फजिती

फजिती !

३१ डिसेंबरला कुठल्यातरी एका मित्राच्या घरी जमून नव्या वर्षाचे स्वागत करायचे हे आमच्या मित्रमंडळाचे ठरलेलेच. आम्ही नऊ मित्र म्हणजे अगदी जवळचे आणि एकामेकांची टिंगल टवाळी हीही नित्याचीच. हसायला कोणाला आवडत नाही ? त्यात एखाद्याची फजिती झाली तर मग काही विचारू नका आणि ती जर ठरवून केली असेल तर मग तर काही विचारलायलाच नको. आम्ही सगळे यात माहीर होतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ना ती. अगदी केळ्याच्या सालीवरून एखादा माणूस घसरून पडला आणि जखमी झाला तरी बघणार्याीची पहिली प्रतिक्रिया ही फिदीफिदी हसण्याचीच असते. मी व माझे मित्रही याला अपवाद कसे असतील ? मागच्याच थंडीत ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत आमच्या मित्राच्या नवीन बंगल्यात करायचे ठरले. तेव्हाची ही गोष्ट. नुकताच त्याने कोकणात नांदोसला हा बंगला बांधला होता. सगळे ३० तारखेलाच नांदोसला पोहोचले होते व मी गोव्याहून ३१ला दुपारी पोहोचणार होतो. दुपारी नांदोसला पोहोचल्यावर माझे राजेशाही स्वागत करण्यात आले. मला एखादा नवीन लेफ्टनंट त्याच्या रेजिमेंटला रुजू होतो त्याचीच आठवण झाली. मला घ्यायला कट्ट्यावर गाडी देखील घेऊन आले होते ते. माझे असे स्वागत झालेले बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “आज माझा बकरा करायचा विचार दिसतोय यांचा” मी मनाशी म्हटले. बंगल्यावर पोहोचल्यावर तर कमालच झाली. तेथे फटाके उडत होते. आता माझी खात्रीच झाली. “काळजी घेतलेली बरी” मी मनाशी हसून स्वत:ला बजावले. त्या संध्याकाळी सर्वजण माझ्या नवीन पुस्तकाचे अगदी तोंड फाटेतोपर्यंत कौतूक करत होते. आश्चर्यच आहे माझा साधा लेख न वाचणारे आज माझ्या पुस्तकाबद्दल बोलत होते. मला जागेवर दारूचा ग्लास भरून मिळत होता आणि सगळे नियम धडाधड वाकवले जात होते. माझ्या अत्यंत फालतू विनोदाला सगळे मनापासून दाद देत होते. आता मात्र एखाद्या शिकारी कुत्र्याला त्याच्या सावजाचा वास यावा तसा मला माझ्याच फजितीचा वास येऊ लागला. “सावधान!” मी स्वत:ला सावध केले. यांनी काय बरं गंमत करायची ठरवली असेल माझी? मी सगळीकडे जरा सावध नजरेने बघू लागलो आणि खोटं कशाला बोलू ? थोडासा अस्वस्थही झालो. माझ्या नजरेतून आता काहीही सुटत नव्हते. त्या आठजणांपैकी कोणी वेगळे वागतोय का ? बोलतोय का ? हे तपासून पाहू लागलो. त्याची मनात उजळणी करू लागलो. आता मला सगळ्यांचाच संशय येऊ लागला. त्यातून त्यांचा बिचारा म्हातारा नोकरही सुटला नाही. काहीच झाले नाही व होत नाही हे बघून माझी बेचैनी अजूनच वाढली व मी ती लपवण्याचा अटोकाट प्रयत्न करू लागलो. एका मित्राकडून मी माहिती काढायचाही प्रयत्न केला पण छे ! कोणी ताकास तूर लागू देईना.
शेवटी डोळे जड झाल्यावर झोपायची वेळ झाली आणि सगळे झोपायला निघाले. आमच्या एका मित्राला झोपण्यासाठी स्वत:साठी वेगळी खोली लागायची. त्या एका वेगळ्या खोलीसाठी तो काहीही करायला तयार असायचा. पण आज ऐकावे ते नवलच. “ मला झोपायला जरा वेळ आहे. मी अजून एखादा पेग घेऊन मग झोपेन. नाहीतर तू असं करना तू झोप त्या खोलीत. मी झोपेन येथेच बाहेर” मी नको म्हटल्यावर सगळ्यांनी मला जवळजवळ ओढतच त्या खोलीकडे नेले. का ? का बरं आज असं ?
