त्यांना त्यावरील चित्र पाहवेना.
‘’आपली प्रकृती ठीक असेल अशी आशा आहे. हे गुलिस्तानवरुन आलेले पोस्टकार्ड आपल्याला आवडेल अशी खात्री आहे.’’ ते वाचत राहिले. तुम्हाला कोणी कधी येथे पाठवले आहे का? मला पाठवले गेलंय. खरंतर तुम्हीच पाठवलय ना मला ! गुलिस्तानचा अनुभव मुळीच चांगला नव्हता. मी आता जवळ जवळ येत आहे आणि मला खात्री आहे एक दिवस आपली भेट होईल आणि आपण एकमेकांना नीट समजून घेऊ. मी तुम्हाला तुमच्या कादंबरीतील पात्रांना नीट समजून उमजून घ्या असा सल्ला दिला होता. आठवते आठवतंय ना ? माझ्यामुळे तुम्हाला काही नवीन विषय सुचला का ? असल्यास तुम्ही माझे आभार मानायला हवेत. शेवटी कुठल्याही लेखकाला तेच हवं असतं असं म्हणातात. मी तुमच्या जुन्या कादंबर्‍या परत वाचयला घेतल्‍या आहेत.. परत एकदा सप्रेम नमस्‍कार ! – मा. का.’’

काळ्यांच्या शरीरावर अचानक काटा उभा राहिला. त्यांच्या लक्षात आत्तापर्यंत हे कसे आले नाही ? ज्या ठिकाणाहून ती पत्रे आली होती ती ठकाणे आता त्यांच्या जवळ जवळ येत चालली होती.‘‘ मी आता जवळ जवळ येत आहे’’ हे वाक्य त्यांच्या नजरेतून कसे काय निसटले. त्यांच्या मनाने त्यांच्या नकळत डोळ्यावर कातडे ओढले होते की काय ? पण डोळे मिटले म्हणून जे आहे ते नष्ट पावते की काय? पण त्यांनी ठरवले असते तर डोळ्यावर कातडे ते केव्हाही ओढू शकले असते. कटकटच गेली असती पण तसे काहीच न करता त्यांनी जवळच पडलेला एक नकाशा समोर ओढला. (लेखकांना नकाशा नेहमीच हाताशी लागतो) त्यांनी मा.का.च्या प्रवास कसा चालला आहे ते पाहिले. ज्या गावांवरुन मा.का.ने पत्र टाकले होते त्यात अंदाजे ८० मैल अंतर होते. काळे श्रीनगरला रहात होते. तेथून साधारणत: ८० मैल.

‘‘एखाद्या मानसोपचारतज्ञाला स्वत:ला दाखवावे का ? पण ते तरी काय सांगणार ?’’ काळ्यांना पाहिजे होते की मा.का. धोकादायक आहे का? पण ते त्यांना माहीत असण्याचे काही कारण नव्हते. ‘‘पोलिसांकडे जावे का? त्यांना असल्या प्रकरणाचा चांगला अनुभव असतो. हे सगळे ऐकून ते त्यांना हसले तर बरंच झालं. कादंबरीत असेच असते. पण ते हसले नाहीत. ते म्हणाले,

‘‘हे सगळे थोतांड आहे. हा ‘‘मा.का’’ का कोण आहे ते कधीच प्रत्यक्षात अवतरणार नाहीत. तुम्हाला कोणी शत्रू वगैरे ? कोणाशी भांडण ?’’

‘‘नाही तसे काहीच नाही. म्हणजे मला तरी आठवत नाही.’’ पोलिसांनाही ती पत्रं कोणीतरी स्त्रीच लिहिते आहे असा संशय आला.

‘‘चिंता करु नका आणि परत पत्र आले तर आम्हाला कळवा.’’ पोलिस म्हणाले.

