मैत्र !

एक जवळचा मित्र !

आपल्या आयुष्यातील कितीतरी, म्हणजे कितीतरी तास आपण या लाकडाच्या अडीच फूट बाय ३/४ फूट तुकड्यावर घालवतो. टेबलाशी निगडीत अनेक चांगल्या वाइट आठवणींचा आपल्या डोक्यातल्या हार्डडिस्कवर एक वेगळा ड्राईव्ह केला तरी चालेल एवढ्या आठवणी सहज असतात. कामाचा पहिला दिवस, मधल्यावेळेचा डबा, मित्रांचे कोंडाळे, साहेबाची बोलणी, पडलेला चेहरा, बढती, बढतीची मेजवानी….शेवटचा दिवस…. अशा अनेक आठवणी आपण या टेबलाशी बोलू शकतो. अशा अनेक टेबलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांप्रमाणे आपली सोबत केलेली असते. जरा आठवून पहा आणि तुम्हाला आढळेल किती महत्वाचा आणि जवळचा मित्र होता हा !

मलाही असे अनेक मित्र होते आणि आता एक शेवटचा मित्र आहे तोही माझ्याच घरात.

माझे टेबल.

समोर एक सहा फूट रूंद आणि ६ फूट उंच दरवाजा. त्याबाहेर नजर टाकली की पिचकारीच्या आणि कडूलिंबाच्या फांद्याची सरमिसळ झालेला एक मोठा दाट पडदा, त्याच्या मागे लालभडक फुलांचा गुलमोहोर.

या मित्राला मी जागाच अशी दिली की आमची मैत्री बहरतच गेली. मी जास्तीत जास्त काळ या मित्राबरोबर घालवू लागलो. मला समोर दिसणार्‍या वृक्षांनी चारही ऋतूत निसर्गाला दिलेली दाद हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. पण आज या निसर्गखिडकीतून दिसणारे पक्षी हा माझ्या लेखनाचा विषय आहे.

मी सकाळी लिहायला माझ्या मित्राबरोबर बसलो की ऐकू येतात असंख्य पक्षाचे आवाज, आवाज कसला, एखाद्या स्त्रियांच्या संमेलनात चाललेला गोंधळच म्हणाना. काही नाजूक काही कर्कश्य, काही किणकिणणारे असे अनेक ध्वनी…….

गुंडांसारखे जोरजोरात पंख फडकवत, ओरडत उडणारे पोपट, पिचकारीच्या शेंगांच्या टोकावर बसून त्या शेंगा खालून सोलताना होणारी त्यांची गडबड फारच विनोदी असते. फांदीवर बसून तीच फांदी कापण्याचीच तर्‍हा ही. त्यावेळी उलटे होऊन शेपूट आकाशाकडे व चोच खाली पण वरच्या दिशेन वाकलेली हे दृष्य फार मजेशीर ! त्याच वेळी त्याच्या डोळ्यांची होणारी हालचाल तर कुठल्याही नटश्रेष्ठाला मागे टाकेल याची मला खात्री वाटते.

चिमण्यांच्या जोड्यांची एकत्र राहण्याची धडपड पाहून मला त्यांचे कौतूक वाटते. चिमण्या गायब झाल्या आहेत असे म्हटले जाते पण आम्ही नशिबवान म्हणायला हरकत नाही. आमच्या येथे त्या भरपूर आहेत. त्या बघतांना मला माझे लहानपण (जेव्हा ’या’ घरातही घरटे करायच्या) आठवतेच.

दररोज संध्याकाळी साधारणत: टेरेसमधे वाईनचा ग्लास हातात घेऊन बसले की समोरच असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर असंख्य भूंगे फिरत असताना दिसतात. का, ते शोधून काढायचे आहे अजून. हे भुंगे त्या झाडावर घिरट्या घालत असताना चुकून कधीकधी आमच्या टेरेसमधेही शिरतात आणि शांतपणे बाहेर पडतात. गंमत म्हणजे हा सगळा खेळ साधारणत: अर्धा तास चालतो. त्यानंतर एखाद्या प्रसंगावर पडदा पडावा तसे सगळे एक्झिट घेतात.

