एक लघुकथा…..अमान

माझ्या बापाचे नाव ‘नासिर’

माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही.

आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर !

आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते पण कसे त्याची आम्हाला कल्पना असायची कारण नव्हते. सगळे सातआठ महिने शेतावर काम करीत व उरलेले महिने बाहेर काम शोधत फिरत. आमच्या वस्तीचा प्रमुख होता ‘बुखूतखान’ याला सगळे आदराने ‘जमादार’ म्हणत.

हे सगळे बदलले दोन वर्षापूर्वी. दरवर्षी आब्बा मला छोट्या तट्टूवर बसवून त्यांच्याबरोबर हिंडायला न्यायचा. तट्टूचा लगाम असायचा माझ्या चाचाकडे. त्याचे नाव ‘फिरंगी’. मी एकदा आब्बाला विचारले,

‘ आब्बा ! चाचाजानचे नाव फिरंगी कोणी ठेवले ?’

‘ बुलू एकदा फिरंग्यांनी आपल्या जुन्या वस्तीवर हल्ला चढवला तेव्हा हा तुझा चाचा त्याच्या अम्माच्या पोटात होता. त्या धावपळीत तो या उघड्या जगात आला तेव्हापासून त्याला ‘फिरंग्या‘ हे नाव पडले ! पण तू मात्र त्याला फिरंग्या म्हणू नकोस. नाहीतर थप्पड खाशील. तो तुझा उस्ताद आहे माहिती आहे ना?’

‘हो अब्बा !’

त्या सफरीत आम्ही चंपानेरपाशी नर्मदा पार केली. गेली दोन् वर्षे मी या सफरीवर येत होतो. पहिल्या वर्षी मी तट्टूवर बसून सगळ्यांच्या मागे उस सोलत आरामात जात असे. पुढे काय चालले आहे याची मला कल्पनाही नसायची. पुढच्याच वर्षी पुढे काय चालले असते त्याची मला झलक दाखविण्यात आली. मला अजूनही ते सगळे स्पष्ट आठवते. एका जाजमावर आब्बा, फिरंगी व अजून दोघे जण गपछप करीत होते. त्या दोघांच्या मागे जमादार व अजून दोघे बसले होते. गप्पांना अगदी जोर चढला होता. तेवढ्यात जमादार मोठ्यांने हसत ओरडला, ‘चलो पान लाओ’. हा इशारा, ज्याला आमच्या भाषेत झिरनी म्हणतात, मिळाल्यावर, त्याच क्षणी त्या दोन उतारुंच्या मानेभोवती रुमाल पडले व आवळले गेले. एकाने त्याचे डोके खाली दाबले. थोड्याच वेळात त्या माणसांचे तडफड करणारे पाय शांत झाले. एवढे झाल्यावर मला लगेचच तेथून हलविण्यात आले. त्या रात्री मी आब्बाला बरेच फालतूचे प्रश्र्न विचारले आणि त्याने त्या सगळ्यांची सविस्तर उत्तरेही दिली.

‘माणसे ठार मारणे वाईट नाही का ?’

‘माणसाने मारले म्हणून थोडेच कोणी मरतो ? त्याला तर भवानी घेऊन जाते’ माझ्या बापाने उत्तर दिले होते.

त्यानंतर गेल्या दोन वर्षात मात्र मी माझ्या आब्बाला, बुखुतखान व फिरंगीचाचाला रुमाल फेकताना अगदी जवळून पाहिले होते. एका वेळी तर मी आब्बाला मदतही केली होती. आज माझ्या इम्तहानचा दिवस होता. पार पडली तर मला रुमाल मिळणार होता. त्या सफरीत आम्ही १४००० रुपये लुटले व जवळजवळ दिडशे माणसांचे मुडदे पाडले. (त्या वेळी रात्री रोज आमच्या तळावर मांजर येत असे. हा आम्ही शुभशकून समजतो) माझा उस्ताद माझ्या कामगिरीवर खुष होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर भवानीला गुळाचा नैवद्य दाखविण्यात आला व फिरंगीसमोर मला उभे करण्यात आले. त्याने त्याच्या हातातील रुमालाची गाठ सोडविली व त्यातील रुपायाचे नाणे माझ्या हातात दिले व प्रार्थना म्हटली. शेवटी माझ्या हातात एक रुमाल दिला व मला ‘ बरतोत’ म्हणून जाहीर केले.

या वर्षी अमानला तट्टूवर बसवून फिरवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी त्याला सगळ्यांच्या मागे बरेच अंतर सोडून चालवत होतो. त्याची चेष्टामस्करी करत होतो. मधेच ते तट्टू पळवत होतो. अचानक काय झाले ते कळले नाही पण ते तट्टू उधळले व पळून गेले. ते सरळ पुढे आमची माणसे जेथे थांबली होती तेथे जाऊन थांबले. तेथे अमानने जे पाहिले ते व्हायला नको होते. तेथे अब्बा मुडद्यांचे पाय गुढघ्यात तोडत होता व फिरंगी एका मुडद्याच्या गळ्याभोवतालचा रुमाल सोडवत होता. गुडघ्यात पाय तोडून ते उलटे मुडपण्यात येत म्हणजे पुरायला कमी जागा लागत असे. पुढे जे घडले ते भयानक होते. अमान ते बघून थरथरु लागला व एक सारखा किंचाळू लागला. त्याला कोणी हात लावला की तो अधिकच तारस्वरात किंचाळू लागे. आब्बा तर त्याला नजरेसमोरही नको होता. त्याला शेवटी फेफरे भरले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. सगळ्यांनी त्याला धरण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याच्या अंगात बारा रेड्यांची शक्ती संचारली होती. तो हात हिसाडून पळून जाई व परत धाडकन जमिनीवर पडे…. शेवटी संध्याकाळी अमानला सडकून ताप भरला व त्यातच त्याचा अंत झाला.

तळावर आता स्मशान शांतता पसरली. आब्बाने घरी परत जायची तयारी चालविली. तो सारखा अम्माची आठवण काढत होता. असे यापूर्वी कधी झाले नव्हते. सगळ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याचीही वाचा बसली. अब्बाला मी तर त्याच्या नजरेसमोरही नको होतो…शेवटी तो परत गेल्यावर फिरंगीने मला जवळ घेतले. मी कावराबावरा हो़ऊन केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघू लागलो…

‘बुलू तू हा धंदा सोड.’

‘पण आब्बाला काय झाले ?

‘अमान त्याचा रक्ताचा मुलगा होता…तू तर रस्त्यावरुन उचलून आणलेला पोर आहेस्….एका मुडद्याचा !.’

मी निपचित पडलेल्या अमानकडे एक नजर टाकली. मी आमची ठगांची टोळी सोडली व तडक तसाच मुंबई इलाख्याला निघून गेलो…..

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s