जनरल रोमेलचे शेवटी काय झाले…………

जनरल रोमेल.

जनरल रोमेलचे शेवटी काय झाले…………….

जनरल एरविन रोमेल प्रसिद्धीच्या झोतात आला तेव्हा ४९ वर्षाचा होता. ते साल होते १९४० आणि जर्मन ७ व्या पॅंझर डिव्हिजनचा तो कमांडर होता आणि त्याच्या या रणगाड्यांनीच फ्रान्स घशात घातला असे म्हणायला हरकत नाही. अजून दोनच वर्षांनी जेव्हा त्याचे सैन्य – आफ्रिका कोअर, अलेक्झांड्रिया पासून ७० मैलावर उभे ठाकले तेव्हा तर त्याचे नाव घरोघरी झाले. जर्मनीच्याच नव्हे तर जगातील सर्व देशांमधे. हिटलरनेही त्याला फिल्डमार्शल पदावर बढती दिली आणि जर्मनीचा सगळ्यात धुरंधर सेनानी असे त्याचे कौतूक केले.

ब्रिटीशांचे जे सैन्य अफ्रिकेच्या वाळवंटात रोमेलच्या सैन्याला विरोध करत होते त्यांना वाळवंटातील उंदीर असे संबोधले जायचे कारण त्या वाळवंटात त्यांची ठाणी वाळूत खोल खड्डे करून त्यात लपवलेली असायची आणि वेळ आल्यावर जसे उंदीर बिळातून बाहेर पडतात तसे हे सैनिक बाहेर पडायचे. पण मुद्दा तो नाही. रोमेलची किर्ती इतकी पसरली होती की या सैन्यात एखादी कामगिरी उत्कृष्ट कर असे म्हणण्याऐवजी ती रोमेल सारखी कर असे म्हणायची पद्धत पडली होती. त्याचा युद्धभुमीवरचा कावेबाजपणा आणि बुद्धिमत्ता याने त्याला “वाळवंटातील कोल्हा” असे टोपणनाव पडले. एकदा ब्रिटिशांच्या आठव्या आर्मीने त्याला कोंडीत पकडले असताना त्याने त्याच्या रणगाड्याच्या अशा हालचाली केल्या की त्यातून उठणार्‍या वाळूच्या धूळीवरून व आवाजावरून ब्रिटीश सैन्याने असे अनुमान काढले की जर्मनांच्या सैन्याची ताकद त्या भागात खूपच आहे आणि त्यांनी तेथून माघार घेतली. दुसर्‍या एका ठिकाणी त्याने अशीच एक युक्ती वापरली. ब्रिटीश विमाने रोज त्या वाळवंटाची छायाचित्रे काढायची. हे जेव्हा रोमेलला कळाले तेव्हा त्याने लगेचच ओळखले की ही विमाने वाळवंटातील रणगाड्यांच्या वाळूत उठणार्‍या पट्ट्यांची छायाचित्रे काढत असणार व त्यावरून जर्मनांच्या ताकदीचा अंदाज बांधत असणार. रोमेलने लगेचच त्यानंतर सलग दोन रात्री त्याच्याकडे जेवढी वाहने होती ती त्या वाळूत इतक्या दूरदूर फिरवली की ब्रिटीशांनी त्याच्या सैन्याचा चुकीचा अंदाज बांधून त्या विभागातून माघार घेतली.

असे म्हणत रोमेलला युद्धभुमीवर बघणे म्हणजे एक “बघणे” असायचे. त्या वेळी त्याचा रुबाब बघून स्त्रियांच्या ह्र्दयाचा ठोकाही चुकला असता असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. जेव्हा तो त्याच्या रणगाड्याच्या टरेटमधून बाहेर येई, तेव्हा त्याच्या सैनिकांना तो एखाद्या युद्धाच्या देवतेसारखा भासे. एका युद्धाच्या दरम्यान एका मृत्यूच्या कल्पनेने हैराण झालेल्या त्याच्या अधिकार्या्ला तो निडरपणे म्हणाला “ तुला एवढी भीती वाटत असेल तर माझ्याबरोबर रहा. मला काहीही होत नाही”

पण शेवटी काहीतरी झालेच. काय, ते आता आपण बघणार आहोत.