( चिंता करायची नसेल तर कशाला यांना कळवायचे?) असा विचार काळ्यांच्या मनात आला खरा पण पोलिसांना भेटल्यावर त्यांना बराच धीर आला. ते निवांत झाले आणि घरी आले. पोलिसांशी बोलल्यावर त्यांचा आत्मविश्र्वास बराच वाढला होता. त्यांना कोणीही शत्रू नाही आणि त्यांचे कोणाशीही भांडण झालेले नाही हे त्यांनी पोलिसांना सांगितलेले खरंच होते. काळ्यांना टोकाची मते व भावभावना नव्हत्या. ते सगळे त्यांनी त्यांच्या कादंबरीतील पात्रांसाठी राखून ठेवले होते. पूर्वी काही कादंबरीत तर त्यांनी द्वेष वाटावा अशी पात्रे रेखाटली होती. पण त्‍यांच्‍या हल्ली हल्ली लिहिलेल्या कादंबर्‍यात तसली पात्रे अपवादानेच आढळतील. हल्ली टोकाची वाईट स्त्री किंवा पुरुष कादंबरीत रेखाटण्याचे त्यांनी जवळजवळ थांबवले होते. तसे करणे म्हणजे नैतिक दृष्ट्या बेजबाबदारपणाचे आहे असे आजकाल त्यांना वाटे. शिवाय त्यात विशेष काही कलात्मकता नाही असे आजकाल त्यांना वाटत असे. प्रत्येकात काहीतरी चांगला गुण असतोच. ऑथेल्लोमधील लागोस हे एक मिथक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. पण आताशा त्यांना जर एखादे निष्ठूर, बदमाश, स्वार्थी, लबाड, सॅडीस्ट पात्र रंगवायचे असेल तर त्याला ते सरळ नाझी किंवा कम्युनिस्ट करुन टाकत. थोडक्यात ज्यांनी माणसांच्या सद्‌गुणांचा जाणीवपूर्व त्याग केला आहे अशी माणसे त्यांना फक्त या दोन जमातीत सापडत. अर्थात या पोस्टकार्डाच्या भानगडीत त्यांनी बरेच दिवस काही ठोस असे लिहिले नव्हते म्हणा. पण पूर्वी जेव्हा ते तरुण होते, जेव्हा ते वास्तव मांडत असत तेव्हा एक दोनदा त्यांनी अशी क्रूर पात्रे रंगविली होती. म्हणजे त्यांना नाझी किंवा कम्युनिस्ट न करता. त्यांना त्यांची जूनी पुस्तके फारशी नीट आठवत नसत पण ‘‘वाळीत’’ या विद्रोही कादंबरीत त्यांनी एका पात्राला रंगविताना त्यांची लेखणी अगदी खुनशीपणे चालवली होती. त्याचा पराकोटीचा खुनशीपणा त्यांनी इतका मस्त रंगवला होता की जणू काही ते पात्र जिवंतच होते. आणि गंमत म्‍हणजे ते पात्र रंगविताना ते अगदी खूष होऊन जायचे. त्या माणसाला त्यांनी जगात असतील नसतील तेवढे दुर्गूण चिकटवले होते. त्याला बिचार्‍याला त्‍यांनी थोडाही चांगूलपणा दाखविण्‍यास वावच ठेवला नव्‍हता. त्या पात्राला त्यांची कणभरही सहानुभूती मिळाले नव्हती. अगदी तो फासावर लटकेपर्यंत आणि बिचार्‍याला त्‍यानंतरही लेखकमहाशयांची सहानुभूती मिळाली नव्‍हती. त्‍यांनी या पात्राचा ओसांडून जाणारा दुष्टपणा असा रंगवला होता की काही वेळा ते स्वत:ही त्याचा दुष्टपणा पाहून दचकले होते.

गंमत म्हणजे त्यांना त्या पात्राचे नाव बराच प्रयत्न करुनही आठवत नव्हते. त्यांनी बेफिकीरपणे खांदे उडवले पण पुढच्याच क्षणी ते त्यांच्या पुस्तकाच्या कपाटाकडे वळले. ते पुस्तक काढून त्यांनी त्याची काही पाने उलटली – आत्ताही त्याचा विचार करताना त्यांना बेचैन वाटत होते. स्वत:शी पुटपुटत त्यांनी अजून काही पाने उलटली, ‘‘ हां… इथे आहे… मार्तंड कारखानीस…
‘‘मा.का.’’

