सविनय कायदेभंग – हेन्री डेव्हीड थोरो….

श्री. अण्णा हजारेंनी जी प्रस्थपित सरकारविरूध्द चळवळ उभी केली आणि यशस्वी केली ती योग्य आहे का यावर अनेक चर्चा चित्रवाणी व वर्तमानपत्रांमधे झाल्या. त्यांच्या आंदोलनाविरूद्ध एक समान आरोप होता तो म्हणजे आपल्या राज्यघटनेविरूद्ध असे अहिंसक आंदोलन पुकारणे योग्य आहे का ?

मते अनेक असतील किंवा आहेत पण १८४६ साली लिहिलेला हा निबंध आजही वाचण्यासारखा आहे याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही……….

ले. हेन्री डेव्हिड थोरो
जन्म : जुलै १२, १८१७
मृत्यू : मे ६, १८६२
एकूण आयूष्य : ४४ वर्षे.
कर भरला नाही म्हणून तुरूंगात गेल्यावर लिहीलेला लेख –

सविनय कायदेभंग –

कमीत कमी बंधने असणे हे चांगल्या शासनपद्धतीचे लक्षण आहे असे मी मानतो आणि त्या दिशेने लवकर प्रवास व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. असे झाले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की ज्यात ’शासनच लागत नाही ती सर्वोत्कृष्ठ शासन पद्धती. जेव्हा माणसाची एवढी तयारी होइल तेव्हा अशी शासन पद्धती येइल याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. चांगल्या शासनपद्धतीची उपयुक्तता वादातीत आहे पण काही सरकारे ही दुर्दैवाने उपयूक्त नसतात आणि सगळ्याच सरकारांची उपयुक्तता केव्हा ना केव्हा तरी ढासळते. खडे सैन्य असावे की नाही किंवा किती असावे याच्या विरुद्ध अनेक मुद्दे आहेत आणि त्यातील काही आपण खोडूही शकत नाही तेच मुद्देही सरकारविरूद्ध वापरले जाऊ शकतात. खडे सैन्य हे राज्यकर्त्या सरकारचेच एक अंग आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार किंवा राज्यकर्ते हे जनतेने निवडून दिलेले असतात. या पलिकडे त्याला अर्थ नाही त्यामुळेच त्यांच्यातर्फे एखादे काम किंवा एखादा कायदा आमलात आणायच्या अगोदरच जनता त्यांना खाली खेचू शकते किंवा त्यांची कान उघडणी करू शकते. उदा. मेक्सीकोचे युद्ध घ्या. थोड्या लोकांनी सरकारला हाताशी धरून जी उलथापालथ केली ती सर्व जनतेला मान्य होण्यासारखी नव्हतीच.

आजचे सरकार तरी काय आहे ? परंपरेच्या नावाखाली आहे तीच राज्यव्यवस्था तोडमोड न करता आहे तशीच पूढच्या पिढीला सुपूर्त करणे हेच यांचे ध्येय आहे. हे करताना जसा काळ जातो तसा प्रामाणिकपणा कमी होतोय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. आज एकाही नागरीकाची चेतना आणि शक्ती या सरकारमधे नाही कारण एक माणुसही (त्यांचा पूढारी) त्यांना त्याला हवे तसे वाकवू शकतो. एखाद्या खेळण्यातील बंदूकीची किंमतही आज जनता या सरकारला देत नाही. मग जनतेला अशी काहीतरी यंत्रणेची गरज भासू लागते की जी सरकारविषयी त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवेल. यावरून हेच सिद्ध होते की सरकार यामुळे लोकांवर आणि स्वत:वर सुद्धा माणसे लादू शकते आणि त्यातून फायदा करून घेऊ शकते.

जे सगळ्यात चांगल आहे त्याला आपण परवानगी द्यायलाच पाहिजे. पण या सरकारने कुठलीही उद्यमशील योजना राबवीली नाही मात्र असल्या मार्गातून बाजूला होण्याची तत्परता मात्र दाखिवीली. देश खरा स्वतंत्र आहे का हा खरा प्रश्न आहे. शासन स्वत: काही करत नाही, जनतेला खर्याब अर्थाने सुशिक्षित करत नाही. जे काही आत्तापर्यंत मिळवलेले दिसत आहे ते जनतेच्या मुलभूत गुणांनी. जर सरकारने वेळीच योग्य धोरण अवलंबविले असते तर जनतेने यापेक्षाही जास्त मिळवले असते, करून दाखविले असते. जर सरकार खरेच उपयुक्त असेल तर माणसे आनंदाने एकामेकांच्या मतांची फिकीर करतील. जर सरकार सगळ्यात उपयुक्त असेल तर सरकार जनतेला त्यांच्या मताप्रमाणे वागायला पूर्ण मूभा देईल. उपयुक्त असेल तर व्यापारउदीम हा रबराच्या चेंडू प्रमाणे सरकारने उभ्या केलेल्या अनेक अडथळ्याच्यावरून पूढे मागे उड्या मारताना दिसणार नाही. सरकारमधील माणसांच्या हेतूंपेक्षा जर त्यांच्या निर्णयांच्या परिणामांवरून त्यांची योग्यता, उपयुक्तता ठरविली तर त्यांना आंदोलने करणार्या् जनतेसारखेच तुरूंगात टाकावे लागेल.

पण सरकार नकोच या टोकाच्या मार्गाला येण्यापेक्षा मी अधिक चांगल्या शासनाची मागणी पूढे रेटतो. प्रत्येक माणसाला कशा प्रकारचे शासन पाहिजे आहे हे सांगण्याचा आधिकार आहे आणि त्याने ते सांगितले की ते मिळवायच्या दिशेने त्याने एक पाऊल पूढे टाकले असे मी म्हणेन.

