पिसूक….aka मेटॅमॉर्फॉसिस… भाग-४

image5

….‘‘ आई ! आई !’’ ग्रेगॉरने तिला खालच्या आवाजात हाक मारली व तिच्याकडे तो डोके उचलून पाहू लागला. ग्रेगॉरने कॉफी पाहिल्यावर दोन मिटक्या मारल्या त्यामुळे तो हेडक्लार्क त्याच्या डोक्यातून गेला. ते पाहिल्यावर त्याच्या आईने अजून एक किंकाळी फोडली व ती त्याच्या वडिलांच्या गळ्यात जाऊन पडली. ग्रेगॉरकडे आता त्याच्या आईवडिलांसाठी वेळ नव्हता. हेडक्लार्कला कुठल्याही परिस्थितीत थांबवणे त्याला भाग होते आणि तो तर आता पायऱ्यांवर जाऊन पोहोचला होता. त्या कठड्यावर आधारासाठी त्याने हनुवटी टेकली होती आणि तो मागे शेवटची नजर टाकण्याच्या तयारीत होता. त्याला गाठण्यासाठी ग्रेगॉरने पुढे झडप घातली पण त्याचा इरादा ओळखून हेडक्लार्क पायऱ्यांवरुन ताडताड उड्या मारुन रस्त्यावर नाहिसा झाला. पायऱ्या उतरताना तो घशातून किंचाळला, त्याने कसलातरी विचित्र आवाज काढला जो त्या हॉलमधे घुमला.

हेडक्लार्कच्या गोंधळाने इतक्या वेळ शांत असलेले ग्रेगॉरचे वडील बिथरले. हेडक्लार्कला थांबविण्याऐवजी त्यांनी हेडक्लार्कने तेथेच खुर्चीवर टाकलेली काठी, कोट व हॅट हातात घेतली व डाव्या हाताने टेबलावर पडलेले वर्तमानपत्र उचलले. ग्रेगॉरच्या पुढ्यात ते पाय आपटत त्या वर्तमानपत्र व काठीने ग्रेगॉरला खोलीत ढकलण्याचा प्रयत्न करु लागले. बिचाऱ्या ग्रेगॉरने अत्यंत लिनतेने खाली मान झुकवून झुकवून त्यांना विनंती करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य करण्यात आली नाही. किंबहुना ती विनंती समजलीच गेली नाही. त्याने मान झुकविली की त्याचे वडील त्याला आत हाकलत होते. थंडी मी म्हणत होती. वडिलांच्या मागे त्याच्या आईने धाडकन खिडकी उघडली आणि तिने त्यातून मान बाहेर काढून आपला चेहरा तळहातांनी झाकून घेतला. रस्त्यावरुन गोठलेल्या हवेचा एक झोत घरात घुसला. खिडकीचे पडदे उडाले, टेबलावरील वर्तमानपत्राची पाने फडफडली आणि जमिनीवर विस्कळीत होऊन पसरली. ग्रेगॉरच्या वडीलांनी दयामाया न दाखविता त्याला मागे हाकलण्यास सुरुवात केली, ‘‘ शूऽऽऽ शूक..’’ पण ग्रेगारला उलटे चालण्याची सवय नव्हती. त्याने प्रयत्न केला पण तो फारच हळू हळू मागे झाला. त्याला वळून पटकन खोलीत जाता आले असते पण त्याच्या थोड्याशाही हालचालींनी त्याच्या वडीलांनी खवळून हातातील काठी त्याच्या पाठीत किंवा डोक्यात घातली असती. पण मागे सरकायच्या प्रयत्नात त्याच्या लक्षात अजून एक गोष्ट आली ती म्हणजे मागे सरकताना तो कुठल्या दिशेने जातोय हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. वळण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. वडिलांवरची नजर न काढता त्याने वळण्याचा प्रयत्न सुरु केला. बहुतेक त्यांना त्याचा उद्देश लक्षात आला असावा. त्याला मदत म्हणून त्यांनी दुरुनच त्याला काठीने खोलीचा दरवाजा दाखविला.. एकदा…दोनदा…तीनदा.. ‘‘त्यांनी तो फुत्कार थांबवला तर किती बरं होईल’’ ग्रेगॉर मनाशी म्हणाला. त्या आवाजाने त्याचे डोके अगदी भणाणून उठले होते. त्या आवाजाच्या त्रासाने तो एकदा चुकीच्या दिशेने चालला होता. दुर्दैवाने तो पूर्ण वळाला तेव्हा त्याचे डोके दाराच्या फटीसमोर आले. त्यातून आत जाणे शक्यच नव्हते. त्यांच्या बिथरलेल्या मनस्थितीत त्याच्या वडिलांना दुसरे दार उघडावे हा विचार सुचणेही शक्यच नव्हते. त्याच्या मनात ग्रेगॉरला लवकरात लवकर आत हाकलणे एवढाच विचार प्रबळ होता. उभे राहून त्या फटीतून आत जाण्याची त्याची तयारी नव्हती. त्याचे वडील आता ग्रेगॉरला पुढे सरकण्याची घाई करीत होते. त्यांच्या आवाजाचा गोंगाट इतका वाढला होता की ग्रेगॉरला तो त्याच्या एकट्या वडीलांचा आवाज आहे यावर विश्र्वास बसेना. तो गोंगाट असह्य होऊन ग्रेगॉरने काय व्हायचे तो होऊ देत असा विचार करुन त्या फटीत आपले शरीर घुसवले. त्याबरोबर त्याच्या शरीराची एक बाजू वर उचलली गेली..त्याच्या बाजू जोरात घासल्या गेल्या आणि दरवाजावर व जमिनीवर हिरवट द्राव पसरला… या अशा परिस्थितीत ग्रेगॉरला पुढेही जाता येईना ना मागे. तो असहाय्यपणे त्याचे पाय केविलवाणे हलवित राहिला. तेवढ्यात त्याच्या वडीलांनी त्याला मागून एक जोरदार धक्का दिला. इतका जोरात की तो रक्तबंबाळ झाला व खोलीत आत दूरवर फेकला गेला. दरवाजा लावण्याचा आवाज झाला आणि अखेरीस काही क्षण तेथे शांतता पसरली.