या योगायोगाची त्यांना मजा वाटली. थोडेसे चेष्टेवारीच नेला तो त्यांनी. पण त्यांनी त्या पोस्टकार्डाला जो आतून विरोध चालवला होता तो थोडासा लुळा पडला हे मात्र खरं. ते इतके बेचैन झाले, इतके बेचैन झाले की जेव्हा पुढचे पोस्टकार्ड आले तेव्हा त्यांनी चक्क सुटकेचा नि:श्र्वास टाकला…
त्यांनी वाचण्यास सुरुवात केली,

‘‘मी आता खूपच जवळ आहे.’’ हे त्यांनी वाचले आणि अजाणतेपणे कुठले चित्र आहे हे पाहण्यासाठी पोस्टकार्ड उलटे केले. एका देवळाच्या शिखराचे छायाचित्र ! ते चित्र काहीतरी सांगेल म्हणून त्यांनी त्याकडे बराच वेळ एकटक नजत लावली आणि मग उरलेला मजकूर वाचला,

‘‘तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या हालचालींवर माझा ताबा नाही. पण सगळे ठीक झाल्यास बहुधा या आठवड्याच्या शेवटी आपली भेट होईल. तेव्हाच आपण एकमेकांचा परिचय करुन घेऊ. आता तुम्ही मला कसं ओळखणार हा एक प्रश्र्नच आहे म्हणा. अर्थात ही काही आपली शेवटची भेट नसणार याची मला खात्री आहे. आज माझा हात जरा थरथरतो आहे पण त्या थरथरत्या हातानेच तुम्हाला सप्रेम नमस्कार ! नेहमीप्रमाणेच आपला, – मा.का.’’ ता.क. : या देवळावरुन तुम्हाला कशाची आठवण येते आहे का ? मंदीरासमोरच्या पोलिस ठाण्यातील पोलीस कोठडी ?’’

काळ्यांनी ते पत्र घेतले आणि सरळ पोलिसस्टेशन गाठले व त्यांना

‘‘मला पोलिस संरक्षण मिळेल का ?’’ विचारले.
ठाण्याच्या अंमलदाराने त्यांच्याकडे पहात अर्थपूर्ण स्मितहास्य केले आणि म्हणाला,

‘‘आहो ही सगळे बनवेगिरी आहे.’’ पण त्यांच्या घरावर कोणालातरी लक्ष ठेवण्यासाठी तैनात करणे त्याला सहज शक्य होते.

‘‘पण मला सांगा काळेसाहेब, तुम्हाला खरंच हे कोण लिहिते आहे याची पुसटची सुद्धा कल्पना नाही? पहा बरं जरा आठवून.’’ यावर काहीही न बोलता काळ्यांनी थकल्यासारखी नकारार्थी मान हलविली.

आत्ताशी मंगळवार आला होता. काळ्यांच्या हातात शनिवार/रविवारबद्दल विचार करण्यासाठी बराच वेळ होता. पहिल्यांदा त्यांना हा काळ कसा जाणार याची मोठी चिंता वाटली पण आश्चर्य म्हणजे नंतर त्यांचा आत्मविश्र्वास कमी होण्याऐवजी कारण नसताना वाढला. आता आपण काम करु शकतो या कल्पनेनेच ते कामाला बसले आणि त्यांना ते लिहू शकतात हे उमगले. चक्क ! लिहू शकत होते ते. पूर्वीपेक्षा खूपच वेगळे ! जणू काही त्यांच्या मनात दाटलेल्या निराशेच्या सुर्‍याने त्‍यांच्‍या विचारांचे मळभ टराटरा फाडले आहे. त्‍या दाटलेल्‍या मळभात आत कोंडलेल्‍या भावना आता मोकळ्‍या झाल्‍या आणि कागदावर उतरु लागल्‍या. पात्रे आता त्‍यांचे ऐकू लागली आणि त्‍यांच्‍या अज्ञा पाळू लागली. शुक्रवारची पहाट नेहमीसारखी उजाडली. काळे खिडकीबाहेर कुठेतरी शुन्यात नजर लाऊन बसले होते. तेवढ्यात त्यांना एका विचाराने खडबडून जागे केले ‘‘ विकएन्ड केव्हा सुरु होतो?

