विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-३

….. ही झाली पोर्तुगीज भारतात कसे आले त्याची कहाणी….आता परत कृष्णदेवराय व विजयनगरकडे वळू. त्याच्या अगोदर विजयनगरमधील घोड्याच्या व्यापाराच्या पेठेचा फोटो खाली दिला आहे त्याच्यावर एक नजर टाका…

क्रमश:……

कृष्णदेवरायच्या कारकिर्दीबाबत लिहावे तितके कमीच आहे. त्याच्या विजयांमुळे, राज्यकारभारांमुळे त्या काळात त्याचा दरारा सार्‍या दक्षिण हिंदुस्थानात पसरला. एवढेच नाही तर उत्तरेकडेही मुसलमानी सत्तेत त्याच्या भरभराटीचे गोडवे गायले जात होते. दुर्दैवाने काळाच्या उदरात काय दडले आहे व पुढे काय होणार आहे ही दूरदृष्टी फार कमी जणात असते किंवा असेही म्हणता येईल की काही गोष्टी आपल्या हातातून सुटतात. कृष्णदेवराय शांततेच्या काळात काव्य, देवळे, नृत्य इत्यादी कला यांचा आस्वाद घेण्याबरोबर तो युद्धाचीही जोरदार तयारी करत होता.

महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता हे आपल्याला माहीतच आहे. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला.

दक्षिणेला याने जे राज्य स्थापन केले त्याला इतर मुसलमान ब्राह्मणाचे राज्य म्हणत त्याचे झाले बहामन-बहामनी….. हा अर्थातच हिंदूंच्या बाबतीत बराच मवाळ धोरण स्वीकारत होता जे त्याच्या सरदारांना बिलकुल पसंत नव्हते. आर्थिक कुरबुरी, प्रशासकीय कामात ढवळाढवळ इत्यादी कारणांमुळे त्याचा परिणाम त्याच्या विरोधात बंडखोरी होण्यात झाला. असो. याच्याही राज्याचे पाच तुकडे झाले. विजापूर, अहमदनगर, गोवळकोंडा, बेरर, व बिदर या नावाच्या या पाच शाह्या आपल्या ओळखीच्या आहेतच.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नकाशा:

या सगळ्यांशी विजयनगरने येनकेनप्रकाराने सामना केला. कधी त्यांना एकामेकांच्यात झुंजवून तर कधी त्यांच्याशी लढाया करून…. कृष्णदेवरायचे पुढील लक्ष होते अदिलशहाचा रायचूरचा किल्ला. नुनीझ नावाचा जो एक पोर्तुगीज प्रवासी येथे त्या काळात होता त्याने या लढाईचे वर्णन हुबेहूब केले आहे ते आपण बघुया.. मी ते थोडक्यात देतो..
कृष्णदेवरायचा अत्यंत विश्वासू सेवक सालूवतिम्मा नावाचा एक ब्राह्मण सरदार होता.
राजा याच्यावर बरीच महत्वाच्या योजना सोपवीत असे. ओरिसाच्या मोहिमेनंतर कृष्णदेवरायने यालाच त्या विभागाचा ताबा दिला होता. हा सरदार विजयनगरला आला असता रायचूरच्या किल्ल्याच्या मोहिमेला मूर्त स्वरूप देण्यात आले. अदिलशहाचा हा किल्ला मजबूत व शिबंदीने नेहमीच खचाखच भरलेला असायचा व त्यामुळे याला घातलेले वेढे शेवटी उठून जायचे अशी याची ख्याती होती.

अदिलशहा आणि विजयनगरमधे चाळीस वर्षापूर्वी जो शांतता करार झाला तो अजूनही अस्तीत्वात होता. पण जेव्हा हा अस्तित्वात आला तेव्हा रायचूर विजयनगरच्या ताब्यात होते त्यामुळे ही जखम ठसठसत होती. आता कृष्णदेवरायची ताकद अतोनात वाढल्यामुळे त्याला अदिलशहापासून हा किल्ला हिसकावून घेउन हिशेब चुकता करायचाच होता पण त्याला संधी व कारण दोन्हीही मिळायची होती. सालूवतिम्मा विजयनगरमधे असताना आयतेच कारण चालून आले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कृष्णदेवराय….(असावा….खात्री नाही)