ग्रेगॉर संध्याकाळपर्यंत ठार झोपला. त्याला झोप म्हणावे का एक प्रकारची गुंगी म्हणावी हे त्याला कळत नव्हते. भरपूर झोप झाल्यामुळे तो अजून थोड्यावेळाने उठलाच असता पण कोणीतरी हळूच दरवाजा लावला व बाहेर दबक्या पावलाने चालण्याचा आवाज झाल्यामुळे त्याला जाग आली. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड खोलीतील छतावर अस्ताव्यस्त पडला होता पण खाली, जेथे तो पडला होता तेथे मात्र काळाकुट्ट अंधार होता. डोक्यावरील वळवळणाऱ्या स्पृषांचा त्याने वापर करुन पाहिला. त्याला त्यांच्या स्पर्षज्ञानाचे कौतुक वाटले. त्यांचा वापर करुन तो अडखळत दरवाजापर्यंत पोहोचला. त्याला बाहेर काय चालले आहे त्याचा कानोसा घ्यायचा होता. त्याच्या डाव्या अंगावर एक ठसठसणारा व्रण उठला होता त्यामुळे त्याच्या पायांच्या दोन रांगांवर त्याला लंगडत चालावे लागत होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणून त्या सकाळच्या गडबडीत त्याचा एक पाय जायबंदी झाला होता. नशीब एकच पाय जायबंदी झाला होता. खरे तर सगळेच व्हायचे. तो पाय लोंबत मागे मागे खरडत येत होता.

तो दरवाजापर्यंत पोहोचला आणि त्याच्या लक्षात आले की त्याला बाहेर काय चालले आहे याचा कानोसा घ्यायचाच नव्हता. तो दरवाजापाशी खेचला गेला होता तो अन्नाच्या वासाने. तेथेच जमिनीवर एक भांडे होते ज्यात ताज्या दुधावर पावाचे तुकडे तरंग होते. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. भुक लागलीच होती. आनंदाने त्याने त्या दुधात तोंड बुडविले पण लगेचच मागे घेतले. डाव्या अंगाला दु:खापत झाल्यामुळे त्याला ते दुध पिता येईना. त्याच्या लक्षात आले त्याच्या खाण्याच्या क्रियेत त्याला आता सगळ्या शरीराची गरज भासत होती. आणि त्याला दुध आवडायचे हे खरे असले (म्हणूनच त्याच्या बहिणीने ते तेथे ठेवले असणार) तरी आत्ता त्याला दुध नकोसे वाटले. त्याने तोंड वळवले आणि तो खोलीच्या मध्यभागी आला.