‘‘शुक्रवारी’’

त्यांनी स्वत:ला उत्तर दिले आणि त्यांची परत घाबरगुंडी उडाली. त्यांनी बाहेर जाऊन रस्त्यावर नजर टाकली. गावाबहेरचा हा रस्ता निवांत होता. त्या रस्त्यावर त्यांच्या बंगल्यासारखेच मोजकेच बंगले होते. काही बंगल्यांच्या फाटकाला सुशोभित खांब होते आणि काहींवर वेल चढविलेल्या कमानी. काही खांबांवर असलेले दिवे कधी पेटले असतील नसतील.. रस्त्यावरुन एक गाडी खाली गेली आणि त्यानंतर काही लोकांनी रस्ता पार केला… सगळे कसे नेहमीप्रमाणे चालले होते.

त्या दिवशी त्यांनी किती वेळा रस्त्यावर नजर टाकली असेल त्याची गणतीच नाही. पण वेगळे असे काही रस्त्यावर घडले नाही. शनिवार आला आणि पोस्टकार्ड आले नाही त्यामुळे त्यांच्या मनातील भिती पुष्कळच कमी झाली. ‘‘पोलिस चौकीला फोन करुन आता सगळं ठीक आहे हे सांगायला पाहिजे ! कोणाला पाठविण्याची गरज नाही.’’ ते मनात म्हणाले.

पोलिसांनी मात्र दिलेला शब्द पाळला. दुपारच्या चहाच्या आणि संध्याकाळच्या जेवणादरम्यान काळे दरवाजात गेले तेव्हा फाटकाच्या दोन खांबांच्या शेजारी त्यांना एक पोलिस दिसला. बहुधा त्या रस्त्यावर त्यांनी पाहिलेला पहिला पोलिस असावा तो. त्याला पाहिल्यावर त्यांचे मन शांत झाले पण त्यामुळे ते किती घाबरले होते याचीही त्यांना जाणीव झाली. त्यांना स्वत:चीच शरम वाटली. पोलिसांना उगाचच त्रास ! ‘‘त्याला जाऊन भेटावे का ? चहाचे तरी विचारले पाहिजे. माझी हकिकत ऐकून बिचार्‍याची दोन घटका करमणूक तरी होईल.’’ पण ते गेले नाहीत. त्‍यांना वाटले, सुरक्षा रक्षक जर अनोळखी असेल तर जरा जास्‍त सुरक्षित वाटते. समजा त्‍याचे नाव भट्ट असेल तर भट्ट पहारा देतोय यापेक्षा एक पोलिस पहारा देतोय हे कसे ऐकायला बरं वाटते.

खिडकीतून त्‍यांनी तो जागेवर असल्‍याची अनेक वेळा खात्री केली. शिवाय खात्री करण्यासाठी त्यांनी मोलकरणीला तो अजून जागेवर आहे का नाही हे पाहण्यास बाहेर पाठवले. पण ती म्हणाली की तिला काही तसा पोलिस काही दिसला नाही पण आजकाल तिची दृष्टी जरा अधू झाली आहे. मग मात्र त्यांनी परत एकदा दरवाजा उघडला. तो तेथे जागेवरच होता. कदाचित ती गेली तेव्हा तो फेरफटका मारण्यास जवळच कुठेतरी गेला असेल.

खरं तर ते रात्री कधीच लेखणी उचलत नसत. पण त्या रात्री ते स्वत:ला रोखू शकले नाहीत. शब्द कसे त्यांच्या लेखणीतून कागदावर पटापट निसटत होते. आता थोड्याशा झोपेसाठी प्रतिभेला रोखणे हा कपाळकरंटेपणाच झाला असता. ते म्हणतात ते बरोबरच आहे. झोपण्याआधी लिहिणे हे सर्वोत्तम. मोलकरीण जेव्हा ‘जाते’ असे सांगण्यास आली तेव्हा त्यांनी तिच्याकडे नजर वर करुन पाहिलेही नाही इतके ते लिहिण्यात गर्क झाले होते.
त्‍या निस्‍तब्‍धतेत ती खोली बुडून गेली. त्‍यांना बेल वाजती आहे हेही ऐकू आले नाही.

