नथ……….भाग-१

Untitled-1

नथ……

माधव गोविंद भानू (खाजगीवाले)…….
१९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला. स्वत: नजिब़उल्लाने काबूलमधे राष्ट्र्संघाच्या कार्यालयात आसरा घेतला. त्याला असा विश्वास वाटत होता की खिलजी वंशाचे तालिबान त्यांच्यासारख्याच दुसऱ्या खिलजीच्या वाटे जाणार नाहीत पण तो अंदाज साफ चुकला. पाकिस्तानच्या पुरत्या कह्यात गेलेल्या तालिबानच्या टोळीप्रमुखाला नजिब़उल्लाला धडा शिकविण्याचा पाकिस्तानकडून स्पष्ट आदेश होता. मुल्ला अब्दुल रझाकने तो शब्दश: अमलात आणला व नजिबउल्ला अहमदझाईचे शब्द खरे ठरविले. त्याने म्हटले होते की ‘अफगाणी आपल्या चुकांतून कधीच शिकत नाहीत व ते सारख्या त्याच त्याच चुका करतात.’ मुल्ला रझाकने व आय् एस् आय् च्या एका अधिकाऱ्याने नजिब़उल्लाला ट्रकच्या मागे बांधून फरफटवत ठार मारले, त्याच्या प्रेताची विटंबना केली व ते शव राष्ट्रसंघाच्या कार्यालयाबाहेर उलटे टांगले. नजिब़उल्ला संपला आणि अफगाणीस्तानमधील शहाणपण संपले असे म्हणण्यास हरकत नाही.

याच काळात मी बाबरी मशिदीच्या भिंती उन्मादात फोडत होतो. व मित्रांमधे ते कसे योग्य आहे याबद्दल जोरजोरात वाद घालत होतो.

रशियाच्या फौजा मागे गेल्या आणि अफगाणिस्तानमधे टोळीयुद्धांचे पेव फुटले. कोण कोणाकडून लढतोय आणि कशासाठी लढतोय हे कळेनासे झाले. लाखो जनता बेघर झाली व सोन्यासारख्या देशाची तुलना सोमालियाशी हो़ऊ लागली. अहमदझाई गेले आणि करझाई आले व २००१ मधे अमेरिकेची वकिलात परत एकदा उघडली. ही वकिलात काबूलच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वझीर अकबर खान विभागात मसूद रोडवर आहे.

ज्या ठिकाणी ही गोष्ट सुरु झाली ते ठिकाण हे आहे व काळ २०११. पण त्या अगोदर तुम्हाला मला या देशाविषयी एवढी माहिती का व कशी हे सांगावे लागेल. आमच्या मुलीने शिकण्यासाठी अमेरिकेची वाट धरली एवढ्यावरच हे थांबते तर ठीक. पण तिने शिक्षण झाल्यावर तेथेच नोकरी धरली आणि एका उमद्या अमेरिकन माणसाशी लग्न केल्यावर मात्र घरात माजायचा तो गोंधळ माजला. सौ व आमच्या पिताश्रींची मानसिक अवस्था जरा नाजुकच झाली. साहजिकच आहे आमच्या आख्या खानदानात असे वेडे धाडस कोणी केले नव्हते.

आमचे घराणे म्हणजे वेळासचे भानूंचे घराणे. आमच्या पिढ्यांनपिढ्या पेशव्यांच्या पदरी नोकरी करत होत्या तर काही जण त्याच्याही अगोदर नागपुरकर भोसल्यांच्या पदरी रुजू झाले होते. भानूंच्या ज्या अनेक शाखा भारतभर पांगल्या त्यातील आमची एक. एका शाखेत नाना फडणवीस निपजले तर आमच्या शाखेच्या एका पुर्वजाने बडोद्याला गायकवाड महारांजाकडे नोकरी पत्करली. ते त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचे काम बघायचे त्यामुळे त्यांचे नाव झाले ‘खाजगीवाले’. काळानुसार झालेल्या बदलांमुळे खाजगीवालेही अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी बऱ्याच ठिकाणी पांगले. आमचे आजोबा पुण्याला स्थायिक झाले. आमच्या घराण्यात त्या काळात हिंदूमहासभेचे भयंकर प्रस्थ होते. कडवेपणाची किंचित वेडसर झाकही आमच्या घरातील सर्व कर्त्या पुरुषांमधे दिसायची. अर्थात मीही त्याला अपवाद नव्हतो. त्या वेडात आम्ही काय काय करायचो हे सांगायची ही जागा नाही.