एकदा निवडून आल्यावर राज्यकर्ते अनेक दिवस राज्य करतात कारण ते चांगले असतात किंवा ते लोकोपयोगी कामे करतात, किंवा त्यांच्या मनात दुबळ्या लोकांबद्दल सहानभूती असते म्हणून नव्हे तर त्याचे खरे कारण ते ताकदवान झालेले असतात हे आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे की ज्या शासनामधे बहूमत राज्य करते ते शासन खर्याा न्यायावर आधारीत कसे असेल ? अशी राज्यपध्दती विकसीत होईल का? ज्यात बहूमत चांगले काय आणि वाईट काय याचा निर्णय न करता सद्वितवेक बुद्धी ते काम करेल ? शासन अधिक जास्त उपयूक्त कसे ठरेल या संधर्भातीलच निर्णयप्रक्रिया बहूमतावर सोडली पाहिजे. निवडून आलेल्या प्रतिनिधीपाशी माणसांनी आपली सद्विकवेकबुद्धी एका क्षणासाठीही गहाण टाकावी का ? तसे असेल तर माणसांमधल्या सद्विचवेकबुद्धिला काय अर्थ आहे ? मला वाटते आपण पहिल्यांदा माणसे असायला पाहिजे आणि नंतर नागरीक. सत्य आणि कायदा या दोन्हीमधे सत्यालाच जास्त महत्व आपण द्यायला पाहिजे. पहिल्यांदा सत्य आणि मग कायदे हे आपण नीट लक्षात ठेवले पाहिजे. कुठल्या वेळी काय योग्य हे गृहीत धरण्याचा व ते करण्याचा माझा हक्क हेच माझे कर्तव्य आहे. आता तुम्ही असेही म्हणाल सरकारला किंवा एखाद्या संस्थानाला सदसद्‌विवेकबुद्धी कशी असू शकेल ? पण लक्षात घ्या त्या संस्थानात किंवा शासनात काम करणार्यात माणसांची सद्सकद्‌विवेकबुद्धी हीच त्या संस्थानाची किंवा सरकारची सद्सशद्‍विवेकबुद्धी असते. कायद्याने माणसाला कधीच कणभरही न्यायप्रिय बनविलेले नाही. उलट जे सुस्थितीत आहेत त्यांना न्यायाचे दलाल मात्र कायद्याने बनविलेले आहेत. कायद्याला परमेश्वरापेक्षाही महत्व देण्याने काय होते बघा…एखादी कवायत करणारी सैनिकांची रांग ज्यात सगळ्यात पूढे त्यांचा जनरल आहे, मागे इतर आधिकारी आणि सैनिक आहेत अशी ही पलटण कवायत करत युद्धात सहभागी होते. हो ! त्यांच्या मनाविरूद्ध ! त्यापेक्षाही भयंकर म्हणजे त्यांच्या सदसद्‌विवेकबुद्धीविरूद्ध सुद्धा. त्यांना फक्त त्यांच्या या कवायतीच्या परिणामांची जाणीव असते. मग ही माणसे आहेत का मुठभर नालायक माणसांच्या चाकरीतील हलणारे छोटे दगडाचे किल्ले ? फौजेच्या तळावर आपण जाल तेव्हा एखाद्या सैनिकाच्या स्मारकाला भेट द्या. जिवंतपणे लढणार्यार या सैनिकाच्या रायफलची तेथे आता फक्त सावली असते. “नाही चिरा नाही पणती” असे काव्य लिहून ही वस्तुस्थिती बदलत नाही हेही खरे आहे.

आपल्या लक्षात आता आले असेल की ही माणसे शासनाची चाकरी ही माणूस म्हणून नाही तर एखादे यंत्राने ती करावी अशी करत असतात. त्यांचे मन भले मग त्यांना काहीही सांगत असूदे ! बर्यारचदा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या नैतिक आधिकाराप्रमाणे वागताच येत नाही. असे असेल तर त्यांच्यात आणि खेळणातल्या मानवी आकृत्यांमधे काय फरक आहे ? खेळणी ही आपण आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या फायद्यासाठी आपण तयार करु शकतो. समाज मग यांना बुजगावण्याचीच किंमत देतो. तरीही हे सामान्यपणे चांगले नागरीक असतात असे म्हटले पाहिजे. उरले – राजकारणी, वकील, मंत्री, नोकरशाही जे शासनाची सेवा त्यांची बुद्धी वापरून करतात असे म्हटले जाते, त्यांच्यात नैतिकतेचा आनंदी आनंद असल्यामुळे ते बहुतांशी सैतानाचीच त्याला देव समजून सेवा करतात असे म्हटले पाहिजे. फारच थोडे असे असतात की जे स्वत:च्या सदसद्‌विवेकबुद्धीला स्मरून शासनाची सेवा करतात त्यात असतात देशभक्त, हुतात्मे, सुधारणावादी. त्यांचा त्यांच्या या कामामुळे सरकारला विरोधकरण्यातच वेळ जात असल्यामुळे त्यांना शासन शत्रू मानते. मग शहाणा माणूस कोणाला म्हणायचे ? जो बुजगावणे होण्याचे नाकारेल आणि त्यासाठी त्याच्या पदाचाही त्याग करू शकेल त्याला –
“मी नाही होणार त्यांची मालमत्ता !
नाही माझा जन्म त्यासाठी.
माझी विद्वत्ता नाही नोकर होण्या त्यांचा.
हे विश्वची घर माझे, मी विश्वाकरता !

दुर्दैवाने आज जे असे करतात आणि स्वत:ला समाजाला अर्पण करतात त्याला शासनकर्ते स्वार्थी आणि मूर्ख समजतात आणि जे शासनकर्त्यांना आपल्यातले थोडेसे देतात त्यांना ते दानशूर आणि शहाणे समजतात.

आज अशा सरकारशी माणसाचे कसे संबंध असावेत ? उत्तर हेच आहे की असे संबंध हे बदनामी स्विकारल्याशिवाय अशक्य आहेत त्यामुळे जे सरकार एवढे वैचारीक/आर्थिक भ्रष्ट आहे त्याच्याशी एक क्षणही संबंध ठेवणे शक्य नाही.

समाजाने माणसाचा क्रांती करण्याचा हक्क मान्य केलेला आहे. क्रांतीचा अर्थ अधिक व्यापकतेने घेतला पाहिजे. क्रांती म्हणजे मला जे मान्य नाही त्याच्यात सामील न होण्याचा हक्क. वेळ पडल्यास जे पटत नाही त्याला विरोध करण्याचा हक्क. जेव्हा त्या शासनकर्त्यांची दडपशाही वाढेल आणि कार्यक्षमता लयास जाईल त्यावेळी त्यांना विरोध करायचा हक्क. आता हीच वेळ आली आहे असे सगळ्या जनतेचे म्हणणे आहे. जर या सरकारने चैनीच्या वस्तूवरचे कर वाढवले तर मला त्याचे काही वाटणार नाही कारण त्या चैनीच्या वस्तूंशिवाय मी जगू शकतो. प्रत्येक राज्यपद्धतीचे समाजाशी खटके उडतच असतात. हे खटकेच किंवा संघर्ष वाइटाला अटकाव करत असतो. पण जेव्हा खूलेआम टोळ्या करून संपत्तीवर धाड पडते आणि ती लुबाडली जात तेव्हा ते शासन आता यापूढे आम्हाला नकोच असे म्हणणे भाग आहे. दुसर्याह शब्दात सांगायचे म्हणजे ज्या राज्यपद्धतीत समाजाचा मोठा भाग हा दारिद्र्यात खितपत पडला आहे, आणि हे शासनकर्ते त्यांचे संरक्षणही करू शकत नाहीत, जेथे आवाज उठवल्यावर आणिबाणी जाहीर केली जाते, नोकरशहांशी हातमिळवणी करून राष्ट्रीय संपत्ती गिळंकृत केली जाते, अशा वेळी प्रामाणिक माणसाच्या मनात क्रांतीचे विचार घोळतील यात नवल ते कसले ! नव्हे ते त्याचे कर्तव्यच बनते. हे कर्तव्य फार तातडीचे आहे कारण आपला शत्रू आतच आहे.

