कूटचा वेढा …. भाग ३ – माझ्या आगामी पुस्तकातील ” मराठा लाईट इन्फंट्री” मधे वर्णन केलेले एक युद्ध.

मागच्या भागात वर्णन केलेल्या माघारीच्या मार्गाचा नकाशा –

ज. टाऊनशेंडने तुर्कांचा सेनाप्रमुख खलील पाशा याची १६ एप्रिलला गाठ घेतली आणि त्याला हा वेढा उठवण्यासाठी १० लक्ष पाऊंड व सर्व तोफा देऊ केल्या या बदल्यात त्याने सर्व सैनिकांना कूटमधून सुखरूप सोडून द्यायची मागणी केली. तुर्कांनी ही मागणी अर्थातच धुडकावून लावली. त्यांचे १०००० सैनिक या युद्धात कामी आले असल्यामुळे ते नैसर्गिकच होते. कमांडर पाशा याने म्हटले आहे “ही मागणी जर दुसर्‍या परिस्थितीत करण्यात आली असती तर मी त्याला गोळीच घातली असती. त्यावेळी मात्र मी शांत राहून मी ही मागणी म्हणजे मोठा विनोद असल्याचे त्यांना सांगितले”.

याबद्दल ब्रिटीशांनी स्वत:ला कधीच माफ केले नाही कारण तुर्कस्तानने ही बातमी पेपरमधे छापली आणि जगभर ब्रिटीशांची बदनामी झाली. ही कल्पनासुद्धा LWC चीच होती.
ब्रिटीश गोटात सैन्य उपासमारीने मरते आहे हे माहीत असल्यामुळे पाशाने विनाअट शरणागती मागितली. दुसरा कुठलाच उपाय नसल्यामुळे ज. टाउनशेंडने १९ एप्रिल रोजी तुर्कांच्यासमोर शरणागती पत्करली. कूटचा हा १४७ दिवस चाललेला कूप्रसिध्द वेढा उठवण्यात आला आणि तुर्कांनी कूटमधे प्रवेश केला.
ज. टाऊनशेंड्ने सगळ्या तोफा व इतर महत्वाचे साहित्य नष्ट करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे बरेच साहित्य नष्ट करण्यात आले. रात्रभर सगळीकडे पेटवलेल्या शेकोट्या व त्यात जळणारी कागदपत्रं व त्या उजेडात पडणार्यार सावल्यांचा उदास पण भीषण खेळ चालला होता. एका ब्रिटीश अधिकार्यााने त्याच्या आठवणीत लिहून ठेवले आहे “ मी ते दृष्य़ कधीच विसरणार नाही. आम्ही आम्हाला प्रीय असणार्या सर्व वस्तूंचा नाश करण्याचे अंगावर काटा आणणारे काम करत होतो. तोफा चालवणार्यास गोलंदाजांच्या डोळ्यातून त्या तोफा फोडताना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. दुपारपर्यंत कूटमधे आलेल्या तुर्की सैन्याने ते शहर व्यापून टाकले आणि आम्ही टायग्रिसच्या किनार्‍यावर अश्रू ढाळत खिन्न उभे होतो.”