दरवाजाच्या फटीतून त्याला थंडीमुळे पेटलेली शेगडी दिसत होती. या वेळेला त्याचे वडील आईला वर्तमानपत्रातील बातम्या मोठ्याने वाचून दाखवायचे. पण आश्चर्य म्हणजे आज सगळीकडे शांतता होती अगदी बाहेर रस्त्यावरही स्मशान शांतता पसरली होती. कदाचित त्याच्या वडिलांनी तो वर्तमानपत्र वाचनाचा कार्यक्रम सोडून दिला असावा. त्याच्या बहिणीने त्याला तसे एकदा पत्रात लिहिलेही होते. ती शांतता, तो निवांतपणा पाहून त्याला वाटले, ‘‘या सुंदर घरात किती निवांत आयुष्य जगतोय आपण !’’ अंधारातून पाहताना तो हे सगळे त्याच्या कुटुंबियांना देऊ शकतोय म्हणून त्याच्या मनात स्वत:बद्दल अभिमान दाटून आला. विचारात हरवून जायला नको म्हणून त्याने त्या खोलीत इकडे तिकडे हालचाल करण्यास सुरुवात केली.

त्या संध्याकाळी कोणीतरी बाजूचे दार ऊघडून पटकन बंद केले. थोड्याच वेळाने दुसऱ्या बाजूच्या खोलीचा दरवाजाही उघडला आणि पटकन बंद झाला. कोणालातरी आत यायचे होते पण त्याचा धीर होत नव्हता. ग्रेगॉरने बैठकीच्या खोलीत जो दरवाजा उघडत असे त्यासमोरच थांबायचे ठरविले. जो कोणी तो दरवाजा उघडेल त्याला तो पटकन आत येण्याचे विनंती करणार होता. नाहीच जमले तर कोण आत येण्याचा प्रयत्न करतंय हे तरी त्याला कळले असते. पण दुर्दैवाने तो दरवाजा परत काही उघडला गेला नाही. त्याने बराच वेळ वाट पाहिली. रात्र झाली आणि बैठकीच्या खोलीतील शेकोटी विझली. म्हणजे ते ‘‘आत्तापर्यंत जागेच होते तर !’’ तो मनाशी म्हणाला. त्याला हलक्या पावलांनी चालण्याचा आवाज ऐकू आला. आता सकाळपर्यंत कोणी त्याच्या खोलीत येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याला आता विचार करण्यास भरपूर वेळ व निवांतपणा मिळणार होता. आता पुढील आयुष्य कसे व्यतीत करायचे याबद्दल त्याला विचार करणे महत्वाचे वाटत होते. त्या अवाढव्य खोलीत जमिनीवर पोटावर पडलेल्या ग्रेगॉरच्या मनात अचानक कसलीतरी अनामिक भिती दाटून आली. काहीतरी वाईट घडणार आहे असे त्याला वाटू लागले. काय ते त्याला सांगता येत नव्हते. ज्या खोलीत त्याने गेली पाच वर्षे काढली होती त्या खोलीवर त्याने नजर फिरविली आणि कशाचीही लाज न बाळगता तो त्या सोफ्याखाली सरकला. गंमत म्हणजे त्याला तेथे एकदम शांत व सुरक्षित वाटले. आपले सगळे अंग सोफ्याखाली जात नाही हे लक्षात येताच त्याने अंग आक्रसले पण जेवढे आत गेलं त्यावर तो खुष झाला.

त्याने रात्रभर तेथेच मुक्कम ठोकला. रात्री तशी त्याला झोप आलीच नाही शिवाय भुकेने त्याला अधूनमधून जाग येत होती. रात्रभर विचार करुन त्याचा मेंदू फुटायला आला होता. सगळ्या बाजूने विचार करीत तो परत परत एकाच निष्कर्षाशी येऊन पोहोचत होता. ‘‘सध्यातरी त्याला गप्प रहायला हवे. गप्प राहून त्याच्या कुटुंबाला मदतच होईल.’’ त्याने निश्चय केला. त्याच्यामुळेच त्याच्या कुटुंबावर हा दारुण प्रसंग गुदरला होता.

