पराभवाचे श्राद्ध ! …………..भाग – २

भाग-२

भारताच्या परराष्ट्रीय धोरण, आणि सैन्याची जी खिल्ली उडवण्यात आली त्यामुळे देशभर संतापाची आणि निराशेची लाट उसळली आणि क्षणभर असे वाटले की आता भारताची प्रगती थांबते की काय. गेले अनेक वर्षे अर्धसत्ये सांगून, धाडसी,आवेशात्मक भाषणे व वचने देत चीन पासून देशाचे संरक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत हेच असत्य जनतेच्या माथी मारण्यात येत होते. ते सगळे पितळ उघडे पडले. या आक्रमणाच्या उच्चतम तिव्रतेच्या काळातसुद्धा आपले मंत्रीगण चिनी सैन्याला बाहेर फेकून द्यायची बढाई मारत होते. म्हणत होते “ अजून एकाच लढाईत आमचे सैन्य त्यांना बाहेर ढकलून देईल”

दुर्दैवाने या पराभवाच्या कहाण्या जशा जनतेत पसरायला लागल्या तसा जनतेतला असंतोष वाढायला लागला. लोकांना हे स्पष्ट होत गेले की आम्ही, आमचे पुढारी झोपा काढत होते आणि जेव्हा याची सुरवात होत होती त्यावेळेस काही उपाययोजना करायच्या ऐवजी जाणीवपुर्वक आम्ही दुसरीकडे बघत होते. एखाद्या प्रश्नाला टाळण्यासाठी दुसरीकडे बघितले की तो आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही, तात्पुरतेकाहीच करावे लागत नाही पण जेव्हा तो उग्र स्वरूप घेतो तेव्हा पळता भूई थोडी होते. असेच यावेळेसही घडले. संरक्षणदलावर बर्‍यापैकी खर्च करूनसुद्धा आम्ही त्याविभागात लष्कराच्या जलद हालचालींसाठी चांगले रस्ते बांधले नव्हते ना आम्ही त्या वातावरणातील युद्धासाठी लागणारी युद्धसामूग्री तयार केली किंवा जमा केली. चिनशी युद्ध होणार नाही या ठाम मतापायी या सिमेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. पायदळावरही कडवट टिका करण्यात आली. ज्या सैनिकाला जगात मान होता, ज्यांनी दुसर्‍या महायुद्धात मोठा मान मिळवला होता ते सर्व एका क्षणात नष्ट झाले. म्हणून हे का झाले याचा शोध घेणे अपरिहार्य आहे.

देशभर संतापाची आणि नैराश्याची जी लाट उसळली त्याबरोबर आसाममधील गोंधळाचेही अहवाल येऊ लागले. आसामलाही चिनपासून का धोका नाही असे विचारू जाऊ लागले. श्री. कुलदीप नायर, जे त्याकाळी श्री. लाल बहादूर शास्त्रींचे प्रेस ऑफिसर होते त्यांनी आसामला भेट दिली. त्यांनी असा अहवाल दिला की आसाम मधे अत्यंत गोंधळाचे वातावरण आहे. लोक घाबरलेले आहेत आणि तेजपूर या शहरातून पलायन करणार्‍या नागरिकांची संख्या वाढते आहे. चिन्यांच्या हातात तेजपूरचे विमानतळ सुस्थितीत पडू नये म्हणून ते उडवायची योजनाही तयार करण्यात आली होती. तसेच दिग्बोईचा तेल शुद्धीकरणाचा कारखानाही उडवून लावायचे ठरले. त्यांनी असेही सांगितले की सरकारी अधिकारी आपले चंबुगबाळे आवरून या पलायनात सगळ्यांच्या पुढे होते. त्यांनी अजून एक चमत्कारीक हकिकत सांगितली ती अचाटच होती. एक दिवस तेजपूरमधे लाऊडस्पिकरवरून घोषणा करण्यात आल्या की सरकार आता नागरिकांच्या मालमत्तेची आणि जिवीताची कुठलिही हमी देऊ शकत नाही.” शहराचा कमिशनर याने तुरूंगातील सर्व कैदी सोडून देऊन तेथून पळ काढला होता. हे सर्व अफवांवर विश्वास ठेवून चालले होते. जर चिनी खरेच तेजपूरला पोहोचले असते तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.

