सोफिया !

मोझंबीकमधील मापूटो नावाच्या गावात एका इस्पितळासमोर, पंधरा एक वर्षापूर्वी एक छोटी मुलगी एका गंजलेल्या चाकाच्या खुर्चीत हताशपणे बसलेली होती. तिला दोन्ही पाय नव्हते आणि तिचे वय असेल अंदाजे १० एक. माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कोणास ठावूक मला तिच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी बोलले. तिच्या अस्फूटशा आवाजात मला तिने तिचे नाव सांगितले तो प्रसंग मला अजून लख्खपणे आठवतोय. ती म्हणाली “सोफिया”

आज अनेक वर्षानंतर आम्ही चांगल्या आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहोत. माणूस म्हणून जन्माला यायचे म्हणजे काय,  हे तिच्या एवढे मला कोणीही शिकवलेले नाही तसेच अत्यंत गरीबीत दिवस काढणार्‍यांमधे परिस्थितीशी झगडायची एवढी ताकद कुठून येते हे तिच्या एवढे चांगले कोणीच सांगू शकत नाही. ज्या घटकाला या समाजाच्या सगळ्यात खालच्या थरावर जगणे भाग पाडले जाते ते आपले जग किती अन्यायी, क्रूर आहे हे या थरातील लोकांच्या वेदनांना, हाल आपेष्टांना बघितल्यावर समजते. पण खरंच या वेदना, ही क्रूरता खरोखरच अनावश्यक आहेत.

हा शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे. या आपल्या युगात पटायला सगळ्यात कठीण हीच बाब आहे की या हाल आपेष्टा आणि क्रूरता अनावश्यक आहेत. त्याच्या वाचूनही प्रगती शक्य आहे. हे वाक्य लिहितानाच कुठेतरी एक मुल मलेरियाने दगावलेले असेल तसेच या जगातील लाखो बालकांना हे वाचताही येणार नाही कारण त्यांना वाचता येत नाही. त्यांच्यासाठी या कसल्यातरी रहस्यमय खुणाच असतील. जगात आज लक्षावधी मुले लिहायला वाचायला न येता तशीच जगत आहेत याची एक लेखिका म्हणून घ्यायला मला खरोखरच शरम वाटते. दुर्दैवाने त्यांचा हा मुलभूत हक्क डावलला जातोय याची फार कमी जणांना जाणीव आहे. असो. मी काय म्हणत होते बर…. हं सोफी…..

लहानपणी सोफिया आणि तिची लहान बहीण तिच्या गावातील एका छोट्या रस्त्यावरून पळत होत्या. पहाटेची वेळ होती. पहाटेचे धूके खाली उतरले होते आणि समोरच्या डोंगरात सूर्य उगवत होता. सोफियाला रस्ता सोडायचा नाही हे चांगलेच माहीत होते कारण रस्त्याच्या कडेला असतात जमिनीतील सुसरी, ज्या पायाचे लचके तोडतात हे तिच्या आईने तिला अनेक वेळा सांगितलेले असते.

मुली पळत होत्या. मुलांना खेळायचा हक्क आहे आणि ती सांगितलेले विसरूही शकतात. हाही त्यांचा हक्कच आहे.

काय झाले असेल याचा सहज अंदाज बांधता येऊ शकतो.
पळता पळता सोफियाचा उजवा पाय रस्त्याबाहेरच्या मातीत पडला असणार. तो जमिनीत पुरलेल्या भुसुरूंगावर पडला असणार. आता तो भुसुरूंग असा रितीने पेरला होता की त्याच्यावर पाय पडला की तो तर उडेलच पण त्याच्या पुढचाही उडेल. तसेच झाले. सोफियाची बहीण मारीया जागेवरच ठार झाली आणि रक्तात माखलेल्या सोफियाला इस्पितळात आणण्यात आले.