हा जो शांतता करार झाला होता त्यात एकामेकांच्या राज्यातील गुन्हेगारांना आश्रय द्यायचा नाही अशी अनेक कलमे होतीच. आपण अगोदर बघितलेच आहे की कृष्णदेवरायला घोडे लागत व चांगले घोडे लागत व या कामात त्याला पोर्तुगीज मदत करत, म्हणजे त्यांचा तो धंदाच होता पण घोडे कोणाला द्यायचे हे येथे व्यापारी ठरवत असे. दक्षिणेतील सर्वच सत्ता घोड्यांसाठी गोव्यावर अवलंबून असत. आता पुरवठा करणारा एक व गिर्‍हाईक पाच असे असल्यामुळे पोर्तुगिजांचे महत्व अवास्तव वाढले होते. तसेच कोणी एकाने घोड्याची प्रचंड मागणी नोंदवली की लढाई होणार अशी अटकळही बांधली जायची. ही माहिती गोळा करण्यासाठी सर्व सत्तांचे हेर गोव्यात कार्यरत असत. (हल्लीच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास, कारगीलच्या वेळेस पाकिस्तानमधील एका व्यापाराने बर्फात वापरायचे बरेच बूट बाजारातून उचलले होते. हे नंतर कळाले. पण ही माहिती जर आपल्या गुप्तहेरखात्याने अगोदरच पैदा केली असती तर झाले ते प्रकरण अशा तर्‍हेने झाले नसते. कदाचित केलीही असेल मला माहीत नाही)..तर कृष्णदेवरायचा एक व्यापारी गोव्यात होता. हा व्यापारी मुसलमान होता व त्याचे नाव मर्शर असे काहीतरी होते व तो “सय्यद” होता. हा माणूस गोव्यामधे घोड्याच्या व्यापारात कृष्णदेवरायचे प्रतिनिधीत्व करत असे. या माणसाला भरपूर पैसे देऊन कृष्णदेवरायने फोंड्याला रवाना केले. या माणसाला जे घोडे विकत घ्यायचे होते त्याची संख्या बघून शंका आलीच असणार व ते कोणाविरूद्ध असणार याचीही कल्पना आली असणार. त्याने आपला गोव्यातील बाडबिस्तारा गुंडाळला व पैसे घेऊन पळ काढला. तो अदिलशाहाच्या आश्रयास गेल्यावर सालूवतिम्माच्या डोक्यात आता रायचूरवर हल्ला करण्यास हे योग्य कारण आहे ही कल्पना आली व त्याने कृष्णदेवरायलाही हा सल्ला दिला जो त्याने लगेचच मानला. अदिलशहाला लगेचच खलिता पाठवून करारातील कलमांची आठवण करून देण्यात आली. अदिलशाच्या दरबारात मौला मौलवींचा विशेष भरणा असल्यामुळे त्यांच्या मताला किंमत होती. त्यांनी हा माणूस “पैगंबरच्या” रक्ताचा असल्यामुळे आपल्याला कुठलीही किंमत चुकवून त्याचे संरक्षण करावे लागेल असा पवित्रा घेतला.

दुसरा पोर्तुगीज बारोस याने जरा वेगळी कहाणी सांगितली आहे. “त्याच्या मते या मुसलमान व्यापाराला कृष्णदेवरायने मुद्दाम बरीच मोठी रक्कम देऊन गोव्याला रवाना केले होते. त्याचवेळी पर्शियामधून चांगले घोडे आले होते. मूर वंशाच्या या मुसलमानावर ना कृष्णदेवरायचा विश्वास होता ना पोर्तुगिजांचा. कृष्णदेवरायने पोर्तुगीजांना अगोदरच या सगळ्याची कल्पना देऊन ठेवली होती. तो जर पळाला तर त्याला मारू नये पण रक्कम हस्तगत करावी. त्याला पाहिजे तेथे जाऊ द्यावे अशा प्रकारच्या सुचनाही देऊन ठेवल्या होत्या.”

पणजीपासून काही अंतरावर आल्यावर अपेक्षेप्रमाणे या व्यापार्‍याने पळ काढला पण तो निसटला व अपेक्षेप्रमाणे अदिलशहाच्या आश्रयाला गेला. शेवटी धर्मगुरूंच्या सल्ल्यानुसार याला बोटीत बसविण्यासाठी चौल बंदरात नेण्यात आले. अर्थात थोर अदिलशहाने त्याच्या कडून ते पैसे काढून घेऊन या पैगंबराच्या वंशजाला पैगंबरवासी केले ते वेगळे. तो पुढे कुठेही दिसला नाही ना त्याच्याबद्दल कोणी काही सांगितले. तो गायबच झाला.

