भ्रमणकक्षा

लाल मुंडासे घातलेल्या धनगराच्या पोराने आपली मेंढरे पुढे काढण्यासाठी हाळी घालावी तसे त्या कंडक्टरने ८ जानेवारी १९८० रोजी त्या बसमधील मेंढरांना हाळी दिली “ चला स्वारगेट्ला उतरणार्‍यांना पुढे येऊ देत. चला ! लवकर !
टिंग टिंग आवाज झाला आणि बस थांबल्यावर अनेक मेंढराच्या मागे अजित प्रधान अलगद त्या बसमधून जमिनीवर आला. शांतपणे त्याने रिक्षाच्या दिशेने पावले टाकली. त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या शब्दकोशात “कदाचित” हा शब्दच नव्हता असे म्हणायला हरकत नाही. कदाचित असे होईल, कदाचित तसे होईल, कदाचित रिक्षा मिळणार नाही, कदाचित मिळेल असे अनिश्चित त्याच्या आयुष्यात काही राहिलेले नव्हते. लग्न होऊन दोन वर्षे झालेल्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडून घडून काय घडणार ? तीच बस, तोच कंडक्टर, बरचसे प्रवासीही तेच…तेच स्वारगेट..तोच थांबलेला रिक्षावाला आणि तेवढेच भाडे. रिक्षाच्या दिशेने चालताना त्याने मनातल्या मनात पण उघडपणे या तोचतोचपणाच्या निष्ठूरतेला शिव्या दिल्या.

फ्लॅटची घंटा वाजवली की ज्योती दार उघडेल. अफगाण स्नोचा वास त्या दरवाजात दरवळेल जो उद्यापर्यंत तेथे राहणार, याची त्याला खात्री आहे. आतल्या कडी कोयंड्यांना तर तो कायमच असतो. मग बुट काढून, तोंड धुवून तो वर्तमानपत्र वाचत बसेल. खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या वाचून होईतोपर्यंत गरमागरम चहा टेबलावर येईल. तसे ज्योतीचे काम व्यवस्थीत असते. टेबलावरची आयोडीनयुक्त मिठाची बाटली बघत मग त्याचे खाणे, चहाही संपेल. चहानंतर ज्योती त्याला तिच्या भरतकामाचा एखादा नमुना दाखवेल.

साडेसात वाजले की त्यांना सगळे आवरून त्यांच्या त्या छोट्याशा हॉलमधील सोफ्यावर वर्तमान पत्रे पसरायचे काम करावे लागते. कारण त्याच वेळी वरच्या मजल्यावर त्या जाड्या साठ्याचे व्यायामप्रकार चालू झाल्यावर जे पोपडे पडतात ते त्यांना त्या कागदात पकडायचे असतात नाहीतर नंतर फारच काम वाढते…असे ज्योतीचे म्हणणे पडते. बरोबर आठ वाजता शेजारच्या फ्लॅटमधून तबल्याचे चित्रविचित्र आवाज ऐकायला येईल. आणि व्हायलिन शिकणार्‍या त्या डोळेबाईंच्या व्हायलिनमधून कधीही ऐकले नसतील असे अभद्र स्वर ऐकू यायला लागतील. कदाचित, कोणी मेल्यावर शोकसंगीत लावायच्या पद्धतीला याचीच पार्श्वभूमी असावी. ड्राईंग बाल्कनीतून दिसणार्‍या मागच्या प्लॅटच्या किचन मधून कुकरची एक कर्कश्य शिट्टी येईल आणि त्या पाठोपाठ “जरा गॅस बंद करा हो ! अशी जोशी बाईंची हाक. त्याच वेळी खालच्या मजल्यावरच्या सोमणांचा रेडिओ जोरजोरात बातम्या सांगायला लागेल…
अजित प्रधानला माहिती आहे की आता हे सगळे त्याच क्रमाने आणि त्याच वेळी होणार आहे…. त्याला हेही माहिती आहे की सव्वा आठ वाजता आवसान आणून तो पायात सॅंडल सरकवत म्हणणार “ज्योती मी जरा जाऊन येतो…”
“आता कुठे चाललात ? समजेल का मला ?”
“कुठे जाणार… खाली जरा एक दोन पत्याचे डाव टाकून येतो…..

