तरपत हूं जैसे जलबीन मीन…..-१

नांदेडचा उन्हाळा ! म्हणजे रात्री झोपेचा प्रश्नच नाही. पहाटेच थोडा वेळ झोप येत असे तेवढीच. अशा ठिकाणी माझी बदली झाल्यावर आणि हातात १९७८ साली महिन्याला ४००० रुपये हातात खुळखळत असल्यावर उन्हाळ्यात संध्याकाळी काय होत असणार हे मी सांगायला नको. पण ते जाऊदेत अगोदर नांदेडला कसा पोहोचलो ते सांगायला पाहिजे.

१९७६ साली ग्रॅज्युएट झाल्यावर चार आकडी पगारावरच नोकरी करणार या हट्टापायी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली आणि त्यांनी नांदेड येथे जावे लागेल हे सांगितले. म्हटले ठीक आहे. काय फरक पडतो ? एकटा जीव सदाशीव. त्या काळी हा पगार खूप म्हणजे खूपच होता. एक चांगली जागा गावाबाहेर भाड्य़ाने मिळाली आणि अस्मादिक त्या जागेत १० जानेवारी १९७८ रोजी रहायला गेले. १ ते ९ माझा मुक्काम हॉटेलमधेच होता. त्या काळात आमच्या सारख्यांचा आसरा होता तेच हॉटेल पारिजात-परिवार हॉटेल. नावात होते परिवार पण कुठलाही परिवार त्या हॉटेलात येत नसे कारण आमच्यासारखे लोक. ज्यांच्याकडे पैसे असत त्या लोकांचा परिवार मात्र रोज संध्याकाळी येथे दारू प्यायला, गप्पा मारायला जमत. घर सोडून आलेल्यांना संध्याकाळ कशी खायला उठते हे आपल्याला घर सोडल्याशिवाय समजणार नाही. दिवसभर काम करून दमूनभागून घरी आल्यावर जेवणासाठी बाहेर पडायलाच लागायचे मग थोडे अगोदर जाऊन करमणूकही करून घ्यायची हा सर्व ब्रह्मचार्यांजचा पायंडाच पडला होता. अर्थात काही वैतागलेले विवाहीत मध्यमवयीन माणसेही आमच्या बरोबर प्यायला बसायचीच. पण मला वाटते त्यांना आमची तरूण कंपनी आवडायची त्याचे कारण तरूणांमधील चावट गप्पा हे असावे. असो…

आमचा हा जो कंपू जमला होता त्यात एकंदरीत ८.५ लोक होते. करंदीकर, आठवले हे दोन कोके, भोसले,जाधव हे दोन देशमूख, मी व देवकर हे दोन कोकणी आणि उरलेल्यात होता एक सलीम खान जो उत्कृष्ट मराठी भावगीते म्हणत असे आणि एक होता पानसे. सलीम खान दारूच्या प्रोहिबिशन खात्यात कामाला होता त्यामुळे आमच्या दृष्टीने साला साहेबच होता. पण आमच्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय होता संगीत….कुठलेही संगीत. इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्रीय, उपशास्त्रीय…आम्हाला कशाचेही वावडे नव्हते. इन फॅक्ट दोन कोके, सलीम खान, मी आणि पानसे यांना संगीताची उत्तम जाण होती. वेळात वेळ काढून आम्ही आंबेजोगाईला सगीत महोत्सवाला जायचोच. अर्थात त्या काळी त्याचे स्वरूप फार खाजगी होते पण सलीम मियॉ असल्यावर काहीच अडचण नव्हती…..हा अर्धा मेंबर होता तो होता उद्योगपती अग्रवाल-आमचा डिस्ट्रिब्युटर. तो अर्धा कारण तो कधीकधीच असायचा…