नुनिझ त्यानंतर यु्द्धाच्या वर्णनात लिहितो “पुजाअर्चा झाल्यावर व पशूंचे बळी दिल्यावर कृष्णदेवरायची सेना विजयनगरातून नगार्यारचा तालावर पावले टाकत बाहेर पडली. पहिल्यांदा बाहेर पडली कामनाईक याची सेना. त्यात तीस हजार पायदळ-त्यात धनुर्धारी, तलवारधारी, भालाफेक करणार्‍या तुकड्या व अंदाजे हजार घोडेस्वार व सोळा हत्ती चालत होते. त्यानंतर तिमण्णानाईक याची सेना बाहेर पडली. त्यात साठ हजार पायदळ व दोन हजार स्वारांचे घोडदळ व एकवीस हत्तींचे गजदल होते. त्याच्या मागे सलुवतिम्माची सेना होती. यात एक लाख वीस हजारचे पायदळ, साठ हत्ती होते. त्यानंतर कुमारचे सैन्य बाहेर पडले. त्याच्या सैन्यात ऐशी हजारचे पायदळ, सहा हजाराचे घोडदळ व चाळीस हत्ती होते. त्यानंतर सलुवतिम्माचा भावाची सेना बाहेर पडत होती. हा विजयनगर शहराचा प्रशासक होता. त्याच्या सेनेत हजाराचे घोडदळ, तीस हजार सैनिक व दहा हत्ती होते. त्यानंतर राजाचे तीन विश्वासू हिजडे होते त्यांची सेना बाहेर पडली. त्यातही तीस हजार सैनिक, एक हजार घोडेस्वार व पंधरा हत्ती होते. राजाचे असे इतर अनेक सेवक आपापली सेना घेऊन हजर होते. स्वत: राजा त्याच्या सैन्यासह यात सामील झाला होता. सर्व सैनिक शस्त्रसज्ज असून हत्तीवर हौदे होते ज्यात चार माणसे बसली होती. हत्तींना शक्य असेल तेथे चिलखत चढवलेले होते व त्याच्या सोंडेला जाडजूड तलवारी बांधलेल्या होत्या. बाजारबुणगे तर असंख्य होते. धोबी, न्हावी, पखाली धारण केलेले पाणके, एवढेच काय वेश्याही या सेनेबरोबर होत्या.

हत्ती महत्वाचे होते. विजयनगरमधेही प्रचंड संख्येने हत्ती होते. सण व युद्ध या दोन्ही ठिकाणी या महाकाय हलत्या किल्ल्याला महत्व होते. त्यांच्या तबेल्याच्या एका खोलीचे चित्र खाली दिले आहे
Simple, Free Image and File Hosting at MediaFire


या प्रचंड सेनेच्या अगोदरच पन्नास हजारांची फौज कमीत कमी लवाजमा घेऊन पुढे गेली होती. यांच्या बरोबर शत्रूच्या बातम्या काढणार्‍यांच्या असंख्य तुकड्या शत्रूच्या प्रदेशात खोलवर पसरल्या होत्या. या सैन्यदलाबरोबर सैनिकांच्या गरजा भागवायला असंख्य व्यापारी व त्यांची दुकानेही होती. अशा तर्‍हेने मजल दर मजल करत हे सैन्य रायचूरपासून जवळ असलेल्या मलियाबाद येथे पोहोचले. तेथे त्याला इतर ठिकाणाहून आलेले सैन्य मिळाले.

शहराला वेढा घातल्यावर आतून तोफांचा व बाणांचा मारा सुरू झाला. तटबंदीपाशी असंख्य सैनिक मरून पडू लागले. शेवटी कृष्णदेवरायच्या अधिकार्‍यांनी तटबंदीतील दगड विकत घ्यायला सूरू केले. आतील जनतेने याला चांगलाच प्रतिसाद दिल्यावर काही ठिकाणी ही तटबंदी उघडी पडली. हा वेढा तीन महिने चालला व याचा निर्णय लागेना. तेवढ्यात अदिलशहा या शहराच्या मदतीसाठी कुमक घेऊन आला व त्याने रायचूरच्या उत्तरेला असलेल्या कृष्णेच्याकिनारी तळ ठोकला. हे शहर कृष्णा व तुंगभद्रा या दोन नद्यांच्या मधे असलेल्या जमिनीवर वसले होते. अत्यंत कोरडा, फक्त झाडे झुडपे असलेला हा प्रदेश आहे व येथे मोठमोठे दगड पडलेले आहेत. कृष्णदेवरायने लगेचच आपले हेर त्या तळाची वित्तंबातमी काढायला पाठवले खरे पण मुसलमानांच्या क्रुरतेच्या कहाण्या जनमानसात पसरल्या असल्यामुळे कृष्णदेवरायच्या सैनिकांत चलबिचल सूरू झाली.

