उंबरठ्यातील खिळे.

उंबरठ्यातील खिळे.

आई जाऊन आज १२ दिवस झाले होते.

आमच्या घरासाठी कष्ट उपसत बिचारीच्या हाडाची काडे झाली. वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर संसाराचे गाडे ओढताना तिची होणारी दमछाक आम्ही आमच्या डोळ्यांनी पहात होतो. जमेल तसा तिला हातभारही लावत होतो. मी स्वत: पहाटे उठून वर्तमानपत्रे टाकायला जायचो तर धाकटा दुधाचा रतीब घालायला जायचा. दिवस भर शाळा कॉलेज करून शिकून आम्ही दोघेही आता स्थिरस्थावर झालो आणि आईच्या मागची विवंचना संपली. पण सुखाचे दिवस फार काळ बघायचे तिच्या नशिबात नसावे.

आई गेल्यावर घरातील वर्दळ वाढली. उद्या तेरावा झाला की मग मात्र घर खायला उठेल . आता राहिलो आम्ही तिघेच मी, बाबा आणि धाकटा. दु:ख जरा हलके झाल्यावर आलेल्यांच्यात आता माफक हास्यविनोदही चालू झाले. माणसाचे मन कसे घडविले आहे परमेश्वराने ! परवापरवा पर्यंत सारखे डोळ्यातील पाणी पुसणारी माझी मावशीही आता सावरून घर कामाला लागली होती. आईची साडी नेसून घरात वावरत असताना मीही एकदोनदा फसलो होतो. मग परत एकदा रडारड. पण असे एकदोन प्रसंग वगळता घर आता सावरले होते असे म्हणायला हरकत नव्हती.

आईच्या अगणित आठवणी सगळ्यांच्या मनात दाटून आल्या होत्या आणि परत परत उगाळल्या जात होत्या. बाबांचे मात्र मला आश्चर्य वाटत होते. शांतपणे ते घरात हवे नको ते पहात होते. त्यांच्या पाणी आटलेल्या डोळ्यात मागे कुठेतरी अश्रूंना बांध घातलेला मला स्पष्ट जाणवत होता. घर लहान, पाहुण्यांची गर्दी, मिळेल त्या जागी पडायचे अशा अवस्थेत बाबांच्या हुंदक्यांचे आवाज एकू येणे शक्यच नव्हते. पण त्यांच्या आणि आईच्या प्रेमाचा मी कळायला लागल्यापासून साक्षीदार होतो. त्यांनी घरासाठी किती खस्ता खाल्या, दोन दोन नोकर्‍या केल्या आणि आईबरोबर हा संसार आनंदाने केला. कष्ट भरपूर होते पण आनंदही अपरंपार होता.

जे वेळेला येऊ शकले नव्हते ते येत होते आणि आल्या आल्या त्या दिव्याच्या पुढ्यात जाऊन पाया पडत होते. थोडे टेकत होते. वयस्कर अनुभवी होते ते चहा टाकायला सांगून गप्पात परत रंगून जात होते. जेवताना आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव तीव्रतेने आठवत होती आणि डोळ्यात पाणी जमा होत होते. रात्री अंथरूणावर पडल्यावर मात्र स्वप्ने पडावीत तसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते.

आईने शिवलेला पहिला सदरा, थंडी वाजू नये म्हणून विणलेला तोकडा स्वेटर, अभ्यास केला नाही म्हणून दिलेला मार, मारून झाल्यावर तिचेच रडणे हे सगळे आठवून मन खिन्न झाले. धाकट्याची तीच परिस्थिती असणार हे त्याच्या चुळबुळींवरून कळत होते. नेहमी घोरणारे बाबा आज मात्र बिलकूल घोरत नव्हते.

“सदा, गरीबी फार वाईट. तू आता मोठ्ठा झालास. आपल्या घरातील भांडणांचे मूळ कमी पडणारा पैसाच आहे हे आता तुला कळायला पाहिजे. यातून बाहेर पड बाळा. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी कर. पैसा आला की बघ सगळे सुरळीत होईल”. आईने तेव्हा बजावलेले वाक्य मला आठवले. तेवढ्यात दरवाजात कसलातरी धडपडायचा आवाज झाला. पटकन उठून बघितले तर उंबर्‍याला अडखळून माझा काका धपडला होता. दिल्लीवरून तो तेराव्याला आला असणार. हा माझ्या आईचा अजून एक लाडका दीर. पण त्याचे लग्न झाल्यावर त्याच्याकडून आईने एक पैही घ्यायची नाकारली होती. तुझ्या संसारासाठी साठव असे म्हणाली होती त्याला. पुढे जाऊन मी त्याची पडलेली बॅग आणि त्यातील सामान गोळा करायला लागलो. मला जवळ घेऊन तो म्हणाला “सदा राहूदे… राहूदे…” मी खाली बसलो आणि ती बॅग भरू लागलो. उंबरठ्यावर पसरलेले सामान गोळा करताच झिजलेला उंबरठा माझ्या नजरेस पडला. मधेच झिजून त्याला एक प्रकारचा गुळगुळीतपणा आला होता. मी त्याच्यावरून मायेने हात फिरवला आणि रांगोळीची रिकामी जागा…तिच्याकडे बघवेना मला.. उंबरठ्यावर मोठमोठे कुर्‍हाडी खिळे ठोकलेले होते. जवळ जवळ १० एक तरी असतील. काय हालायची बिशात होती त्याची ! थोड्यावेळ गप्पा मारून झाल्यावर घरात समसूम झाली. उद्या तेरावा. लवकर ऊठून बाबांनी सांगितलेली बरीच कामे करायची होती. झोप तर येतच नव्हती, तसाच तळमळत अंथरूणावर पडलो झाले.