सकाळ, संध्याकाळी सोबत करणारी तुरेवाल्या बुलबुलाच्या जोडीशी तर माझी वैयक्तिक ओळख आहे. माझ्या टेबलासमोर जो खाली जाणार्‍या जिन्याचा कठडा आहे तेथे नियमीत येऊन बसणे हा यांचा छंद आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एवढ्या जवळून यांना पहाणे हा एक अनूभव आहे. तो तुरा, रुबाब, चोच, आणि कानाखाली असलेला वेगळाच लाल रंग आणि रंगात आले की मस्त शीळ घालणे….. व्वा !

ज्याच्या दर्शनाने धनलाभ होतो असे म्हणतात तो भारद्वाज बघून बघून, हे खरे असते, तर मी टाटा बिर्लां पेक्षाही श्रीमंत झालो असतो. इतरवेळी त्याच्या काळ्या अंगावर त्याने चॉकलेटी रंगाचे मखमली ब्लेझर घातला आहे की काय असे वाटते. सकाळी झाडाच्या टोकावर पंख पसरवून कोवळे उन खात बसलेल्या या पक्षाला बघताना मला नेहमी गंमत वाटते तर त्याला चालताना बघून वाइट वाटते. असे वाटते की याला आकाशात का उंच उडता येऊ नये ? ती बुलबुलांची जोडी याला सारखी फांद्यांवरून हुसकावून लावत असते पण हा शांतपणे दुसर्यात फांदीवर जाऊन बसतो आणि काहीच करत नाही. मी बघितलय तसा अत्यंत घाबरट पक्षी आहे हा. उघड्यावर कधी येणार नाही सदासर्वदा पानांच्या आड. पण याच्याशीही आमची दोस्ती जमलीय बरका ! सकाळी न्याहारीच्या वेळी फोडणीची पोळी कठड्यावर टाकली की हळूच कठड्यावर अवतीर्ण होतात हे महाराज ! पण ते सुद्धा कुंडीच्या आडून. त्याला घारींसारखे उडावे असे तीव्रतेने वाटत असेल का ?…..पण सदानकदा सावलीत, असल्यामुळे याचा चांगला फोटो काही मिळत नाही. कधितरी मिळेलच !

एकदा मी माझ्या मशीनवर काम करत बसलेलो असताना मला एकदम गोंगाट ऐकू आला. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केले पण जास्तच आवाज येऊ लागला म्हणून बघितले तर दोन घारींच्या मागे दोन टिटव्या लागल्या होत्या. त्या पाठलागात त्या एवढ्या कर्कश्य ओरडत होत्या की बस्स ! गंमत म्हणजे घारीसारखा एवढा मोठा पक्षी जिवाच्या आकांताने पूढे उडत होता आणि या मागे. शेवटी घारींनी उंची गाठल्यावर या खाली जमिनीवर उतरल्या. बहूदा त्यांची अंडी त्या तेथे खाली झुडपात असावीत. इतरवेळी त्यांचे उंच पाय ही एक लक्षात येणारी गोष्ट.

घारींवर मी काही लिहीत नाही कारण त्यांच्याबद्दल मी माझ्या एकात्म या कथेत लिहीले आहे. अर्थात ही कथा मला या निसर्गखिडकीतून घारींकडे पहात असतानाच सुचली हे ही खरं. आता मला घारी एकामेकांना जी साद घालतात तोही ओळखू यायला लागला आहे.

ब्राह्मणी मैना आणि साधी मैना यांच्यातला व यांच्या स्वभावातला फरक त्यांना दोघांनाही एकदम बघितल्याशिवाय उमगणार नाही. यांच्यात सामाजिक नियक फार कडक असावेत असे वाटते कारण या त्यांच्या भाइबंदांना चोचीने मारत असताना मी अनेक वेळा बघितले आहे. कर्मठ लेकाचे ! जग कुठे चालले आहे हे यांना केव्हा कळणार कोणास ठावूक !

