खटला…………….भाग-३

“आम्ही त्यालाही बोलून देणार आहोत वॅन” मी म्हणालो.”त्याचीही बाजू ऐकून घ्यावीच लागेल. त्याचे बोलणे झाल्यावर तुलाही काय झाले हे सांगायची संधी मिळणारच आहे”.
एंजेलाने तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि तिला शांत केले.
“विलफ्रेड बोल लवकर”
तो उठला आणि त्याने माझ्या डोळ्याला त्याची नजर भिडवली. त्याच्या पुढची कहाणी त्याने मलाच उद्देशून सांगितली……………

पुढे……..

“मागच्या गुरवारी मी घरी आलो तेव्हा कोणीतरी सांगितलं, कोणी तेही माझ्या लक्षात नाही, की माझ्या मेलेल्या भावाची मुलगी, जोसेट्टे छतावरून पडली. नंतर त्यांनी सांगितले की ती मेली. पोलिस आले होते, रुग्णवाहिका आली पण शेवटी राहिले काय तर त्या रस्त्यावरचा तो काळपट रक्ताचा सडा आणि शेवटी त्याचे वाळलेले डाग. तो ही त्या दिवाणजीने पाण्याने मगाशीच धुवून टाकला. माझ्या मेलेल्या भावाची मुलगीही मेली. तिला माझ्या आणि लिंडाबरोबर रहायचेच नव्हते. लिंडा गेल्यावर तर ती माझ्याशी शत्रू असल्यासारखीच वागायची. मी तिला त्या जी ६ मधे जाताना नेहमी बघायचो. झोकांड्या खात ती खाली यायची हेही बघायचो. नंतर तिला मी या वस्तीतल्या अंधार्‍या कोपर्‍यावर उभी असताना बघायचो आणि तिच्या मागे पॅंटच्या चेन लावत येणारे तरूणही बघायचो.

पोलिसांनी मला तीन दिवस काय झाले आहे याचा थांगपत्ता लागू दिला नाही. ती माझी नातेवाईक आहे हे त्यांनी मलाच सिद्ध करायला सांगितले. आता ते मी कसे करणार होतो ? शेवटी मी आपल्या मंत्र्यांना त्यांच्याशी बोलायला सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले की तिने आत्महत्या केली. कसे शक्य आहे ते ? मी त्यांना घसा खरवडून सांगितले की लार्क थाईन्सने आणि त्याच्या कोकेननेच माझ्या पुतणीचा खून केलाय. त्यानेच तिला धंद्याला लावली……..

क्षणभर वाटले तो आता रडतो की काय पण त्याने स्वत:ला सावरले आणि त्याने त्याची कहाणी पुढे चालू ठेवली….
“शेवटी मी एक पिस्तूल पैदा केले आणि माझ्या पुतणीने जे सांगितले तसेच केले. मी त्याचा दरवाजा ठोठावला आणि त्याला म्हणालो की मला थोडे क्रॅक कोकेन पाहिजे आहे. त्यांच्यात असेच म्हणतात. तो माझ्याकडे बघून हसला आणि तो मागे वळाला. त्याची पाठ दिसताच मी सरळ गोळ्या झाडायल सुरवात केली. तो एका बाजूला पळाला मी तेथेही त्याला गोळी घातली तो दुसर्‍या बाजूला पळाला तेथेही मी त्याला गोळी घातली. मी गोळ्या संपेतोपर्यंत ते पिस्तूल चालवले. पण तो अजून हलतच होता. मी ते पिस्तूल परत गोळ्यांनी भरले आणि ते त्याच्यावर रिकामे केले. त्याची हालचाल थांबल्यावर मी थांबलो. नंतर मी जिना उतरून खाली आलो आणि या अपार्टमेंटच्या समोर बसलो तेवढ्यात मि. मिलान ऑफिसला जायला निघाले.

तुला माहिती आहे मी थाईन्सची तक्रार घेऊन पोलिसांकडे कितितरी वेळा गेलो होतो. प्रत्येक वेळी ते त्याला अटक करायला जायचे आणि काहीच करायचे नाहीत. एक पोलिस तर म्हणाला की मीच ही वस्ती सोडावी.