सगळे धार्मिक विधी झाल्यावर प्रसादाची जेवणे झाली आणि चार नंतर सगळे एक एक करून जायला निघाले संध्याकाळपर्यंत घर पार रिकामे झाले आणि आमचे तिघांचेही चेहरे कावरे बावरे झाले. उन्हे कलली आणि मावशीला न्यायला तिच्या घरचे आले आणि मग मात्र आम्हाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येऊ लागली. घरात स्त्री नसली तर घराचे हॉटेल कसे होते हे आम्हाला पहिल्या तासातच कळाले. काय बोलावे हे न कळाल्यामुळे आम्ही तिघांनाही एकमेकांची तोंडे चुकवत त्या घरात वेगवेगळ्या जागा घेतल्या. थोड्यावेळाने एकामेकांच्या जवळ जाऊन परत दूर जात होतो. काही सुचत नव्हते. अंधार पडल्यावर मात्र आता एकामेकांचे भकास चेहरे दिसणार नाहीत या कल्पनेने जरा सुटकेचा निश्वास टाकून मी अंथरूणावर अंग टाकले.

सकाळपासूनच्या दगदगीमुळे व काही दिवस झोप न झाल्यामुळे पटकन झोप लागली.. जाग आली ती कोणी तरी काहीतरी ठोकत असल्याच्या आवाजाने. आता कोण ठोकते आहे ? घड्याळात बघितले तर काही फार वाजले नव्हते रात्रीचे ८. उठून बघितले तर बाबा उंबरठ्यावर काहीतरी करत होते. मला वाटले वर्दळीमुळे उंबरठा हलला असेल करत असतील दुरूस्ती. मदतीला गेलो. त्यांनी हत्यारांच्या पेटीतून एक मोठ्ठा कुर्‍हाडी खिळा काढला आणि तो खिळा त्या उंबरठ्यावर मधोमध ठेवून वर हातोड्याचा घाव घातला. खिळा थोडासाच आत गेला. जूने सागवान ते ! लाकडात गाठ आलेली असणार मी मनात म्हटले.
“बाबा काय झाले आहे याला ? हा हालत तर नाही. उद्या खिळे ठोकले तर नाही का चालणार ?”
“नाही रे बाबा ! तुला नाही कळायचे ते. आजच करायला पाहिजे !”
“ का बरे ?”
“तेराव्या दिवशी उंबरठ्यात खिळे ठ्कल्यावर अतृप्त आत्मे घरात येत नाहीत. हे सगळे खिळे, नाल, याचसाठी ठोकलेले आहेत”
माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला. तो खिळा पूर्णपणे आत गेल्यावर त्याचे फक्त ते चपटे झालेले चौकोनी डोके वर राहीले आणि बाबा म्हणाले “चल झोप आता”.

बाबा त्यांच्या खोलीत गेले आणि मी माझ्या अंथरूणावर. झोपेचे आता खोबरेच झाले होते. परत सगळ्या आठवणी जागा झाल्या आणि डोळ्यातून येणारे अश्रू थांबेचनात. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. डोळे मिटले तर तो चपटा खिळा माझ्याकडे बघून दात विचकतोय असाही भास व्हायला लागला. कपाळावर घाम जमा झाला आणि शरमेने मान खाली गेली. त्याच तिरमिरीत मी उठलो. हत्यारांची पेटी काढली आणि तसाच उंबरठ्यावर धावलो. खिळे काढायचा अंबूर काढला आणि त्वेषाने त्या खिळ्याशी झटापट करायला लागलो. पण बाबांनी आई घरात येऊच नये अशी मजबूत व्यवस्था केली होती. त्याच तिरीमिरीत परसात गेलो आणि ती छोटी पहार घऊन आलो आणि त्या उंबरठ्याखाली सारली व उचलली…. त्या आवाजाने बाबा व धाकटा उठले आणि बाहेर आले.
“अरे काय करतोस काय तू ?”
“मी हे खिळे काढतोय बाबा”
“अरे नको काढूस”
“का? का नको काढू ? ज्या बाईने आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता काढल्या, आमची नेहमीच काळजी केली त्या बाईचा आत्मा आत येऊन आम्हाला त्रास देईल असे वाटते की काय तुम्हाला ? हा खिळा येथे राहिला तर बाबा मी सांगतो मी या घरात राहणार नाही आणि आपल्याला कधीही शांतता लाभणार नाही”
माझ्या डोळ्यात संताप उतरला होता, आणि मी शरमेने आणि रागाने थरथर कापत होतो. रडत रडत मी बाबांना मिठी मारली. माझ्या डोक्यावर थोपटत त्यांनी मला शांत केले.
“चला आपण तो खिळाच काय, उंबरठाच काढून टाकू”
———————————————————————
“आमच्या घराण्यात त्या दिवसापासून कोणाच्याही घराला उंबरठा बसवायची परंपरा नाही………”

मी डोळे पुसत माझ्या नवीन वाड्याच्या वास्तूशांतीसाठी आलेल्या माझ्या मित्रांना सांगितले.

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s