
नाल….
आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. त्या काळात इंजिनिअरींगच्या मुलांना जरा अवास्तव महत्त्व मिळायचे ही वस्तुस्थिती आहे. त्यातून आमचे राजे म्हणजे राजघराण्यातील. त्या काळात साहेबांकडे निळाशार रंगाचा ब्लेझर इत्यादी.. कपडे असायचे. खाली पांढरी शुभ्र, कसल्या तरी सिल्कची पँट वर पांढरा, वर एकही ठिपका नसलेला पांढरा शर्ट, त्याची अत्यंत छोटी पण चांदीची बटणे, तसलीच कफलिंक्स. त्यातील एक मला त्याने कॉलेज सोडताना भेट म्हणून दिली होती. आजही ती माझ्याकडे आहेत. पण त्या चांदीच्या कफलिंक्सला मी नंतर सोन्याचे प्लेटींग करून घेतले. पण शेवटी चांदीवरील सोन्याचा असला तरी मुलामाच तो. कितीही मुलामा चढवला तरी मध्यमवर्गीय विचार आणि राजांच्या दिलदारीत फरक राहणारच. तसा तो आमच्या स्वभावातही राहिलाच. संध्याकाळी हे कपडे घालून राजे डोळ्यावर रेबनचा ॲव्हिएटरचा गॉगल चढवून बाहेर पडले की आम्ही समजायचो, आज कुठेतरी पार्टी असणार. फायद्याचा विचार करून दिलदारी दाखवणार आम्ही…
मालोजी राजे धारच्या कुठल्यातरी पातीचे एकुलते एक राजकुमार. एकत्र कुटुंब. चुलत्यांची आणि यांची मिळून बक्कळ जमीन, जमीनजुमला, दोन तीन वाडे. शेती म्हणजे दोन डोंगरांमधून पसरलेली. राजांनी ती कधी पूर्णपणे पाहिली असेल की नाही याची मला शंकाच आहे. राजे स्वभावाने दिलदार, मदतीस तत्पर. म्हणजे उसनी दिलदारी नव्हं बरं. म्हणजे कोणी मदत मागितली तर करायची आणि ती आयुष्यभर काढायची असला फालतूपणा राजांकडे नव्हता. अख्ख्या हॉस्टेलचा राजांच्या ब्लेझरवर अधिकार असायचा. सिनियर मुले तो हक्काने मुलाखतीसाठी घालायची. म्हणजे ते मागण्यास येत नसत तर राजेच त्यांना स्वत:हून देत असत. खरे तर त्यांच्या सगळ्याच कपड्यांवर त्यांनी मित्रमंडळींना अधिकार देऊन टाकला होता. कधी कधी मालोजीलाच घालायला कपडे उरायचे नाहीत मग तेव्हा स्वारी खोलीत स्वत:ला कोंडून घ्यायची. ही वेळ शेवटच्या वर्षाचा निकाल लागला की हमखास यायचीच. त्यावेळी दिलखुलास हसत त्यांचे हे वाक्य ठरलेले असायचेच. ‘‘अरे बामना, आमची लंगोटी तरी ठेवतील कारे आमची ही मंडळी. तू एक बामन आणि तो एक साठ्या, साल्यांनो तुम्ही जाम हट्टी.. काही घे म्हटले तरी घेणार नाही.’’ पण आम्ही अभिमानी म्हणून त्याच्याकडून काही घेत नाही याचे त्याला वैषम्य वाटत नसे पण आम्ही जे आहे त्यात भागवत असू याचे त्याला मनापासून वाईट वाटे.
‘‘अरे लेको, लागले तर घ्या ना पैसे. नंतर नोकर्या लागल्यावर द्या परत. मी कुठे तुम्हाला फ़ुकट वाटतोय ?” पण आम्हाला माहीत होते की ते पैसे तो परत घेणार नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याकडून काही घ्यायचो नाही.
मालोजीरावांना ब्राह्मणांचा अत्यंत द्वेष वाटे पण त्यांना ब्राह्मणांचे भयंकर कौतुकही वाटे. ते तसे उघडपणे बोलूनही दाखवत. त्यांचा या बाबतीत वैचारिक गोंधळ भयंकर होता. पण त्याने आमच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही. यामागचे कारण एकच, माणूस सरळ साधा व दिलदार होता. राजांचे इतिहासावर मनापासून प्रेम.
‘‘ चायला लाईन चुकलीच बरं का आमची. आम्ही खरं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायचा.’’ तो म्हणे.