दोन्हीही सैन्य तळ देऊन बसली व हालचाल करेनात. कृष्णदेवरायचे सैन्य काहीच हालचाल करत नाही हे बघून अदिलशहा बेचैन झाला व त्याने आपल्या सरदारांशी सल्लामसलत केली. त्यात अनेक मतांतरे प्रकट झाली. काहींचे म्हणणे होते की अदिलशाहाची लष्करी ताकद बघून कृष्णदेवराय हालचाल करत नाही तर काही म्हणत होते की तो आदिलशहा नदी पार करायची वाट बघतोय. हे मत मांडणार्‍यात फोंड्याचा सुभेदार व गोव्याचा सुभेदार अंकूशखान प्रमुख होता. इतर उतावळ्या सरदारांनी मत मांडले की कृष्णदेवरायच्या सैन्यात असे अनेक सरदार आहेत ज्यांनी अदिलशहाच्या हातून पूर्वी सपाटून मार खाल्लेला आहे त्यामुळे ते घाबरलेले आहेत. हल्ला चढवायची.हीच वेळ आहे आता कच खाण्यात अर्थ नाही.

शेवटी या मताला बळी पडून अदिलशहाने मोठ्या धाडसाने व आवेशाने आपल्या सेनेला आक्रमण करायचा आदेश दिला. त्याच्याकडे एक लाख वीस हजार सैनिक, एकशे पन्नास हत्ती, व तोफखाना होता. या तोफखान्याच्या मारक शक्तीवर त्याचा विश्वास होता व त्यामुळेच तो हे युद्ध जिंकणार अशी त्याला खात्री होती. कृष्णदेवरायच्या तळावर हल्ला करून रायचूर वाचवता येईल अशी त्याला खात्री होती. स्वत:च्या तळाभोवती खंदक खणून त्याने त्या तळाच्या संरक्षणाची सिद्धता केली. मुबलक पाण्याची आवश्यकता असल्यामुळे हा तळ पाण्याच्या कडेकडेने पसरला होता. त्यांना योग्य त्या सुचना देऊन अदिलशहा निघाला.
कृष्णदेवरायला या हालचालींची वित्तंबातमी मिळतच होती. त्याने लगेचच आपल्या फौजेला तयारीत रहायला सांगितले पण अदिलशहाच्या पुढच्या हालचालींचा अंदाज आल्याशिवाय काहीही करायचे नाही हाही आदेश दिला. जेव्हा कृष्णदेवरायला अदिलशहाने तळ ऊठविल्याची बातमी मिळवली तेव्हा त्याने लगेच आपल्या सेनेला तयार व्हायची आज्ञा केली. त्याने आपल्या सेनेचे एकूण सात भाग केले. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याला त्याच्या राजज्योतीषांनी हा दिवस शूभ नाही हे सांगून या विचारापासून परावृत्त केले व त्या ऐवजी शनिवारी हल्ला काढायचा मुहुर्त काढून दिला. (मला स्वत:ला हे अंधविश्वासच भारतीयांच्या नाशाला कारणीभूत झाले आहेत याची खात्री आहे. दुर्दैव हे आहे की आजही शनीच्या देवळासमोर तरूण तेलाच्या चिकट बाटल्या घेऊन रांगेत आपली साडेसाती संपविण्यासाठी उभे असतात. किंवा आपली पत्रिका घेऊन दारोदारी फिरत असतात. काय म्हणावे या कर्माला. कधी कधी असे वाटते, यांना युद्धभूमीवर उभे करायला पाहिजे म्हणजे हे स्वत:च्या आयुष्याला एवढी किंमत देणार नाहीत. नशिबाने कृष्णदेवराय हे युद्ध जिंकला तरीही माझे हेच म्हणणे आहे.)