‘‘ आत्‍ता या वेळी ?’’ ते चमकले.

थरथरत्‍या पायाने ते दरवाजापाशी गेले. समोर काय वाढून ठेवलेले आहे या कल्‍पनेनेच त्‍यांचा थरकाप उडाला. पण दरवाजात त्‍या पोलिसाला पाहून त्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. तो काही बोलणार तेवढ्‍यात काळे म्‍हणाले,

‘‘या ! या! आत या.’’ त्‍यांनी हात पुढे केला पण त्‍या पोलिसाने तो हातात घेतला नाही. बाहेर फार थंडी आहे. गारठला असाल तुम्‍ही. बाहेर बर्फ पडतोय याचे मला कल्‍पना नव्‍हती.’’ त्‍याच्‍या कोटावरील बर्फाचे कण पहात काळे म्‍हणाले. ‘‘आत या आणि जरा हात शेका या शेकोटीवर.’’

‘‘ धन्‍यवाद ! मी ते करणारच होतो !’’
पोलिसांच्‍या बोलण्‍याची किंचित उद्धट पद्धत काळ्‍यांना परिचयाची होती. ती त्‍यांनी त्‍यांच्‍या दोनचार कादंबर्‍यात वापरलेली होती.

‘‘असे या ! मी आतल्‍या खोलीत जरा लिहित होतो. काय भयंकर थंडी पडली आहे नाही ? थांबा ! शेकोटीत अजून लाकडे टाकतो. तुम्‍ही तो कोट काढून जरा आरामात बसा. आपलेच घर समजा !’’

‘‘ मी काही जास्‍त वेळ थांबू शकणार नाही. मला एक काम पार पाडायचे आहे ! तुम्‍हाला माहीतच असेल !’’

‘‘ हो ! हो ! माहिती आहे ना ! अहो ते कसले काम तुमच्‍या सारख्‍याला ? म्‍हणजे तसे फालतूच काम म्‍हणायचे ते !’’ ते क्षणभर त्‍याचा गैरसमज तर झाला नाही ना हे पाहण्‍यासाठी बोलायचे थांबले. ‘‘ ते पोस्‍टकार्डाचेच ना ?’’
त्‍या पोलिसाने न बोलता नुसतीच मान हलवली.

‘‘पण तुम्‍ही येथे असताना मला कसली भिती ? मी अगदी एखाद्‍या तुरुंगात असल्‍यासारखा सुरक्षित आहे. तुम्‍हाला पाहिजे तितका वेळ बसा. थोडेसे मद्य ?’’

‘‘ मी ड्युटीवर असताना हे असले काही करत नाही.’’ खोलीवर नजर फिरवत तो म्हणाला, ‘‘ हंऽऽ म्हणजे तुम्ही येथे लिहिता तर !’’

‘‘ हो ! तुम्ही बेल वाजवलीत तेव्हा मी लिहितच होतो.’’

‘‘ आजही कोणाची तरी वासलात लागलेली दिसते !’’
त्याच्या कडवट स्वराने काळे चमकले. पण ते खरे हादरले त्याच्या डोळ्यातील कठोर भाव बघून !

‘‘ का ?’’ त्यांनी विचारायचे म्हणून विचारले.

‘‘दोन मिनिटात कळेलच तुम्हाला…’’ असे तो म्हणतोय तेवढ्यात फोनची रिंग वाजली.

‘‘ एक मिनिट हं मी आलोच !’’ काळे म्हणाले आणि खोलीबाहेर फोन घेण्यासाठी धावले.

‘‘ मी पोलिस चौकीतून हवालदार खान बोलतोय. कालेसाब आहेत का ?’’

‘‘ हो बोला !’’

‘‘ कमिशनर साहेबांनी नमस्कार सांगितलाय तुम्हाला ! सगळे ठीक आहे ना ? तुमची माफी मागण्यासाठी फोन केलाय ! मी तुमच्या बंगल्यावर एक पोलिस पाठविण्याचे कबूल केले होते पण कामाच्या गडबडीत विसरुन गेलो. कृपया साहेब भेटतील तेव्हा त्यांना हे सांगू नका… माझी बदली होईल.