मी नंतर जे डॉक्टर सोफियावर औषधोपचार करत होते त्यांच्याशी बोलले.
ते म्हणाले “ कुठल्याही डॉक्टरने सांगू नये अशी कबूली मी आज तुम्हाला देतो. पण मी हे सांगितले नाही तर त्या मुलीच्या खर्‍या ताकदीची तुला कल्पना येणार नाही”.

ते म्हणाले “ सोफियाला जेव्हा येथे आणले तेव्हा तिचे दोन्ही पाय तुटलेले होते. शरीरावरच्या मासाचे तुकडे ठिकठिकाणी लोंबत होते. छातीवर फक्त बरगड्याच रहिल्या होत्या. प्रामाणिकपणे सांगतो ती तिच्या बहिणीसारखी मरावी म्हणून आम्ही देवाची प्रार्थना करत होतो”.

पण सोफिया जगली. जगातील सर्व लष्करी उद्योगांपेक्षाही तिची ताकद जास्त होती. असे बलाढ्य उद्योग ज्यांच्या विरूद्ध जगातील गरीब काहिच करू शकत नाहीत. आपल्या उरलेल्या अवयवात आणि मनात सोफियाने आता एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे जगातील गरीबांना बाजूने या ताकदींच्या विरुद्ध उभे रहायचे.
या विचाराने तिने उभारी धरली आणि ती बरी झाली.

आज सोफियाला दोन मुले आहेत. तिचे शिवणकाम चांगले आहे आणि मुख्य म्हणजे तिचे शिक्षण चालू आहे. तिला शिक्षिका व्हायचे आहे. पण या पेक्षाही महत्वाचे म्हणजे जगात भुसुरुंगाच्या विरोधात जी काही चळवळ सुरू झाली त्या चळवळीची ती एक प्रेरणा आहे. अनेक तरूणांची ती प्रेरणा आहे.

माझ्या बाबतीतही तेच म्हणता येईल.

माझ्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेले पण जेव्हा मी सोफियाला कृत्रिम पायावर चालताना बघितले तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणी त्याच क्षणी आम्ही दोघिंनीही आमच्या आयुष्याचे ध्येय ठरवून टाकले “It is never too late !Everything is still possible” सगळे संपलेले नाही. शक्यता नाकारू नका !”

सोफियाची गाठ जेव्हा त्या जमिनीतील सुसरीशी पडली तेव्हा ती अडाणी होती. आता ती वाचू शकते आणि लिहूही शकते. आता ती स्वत:चे अनुभव लिहिते, तिची स्वप्ने लिहिते व तिला जे तत्वज्ञान समजलेले आहे तेही तिच्या सोप्या भाषेत लिहिते. ती ज्याच्या विरूद्ध उभी ठाकली आहे त्याची कारणेही ती लिहून सगळ्यांना पाठवते.

तिच्या दोन मुलांची ती नीट काळजी घेते आणि त्यांच्या भविष्याबद्दल ती खूपच आशावादी आहे. अर्थात काही वेळा ती जगात जे चाललेले आहे ते बघून उदास होते व तिच्या कुबड्यांचा आधार घेत निघून जाते जणु काही तिला या जगात रहायचेच नाही. अजून काही प्रसंगात ती अशीच निघून जाते ते म्हणजे जेव्हा इतर स्त्रिया नाचत असतात तेव्हा. आपल्याला याचे काही विशेष वाटणार नाही पण नाचता न येणं याच्या वेदना फक्त आफ्रिकन स्त्रीच समजू शकते. पण ती इतरांना वाईट वाटू नये म्हणून तेथून निघून जाते.

एका बाँबने तिच्या चिंधड्या उडवायचा प्रय्त्न केला पण ती जिद्दीने मृत्यूशी भांडली, तिने त्याला भीक घातली नाही. कोणीच तिला हरवू शकले नाही.
सोफियामधे मला जगण्यासाठीची कारणे व आशा दिसतात. तिची परिस्थितीला शरण न जाण्याची व लढत राहण्याची वृत्ती दिसते. ती अजूनही तशीच आहे.

जयंत कुलकर्णी
मुळ लेखक : हेनिंग मॅंकेल.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s