यथावकाश आमच्या मंडळींचा व पिताश्रींचा विरोध मावळला व अमेरिकेची वारी झाल्यावर तर तो पारच मावळला. घराण्याची ‘अब्रू धूळीस मिळवली’ पासून जावयाच्या कोतुकापर्यंत प्रवास केव्हा झाला हे आमचे आम्हालाच कळले नाही. देवासच्या म्हणजे आमच्या मूळगावातील देवळाला भरगोस देणगी मिळाल्यावर तर आमच्यावर कडवट टिका करणाऱ्या गावच्या भटांच्या जिभेवर आमच्या जावयाचे कौतुक खेळू लागले. आमच्या नातवाने तर कमालच केली. अत्यंत बुद्धिमान व देखणा हा तरुण ‘ आर्य अँगस कँपबेल ’ एम. बी. ए. झाला व अमेरिकेच्या परराष्ट्रखात्यात भरती झाला. त्याच्या यशाची कमान सतत चढतीच राहिली आहे. पण त्याला भारतात स्थायिक व्हायचे आहे. त्याची कारणे अनेक आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे पठ्ठ्याने वेळासच्या पटवर्धनांच्या मुलिशी लग्न केले आहे. ते प्रकरणही खरे तर एका कादंबरीचाच विषय आहे..

२००९ साली आर्य अमेरिकेच्या अफगाणिस्थानमधील कॉन्स्युलेटमधे आर्थिक बाबी हाताळणारा आधिकारी म्हणून रुजू झाला आणि लवकरच त्याने आपले कुटुंब तेथे हलविले. तेथे असणाऱ्या अनेक बैठ्या इमारतींमधे एका इमारतीमधे राहण्याची सोय असल्यामुळे तसे काळजीचे कारण नव्हते पण अर्थात काळजी वाटतच होती हेही खरंच……

आर्य अँगस कँपबेल……..
२००९ साली मी माझ्या नवीन नोकरीच्या ठिकाणी म्हणजे काबूलमधे आमच्या वकिलातीत रुजू झालो आणि लगेचच कामाला लागलो. सगळेच नवीन व त्या राष्ट्राची नव्याने पायाभरणी करणे एवढे सोपे नव्हते. त्यात अफगाणिस्थानमधे असंख्य जमातीच्या टोळ्यांचा सुळसुळाट होता. देशाचे हित डोळ्यासमोर ठेऊन या सर्व टोळ्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणे हे महा कर्मकठीण काम होते. त्यासाठी मला व माझ्या हाताखालील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते त्यात अफगाणिस्थानचा इतिहास, त्यांच्या आपापसातील लढाया, त्यांची टोळीयुद्धे, त्यांचे रितीरिवाज, प्रत्येक टोळीचा स्वभाव, इत्यादींचा अभ्यास करावा लागला. सगळ्यात शेवटी प्रत्येकाला लष्करी प्रशिक्षण घ्यावे लागले ते वेगळेच. हे प्रशिक्षण लष्करी प्रशिक्षणाइतके खडतर नव्हते पण कमीत कमी बंदूक चालविणे व हातघाईच्या लढाईत काय करावे याचे निश्चित होते.

अफगाणिस्थानला येण्याअगोदर आम्ही दोघे भारतात जाऊन आलो. माझ्या आजोबांची व माझ्या पत्नीच्या म्हणजे मानसीच्या वडिलांची मुसलमानांबद्दलची व पठाणांबद्दल काय मते आहेत याची मला त्यांच्याबरोबर झडलेल्या गप्पांवरुन कल्पना आली होती. त्यांना अफगाणिस्थानबद्दल फारच कमी माहिती होती. अफगाणिस्थानमधे राहणाऱ्या सर्वांना ते पठाणच म्हणत. पठाणांविषयी त्यांना बरीच चुकीची माहिती होती. मूळात पठाण हा शब्दच अफगाणी नाही. अफगाणीस्थानमधील लोकांना हिंदुस्थानात पठाण म्हणत असत आणि तो शब्द आला पश्तूनवा या शब्दावरुन. आफ्रिदी जमाती याचा उच्चार पॅश्तूनवा असा करत असत. आम्ही इतिहासावर गप्पा मारताना दोन विषय मात्र नेहमीच चर्चिले जातात. एक म्हणजे महाभारतातील शकूनी व दुसरा म्हणजे पानिपतचे युद्ध. माझ्या अभ्यासक्रमात माझा या विषयावरील पूर्ण अभ्यास झाला होता पण मी त्यांच्याशी वाद घालायचा नाही असे ठरवूनच टाकले आहे. त्यांच्या या युद्धाबद्दलच्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या. साहजिकच आहे त्या युद्धाचा आघात त्यांच्या घराण्यावर त्या काळात झाला असणार. दोघांचेही पूर्वज त्या युद्धात जखमी झाले होते किंवा धारातिर्थी पडले होते.