‘‘पण तुम्ही पाठवलाय ना एक पोलिस !’’ काळे.

‘‘ नाही कालेसाहब आम्ही कोणाला पाठवलेले नाही.’’

‘‘ अरेच्चा ! पण तो येथे आहे ! माझ्या घरातच !’’ क्षणभर फोनवर शांतता पसरली.

‘‘ शक्य नाही. तुम्ही त्याची नेमप्लेट पाहिली आहे का ?’’

‘‘ नाही ’’
बर्‍याच वेळानंतर आवाज आला,

‘‘ मी आत्‍ता पाठवू का तुमच्‍याकडे कोणाला तरी? नको ! पाठवतोच !’’

‘‘पाठवा! पाठवा !’’ काळे घाईघाईने म्‍हणाले.

‘‘ दोन तीन मिनिटात पोहोचेल कोणीतरी !’’

काळ्‍यांनी फोन खाली ठेवला. आता काय करायंच ! त्‍यांनी स्‍वत:लाच प्रश्र्न केला. खोलीचे दार लाऊन घ्यावे का ? का घराबाहेर धूम ठोकावी ? का आरडाओरडा करावा ? नकली पोलिसाची कल्पना त्यांना भयावह वाटली. ’’खरा पोलिस केव्हा येणार कोण जाणे !’’ तो दोन तीन मिनिटात कोणीतरी येईल म्हणाला खरा पण पोलिसांची दोन तीन मिनिट म्हणजे… ते हा विचार करत असतानाच दार उघडले आणि त्यांचा पाहूणा आत आला.

‘‘पाहुणा एकदा घरात आला की खाजगी असं काही रहात नाही ! मला वाटतं ही म्हण तुम्हाला माहीत असावी ! मी पोलिस होतो हे तुम्ही विसरला की काय ?’’

‘‘होता म्हणजे ? तुम्ही अजूनही पोलिसच आहात माझ्या दृष्टीने.’’

‘‘हं ऽऽ तसा मी बरेच काही होतो म्हणा माझ्या पूर्वायुष्यात. उदा. एक चोर, अट्टल बदमाश, लोकांना लुबाडणारा आणि शिवाय खूनी… तुम्हाला माहितीच आहे की.

तो पोलिस हळूहळू त्यांच्याकडे सरकत होता आणि छोटे अंतर म्हणजे काय याचा काळ्यांना अचानक साक्षात्कार झाला. टेबलाची रुंदी, त्याच्या पलिकडे काही इंचावर खुर्ची, त्याच्या पलिकडे तो…

‘‘तुम्ही काय म्हणत आहत ते मला समजत नाही. असं काय बोलताय तुम्ही ? मी तर तुम्हाला कधी इजा केलेली नाही. मी तर तुम्हाला आज प्रथमच पहातोय!’’

‘‘काय म्हणताय ? प्रथमच ? पण तुम्ही माझ्याबद्दल सतत विचार करत होतात.’’ त्याचा आवाज चढला.

‘‘विचार करुन करुन तुम्ही माझ्याबद्दल लिहिलंय. आठवतंय की नाही? माझी टर उडवत होता नाही का तुम्ही ? आता माही जरा तुमची फिरकी घ्यावी म्हणतो. तुम्ही
मला जेवढे करता येईल तेवढे क्रूर केलेत. मग त्याने मला इजा झाली नाही असे तुम्ही कसं म्हणू शकता ? मला जे दुर्गूण तुम्ही चिकटवलेत त्याने मला किती वाईट वाटले असेल याची तुम्ही कधी पर्वाच केली नाहीत. तुम्ही स्वत:ला माझ्या जागी उभे करुन कधी पाहिलेच नाही ! पाहिलेत का ? माझ्याबद्दल तुमच्या मनात थोडीही सहानुभूती नव्हती. मला सांगा फक्त दुर्गूण असलेली माणसे या जगात आहेत का ? अर्थात तुम्ही जन्माला घतलेली सोडून ! मीही आता तुम्हाला कसली सहानुभूती दाखविण्याच्या मस्थितीत नाही हे लक्षात घ्या. !’’

