वॉल्डन
….अनुभवाने माझी दृष्टी आत तीक्ष्ण झाली आहे आणि मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही हलाखीचे जीणं जगताय. कर्जे न फेडता आल्यामुळे तुम्ही जामिनावर बाहेर आहात. काहीतरी उद्योग करून तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचे आहे. कर्ज – एक अतिप्राचीन दलदल ज्यातून मानव बाहेर पडायचा युगानुयुगे प्रयत्न करत आहे. कर्जबाजारी दररोज नवीन दिवसाचा वादा करतात. रोज दिवाळखोरीत मरण जगतात. पुढे आजारपणात उपयोगी पडेल म्हणून तुम्ही आजारी पडेपर्यंत कष्ट करून पैसे गोळा करता आणि दिवाळे निघणार्या बँकेत ठेवता. किती पैसे, कुठे ठेवले आहेत हे महत्त्वाचे नाही. सर्वसाधारणपणे सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
मला कधीकधी आश्चर्य वाटतं की आपण दक्षिणेकडे असलेली निग्रोंची गुलामगिरी एवढ्या सहजपणे कशी काय मान्य करतो. आता दक्षिणेकडे गुलामांचे मालक आहेत आणि उत्तरेत ही आहेत. ही मंडळी दक्षिण व उत्तर दोन्ही गुलाम करायला निघाली आहेत. दक्षिणेचा मालक असला तर तेे भयंकर असेल तर आता उत्तरेचा मालक असला तर तेे महाभयंकर आहे असे म्हणावे लागते. पण गुलामीच्या प्रथेला ह्रदयात स्थान देणारे, गुलाम हाकणारे सगळ्यात भयंकर आहेत असे मी म्हणतो. माणसांमधे परमेश्वराचा अंश असतो असे म्हणतात पण एखाद्या हमरस्त्यावर दिवस रात्र गुलामांचा व्यापार करणारे दलाल पहा, त्यांच्यात परमेश्वराचा अंश कसा काय असेल ? घोड्याला चारा घालणे व पाणी घालणे हे तो स्वत:चे सर्वोच्च कर्तव्य समजतो. त्याच्या भवितव्याला तो त्याच्या माल पोहोचविण्याइतकेच महत्त्व देतो. परमेश्वरानेच माणसाला जन्माला घातल्यामुळे माणसात परमेश्वराचे प्रतिबिंब पडते असे प्राचीन ग्रंथ म्हणतात. मग आहे का त्याच्यात परमेश्वराचा अंश ? आहे का तो थोडासा तरी परमेश्वरा सारखा ? पण तो दिवस लपून छपून काढतो. तुम्ही पहाल तो कायम घाबरलेला असतो. तो मरणाला किंवा परमेश्वराला घाबरत नाही तर तो घाबरत असतो त्याचे स्वत:चे स्वत:बद्दल जे मत झाले आहे त्याला. या मतांचा गुलाम असताना त्याच्या कर्माने जी प्रसिद्धी त्याला मिळाली आहे त्याला. पण खरं म्हटलं तर समाजाची आपल्याबद्दल असलेली मते ही आपल्या स्वत:ची स्वत:विषयी असलेल्या मतापेक्षा कमी जहाल असतात. माणसं स्वत:स किती ओळखतात त्यावरून त्याचे नशीब ठरते असे मला वाटते. ज्या प्रमाणे श्री. विलबरफोर्स यांनी इंग्लंडच्या साम्राज्यातून गुलामी हद्दपार केली तसा आपल्या येथे दूरदूरच्या प्रांतात कोण विलबरफोर्स येणार आहे ? शिवाय घरात अखंडपणे घरकाम करणार्या स्त्रियांचाही विचार करावा लागेल. त्या इतक्या अपरिपक्व आहेत की त्यांना त्यांच्या भवितव्याची चिंताही भेडसावत नाही.
आज बहुसंख्य माणसे अगतिक होऊन जगत आहेत. संन्यासी वृत्तीने जगणारी माणसे खरे तर अगतिक असतात हे अनेक वेळा सिद्ध होते आहे. काहीच न जमल्यामुळे संन्यास घेणे ही नित्याचीच बाब झाली. निराशेने ग्रासलेल्या शहरांची वाटचाल निराशेने ग्रासलेल्या देशाकडे चालली आहे. ज्या प्रमाणे मिन्क व मस्क्रॅट प्राणी सापळ्यातून सुटण्यासाठी स्वत:चे पाय कुरतडतात तशीच यांची अवस्था झाली आहे हेच खरे. खेळांच्या आवरणाखाली ही तुम्हाला हीच अगतिकता सापडेल कारण त्यात खेळ उरलेलाच नाही कारण हे खेळही कष्ट केल्यानंतरच खेळले जातात. पण निराशेपासून स्वत:ला दूर ठेवण्यातच शहाणपणा असतो.
