कूटचा वेढा ….. पहिले महायुद्ध… भाग- १

ब्रिटिशांनी मेसोपोटामियामधे तुर्कांच्या विरूध्द जे युध्द छेडले त्याबद्दल आपण जरा सविस्तर वाचणार आहोत. कारण लढाई कशी करू नये याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. राजकीय शक्तींनी सैन्याच्या कारभारात हस्तक्षेप केला की एखाद्या मोहिमेचा कसा बोजवारा उडतो हे या युध्दातून समजून येते. दुसरे कारण म्हणजे या चुकांमुळे सामान्य सैनिकांचे कसे हाल होतात आणि राजकारणी या बालंटातून कसे सहीसलामत सुटतात हेही या उदाहरणावरून आपल्याला उमगेल. युध्दाच्या रम्य कथा आपण आत्तापर्यंत वाचल्यात पण थोडासा अभ्यासही करावा लागेल कारण आपण एक मतदाता असाल किंवा होणार असाल. आपण निवडून दिलेल्या चुकीच्या लोकांमुळे आपल्या सैनिकांना कशाला सामोरे जावे लागेल हे आपण लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे. उदा. जम्मू काश्मीरमधे आपल्या सैन्याच्यामधे कडमडणारे आपले राजकारणी….. त्यांच्यामुळे किती सैनिकांना मृत्यूमुखी पडावे लागले असेल हे ३०-४० वर्षानंतर बाहेर येईल तेव्हाच कळेल. असो..

मेसोपोटॅमियामधे ब्रिटीशांचा उद्देश पहिल्यांदा हा फक्त त्यांच्या तेलाचा पुरवठा सुरळीत रहावा एवढाच होता. पण त्याचे रुपांतर एका युध्दात केव्हा झाले हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता. अवास्तव व फाजील आत्मसन्मानाच्या आहारी जाऊन ब्रिटीशांनी बगदाद्वर हल्ला करून ते काबीज करायचे आदेश दिले. सुरवातीला मेसोपोटॅमियामधे फक्त एकच डिव्हीजन होती. याच्याकडे तेलाच्या विहिरी आणि तेल शुध्दिकरणाचे कारखाने यांचे संरक्षण करणे व अरबांना आपल्याकडे वळवणे एवढेच काम होते. लंडनमधे लंडन वॉर कॅबिनेटने ही कामगिरी हिंदुस्थानातील त्यांच्या सैन्याला देण्याचे आदेश सोडले आणि हळूहळू भारतातून येथे सैन्य पाठवायचे काम सुरू झाले. ५ नोव्हेंबर १९१४ रोजी ब्रिटीशांनी तुर्कांच्या विरूध्द युध्दाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच ब्रिटिश सैन्याने बसरावर कब्जा केला आणि अबादानच्या बेटावर आपले बस्तान बसवले. त्यामुळे त्या बेटावरचे तेलाचे उत्पादन ब्रिटीशांच्या हाती लागले आणि बसरासारखे एक बंदर. सुरवातीलाच मिळालेल्या या यशामुळे लंडन व भारतात बसलेले सेनानी हुरळून गेले असल्यास नवल नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांना यासाठी पश्चिमेच्या आघाडीवरून कुठलेही सैन्य हलवावे लागले नाही. यावर समाधान मानून ब्रिटीशांनी बसरामधेच ही मोहीम थांबवावी असा निर्णय घेतला खरा पण तुर्कांच्या गनिमीकाव्याच्या हल्ल्यांना कंटाळून ब्रिटीश फौजांनी कुर्ना काबीज केले.

हा विजय मात्र ब्रिटीश राजकारण्यांना पचवता आला नाही. कुर्नाची ही लढाई न थांबवता आक्रमण तसेच पुढे चालू ठेवावे असे आदेश LWC ने दिले. या आदेशाची कारणे राजकीयच होती. त्यासाठी झालेल्या महत्वाच्या चर्चेमधे थातूरमाथूर कारणे देण्यात आली. उदा. अरबांनी ब्रिटीशांच्या गोटात येण्यासाठी हे असले विजय आवश्यक होते…. हा ब्रिटीशांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे….इत्यादि. इ… हा आदेश प्राप्त होताच, जनरल निक्सन याने आपल्या सैन्याला नासिरयेह काबीज करायचा आदेश दिला. त्याप्रमाणे ते २५ जुलैला आणि अल कूट हे २८ सप्टेंबरला काबीज करण्यात आले. यानंतरच बगदादवर हल्ला करायचा आदेश आला आणि या सेनेच्या दुर्दशेला सुरवात झाली.

