पिसूक….aka मेटॅमॉर्फॉसिस… भाग-५

image6

….त्या दरवाजाला कान देऊन उभे राहताना त्याच्या मनात असल्या वांझोट्या विचारांनी गर्दी केली. विचार करुन करुन अतिश्रमाने तो त्या दरवाजावर त्याचे डोके टेकीत असे पण ते करताना जर थोडा जरी आवाज झाला तर त्यांचे बोलणे एकदम थांबे व त्याच्या वडिलांचा पलिकडून लगेचच आवाज येई, ‘‘आता काय करतोय तो ? काय करीत असेल ?’’ मग त्यांचे बोलणे परत सुरु होई.

आर्थिक बाबींबद्दल त्याच्या आईला एकदा सांगितलेले कळत नसे त्यामुळे त्याचे वडील तिला तीच गोष्ट अनेक वेळा समजावून सांगत होते. त्यातून एक गोष्ट मात्र ग्रेगॉरला अनेक वेळ कळली ती म्हणजे त्यांच्या वाईट काळात एक छोटीशी गुंतवणूक दिवाळखोरीतून वाचली होती. नुसती वाचलीच नव्हती तर तिच्यात बऱ्यापैकी वाढही झाली होती कारण त्यातून मिळणाऱ्या व्याजाला कोणी हात लावला नव्हता. शिवाय ग्रेगॉर स्वत:साठी थोडे पैसे ठेऊन उरलेले पैसे घरखर्चासाठी द्यायचा, त्यातीलही बरेच पैसे वाचत होते. दरवाज्याआड ग्रेगोरला या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. कौतुकाने त्याने मान हलविली. हे खरे होतं की त्या पैशातून त्याने काही रकमेची कर्जफेड केली असती आणि त्याला लवकर नोकरीही सोडता आली असती. पण त्याच्या वडिलांनी जे काय केले होते तेही ठीकच होते.

अर्थात या जमलेल्या पैशांवरील व्याजावर त्या कुटुंबाचा खर्च भागणे शक्यच नव्हते. आणि समजा मुद्दलच खर्च करायचे असे त्यांनी ठरविले असते तर फार तर एक दोन वर्षे ते पुरले असते. त्या पैशाला खरे तर हातच लावायला नको होता. अडीअडचणीला त्याचा उपयोग झाला असता. महिन्याच्या खर्चासाठी नियमीत पैसे कोणीतरी कमवायलाच पाहिजेत. पण त्याच्या वडिलांनी गेले पाच वर्षं कुठलेच काम केले नव्हते व आता म्हातारपणी त्यांच्याकडून तसली अपेक्षा करणेही चूक होते. गतआयुष्यातील खडतर कष्टांनंतर आलेल्या या पाच वर्षात त्यांनी चांगलाच आराम केला होता. त्यामुळे ते जरा आळशीही झाले होते. ग्रेगॉरच्या आईला दम्याचा त्रास होता त्यामुळे ती कशी काय नोकरी करु शकणार होती ? घरात चालताना, एवढेच काय खिडकीशेवारील सोफ्यावर लवंडलेली असतानाही तिला दम्याची उबळ यायची. ती काय काम करणार ? उरली त्याची सतरा वर्षांची लहान बहीण. आजपर्यंत तशी लाडात वाढलेली. नटण्यामुरडण्याचे वय तिचे. घरकामात मदत करायची आणि मस्तपैकी स्वप्नात रमायचे वय तिचे. ती काय घराला हातभार लावणार ? उरलाच वेळ तर छान व्यायलिन छेडायचे… तिला या निष्ठुर जगाची कल्पनाच नव्हती मुळी.. जेव्हा प्रथम त्याने पैशाच्या गरजेबद्दल त्यांची चर्चा ऐकली तेव्हा त्याने दरवाजा सोडून थंडगार काळ्या कुळकुळीत सोफ्यावर आपले अंग झोकून दिले. त्याची कानशिले शरमेने गरम झाली. गार सोफ्यावर त्याला जरा बरं वाटलं.