‘‘पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला साधे ओळखतही नाही !’’

‘‘हंऽऽ आता सगळं झाल्यावर म्हणताय की तुम्ही मला ओळखत नाही. माझ्यावर सतत अन्याय केलात आणि नंतर मला विसरलात. मी ‘‘मार्तंड कारखानीस!’’

‘‘मार्तंड कारखानीस !’’

‘‘हो ! तुम्ही माझा किती वेळा बळीचा बकरा बमनवला असेल तुम्हालाच माहीत. तुम्हाला न आवडणार्‍या सर्व गोष्‍टी तुम्‍ही माझ्‍यात कोंबल्‍यात. तुम्‍हाला माझ्‍याबद्‍दल लिहिताना किती विकृत आनंद होत असेल याची तुम्‍हाला नसेल पण मला आहे. तुम्‍हाला वाटत असेल ‘या गलिच्‍छ माणसाबद्दल लिहितोय म्‍हणजे मी किती पराक्रम करतोय, मी किती सद्‌गुणी आहे. आता एका मा.का ने त्‍याचे व्‍यक्‍तिमत्‍व रंगवले आहे तसे वागायचे ठरवले तर दुसर्‍या मा.काचे काय होईल बरे?’’

‘‘काय होईल…’’ काळे पुटपुटले.

‘‘माहीत नाही ?’’ मार्तंड फिस्‍कारला.‘‘ तुम्‍हाला तर माहीत असायला पाहिजे लेखक महाशय. तुम्‍ही तर माझे जन्‍मदाते आहात. ज्‍या मुलावर वडिलांनी अन्‍यायच केला आहे, ज्‍याच्‍यावर कधीच प्रेम केले नाही, सदान कदा त्याची बदनामीच केली, ज्याच्या आयुष्याचे वाटोळे केले असा मुलगा त्याच्या वडिलांना अनेक वर्षांनंतर जर एकांतात भेटला तर काय होईल?…’’

काळे हताशपणे त्याच्याकडे एकटक पहात राहिले.

‘‘तुम्हालाही ते माहीत आहे आणि मलाही चांगले माहीत आहे. ’’ पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा बदलला आणि तो ओरडला, ‘‘नाही ! नाही ! तुम्हाला ते कळणे शक्यच नाही. कारण तुम्ही मला कधी समजून घेतलेच नाही. मला तुम्ही आतून बाहेरुन काळेच रंगविले आहे.नेहमीच. तुम्ही रंगवलाय तेवढा दुष्ट, वाईट मी कधीच नव्हतो.’’ तो बोलायचा थांबला. काळ्यांच्या काळजातील धडधड वाढली. ‘‘ तुम्ही मला कधी सुधरण्याची संधीच दिली नाहीत. पण मी तुम्हाला एक शेवटची संधी देणार आहे..या वरुनच कळतंय की तुम्हाला मी कधी समजलोच नाही.’’

काळ्यांनी मान हलवली.

‘‘आणि अजून एक गोष्ट तुम्ही विसरलात !’’

‘‘ती कोणती?’’ काळ्यांनी धडपडत विचारले.

‘‘मीही एकदा लहान मुलगा होतो.’’

काळे काहीच म्हणाले नाहीत.

‘‘चला ऽऽ म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे तर ! पण मग मला सांगा तुम्ही मला एकतरी चांगला गुण दिलाय का ? कधी माझ्याबद्दल प्रेमाने विचार तरी केलात का ?’’

‘‘तुम्ही माझ्याबद्दल एक जरी चांगली गोष्ट लिहिलेली मला सांगितलीत तर मी तुम्हाला सोडून देईन.’’

‘‘आणि नाही सांगू शकलो तर ?’’ काळ्यानी कापत्या स्वरात विचारले.

‘‘मग ते तुमच्यासाठी वाईट असेल. मग मला तुमचा समाचार घ्यावा लागेल. त्याचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही माझा एक हात कापलाय पण माझा दुसरा हात अजून शाबूत आहे. ‘मार्तंडचा लोखंडी पंजा ’ असं काहीतरी तुम्ही लिहिलं होतं ना ?’’

काळ्यांनी धापा टाकण्यास सुरुवात केली.