या पराभवानंतर बर्‍याच जणांना परिणामांना सामोरे जावे लागले. ७ नोव्हेंबरला वादग्रस्त संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन यांना राजिनामा द्यावा लागला. यासाठी त्यांच्यावर लोकसभेमधे सर्वच पक्षांकडून दबाव आणण्यात आला. अर्थात एक व्यक्ती शेवटपर्यंत त्यांच्या बाजूने उभी राहिली पण शेवटी त्यांचेही काही चालले नाही. नेहरूंनी त्यांची बाजू घेवून त्यांना मंत्रीमंडळात ठेवायचा प्रयत्न केला ( संरक्षण उत्पादनमंत्री म्हणून) पण त्याविरोधात लोकसभेत प्रचंड गदारोळ झाल्यावर त्यांना हाकलण्यात आले. पं. नेहरुंना पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच जनतेच्या व इतर मंत्र्यांच्या दबावाखाली झुकावे लागले. नाहीतर त्यांच्या पक्षात त्यांच्या विरोधात बोलायची कोणाचिही टाप नव्हती. असेही होऊ शकते हे ही जनतेला कळाले. नेहरूंच्या चीनच्या बाबतीतले अर्धवट, बिनबुडाचे धोरणाने त्यांच्या या देशाच्या जनतेच्या मनावरच्या अधिसत्तेला घरघर लागली. त्यांची खुर्ची सुरक्षीत ठेवण्यासाठी श्री. कृष्णमेनन यांचा बळी देण्यात आला.
भूदलाचे प्रमूख जनरल प्राणनाथ थापर यांनी प्रकृतीस्वास्थ्यामुळे राजिनामा दिला. त्यांनाही अफगाणीस्तानमधे राजदूत म्हणून पाठविण्यात आले. ले. जनरल कौल यांना निवृत्तीपूर्व पण कायमच्या रजेवर पाठवण्यात आले. हे पचवायला पं. नेहरूना फार जड गेले कारण हे गृहस्थ त्यांचे वैयक्तिक मित्र आणि काश्मिरी होते. बर्‍याच सरकारी अधिकार्‍यांना काढण्यात आले तर काहिंना नाही. पण त्यांच्या निवृत्तीनंतरच्या फायद्यावर परिणाम झाला.

३० दिवसात विजेसारख्या हालचाली करू जे काही चिन्यांनी मिळवले होते ते त्यांनी सोडून द्यायचे ठरवले. त्यामुळे आपल्याला परिस्थितीचा आढावा घ्यायला उसंत मिळाली. हे निश्चित होते की चिन्यांनी त्यांना पाहिजे होते त्या भागातून आपल्याला पूर्णपणे उखडून टाकले होते आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले भयंकर हसे झाले. इतके की आपली त्या व्यासपीठावर काही पतच राहिली नाही.

जे काही मिळवले होते ते एका क्षणात धूळीस मिळाले होते.

जयंत कुलकर्णी.

या सगळ्या घडामोडींनी हडबडुन गेल्यावर पं नेहरूंनी गुपचूप आपल्या कुठल्याही सहमंत्र्याला विश्वासात न घेता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मदतीची याचना करणारी पत्रे लिहीली त्यात त्यांनी आधूनिक विमांनांची १६ स्क्वाड्रन्स मागितली होती. अर्थातच त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ही विमाने अमेरीकन वैमानिकांनीच उडवायची होती म्हणे…..……..

क्रमश:….
यानंतर ज्या “हिमालयन ब्लंडरमधील अजून एक प्रकरण… त्या नंतर जी कागदपत्र बाहेरच्या देशात खूली झाली त्यावर आधारीत एक/दोन प्रकरणे. आपल्या देशाने अजूनही या संदर्भात कागद्पत्रे खूली केलेली नाहीत म्हणून हा उद्योग करावा लागणार.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s