येणार्‍या २६ जानेवारी निमित्तने एक स्मरण ! INS कुकरी….

मित्रांनो,
हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे..

बरोबर याच दिवशी १९७१ साली……

समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या. धूराचा दर्प जाणवत होता आणि अशातच त्या बुडणार्‍या जहाजाच्या सगळ्यात वर राहिलेल्या भागावर उभे असलेल्या कॅप्टन महेन्द्र नाथ मुल्ला यांनी आपल्या गळ्यातले लाईफ सेव्हिंग जॅकेट खाली पाण्यात एका खलाश्याकडे टाकले आणि एका हाताने तो लोखंडी कठडा घट्ट धरत त्यांनी ओठात त्यांची मोठी सिगार धरली मग इकडे तिकडे न बघता त्यांनी क्षितिजावर नजर रोखली………….ती शेवटचीच.
कॅप्टन महेन्द्रनाथ मुल्ला.

जहाज होते आय. एन. एस. कुकरी आणि कॅप्टन होते महेन्द्र नाथ मुल्ला. बोटीला जलसमाधी मिळाली आणि त्याबरोबर कॅप्टन मुल्लांनीही आपल्या जहाजाबरोबर जलसमाधी घेतली. ती सिगार ओढताना त्यांच्या मनात काय विचार आले असतील ? त्यांना असे वाटले असेल का की चला पाण्यात उडी मारूया ? असा विचार आलाही असणार पण त्या जहाजात खाली त्यांचे अनेक अधिकारी आणि खलाशी अडकले होते. ते, त्यांची कुटूंबे ही त्यांची जबाबदारी होती. त्यांना सोडून ते जाऊच शकत नव्हते. त्यापेक्षा नौदलाची परंपरा राखत त्यांनी मृत्यूलाच कवटाळले असे म्हणायला हरकत नाही. या परंपरेचे महत्व काय ? याच परंपरेमुळे राष्ट्रे उभी राहतात. अशा परंपरा निर्माण झालेल्या आपण इतिहासात बघतो आणि त्या राखायचा प्रयत्न करतो.
आधी लगीन कोंडाण्याचे…. ही परंपरा.
प्रतापराव गुजरांनी राखली ती परंपरा.
भगवा झेंडा जमिनीवर पडून द्यायचा नाही ही ही परंपरा.
महाराजांनी सुरत लुटली तेव्हा मुसलमान किल्लेदार पळून गेलेला असताना दोन ब्रिटीश अधिकर्‍यांनी १०० सैनिकांसह सुरतमधे फ्लॅगमार्च काढला हीही परंपराच.
आपल्या रेजिमेंटच्या झेंड्याला कमीपणा येईल असे कसलेही वर्तन करायचे नाही ही परंपरा. पराभवातही झेंडा परत घेऊन यायचा ही परंपरा.
फिल्ड आर्टिलरीमधे असलेल्या मराठ्यांच्या रेजिमेंटनी माघार घ्यायच्यावेळी तोफांच्या नळ्या खांद्यावर वाहून आणल्या ही परंपरा………..
या परंपरा पाळताना किती बांगड्या फुटल्या, किती मुले निराधार झाली याची गणतीच नाही. महत्वाच्या असतात या परंपरा, कारण त्या आठवूनच तरूणांच्या हातून भव्य दिव्य पराक्रम होतात आणि राष्ट्र बलवान होते. सर्वसामान्य व्यवहाराच्या पातळीच्या पलिकडे जाऊनच यांच्याबद्दल विचार करावा लागतो. शनीच्या दगडावर तेल थापण्याच्या परंपरेपेक्षा या परंपरा मित्रहो फार थोर आहेत.

कॅप्टन मुल्लांनीही अशीच परंपरा पाळली आणि आपली जीवनयात्रा संपविली ती हकीकत आपण आज वाचणार आहोत. कॅ. मुल्लांसारखा एकच माणूसही देशाची शान वाढवतो.