बहुतेक वेळा तो न झोपता त्या सोफ्याचे कातडे खरवडत पडून रहायचा.. नाहीतर फारच कंटाळा आल्यावर त्याने एक दिवस मोठ्या कष्टाने खुर्ची खिडकीशेजारी ढकलत नेली आणि खिडकीच्या काचेला टेकून बाहेर पहात उभा राहिला. त्याला आठवले त्याला पुर्वायुष्यात खिडकीत उभे राहून पाहिले की मुक्त वाटायचे. वाटायचे कोणी मागून पकडायला आले तर त्याला सुटण्यासाठी एखादा तरी मार्ग उपलब्ध आहे.. पण दुर्दैवाने जसे दिवस जात होते तशी त्याला त्याची दृष्टी दगा देत होती. खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यापलिकडील इस्पितळाची इमारत, जिच्याकडे पहायला त्याला आवडायचे ती आता त्याला अंधूकशी दिसायला लागली होती. तो त्या रस्त्यावर रहात होता हे जर त्याला माहीत नसते तर ती जागा त्याला एखाद्या वाळवंटासमान भासली असती.. कारण त्याच्या दृष्टीस आता आकाश आणि जमीन एकमेकात मिसळलेले दिसत होते..आणि ते सुद्धा अंधूक.. नशीब त्याच्या प्रसंगावधानी बहिणीने एकदा ती खुर्ची खिडकीशेजारी पाहिली आणि त्यानंतर तेव्हापासून खोली आवरुन झाल्यावर ती खुर्ची परत खिडकीशेजारी ठेऊन जात असे. एवढेच नव्हे तर खिडक्यांची आतील तावदाने व पडदेही उघडे ठेऊन जात असे.

त्याला जर तिच्याबरोबर बोलता आले असते तर त्याने तिच्या मदतीसाठी प्रथम तिचे आभार मानले असते. कदाचित त्याला तिची मदत, थोडीशी का होईना, मोकळपणाने घेता आली असती. आत्ता त्या मदतीने त्याचा मानसिक छळच होत होता. ती या कामाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करीत होती आणि त्यात तिला यशही मिळत होते आणि जसा काळ उलटत होता तसा ग्रेगॉरच्या विचारातही फरक पडला होता. ज्या प्रकारे ती खोलीत प्रवेश करीत असे त्यानेच ग्रेगॉरच्या ह्रदयात कालवाकालव होत असे. आल्याआल्या ती खिडकीशी धाव घेत असे व पडदे फराफरा बाजूल करीत असे. नेहमी त्याचा दरवाजा काळजीपूर्वक बंद करणारी ती यावेळी मात्र तो उघडा आहे का बंद याची काळजी करीत नसे. गुदमरल्यासारखी खिडकीशी उभी राहून ती दीर्घ श्र्वास घेत असे. मग कितीही थंडगार हवा असो. तिची ही गडबड त्याला दिवसातून दोनदा सहन करावी लागत असे. त्यावेळी मात्र तो त्या सोफ्याखाली स्वत:ला कोंबत असे. पण त्याला खात्री होती की जर त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल तिला कळले असते तर तिने ती खिडकी उघडली नसती. पण….