‘‘चला मालोजी, आता इतिहास घडवण्यापासून वाचण्यापर्यंत पाळी आली म्हणजे तुमच्यावर ’’ आम्ही त्याला चिडवत असू.
‘‘आता साल्याहो, इथे कसला इतिहास घडवू !’’
मालोजीराजे उखडायचे. कधी कधी वादाला कडवट वळण लागायचे पण मालोजीराजांमुळेच वाद मिटायचा हे सांगण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. तो माणूसच तसा होता, उमदा. सडसडीत बांधा उंची जवळजवळ सहा फूट आणि त्या काळातील राजेराजवाड्यांचे खेळ तो खेळायचा म्हणजे क्रिकेट व टेनिस. खेळताना पाहत रहावे असे त्याचे एका हाताने मारलेले बॅकहँडचे फटके किंवा केसाची झुल्फे उडवीत गोलंदाजी करतानाची त्याची लकब भल्याभल्यांना घायाळ करून जायची. सगळी व्यसने करणे शक्य असूनही कुठलेही व्यसन नसलेला हा मुलगा काहीच काळात सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला नसेल तर नवलच. तीन वर्षे होत आली आणि आम्ही मध्यमवर्गीय मुलांनी त्याचा पूर्ण पराभव केला. म्हणजे हळूहळू तोही आता आठवड्यात एकच जिनची पँट घालू लागला. तीच पँट परत पुढच्याच महिन्यात धुण्यासाठी टाकायची. वरती कुठलातरी एखादा टी-शर्ट अडकवायचा आणि पायात स्लिपर्स सरकवून बाहेर पडायचे. आम्हाला वाटले आमच्यामुळे मालोजी बदलला. एक दिवस आम्ही गप्पा मारताना म्हटलेही,
‘ शेवटी ज्या समाजात आपण राहतो त्याची ताकद फार मोठी असते. मालोजीचेच पाहाना, त्याला आता कोणी घरात तरी घेईल का ?’’
‘‘ कोणाला बोंबलायला जायचंय घरी ?’’ मालोजी कडवटपणे म्हणाला. त्याचा असा स्वर आजतागायत आम्ही ऐकला नव्हता.
‘‘ का रे ! ’’ आम्ही विचारले.
‘‘ जाऊ दे रे ! ’’
त्याच्या खनपटीला बसल्यावर त्याने सगळे सांगितले. त्यातील त्याचा काही खाजगी भाग गाळून जेवढे लिहिता येईल तेवढे लिहितो. मालोजी राजांचे गावी एका मुलीवर प्रेम होते. मुलगी हुशार, दिसायला सुंदर, व ग्वाल्हेरला उच्चशिक्षण घेत होती. पण होती बिचारी खालच्या जातीतील. घरच्यांनी नेहमीप्रमाणे निर्वाणीचा इशारा दिला. पण मालोजीने ऐकले तर ते राजे कसले ? त्यांनी सगळे इशारे धुडकावून लावले व लग्न करेन तर हिच्याशीच इ. इ. नेहमीची टेप वाजवली. पण पुढे झाले ते वेगळेच झाले. मालोजीरावांची घरातून हकालपट्टी झाली व इस्टेटीच्या वाटणीतून नाव उडाले. घरच्यांनी व भाऊबंदांनी फसवले आमच्या मालोजीला. मालोजीनेही फक्त एकच अट घातली. माझे शिक्षण होऊ देत. शिक्षण झाल्यावर मला उचल म्हणून एक लाख रुपये द्यावेत, माझे संग्रहालय मला द्यावे, मी परत तुमचे तोंड पाहणार नाही. हे सगळ्यांना सहज मान्य होण्यासारखे होते. त्या जुन्या पुराण्या वस्तूत तसाही कोणाला रस नव्हताच. थोडक्यात एका वाटेकऱ्याचा काटा निघाला म्हणायचा. खरे तर मालोजीला कोर्ट कचेऱ्या सहज करता आल्या असत्या. पण त्याला विलायतेला जाण्याचे वेड लागले होते. (त्याचा पुढचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. तो आता अब्जाधीश आहे.) थोडक्यात काय आम्ही त्याचा पराभव केला नव्हता तर त्याच्या घरच्यांमुळे त्याच्यावर अशी परिस्थिती आली होती. अशाही परिस्थितीत या माणसाचा चेहरा कधी दुर्मुखलेला आम्ही पाहिला नाही. त्याच्या डोळ्यातून कधी पाणी तर येणे शक्यच नव्हते.
मालोजीला इतिहासाचे भयंकर वेड होते हे वर सांगितलेच आहे. आम्ही त्याची चेष्टाही करत असू,
‘‘ मालोजीराजे जर शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्ही काय केले असते रे?