पाकिस्तानने भारतीय हवाईदलाच्या मुख्य ठिकाणांवर हल्ला चढवला आणि युद्धाला तोंड फुटले. ३ डिसेंबरला भारतीय नौदलाने कच्छच्या समुद्रामधे पाकिस्तानी पाणबुडीचे संदेश पकडायचे प्रयत्न चालवले होते. त्यात यश येऊन ७/८ तारखेला दक्षिण-पश्चिम या दिशांमधे दीवच्या आसपास पाकिस्तानची पाणबुडी असेल असा निष्कर्श काढण्यात आला. दीव हे आपल्या नौकांचे प्रमूख बंदर होते आणि कराचीवर हल्ला करण्यासाठी येथे नौका जमणार होत्या आणि त्यातील काही आल्याही होत्या. या विभागात शत्रूची एखादी पाणबुडी शिरणे हे फारच धोकादायक ठरले असते. यासाठी या ठिकाणी पाणबुडीविरोधी नौका तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो किती योग्य होता हे लवकरच कळणार होते एडमिरल कोहिली त्या वेळी वेस्टर्न नॅव्हल कमांडचे मुख्य होते, त्यांनी २ डिसेंबरला मुंबईहून दीवला १४ वी फ्रिगेट स्क्वाड्रन रवाना करण्याचा निर्णय घेतला. यात तीन नौका होत्या. एक होती कुकरी, दुसरी होती कृपाण आणि तिसरी होती कुठार.

आय.एन.एस कुकरी-

आय.एन.एस. कृपाण –

पाकिस्तानची पाणबुडी पी.एन.एस. हँगोर

या तीनही नौकांना शस्त्रांची नावे देण्यात आली होती आणि त्या शस्त्रांची किर्ती जगभर होती. दुर्दैवाने कुठारच्या बॉइलर रुममधे मोठ स्फोट झाल्यामुळे तिला ४ तारखेला कृपाणने परत ओढत मुंबईच्या बंदरात नेले. पाकिस्तानकडे त्या काळातील सगळ्यात आधुनिक पाणबुडी होती. फ्रान्सची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ही डॅफीन जातीची पाणबुडी खरे तर या तिनीही नौकांना भारी होती आणि त्याचे मुख्य कारण होते या नौकांच्या जुनाट व कमी पल्ल्याच्या सोनार यंत्रणा. या पाणबुडीचे नाव होते PNS Hangor.

या पाणबुडीची आणि आपल्या नौकांची गाठ पडायच्या अगोदर पाणबूड्या नौकांना त्या काळात कशा व का भारी ठरायच्या ते बघूया. आता अर्थातच नौकांमधेही बराच बदल झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे पाणबुडीविरोधी विमानेही हल्ली या बोटींवर तैनात असतात.

१९७१ सालातील भारतीय नौदल आणि आत्ताचे नौदल यात जमीनस्मानाचा फरक आहे. पाणबुडीविरोधी अस्त्रे आणि वापरायच्या युद्धनितींवरही जास्त विचार झालेला नव्हता. आपली पहिली पाणबुडी १९६८ साली रशियामधे तयार झाली. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडे १९६० सालीच पाणबूड्या आल्या होत्या आणि त्याही डॅफीन जातीच्या अत्याधुनिक. या युद्धनौका घेण्याच्या बाबतीत पाकिस्तानी नौदलाचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. या अत्याधुनिक पाणबुडीला थांबवणार होत्या आपल्या या दोन जुनाट नौका.