हा ब्रिजचा खेळ आजकाल नित्याचाच झाला होता. साधारणत: १०/११ वाजता अजित प्रधान परतायचा, तो पर्यंत ज्योती झोपलेली असायची. क्वचित कधी काही खास पदार्थ असल्यास मात्र ती जागे राहून वाढायची. दोन वर्षानंतर रात्रीही त्याला वैविध्यहीन वाटू लागल्या होत्या. तीन खोल्यांच्या फ्लॅटमधे राहणार्‍यांच्या नशिबी हे का येते याचा जाब मात्र मदनालाच परमेश्वराच्या दरबारात द्यावा लागेल. पण रात्री झोपतानाचे आणि पहाटे उठल्यावरचे चुंबन मात्र या दोन वर्षात एकदाही चुकले नव्हते. साला त्यातही तोचतोचपणा ! आज संध्याकाळी मात्र अजित प्रधानांच्या जीवनात भयंकर मोठी उलथापालथ झाली. त्याने बेल वाजवली आणि ज्योतीने दरवाजा उघडला नाही. किल्लीने दार उघडून आत गेल्यावर त्याला त्याचा तीन खोल्यांचा फ्लॅट अस्ताव्यस्त झालेला दिसला. ज्योतीचे सगळे सामान उलटेपालटे झाले होते. हॉलच्या मध्यभागी तिचे बूट, सोफ्यावर कंगवे, कपडे…सौंदर्यप्रसाधनाचा डबा…. हे काही ज्योतीच्या शिस्तीत बसणारे नव्हते. एवढी काय घाई झाली असावी…काय झाले असावे असा विचार करत अजित प्रधान पुढे झाला तर कंगवा आणि त्यात तिच्या कुरळ्या केसांची गुंतवळ दिसल्यावर मात्र त्याच्या पोटात खड्डा पडला… हे असे होणे शक्यच नाही. तेवढ्यात त्याला टेबलावरची चिठ्ठी दिसली. घाईघाईने, अधिरतेने त्याने ती वाचायला घेतली –
प्रिय अजित,
आईची आत्ताच तार आली. ती फार आजारी आहे असे कळल्यामुळे मी काही दिवस तळेगावला जात आहे. दादा मला घ्यायला स्टेशनवर येणार आहे. बहुतेक काळजी करण्यासारखे काही नसावे. गवळ्याचे बिल देणे. मागच्याच महिन्यात ती बरी होती. गॅसचा नंबर लावा. इस्त्रीचे कपडे आणायचे आहेत. मी उद्या परत पत्र टाकेन.
ज्योती.

लग्नानंतरच्या दोन वर्षात अजित प्रधानला बायकोला सोडून रहायची वेळ आली नव्हती. मंदबुद्धी मुलाप्रमाणे अजित प्रधानने ती चिठ्ठी परत परत, परत परत वाचली. त्याच्या तोचतोचपणात एकदाचा खंड पडला होता पण वेडा गांगरून गेला. ज्योतीचा आकाशी निळा गाऊन जो ती वाढताना घालायची टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवर पडला होता. तिच्या आवड्त्या बटरस्कॉचचे खोके तसेच टेबलावर पडले होते. घरातील प्रत्येक वस्तू काहीतरी महत्वाचे हरवले आहे हे ओरडून सांगत आहे असा त्याला भास झाला. घराचा आत्माच नाहिसा झाला आहे आणि उरल्या आहेत त्या मर्त्य वस्तू असेही त्याला वाटू लागले. एखाद्या भग्न देवालयाच्या मधे उभा राहून आता काय करायचे असा प्रश्न पडलेल्या माणसासारखा तो तेथे उभा होता. अखेरीस त्याने ते घर जसे जमेल तसे आवरायला घेतले. जेव्हा त्याने त्या गाऊनची घडी करायला घेतली तेव्हा त्याच्या ह्र्दयातून एखादी सुरी जावी अशा वेदना त्याला झाल्या. ज्योतीशिवाय आयुष्य याची कल्पनाच अजित प्रधानने कधी केली नव्हती. ती त्याच्या आयुष्यात अशी मिसळून गेली होती की जणू त्याचा श्वास. आवश्यक पण अस्तित्व न जाणवणारा आणि आता ती निघून गेली होती जणू काही ती त्याच्या आयुष्यात कधी नव्हतीच. अर्थात ती गेली होती थोड्या दिवसांसाठीच पण ती नाही हा विचारच त्याला सहनच होत नव्हता.