मी सुधारगृहात जाऊन भेटलो, पण ते म्हणाले जोसेट्टे आता मोठी झाली आहे आणि तिला ताब्यात घेण्याचे सर्व सरकारी सोपस्कार होईपर्यंत ती १८ वर्षाची होईल.”
“तुला त्याला मारायचे होते का ?” मि विचारले.
“हो ! मला त्याला मारायचेच होते”
“जेव्हा तू त्याच्या घरी गेलास तेव्हा तू त्याला मारायचे हे ठरवून गेला होतास का ?”
“हो. ! मी तसेच ठरवले होते”
“त्याला मारल्यावर तुला बरे वाटले का ?” बेल्स पचकला.
एक क्षण विलफ्रेड गप्प बसला आणि मग त्याने मान हलवली.
“विलफ्रेड, तुला अजून काही सांगायचे आहे का ?” मी विचारले.
त्याने मान हलवून नकार दिला आणि तो खाली बसला. त्या खोलीतील सगळी माणसे त्या दु:खी माणसाकडे बघत होते. कोणी काहीच बोलत नव्हते. वॅनिटाही तिचा राग विसरून त्याच्याकडे दयार्द्र नजरेने बघत होती. ते बघून मला मोठी मौज वाटली.


“पण नालयका तू त्यांना सगळे सांगितलेले नाहीस. तू तिसर्‍यावेळी पिस्तूलात गोळ्या भरल्यास आणि ते माझ्यावर रोखलेस हे सांगितले नाहीस. सांगितलेस का ?” वॅनिटा म्हणाली.
मला आठवले की जेव्हा ते पिस्तूल माझ्या स्वाधीन केले तेव्हा ते भरलेले होते. त्या पिशवीत १४ रिकामी काडतुसेही होती. म्हणजे पोलिसांच्या हातात तो पुरावा लागू नये म्हणून ती गोळा करण्याइतका तो निश्चितच शहाणा होता म्हणायचा.
“हंऽऽ ते मी सांगायचे विसरलोच. पण ते मला एवढे महत्वाचे वाटले नाही”
“हो का ! पण तू ते भरलेस आणि माझ्या मागे आलास, खरे आहे की नाही ?”
“अरे देवा !” मिलोच्या तोंडातून उद्‌गार बाहेर पडले. त्याने खेदाने मान हलवली.
“तुला त्यावेळी काही लागले तर नाही ? केन्याने विचारले.
“लार्कनंतर तो मलाही मारणार होता. त्याने माझा खालच्या मजल्यापर्यंत पाठलाग केला आणि माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखले. तो चाप ओढणार तेव्हा मी मला बाळ होणार आहे हे सांगितल्यावर तो थांबला नाहीतर मेलेच होते मी” वॅनिटा म्हणाली.
ते सगळे आठवून ती परत रडायला लागली.
“तूला दिवस गेले आहेत ?मिलानने विचारले.
“हो डॅडी, तिला दिवस गेले आहेत. मागच्या बुधवारी मीच तिच्याबरोबर डॉक्टरकडे गेले होते.” मिलानची मुलगी म्हणाली.
“ती म्हणतेय ते खरे आहे का विलफ्रेड ?” मी विचारले.
“तिला दिवस गेले आहेत याचा याच्यात काही संबंध नाही. ती तेथे आत होती आणि ती कोकेन विकायला लार्कला मदत करत होती म्हणून मी तिलाही मारणार होतो. पण तिच्या डोळ्यातील अश्रू बघून मला जोसेट्टेची आठवण झाली आणि माझ्या लक्षात आले की मी ते करू शकणार नाही”
“हंऽऽऽऽ चला सगळ स्पष्टच आहे आता” असे म्हणून रेग्गी उठला देखील. “या मुलीने त्याला खून करताना बघितले आहे आणि यानेसुद्धा कबूली दिली आहे. आता कायद्याला त्याचे काम करू दे”
“रेग्गी खाली बस. अजून संपलेले नाही” मिलान म्हणाला.
“का ?” रेग्गीने चिडून विचारले.
“कारण आपण एक खटला चालवतोय आणि तू निर्णय घेणार्‍यांपैकी एक आहेस. तू आम्ही येथे आहोत तो पर्यंत थांबणार आहेस.” मिलानने ठामपणे सांगितले.