कुकरीवर जी सोनार यंत्रणा होती तिचे नाव होते सोनार १७० आणि ही यंत्रणा आपल्याकडे असलेल्या सोनार यंत्रणांपैकी सगळ्यात उत्तम होती. अर्थात तिला सुधारणण्याचे कामही चालू होते. आणि त्याच उपक्रमात कुकरीवर एक यंत्रणा बसविली होती ज्यामुळे तिचा वेग बराच कमी झाला होता. या सोनार यंत्रणेचा पल्ला होता फक्त १५०० यार्ड आणि तो सुद्धा प्रयोगशाळेत. खोल समुद्रात असणार्‍या निसर्गनियमांचा आपला अभ्यास फारच कमी होता. भारताचे समूद्रकिनारे दुपार पर्यंत तापतात आणि वरच्या पाण्याचे तापमान आजुबाजुच्या वातावरणा इतके होते. त्यामुळे सोनार यंत्रणेमधून निघणार्‍या लहरी खरोखर खालच्या बाजूला वाकतात ज्यामुळे सोनार यंत्रणेचा पल्ला अजूनच कमी होतो. खोल समुद्राच्या पाण्याचे तापमान बर्फाच्या जवळपास असते. आता ज्या ठिकाणी हे दोन वेगवेगळ्या तापमानाचे पाण्याचे थर एकामेकांना भेटतात त्या तेथे फार मजेशीर प्रकार घडतो. या थराला म्हणतात “लेयर”. याची खोली साधारणत: असते ३० ते ६० मिटर. या थराला आपटून सोनारच्या लहरी परावर्तीत होतात. हा जो शास्त्रीय चमत्कार होतो त्याचा फायदा पाणबुडीचे कप्तान न उठवतील तर नवलच ! या थराच्या खाली पाणबूड्या चक्क लपतात आणि अत्यंत कमी वेगाने प्रवास करतात. आता या पाणबुडीला शोधणे किती अवघड असेल बघा. या उलट पाणबुडीला जहाज सहज ओळखता येते ते त्याच्या इंजिनच्या आवाजाने. पाणबुडीचे इंजीन हे तुलनेने बरेच शांत असते. त्यांना या शांततेचा भंग फक्त जेव्हा ते टारपेडो सोडतात तेव्हाच करावा लागतो.

याचा अर्थ आपल्या लक्षात येतो आहे का ? कॅप्टन मुल्लांना हे माहीत होते की आपण पाणबुडीचा वेध घेण्या अगोदरच तिने आपला वेध घेतलेला असणार आणि समजा त्यांनी पाणबुडीचा वेध घेतला तरीही त्या अगोदरच त्या पाणबुडीने टॉरपेडो सोडला असणार. यामुळे स्वत:च्या बचावासाठी काहीच मिनिटे उपलब्ध असणार, प्रतिहल्ला तर दूरच राहिला. कुकरीमधे नुसते लढणारे सैनिक नव्हते तर इंजिनियर आणि इतर टेक्निकल माणसेही होती. या माणसांचे धैर्य तर अचाटच असते. कारण यांना जहाजाच्या सगळ्यात खालच्या भागात काम करावे लागते. जेव्हा यांची नौका पाणबूड्यांविरूद्ध लढाईत उतरते तेव्हा हे जीवावर उदार होऊन आपल्या कॅप्टनला नौका हालचाली करायला नेहमीच उपलब्द्ध करून देतात. कुकरीमधेही या माणसांना माहीत होते की ते आता मरणार आहेत, पण शेवटपर्यंत त्यांनी जागा सोडली नाही हेही खरेच आहे. या माणसांना सोडून कुठलाही कॅप्टन जिवंत रहायची कल्पनाच करू शकत नाही. (तसे केले तर त्याला उरलेले आयुष्य झोपेविना काढावे लागेल). मित्रांनो जे आपले सहकारी आपली नौका चालवतात त्यांना मृत्यूच्या खाईत सोडून कुठलाही कप्तान जात नाही या परंपरेमागे हे एक सबळ कारण असावे. असो. कॅ. मुल्लांनी ही परंपरा पाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. नौदलातील प्रत्येक अधिकारी यापुढे जिवाच्या भीतीने कसलेही भ्याड कृत्य करताना या त्यागाची आठवण करेल आणि ते तो करणार नाही याची मला खात्री आहे.

वर ज्या अॅडमिरलचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या शब्दात पुढची कहाणी……………
“पाकिस्तानी नौदल आपल्या नौदलापेक्षा कशात सरस असेल तर ते त्यांच्या पाणबुडीदलामुळे. फ्रान्सकडून घतलेल्या या डॅफीन जातीच्या या पाणबूड्या अत्याधुनिक असून आपल्या पाणबुडीहुन सरस होत्या. कुकरीने हॅंगॉरला हेरण्या अगोदरच तिने कुकरीला हेरले होते. सोनारमुळे आणि विमानांच्या टेहळणीमुळे अशी एखादी पाणबुडी तेथे आहे याची कल्पना होतीच. १४ व्या पाणबुडीविरोधी स्क्वाड्रनला ही पाणबुडी हुडकून काढून, तिचा पाठलाग करून तिचा नाश करायला सांगितले गेले. याच दरम्यान हॅंगॉरच्या सोनारमुळे कुकरीचा ठावठिकाणा लागल्यामुळे तिच्यावर ३ टारपॅडो डागण्यात आले आणि काहीच मिनिटात कुकरी रसतळास गेली. कुकरीबरोबर गेले १८ आधिकारी आणि १७६ सैनिक/खलाशी आणि कमांडर कॅप्टन मुल्ला.