पाले नावाच्या एक तत्ववेत्ता, ज्याला बर्यातचजणांची “नैतिकता” या विषयावरचा आधिकारी म्हणून मान्यता आहे त्याने एका लेखात म्हटले आहे…
“शासनाचे ऐकणे हे कर्तव्य मानायचे की नाही हे फक्त शासन उपयूक्त आहे का नाही ही एकच गोष्ट ठरवू शकते. सरकारला सत्तेवर रहायचा हक्क जोपर्यंत समाजाच्या हिताचे रक्षण होते आहे तोपर्यंतच. त्याच्याही पूढे ते अस्तित्वात राहिले आणि जनता त्यांचे – प्रस्थापीत सरकारचे ऐकत राहिली तर ती देवाची इच्छा म्हणावी लागेल पण त्यापूढे नाही. हे एकदा मान्य केले की विरोधाचे प्रत्येक प्रकरण हे तोलले जाऊ शकेल. एका बाजूला धोके आणि तक्रारी आणि दुसर्याा पारड्यात त्या दूर करण्याच्या शक्यता. पण एक लक्षात घ्या, पॅलेने ज्यात उपयुक्तता हा निकष लावता येत नाही अशा शक्यतेवर विचार मांडलेला नाही. ही शक्यता जर गृहीत धरली तर प्रत्येक समाजाच्या घटकाला ज्यात शेवटचा घटक एक माणूस आहे, त्याला न्याय करावाच लागणार मग त्याची किंमत कितीही असुदेत. जर मी एखाद्या बुडणार्या माणसाची फळी हिसकावून घेतली असेल तर मला ती त्याला परत द्यायलाच पाहिजे मग त्यामुळे मी बुडालो तरी चालेल. पण पॅलेला हे म्हणजे फळी हिसकावून घेणे काही तितकेसे बरोबर वाटत नाही. जो त्याचे प्राण वाचवू शकतो त्याचाच प्राण याच्यात जाऊ शकतो.

वास्तवात सुधारणांच्या विरोधात सगळे राजकारणी आहेत असे म्हणणे धाडसाचे होईल. या सुधारणांच्या विरोधात खरे आहेत ते सत्तेचे दलाल, औद्योगिक साम्राज्ये आणि श्रीमंत शेतकरी. त्यांना मानवतेपेक्षा व्यापार-उदीम जास्त महत्वाचा वाटतो. त्यामुळे सामान्य माणसांना न्याय मिळू नये अशी त्यांनी सोय केलेली असते. त्याची पडेल ती किंमत मोजून. माझे खरे भांडण सीमेपलिकडच्या लोकांशी नव्हे तर या घरातील लोकांशीच आहे. आपल्याला सुधारणा ही हळू हळू होत असते असे म्हणायची सवयच असते. कारण लोकांची यासाठी मानसिक तयारी नसते, पण मुख्य कारण हे असते की ज्या समुहाला ही सुधारणा घडवून आणायची असते तो तुलनेने लहान असतो आणि सत्तेतल्या लोकांपेक्षा सांपत्तिक स्थितीने तुलनेने मागासलेला असतो. किती लोकं आपल्यासारखी प्रामाणिक किंवा चांगली आहेत हे त्यावेळी महत्वाचे नसून एकही डाग नसलेला एखादा तरी माणूस आहे का याचा शोध घेणे महत्वाचे असते. कारण तोच हे बांडगूळ नष्ट करू शकतो. आज परिस्थिती अशी आहे की भ्रष्टाचाराचा विरूद्ध लाखो लोक आहेत पण त्याचा अंत करण्यासाठी कोणीच काही करत नाही. हे एके काळी स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक खिशात हात घालून स्वस्थ बसतात आणि आम्हाला काय करायचे हे माहीत नाही असा आक्रोश करतात. भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य हा विषय त्यांना दररोजच्या बाजारभावापेक्षा कमी महत्वाचा वाटतो. आणि रात्री हा समाज दोन्ही गोष्टींबाबत काही करता येत नसल्यामुळे चडफडत झोपी जातो. या आजच्या जमान्यात देशभक्त आणि प्रामाणिक माणसांचा बाजारभाव काय आहे हा खरोखरीच चिंतनाचा विषय आहे. ते सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करतात, खेद व्यक्त करतात, यासाठीच का स्वातंत्र्य मिळवले असे खालच्या दबलेल्या आवाजात कुजबुजतात, अगदीच चिडले तर अर्ज करतात. पण ते अशी एकही क्रिया करत नाहीत की ज्याचा काही फायदा होऊ शकेल. ते शांतपणे दुसरा कोणीतरी हे काम करेल आणि या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करेल या आशेने वाट बघत असतात. त्यांच्या दृष्टीने त्यांचे एक मत हीच त्यांची एकमेव ताकद असते. किंबहुना त्यांना हेच शिकवलेले असते. एक मत दिले की उलथापालथ होईल असा त्यांचा गोड गैरसमज असतो. ही परिस्थिती सगळीकडेच सर्व क्षेत्रात असते. एकच माणूस असतो ज्याच्या कडे गुण आहेत पण त्या गुणाचे ग्राहक नऊशे नव्वॅणव असतात. ज्याच्याकडे खरी ताकद आहे तोच महत्वाचा असतो. कोणापेक्षा ? या ९९९ लोकांपेक्षा. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सर्व मतदान हे एखाद्या खेळासारखे असते. फक्त त्याला एक नैतिकतेचा मुलामा दिलेला असतो. या खेळात आपल्याला चांगले आणि वाईट या दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची असते आणि हा एक प्रकारचा जूगारच असतो. मी चांगल्याच्या बाजूने मत टाकतो पण विजय चांगल्याचाच होईल का या बाबतीत मी बेफिकीर असतो. ते मात्र मी बहूमतावर सोडतो. म्हणजे मला जे चांगले वाटते, व जे चांगले आहे हे इतरांना चांगले वाटले नाही किंवा त्यांना तसे पटवले गेले की संपले. यामुळे होते काय की जर त्यांच्या उपयोगी एखादा उमेदवार पडला तर तो चांगला असे समिकरण तयार होते. याचा दुर्दैवाने असा अर्थ होतो की तुम्ही अत्यंत दुबळ्या आवाजात एका मताद्वारे सांगत असता की चांगले काय आणि वाईट काय ! आणि दुबळ्यांच्या मताला तीच किंमत मिळते जी मिळायला पाहिजे. शहाणा माणूस सत्य हे कधीच दैवाच्या भिकेवर सोडत नाही. तो यासाठी बहूमतावरही अवलंबून रहात नाही आणि सत्तेचा त्यासाठी उपयोग करत नाही. मग समजा सर्व समाजाने भ्रष्टाचार नष्ट करायच्या बाजूने मतदान केले तर त्याची कारणे काय असावीत ? फार सोपी आहेत. एकतर त्याला त्याच्याशी काही घेणे देणे नसावे, किंवा आता भ्रष्टाचार फारच थोडा उरला असेल. किंवा ते स्वत: या भ्रष्टाचाराचे बळी असतील आणि त्यांना त्यांच्या मताने यापासून मुक्ती मिळणार असेल……..