ग्रेगॉरचे हे रुपांतर झाल्यावर एका महिन्याने एक प्रसंग घडला. खरे तर तिला आता त्याच्या दर्शनाने दचकण्याचे काही कारण नव्हते. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे न येता जरा लवकर त्याच्या खोलीत आली. तिला ग्रेगॉर नेहमीप्रमाणे स्तब्धपणे खिडकीत बाहेर पहात असताना दिसाला. त्याला तेथे पाहून ती आत आली नसती तर ग्रेगॉरला काही विशेष वाटले नसते. पण ती आली आणि सरळ नेहमीप्रमाणे खिडकीपाशी आली. तेथे त्याला पाहून ती किंचाळली आणि एका उडीत तिने दरवाजा गाठला. बाहेर पडताना अर्थातच ती दरवाजा बंद करण्यास विसरली नाही. तो सगळा प्रकार बघणाऱ्यास असेच वाटले असते की तो तिला चावण्यासाठी टपून बसला होता. त्याने लगेचच सोफ्याखाली नेहमीप्रमाणे दडी मारली. त्याने तिची वाट पाहिली पण ती मात्र थेट दुपारीच आली. तिची अवस्था जास्तच वाईट झालेली दिसत होती. यावरुन ग्रेगॉरला त्याचे नवीन रुप भयानक असले पाहिजे याची जाणीव झाली. परत त्याच्या खोलीत येण्यासाठी तिला मनाची किती तयारी करावी लागली असेल या कल्पनेने त्याच्या अंगावर शहारे आले. सोफ्याखालून बाहेर डोकावणारे त्याचे शरीर पाहून बिचारीचा थरकाप उडाला असणार. तिला त्याचे हिडीस शरीर दिसू नये म्हणून त्याने एक दिवस पलंगावरील चादर सोफ्याखाली नेली. चार तास कष्ट करुन त्याने ते काम केले पण आता तिने सोफ्याखाली वाकून पाहिले असते तरी त्याचे शरीर तिला दिसले नसते. तिला जर ती चादर अनावश्यक वाटली असती तर तिने ती काढली असती म्हणा. कारण त्या चादरीची त्याला तशी अडचणच होत होती. पण तिने ती चादर जेथे होती तेथेच सोडली. त्याने चादरीची कड हळुच उचलून तिच्याकडे पाहिले तेव्हा ग्रेगॉरला तिच्या डोळ्यात थोडीशी कृतज्ञता दिसल्याचा भास झाला.

पंधरा दिवस झाले पण त्याच्या आईवडीलांचे अजून त्याच्या खोलीत पाय ठेवण्याचे धाडस होत नव्हते. त्याच्या बहिणीच्या कौतुकाचे शब्द मात्र त्याच्या कानावर पडत होते. ग्रेगॉरसाठी ते जे करु शकत नव्हते ते ती करत होती ना ! नाहीतर इतर वेळी तिला ते बिनकामाचीच म्हणायचे. ओरडायचे. पण जेव्हा ती त्याची खोली आवरत असे तेव्हा त्याचे आईवडील दरवाजाबाहेर वाट पहात उभे रहायचे. बाहेर आल्याआल्या तिला त्यांना आत काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगायला लागायचे. ग्रेगॉर जेवला का ? काय करतोय? त्याच्यात काही सुधारणा झाली आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिला द्यायला लागत. लवकरच त्याच्या आईने त्याला भेटण्याचा हट्ट धरला पण त्याच्या बहिणीने आणि वडिलांनी तिची समजूत काढली. ती काढताना त्यांनी जी कारणे दिली ती ग्रेगॉरने फार लक्षपूर्वक ऐकली आणि ग्रेगॉरला ती थोडीफर पटलीही. पण शेवटी तिच्या भावना अनावर झाल्यावर तिने खोलीत शिरण्याचा प्रयत्न केलाच. तिला जबरदस्तीने बाहेर ठेवावे लागल्यावर ती किंचाळली, ‘‘ मला आत जाऊद्या ! आत बिचारा ग्रेगॉर आहे. तुम्हाला माहिती आहे ना ? काय झालंय त्याला ?’’ क्षणभर तिला आत सोडायला हरकत नाही असे ग्रेगॉरला वाटले खरे पण लगेचच त्याने स्वत:ची समजूत घातली ‘पण रोज नको. आठवड्यातून एकदा ठीक आहे !’ त्याच्या आईला कदाचित त्याच्या बहिणीपेक्षा परिस्थितीची जाणीव लवकर झाली असती. त्याची बहीण तशी वयाने अजून अल्लडच होती. कदाचित त्या अल्लडपणामुळेच तिने जास्त विचार न करता ग्रेगॉरची जबाबदारी अंगावर घेतली असावी.