वेस्ट मिनिस्टरच्या न्यु इंग्लंड प्रायमरमधे प्रश्नोत्तराच्या स्वरुपात धार्मिक शिक्षण केले जाते. यात एक महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे माणसाच्या जन्माचा अर्थ काय ? त्याचे या इहलोकात काम काय? ( याचे उत्तर अर्थातच परमेश्वराची भक्ती हे आहे) पण या प्रश्नापेक्षा माणसाच्या खर्या गरजा काय आहेत आणि त्या भागविण्याचे खरे मार्ग कुठले आहेत हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. सध्यातरी समाजाने जाणूनबुजून जगण्याची सर्वसामान्य रीत स्वीकारलेली दिसते आहे. ती त्यांना इतर जीवन पद्धतीपेक्षा जवळची वाटते म्हणून असेल कदाचित पण त्यामुळे त्यांना दुसरी कुठली जीवन पद्धती अस्तित्वात नाही असे प्रामाणिकपणे वाटते. पण अजूनही उशीर झालेला नाही. आपले गैरसमज आपण सहज दूर करू शकतो. आत्ता जे आहे ते तसे नव्हते. कितीही प्राचीन असली तरी विचारपद्धतीवर आणि जीवनपद्धतीवर आंधळा विश्वास ठेऊ नये हेच खरं. आज एखाद्या तत्त्वाची चलती असेल तरी ते उद्या ते टिकाव धरेल याची शाश्वती देता येत नाही. त्या तत्त्वांचा धूर झालेला कदाचित तुम्हाला पहावा लागेल किंवा याउलट ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे अशा विचारप्रवाहांचं पाऊस उद्या पडणारच नाही असेही कोणी ठामपणे म्हणू शकत नाही. जुनी जाणती मंडळी तुम्हाला हे जमणार नाही असे ठामपणे म्हणतात आणि तुम्ही ते सहजपणे करून दाखवता. या जुन्या खोडांचे मार्ग वेगळे आणि आजच्या तरुणांचे मार्ग वेगळे. प्राचीन काळी माणसाला अग्नी कसा प्रज्वलित ठेवायचा असा गहन प्रश्न पडत असे तर आता लाकडे इंजिनात सारून माणसे जगभर पक्षांच्या वेगाने प्रवास करतात. याचा अर्थ शब्दश: घ्यायला नको. मी एखादा विचार प्रज्वलित ठेवून पुढे कसा न्यायचा याबद्दल बोलतोय. अनुभव हा चांगल्या मार्गदर्शकाला आवश्यक असणारा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे असे मी मानत नाही कारण त्याच्या भूतकाळात त्याने यशापेक्षा अपयशच जास्त पचविले असण्याची शक्यता जास्त आहे. त्याने एवढे जगून मुलभूत ज्ञान मिळवले असेल का ही शंका मनात येणे अत्यंत रास्त आहे. अगदी खरं सांगायचं तर या म्हातार्यांकडे तरुणांना सल्ला देण्यासारखे काही उरलेले नाही कारण त्यांच्या वेळचे जग वेगळे, संकल्पना वेगळ्या, प्रश्न वेगळे आणि त्याची उत्तरे वेगळी. शिवाय आपण ते अनुभवी आहेत, अनुभवी आहेत, असे म्हणतो त्या बाबतीत बोलायचे झाले तर तो अनुभव अत्यंत वैयक्तिक असतो. त्याचा कितपत उपयोग आजच्या तरुणांना होईल याची मला शंकाच आहे. या ग्रहावर मला येऊन तीस वर्षं झाली पण चांगल्या सल्ल्यातील मला साधा ‘स‘ ही ऐकू आलेला नाही. ज्याचा उपयोग होईल असे त्यांनी मला काही सांगितलेले नाही कारण बहुधा त्यांना ते शक्यही नसावे. माझ्या आयुष्यात मी जी वाटचाल केली त्यात मी ठेचकाळलो असेन, मी नाही म्हणत नाही पण ज्यांनी हे आयुष्य उपभोगले आहे त्यांचा मला काही फायदा झाला आहे असे मला तरी वाटत नाही. हं.. एक मात्र खरं की मला जरा कुठला आगळा वेगळा अनुभव आला असेल तर माझ्या मार्गदर्शकांनी त्या प्रकारच्या अनुभवाबद्दल काही सांगितलेले मला तरी आठवत नाही….
क्रमशः….
वॉलडन : हेन्री डेव्हिड थोरो.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.