जर्मनांच्या अधिकृत इतिहासात त्याच्या मोटारीवर लिव्हारॉट नावाच्या गावापाशी विमानांनी झाडलेल्या गोळ्यांच्या फैरींनी झालेल्या जखमांना तो बळी पडला. पण सत्य काही वेगळेच होते.

आफ्रिकेच्या वाळवंटातील युद्ध जर्मनी हरत आले होते तेव्हाच रोमेलच्या लक्षात एक गोष्ट आली होती आणि ती म्हणजे माणूस माणसाला जो एक प्रकारचा आदर दाखवतो त्याची हिटलरकडे पूर्ण वानवा होती. रोमेलला हे आफ्रिकेतील युद्ध तो हरणार आहे याची पूर्ण कल्पना होती कारण त्याच्याकडे रणगाड्यात आणि इतर वाहनांमधे घालायला इंधनच नव्हते आणि तिकडे तर ब्रिटिशांना नवनवीन ताजी कुमक व युद्धसाहीत्याची रसद नियमीत मिळत होती. त्याने त्याच्या लष्करी अनुभवाच्या व ज्ञानाच्या जोरावर हिटलरला स्पष्ट सल्ला दिला की या हजारो सैनिकांचे प्राण वाचवायचे असतील तर ताबडतोब माघार घेणे इष्ट. यावर हिटलरचा निरोप आला “विजय किंवा मृत्यू”.
“मी या दोन्हीही गोष्टी त्या वेळेस करू शकलो नाही” रोमेल नंतर एकदा विषादाने म्हणाला.

ट्युनिशियातील पराभवानंतर हिटलरने रोमेलला जर्मनीला बोलावून घेतले कारण त्या पराभवाशी त्याला रोमेलचे नाव जोडले गेलेले नको होते असे म्हणतात. खरे खोटे त्यालाच माहीत.

या नंतरचा काळ रोमेलला फारच कठीण गेला. रोमेलने आत्तापर्यंत नाझी पार्टीचे सदस्यत्व घेतलेले नव्हते आणि त्याच्याकडे फिल्डमार्शलला मिळते तसले पार्टीचे सोन्याचे चिन्हही नव्हते. तो स्वत:च त्याच्या लष्करी शिक्षणात व नंतर प्रशिक्षण देण्यात व्यग्र होता की त्याला या पार्टीच्या उचापतींना वेळच नव्हता. जेव्हा त्याला नाझींचा अमानुष अत्याचार, गेस्टापो, छळछावण्या, याबद्दल कळाले तेव्हा नाझींनी जर्मन जनतेच्या नावाखाली काय धुमाकूळ घातला आहे हे बघून त्याला धक्काच बसला. “मी एक युद्ध करत होतो. पण यांनी माझ्या गणवेशांवर डाग पाडले.” जेव्हा नंतरच्या काळात हिटलरने एकास बारा या प्रमाणात युद्धकैदी ठार मारायचा हुकूम काढला तेव्हा रोमेलने तो नाईलाजाने केराच्या टोपलीत फेकला.

शेवटी रोमेलला हे कळून चुकले की हिटलर स्वत:बरोबर जर्मनीला खाईत लोटतोय आणि त्याला त्याचेच फार दु:ख होत असे.

जर्मन जनतेचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि दोस्त राष्ट्रांवर दबाव टाकण्यासाठी हिटलरने रोमेलवर नॉर्मंडीच्या किनार्‍याचे संरक्षण करायची जबाबदारी टाकली. रोमेलने परिस्थितीचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की या तुटपुंज्या युद्धसाहित्याच्या जोरावर दोस्तांचे आक्रमण परतवून लावणे अशक्यच आहे.

१९४४ साली त्याने एक महत्वाचे पाऊल उचलले. त्या काळात जिंकलेल्या फ्रान्स चा जर्मन अधिपती होता एक स्टुल्पनागं नावाचा जनरल. हा माणूस हिटलरला जे काही जर्मनीमधे विरोध करत होते त्यांचा पुढारी होता. त्याने त्याच्याशी हे युद्ध संपवण्यासाठी व नाझी राजवट उलथवण्यासाठी काय करावे लागेल याची चर्चा केली.
जनरल स्टुल्पनाग.