अगदी पहाटे पहाटे, अजूनही अंधारच असताना ग्रेगॉरला त्याच्या निश्चयाची परिक्षा घेण्याची संधी मिळाली. त्याच्या बहिणीने बैठकीच्या खोलीतून त्याच्या खोलीत उघडणारा दरवाजा उघडला. तिचे आवरुन झालेले दिसत होते. तिला ग्रेगॉर प्रथम दिसला नाही. तिने एक नजर सोफ्याखालीही टाकली… ‘‘कुठेतरी असायलाच हवा तो.. असा नाहिसा होऊ शकत नाही एकदम ’’ ती पुटपुटली. तिने घाबरुन दरवाजा परत लावला . त्यानंतर तिच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक, ती दरवाजा उघडून चवड्यावर, पावलांचा बिलकूल आवाज न करता आत आली. जणू काही ती एखाद्या अनोळखी रुग्णाला भेटण्यास आली होती. ग्रेगॉरने सोफ्याच्या खालून त्याच्या काठापर्यंत आपले डोके बाहेर काढले. त्याने तिला पहात विचार केला, ‘‘तिने मी टाकलेले दुध पाहिले असेल का? मी भूक असताना ते टाकले आहे हे तिच्या लक्षात येईल का ? मला आवडणारे अन्न ती आणेल का ? समजा तिने दुसरे अन्न आणले नाही तर त्याने ठरविले की तिला सामोरे जाण्यापेक्षा भुकेने तडफडून मरणे बरे. त्याच वेळी एकदम पुढे होऊन तिच्या पाया पडून काहीतरी खायला मागावे अशीही एक इच्छा त्याच्या मनात उफाळून आली. तेवढ्यात तिची दृष्टी त्या दुधाच्या भांड्यावर पडली. त्यातील दुध तसेच होते फक्त आजुबाजुला काही थेंब सांडले होते. तिने ते पटकन उचलले अर्थात उचलताना तिने त्याला आपल्या हाताचा स्पर्ष होणार नाही याची काळजी घेतली. तेथेच पडलेला एक रुमाल घेऊन तिने ते भांडे उचलले. ती आता काय आणेल याबद्दल ग्रेगॉरच्या मनात अपार उत्सुकता दाटून आली. त्याने अनेक शक्यतांचा विचार केला. पण तिने पुढे काय केले हे पाहून तो अचंबित झाला. त्याचा त्याने विचारच केला नव्हता. तिच्या चांगुलपणाचा असा अपमान झालेला पाहून तो मनातल्या मनात खजील झाला. त्याला खाण्यासाठी काय आवडेल हे जाणून घेण्यासाठी तिने अनेक प्रकारचे अन्नपदार्थ एका जुन्या वर्तमानपत्रात पसरुन आणले होते. कुजत आलेला भाजीपाला, कालच्या रात्रीच्या जेवणात उरलेली चिकनची हाडे, घट्ट झालेला, थोडासा वाळलेला सॉस, थोड्या मनुका, बदाम, चीजचा एक तुकडा ज्याला दोन दिवसापूर्वी ग्रेगॉरने तोंडही लावले नसते, लोणी लावलेला, वाळलेला पाव असे अनेक पदार्थ त्याच्या नजरेस पडले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिने एका भांड्यात पाणी भरुन ठेवले. अर्थात ते फक्त त्याच्यासाठीच असणार. तिच्या समोर तो खाणार नाही हे उमजून ती शहाणी मुलगी पटकन बाहेर पडली. तिने दरवाजा हळूच लावून घेतला आणि ते त्याला समजावे म्हणून तिने त्यातील किल्लीही फिरवली. ती जाताच ग्रेगॉरच्या सगळ्या पायांची आपोआप, अचानक त्या अन्नाच्या दिशेला वाटचाल चालू झाली. त्याची डाव्या बाजूची जखम भरुन आली होती आणि त्याला कसलाही अशक्तपणा जाणवत नव्हता. त्याला त्याचे आश्चर्य वाटले. मागच्या महिन्यात त्याला चाकूने साधे कापले होते, ती जखम परवापर्यंत भरली नव्हती. माझ्या संवेदना कमी झाल्यात की काय त्याने स्वत:ला विचारले व तो अधाशासारखे ते चीज चाटू लागला. त्याचेही त्याला आश्चर्य वाटले. त्याला चीज एवढे आवडत नसे आणि आता त्याला ते कधी एकदा खातोय असे झाले होते. एकामागून एक असे त्याने ते सगळे अन्न फस्त केले. ताज्या अन्नाचे त्याला आता विशेष आकर्षण उरले नव्हते. त्याला त्या ताज्या अन्नाचा उग्र वासही सहन होत नव्हता. त्याने खातानाही त्याचे अन्न जरा बाजूला घेऊनच ओरपले. जेवण झाल्यावर तो तेथेच सुस्त पडून राहिला. तेवढ्यात त्याच्या बहिणीने कुलपातील किल्ली हळुहळु फिरविली. तिला बहुतेक त्याला मागे सरकण्यासाठी वेळ द्यायचा असावा.