कृष्णदेवराय आपली सेना घेऊन आगेकूच करून पुढे गेला तेवढ्यात रायचूरची तटबंदी उघडून एक छोटे घोडदळ बाहेर पडले. राजाचे सैन्य थांबले की हे थांबे. ते चालले की हे मागे मागे येई. कोणालाच हे काय चालले होते, कोण होते याचा पत्ता लागला नाही. शेवटॊ रविवारच्या पहाटे कृष्णदेवरायच्या तळावर मोठी गडबड उडाली. लाखो सैनिक युद्धगर्जना करू लागले. जणू काही आता आकाशच त्या आवाजाने खाली कोसळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. लाख घोड्यांच्या खिंकाळण्याने व खूर आपटण्याने जमीन हादरू लागली. वाद्ये व हत्तींच्या ओरडण्याने वातावरण भयभीत झाले. याची कोणालाही कल्पना येणार नाही कारण याचे वर्णनच होऊ शकत नाही. समजा त्याचे वर्णन करायचा प्रयत्न केला तरी त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

सगळे सैन्य आघाडीवर गेल्यावर राजाने सैन्याच्या दोन तुकड्यांना (डिव्हिजन्स) हल्ल्याची आज्ञा दिली व शत्रूच्या एकही सैनिकाला जिवंत सोडू नका असे आवाहन केले. हे ऐकल्यावर विजयनगरच्या सैनिकांनी इतक्या त्वेषाने हल्ला केला की काहीच क्षणात ते शत्रूच्या शिबंदीवर पोहोचले व त्यांनी मुसलमानांच्या कत्तलीला सुरवात केली. मुसलमान सैनिकांनी माघार घेतलेली पाहून अदिलशाहाने त्याचा तोफखाना आणला व त्यांचा भडिमार चालू केला. त्यात असंख्य सैनिक मरताना पाहून कृष्णदेवरायच्या सैन्यात पळापळ झाली. ते बघून स्वत: राजा आघाडीवर गेला व त्याने स्वत:च पळणार्‍या सैनिकांची मुंडकी उडवली ते बघून हे सैन्य परत फिरले. त्यांच्या बरोबर नवीन सैन्यही होते. त्यांनी काहीच वेळात अदिलशहाच्या सैन्याची दाणादाण उडविली. शत्रूचे सैनिक पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी त्यांनी नदीत उड्या मारल्या व असंख्य बुडून मेले. अदिलशहाचा गोट पूर्णपणे लुटण्यात आला…बर्‍याच सरदारांना पकडण्यात आले. मुख्य म्हणजे तोफखाना व अगणित संपत्ती हातात पडली. स्वत: राजाने अदिलशाहाच्या तंबूत जाऊन विश्रांती करायचा मनोदय जाहीर केला. त्याच्या सरदारांनी याला विरोध केला व शत्रूचा पाठलाग करून त्याचा पुरता नायनाट करायची परवानगी मागितली पण राजाने ती दिली नाही. बरेच हकनाक बळी गेले आहेत तेव्हा झाली तेवढी शिक्षा पूरी झाली असे राजाने उत्तर दिले…….

या युद्धात चारशे तोफा, अगणित बैल, चार हजार ओरमूझचे जातीवंत घोडे अनेक स्त्रिया व मुले हाती लागली. राजाने त्या सगळ्यांना सोडून द्यायची आज्ञा दिली. ……………….”

या युद्धाचे अगदी सवीस्तर वर्णन नुनीझने केले आहे पण ते सगळे येथे देता येणार नाही. युद्ध जिंकल्यावर कृष्णदेवरायचे विजयनगरमधे भव्य स्वागत करण्यात आले.

अदिलशहाचा दूत कृष्णदेवरायची भेट घेण्यासाठी एक महिना प्रयत्न करत होता. अखेरीस त्याने भेट घेऊन त्याच्या राजाच्या मागण्या पूढे ठेवल्यावर कृष्णदेवरायने तूझ्या राजाच्या मागण्या मी मान्य करेन पण त्याने येथे येऊन माझ्या पायाचे चुंबन घेतले तर.. असा निरोप पाठवला…. हे सगळे लिहिले दोन कारणांसाठी.. त्या काळी युद्धे कशी चालत, राजकारण कसे चाले, व आपले राजे चुका कशा करत हे कळण्यासाठी….त्याच वेळी अदिलशहा संपवला असता तर विजापूर इतिहासातून उखडले गेले असते…अशा चूका मुसलमान राजवटी कधीच करत नसत…असो.. हे जरतर झाले पण चूका झाल्या हे सत्य आहे.

हे युद्ध झाले १५२० साली मे महिन्याच्या पोर्णिमेच्या आसपास..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

युसूफ अदिलशहा.