मी नुकतेच ऐकले की राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीसाठी उमेदवाराची निवड ही काही प्रमूख वर्तमानपत्राचे वरिष्ठ संपादक, राजकारणी एका बैठकीत करणार आहेत. पण समाजातील एखाद्या स्वतंत्र, बुद्धिमान आणि आदरणीय व्यक्तिमत्वाला याची काय किंमत असणार ? या निवडीत समाजातील काही स्वतंत्र व्यक्तिंची मतेही जमेस धरायला नकोत का ? असे किती लोक या बैठकीत हजर असतात ? पण नाही, तसे होत नाही. ही तथाकथीत विद्वान मंडळी लगेचच आपल्या ठाम मतापासून ढळतात आणि जनतेची घोर निराशा करतात. खरे तर असल्या विद्वानांची निराशा जनतेनेच करायला हवी. हे विद्वान त्या बैठकीत निवडलेल्या चार पाच उमेदवारांपैकी जणू काही त्याच्यशिवाय दुसरा पर्याय नाही असे समजून त्याला मान्यता देतात. यात आपली वर्णी लागावी हा सुद्धा एक सूप्त हेतू त्यांच्या मनात असतोच. लोकप्रिय पूढारीपण कोणाला नको असते ? त्याच्या या तत्वहीन मताला किती किंमत द्यायची हेही ठरवावे लागेल. माझ्यामते त्याला एखाद्या गुलामाच्या मताएवढीच, जे सहज विकत घेतले जाऊ शकते, किंमत द्यावी लागेल. खरा पुरुषार्थ मोडेन पण वाकणार नाही याच्यातच आहे हे यांना केव्हा कळायचे, कोणास ठाऊक !

सर्वसाधारणपणे सर्वसाधारण माणसाला भ्रष्टाचार किंवा समाजातील वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यासाठी त्या कामात कर्तव्य म्हणून झोकून देणे अवघड असते, पण त्याने कमितकमी वाईटाला किंवा भ्रष्टाचाराला पाठिंबा देऊ नये एवढी अपेक्षा त्याच्या कडून निशितच करता येऊ शकते. त्यात त्याने भाग घेतला नाही तर उत्तमच ! जर आपण इतर काही गोष्टींच्या मागे धावत असू किंवा इतर विचार करत असू तर मग जे हा बदल करू इच्छितात त्यांच्या मार्गातून आपण बाजूला व्हावे हे बरे. कारण आपल्याप्रमाणे त्यांनाही त्यांचे विचार आहेत. काय गंमत आहे बघा, माझे काही बांधव म्हणतात, मला त्यांनी आज्ञा करुदेत मग बघा मी त्या लढाईत भाग घेतो की नाही. यासारखा विनोद नाही. शेवटी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ते आपल्याऐवजी दुसर्याो कोणालातरी या कामाला जुंपतातच. जे अन्यायी सरकारला जरा सुद्धा विरोध करत नाहीत ते, जो सैनिक त्याला न पटणार्याा युद्धात भाग घेत नाहीत त्याचे कौतूक करतात. ज्या शासनामुळे त्याच्यावर ही वेळ आली तेही त्याचे कौतूक करतात. जणू काही पापक्षालनासाठी ते असे करत असावेत. पण या तथाकथीत पच्छात्तापाने दग्ध झालेल्या शासनाचे वर्तन काही सुधारत नाही. शेवटी काय, शासनाच्या आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली आपण सगळे एका प्रकारच्या भोंदूगिरीलाच मान्यता देत असतो. त्याची पुजा करतो म्हटले तरी चालेल. या लाजिरवाण्या पारिस्थितीची सुरवातीला लाज वाटली तरी हळू हळू आपल्यात कोडगेपणा येऊ लागतो. नैतिकतच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे आपण कधी अनैतिक गोष्टींना पाठिंबा देऊ लागतो ते आपल्यालाही उमगत नाही. शेवटी तसे वागणे आवश्यकच आहे अशी आपल्याला खात्री वाटू लागते. मोठ्या चुका व अन्याय सहन करण्याची ताकद समाजात फक्त उदासिनेतूनच येऊ शकते हे निर्विवाद.

देशभक्तीसारख्या गुणांनाही कधी कधी निंदेचे धनी व्हावे लागते. जे जनतेचे प्रमूख पुढारी, नावाजलेले प्रतिष्ठीत नागरीक, शासनाचा अनेक गोष्टींचा निषेध करतात आणि तरीसुद्धा त्याच शासनाला शासन करण्यासाठी पाठिंबा देतात, त्यांना काय म्हणावे ? तेच या सरकारचे खंदे पाठिराखे असतात. हेच लोक परिवर्तनाच्या लढाईतील प्रमूख शत्रू व अडथळे असतात. यातले काहीजण सरकारकडेच (राष्ट्रपती) हे शासन खालासा करण्याची मागणी करतात. ते स्वत:च या सरकारची हकालपट्टी का करत नाहीत ? किंवा हे शासन आणि त्यांच्या मधील दूवा का तोडत नाहीत ? हा महत्वाच दुवा कुठला ? नागरिकांच्या आणि शासनाच्या संबंधात, अशा अर्थाने जर विचार केला तर – अर्थातच पैसे- जो कर तो शासनाच्या तिजोरीत भरतात तो ! केंद्र सरकार आणि राज्ये (जी आधिक भरणा करण्यास अनुत्सूक असतात) आणि सरकार व जनतेच्या संबंधात काय फरक आहे ?