त्या आवाजाने दचकून तो त्याच्या गुंगीतून उठला आणि घाईघाईने सोफ्याखाली गेला. त्या सोफ्याखाली जाताना आता त्याला बरीच धडपड करावी लागली. बहुतेक खाऊन खाऊन तो चांगलाच फुगला होता. सोफ्याखाली तो इतका कोंबला गेला होता की त्याला धड श्र्वासही घेता येत नव्हता. त्याच्या बहिणीला उष्टे साफ करताना पाहून त्याचा जीव गुदमरला. बुबुळे बाहेर येतात की काय अशी परिस्थिती झाली. तिने केरभरणे हातात घेऊन खरकटे काढले. त्याने स्पर्ष न केलेले अन्नही तिने काळजीपूर्वक त्यात भरले जणू आता त्याचा कोणालाही उपयोग नव्हता. कचऱ्याच्या बादलीत भरुन तिने त्यावर झाकण घातले व बाहेर नेले. तिची पाठ दिसते ना दिसते तोच ग्रेगॉर सोफ्याखालून तडफडत बाहेर आला आणि त्याने शरीर ताणून एक दीर्घ श्र्वास घेतला व सोडला.

त्याच्या बहिणीने त्याला याच प्रकारे जेवण देण्यास सुरुवात केली. सकाळी लवकर जेव्हा त्याचे आई-वडील व मोलकरीण झोपलेली असायची तेव्हा आणि नंतर त्यांचची वामकुक्षी चालू असायची तेव्हा. याचा अर्थ असा नाही की त्यांना त्याला जेवायला द्यायचे नव्हते. याचा अर्थ एवढाच की त्याच्या बहिणीला त्यांच्या आईवडिलांना जास्त काळजीत टाकायचे नव्हते. तिला कल्पना होती की ते बसलेल्या धक्क्यातूनच अजून बाहेर आलेले नव्हते.

ज्या डॉक्टरांना आणि कुलुपकिल्लीवाल्याला बोलाविण्याबद्दल चर्चा झाली होती त्यांना काय सांगण्यात आले होते हे ग्रेगॉरला समजले नाही. त्याचे बोलणे कोणालाच म्हणजे त्याच्या बहिणीलाही समजत नव्हते त्यामुळे त्याला त्यांना हे सांगता येईना की त्याला मात्र ते काय बोलताएत ते सगळे समजते. त्याची बहीण जेव्हा त्याव्या खोलीत येई तेव्हा तो तिचे पुटपुटणे ऐकून स्वत:चे समाधान करुन घेत असे. कधी कधी ती उसासेही सोडून प्रार्थना करीत असे. नंतर नंतर या परिस्थितीत रुळल्यावर, अर्थात पूर्णपणे रुळणे शक्यच नव्हते, जेव्हा तो जेवण फस्त करायचा तेव्हा तिचे एखादे वाक्य त्याच्या कानावर पडायचे. ‘‘आज त्याला जेवण आवडले बरं का !’’ जेव्हा तो खात नसे तेव्हा ती इतरांना मोठ्या दु:खी स्वरात सांगत असे, ‘‘आज सगळे तसेच होते !’’

 ग्रेगॉरला बाहेर काय चालले आहे हे प्रत्यक्ष कळणे शक्यच नव्हते पण त्याला बाजूच्या दोन्ही खोलीत चाललेले बोलणे मात्र ऐकू यायचे. आवाज झाल्यावर तो पटकन त्या दरवाजाला कान देऊन उभा रहात असे. पहिले काही दिवस त्यांचे बोलणे फक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्या संबंधितच असायचे. दोन दिवस ते आता पुढे काय करायचे यावर खल करताना त्याला ऐकू आले. जेवताना सुद्धा त्यांच्या बोलण्यात हाच विषय असायचा. घरात एकट्याला कोणी सोडत नव्हते आणि घर सोडून जाण्याचा विचारच ते करु शकत नव्हते. पहिल्याच दिवशी स्वयंपाक करणाऱ्या बाईने ग्रेगॉरच्या आईपुढे डोळ्यात पाणी आणून नोकरी सोडण्याची परवानगी मागितली. जणू काही नोकरीवरुन काढून ते तिच्यावर अगणित उपकारच करणार होते. कोणी न सांगता तिने या बाबतीत ती कुठेही बोलणार नाही असे वचनही त्याच्या आईला दिले.