याच वेळी त्या नौकेवर असणार्‍या कमांडर मनू शर्मांनी काय लिहून ठेवले आहे ते बघू.
“मला आठवतय आमच्या जहाजाला टॉरपेडो लागले तेव्हा आमचे जहाज बुडू लागले. सूटायच्या मार्गात एक छोटे वर उघडणारे दार होते. या दरवाजातून जमेल तेवढ्यांना बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न चालू होते. प्रसंग असाच होता की माझ्या डोळ्यात पाणी तराळले. कॅप्टन मुल्लांनी मला आणि ले. कुंदन माल यांना त्या जहाजातून बाहेर ढकलले आणि स्वत:ला वाचवायला सांगितले. आम्ही जेव्हा पाण्यात पोहायला सुरवात केली तेव्हा ले. कुंदन कुठे गायब झाला ते कळालेच नाही. त्याला शोधताना माझी दृष्टी वर गेली तेव्हा मला कॅप्ट्न मुल्ला त्या कठड्याला धरून शांतपणे यांचा आवडता सिगार ओढत असताना दिसले. काही शेवटचीच मिनिटे शिल्लक होती. मला उमगले ते तेथे का उभे होते ते. ते त्यांचे जहाज सोडणार नव्हते”.

इकडे कृपाण जी कुकरी बरोबर या पाणबुडीच्या पाठलगावर होती, तिने हे सगळे बघितले आणि ती त्या पाणबुडीवर तुटून पडली. तिने इतके तोफगोळे डागले की त्या तोफा तापून बंद पडल्या. आता तिला दोन पर्याय होते. एक कुकरीच्या खलाशांना वाचवणे किंवा बचावकार्यासाठी लहान नौका समुद्रात सोडणे. या दोन्ही पर्यायासाठी कृपाणला थांबावे लागणार होते आणि त्यात प्रचंड धोका होता. नियमाप्रमाणे ती बुडणार्‍या नौके पासून काही अंतरावर गेली आणि परत काही तासांनतर या जागेवर आली. अर्थात यात एक तोटा झाला की त्या पाणबुडीला निसटून जायला वाव मिळाला.

कॅ. मुल्ला यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले.
या सर्व शूरांचे एक दीवला स्मारकही बांधण्यात आले.
स्मारक-

आपणही त्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहून आपला या परंपरेप्रती आदर व्यक्त करुयात.
जयंत कुलकर्णी.

या घटनेबद्दल नंतर अनेक उलटसुलट वादग्रस्त चर्चा झाल्या. कृपाणच्या कॅप्टनवर अनेक आरोप झाले. पण जे ड्रिलमधे शिकवतात/ठरवले जाते त्याप्रमाणेच तो कॅप्टन वागला हेही तितकेच खरे आहे.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास. Bookmark the permalink.

3 Responses to येणार्‍या २६ जानेवारी निमित्तने एक स्मरण ! INS कुकरी….

  1. Prachi म्हणतो आहे:

    Captain Mullana Salam!!!

  2. arunjoshi123 म्हणतो आहे:

    Would the Captain have not seen political, social condition in the country? Would he not have witnessed mind-numbing fall of social values? The tag of “observance of defense tradition” is just one aspect of such supreme sacrifice. It is nor about desire for the posthumous glory of a martyr. I think it is very deep, subtle, intense bonding of the man on the frontier with the its equally pure counterpart on civil side- from present or from history, though in minority.

  3. Sanjayant Sahasrabuddhe म्हणतो आहे:

    Hya jahajawar tyaaweli aslele aani sudaiwaane vachlele ek gruhasth Limaye nawaache,aaj suddhaa punyatach rahtaat,pan hyaanaa kadhi vyaakhyaan denya saathee amanteet kele naahee,karan PUNERI PARAMPARA

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s