नुसते चांगले जगावे असे मत असून भागत नाही, किंवा मतप्रदर्शनाचा हक्क असूनही तो आनंदी असेल असे सांगता येत नाही. समजा त्याचे मत तो अत्यंत दु:खी आहे असे असेल तर ? तुम्ही जर एका पैशासाठीही ठकवले गेला असेल तर रात्री तुम्हाला सुखासमाधानाची झोप येत नाही. ज्यानी तुम्हाला ठकवले आहे तो तुम्हाला माहीत असेल तर त्याच्याकडे तुम्ही पैसे परत मिळवण्याचे अर्जही करत बसत नाही. तुम्ही लगेचच ते पैसे वसूल करणासाठी पावले उचलता आणि परत असे ठकवले जाणार नाही अशी काळजी घ्यायची प्रतिज्ञा करता आणि ती अमलात आणता. तत्वांवर आधारीत कर्म, सत्याच्या खर्याा स्वरूपाचे ज्ञान व सत्याचे वर्चस्व यामुळे माणसांमधील नाती आणि इतर अनेक गोष्टी बदलतात. हा बदल क्रांतिकारक आणि पूर्णत: आगळा वेगळा असू शकतो, नव्हे असतोच. केंद्रसरकार आणि राज्ये, राज्ये आणि धर्म, एका कुटुंबातही हा बदल मतप्रवाहाला दुभंगून जाणारी एक रेष मारतो. एवढेच नाही तर आपल्याच व्यक्तिमत्वातील दैवी अंश आणि सैतानी अंश यांना विभक्त करून आपल्यासमोर उभे करतो. या बदलाची ताकद फार आहे आणि तो खोलवर प्रहार करू शकतो.

कायद्यांनी न्याय करायचे असतात असे म्हटले जाते, पण दुर्दैवाने अन्याय्य कायदे आजही अस्तित्वात आहेत. अशा कायद्यांचे पालन करायचे का त्यात सुधारणा करायची आणि ती सुधारणा होईपर्यंतच त्याचे पालन करायचे, का त्यांचा निषेध करून त्वरित उल्लंघन करायचे ? सामान्य जनतेला बहुतांशी वेळा असे वाटते की वाट बघणे बरे ! बहूजनांचे मतपरिवर्तन करून या कायद्यात सुधारणा करता येतील किंवा ते रद्द करता येतील. त्यांना अशी भिती वाटत असते की रोगापेक्षा औषध जालीम ठरायला नको. या विचारसरणीने परिस्थिती अजूनच बिकट होते. या अशा सुधारणांची गरज भासणार आहे याची अटकळ बांधून तशी सोय ठेवणे हे खरोखर अवघड आहे का ? बहुमतापेक्षा सुज्ञ अल्पमताला का किंमत देता येऊ नये ? अशा सुधारणांची नुसती चाहूल जरी लागली तरी शासनाला अस्मानी संकट कोसळल्यासारखे का वाटते ? का नाही शासन त्यांच्याच नागरिकांकडून वेळोवेळी त्यांच्या या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याबद्दलच्या सुचना मागवून त्याप्रमाणे कारवाई करत ? का शासनाला ख्रिस्ताला फाशी द्यावे लागते आणि का कॉपर्निकस, लुथर यांच्यासरख्यांना वाळीत टाकायला लागते ? का वॉशिंग्टन आणि फ्रॅंकलिन यांना बंडखोर म्हणून घोषीत करावे लागते ?

ठरवून शासनाचा आधिकार नाकारायचा या गुन्ह्याला स्थानिक कायदेमंडळ, न्यायालय काहीही शिक्षा, देऊ शकतो. कारण हा असा गुन्हा होऊ शकतो हेच गृहीत धरले नसल्यामुळे यासाठी काहीही ठराविक शिक्षा ठरलेली नाही. गंमत आहे बघा. तूम्ही १०० रुपायाचा कर बुडवलात तर तुम्ही तुरुंगात कितीही काळ खितपत पडू शकता. पण शंभर वेळा जरी तुम्ही १०० रुपायांची चोरी केलीत तर तुम्ही कायद्याप्रमाणे काही कालावधीत परत बाहेर येऊ शकता आणि परत चोरी करू शकता.

जर अन्यायावाचून शासनाची यंत्रणा चालू शकत नसेल तर ते शासन जाऊदेत. जर या यंत्रामधे होणार्यास घर्षणाचाच अन्याय हा एक भाग असेल तर कदाचित ज्या भागात घर्षण होत आहे ते झिजून गुळगुळीत होतील किंवा दुसरी शक्यताही नाकारता येत नाही ती म्हणजे ते यंत्र मोडून पडेल. जर या अन्यायाकडे फाशीची सर्व अवजारे असतील तर रोग परवडला पण औषध नको असा विचार आपण करू शकता. पण जर हे शासन तुम्हाला त्यांच्या पापात सहभागी करून दुसर्यारवर अन्याय करायला भाग पाडत असेल तर मात्र मी म्हणेन “मोडा तो कायदा”. तुमचे आयुष्य मग ही यंत्रणा थांबविण्याचे विरोधी बल होऊद्यात. कुठल्याही परिस्थितीत ज्याचा विरोध मी करतो त्याचसाठी मी माझा वापर करून देणार नाही हे निश्चित.