मला गुडनाईट म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला आणि ते त्यांच्या दारुकामात परत मग्न झाले. मी त्या खोलीत पाऊल टाकले आणि दरवाजा लोटून स्तब्ध उभा राहिलो. मला खात्री होती ते बाहेर माझी फजिती बघायला टपून बसलेले असणार. बाहेर मला कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. साले ! माझी फजिती करताय काय…… तेवढ्यात बाहेर पावलांचाही अवाज झाला. मी त्या खोलीवर माझी शोधक नजर टाकली. भिंती, फर्निचर, छत, एक झुंबर, टाईल्स, भिंतींवरच्या फ्रेम्स.. पडदे…पण प्रथमदर्शनी मला काहीच संशयास्पद दिसले नाही. चायला ते दाराच्या फटीतून बघत असणार…मी स्वत:ला बजावले.
आता बहुतेक ते लाईट घालवतील, त्याच्या आधीच मेणबत्तीची सोय करून ठेवलेली बरी म्हणून मी नोकराकडून त्या मागावून घेतल्या. त्याने दोन आणल्या तर मी अजून तीन मागवल्या. मी एक पाऊल हळूच पुढे टाकले. हो ! कुठे दगाफटका होईल सांगता येत नाही. मी परत त्या खोलीवर चौफेर नजर टाकली. काहीच नाही ! मग मात्र मला चेव चढला. मी आता त्या खोलीतील प्रत्येक वस्तू तपासायची ठरवले. एका मागून एक वस्तू मी खालून वरून तपासून बघितल्या. एका घड्याळातील सेलही मी काढून टाकले व फोनही काढून ठेवला. मग मी खिडकीकडे गेलो. त्याची मोठी तावदाने उघडी होती. तेथून बाहेर बघून मी त्या दोन खिडक्या काळजीपुर्वक बंद केल्या आणि त्यावर पडदेही ओढून घेतले. येणारा आडखळावा म्हणून त्यांच्या समोर दोन खुर्च्याही ठेवल्या. चला आता बाहेरून तरी काही धोका नाही.
समोरच एक आरामखुर्ची होती, ती मी गदागदा हलवली आणि मग त्या जड आरामखुर्चीवर मी अत्यंत काळजीपूर्वक सावकाश बसलो. त्या भल्यामोठ्या पलंगावर झोपायचा मला काही धीर होईना. पण आता मध्यरात्र उलटून गेली होती आणि माझ्या मनात एक विचार आला “ काय बावळटपणा चालवला आहेस तू ? त्यांना जर खरोखरच माझी फजिती करायची असती तर त्यांनी ती न झालेली पाहून केव्हाच हात पाय पसरले असतील. मी कशाला जागत बसलोय ? कदाचित माझी ही अस्वस्थता बघुनच त्यांची करमणूक होत नसेल कशावरून ? हा विचार मनात येताच माझ्या मनात झोपेची तीव्र इच्छा झाली आणि मी पलंगाकडे गेलो खरा पण परत थबकलो. कशावरून या पलंगाची फळी खाली पडणार नाही आणि मी गादीसकट जमिनीवर पडणार नाही ? आणि त्याचा आवाजही चांगला मोठा येईल…. म्हणजे सगळ्यांना समजेल…कदाचित मी आडवा झाल्यावर वरून एखादा पाण्याचा शॉवर चालू होऊन मला रात्र कुडकुडत काढावी लागेल ! काय सांगता येतय यांचे……आता मला या कटाला अजिबात बळी पडायची इच्छा नव्हती. मी गादी एका टोकाकडून पकडली आणि हळू हळू माझ्या बाजूला ओढली. काही झाले नाही. मी शेवटी त्यावर झोपायचे ठरवले. पण शेवटची काळजी म्हणून मी हलणार्‍या सर्व वस्तू त्या खोलीच्या दरवाज्याच्या समोर आणून ठेवल्या. गादीवरची चादर एकदा झटकून परत घालणार होतो…..पण नकोच…साला त्यात खाजखुजली टाकली असेल तर ? ती चादर टाकून देऊन मी सर्व दिवे बंद केले आणि त्या पलंगावर पडलो. तसा एक तासभर तसा मी जागाच होतो….शेवटी कधी झोप लागली ते कळालेच नाही………मी बराच वेळ झोपलो असणार पण माझ्या अंगावर एक जाडजूड माणूस पडला. त्याच्या वजनाने मला श्वासही घेता येईना…. आणि मी किंचाळत उठलो….

बाहेर मस्त प्रकाश पसरला होता, मंद वारा सुटला होता, गरमागरम कॉफीचा सुवास सगळीकडे दरवळत होता आणि सगळे जण माझ्या भोवती उभे राहून हसत मला विचारत होते “ काय रे स्वप्न बिप्न पडलेकी काय……..?
मी मात्र खजील होऊन हासत हासत त्या कॉफीच्या वासामागे गेलो……………….

जयंत कुलकर्णी
गी द मुपासाँच्या “The Uncomfortable Bed” या गोष्टीचा स्वैर अनुवाद.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s