अर्थशास्त्र.
मी जेव्हा हे सगळे लिहिले, म्हणजे जवळजवळ सगळे, तेव्हा मी एका जंगलात राहात होतो. माझ्या घरापासून सगळ्यात जवळचे घर एक मैल अंतरावर होते व मी ज्या घरात राहात होतो ते मी स्वत:, माझ्या हाताने उभे केले होते. हेे घर मी बांधले होती मॅसाचुसेट्स प्रांतातील कॉनकॉर्ड येथे वॉल्डन नावाच्या तळ्याकाठी आणि महत्वाचे म्हणजे मी माझ्या दोन हाताने कष्ट करून माझी उपजिविका करत होतो. त्या घरात मी दोन वर्षे आणि दोन महिने राहिलो. सध्या मी माणसात परत आलो आहे.
तुम्हाला कंटाळा येईल म्हणून मी हे सगळे लिहिणार नव्हतो पण मी परत आल्यावर माझ्या शेजार्यापाजार्यांनी मला इतके प्रश्न विचारले की बस्स. ते प्रश्न कदाचित तुम्हालाही पडतील म्हणून मी हे लिहितोय. मला विचारले गेलेले प्रश्न माझ्या काही मित्रांना उद्धट वाटले किंवा काही तर अनावश्यकही वाटले पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला तसे काहीही वाटले नाही. उलट मी वेड्यासारखा जंगलात एकटा जाऊन राहिलो हे पाहता त्यांनी मला अत्यंत रास्त प्रश्न विचारले असेच मी म्हणेन. काहींनी मला विचारले की मी काय खात होतो, तुम्हाला एकटे एकटे, उदासवाणे वाटले नाही का ? भीती वाटली नाही का ? असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. मी असा उठून दुसरीकडे जाऊन राहू शकतो यावरून काहींचा मी श्रीमंत असल्याचा समज झाला. त्यांनी लगेचच मी माझ्या उत्पन्नातील किती टक्के समाजकार्यासाठी राखून ठेवले आहे याची चौकशी केली. ज्यांची कुटुंबे मोठी होती, ज्यांच्या घरात अनेक मुले होती, त्यांनी मी काही गरीब मुले सांभाळली आहेत का अशी चौकशी केली. माझ्या ज्या वाचकांना या प्रश्नांच्या उत्तरात काडीचाही रस नाही अशा वाचकांची आधीच क्षमा मागून मी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक पुस्तकात “मी” लिहीत नाहीत, म्हणजे प्रथम वचनी लिहीत नाहीत. पण या पानांमधे आत्मस्तुतीचा दोष पत्करून “मी” राहणार आहे. बर्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की शेवटी “मी” च बोलत असतो. माझ्याबद्दल मला जेवढी माहिती आहे तेवढी जर मला इतरांबद्दल असती तर मी इतरांबद्दलच लिहिले असते. लिहिण्याची ही पद्धत माझ्या सारख्या संकोची माणसासाठी मला योग्य वाटते. प्रत्येक लेखकाने इतरांबद्दल लिहावेच पण आपले आत्मचरित्र प्रांजलपणे लिहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याने जर हे आत्मचरित्र त्याच्या सारख्याच इतर लेखकांना पाठवले तर किती चांगले होईल. प्रत्येकाचे जग वेगळे, अनुभव वेगळे. मी लिहिलेले कदाचित गरीब विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयुक्त असेल. माझ्या उरलेल्या वाचकांनी त्यांना त्यातील योग्य वाटेल ते उचलावे. असे करताना या लेखाचे वस्त्र उसवणार नाही अशी मला आशा आहे म्हणजे ज्याला उपयुक्त आहे त्याला ते वस्त्र वापरता येईल.
मला तुमच्याबद्दल, तुमच्या गावाबद्दल, तुमच्या शहराबद्दल काहीतरी सांगायला आवडेल. म्हणजे तुमच्या मानसिक अवस्थेबद्दल नाही तर तुमच्या अवतीभोवती जे काही चालले आहे त्याबद्दल. ते वाईट आहे की नाही, ते बदलता येईल की नाही…ते खरंच इतके वाईट आहे का ? मला या बद्दल लिहायला आवडेल. मी कॉनकॉर्डमधे सगळ्या रस्त्यांवर फिरलो आहे. दुकानातून, कार्यालयातून व शेतातूनही फिरलो आहे. मला एक गोष्ट जाणवली म्हणजे मला भेटलेला प्रत्येकजण शेकडो पद्धतींनी आत्मक्लेष करून घेतोय. मी हिंदूस्थानातील ब्राह्मणांच्या आत्मक्लेषांच्या चमत्कारिक व सुरस कथा ऐकल्या आहेत पण इथे जे चालले आहे तेही तेवढेच चमत्कारिक आहे. रोमन पुराणात हर्क्युलिसने बारा वेळा जे शिवधनुष्य पेलले ते माझ्या शेजार्यांच्या कष्टांपुढे किरकोळच म्हणावे लागेल. कारण ते फक्त बारा वेळा घडले आणि त्या प्रत्येक मोहिमेला कुठेना कुठे तरी अंत होता. पण माझ्या शेजार्यांनी त्यांच्या हव्यासापोटी त्यांची लढाई कुठेतरी थांबवलेली मला तरी दिसली नाही. एका हव्यासाची पूर्तता झाली की त्या राक्षसाची अजून दोन डोकी त्यांच्यापुढे तयारच असत्तात. हर्क्युलिसला ज्याप्रमाणे हायड्राची डोकी छाटणारा आयोलास सारखा मित्र भेटला तसा यांना कोणी भेटत नाही.