लवकरच ग्रेगॉरची आईला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. दिवसा ढवळ्या कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून तो खिडकीत फार वेळ उभा रहात नसे पण त्या खोलीत उरलेल्या जागेत तो फार काळ सरपटूही शकत नसे. आणि नुसतं पडून तरी किती वेळ राहणार ? यावर त्याने लवकरच उत्तर शोधले. तो भिंतींवर आणि छतावर सरपटू लागला. त्यामुळे तो जेथे सरपटे तेथे त्याच्या ग्रंथीतून पाझरणाऱ्या द्रावाचे पट्टे तो उठवीत जात असे पण त्याला तसे फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शिवाय छताला मध्यभागी तो मधेच उलटा लटकत असे व झोके घेत असे. तो खेळ तर त्याला फारच आवडे. जमिनीवर सोफ्याखाली गुदमरण्यापेक्षा ते केव्हाही चांगलेच होते. हलकासा झोका घेत तो मधेच खाली धप्पकन पडत असे. त्याला आता पूर्वी इतके लागतही नव्हते व त्याच्या शरीरावर आता त्याचा पूर्ण ताबा होता. त्याच्या बहिणीला ते पट्टे पाहिल्यावर तो काय करीत असावा याची कल्पना आली. तिने त्याला फर्निचर हालवून खालीच जास्त जागा करुन द्यायची मनाशी खुणगाठ बांधली. विशेषत: ते लिखाणाचे टेबल व ड्रॉवर असलेले कपाट यांनी फारच जागा अडवली होती. पण तिला एकटीला ते हलवणे शक्यच नव्हते. वडिलांना विचारायचा तर प्रश्नच नव्हता. मोलकरीण, स्वयंपाकीणबाई नोकरी सोडून गेली तेव्हाच जाणार होती पण तिने स्वयंपाकघराची कडी आतून लावण्याच्या बोलीवर तेथे राहण्याचे कबूल केले होते. त्यामुळे तिच्याकडे आता आईला विचारण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्या दिवशी वडील बाहेर गेलेले पाहून तिने आईला या बाबतीत विचारलेच. तिनेही या कामाला उत्साहाने होकार दिला जो ग्रेगॉरच्या खोलीच्या दरवाजाबाहेर लगेचच मावळला. नसती गडबड नको म्हणून ग्रेगॉरची बहीण तिच्या आधी आत गेली. ग्रेगॉरने लगेचच अंगावरील चादर अंगावर ओढली. आता एखादी चादर सोफ्यावर पडली आहे असे कोणालाही वाटले असते. त्याने चादरीबाहेर डोकावून बघण्याचा मोह मात्र यावेळीस टाळला. आई आपल्या खोलीत आली यावरच खुष होता बिचारा. ‘‘ आई ये ना आत ! तो आता दिसत नाहीए’’ त्याची बहीण आईला हाताने आधार देत म्हणाली. फर्निचरच्या हलवाहलवीच्या आवाजाने ग्रेगॉरने ताडले की ते जूने कपाट हालवायचा प्रयत्न त्या दोघी करत असणार. अर्थात त्याची बहीणच जास्त शक्ती लावत होती आणि आई तिच्या काळजीने ‘‘जरा हळू ! जरा हळू !’’ असे सारखे तिला सांगत होती. त्यांना ते सरकविण्यास बराच वेळ लागला. पंधरा मिनिटे धडपड केल्यावर ग्रेगॉरची आई म्हणाली, ‘‘ हे हलविणे मुष्कील आहे ! ते आहे तेथेच राहू देत.’’ शिवाय ग्रेगॉरचे वडील कुठल्याही क्षणी घरी येण्याची शक्यता होती. मधे उभे राहून तिने एकदा खोलीवर नजर फिरवली. तिच्या मते ते मधेच राहिले तर ग्रेगॉरच्या हालचालींना फार अडथळा होईल असे तिला वाटत नव्हते. खरे तर ते कपाट व इतर गोष्टी हलविल्यावर ती खोली फारच ओकिबोकी वाटली असती. त्या विचारानेच तिचे मन उदास झाले. ती कुजबुजली.. त्या खोलीत आल्यापासून ती कुजबुजतच बोलत होती. कदाचित तिला वाटत होते की ती बोललेले त्याला तसेही समजणारच नव्हते तर मोठ्याने बोलण्याचा काय फायदा ? ‘हे हलवायला नको ! आपण हे सामान हलविले तर आपण त्याची आशा सोडली आहे असे वाटेल त्याला. मला वाटते त्याची खोली जशी होती तशीच सोडणे इष्ट. म्हणजे तो परत आल्यावर त्याला काही बदल जाणवणार नाही आणि जे काही घडले आहे त्याचा त्याला विसरही पडेल कदाचित !’’