त्या काळी माझ्याकडे तीन खोल्यांचा एक छोटा बंगला होता आणि एक दिवस त्या घराचे मालक जेव्हा माझ्याकडे भाडे गोळा करायला आले तेव्हा त्याची हालत बघून गाडगीळ काकांनी कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हणाले “ अहो सावंत, तुम्हाला घर भाड्याने दिले आहे याचा अर्थ विकत दिलेले नाही. काय अवस्था केली आहे तुम्ही माझ्या बंगल्याची. साधी साफसफाई करता येत नाही तुम्हाला, कमाल आहे.”
“काका, अहो मला वेळच मिळत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर जेवायला बाहेर जावे लागते आणि घरही खायला ऊठते, म्हणून बाहेर जातो. सकाळी लवकर उठून कामाला जावे लागते. केव्हा साफ करू हे घर ! सांगा तुम्हीच.
“मग एखादी बाई का नाही ठेवत……. डोळे मिचकावत काकांनी वाक्य पूर्ण केले…. साफसफाईसाठी !”
“नको रे बाबा ! आईने सक्त ताकीद दिली आहे असले काही करायची…..”
“बरं ! मी बोलतो वहीनींशी” काका.
काका गाडगीळ आणि बाबा सावंत कॉलेजपासून मित्र होते.

दुसर्‍याच दिवशी सकाळीच काका एका बाईला घेऊन हजर झाले.
“काका आत्ता मी चाललोय उदगीरला. आपल्याला नंतर नाही का बोलता येणार ? मला अजून गाडीत पेट्रोल भरायचे आहे” मी म्हणालो.
“नाही तुझ्याशी काही बोलायचेच नाही मला. मी वहिनींशी सगळे बोललो आहे. या ताराबाई. आमच्या सौंच्या चांगल्या ओळखीच्या आहेत. घरंदाज आहेत. उद्यापासून या तुझ्याकडे कामाला येतील. पैशाचे काय ते तू त्यांच्याशीच ठरव.. या स्वयंपाकही करतील अर्थात तुला पाहिजे असेल तर. चल निघ तू आता. उशीर होईल. मी सांगतो यांना कामाचे स्वरूप”
“ठीक आहे. मी उद्या यांच्याशी बोलतो” असे म्हणून मी गाडीला चावी लावली आणि फिरवली. फिआटचा फाटका आवाज करत त्या गाडीने जागा सोडली आणि एक डौलदार वळण घेत ती रस्त्याला लागली.

त्या रात्री नेहमीप्रमाणे पारिजात मधे बरीच बीअर पिऊन झाल्यामुळे नेहमीप्रमाणे झोपायला उशीर झालाच. सकाळी उठतो तो मला दुसर्‍याच्याच घरात असल्यासारखे वाटायला लागले. मुख्य म्हणजे उशाशी असणारे सिगरेटचे रक्षापात्र कमालीच्या पलिकडे स्वच्छ होते. अजून मला बरेच धक्के बसायचे होते….. मी डोळे चोळत होतो, तेवढ्यात हाक आली “ साहेब उठा आता. चा बी तयार होईल हितक्यात”

हंऽऽऽऽ आत्ता डोक्यात प्रकाश पडला. ताराबाई आलेल्या दिसतात.

सकाळच्या ब्रेक्फास्टला ताराबाईंची गाठ पडली. मी तसा खूष होतो… कारण ब्रेकफास्टला त्यांनी ब्रेड ऑमलेट आणि तेही टोमॅटो घालून केले होते. बर्‍याच दिवसांनी घरीच वेळेवर ब्रेकफास्ट मिळाल्यामुळे माझी तब्येत खूष होती. त्या मागतील ते पैसे द्यायला मला तरी काहीच प्रश्न नव्हता.