माझ्या आसपास वावरणार्या माझ्या दुर्दैवी तरूण मित्रांनी, गावकर्यांनी वारसा हक्काने घरे, शेती, गुरे व शेतीची अवजारे मिळवली आहेत. मी त्यांना दुर्दैवी म्हणतो कारण ज्या सहजतेने त्यांना ही संपत्ती मिळाली आहे, त्या सहजतेने तिचा त्याग करणे जिकिरीचं आहे. त्यापेक्षा त्यांनी उघड्या शेतावर जन्म घेतला असता आणि लांडग्यांनी त्यांचे पालनपोषण केले असते तर बरं झाले असते. मग त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले असते की ते कुठल्या शेतावर मजूरी करण्यास आले आहेत. त्यांना शेतमजूर कोणी बनवले.. माणसाला दोन वेळचे दोन घास पुरत असताना ते शंभर एकर का खात आहेत, जन्मल्या जन्मल्याच ते त्यांच्या शेतात त्यांच्या थडग्यासाठी का खणतात? त्याचे सगळे आयुष्य त्यांना झगडण्यात घालावे लागते. आयुष्याच्या रस्त्यावर या ओझ्याखाली पिचून गेलेले कितीतरी अभागी जीव मी पाहिले. त्यांची शेती, त्यांचे मोठे गोठे जे साफ ठेवणे म्हणजे एक अशक्य काम आहे. शिवाय शंभर एकराची नांगरणी, पेरणी, लाकूड तोड यात बिचारे गुंतून गेलेले असतात. ज्यांना ही वारसाहक्काने आलेली ओढाताण करावी लागत नाही त्यांना या एवढ्याशा जिवासाठी हे का करावे असा प्रश्न पडल्यास नवल ते काय…
पण माणसे हव्यासापोटी तीच चूक पुन्हा पुन्हा करतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ते त्यांच्या जमिनीत खत म्हणून कुजण्यास घालतात. मग त्यांच्या प्रारब्धात कष्ट लिहिलेले असतात. या प्रारब्धाला सर्वसामान्य जनता गरज असेही संबोधते. कुठल्यातरी एका जुन्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे मग ते या प्रारब्धाचे ओेझे वागवून संपत्ती गोळा करतात ज्याला नंतर वाळवी लागतेे किंवा ती दुसर्याच्या तरी हाती लागते. हा सगळा मुर्खपणा आयुष्याच्या शेवटी त्यांच्या लक्षात येतो.
तुलनेने विचारस्वातंत्र्य असलेल्या या देशात माणसे अडाण्यासारखे काबाडकष्ट करतात. बिचारी जनता स्वत:च्या प्रकृतीच्या काळजीत व त्याची काळजी घेण्यासाठी लागणारे पैसे कमविण्यात इतकी बुडून गेलेली असते की त्यांना त्यांच्या काबाडकष्टाची फळे वेचणेही शक्य होत नाही. त्यांनी उपसलेल्या काबाडकष्टाने त्यांची बोटे वाकडी झालेली असतात किंवा थरथरत तरी असतात. दिवसेंदिवस दिवसरात्र काबाडकष्ट करणार्या माणसाला प्रामाणिकपणाची चैन परवडेनाशी होत चालली आहे. त्याच्या श्रमाचे मुल्य बाजारात कमी होत चालले आहे. त्याला बिचार्याला यंत्र होण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. जरी पर्याय असेल तरी त्याबद्दल विचार करण्यास त्याच्याकडे वेळ नाही हे सत्य आहे. आपल्याकडे स्वत:च्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे कुठले ज्ञान नाही हेही त्याला उमजत नाही. मग आपण काय करायला पाहिजे ? प्रथम आपण त्याच्याविषयी कसलाही गैरसमज करून घेता कामा नये. म्हणजे तो आळशीच आहे, त्याला पुढेच यायचे नाही, तो अस्वच्छच आहे..इ.इ. असे विचारही आपण मनात आणता कामा नये. आपण त्याला काही काळ सांभाळले पाहिजे, त्याच्या किमान गरजा भागवल्या पाहिजेत जेणेकरून त्याला हे ज्ञान प्राप्त करण्यास वेळ मिळेल व तो प्रगतीच्या पथावर चालू लागेल. निसर्गात आपण फळांचा बहर येण्याची वाट पाहतो तो निसर्गाचा सर्वोत्तम काळ असं समजतात. पण तेथे पोहोचण्यासाठी आपण त्याची हळूवारपणे हाताळणी करतो. हेही तसेच आहे पण एवढे सर्वोत्तम उदाहरण आपल्या समोर असताना आपण एकमेकांचा हळूवारपणे सांभाळ करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.
तुमच्यापैकी काही जण गरीब आहेत, दारिद्—यात खितपत पडले आहेत. त्यांना जगणे अशक्य आहे. या दारिद्त्यात
त्यांचा जीव गुदमरतोय. मला माहिती आहे की हे पुस्तक वाचणार्यांपैकी कित्येकजणांना त्यांच्या जेवणाचे पैसेही देता आलेले नाहीत. त्यांचे कपडे जीर्ण झाले आहेत आणि हे पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी वेळ उसनवार करून किंवा चोरून आणला आहे…..
– मूळ लेखक : डेव्हिड हेन्री थोरो. अनुवाद : जयंत कुलकर्णी.