आईचे हे शब्द ऐकल्यावर ग्रेगॉरला एक गोष्ट मात्र कळाली. गेले दोन महिने त्याचे कुठल्याही मनुष्यप्राण्याबरोबर प्रत्यक्ष संभाषण झाले नव्हते व त्याचे कौटुम्बिक आयुष्य फारच एकसूरी झाले होते. या दोन्ही गोष्टींमुळे त्याच्या मनाचा प्रचंड गोंधळ उडाला असणार. नाहीतर त्यालाही ती खोली फिरण्यासाठी मोकळी असावी असे का वाटले होते याचे दुसरे कुठलेही उत्तर त्याच्याकडे नव्हते. त्याला खरेच त्याच्या खोलीतून सगळे सामान हलवावेसे वाटत होते का ? त्या सामानाशी त्याच्या मनुष्य जिवनाच्या असंख्य आठवणी निगडीत होत्या. त्या त्याला तोडायच्या होत्या का ? त्याची स्मरणशक्ती त्याला दगा देत होती. पण त्याच्या आईच्या आवाजाने तो परत एकदा ताळ्यावर आला. खोलीतून काहीही हलवायचे नाही. सगळे आहे तसेच असूदेत. त्याचे मन ताळ्यावर राहण्यात त्या सामानाचा मोठा सहभाग होताच. हालचालींसाठी सामानाची अडचणच व्हायची हे खरे पण मन ताळ्यावर राहणे हे जास्त महत्वाचे होते.

पण दुर्दैवाने त्याच्या बहिणीचे मत एकदम विरुद्ध होते. ती आता काही कारण नसताना  ग्रेगॉरच्या बाबतीत सगळे निर्णय घेण्याचे अधिकार तिच्याकडेच आहेत असे समजे. आई वडिलांना यातील काही कळणार नाही अशा समजूतीपोटी तिची अशी समजूत झाली असावी. त्यामुळे आईच्या सल्ल्याविरुद्ध तिने कपाट व टेबल हलविण्याचे निश्चित केलेच होते, पण आता ती आख्खी खोली रिकामी करण्याचे ठरवू लागली. नशीब तो सोफा सोडून. ग्रेगॉरच्या या प्रकरणात तिचा आत्मविश्र्वास उगीचच वाढला होता. वयात येणारे जसे प्रत्येक बाबतीत आपल्याला समजते या समजूतीने ढवळाढवळ करतात तसे. अर्थात या वाढलेल्या आत्मविश्र्वासामुळे तिने ते सामान हलविण्याचे ठरविले नव्हते तर तिला प्रामाणिकपणे त्याला मोकळी जागा लागेल असे मनोमन वाटत होते आणि शिवाय तो त्या सामानाचा वापरही पूर्वीसारखा करीत नव्हता.

थोडक्यात तिच्या आईला तिचे मन या बाबतीत वळविणे शक्यच नव्हते. त्या खोलीत आल्यापासून तिला जरा बरेच वाटत नव्हते. तिने गुपचूपपणे आपल्या लेकीला शक्य होईल तेवढी मदत करण्यास सुरुवात केली. ‘‘जे काही चाललेले आहे ते फार काही विशेष नाही’’ असे त्याने आपल्या मनाला समजविण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्या सरकवासरकवीचे आवाज, त्या दोघींची गडबड, बडबड या सर्वांचे त्याच्यावर चहुबाजूंनी आक्रमण होत होते व अधिक काळ तो सहन करु शकेल अशी त्याला खात्री नव्हती. त्या त्याची खोली रिकामी करीत होत्या. ज्या ज्या वस्तूंवर त्याचे प्रेम होते त्या सगळ्या त्या बाहेर नेत होत्या. त्याचे फ्रेम्स करण्याच्या हत्यारांचे कपाट त्यांनी अगोदरच शेजारच्या खोलीत हलविले होते व आता त्या जमिनीत रुतलेल्या टेबलाच्या मागे लागल्या होत्या.  लिहिण्याचे टेबल मात्र कुठल्याही परिस्थितीत वाचवायला हवे होते. त्यानंतर पाळी येणार होती त्याच्या अभ्यासाच्या डेस्कची, ज्यावर त्याने कॉलेजचा अभ्यास केला होता. त्या आधी शाळेत असताना त्यावरच त्याने अभ्यास केला होता. त्या दोघींचा उद्देश चांगला होता का वाईट यावर विचार करण्यासाठी त्याला वेळ नव्हता. खरे तर त्यांचे अस्तित्वच तो आता विसरला होता. त्या इतक्या दमल्या होत्या की त्यांचा आवाजही आता येत नव्हता.