अन्याय व वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आपल्या घटनेत काही उपाय योजलेले आहेत असे मला तरी माहीत नाही आणि जरी लिहिले असतील तर ते अमलात आणून या वाईटाचा नाश करण्याअगोदर आपण स्वर्गवासी झालेलो असू हे निश्चित. मला या कामाशिवाय कितीतरी दुसर्या गोष्टी करायच्या आहेत. मी या जगात आलो ते हे जग रहायला चांगले करायला नव्हे तर या जगात रहायला मग ते कसेही असो चांगले किंवा वाइट. माणसाला सगळ्याच गोष्टीत भाग घेता येत नाही, पण काही कामे तो करू शकतो. तो सगळ्याच गोष्टी करू शकत नसल्यामुळे त्याने सरकार दरबारी त्याची कामे सोडून अर्ज दाखल करणे हे अपेक्षित नाही. खरे तर त्यांनी माझ्याकडे सुचनांसाठी अर्ज करायल पाहिजे. पण जर ते माझे अर्ज वाचणार नसतील, त्याला केराची टोपली दाखवणार असतील तर मी काय करावे ? पण अशा प्रकरणात म्हणजे सरकार माझे ऐकत नाही माझी विनंती ऐकुनही घेत नाही, काय करावे याचे कुठलेही कलम घटनेत नसेल तर ती घटनाच कालबाह्य किंवा वाईट आहे असे म्हणावे लागेल. हे ऐकायला फर कटू आणि अशांतता माजवणारे एककल्ली मत वाटेल, पण त्यातल्यात्यात हेच योग्य आहे. बदल हा थोडासा त्रासदायक असतोच. जन्म आणि मृत्यू हे शरीरातले बदलही त्रासदायक असतातच म्हणून कोणी बदल नको असे म्हणत नाही. जर तसे म्हटले तर मानवजातीचा विनाश अटळ आहे !

ज्यांना या सरकारचे वर्तन आणि लक्षण ठीक वाटत नाही त्यांनी ताबडतोब या सरकारचा आर्थिक आणि नैतिक पाठिंबा काढून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांनी बहूमत संघटीत होईपर्यंत मुळीच थांबू नये. त्यांच्या बाजूने त्यांची सतसद्‌विवेक बुद्धी आणि परमेश्वर असताना त्यांना बहूमताची काय गरज ?

मी या सरकारच्या प्रतिनिधीला समोरासमोर वर्षातून एकदाच भेटतो. किंवा त्याच्याकडुन या कारणासाठी येणारे कागद माझी भेट घेतात. तो म्हणजे त्या सरकारचा कर संकलक. सरकारातून दुसरे आपल्याला कोण भेटायला येतो ? तो येतो एकदा आणि त्याला मान्यता आणि कर द्या म्हणतो. त्यांच्या विषयी आणि ते ज्या शासनाकडून आलेले आहेत आदर व्यक्त करून जर तुम्हाला प्रेमाने, सामोपचाराने तुमची बाजू मांडायची असेल तर सगळ्या अहिंसक असा मार्ग आहे त्या करभरणीस शांतपणे नकार देणे. दुर्दैवाने मला या माझ्या शेजार्यासशी म्हणजे कर संकलकाशीच, जो या सामाजाचा घटक आहे, हा प्रश्न सोडावायला लागेल. कारण स्पष्ट आहे. त्याने स्वखूषीने या शासनाचा प्रतिनिधि होऊन माझ्यावर होणार्या अन्यायात भाग घेतला आहे. मी काही मला येणार्या् नोटीसीच्या कागदाच्या तुकड्याबरोबर लढू शकत नाही. त्याच्या मागे असणार्याण या माझ्या मित्राबरोबरच मला हे भांडण करावे लागणार. पण माझ्या या शेजार्यामला जो सरकारी अधिकारी आहे त्याला मला वागणूक कशी द्यायची हे कसे कळेल ? तो मला एक एक चांगला शेजारी म्हणून चांगले वागवेल का माझ्या विचारंचा बंडखोरपणा बघून माझ्या पासून दूर पळेल ? त्याच्या सरकारी कार्यात जर माझा अडथळा होत असेल तर तो माझ्याशी कमीतकमी वाद घालून माझा अडथळा कसा दूर करेल ? हे शक्य आहे का त्याला ?

मला खात्री आहे की देशात हजार एक, किंवा शंभर, किंवा दहा जरी अशी माणसे मिळाली कि जे या शासनाच्या निर्णयाविरूद्ध आहेत आणि ती त्यासाठी तुरुंगात जायला तयार आहेत, आणि ती गेली तर या देशातून अन्याय, गुलामगिरी, भ्रष्टाचार नष्ट होईल. या बाबतीत ही चळवळ पहिल्यांदा जरी ती लहान प्रमाणावर असली तरीही एकदाच आणि शेवटची ठरेल अशा पद्धतीने चालवली पाहिजे आणि तेच आपले ध्येय असायला पाहिजे. पण आपण नुसत्याच बाता मारतो.

जेव्हा शासन तुम्हाला अन्यायाने तुरुंगात टाकते तेव्हा त्या सज्जन माणसाची जागा ही तुरूंगच असते आणि त्याने त्याची तयारी ठेवली पाहिजे. दुर्दैवाने आज सरकारने जनतेच्या इच्छा आकांक्षा आणि स्वतंत्र अस्मितेला तुरुंग ही एकच जागा ठेवली आहे. पण सत्य हे आहे की जनता एकीकडे आणि शासनकर्ते एकीकडे असे असल्यामुळे जनतेनेच शासनाला एका प्रकारे तुरुंगात टाकले आहे असे म्हणावे लागेल. जनतेला या शासनाचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे संवादहीन संबंधात सरकारचाच हा त्या लोकसभेच्या इमारततील तुरुंगवास म्हणावा लागेल. या तुरुंगातच मग सामान्य जनतेला आपली गार्हाोणी मांडायला जायला लागेल. या येथे त्यांचे म्हणणे जर कोणी ऐकून घेणार नसेल तर मात्र त्याला आत्मसन्मानाने जगायची एकच जागा उरते आणि ती म्हणजे सरकारने केलेले तुरुंग. त्यांना तुरुंगात टाकले की आपल्याला शत्रूपासून आता कुठलीही भीती नाही अशा भ्रमात कोणीही राहू नये. असा भ्रम त्यांच्या मनात उत्पन्न झाला तर मात्र असेच म्हणावे लागेल की त्यांच्या चूका आणि सत्य याच्यातले सत्य काय आहे हे त्यांना अजून उमगले नाही. सरकारला तुरुंगात आत्मशोध लागलेल्या माणसाची खरी ताकद माहीत नाही असेच म्हणावे लागेल. त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध तो येथूनच तीव्र लढा देऊ शकतो हे लवकरच त्यांना कळेल. मतदान करताना म्हणून हे लक्षात ठेवले पाहीजे की तुम्ही एक नुसता कागदाच तुकडा त्या पेटीत टाकू नका तर त्या कागदाच्या तुकड्यामागे आपले आग्रही मत, विचार, अन्यायाविरुद्धचा लढा उभा करा. एक लक्षात घ्या जेव्हा अल्पमत आणि बहूमत एकच असतात तेव्हा अल्पमताला कोणी विचारत नाही. ते क्षीण असते आणि दाबले जाते. पण तेच जेव्हा बहूमतापेक्षा वेगळे असते तेव्हा त्या एकत्रित अल्पमतालाही विलक्षण वजन प्राप्त होते. या वजनाखाली मग मोठमोठी राज्येही खालसा होऊ शकतात. मग सरकारला कोणत्या भाषेत आपले गार्हा.णी सांगावी लागतील ? जर सरकारला आपली वागणूक सुधारणे वा त्याच्या विरोधात लढणार्यांसना तुरूंगात टाकणे हे दोन पर्याय उपलब्ध असतील तर हे नालायक सरकार निश्चितच दुसर्याय पर्यायाचा वापर करतील. पण जर हजार एक माणसांनी कर या वर्षी कर भरण्यास नकार दिला आणि कर भरला नाही तर ते काही हिंसक कृत्य म्हनता येणार नाही. पण मी तर असे म्हणेन की तो कर भरणे हेच हिंसक कृत्य ठरेल कारण आपण जर तो भरला तर सरकार त्याचा वापर करून रक्तरंजित दडपशाहीसारखे हिणकस कृत्य करते. अहिसंक क्रांती किंवा परिवर्तन याची व्याख्या हीच आहे. मग जो सरकारी माणूस जो अडचणीत सापडलेला आहे, त्याने जर मला विचारले की “मी आता काय करू ?” तर माझे उत्तर असेल, तुला जर या परिवर्तनाला मदत करायची असेल तर तर तू तुझ्या पदाच राजिनामा दे”. जनतेने सरकारमधे सामील व्हायचे नाकारले आणि जर नोकरशहांनी राजिनामे सादर केले तर सरकारला वठणीवर आणायला कितीसा वेळ लागणार ? सरकार जेव्हा तुमच्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीवर घाला घालते, तेव्हा होणार्याच रक्तपाताचे काय ? मी म्हणेन अशा जखमेतून त्यावेळी रक्ताऐवजी माणसांचा खरा पुरुषार्थ वाहतो आणि तो अमर होतो.