रोमेल बरोबर चर्चा करताना

रोमेलचे मत होते की नंतर बिनशर्त शरणागती पत्करून सगळेच घालवण्यापेक्षा हिटलरला न कळवता आत्ताच जर तहाची मागणी केली तर काहीतरी सवलती पदरात पडतील. त्याची कल्पना अशी होती – जर्मन सैन्य माघार घेईल त्या बदल्यात ब्रिटन आणि अमेरिकेने जर्मनीवरचे विमानहल्ले ताबडतोब थांबवावेत. पूर्वेकडे मात्र पश्चिम देशांच्या संस्कृती रक्षणासाठी जर्मन सैन्य लढत राहील. त्याने असेही सुचवले की हिटलरला त्याच्या विश्वासू पॅंझर तुकड्या पकडतील व त्यानंतर त्याच्यावर एखाद्या न्यायाधिकरणासमोर खटला चालवला जाऊ शकतो. त्याच्या मते त्याला तसेच ठार मारून त्याला हुतात्मा ठरवण्यात अर्थ नव्हता.

दरम्यानच्या काळात दोस्तांचे सैन्य नॉर्मंडीच्या किनार्‍यावर उतरले आणि १५ जुलैला रोमेलने हिटलरला शेवटचा पण निर्वाणीचा तह करण्याबाबत निरोप पाठवला. त्याने हिटलरला चार दिवसाची मुदत दिली होती.

जुलैच्या १७ तारखेच्या संध्याकाळी रोमेल त्याच्या मोटारीने आघाडीवरून परत येत असताना लिव्हारॉट येथे अचानक दोन ब्रिटिश खुणा असलेली विमाने त्याच्या दिशेने झेपावली. त्यातील एक तर खुपच कमी उंचीवरून उडत होते की रोमेलला त्याचा वैमानिक व त्या वैमानिकाला रोमेल स्पष्ट दिसत होते. त्या वैमानिकाने खालच्या मोटारीच्या डाव्या बाजूवर आपल्या मशीनगनचा तुफान मारा केला आणि तो आकाशात नाहीसा झाला. रोमेल गाडीबाहेर फेकला गेला व बेशूद्ध पडला. तो खाली पडलेला असताना ते दुसरे ब्रिटिश विमान खाली झेपावले आणि त्यानी त्याची मशीनगन चालवली. या हल्ल्यात रोमेल जबर जखमी झाला. त्याच्या कवटीला भेग पडली, कपाळाचे हाड दोन ठिकाणी तुटले, गालाचेही हाड तुटले व डाव्या डोळ्यालाही जखमा झाल्या होत्या. त्याच्या मेंदूच्या जखमा बघून डॉक्टरांनी त्याची आशा सोडली होती.

रहस्यमय गोष्ट ही आहे की, अगदी छोट्यामोठ्या गोष्टींची नोंद करणार्‍या रॉयल एअर फोर्सच्या त्या दिवशीच्या अहवालात या दोन विमानांच्या हल्ल्याची नोंद सापडत नाही. असे म्हणतात की हे रोमेलच्या निर्वाणीच्या पत्राला हिटलरने दिलेले उत्तर होते.

हिटलरच्या विरूद्ध चाललेल्या कारवायांना बसलेल्या दोन धक्क्यापैकी हा पहिला होता. दुसरा आपल्याला महितच आहे. “ऑपरेशन व्हॅल्किरिआ” (Valkyrie). या कटात हिटलरला बाँबच्या स्फोटात ठार मारायची योजना होती. त्याच्यात आता सविस्तर जायला नको कारण तो एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. यातून हिटलर विस्मयकारकरित्या बचावला. नाझींनी मग या कटाची पाळेमुळे खणायला सुरवात केली. अनेकांना चौकशीविना ठार करण्यात आले. हिवाळ्यापर्यंत हिटलर चांगलाच सावरला. त्याच्या डोळ्याला झालेला पक्षघात सोडल्यास तो अगदी ठणठणीत बरा झाला.