रेग्गी खाली बसल्याचे पाहून मलाच आश्चर्य वाटले. तो त्याच्या धंद्याच्या दृष्टीकोनातून कायद्याच्या बाहेर होता. या लोकांना सगळे कायदे त्यांच्या विरूद्धच केले आहेत असे वाटते. पण विलफ्रेडची गोष्ट वेगळी आहे. या खटल्यानंतर अनेक महिन्यानंतर विचार केल्यावर रेग्गी का थांबला त्याचे उत्तर मला वाटते मला मिळाले. मिलानने त्याला बोलावून त्यांच्या समाजात एक स्थान दिले होते एका समुहाचे नागरिकत्व दिले होते जो समूह काय चांगले आणि काय वाईट हे स्वत:च ठरवणार होता.
“पण त्याने स्वत:च गुन्ह्याची कबुली दिली आहे” बेल्स म्हणाला. हा बेल्स हळुहळु माझ्या डोक्यात जायला लागला होता. मी शांतपणे म्हटले
“तो या खटल्याचा फक्त पहिला भाग आहे. आणि विलफ्रेडने तो खून, त्याच्या पुतणीचा खून झाला, म्हणून केलाय, हे विसरता येणार नाही.”
“लार्कने तिला मारले नाही” वॅनिटा ओरडली.
“त्याने तिला व्यसनाची ओळख करून दिली हे खरे आहे का ?” सिलाने वॅनिटाला विचारले.
“नाही ! जोसी त्या घरात पार्ट्यांसाठी यायची आणि लार्क तिला जे हवे होते ते विकायचा”
“पण त्याने तिला धंद्याला लावले हे तरी खरे आहे ना?” केन्याने विचारले.
“त्याने तिला कशालाच लावले नाही. त्याने काही तिला बांधून ठेवले नव्हते ना कोणी तिच्यावर बलात्कार केला. तो तिचा स्वत:चा निर्णय होता. तुम्ही आम्हाला त्यासाठी दोष देऊ शकत नाही. लार्क एक व्यापारी होता मि. सिम्स सारखा.
“छे ! मी काय कोकेनचा एजंट वाटलो की काय तुला ? मी लोकांना मदत करतो.”
“पण समजा तुमच्या त्या मेक्सिकन कामागारांपैकी कोणी आजारी पडला तर तुमच्या वर खापर फुटतं का ? वॅनिटाने वाद घातला.
“ती वेगळी गोष्ट आहे”
“का बरे वेगळी ? समजा त्यातील एखादा येथे येताना किंवा तुमच्याबरोबर येताना पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल का ? हा प्रश्न आहे.” रेग्गीने उत्तर दिले नाही कारण त्याला माहीत होते की तसे काही झालेच तर त्याचेही तेच म्हणणे असणार.
“आणि बेल्स, तू तर लार्कसाठी पूर्वी काम केलेले आहेस. तू तर स्वत: जोसेट्टेला ती धंद्याला लागायच्या आधी ती घाण विकली आहेस.
विलफ्रेडने मान उचलून बेल्सकडे बघितले.
“मग ?” बेल्सने बेफिकिरीने विचारले.
“लार्कने जोसीला मारले असे जर यांचे म्हणणे असेल तर तूही तेवढाच खूनी आहेस.” वॅनिटाने एक मुद्दा पुढे ढकलला.
“वॅनिटा या सगळ्यांना तुझे वय सांगतेस का ?” जिना गोअर्सने विचारले.
“माझ्या वयाचा इथे काय संबंध ?”
“दोन महिन्यापूर्वी तिला १४वे लागले आहे. मला माहीत आहे. कारण मी तिची गॉडमदर आहे”.
वॅनिटाने ऐकले मात्र, तिने आपली नजर त्या वर्तूळाच्या बाहेर खिडकीकडे लावली.
“तिच्या वयाचा येथे काय संबंध ?’” मी चर्चा परत मार्गावर आणण्यासाठी विचारले.
“लार्कने जोसीला कोकेनची सवय लावली आणि मग धंद्याला लावली असे जर तुमचे म्हणणे असेल तर तो असे इतर कोणाशी वागला आहे का हे बघायला लागेल. जर हा लार्क एका १३ वर्षाच्या मुलीबरोबर रहात होता आणि त्याच्या पासून तिला दिवस गेले असतील तर आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जेथे कोकेन सर्रास विकले जात होते, तर ते सगळे विचारात घेतले पाहिजे”
चर्चच्या माणसाने मान डोलवली आणि होकारार्थी हूंकार भरला.
बेल्स जरा घाबरल्यासारखा वाटला.
“ठीक आहे मग आपल्याला जी ६ मधील लार्कच्या आयुष्याबद्दल चर्चा करावी लागेल. काही हरकत नाही.” मी म्हणालो.