ब्रिटीश आणि भारतीय सैनिक आता युद्धकैदी झाले होते आणि त्यांना लवकरच तुर्क, अरब आणि कुर्द लोकांच्या अमानुष वागणुकीला तोंड द्यावे लागणार होते. कुठल्याही युद्धाच्या इतिहासात असा अनुभव कुठल्याही सैन्याला आला नसेल. तुर्कस्तानी सैन्याची काळी बाजू यामुळे जगासमोर आली आणि जगभर संतापाची लाट उसळली. एकंदर ४८१ अधिकारी आणि ९५८० सैनिकांनी शरणागती पत्करली. टाऊनशेंडला शरणागतीच्या कलमात सैनिकांना चांगल्या वागणुकीची हमी देऊनसुद्धा ४००० सैनिक युद्धकैदी असताना मृत्यूमुखी पडले. या सगळ्या १००६१ माणसांना उपासमार होत असताना, तशा भयंकर उन्हाळ्यात अल-कूट ते बगदाद असे चालवत नेण्यात आले. एका ब्रिटीश सैनिकाने त्याच्या आठवणीत लिहिले आहे “ आमच्यात एक इंचही पुढे पाऊल टाकण्याची शक्ती नव्हती. आम्ही जणू उभी राहिलेली प्रेतेच होतो. बरेचजण तापाने फणफणत, हागवणीने त्रस्त होऊन जमिनीवर पडले होते. उठण्याची शक्ती नसल्यामुळे त्यांच्याच विष्ठेत ते लोळत होते आणि त्यांच्यावर माशा घोंघावत होत्या.” जे उरले होते ते उपासमारीने अर्धमेले झाले होते. हा वेढा एवढा वेळ चालू ठेवण्यात आला याला लंडन वॉर काउन्सीलच्या पदाधिकार्यां नाच जबाबदार धरले पाहिजे, यात नंतरच्या इतिहासकारांच्या मनात कोणतीही शंका उरली नाही. ब्रिटीश आणि भारतीय सैन्याला ज्या हालआपेष्टांना सामोरे जावे लागले त्याच्या तुलनेत ज. टाऊनशेंड हा आरामात कॉस्टनटिनोपालमधे तुर्कांच्या कैदेत आरामात रहात होता. त्याला त्याच्या बायका मुलांनाही त्याच्याबरोबर ठेवण्यास परवानगी दिली होती. ब्रिटीशांच्या विनंतीखेरीज हे शक्य नव्हते. पण हीच काळजी LWC ने सामान्य सैनिकांच्या बाबतीत अजिबात दाखविली नाही.

अल-कूट्चा विजय हा तुर्कांच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. मुख्य म्हणजे त्यांच्या सेनानींचा आत्मविश्वास अतोनात वाढला आणि तेही ब्रिटीश सैन्याचा पराभव करू शकतात याची जगाला आणि त्यांना खात्री पटली. ज्या जर्मन सेनानी म्हणजे फॉन गोल्ट्झ या विजयाचे श्रेय घ्यायला फारसा जगला नाही. तो हा वेढा उठण्याआधीच टायफसच्या तापाने मरण पावला. ब्रिटीशांचा विचार केला तर ज. टाऊनशेंडवर बरीच टीका झाली त्यात हा वेढा तोडून बाहेर पडायचा कुठलाच प्रयत्न त्याने केला नाही हा प्रमुख आक्षेप होता. पण त्यात काही अर्थ होता असे वाटत नाही. खरेतर त्याच्या सैन्यात तेवढी ताकदच उरली नव्हती. त्याचे वरिष्ट ज.निक्सन याच्यावर या पराजयाचे खापर फोडण्यात आले कारण त्यानेच टाउनशेंडला कुरनावरून टेसिफॉन ताब्यात घ्यायचा आदेश दिला होता. या युद्धानंतर ले. कर्नल विल्सन यांनी या युद्धाचे विश्लेषण करताना लिहिले “ निक्सन एक प्रामाणिक अधिकारी होते. मंत्रीमंडळाला बगदाद काबीज करण्यात खूपच रस होता हे उमगून त्याने तसे आदेश दिले. हे करताना तो फार मोठा धोका पत्करतोय हे लक्षात येऊनसुद्धा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले व त्याची प्रतिष्ठा पणाला लावली आणि शेवटी ती घालवली.”