त्याच्या जोडीला घराण्याचा भयंकर अभिमानही होता. थोडासा दुरभिमान होता म्हणा ना !. त्याच घराण्याने त्याला समजून न घेता घराबाहेर काढले हे त्याच्या मनाला लागले होते. अर्थात ते तो चेहर्यावर दिसू द्यायचा नाही ना त्याच्या बोलण्यात परत त्या गोष्टीचा कधीही उल्लेख झाला. पण या आमच्या मित्राच्या डोळ्यात एकदा पाणी तरळलेले पाहणे आमच्या नशिबी होते. प्रसंग विनोदी होता पण इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असणार्या आमच्या मालोजीराजांच्या ह्रदयाला घरे पाडून गेला.
शेवटची परीक्षा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी कुठल्यातरी सहलीला जाण्याचे ठरवले. मालोजीचा आग्रह होता कुठल्यातरी किल्ल्यावर जाऊ. शेवटी नांदोसला जायचे व नंतर खालून कोकणातून रांगणा चढायचा असा बेत ठरला. एकत्र अशी ती आमची शेवटचीच सहल असणार होती. पुढे कोण कुठे जाईल हे त्या परमेश्र्वरालाच माहीत. थोडेसे भावूक होत आम्ही निघालो. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. नांदोसला पोहोचेपर्यंत पाऊस चांगलाच कोसळू लागला. रांगण्याला जाणे होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मालोजीने हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही रांगण्यासाठी घर सोडले. कट्ट्यावरून सायकली भाड्याने घेतल्या व निघालो.
थोड्याच वेळात पावसाने आम्हाला झोडपले. पावसाच्या तिरक्या रेषांनी एखाद्या कॅनव्हासवर शेडींग केल्या सारखे सगळे चित्र दिसू लागले. सायकल हाणता हाणता आमची पार दमछाक झाली. पूर्वीच्या गवळी सायकली त्या… नावच हर्क्युलस, ॲटलास, रॅले म्हणजे सगळ्यात भारी… सायकलीचे वजन खेचण्यातच माणसे बिचारी अर्धमेली व्हायची. त्यातच चेन मधे पँट अडकली नाहीतर देवाची कृपा… असो. मधेच पाऊस थांबायचा, वातावरण कुंद व्हायचे आणि ज्ञानेश्र्वरांनी भिंत चालवावी तसा वारा एकदम पावसाची भिंत चालवू लागायचा. विजांचा गडगडाट, वार्याचा घोंगावणारा आवाज याचा अनुभव घेत आम्ही रांगण्याच्या पायथ्याशी जे नारूर नावाचे गाव आहे तेथे पोहोचलो. तेथे तर वातावरण फारच भीतिदायक होते. गावात जाणार्या रस्त्यावरून ओढ्याचे पाणी वाहत होते व त्यातून तुटलेली झाडे, मेलेली जनावरे तरंगत होती. आमचा थरकाप उडाला पण तेथेच खाली असलेल्या एका टपरीत आम्ही शिरलो. त्यावेळी तेथे देऊळ नव्हते. एक छोटी मुर्ती उघड्यावरच ठेवलेली होती. टपरीच्या उबेत आम्ही शिरलो आणि जिवात जीव आला. जरा चौकशी करून कोणी वाटाड्या मिळतो का हे पाहिले. पोरगावकर म्हणाले,
‘‘ मिळेल पण तुम्हाला तास दोन तास थांबावे लागेल. माणसं कुठेतरी अडकली असतील येतीलच एवढ्यात.’’
‘‘ पण एवढ्या पावसात कोणी येणार का आम्हाला वाट दाखवायला ?
‘‘ अहो वरती पाऊस नसतो फक्त ढग. पाऊस इथे खाली.’’
‘‘ ठीक आहे मग आम्ही थांबतो.’’ मालोजी.
आता सगळे निश्चित झाल्यावर मग गप्पांना ऊत आला. चर्चा, वादविवाद सुरू झाले. मालोजीराजेंचे इतिहास प्रेम परत उफाळून आले. आमच्यात एक मुसलमान मित्रही होता. मालोजी नेहमी त्याच्या मागे लागायचा की तू परत हिंदू हो. नाहीतरी तुम्ही बाटलेलेच आहात. तो बिचारा नेहमी गप्प बसायचा व तो विषय हसण्यावारी न्यायचा. पण त्या दिवशी काय झाले होते कोणास ठाऊक. तो फटदिशी त्याला म्हणाला,
‘‘राजे ! उगंच बकवास नको. तुम्ही तुमची मुलगी देणार का माझ्या मुलाला ? बोला ! आहो मी जरी हिंदू झालो तरी तुम्ही आम्हाला अजून एका नवीन जातीत ढकलाल. ’मुसलमान विश्र्वकर्मी.’’