डेस्क वाचविण्याच्या विचार मनात येताच तो सोफ्याखालून बाहेर पडला… त्या दोघीजणी शेजारच्या खोलीत दमून टेबलावर टेकल्या होत्या. बाहेर आल्यावर त्याने तीनचार वेळा त्याची दिशा बदलली कारण त्याला कळत नव्हते की कुठली वस्तू प्रथम वाचवायची. त्याची नजर समोरच्या मोकळ्या भिंतीवरील त्या फरमधे गुंडाळलेल्या स्त्रीच्या फ्रेमवर पडली. तो पटकन त्या फ्रेमवर चढला व त्याने ती फ्रेम झाकून टाकली. त्या फ्रेमच्या काचेवर तो चिकटला. त्या काचेवर त्याच्या पोटाची पकड चांगली बसत होती आणि त्याच्या पोटाला त्या गार काचेने बरेही वाटले. हे चित्र तरी आता वाचले असे त्याला वाटले. त्या दोघी केव्हाही येऊ शकतात या विचाराने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने आपले डोके बैठकीच्या दरवाजाकडे वळविले.

पण त्या दोघी त्याच वेळी आत येत होत्या. त्याच्या बहिणीने आपला एक हात आईच्या कमरेभोवती तिला आधार देण्यासाठी लपेटला होता. ‘आता काय नेऊया आपण बाहेर ?’’ ती आईला विचारत होती. तेवढ्यात तिची नजर भिंतीवरील ग्रेगॉरच्या नजरेला भिडली. ती काहीच झाले नाही असे दाखवत आईच्या आणि ग्रेगॉरच्या मधे आली. पुढचा प्रसंग टाळण्यासाठी ती आईला म्हणाले, ‘‘आपण बैठकीच्या खोलीत जाऊ या का थोडा वेळ ?’’ तिचा उद्देश ग्रेगॉरच्या लगेचच लक्षात आला. आईला तेथे सोडून ती ग्रेगॉरला भिंतीवरुन खाली हुसकावणार होती. ‘‘हंऽऽ करु तर दे तिला तसा प्रयत्न..मग बघतो मी. नाही तिच्या तोंडावरच उडी मारली तर माझे नावा ग्रेगॉर नाही.’’ ग्रेगॉर मनाशी म्हणाला. पण त्याच्या बहिणीच्या बोलण्याने तिच्या आईने एक पाऊल बाजूला टाकले आणि त्याच क्षणी तिच्या नजरेस त्या भिंतीवरील मोठा काळसर डाग पडला. तो ग्रेगॉर होता का नव्हता हे तिच्या मनात निश्चित होण्याआधीच ती मोठ्याने किंचाळली व त्या सोफ्यावर निपचीत पडली. ‘‘ग्रेगॉर !’’ त्याची बहीण त्याच्याकडे पहात मुठी आवळत ओरडली. त्याचे रुपांतर झाल्यानंतर तिने प्रथमच त्याला त्याच्या नावाने हाक मारली होता. ती आईला शुद्धीवर आणण्यासाठी कसलेसे औषध आणायला बाहेर धावली. ग्रेगॉरलाही तिला मदत करायची होती पण तो त्या चित्राच्या काचेला घट्ट चिकटला होता. त्याने जोर लावून त्या काचेपासून सुटका करुन घेतली व तो बहिणीमागे धावला. अर्थात त्याच्या वेगाने. त्याला ते औषध आईला कसे हुंगण्यास द्यायचे हे सांगायचे होते पण तो अचानक तिच्यामागे थांबला. ती बाटल्यांमधे कसलिशी बाटली शोधत होती. काही बाटल्या तिने उचलल्या व ती गर्रकन मागे वळली. त्याला तेथे पाहताच ती दचकली व तिच्या हातातून एक बाटली खाली पडली…. खळ्ळ्ळ्…. काचेचा एक तुकडा उडून ग्रेगॉरच्या गालाला चाटून गेला आणि त्यातील आग होणारे औषध त्याच्या अंगावर पडले. तेथे एक क्षणही न थांबता त्याच्या बहिणीने जमतील तितक्या बाटल्या हातात गोळ्या केल्या व ती आईकडे पळाली. जाताना तिने लाथाडून दरवाजा बंद केला. आता ग्रेगॉरची आणि त्याच्या आईची ताटातूट झाली, कदाचित ती त्याच्यामुळे मरायलाही टेकली असेल. बहीण घाबरेल म्हणून त्याला दरवाजाही उघडता येईना. ती आता आईबरोबर असणे महत्वाचे होते. आता थांबण्याशिवाय त्याच्या हातात काय होते …? अपराधीपणाची भावना, दु:ख व काळजी या भावनांनी त्याचा जीव कुरतडला. तो अस्वस्थपणे जमेल तेथे सरपटू लागला. भिंतीवर, टेबलावर, कपाटावर, जमिनीवर व शेवटी जेव्हा ती खोली त्याच्या भोवती गर्रकन फिरली तेव्हा त्या टेबलाच्या मध्यभागी निपचित पडला.