कूटच्या युद्धानंतर.
कूटच्या शरणागतीनंतर सगळ्यात महत्वाचा बदल LWC ने केला तो म्हणजे मेसोपोटॅमियामधील सैन्याचा प्रमुख म्हणून ज. स्टॅनले मॉड याची नेमणूक. त्यांच्या अधिपत्याखाली ब्रिटिशांनी त्यांच्या पुरवठा करणार्याम योजनेची पुनर्बांधणी केली आणि ते पूर्ण तयारीनिशी मेसोपोटॅमियाच्या युद्धात उतरले. ज. मॉडला सगळ्यात फायदा झाला तो म्हणजे वेळेच्या उपलब्धेचा. जुलै १९१७ मधे त्याने ही नेमणूक स्विकारली पण त्याने मेसोपोटामियामधील मोहिमेला प्रारंभ केला तो डिसेंबर १९१७ मधे. त्याच्यावर बगदाद काबीज करण्यासाठी कुठलेही राजकीय दडपण नव्हते ना त्याला कुठला वेढा उठवायला जायचे होते. त्याने हा उपलब्ध असलेला काळ त्याच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यात, आणि युद्धसामग्री गोळा करण्यात घालवला. ज. मॉडने या अगोदरचा काळ पश्चिमेच्या आघाडीवर घालवला होता आणि त्याला खंदकयुद्धाचा अनुभव नव्हता. त्याने त्याच्या सैन्यदलाला गनिमीकाव्याने लढण्यासाठी प्रशिक्षित केले. त्याचा रणनीती आखण्यात हातखंडा होता आणि इतर ब्रिटीश सेनानींसारखा तो सैन्याच्या मागे राहून सैन्याचे अधिपत्य करत नसे. तो स्वत: आघाडीवर असे आणि त्यामुळे त्याला त्याच्या सैनिकांमधे अतोनात मान होता व त्याच्या शब्दाखातर ते काहीही करायला तयार होत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सैन्य हे पोटावर चालते या तत्वावर त्याचा ठाम विश्वास होता. युद्ध चालू होण्याअगोदर त्याने युद्धसामग्रीसाठी मोक्याच्या ठिकाणी भांडारे चालू केली आणि तसेच इस्पितळे उभारली. सर्व सैनिकांना आघाडीवर काम केले की या अशा ठिकाणी काम करायची संधी मिळायची. याचा फायदा त्याने फ्रान्समधे बघितला होता. त्याने LWC कडून अधिक तोफा मंजूर करून घेतल्या. अशाप्रकारे तयारी झाल्यावर व त्याच्याकडे ७२,००० सैन्य जमा झाले तेव्हा त्याने मोहीम चालू केली. या मोहिमेत १९१७ च्या फेब्रुवारीमधे ब्रिटीशांनी अल-कूट काबीज केले. तुर्कांच्या विस्कळीत माघारीत त्यांनी बर्यारच तुर्की सैनिकांना युद्धकैदी बनवले. अखेरीस ११ मार्चला बगदाद ब्रिटीशांच्या ताब्यात आले. त्यानंतर त्याच झपाट्यात ज. मॉडने रामादी, बालाद, सामारा, फेलूजा, तिक्रित इत्यादी…. शहरे काबीज केली. ज. मॉडचाही कॉलर्यााने १९१७च्या नोव्हेंबरमधे मृत्यू झाला, पण त्याने जी युद्धनीती आखली होती त्यानुसार आक्रमण होत राहिले ते तुर्कांच्याबरोबर झालेल्या तहापर्यंत. या सगळ्या विजयांमुळे कूटचा पराजय पुसला गेला. ब्रिटीश सैन्याची चुकांमधून शिकण्याची ताकद आणि वेळेनुसार युद्धनीती बदलण्याची त्यांची वृत्तीही जगासमोर आली.
असे हे कूटचे युद्ध. या लढाईत मराठ्यांचा महत्वाचा सहभाग होता व त्यात त्यांनी जी सहनशक्तीची परिसीमा गाठली, ती पाहून जगाने तोंडात बोटे घातली. या युद्धाचा अभ्यास अजूनही जगभर केला जातो.

या युद्धात आमचे एक पूर्वज सुभेदार मेजर लोखंडे (शिवरामपंत कुलकर्णी), त्यांचे मित्र श्री. हसन, व सुभेदार जाधव यांचा सहभाग होता. त्यात श्री. शिवरामपंत आपले नाव चोरून कसे फौजेत भरती झाले (कारण त्याकाळी ब्राह्मणांना फौजेत भरती करून घेत नसत) व त्यांनी या सगळ्या युद्धाची व कूट ते बगदाद ते कसे चालत गेले, त्या भयंकर अवस्थेत त्यांनी काय काय बघितले, अनुभव घेतले व मोडीमधे कसे वर्णन लिहिले, ती पाने कशी सुखरूप हिंदुस्थानात पोहोचवली, त्या पानांचे फोटो व ते कसे सुखरुप गावी परत आले, याबद्दल परत केव्हातरी………..
समाप्त.
जयंत कुलकर्णी

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

One Response to कूटचा वेढा …. भाग ३ – माझ्या आगामी पुस्तकातील ” मराठा लाईट इन्फंट्री” मधे वर्णन केलेले एक युद्ध.

  1. nandan1herlekar म्हणतो आहे:

    उत्तम लेखन! अभिनंदन. कृपया माझ्या ब्लोग वरील लिंक पहावी. इंदिरेचे arials यु ट्यूब वर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s