या झाडांच्या मधून दोन केबल्स जातात एकामेकांना समांतर. ही जागा एका पक्षासाठी राखीव आहे म्हणाना ! त्याचे नाव कोतवाल किंवा ड्रॅंगो. त्या तारेवर बसून हा आजूबाजूचा आसमंत न्याहाळीत असतो ते बघून मला का कोणास ठाऊक तूंगी या किल्ल्याची आठवण येते. तोही असाच उंचच्या उंच आणि खाली नजर ठेवून असतो. याचे लालबूंद डोळे, दुभागलेली शेपटी आणि वेगात उडणे बघून असे वाटते की हे महाराज मांसाहारी असावेत. आहेत का नाहीत हे माहीत नाही, पण असणारच. असं म्हणतात की हा पक्षी दुसरा पक्षी ओरडत असताना त्याची हुबेहूब नक्कल करू शकतो. पण मला हा अनूभव अजून यायचाय.

साधारणत: सकाळची उन्हे पडली की पिचकारींच्या झाडावर एकदम गर्दी उडते. त्या फुलातील किडे खाण्यासाठी. त्यातच फुलपाखरांप्रमाणे त्या फुलांवर पिंगा घालणारे छोटे शिंजीर इतके वेगाने पंख हलवातात की त्यांचा फोटो काढणे मुष्कील. आकार तर इतका लहान की त्या फुलातही गायब होऊ शकतात ते.

सूर्यपक्षी/शिंजीर.

शिंजीरचे शहरी घरटे.

कुहू कुहू असा आवाज काढणार्‍या कोकीळ आणि सौ. कोकिळा यांची जोडी बघतांना कोकीळ एवढा सूंदर गातो आणि कोकीळा इतकी सूंदर का असते याचा उलगडा होतो. या दोन जोड्या दिवसातून संध्याकाळी एकदा तरी हमखास दर्शन देतातच.

कोकिळा…

दयाळाचे सकाळचे गाणे ऐकत उठताना परमेश्वराचे या जन्माबद्दल आभार मानावेत का दयाळचे आभार मानावेत हे समजत नाही. पण मी दोघांचेही आभार मानतो.

दयाळ

एक दिवस पाऊस पडून गेल्यावर त्या झाडांच्या इथे जमिनीवर एक गंमत बघितली. त्या डबक्याच्या एका कडेला एक झाड आहे आणि एका बाजूला तारेचे कुंपण. पावसाळ्यात या डबक्यात बरेच पाणी साठते इतके की एकदा याच्यात मी बदकेही बघितली. असो. तर हा खंड्या डबक्यात काही हालचाल दिसली की झाडावरून निघायचा सूर मारायचा आणि इकडच्या काठावर कुंपणावर यायचा. शिकार फस्त केली की पुन्हा पाण्याकडे लक्ष. परत सूर आणि पलिकडे त्या झाडाच्या फांदीवर लॅंडींग. असे जवळजवळ अर्धा एक तास तरी चालले असेल. शेवटी मीच कंटाळून बाजूला झालो. रंग तर डोळ्याचे पारणे फिटवणारे !

खंड्या

एकदा मला याच झाडावर कधीही न आढळणारा पक्षी आढळला……

मुनीया, रॉबीन, कावळे, कबूतरे, तांबट हे पण नित्य दर्शन देतात पण यांचे चांगले फोटो अजून काढायचेत.

तांबट

एक दिवस मात्र त्या डबक्यात मलबार ग्रे हॉर्नबील बघून मी थक्क झालो. आता पुढच्या मोसमात येतात का ते बघायचय !

जयंत कुलकर्णी.
सर्व फोटो मी काढले आहेत.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in मी काढलेली छायचित्रे, लेख. Bookmark the permalink.

2 Responses to मैत्र !

  1. sudeep mirza म्हणतो आहे:

    छान! फोटो सुरेख आहेत …

  2. सदानंद शेणवी म्हणतो आहे:

    ज़यंतजी, सुंदर लेख. फोटो तर अप्रतिमच. खरच भाग्यवान आहात जे की आपल्याला एवढया निर्सगरम्य वातावरणात काम करता येतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s