या आदेशामागची कारणे अनाकलनीय होती. कोणी म्हणे ब्रिटीशांना त्यांच्या गालिपोली येथील पराभवाचे उट्टे काढायचे होते आणि आपला दबदबा परत प्रस्थापित करायचा होता. तर कोणी म्हणे कदाचित तुर्कांनी आपल्या पश्चिमेच्या त्या युध्दभूमीवरचे काही सैन्य मेसोपोटॅमियामधेही हलवण्यासाठी ही चाल खेळली गेली असेल, पण यात बरेच तथ्य होते असे तज्ञांचे मत होते व आहे. कारण अल-कूटला माघार घेण्यात आली त्याच वेळी ही युक्ती फसल्यामुळे गालीपोलीहूनही माघारीची सुरवात करण्यात आली होती. गालीपोलीच्या माघारीमुळे ब्रिटीश जनतेत पसरलेला असंतोष मेसोपोटॅमियामधील विजयामुळे कमी होईल अशीही राजकारण्यांची अटकळ होती. दुर्दैवाने दोन्हीही आघाड्यांवर ब्रिटीशांना पराभव पत्करावा लागला. हे खरे वाटावे याला अजून एक कारण आहे ते म्हणजे ३० एप्रिल रोजी राणीच्या जनरल स्टाफने आपल्या एका पत्रात स्पष्ट म्हटले होते की “सध्या आमचे धोरण हे बचावात्मक असेच आहे. बगदाद किंवा कूट काबीज करण्याची आमची कुठलीही योजना नाही हे ध्यानात घ्यावे. पण नंतर काय माशी शिंकली कोणास ठाऊक, हे धोरण गुंडाळण्यात आले. याच सुमारास ब्रिटीशांची बर्‍याच आघाडीवर पिछेहाट होत होती त्यामुळे सगळ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांना एखादा विजय आवश्यक वाटत होता हे निश्चित.

२८ स्प्टेंबरला इंपिरियल जनरल स्टाफने एका पत्रात त्यांचा स्पष्ट आदेश दिला. “जेव्हा शक्य होईल तेव्हा ब्रिटीशांचे राज्य बगदादमधे स्थापन करण्यात यावे”. हा आदेश मिळाला तेव्हा जनरल मॉड यांनी जनरल लेक यांच्याकडून सूत्रे हातात घेतली होती. (जनरल लेक हे जनरल निक्सन नंतर प्रमुख झाले होते). हा आदेश मिळाल्यावर त्यांच्या सैन्याने मोठ्या तडफेने बगदाद आणि अल-कूटवर ताबा मिळवला. एकंदरीत स्पष्ट आदेश नसणे, एक निश्चित धोरण नसणे व त्यामुळे उडणारे गोंधळ व सैन्याला त्यामुळे सुनियोजित हालचाली करायला वेळ न मिळणे असे सगळे गोंधळाचे वातावरण होते. सैन्याच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट आदेश मागावेत व त्यानंतर राजकारण्यांना बाजूला ठेवावे हे किती महत्वाचे आहे हे या युध्दाच्या अभ्यासातून आपल्याला कळेल.
जनरल निक्सन यांनी बगदाद घेण्याची अवघड कामगिरी जनरल टाऊनशेंड यांच्यावर सोपवली. यांच्या सेनेला लवकरच हे युध्द किती अवघड आहे याची कल्पना आली. अतीटोकाचे उष्ण वातावरण ( १३० फॅ), औषधांचा तुटवडा, कोलमडलेली वाहतुकीची व्यवस्था या सगळ्या अडचणींचा डोंगर त्यांच्यासमोर उभा होता. या अती उष्णतेने बरेच सैनिक आजारी पडले. ज. टाऊनशेंडने म्हटले आहे “ मला वाटले माझे सैन्य आता न लढता या तापमानानेच मरते की काय” . पाण्याचे दुर्भिक्ष तर होतेच. जनावरांना, विशेषत: घोड्यांना पाणी लागतच होते आणि ते मिळण्याची मारामार होती. याच्या उलट नद्यांच्या काठी पुराने हाहा:कार उडाला होता. रस्ते आणि खंदक पाण्याने भरून जात. या सगळ्यात वाहने बंद पडायच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे हालचाली आपोआप मंदावल्या. याच्यावर मात म्हणून नदीतून वाहतूक करायचा निर्णय घेण्यात आला. यातही काही कमी अडचणी नव्हत्या. टायग्रीसचे पाणी आटतही असे. मुख्य म्हणजे टायग्रीस नदीचा उपयोग वाहतुकीसाठी करायचा हे आखलेल्या योजनेत नसल्यामुळे बोटींची संख्याच नगण्य होती. त्यामुळे मालाची, सैनिकांची व जखमी सैनिकांची वाहतूक करण्यात मोठ्या अडचणी आल्या. बरेच सैनिक वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच मृत्यूमुखी पडले. उदा. टेसिफॉनच्या युध्दात अपेक्षेपेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाला.. जवळजवळ ७०% टक्के जास्त.
६-डिव्हिजनकडे फक्त चार रुग्णवाहिका होत्या आणि त्या फक्त ४०० सैनिकांची देखभाल करू शकत. शेवटी जखमींना घोड्यांवरून किंवा खेचरांवरून नदीकिनारी हलवण्यात येत होते. त्यातच त्यांचे दोन दिवस जायचे.