लार्कच्या आयुष्याची चर्चा तासभर चालली असेल. सगळ्यांकडे लार्कच्या दादागिरीच्या कहाण्या होत्या. कोणाला त्याने भोसकले, कोणाला मारले, कोणाला त्याने कोकेनचा जास्त डोसही दिला होता…त्या वस्तीत एकूण चार मुलींनी व दोन मुलांनी कोकेनसाठी त्याला पैसा देण्यासाठी वेश्याव्यवसाय स्विकारला होता.
गंमत म्हणजे यात जे तरूण होते ते काही तक्रार करत नव्हते. वॅनिटा बोलायचा काही प्रश्नच नव्हता. एंजला गप्प होती आणि बेल्स त्या मेलेल्या माणसाच्या कहाण्या आणि त्याच्यावरचे आरोप गंभीरपण ऐकत होता.
“तुला अजून काही सांगायचे आहे का ? मी बेल्सला विचारले.
“खटला माझ्यावर चाललेला नाही” त्याने फटकन उत्तर दिले.
“तुला लार्क बद्दल काही सांगायचे आहे का असे विचारले मी”. मी म्हणालो. कारण जे सांगत होते त्यांच्या कहाण्यात त्याच त्याच गोष्टी आता परत येऊ लागल्या होत्या.
“लार्क बद्दल ?” बेल्सने विचारले.
“हो”
“माहीत नाही. तो कोकेनची दुकानदारी करायचा हे मान्य पण हे जे सगळे झाले त्यासाठी त्याला तुम्ही कसे जबाबदार धरणार आहात हे काही कळत नाही. पोलिस तर दर आठवड्याला त्याच्या येथे भेट देत होते पण कोणालाही अटक न करता परत जात होते. अर्थात जाताना ते पाकीट घेऊन जायचे तेही खरे आहे म्हणा”.
“तो सगळ्या पोलिसांना लाच द्यायचा का ? “ सिलाने विचारले.
“काहींना तो देत असे. सगळ्यांचे माहीत नाही. पण मला एक कळत नाही, त्याच्या त्या धंद्यावर पालिकेत कोणी आक्षेप घेत नाही तर तुम्ही इथे बसून कसा काय घेऊ शकता”. बेल्स म्हणाला.
नकळत रेग्गीची मान हलली.
“आणि तुम्हाला जर खोल चौकशी करायची असेल तर वॅनिटाच्या आईची पण करा. कदाचित तीही यात दोषी असेल”
“गप्प बस ! पुढे बोलू नकोस” वॅनिटा जोरात ओरडली आणि खुर्चीतून जवळजवळ उठलीच ती. एंजलाने तिला बळजबरीने खाली बसवले. एंजेलाची आणि माझी काही क्षणच नजरानजर झाली. आवडली मला ती….
“मग जीना काय म्हणायचे आहे तुला ?” मी विचारले.
“मला या विषयावर काही बोलायचे नाही पण त्या पोराला गप्प बसायला सांगा”
“नाही ! या खोलीत कोणालाच गप्प बसवता येणार नाही. सगळ्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे.” मिलान म्हणाला.
मिलानच्या आवाजातील प्रामाणिकपणा आणि आश्वासन बहुदा बेल्सला भावले असावे. त्याने तोंड उघडले.