कृष्णदेवरायला शेवटच्या काळात बर्‍याच अनिश्चितेचा सामना करावा लागला. बहुदा त्याला आजाराने ग्रासले असावे व त्याची राजकारभारावरची पकड जरा ढिली झाली असावी. त्यातच त्याच्यावर एक कौटुंबिक आपत्ती कोसळली. त्याचा एकुलता एक मुलगा एकाएकी मरण पावला. त्याच्यावर वीषप्रयोग झाला असा संशय येऊन कृष्णदेवरायने त्याचा अत्यंत विश्वासू व पराक्रमी सरदार सलूवतिम्मा याला पकडून कैदेत टाकले. त्याचा मुलगा कसाबसा सूटून संदूरच्या टेकड्यात पळाला व त्याने तेथे रामदूर्ग येथे स्वत:चे राज्य स्थापन केले. कृष्णदेवरायने सलूवतिम्माला, त्याच्या भावाला व मुलाला दरबारात बोलावून त्यांचे डोळे काढले. या प्रकारात त्याला पोर्तुगीजांनी मदत केली असे म्हणतात कारण या सरदाराला हात लावायची कोणाची ताकद नव्हती.. तेवढ्यात अजून एका सरदाराने, नागम नायकानेही बंड पुकारले. हा कृष्णदेवरायला धक्कच होता. गंमत म्हणजे या नायकाचा मुलगा कृष्णदेवरायच्या दरबारात होता त्यानेच आपल्या बापाला वठणीवर आणायची कामगिरी स्वीकारली व यशस्वी केली.

या सगळ्या प्रकरणांमुळे, मुलाच्या मृत्यूमुळे व बंडाळ्यांमुळे हळू हळू कृष्णदेवरायचे मन राज्यकारभारावरून उडू लागले व त्याचा सावत्रभाऊ अच्युतराय हा राज्यकाराभाराचा शकट हाकू लागला. हा अच्युतरायही कृष्णदेवरायप्रमाणे शूर व राजकारणी होता. त्याने मोठ्या अक्कलहुशारीने सगळी बंडे मोडून काढली व थोडाफार त्रावणकोर भागात प्रदेशही जिंकला पण यालाही काय धाड भरली ते कळत नाही यानेही आपल्या दोन मेव्हण्यांवर राज्यकारभार सोडून दिला, हेही हुशार होते, नाही असे नाही पण इतर सरदारांना हे रुचणे शक्यच नव्हते. या मेहूण्यांची आडनावे तिरूमलराजू अशी असावीत.. अच्युतराय जिवंत होता तोपर्यंत विरोधी पक्ष शांत होता मात्र तो मेल्यावर या मेहुण्यांची सत्ता उलथवण्यात आली व तीन भावांनी हस्तगत केली. त्यांनी शहाणपणा करून स्वत: गादीवर न बसता अच्युतरायच्या मुलाला गादीवर बसवले व राज्यकारभार आरंभला. यातील मोठ्याचे नाव रामराजा होते. हे तिघेही हुशार व राजकारणी होते. यांनी विजयनगरचा राज्यकारभार योग्यपणे चालविला असे म्हणावे लागेल.

आपण वर बघितले की बहामनी साम्रज्याचे पाच तुकडे पडले व दक्खनची सत्ता विजापूर, अहमदनगर, गोवळकोंडा, बेरर, व बिदर या पाच सत्तांमधे विभागली गेली. यातील विजापूर व अहमदनगर या विजयनगरच्या उत्तरसीमेला लागून होती. गोवळकोंड्याचा एक चिंचोळा भागही विजयनगरच्या सीमेला लागून होता. गोवळकोंड्याच्या पूर्वेला कलिंगाचे राज्य होते व यांच्यातही सतत लढाया होत असल्यामुळे गोवळकोंड्याला विजयनगरला विशेष त्रास नव्हता. या पास सत्तांमधे सतत लढाया होत व त्यात ते विजयनगरची मदतही मागत. त्यावेळेचा राजा रामराजा ही मदत त्यांना आनंदाने देत असे कारण त्यामुळे या पाच सत्ता आपापसात लढून क्षिण होत होत्या. पण हे डावपेच जास्त काळ चालले नाहीत. असे म्हणतात रामराजाच्या उद्धट स्वभावामुळे हे इतर सुलतान दुखावले जाऊन एकत्र आले. पण त्यात काही तथ्य असेल असे वाटत नाही. एक गोष्ट मात्र खरी की रामराजा त्यांच्यातील या दुहीचा फायदा घेऊन स्वबळ वाढवत आहे व लवकरच तो कोणासही न जुमानता एकएक करून आपल्याला संपवेल याची जाणीव या पाच जणांना तिव्रतेने झाली व याचाच परिणाम म्हणून प्रसिद्ध तालिकोटचा संग्राम घडून आला.