आता ग्रेगॉरच्या बिचाऱ्या बहिणीवर स्वयंपाक करण्याची जबाबदारी येऊन पडली. अर्थात ते काम एवढे त्रासदायक नव्हते म्हणा कारण सगळ्यांचीच भूक पार मेली होती. ग्रेगॉरला ते एकमेकांना खाण्याचा आग्रह करताना सारखे ऐकू येत होते पण ज्याला ते जेवायला सांगत तो एकच उत्तर देई, ‘‘ नको माझे पोट भरले आहे’’ किंवा मला भूक नाही.’’ ते बिअरही पीत नव्हते. जेव्हा ग्रेगॉरच्या बहिणीने वडिलांना ‘‘मी जाऊन बिअर आणू का ?’’ किंवा ‘‘ मागवू का ?’’ असे विचारले तेव्हा त्यांनी कोरडेपणाने उत्तर दिले, ‘‘नको.’’ असे कधी झाले नव्हते. त्याविषयी पुढे काही चर्चाही झाली नाही. तेही विचित्रच.

पहिल्याच दिवशी ग्रेगॉरच्या वडिलांनी त्याच्या आईला आणि बहिणीला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली. ग्रेगॉरच्या वडिलांचा धंदा पाच वर्षापूर्वीच बसला होता. त्यातून वाचलेल्या एका छोट्या तिजोरीतून ते सारखे कुठलातरी कागद काढण्यासाठी उठत होते, टेबलावर येत होते, व ग्रेगॉरच्या बहिणीला व आईला काहीतरी समजावून सांगत होते. त्या आवाज करणाऱ्या तिजोरीचा दरवाजाच्या आवाजाने ते सहज समजत होते. या बंदीवासात पडल्यानंतर ग्रेगॉरला प्रथमच काहीतरी चांगले ऐकू आले असावे. त्याचे असे मत होते की वडिलांच्या धंद्यातील कुठलीच गोष्ट आता शिल्लक नव्हती. म्हणजे वडिलांनी तरी त्याला तसे काही सांगितले नव्हते आणि तोही विचारण्याच्या फंदात पडला नव्हता. धंदा बंद पडल्यावर त्यावेळी अहोरात्र कष्ट करुन स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक दु:स्थितीतून बाहेर आणायचे एवढे एकच ध्येय त्याच्यासमोर होते. त्यासाठीच त्याने साध्या कारकुनाची नोकरी सोडून फिरस्त्या विक्रेत्याची नोकरी पत्करली होती. अर्थात या मागे जास्त पैसे मिळवायचे एवढे एकच उद्दीष्ट होते. त्याचा परिणामही लगेच दिसून आला होता. चांगले दिवस होते ते. नंतर नंतर ग्रेगॉर इतके पैसे मिळवू लागला होता की तो स्वत:चा खर्च भागवून आख्ख्या कुटुंबाला पोसू लागला होता. त्या उत्पन्नाची त्यांना सवयच झाली होती. ग्रेगॉरला व घरातील इतरांनाही. ग्रेगॉर घरात पैसे देत होता आणि ते घेतलेही जात होते पण घरातील प्रेम थोडेसे का होईना कमी झाले होते हे नाकारण्यात अर्थ नव्हता. त्याला फक्त त्याच्या बहिणीबद्दल आपलेपणा व प्रेम वाटायचे. त्याच्या बहिणीला संगितात गती होती आणि तिला संगीत आवडायचेही खूप. ती चांगली व्हायोलीन वाजवायचीही . त्याने तिला एक व्हायोलीन आणून द्यायचे ठरविले होते. एवढेच नाही तर एका महागड्या पण उत्तम परंपरा असलेल्या संगीतवर्गात घालायचेही ठरविले होते. ते दोघे नेहमी त्याबद्दल गप्पा मारायचे पण एक पाहिलेले स्वप्न या पलिकडे त्याला अर्थ नसायचा आणि ते सत्यात उतरणार नाही याची त्या दोघांनाही कल्पना होती. जेव्हा केव्हा याचा उल्लेख ते जेवणाच्या टेबलावर करीत तेव्हा त्यांचे आईवडील लगेचच त्यांना जमिनीवर आणत असत. हे सगळे खरे असले तरी ग्रेगॉर तिला त्या वर्गात घालून ख्रिसमसची भेट देणार होता.….

क्रमश:

मुळ लेखक फ्रॅन्झ काफ्का.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s