‘‘मी तुम्हाला दोन मिनिटे वेळ देतो. त्यात काय आठवायचे आहे ते आठवा.’’ त्या दोघांनीही एकाच वेळी घड्याळावर नजर फेकली. घड्याळाच्या काट्याच्या हालचालीने काळ्यांच्या मनातील विचार लुळे पडले. त्यांनी हताशपणे मार्तंडच्या चेहर्‍याकडे पाहिले. एवढा क्रूर, निर्दयी, भावनाशून्य चेहरा त्यांनी आजवर पाहिला नव्हता. नेहमी हा चेहरा अंधारात दडलेला असायचा जणू प्रकाश त्याला स्पर्षच करू शकत नसे. त्यांनी असहाय्यपणे तशी एखादी गोष्ट आठवण्याची केविलवाणी धडपड केली. अशी एक आठवण त्यांचा प्राण वाचवू शकली असती. पण याच वेळी त्यांच्या स्मरणशक्तीने त्यांना दगा दिला.‘‘ मला काहीतरी आठवण रचली पाहिजे’’ ते मनात म्हणाले. हा विचार मनात आल्या आल्या त्यांच्या मनाच्या पडद्यावर एक चित्र चमकून गेले. त्यांच्या एका पुस्तकाचे शेवटचे पान होते ते. नंतर त्या पुस्तकातील सगळी पाने उलटीकडून त्यांच्या समोर उलगडत गेली. एखाद्या जादुगाराप्रमाणे त्यांना ती सगळी पाने वाचता येत होती. त्यांनी जंग जंग पछाडले पण त्यांना हवे होते ते काही त्यात सापडले नाही. त्या सगळ्या अवगुणांच्या मांदियाळीत चांगल्याचा एक अंशही त्यांना दिसला नाही. पण त्यांना याची कबूली देणे गरजेचे वाटले कारण नाहीतर चांगल्याच्या अस्तित्वाला काही अर्थच उरला नसता. त्या विचाराने त्यांना एकदम मोकळे वाटले.

‘‘तुझ्याबद्दल काही सांगण्यासारखे नाही’’ काळे एकदम त्याच्या अंगावर ओरडले.

‘‘तुला चांगलंच माहिती आहे. तुझ्या पापांवर पांघरुण घालावे असे तुझे म्हणणे आहे. तु रचलेल्या कट कारस्थानापैकी हा अत्यंत गलिच्छ कट आहे असेच मी म्हणेन. अरे तुझ्या कोटावरचा बर्फही तुझ्या काळ्या कर्तृत्वाने काळा पडलाय ! तुला सभ्य व्यक्तिमत्व मागायचे धाडस तरी कसे झाले? तुला एक व्यक्तिमत्व मी दिलंय तेच ठीक आहे. देव करो आणि मला तशी बुद्धी न होवो. तसले काही करण्यापेक्षा मी मरण पत्करेन.’’

मा.का. चा एक हात त्‍वेषाने हवेत गेला, ‘‘तुम्ही नावाप्रमाणे आतून बाहेरुन काळेच आहात. मग मरा !’’ तो म्‍हणाला.

पोलिस जेव्‍हा त्‍या घरात शिरले तेव्‍हा सुप्रसिद्ध लेखक माधवराव काळे जेवणाच्या टेबलावर डोके टेकून पडलेले दिसले.
त्यांच्या शरीरात अजून उब होती पण त्यांचा मृत्यु झाला होता. मृत्युचे कारण समजायला अगदीच सोपे होते. कोणीतरी त्यांचा गळा आवळला होता. त्यांच्या खुन्याचा पत्ता नव्हता. टेबलावर आणि सुप्रसिद्ध लेखक मा.का यांच्या कोटावर बर्फाचे काही कण सापडले. पण ते तेथे कसे आले हे हे एक न उलगडलेले रहस्य आहे कारण त्या खोर्‍यात गेले कित्‍येक दिवसात बर्फ पडले नव्‍हते..

लेखक : एल पी. हार्टले.
स्‍वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

1 Response to ‘‘मा. का.’’

  1. उत्कंठावर्धक आणि सुरेख मांडणी..👍

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s