तो जातीने सुतार होता. मालोजी गप्प बसला तो बसलाच. मालोजीचा घराण्याचा इतिहास ऐकून झाला आणि त्या पोरगावकराचा मुलगा आला. घाईघाईने आम्ही जेवून निघालो. आणि खरच थोड्या उंचीवर गेल्यावर पावसाचा एक थेंबही नव्हत पण दाट धुके मात्र होते अर्थात त्याची काही आम्हाला विशेष काळजी नव्हती. वाटाड्याच्या पायाखालचा रस्ता होता. पण चढण दमछाक करणारी होती. किल्ल्याची उंची जवळजवळ ४५०० फूट असावी आणि आम्ही समुद्रसपाटीपासून चढत होतो. वर पोहोचल्यावर सगळ्यांनी शिवाजी महाराज की जय अशा आरोळ्या ठोकल्या. कुठलाही मराठी माणूस दमून भागून गडाच्या माथ्यावर पोहोचला की महाराजांचा जयजयकार करतोच.
गड हिंडता हिंडता दुपार केव्हा सरली ते कळलेच नाही, पोरगावकरांच्या मुलाने आता मात्र परतण्याची घाई करण्यास सुरुवात केली. सारखी आरतीची वेळ झाली असे त्याने पालुपद लावले होते. कसली असे विचारल्यावर म्हणाला ‘‘नालाची आरती. आम्हीही काही जास्त लक्ष दिले नाही. दमलो होतो व जाम भूक लागली होती. चटाचट पावले उचलत आम्ही पोरगावकरच्या पोराच्या आधी खाली पोहोचलो. पाऊस पूर्णपणे थांबला होता. तिन्हीसांजेला वृक्ष जास्त गडद दिसू लागले. मावळतीकडे आकाशात धुरकट ढगातून नारिंगी रंगाची लकेर दिसू लागली. खोपटात पोहोचलो तेव्हा आरतीची तयारी जय्यत सुरू होती. पोरगावकराचे हॉटेल एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेले होते. त्याच बुंध्यावर एक लाकडी देवघर ठोकून बसवले होते व त्या देवघरात एक नाल ठोकला होता. त्याला फुले हार वाहिलेले दिसत होते. तेवढ्यात पोरगावकरांचे सगळे कुटुंबीय आरतीला जमा झाले. आरत्या नेहमीच्याच होत्या पण पूजा मात्र त्या घोड्याच्या नालाची होती. आम्हाला काही समजेना. सगळी पूजा व पोटपूजा उरकल्यावर आम्ही पोरगावकरांकडे हा विषय काढला.
‘‘ हंऽऽ त्याला फार मोठा इतिहास आहे पाव्हणं ! आम्ही मुळचे गारगोटीचे. आमचे सगळे पाव्हणे मंडळी वर देशावर असतात नव्ह का…हा घोड्याचा नाल आमच्याकडे वंशपरंपरागत चालत आला आहे. असे म्हणतात आमच्या पूर्वजांची आणि पहिल्या बाजीरावाची फार दोस्ती होती. उत्तरेत मोहिमेला जाण्याआधी बाजीराव येथे आले होते त्यावेळेस त्यांच्या घोड्याला नाल ठोकले तेव्हा हे जुने नाल आमच्या पूर्वजांनी जपून ठेवले. जे काही आहे ते रावसाहेबांचीच कृपा होती व आहे असे आम्ही मानतो. लोकं हसतात आम्हाला पण त्यो नाल आमचा जीव का प्राण आहे.’’
हे ऐकल्यावर मालोजी ताडकन उठला.
‘‘ पाटील आम्ही पण जे काही आहोत ते राऊसाहेबांमुळेच. आम्ही धारचे पवार.’’
मालोजीने असे म्हटल्यावर पाटलांनी मालोजीला मिठी मारली. त्या मिठीत आम्ही प्रथम त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. नंतर रात्री बर्याच गप्पा झाल्या. पहाटे कसेबसे उठून आम्ही निघण्याची तयारी केली. पाटलीणबाईंनी फक्कड चहा बनवला तो घेऊन आम्ही निघणार तेवढ्यात पाटील आले.
‘‘ राजे थांबा. ! तुमच्या सारखी माणसे आता कुठे परत भेटायला ! नाम्या ! काढ रे तो नाल आणि दे साहेबाला’’
‘‘ अहो काय करतायसा !’’ पाटलीणबाई.