ताराबाई साळूंके ! वय साधारणत: असेल ५० ते ५५. बुटक्या हाडकुळ्या बारीक चणीच्या, गोर्‍यापान, कपाळावर मोठे लालभडक कुंकू. जिरलेल्या नववारीचा कपाळावर पदर अगदी व्यवस्थीत. भूर्‍या रंगाच्या पापण्याचे डोळे, मिचमिचे, पण चेहर्‍याला शोभणारे. खरे तर त्या सुंदरच म्हणायच्या. वयाचा अंदाजही लागणे कठीण पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि नंतर माझ्या अनेक मित्रांच्या लक्षातही आली ती म्हणजे बघताच त्यांचे सौंदर्य डोळ्यात भरायच्या ऐवजी त्यांचे सोज्वळ स्वरूप मनाला भावायचे आणि सगळ्यांना स्वत:च्या आईची, आजीची आठवण यायची. दारू पिताना आम्ही इतक्या स्त्रियांबद्दल काय वाटेल ते बोलायचो पण मला आठवत नाही की एकदाही ताराबाईंबद्दल कोणीही वेडेवाकडे बोललेले.

ताराबाईंनी घराचा ताबा घेतला आणि माझ्या घराचे स्वरूपच बदलून गेले. गाडगीळ काका दुसर्‍या आठवड्यात आले तेव्हा ते तर जाम खूष.
“अरे एवढे पैसे कशाला देतो तिला ? तुम्हा मुलांना ना पैशाची किंमतच नाही.” ते ओरडले.

पण ताराबाईंमुळे माझे कशाला, आमच्या सगळ्यांचे पारिजातचे बिल कमी झाले होते. त्या हल्लीच्या भाषेत एक चांगल्या “शेफ” होत्या. मटण-भाकरी खावी तर त्यांच्याच हातची असे माझे सगळे मित्र म्हणू लागले. थोड्याच दिवसात सगळ्यांच्या घरी ताराबाईंची ओळख झाली. ताराबाईंना आम्ही माझ्या घरी दारू प्यायचो त्याचेही काही वाटत नसे. उलट त्यांनीच एक दिवस मला पेग मेजर आणायला सांगितल्यावर मी उडालोच.
“ते बर असतया ! कमी पिली जातेया !” ताराबाई म्हणाल्या.
असे एकंदरीत सगळे छान चालले होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती मात्र मला खटकली पण मी तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. … काय फरक पडत होता म्हणा…..

अशाच अजून एका प्रसंगात माझी दांडी गूल झाली. एका कंपनीच्या साहेबांना, त्यांचे नाव सांगत नाही, घरी जेवायला बोलावले असताना त्यांनी नंतर एक हसत इंग्रजीमधे कॉमेंट टाकली “ मजा आहे बुवा तुमची सावंत” ते ज्या प्रकारे ते म्हटले ते वास्तविक मला आवडले नव्हते पण त्यांना ओळखत असल्यामुळे ते गंमत करत असावेत हे गृहीत धरून मी काही त्यांना प्रत्युत्तर केले नाही. पण ताराबाईंनी मात्र सगळे गेल्यावर माझ्याकडे निषेध नोंदवला.
“ताराबाई तुम्हाला इंग्रजी येते ? मी विचारले.
“जावदेत सांगन मी तुमाला कधितरी”… ताराबाई म्हणाल्या.

ताराबाईंवर विसंबून आम्ही सगळ्यांनी इयरएंडची पार्टी माझ्याच घरी ठरवली. त्यांनीही आनंदाने होकार दिला…आता त्या आम्हाला सगळ्यांनाच चांगले ओळखत होत्या. ३१ डिसेंबरला सकाळी उठलो तर उशाशी एक चिठ्ठी. गाडगीळ काकांची.
उमेश अ.आ.
ताराबाई काही महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी त्यांच्या गावाला गेल्या आहेत. त्या कधी येऊ शकतील हे सांगता येत नाही पण आल्यावर परत कामावर येतील.
काका. (गाडगीळ)
नांदेडमधे माझ्या ओळखीचे हे एकच वयस्कर गृहस्त होते तरी पण ते कंसात गाडगीळ असे का लिहित असत हे मला न उलगडणारे कोडे आहे.