या पाच सत्तांनी एकत्र येऊन विजयनगरवर आक्रमण केले. रामराजाही आपले सैन्य घेऊन बाहेर पडला. ही लढाई झाली तवरकीरी व राक्षतंगडी (विजयनगर पासून पस्तीस मैल) येथे झाली. (मला आश्चर्य वाटते पस्तीस मैल जवळ येईपर्यंत एकही लढाई कशी झाली नाही ? ..कमाल आहे..) संग्राम मोठा घनघोर झाला. कोण जिंकणार हे सांगता येत नव्हते. ऐन युद्धात आपल्या बाबतीत जे नेहमी घडते तेच झाले…रामराजा श्त्रूच्या हाती जिवंत सापडला. शत्रूने ताबडतोब त्याचा शिरच्छेद करून त्याचे शीर भाल्यावर मिरवले. झाले ! हिंदूंच्या सैन्याची या प्रकाराने दाणादाण झाली. बेशिस्तपणाचा कहर झाला व हिंदूंची सेना पळत सुटली. रामराजा, त्याचा भाऊ मारला गेला. नशिबाने धाकटा तिरूमल मात्र निसटला. त्याने विजयनगरला जाऊन जमेल तेवढी संपत्ती बरोबर घेऊन पेनुगोंडाचा किल्ला गाठला.

मुसलमानांचे सैन्य विजयनगरमधे शिरले व पुढचे सहा महिने त्यांनी लुटालुट करून धुमाकूळ घातला. शत्रू पस्तीस मैल जवळ येईपर्यंत एकही लढाई न केल्याची शिक्षा ही अशी मिळाली. मिळाली ते योग्यच झाले. या युद्धानंतर एकेकाळचे अत्यंत संपन्न असे हे शहर उठले, नामशेष झाले. मुसलमानांनी नंतर हे शहर अनेक वेळा लुटले व त्याला कोणी त्राता राहिला नाही. तशाही परिस्थितीत हे साम्राज्य शंभर वर्षे टिकून होते. शेवटी आपापसातील यादवींनी व मुसलमानी आक्रमणांनी हे साम्राज्य लयास गेले.

तालिकोटचे भयंकर युद्ध झाले व त्यात हिंदूची इतकी ससेहोलपट झाली की खरे तर तेव्हाच विजयनगर हे नकाशावरून पुसले जायचे पण तसे झाले नाही. मुसलमानांच्या सैन्याला पराभूत विजयनगरच्या सैन्याचा पाठलाग करावासा वाटला नाही त्याचे कारण उघड आहे. विजयनगरमधील संपत्ती हेच ते कारण.. दुसरे एक कारण होतेच. रामराजाला धड शिकवण्याच्या आकांक्षेनेच हे सगळे सुलतान एकत्र आले होते. ते उद्दीष्ट एकदा पार पडल्यावर त्यांच्यातील अंतस्थ इर्षा व दुफळी उफाळून वर आली. अहमदनगरच्या निजामालाच फक्त रामराजाचा सूड घ्यायचा होता इतर दोघांचा संपत्तीवरच डोळा होता. खरे तर विजापूर आणि विजयनगरमधे तसे गेली चाळीस वर्षे स्नेहभाव होताच व गोवळकोंडाला तर रामराजाने बेर्‍याच वेळा मदतही केली होती त्यामुळे या सगळ्यांनी ही मोहीम आटोपती घेतली.

या सगळ्या धामधूमीत विजयनगर कसेबसे तग धरून होते. रामराजाचा धाकटा भाऊ तिरुमल याने राज्यकारभार आपल्या हाती घेतला व काहीच अवधीत विजयनगरची परिस्थिती इतकी सुधारली की ते परत उत्तरेच्या सीमा मजबूत करायच्या कामाला लागले. राजकारणही करू लागले. या तिरूमलला तीन मुले होती त्यांची नावे होती – श्रीरंग, राम व वेंकट. हे इतके बलाढ्य झाले की थोड्याच काळात नामधारी राजाला दूर सारून यांनी राज्यकारभार हातात घेतला. तिरूमलनंतर हा श्रीरंग राजा झाला. (यात काहीतरी घोळ आहे पण ते एवढे महत्वाचे नसल्यामुळे त्यात जास्त वेळ घालवायला नको.). १५७० नंतर मुसलमानांच्या डोळ्यात विजयनगरची ताकद सलायला लागल्यावर त्यांनी परत एकदा आक्रमण केले व पेनुगोंडाच्या किल्ल्यालाच वेढा घातला. मुसलमानांचे आक्रमक धोरण बघून अंतर्गत बंडाळी व धुसफुशीला तोंड द्यायला लागू नये म्हणून याने स्वत: राज्याचे तीन तुकडे केले व तीन भावात वाटले. विजयनगर स्वत:कडे ठेवले, रामरायाच्या ताब्यात श्रीरंगपट्टम व म्हैसूरपर्यंतचा प्रांत दिला तर वेंकटला चंद्रगिरी व दक्षिण भाग दिला. श्रीरंग लवकरच मरण पावला व रामराजाविरूद्ध त्याच्या म्हैसूरच्या मांडलिकाचे वाकडे येऊन त्याने श्रीरंगपट्ट्मवर हल्ला केला. या बंडखोर मांडलिकांपैकी एक वडियार हे म्हैसूरच्या राजघराण्याचा मुळ पुरूष समजले जातात.