रोमेल १४ ऑक्टोबरला त्याच्या हर्लिंगजेन येथील प्रासादात पहाटेच ऊठला होता कारण तो त्याच्या मुलाची- मॅनफ्रेड रोमेलची वाट बघत होता. त्याचा हा मुलगाही लष्करात होता आणि सुट्टी घेऊन काही दिवसासाठी घरी येणार होता.

रोमेल व त्याची पत्नी व मुलगा मॅनफ्रेड –

पण त्या दिवशी दुपारी रोमेलला भेटायला अजून एक व्यक्ती येणार होती आणि त्याची त्याला जास्त काळजी वाटत होती. आदल्या दिवशी रात्रीच हिटलरच्या कार्यालयातून रोमेलला फोन आला होता की जनरल बर्गडॉर्फ त्याच्या नवीन नेमणूकीबद्दल चर्चा करायला येत आहे. नाष्ट्याला मॅनफ्रेड भेटल्यावर रोमेल त्याला म्हणालाही “बर्गडॉर्फ भेटायला येतोय. मला कसल्यातरी कटाचा वास येतोय “.
१२ वाजता जनरल बर्गडॉफ आणि जनरल मिसेल आले.
जनरल बर्गडॉर्फ –

रोमेल आणि त्याच्या पत्नीने पाहुण्यांचे स्वागत केले. औपचारिकता पार पडल्यावर रोमेलच्या मुलाने आणि पत्नीने त्यांना एकटे सोडले. साधारणत: १ च्या सुमारास रोमेल वरच्या मजल्यावर आपल्या शयनगृहात आला. त्याच्या चेहर्‍याकडे बघून त्याच्या पत्नीने विचारले “ काय झाले आहे ? तुमचा चेहरा असा का दिसतोय ?”
“अजून एका तासात मी मेलेला असेन” रोमेलने शून्यात नजर लावून उत्तर दिले. जणू काही त्याला या वाक्याचा अर्थच समजला नव्हता.
त्याने तिला थोडक्यात काय झाले आहे ते सांगितले –
स्टुल्पनागंने आत्महत्या करायचा प्रयत्न केल्यावर त्याला फासावर लटकवण्यात आले पण त्याच्या येथे जे पुरावे सापडले त्यावरून म्हणे हिटलरची खात्री झाली होती की रोमेलचा २० जुलैच्या कटात हात आहे. त्याने त्याच्या पुढे दोन पर्याय ठेवले. १) वीष पिऊन लगेच आत्महत्या करणे किंवा लोकन्यायालयात खटल्याला सामोरे जाणे. त्या आलेल्या दोन माणसांनी हेही लगेचच स्पष्ट केले की जर त्याने दुसरा पर्याय निवडला तर त्याचा सूड त्याच्या बायका पोरांवर घेतला जाईल. जर त्याने आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबियांना सर्व मान सन्मान व फिल्डमार्शलचे निवृत्तीवेतनही दिले जाईल. जर्मन जनतेचा लाडका जनरल या कटाच्या मागे होता हे हिटलरला जनतेपासून लपवून ठेवायचे होते. कारणे अर्थातच स्पष्ट होती.
जनरल बर्गडॉफने त्याला त्याच्या आत्महत्येची योजना समजावून सांगितली. उल्मच्या रस्त्यावर त्याला मोटारीतच वीष दिले जाईल. काही सेकंदातच तो मेला की त्याचे शरीर उल्मच्या एका सरकारी इस्पितळात नेले जाईल व बाहेर अशी बातमी पसरवली जाईल की युद्धात१७ जुलैला झालेल्या जखमांनी त्याचा अखेरीस मृत्यू झाला.

त्या वरच्या मजल्यावर रोमेलने ही योजना त्याच्या मुलाला व त्याचा सहाय्यक कॅप्टन अल्डिंगर या दोघांना समजावून सांगितल्यावर ते तिघे खाली आले.
रोमेलला त्याचा करड्या रंगाचा कोट चढवायला त्याच्या मुलाने मदत केली. रोमेलने त्याची आवडती टोपी चढवली. आपल्या हातात त्याने फिल्डमार्शलचा बॅटन घेतला व रुबाबदार पावले टाकत तो मागे न बघता घराबाहेर पडला. बाहेर त्याचे मारेकरी त्याची वाट बघत होते त्यांच्या बरोबर मग तो त्या गाडीतून निघून गेला.
परत कधीही न येण्यासाठी.