‘‘ तू गप्प बस गं जरा ! कोण आहेत माहिते हाय का तुला ? नाही ना? मग जर गप राव्हा की !’’
तेवढ्यात नाम्याने नाल काढला व मस्तकाला लावला. आम्हाला वाटलं तो आता रडणार ! पण तेवढ्यात पाटलांनी तो नाल त्याच्या हातातून घेतला. खाली ठेवला व त्याला साष्टांग नमस्कार घातला.
‘‘ घ्या राजे आमच्या दिलाचा तुकडा तुम्हाला देतूय ! तुमच्याकडंच शोभल तो !’’
असे म्हणून त्यांनी मान फिरवली. आता राजे काय करतात याची आम्ही वाट पाहू लागलो. तो सगळा प्रकार पाहून मालोजीने पाटलांना मिठी मारली व दुसर्यांदा टिपे गाळली. खिशातून त्यांनी शंभराच्या दहा नोटा काढल्या व पाटलांच्या हातात कोंबल्या.
‘‘ आवो काय , काय करताय काय तुम्ही राजे? हीच किंमत केली काय आमची?’’
‘‘ असू दे पाटील ! आम्ही असे रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत.’’
मालोजीराजेंचा घराण्याचा अभिमान जागा झाला. आम्हालाही साक्षात धारचे पवार बोलत आहेत असा भास झाला. वातावरण भारून गेले होते. पाटलांचा निरोप घेऊन आम्ही सायकली काढल्या व नांदोसचा रस्ता पकडला. रस्त्यात कोणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. घडलेल्या प्रसंगाने सगळेजण बहुधा भारावून गेले होते. संध्याकाळी नितीनचे (ज्यांच्या घरी उतरलो होतो त्यांचे) दाजी आले.
‘‘ कशी काय झाली सायकलची ट्रीप ?’’
‘‘ दाजी मस्तच हो !’ काय गड का काय…. फारच भारी. आणि…’’ मालोजी
‘‘ मग काय नाल मिळाला की नाही?’’ दाजी हसत हसत म्हणाले. आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो.
‘‘ मी तुम्हाला कालच सांगणार होतो पण पोस्टातून यायला उशीर झाला ना मग तसाच घरी गेलो.’’
कोणाला काय बोलावे हेच कळेना. थोड्याच वेळात सगळे जण खो खो हसत सुटले. थोड्या वेळाने त्या हास्यस्फोटात मालोजीही सामील झाला. पण त्याचा चेहरा पडलेला दिसला. दुसऱ्याच दिवशी मालोजी दाजींना घेऊन स्पेशल रिक्षा करून नारूरला सकाळी सकाळी पोहोचला. हजार रुपये म्हणजे आमची वर्षाची वर्षांची फी होती त्या काळी. रविवार होता. किल्ल्याला जाण्यासाठी रग्गड गर्दी होती. हवा मस्त होती. झाडाच्या बुंध्याभोवती पंधराएक जण तरी जमले होते. मधे पाटील उभे राहून नालावर फुलांचा ढीग वाहत होते. जमलेले सगळे आदराने नालाचे दर्शन घेऊन माथा टेकवत होते. पैसे फुले वाहत होते. दाजींनी मालोजीला जरा थांबण्याची खूण केली….सगळी गर्दी ओसरल्यावर मालोजी तावातावाने पुढे आला व त्याने पाटलाला खडसावून विचारले,
‘‘ पाटील तुम्ही मला कालच नाल दिला ना? मग आता हा कुठला आला ?’’ माझे पैसे परत द्या.
‘‘ बसा राजे ! शांत व्हा ! वाईच च्या घ्या. राजे बाजीरावाच्या घोड्याला काय फकस्त योकच नाल मारला व्हता की काय ? आणि त्याच्याकडे काय फकस्त योकच घोडा होता ? माझ्याकडे बाजीरावाच्या घोड्याचे पेटी भर नाल पडले हायती. दावू का?’’
मालोजीच्या डोळ्यात त्यावेळी मला वाटते तिसर्यांदा अश्रू तरळले असणार…. दाजी काही बोलले नाहीत, पण मला खात्री आहे मालोजीला तो फसला म्हणून रडू आले नसणार.
पाटलांनी इतिहासाला इतक्या हीन पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले असणार….
लेखक : जयंत कुलकर्णी.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. सत्य घटनेवर आधारित. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.
ता. क. दाजींनी नंतर नऊशे रुपये वसूल केले ते लिहिण्यास विसरलोच.
wah wah…:-)