अफगाणिस्थान……..

अफगाणिस्थान……..

ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य…..एकांडा डॉ. ब्रायडॉन.

1280px-Remnants_of_an_army2

जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला. त्या डोंगराच्या पलिकडे कोठे तरी काबूलवरुन माघार घेणारे ब्रिटिश सैन्य होते. कोठे होते ते ? आलेल्या खबरीनुसार त्या सैन्याने ६ जानेवारी १८४२ रोजी काबूल सोडले होते व अजूनही त्यांचा पत्ता नव्हता.
अनुभवी कर्नल डेनीच्या मनात पाल चुकचुकली. त्याच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांकडे वळून तो म्हणाला,

‘मला काय होणार याची पूर्ण कल्पना आहे. त्या सैन्यातील फक्त एकच माणूस येथे जिवंत पोहोचणार आहे याची मला खात्री आहे आणि तो सुद्धा त्या सैन्याच्या कत्तलीची हकिकत सांगण्यासाठी !’

दुसऱ्या दिवशी कर्नल डेनीचे सैनिक शहराभोवती संरक्षणासाठी खंदक खोदत होते. त्या इमारतीवर काही सैनिक अजूनही टेहळणी करत होते. तेवढ्यात एका सैनिकाला दुरवर एक घोडेस्वार रखडत येताना दिसला. घोडदळाच्या सैनिकांची एक पलटण त्याच्या दौडत त्या एकांड्या घोडेस्वाराकडे गेली. ते बघून कर्नल डेनी म्हणाला, ‘ मी म्हणालो नव्हतो ? निरोप घेऊन एक माणूस जिवंत परत आला आहे !’

त्या सैनिकांनी त्या रक्तबंबाळ घोडेस्वारापाशी पोहोचल्या पोहोचल्या त्याला पहिला प्रश्न केला, ‘बाकीचे सैन्य कुठे आहे ?’
त्या घोडेस्वाराच्या जखमातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या मस्तकाचा एक टवका उडालेला दिसत होता. मोठ्या कष्टाने त्याने पुटपुटत उत्तर दिले,

‘ सैन्य ? मीच ते सैन्य आहे ! डॉ. विल्यम ब्रायडॉन !

त्या सैनिकांनी त्याला जखमी डॉक्टरला काळजीपूर्वक आत नेले. ब्रिटिशांच्या १६००० माणसातील हा एकमेव वाचलेला सैनिक होता. त्याची कहाणी ऐकणाऱ्या सैनिकांना व त्यालाही त्यावेळी कल्पना नव्हती की काही सैनिक व ब्रिटिशांची कुटुंबे अफगाणी सैन्याने पकडली आहेत.

ब्रायडॉनचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या एका स्कॉटिश घराण्यात १८११ साली झाला होता. डॉक्टर झाल्यावर त्याने भारतातील जवळजवळ सत्ताधिश झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत चाकरी पत्करली. साल होते १८३५. चारवर्षे भारतात काढल्यावर त्याला अफगाणी बंडाचा बिमोड करण्यासाठी अफगाणीस्थानला सैन्याबरोबर सर्जन म्हणून जावे लागले. ब्रिटिशांनी रशियाच्या अफगाणिस्थानमधील हस्तक्षेपास उत्तर देण्यासाठी हे सैन्य काबूलवर पाठविले होते. त्या बंडात दारुण पराभव झाल्यावर ब्रिटिश सेना व जनता काबूलवरुन पळत सुटली त्यात डॉक्टर ब्रायडॉनही होता. अफगाण टोळ्यांनी त्यांना एका रात्रीचीही उसंत दिली नव्हती. त्या वैराण प्रदेशात त्यांनी एक एक ब्रिटिश सैनिकाला टिपण्याचा सपाटा लावला होता. त्या माघारीच्या पाचव्या दिवशी ब्रायडॉनला एका अफगाण सैनिकाने घोड्यावरुन खाली खेचले व त्याच्यावर त्याच्या तलवारीने वार केला. नशिबाने त्याने टोपीच्या आत ठेवलेल्या एका मासिकाने त्याला वाचविले. त्याला जमिनीवर फेकून त्याचा घोडा उधळला पण तेवढ्यात एका मरणोन्मुख भारतीय सैनिकाने त्याला त्याचा घोडा देऊ केला.

‘मी मरणार आहे ! माझा घोडा घेऊन येथून पळून जा !’