जर्मनीच्या तिसर्‍या राईशमधे हिटलरने कसली संस्कृती रुजवली होती याचे हे उत्तम उदाहरण आहे.

दुपारी दीड वाजता जनरल बर्गडॉर्फ आणि जनरल मिसेल यांनी फिल्डमार्शल रोमेलचे मृत शरीर उल्मच्या इस्पितळाच्या ताब्यात दिले. डॉक्टरांनी नियमानुसार प्रेताची ऑटोप्सी करावी असे सुचवल्यावर बर्गडॉर्फ पटकन म्हणाला “ त्याला हात लावू नका. आता पुढची सगळी काळजी बर्लिन घेईल”.

त्या उल्मच्या प्रवासात नक्की काय झाले हे काळाच्या उदरात गडप झाले. बर्गडॉर्फ हिटलर बरोबर त्याच्या बंकरमधे मारला गेला. त्या गाडीचा चालक आणि जनरल मिसेल यांनी साक्षीत सांगितले की त्यांना गाडीपासून दूर जायला सांगण्यात आले होते आणि जेव्हा ते परतले तेव्हा रोमेल मृत्यूपंथाला लागला होता.

बरोबर पंचवीस मिनिटांनी रोमेलच्या घरातील फोनची रींग वाजली. जवळच उभ्या असलेल्या कॅप्टन अल्डिंगरने तो फोन उचलला. समोरून मेजर डॉ. एहेरेन्बर्गर बोलत होता “ एक भायनक गोष्ट घडली आहे. फिल्शमार्शल रोमेलच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन ते गाडीतच मृत्यू पावले आहेत. मी काय म्हणतोय ते ऐकतो आहेस का ?”
“हो ! ऐकतो आहे”
“ मग हा निरोप तेवढा फ्राऊ रोमेलला दे ! मी लगेचच तिकडे येतो आहे”
हॅलो ! हॅलो !ऽऽऽऽऽऽऽ
पण अल्डिंगरने फोन तसाच टाकून जिन्याच्या दिशेला चालायला सुरवात केली होती. त्याला तिला काही सांगायची गरज नव्हती.

सरकारी इतमामाने १८ ऑक्टोबरला त्याचे अंत्यविधी करण्यात आले. नाझीपक्षाचे सर्व उच्चाधिकारी, लष्करी अधिकारी व जनरल रुनस्टेड खास हिटलरचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता.
अंत्यविधीच्या वेळी – फ्राऊ रोमेल व मॅन्फ्रेड रोमेल.

जेव्हा तो तिला घेऊन जायला आला तेव्हा रोमेलच्या पत्नीने त्याचा हात झिडकारला ज्यामुळे उपस्थितांमधे व वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता.
जनरल रुनस्टेडने हिटलरचा संदेश वाचून दाखवला ज्यात रोमेलची थोरवी गायली होती. ती ऐकून जमलेली सर्व माणसे माना डोलवत होती पण त्यांना ही कल्पना नव्हती की ते एका खुनाच्या शेवटच्या अंकात भाग घेत आहेत.

जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, कथा. Bookmark the permalink.

4 Responses to जनरल रोमेलचे शेवटी काय झाले…………

  1. विशाल कुलकर्णी म्हणतो आहे:

    हि माहिती नवीनच आहे. धन्यवाद. मीदेखील रोमेलचा प्रचंड पंखा आहे, सध्या एवढेच लिहीतो, सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतोय.

  2. विशाल कुलकर्णी म्हणतो आहे:

    जयंतदादा, मायबोलीवर निखील देशपांडे यांनी रोमेलविषयी एक असाच सुंदर लेख लिहीला आहे. तिथे मी तुमच्या या लेखाचा दुवा दिला आहे. तुमची परवानगी घ्यायला मात्र विसरलो. त्याबद्दल क्षमस्व !

  3. anuvina म्हणतो आहे:

    काय लिहिता साहेब तुम्ही ….. अगदी एखादी कादंबरी किंवा थरारक ऐतिहासिक पुस्तक वाचतोय असं वाटतं. मस्तच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s