बराच वेळ ग्रेगॉर तसाच निपचित पडला होता. आजुबाजूलाही शांतता पसरली. एका दृष्टीने ठीकच झाले म्हणायचे. पण तेवढ्यात दरवाजावरील घंटी वाजली. मोलकरीण नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात आतून कडी लावून बसली होती त्यामुळे त्याच्या बहिणीला, ग्रेटालाच दरवाजा उघडावा लागला. त्याचे वडील बाहेरुन आले होते. आल्याआल्या मुलीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून काहीतरी गडबड आहे हे त्यांनी ओळखले व विचारले,

‘‘ काय चाललय काय ? काय झालंय ?’’

तिने खालच्या आवाजात उत्तर दिले,

‘‘आईला चक्कर आली आहे आणि ग्रेगॉर खोलीतून सुटला आहे.’’

‘‘मला वाटलच ! मी तुम्हाला हेच सांगत होतो पण तुम्ही बायका ऐकतच नाही.’’

ग्रेटाच्या बोलण्याचा त्याच्या वडिलांनी फारच विपरीत अर्थ काढला होता. तिने फक्त काय झाले हे एका वाक्यात सांगितले होते पण त्याच्या वडिलांनी त्यावरुन ग्रेगॉरने गोंधळ घातला होता असा अर्थ काढला. त्याला आता असे काहीतरी करायला हवे होते की त्याचे वडील खुष होतील. त्यांचा राग कमी होईल. त्यांना समजावून सांगण्याची ही वेळ नाही हे ताडून त्याने आपल्या खोलीच्या दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजाला टेकून त्याने आपले अंग मुडपून घेतले. त्याला वडिलांच्या हे लक्षात आणून द्यायचे होते की त्याला त्याच्या खोलीत जायचे आहे. व त्याला धक्के मारण्याची बिलकूल आवश्यकता नाही. दरवाजा उघडला की त्याच क्षणी तो खोलीत अदृष्य होईल. पण त्याच्या वडिलांकडे त्याच्या हालचालींतील बारकावे टिपण्याची क्षमता उरली नव्हती….

क्रमश:

मूळ लेखक : फ्रॅन्झ काफ्का
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

One Response to पिसूक….aka मेटॅमॉर्फॉसिस… भाग-५

  1. सौरभ म्हणतो आहे:

    जबरदस्त…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s