या कायदेभंगाच्या गुन्ह्याबद्दल मी तुरुंगवासाच्य़ा शिक्षेचा विचार केला आहे आणि त्याच्या संपत्तीच्या जप्तीचा नाही कारण एकतर अशी माणसे निर्धन असतात. त्यामुळे त्याने काही विशेष फरक पडेल असे मला वाटत नाही. या प्रकारच्या लोकांना तुलनेने सरकार फार कमी सेवा पुरवते. जर एखादा माणसाने जेवढे लागतात तेवढेच पैसे कमवून जगण्याची कला प्राप्त केली तर शासन त्याच्या कडून काय घेणार ? जी श्रीमंत माणसे कर भरतात त्यांनी मग कर का भरायचा ? याचे उत्तर हे आहे की तो अगोदरच शासनाला विकला गेलेला असतो आणि शासनानेच त्याला श्रीमंत केलेले असते. खरे सांगायचे तर जास्त संपत्ती ही आपल्या सुखप्राप्ती मिळवायच्या मार्गातील खरी धोंड आहे. कारण संपत्तीच माणसाच्या ध्येयप्राप्तीच्या आड येत असते. अर्थात समाधान हे ध्येय असेल तर ! खरे तर खूप पैसा असला तर तो खर्च कसा करायचा हाच प्रश्न उरतो आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला कर भरावे लागतात. हे करता करता नैतिक पातळी घसरू शकते हे ही विसरण्यासारखे नाही. आनंदाने जगण्यापेक्षा मग जगण्यासाठी लागणार्याा साधनांकडे जास्त लक्ष पुरवले जाते आणि साध्य का साधने हा प्रश्न उभा रहातो. श्रीमंत माणसाने मग करावे काय ? तो गरीब असताना त्याने ज्या योजनांची स्वप्ने पाहिली होती ती इतरांसाठी पहावीत आणि ती पुरी करण्याचे प्रयत्न करावेत.

जेव्हा मी माझ्या स्वतंत्र सहनागरिंकांबरोबर चर्चा करतो तेव्हा मला हे जाणवते की वर मांडलेले विचार त्यांना कितीही पटोत वा न पटोत, त्यांच्या मनात शासनाशिवाय त्यांचे संरक्षण कोण करणार व त्यांच्या संपत्तीचे काय होणार या दोन काळज्यांनी घर केलेले असते. माझ्यापुरते बोलायचे तर मी त्या संरक्षणावर अवलंबून नाही. पण मला ही ही खात्री आहे ज्या दिवशी मी कर भरायचे नाकारेन त्याच दिवशी माझ्या घरादारावर जप्ती येणे अटळ आहे. हे तेवढ्यावरच थांबेल याची खात्री नाही. माझा व माझ्या मुलाबाळांचा छळही होईल. मग माझ्या मनात एक प्रश्न उभा रहातो, जी संपत्ती एवीतेवी हिसकावून घेतली जाणारच आहे ती कमवण्यासाठी मी आयुष्यभर कष्ट उपसावेत का ? एवढी त्याची किंमत आहे का ? हे पचायला कठीण आहे. माणसाला प्रामाणिकपणे पण सुखासमाधानाने कसे जगता येईल ? कोठेतरी थोडीशी जमीन भाड्याने घेऊन त्यावर जरूरी पुरते धान्य उगवून, परांवलंबित्व कमी करून जगायला सुरवात करायला पाहिजे. उगाचच व्याप वाढवून उपयोग नाही. कन्फुशियसने एका ठिकाणी म्हटले आहे “ शासन जर तारतम्याने योग्य तत्वानुसार चालले असेल तर गरिबी आणि दारिद्र्य ही लाजिरवाणी बाब आहे. पण शासन जर तसे चालत नसेल तर श्रीमंती आणि तफावत ही लाजिरवाणी गोष्ट ठरते. जर मला शासनाच्या संरक्षणाची गरज भासत नसेल, आणि मी जर शांतपणे एका कोपर्या्त माझे जिवन व्यतीत करणार असेन तर मला कायदेभंगाची भीती वाटायचे कारण नाही. मी थोडीशी जोखीम पत्करू शकतो जी नालायक शासनाला पाठिंबा देण्यापेक्षा कितीतरी कमी आहे.