अजित प्रधानने दुपारचे खाणे घेतले, कॉफी केली आणि तो एकटा टेबलावर बसला. त्याच्या हातात आज पुस्तक होते. झक मारली आणि ते वाचायला घेतले असे झाले त्याला. पान उघडले तर पुढच्या पानावर ही डॉ. झिवॅगोची ही कविता…..त्याने नजर फिरवली

दरवाजातून आत बघितले
माझेच घर मला ओळखू येईना
अचानक तिच्या जाण्याने
घराचा आणि मनाचा कसा
गोंधळ उडाला आहे भयानक…….

त्याने फटकन ते पुस्तक मिटून फेकून दिले. त्याच्या सासूमुळे त्याचे घर ओकेबोके झाले होते. तिला क्षमा करायचा प्रश्नच नव्हता. खाऊन झाल्यावर तो खिडकीबाहेर बघत बसला. त्याने सिगरेट पेटवली नाही. बाहेर जग त्याला खुणवत होते. आता तो त्याचा मालक होता. काहीही मजा करू शकत होता, त्याला कोठे चालला असे विचारणारे आज कोणी नव्हते आणि तो कितीही उशीरा येऊ शकत होता. ब्रिजचा डाव आज रात्रभर खेळला तरी त्याला कोणी ओरडणार नव्हते. ज्योती घरी नव्हती…तो स्वत:ला समजवत राहिला. पण आज त्याला यापैकी काहीच करावेसे वाटेना. त्याला उमगले ही सगळी मजा करायला ज्योती बरोबर पाहिजे. जवळच्यांची किंमत नसते हेच खरे.
“किती मुर्ख आहे मी ! तिला बिचारीला कधीही बाहेर घेऊन जात नाही. मी रोज ब्रिज खेळायला जातो, तिला एकटीला घरी सोडून, तिला एकटीला घरी कंटाळा येत असेल का हा साधा विचारही माझ्या मनाला शिवत नाही… किती नालयकपणा…. आता ती आली की या सगळ्याची भरपाई करायलाच पाहिजे. काय करावे बरं….हे सालं रात्रीचे पत्तेच बंद करू टाकतो…..” विचार करून अजित प्रधानला रडू फुटले… आता असे वागायचे नाही…त्याने स्वत:ला बजावले.
ज्योतीशिवाय हे आयुष्य काय आयुष्य म्हणायचे?

“तेवढ्यात दरवाजाच्या लॅचचा आवाज झाला आणि ज्योतीचा आवाज झाला “चला ऽऽ मी आले बरं का… ! आईची तब्येत एकदम ठीक. मी पण लगेचच लोकल पकडली आणि परत आले. थांब मी कॉफी करते. कधी पितीए असे झालय मला.”

कोणालाच ते यंत्र चालू झाल्याचा आवाज ऐकू गेला नाही. कुठेतरी काहीतरी झाले…एक बारिकशी घंटा वाजली…….एका चक्राने दुसर्‍या चक्राला गती दिली आणि सगळी चक्रं त्यांच्या पुर्वीच्याच भ्रमणकक्षेत फिरायला लागली… अजित प्रधानने भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली. सव्वा आठ झाले होते. त्याने आपले सॅंडल पायात सरकवले.
“आता कुठे चाललात तुम्ही ?” ज्योतीने तक्रारीच्या स्वरात विचारले.
“जरा पत्याचे एक दोन डाव टाकून यावे म्हणतो” अजित प्रधान म्हणाला.

जयंत कुलकर्णी
“O” Henry च्या The Pendulum चे स्वैर भाषांतर.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

One Response to भ्रमणकक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s