आता आली का पंचाईत. संध्याकाळची पार्टी तर करणे क्रमप्राप्त होते. मग काय शेवटी आसरा पारिजातचा. त्या दिवशी पार्टी झाली. दारूकाम भरपूर झाले त्यामुळे जेवणाची कोणालाच शुद्ध नव्हतीच. रात्री कसले, पहाटे ३ वाजता आम्ही सगळे भेलकांडत बाहेर पडलो. एवढा उशीर कधीच झाला नव्हता पण ३१ डिसेंबर-सगळे गुन्हे माफ ! एक एक करत सगळे एकामेकांचा निरोप घेत पांगले. मी ही माझ्या गाडीकडे बोटात किल्ली फिरवत निघालो. खोटे बोलण्यात अर्थ नाही, आजच्या जमान्यात तुरुंगातच जायला लागले असते अशी अवस्था होती. गाडीपाशी आलो, टपावर पडलेल्या पारिजातकाची फुले गोळा केली आणि वळसा घालून गाडीच्या दरवाजापाशी आलो आणि थबकलो. चायला हे काय… डोळे चोळत बघितले तर एक जख्ख म्हातारा खाली मातीत माझ्या दरवाजाला टेकून बसला होता. त्याचीही अवस्था माझ्या सारखीच होती. शेजारीच अर्धवट भरलेली बाटली पडली होती….ग्लेनफिडिशची….
माझे तर डोकेच चालेना. हा रस्त्यावरचा फाटका म्हातारा सिंगल माल्ट व्हिस्की चढेपर्यंत पितोय आणि रस्त्यावर पडलाय…. काय गडबड आहे.. काही कळेना.

त्याला काय हाका मारावी हे न उमजून मी त्याच्यावर जवळजवळ ओरडलोच.
“ओ ! उठा ! मला जायचय.”
हूं नाही का चू नाही.
“उठता का जरा, काका मला जायचेय !”
काका हा शब्द ऐकताच त्याची जरा चुळबुळ झाली. सगळे दारुडे दारू प्यायल्यावर प्रेमाला बळी पडतात हेच खरे. दोनतीन वेळा हेच संभाषण वेगवेगळ्या तीव्रतेने झाल्यावर आजोबांनी डोळे उघडले आणि त्यांनी मोठ्या कष्टाने इकडे तिकडे बघितले.
“सॉरी हं बाळा ! जरा जास्तच झाली आज. साठवून ठेवली होती आजच्या दिवसासाठी ही दारू ! उठतो मी !” असे म्हणून त्यांनी उठायचा प्रयत्न केला. त्या धडपडीत त्यांचे डोके माझ्या गाडीवर आपटले आणि मी वेड्यासारखा गाडीला काही झाले का हे बघायला धावलो. तेवढ्यात त्या म्हातार्यातने हेलपाटत चालायला सुरवातही केली होती. मीही हताशपणे त्याच्याकडे बघत खिशातून सिगारेटचे पाकीट काढले आणि एक सिगारेट पेटवली व त्याच्याकडे बघू लागलो.

माझीही अवस्था फार वेगळी नव्हती म्हणा….तेवढ्यात मी जे ऐकले त्याने माझी दारूची धुंदी खरर्कन उतरली. पहाटेचा मंद गार वारा सुटला होता, रस्त्यावर मिणमिणते दिवे आपला कीव येणारा प्रकाश रस्त्यावर कसाबसा फेकत होते. माझी पांढरी शूभ्र गाडी त्यात जास्तच उठून दिसत होती आणि त्याला टेकून सिगरेट ओढणारी माझी तोल सावरणारी आकृती व तिची सावली, खाली पडलेली फुले….आणि….दहा फुटावर एका हातात दारूची बाटली घेत, धडपडत चालणारा, एक दारूडा…. रस्त्यावर चिटपाखरू नाही आणि त्या निरव शांततेत त्याच्या तोंडातून तडपत येणारी ती ललतची चीज……तरपत हूं जैसे जलबिन मीन….फैयाज खॉसाहेब…

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

One Response to तरपत हूं जैसे जलबीन मीन…..-१

  1. Dilip V Subhedar म्हणतो आहे:

    Eager to know ….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s