ज. टाऊनशेंड यांना या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती आणि त्यांना तुर्कांच्या लढवय्येपणाबद्दलही काही शंका नव्हती. त्यांच्या डिव्हिजनमधे सैनिकांची संख्याही पूर्ण नव्हती. जेव्हा त्याला बगदादवर हल्ला चढवण्याचा आदेश देण्यात आला तेव्हा कूटचे युध्द नुकतेच झाले होते आणि त्यात झालेली माणसांची हानी अजून भरून काढण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त १०००० लढणारे सैनिक होते. यापैकीच काही सैनिकांची वर्णी इतर कामांसाठी लावण्यात आली त्यामुळे त्याची त्याच्या वरिष्ठांशी अनेकवेळा खटके उडाल्याचे त्याने नमूद केले आहे. त्यातच त्याला मुसलमानांच्या पलटणी परत पाठवायला लागल्या कारण त्यांनी सलमान पाकच्या भूमीवर आक्रमण करायला नकार दिला. (हा सलमान पाक प्रेषित महंमदाचा नोकर होता आणि त्याची कबर टेसिफॉनमधे आहे.) हे सगळे बघता ज. टाऊनशेंडच्या मनात या सगळ्या मोहिमेच्या यशाबद्दल शंका उत्पन्न झाल्यावर त्याने ज. निक्सनला जी तार पाठवली त्यात बगदादवर हल्ला करण्यासाठी अजून एक डिव्हिजन लागेल अशी स्पष्ट मागणी केली. तसेच या आक्रमणचा वेग कमी करण्याबद्दलही त्याने सूचना केली होती. त्यामुळे शत्रूची योजना उघडी पडली असती. पण याच्याकडे साफ दुर्लक्ष करण्य़ात आले आणि त्याला बगदादमधे तुर्कांचे फक्त ५००० सैनिक असून लागल्यास एक डिव्हिजन फ्रान्समधून पाठवण्यात येईल असे कळवण्यात आले. असे उत्तर आल्यावर पुढे वाद घालण्यात अर्थ नाही असे ठरवून तो कामाला लागला.

त्याला हा राजकीय निर्णय अजिबात आवडला नव्हता. त्याने नंतर म्हटले आहे “सरकार हे राजकीय फायद्यांसाठी निर्णयप्रक्रिया राबवते आणि बर्‍याच वेळा लष्कारांच्या डावपेचांचा त्यात बळी जातो. हे असे होऊ देणे योग्य आहे की नाही हे माहीत नाही पण असे झाल्यावर त्या लष्करी मोहिमेचा बोजवारा उडतो हे निश्चित”.

क्रमशः ……
जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s