ब्रायडॉनने त्या सैनिकाला त्याच्या खोगिरावर बसते केले पण त्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. त्याला एक सलाम ठोकून त्या गोळ्यांच्या वर्षावातून ब्रायडॉनने आपला घोडा फेकला. दुसऱ्या दिवशी अफगाण टोळ्यांनी परत त्यांना घेरले. आता त्यांच्याकडे २१६ अधिकारी आणि काही सैनिक उरले होते. त्या लढाईत फक्त वीस अधिकारी वाचले. उरलेल्या पंचवीस मैलात त्यातील फक्त सहाजण उरले. त्यांनी आता सपाट प्रदेशात प्रवेश केला. तेवढ्यात त्यांना काही शेतकरी त्यांच्याकडे येताना दिसले. त्यांच्या हातातील पावाच्या लाद्या बघून त्यांना हायसे वाटते ना वाटते तोच त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. सहापैकी तीन पळून गेले. एकजण तेथेच ठार झाला. ब्रायडॉन व ले. स्टियर घोडे कमकुवत असल्यामुळे मागे राहिले व त्यामुळे वाचले असे म्हणायला हवे. स्टियरचा घोडा कोसळल्यावर त्याने शेवटच्या झुंजीसाठी एका उंचवट्याची वाट धरली व ब्रायडॉनला जलालाबादला सावध करण्याची ओरडून सूचना केली. काही क्षणांनंतर दमछाक झालेल्या ब्रायडॉनला वीसएक अफगाणी टोळीवाल्यांनी गाठले. ते पायी चालले होते. त्यांनी ब्रायडॉनवर दगडफेक केली. ब्रायडॉनने घोड्याचा लगाम दातात धरला व डावीकडे, उजवीकडे तलवार चालवत त्याने त्या गर्दीतून मार्ग काढला. तेवढ्यात एका अफगाण्याने त्याच्यावर बंदुक झाडली. त्या गोळीने त्याच्या तलवारीची छकले उडविली. त्याच्या हातात आता फक्त तिची मुठ उरली. पुढेच त्याला काही घोडेस्वार दिसले. त्याला प्रथम वाटले की ते वाचलेले भारतीय सैनिक आहेत पण त्याच्या दुर्दैवाने ते अफगाणी निघाले. त्याला पाहिल्यावर त्यातील एकजण त्याच्या मागे लागला. त्याने त्याच्या बाकदार तलवारीने ब्रायडॉनवर एक जोरदार वार केला. ब्रायडॉनने तो मोठ्या शर्थीने त्याच्या  तलवारीच्या म्यानाने अडविला पण तो घाव त्याच्या डोक्यावर उतरलाच. त्या अफगाणी घोडेस्वाराने मोठ्या त्वेषाने त्याच्यावर चाल केली पण ब्रायडॉनने हाती आलेली तलवारीची मुठ त्याला फेकून मारली. त्या अफगाणानेही ब्रायडॉनवर अजून एक वार केला जो त्याने मोठ्या शिताफीने चुकविला. पण तोही त्याच्या खांद्यावर उतरला. ब्रायडॉन ती तुटकी मुठ उचलायला वाकला ते बघून तो अफगाणी पळून गेला. बहुतेक त्याला ब्रायडॉन त्याचे पिस्तूल काढतोय की काय अशी शंका आली असावी.

डोक्यात पडलेले दोन वार, हातावरील तीन जखमा, त्यातून भयंकर रक्तस्त्राव होतोय, मरायला टेकलेले घोडे अशा अवस्थेत डॉ. ब्रायडॉन जलालाबादला पोहोचला खरा पण थोड्याच दिवसात जलालाबादवरही हल्ला झाला……

ब्रिटिशांची अशी अवस्था कोणी केली ?

कशी केली ?

त्यावेळचे राजकारण काय होते…?

याची सविस्तर कहाणी आपण आता बघणार आहोत पुढच्या भागापासून……….
क्रमश:
जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास. Bookmark the permalink.

2 Responses to अफगाणिस्थान……..

  1. ब्लॉग मनापासून आवडला. पण लिखाणात सातत्य असू द्यावे.

  2. nikhil says:

    sir tumacha blog mala far awadato, pan please ase mothe pause ghet jau naka…Krupaya mahinyatun ekada tari blogwar upasthiti dakhawawi.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s