काही वर्षापूर्वी सरकारचा एक माणूस मला चर्चच्या वतीने भेटायला आला आणि त्याने माझ्या कडे एक विशिष्ठ रकमेची मागणी केली. माझे गरीब बिचारे शाळामास्तर वडिल चर्चमधे पाद्रीबुवांचे भाषण ऐकायला जायचे त्यासाठी हा कर होता. मी अर्थातच त्या चर्चमधे कधिच गेलो नव्हतो. हा कर भरला नाही तर तुरुंगात जावे लागेल अशी धमिकी त्याने मला दिली. मी तयारी दाखविली होती परंतू माझ्या अपरोक्ष, हा कटू प्रसंग टाळण्यासाठी, माझ्या एका मित्राने हा कर भरून टाकला. मला हे कळाले नाही की चर्चसाठी एका गरीब मास्तरावर कर लादाण्यापेक्षा चर्चवर गरीब मास्तरांसाठी कर लादण्यास काय हरकत आहे ? पण पूढील वर्षी हाच प्रसंग टाळण्यासाठी मी आमच्या गावाच्या पंचायतीला आणि शासनाला एक अर्ज देऊन टाकला “ मी हेन्री थोरो, असे जाहीर करतो की मला कुठल्याही संघटनेचा ज्याचे सभासदत्व मी स्विकारले नसल्यास, सभासद समजू नये. त्यानंतर मला चर्चचा कर भरण्यासाठी आत्तापर्यंत एकही पत्र आलेले नाही. अशा सर्व संघटनांचे, धार्मिक संस्थांना जर मी अप्रत्यक्ष कर भरत असेन तर मी त्यांच्याबाबतही असेच प्रकटन देण्यास तयार आहे. फक्त ती यादी कशी मिळवायची ही अडचण आहे.

मी गेले सहा वर्षे निवडणुकीचा कर भरलेला नाही. यासाठी मी तुरुंगवासही भोगलला आहे. तुरुंगातील या वास्तव्यात एका रात्री मी तुरुंगाच्या जाड भिंती, ते जड लोखंडी दरवाजे आणि त्यातून येणारा फिकट प्रकाश, याबाबत विचार करत होतो आणि माझ्या या हाडामासाच्या शरिराला या भिंतीआड कोंडून ठेवणार्याम शासनाच्या मुर्खपणाचे मला हसू आले. माझा उपयोग त्यांना अधिक चांगल्याप्रकारे करता आला असता, असा विचार माझ्या मनात सारखा येत होता.

मी आणि इतरांमधे तुरूंगाची एक जाडजूड भिंत होती. पण ते पारतंत्रात होते आणि मी या कोठडीत असुनही स्वतंत्र होतो. त्या कोठडीत मला एकदाही मी कैदेत आहे असे वाटले नाही हे सत्य आहे. हा तुरूंग बांधायचा खर्च किती वायफळ आहे असेही माझ्या मनात येऊन गेले. बाहेरच्यांना माझ्यापर्यंत येण्यासाठी (खर्याे अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी) या भिंतींचा अडथळा तर ओलांडावा लागेल पण त्यापेक्षाही अवघड आहे त्यांच्या मनाचा वैचारीक तुरूंग फोडणे. मला तर असे वाटत होते की मी एकट्यानेच कर भरला आहे इतका मी आनंदी होतो, कैदी असल्याचा विचार तर माझ्या मनासही शिवत नव्हता. त्यांना माझ्याशी सभ्यपणे कसे वागायचे हे कळत नव्हते. त्यांच्या प्रत्येक धमकीचे मला हसू येत होते कारण त्यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते की मला त्या चार भिंतींच्या बाहेर जायची आस लागली आहे आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करायची शक्यता आहे. त्यांचा दररोजचा कोठडीला कुलूप घालण्याचा सोपस्कार बघून मला हसू लोटले. माझे विचार, जे त्यांच्यासाठी जास्त धोकादायक आहेत त्यांना ते कसे कुलूप घालणार ? माझ्या विचारांच्या जवळपासही न पोहोचता आल्यामुळे ते माझ्या शरीराला शिक्षा देत आहेत. लहान मुले जसे कुत्र्याच्या आडदांड मालकाला काही करता येत नसल्यामुळे त्याच्या कुत्र्यालाच शिव्या देतात, तसे ! एखाद्या अंधार्याक वाटेवरच्या असहाय्य स्त्रीसारखी त्यांची अवस्था झाली आहे. घाबरलेली आणि काय करावे हे न सुचल्यामुळे कावरी बावरी. ते बघून मला त्यांची अधिकच किव येते आणि आता मला त्यांच्याबद्द्ल वाटणार थोडासा आदरही नष्ट झाला आहे.

माझ्या हे लक्षात आले आहे की शासन हे तुमच्या विचारांच्या विरूद्ध जाण्याचे धाडस कधी दाखवत नाही. तुमचे शारिरीक हाल करण्यात त्यांना जास्त रस असतो कारण सोपे आहे. तुमच्या विचारांना सामोरे जाण्याचे त्यांच्या भ्रष्ट विचारांमधे बळ नसते आणि तेवढे नैतिक आधिष्टानही त्यांच्या विचारांना नसते. माझा जन्म हा पारतंत्रात राहण्यासाठी झालेला नाही. मी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि राहीन. बघूया कोण जिंकते आहे ते. माझ्यावर ते काय जबरदस्ती करणार ? असा एखादा कायदा जो माझ्या विचारांपेक्षा श्रेष्ठ आहे असाच कायदा ते मला पाळायला लाऊ शकतात. नाहीतर नाही. मी एक साधासूधा माणूस आहे. हे राज्य चालवायची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. पण शासनाकडे एवढे तज्ञ लोक असताना त्यांना या कामासाठी माझी गरज भासायची गरज नाही. जसा मी माझी मदत करतो तशी त्यांनी त्यांच्या कामात स्वत:ची मदत करावी. मला एवढे कळते की जर जमिनीत ज्वारी टाकली आणि बाजरीही टाकली तर त्यातील एक न रुजता दुसर्या ला वाट करून देत नाही. दोन्हीही बिया रुजतात, वाढतात, बहरतात आणि हे करताना ते स्वत:चे निसर्गाचे नियम पाळतात. या नियमानुसार जर त्यातील एकाला उन मिळाले नाही तर ते रोप खुरटते आणि मरते. जर निसर्गनियमानुसार त्या रोपाला वाढू दिले नाही तर ते रोप मरते. माणसाचेही असेच आहे.

तुरुंगातील आयुष्य मला नवीन होते आणि ते मला मजेदारही वाटले…….
क्रमश:…………..
शब्दांचे दारिद्र्य जाणवलेला,
जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

One Response to सविनय कायदेभंग – हेन्री डेव्हीड थोरो….

  1. koustubh म्हणतो आहे:

    sundar !!! tumache bhashantar avadale … pudhachya lekhachi vaat baghat ahe ….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s