श्रीरंग व रामराजा याच्या मृत्यूनंतर विजयनगर साम्राज्याची सगळी जबाबदारी उरलेल्या चंद्रगिरीच्या वेंकटरायावर येऊन पडली. त्याने तीस एक वर्षे राज्य केले. या काळात त्याने विजयनगरला पहिले वैभव प्राप्त करून द्यायचा बराच प्रयत्न केला पण तोपर्यंत पूला खालून बरेच पाणी वाहून गेले होते. मांडलिक राजे व सरदार त्याच्यापेक्षा प्रबळ झाले होते व कोणीच त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मांडलिकांना वठणीवर आणायच्या ऐवजी त्याने त्यांच्या राज्यांना मान्यता द्यायचे धोरण स्वीकारले. त्यातच म्हैसूरचे राज्य स्वतंत्र झाले. या सगळ्या कटकटींचा त्याला फार त्रास झाला परंतू त्याने हिंदूंची एकजूट अजून फुटू दिली नाही, मात्र याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची छकले उडाली ती उडालीच. मदूरा व जींजी स्वतंत्र झाले…

वेंकटरायला मुलबाळ नव्हते. त्याचा मोठा भाऊ रामराजा याचा मुलगा याच्याकडेच रहात असे. त्याला याने चिक्कराय युवराज अशी पदवीही दिली पण त्याचा मेहूणा ओबावेर जग्गराय याला हे बिलकूल आवडले नाही. एक दिवस संधी साधून त्याने या राजघराण्यातील सगळ्यांची कत्तल केली. या प्रकारामुळे सगळीकडे गोंधळ माजला व जे काही साम्राज्य उरले होते त्याचे दोन तुकडे पडण्याची वेळ आली. नशिबाने या कत्तलीतून पाच मुलांपैकी एकाला “याचम नायक” नावच्या सरदाराने मोठ्या युक्तीने वाचविले होते. या नायकाने या मुलाला गादीवर बसवून जग्गरायशी सामना करायचे ठरविले.

या राजकारणात त्याला तंजावरच्या सरदाराचा पाठिंबा होता मात्र इतर जग्गरायच्या बाजूने झाले. या दोन पक्षांमधे त्रिचनापल्ली येथे लढाई झाली ज्यात बंडखोरांचा पराभव झाला व हा मुलगा तिसरा श्रीरंग म्हणून गादीवर बसला. पण हा दुर्बल होता. परिस्थिती एवढी वाईट झाली की याला रहायला सुरक्षित अशी जागा उरली नाही. त्याचे पुढे काय झाले हे ज्ञात नाही. पण इतिहासाच्या पानावरून जाताना तो एक काम करून गेला ते म्हणजे त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला बांधायला परवानगी दिली.

हा विजयनगरचा शेवटचा सम्राट म्हणता येईल……

या श्रीरंगाबद्दल अजून थोडे लिहावे लागेल कारण याच्याच कारकिर्दीत एका अतिशय महत्वाच्या, अत्यंत शूर, धोरणी हिंदू सरदाराचे या युद्धभूमी व राजकारणाच्या रंगभूमीवर आगमन झाले……ज्याच्यामुळे हिंदूंचा हा जवळजवळ तीनशे वर्षाचा अस्तित्वाचा लढा जिवंत राहिला. नुसता जिवंतच राहिला नाहीतर सगळ्या शाह्या गदागदा हलविण्यात व दिल्लीचे तख्त फोडण्यात या हिंदूंना यश आले..

“शहाजीराजे मालोजी भोसले !.”………….

क्रमश:

जयंत कुलकर्णी.
पुढच्या लेखात – शहाजीराजांच्या बदललेल्या विचारसरणीत विजयनगरच्या या पराभवाचा सहभाग..

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s