“वॅनची आईसुद्धा लार्कच्या पहिल्या गिर्‍हाईकांपैकी होती. मला आठवतंय तीच पहिल्यांदा जी.६ वर आली होती. खरं सांगायचे तर सुरवातीला ती मलाच जी ६ वर कोकेन आणायला पाठवायची. कित्येक वेळा तिचे १० डॉलर हातात फडकवत मी जी ६ गाठली आहे. अर्थात तेव्हा मी लहान होतो. मग मला हे काम न सांगता ती स्वत:च तेथे जाऊ लागली. मी लार्कलाही अनेक वेळा तिच्या घरात शिरताना बघितले आहे तर तिला त्याच्या. वॅनिटाची आणि त्याची त्यामुळेच ओळख झाली.”
वॅनिटाने तिचे तोंड शरमेने तिच्या ओंजळीत लपवले. एंजेला माझ्याकडे गोंधळून बघत होती.
“म्हणजे वॅनिटाच्या आईने तिला त्या लार्कला विकली असे म्हणायचे आहे का तुला ?”
“नाहीऽऽऽऽऽऽ“ वॅनिटाने किंचाळून एंजेलाच्या खांद्यात आपले तोंड लपवले.
“नाही ! मला असे म्हणायचे नाही पण वॅनिटा जी ६ वर जायला लागली आणि तिच्या आईला कोकेन स्वस्त मिळायला लगले हे सत्य आहे”. बेल्सने सत्य दुसर्‍या, डाग न देणार्‍या शब्दात मांडले. त्याचे त्या क्षणी मला कौतूक वाटले. कशाला खोटे बोलू ?
मिलानच्या कपाळावर आजतागायत अशा आठ्यांचे जाळे मी कधीच बघितले नव्हते. या तुटलेल्या मनांच्या आणि वचनांच्या गुंत्यात तो हरवून गेलेला वाटला मला.
“वॅनिटा !” मी म्हणालो.
“हं”.
“बेल्स म्हणतोय ते खरंय का ?”
“समजा आहे. मी लार्कवर प्रेम करत होते. तसाच तो माझ्या आईसाठी खूपच तरूण होता”.
“तुझ्यासाठी वयाने मोठा !” केन्या तुटकपणे म्हणाली.
“या इथे माझ्या पोटात त्याचे बाळ आहे. मी लहान नाही. लार्कचे माझ्यावर प्रेम होते आणि माझे त्याच्यावर आणि या डुकराने त्याला ठार मारले. बस्स ! एवढेच खरे आहे.”
“मग तू पोलिसात का नाही गेलीस ?” रेग्गीने विचारले. जायला निघणारा रेग्गी आता त्या खुर्चीच्या काठावर उत्तेजीत होऊन बसला होता आणि या खटल्यात पूर्णपणे विरघळून गेला होता.
त्या बांधकाम कंत्राटदाराकडे बघत वॅनिटा क्षणभर स्तब्ध झाली.
“मला भीती वाटली……”
“का ? पोलिसांकडे जायचा तुला पूर्ण हक्क होता आणि आहे. त्याने तुझ्या मित्राचा तुझ्या डोळ्यासमोरच खून केला….”
“तिची आई लार्कच्याच एका मित्राकडे काम करत होती. पोलिसांनी तिला कुठल्यातरी अनाथाश्रमात किंवा महिलाश्रमातच नेले असते.” जीना म्हणाली.
“हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो.
वॅनिटा खाली बघत गप्प राहिली.
“इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली.
त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा व न्यायदानाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले……..

क्रमश :……
जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s