२०११ साली राजदूत कार्ल आयकेनबेरी यांच्या काळात आमच्या वकिलातीवर हल्ला झाला आणि मला रोज भारतात दूरध्वनी करायची ताकीद मिळाली. नंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानात आले….पुढचे सगळ्यांना माहितच आहे. त्यानंतर मात्र आमच्या कार्यालयात भरपूर लोक भरती करण्यात आले व कामही वाढले. माझ्या खात्यातही तीन नवीन माणसे भरती करण्यात आले. एकाचे नाव होते जॉन. तो होता न्युयॉर्कचा व दोन अफगाणी होते. एकाचे नाव होते इस्माईलखान बाम्झाई. दुसरा त्याचाच धाकटा भाऊ होता ज्याचे नाव होते वलिखान. हे दोघेही बाम्झाई जमातीचे होते. दोघेही उच्चशिक्षित व वागण्यात आदबशीर होते. सध्याचा क्रिकेटवीर …‘इम्रान खान‘ त्याला डोळ्यासमोर आणलेत तर काम भागेल. कामालाही बरे होते ते. हाताखालच्या अफगाणी माणसांशी कामाव्यतरिक्त संबंध वाढवायचे नाहीत हा आमच्या प्रशिक्षणाचाच एक भाग असल्यामुळे त्यांच्याशी कामापुरताच संबंध आम्ही ठेवला होता.

धर्मांतराबाबतही माझ्या सासऱ्यांचे व अजोबांचे विचार फारच जहाल होते. त्यांच्यातील कोणातरी पूर्वजाने म्हणे मरण पत्करले होते पण धर्म बदलला नव्हता. पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हते की त्यावेळी मरण किंवा धर्मांतर हे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक तिसराही असायचा, तो म्हणजे देश सोडणे. आपला धर्म का भूमी? हे निवडणे मरणाहूनही अवघड. आपली निष्ठा जमिनीशी का धर्माशी? मला पोसणारी जमीन पहिली का धर्म पहिला?
सामान्य माणसे देश सोडत नाहीत.
जी सोडतात ती असामान्य असेही म्हणता येत नाही.
देश सोडणे त्यांना शक्य असते एवढेच !
धर्मांतराकडे आम्ही एक सोय म्हणून बघतो. इतर किमत शून्य !

यांच्यातले नशिबवान कोण ते काळच ठरवतो. हिंदुस्थानातील ज्यांनी धर्म बदलला त्यांचे तसे छानच चालले आहे असे म्हणावे लागेल. मुख्य म्हणजे ते जिवंत राहिले व त्यांचा वंशही चालू राहिला. पण हे त्यांच्या पचनी पडणे अवघड आहे. सुदैवाने माझे व मानसीचे चांगले पटते कारण आमच्यातील सांस्कृतिक दरी आम्ही समर्थपणे सांभाळली आहे. त्या दरीत आम्ही उतरतच नाही. मानसीने सगळ्या गावाचा विरोध पत्करुन माझ्याशी लग्न केले तेव्हाच आमच्या एकमेकांवरील प्रेमाचा कस लागला होता. विरोधाला सामोरे जाऊन लग्न करण्यातील मजा काही औरच असते.

२०११च्या शेवटी कार्लची अमेरिकेला बदली झाली आणि त्याचा निरोप सभारंभ दणक्यात पार पडला.

त्यानंतर २०१२ च्या मार्चमधे आमच्या वकिलातीवर परत एकदा पाकिस्तानी तालिबानने हल्ला चढविला. आम्ही जवळजवळ तीन दिवस त्यांच्या वेढ्यात सापडलो होतो. नशिबाने बायको व मुले भारतात गेली होती त्यामुळे त्यांची काळजी नव्हती. तालिबानी इतका गोळीबार करत होते की खिडकीसमोर उभे राहण्याचीही सोय नव्हती. ते तीन दिवस आम्ही जमिनीवर टेबलाच्या आड बसून काढले. दुसऱ्या दिवशी रात्री मी व इस्माईल खान गप्पा मरत बसलो होतो. अशा वेळी माणसे जरा जास्तच हळवी होतात व मनात सतत आपल्या प्रियजनांच्या आठवणी गर्दी करतात. मन घरादाराच्या आठवणींनी खिन्न होते व मनावर सतत एक प्रकारचे दडपण असते. ते दूर करण्यासाठी मग माणसे एक्मेकांजवळ मने मोकळी करतात. त्या दिवसी असेच झाले. इस्माईल मला त्याच्या घरादाराबद्दल सांगत होता. त्यांचे गावाकडील घर किती मोठे आहे इ.इ.इ…. मीही माझ्या पाकिटातील मानसीचा फोटो काढला व तिच्याकडे बघत बसलो. वेळासच्या दिवाळीतील भेटीच्यावेळी काढलेल्या फोटोत कसली सुंदर दिसत होती ती ! डोक़्यावर पदर, नाकात नथ…व्वा…इस्माईलनेही तो फोटो पाहिला. माझ्याकडून घेतला व परत एकदा निरखून पाहिला. हे नाकात काय घातले आहे याबद्दल चौकशी केली व सुंदर या अर्थाची खूण करुन तो फोटो मला परत दिला…हा प्रसंग मी विसरुनही गेलो….
…… पुढे केव्हातरी इस्माईलच्या घरी जाईपर्यंत…………

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

संपूर्ण काल्पनिक……
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s