सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर….. व सरकार.

सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर….. व सरकार.
ज्यांनी ज्यांनी सचिनला सत्यसाईबाबांच्या पार्थिवाजवळ रडताना बघितले त्यांच्या मनात विचारांचे काहूर उठल्याशिवाय राहीले नाही. असेच काहूर माझ्या मनात ज्यावेळी मी अब्दूल कलांमांना त्यांच्या बरोबर पाहीले तेव्हाही माझ्या मनात उठले होते. एवढेच काय जेव्हा जेव्हा तथाकथीत शहाणी सुरती मंडळी या माणसाच्या पाया पडताना मी पहात असे तेव्हाही माझ्या मनात असेच काहूर उठे व मनात असा विचार येई की या लोकांना जे माझ्या सारख्या सामान्य माणसाला कळते आहे ते कसे कळत नाही ? या माणसाबद्दल आज एवढे लिहून आले आहे, त्याच्या प्रत्येक चमत्काराचा पर्दाफाश झाला आहे हे माहीत असून सुध्दा ही माणसे या माणसाला स्वत:चा गुरू कसा काय मानतात ? या सर्व गोष्टींवर मी सर्व बाजूनी विचार केला, म्हणजे सचिनच्या (अर्थात सचिन म्हणजे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून येथे घ्यायचे आहे ) बाजूने, समाजाच्या विविध घटकांच्या बाजूने, शास्त्राच्या बाजूने, तसेच श्रद्धेच्या बाजूने, अर्थात श्रद्धा म्हटले की आपली विचार करायची शक्ती, मन, मेंदू, धर्म, संस्कार यांच्या बाजूनेही विचार आलाच. यात मला माझ्या पूर्वीच्याच एका लेखाचा बराच उपयोग झाला. बघूया यात काय निष्पन्न होते ते…..

ज्या समाजाने सचिनला दुरदर्शनच्या पडद्यावर बघितले त्या समाजाच्या विविध घटकाचे विश्लेषण आपल्याला प्रथम करायचे आहे. म्हणजे हा लेख कोणासाठी आहे हे आपल्याला अधोरेखीत करता येईल. या समाजाचे जे अनेक घटक त्यांची सामाजिक स्थिती, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची भौगोलिक स्थिती या व अशा अनेक बाबींचा आपल्याला विचार करणे अपरिआर्ह आहे कारण आपण अत्यंत आश्चर्यजनक अशा चमत्काराची कारणमिमांसा करणार आहोत. सचिनला ( प्रतिनिधीक) रडू येणे याला मी चमत्कार असे संबोधले आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.

सचिनला रडताना त्यावेळी बंगालमधील कम्युनिस्टांनी बघितले असेल तर त्यांच्या मनात काय भावना आल्या असतील ? कदाचित देव ही संकल्पना त्यांच्या तत्वात बसत नसल्यामुळे त्यांना गुरू वगैरे हे समजणे कठीण गेले असावे. हा ! कदाचित सचिनचा मार्गदर्शक हरपला असे त्यांना सांगितले तर त्यांना त्या घटनेचे महत्व वाटू शकेल. पण मग हा माणूस सचिनचा मार्गदर्शक कसा काय होऊ शकतो हे प्रश्न त्यांना पडल्याशिवाय रहाणार नाहीत. या असल्या प्रकारच्या माणसांसाठी हा लेख आहे का ? हो ! ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडेल त्यांच्यासाठी हा लेख आहे. हे झाले एक एका विचारसरणीचे उदाहरण.

दुसरे उदाहरण घेऊयात. टोकाचे. अती उजव्या विचारांचे जन. या लोकांच्या मनात मला वाटते दोन्ही प्रकारचे विचार येऊ शकतील. १) बघा सचिन सुध्दा या माणसाला मानत होता २) हे कसे काय बुवा ? काहीतरी असेल म्हणूनच सचिन त्याच्या नादी लागला असेल ना. त्यांच्या आश्रमासमोर अंबानी, टाटा बिर्लांसकट सगळ्यांच्या कारच्या रांगा लागलेल्या असतात. ते उगचच का ? ३) पण मग दुरदर्शनवर दाखवलेले खोटे म्हणायचे का ? काही समजत नाही. कशाला धोका पत्करायचा ? एकदा आश्रमात जाऊन आलेले बरे. त्यात नुकसान तर काही नाही.” या प्रकारच्या माणसांसाठी हा लेख आहे का ? हो आहे ! कारण बाबांच्या संपत्तीचा स्त्रोत हा आहे.

समाजाचा अजून एक महत्वाचा घटक आहे ज्याला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे. या घटकाला समजते पण त्याच्याकडे विचार करायला वेळ नाही. त्याचा सारा वेळ दोन वेळच्या अन्नासाठी झगडण्यातच जातो. त्यांच्यासाठी हा लेख आहे का ? नाही ! कारण त्याला आश्रमात गेल्यावर बरे वाटते. अन्न मिळायची शक्यता असते. ते नसेल तर मनाला बरे वाटेल असे वातावरण तेथे निश्चितच असते. त्यांच्या कटकटींनी भरलेल्या जीवनातील हा क्षणिक आनंद हिरावून घ्यायची आमची इच्छा नाही. पण जेव्हा ते या स्थितीतून बाहेर पडतील तेव्हा त्यांना हे प्रश्न पडतील. तेव्हा त्यांनी हा लेख जरूर वाचावा, किंवा ते प्रश्न पडल्यावर ते उत्तरे शोधतील तेव्हा हा किंवा असे अनेक लेख त्यांच्या वाचनात येतील आणि ते त्यांची मते बनवतील, याबद्दल आमच्या मनात बिलकूल शंका नाही

अजून एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे मध्यमवर्ग. जो वाचतो, पसे साठवून पुस्तके विकत घेतो, वाचतो, आपली मते बनवतो आणि ती ठामपणे दुसर्यापच्या गळ्यात उतरावयाचा प्रयत्न करतो. हा घटक तुलनेने समाधानी असतो. विचार करण्याची क्षमता असल्यामुळे व त्यासाठी पुरेसा वेळ असल्यामुळे हा लेख त्यांच्यासाठी निश्चितच आहे.

अजून एक घटक आहे तो म्हणजे इतर धर्मातील लोक. त्यांच्यातील साधक बाधक विचार करण्याची क्षमता बाळगणार्याल जनांसाठी हा लेख निश्चितच आहे. कारण त्यांच्या धर्मातही हा रोग पसरला आहे व पसरणार आहे. आपल्याला काय करायचे आहे ? असा ते विचार करतात पण हे सगळे जवळून पहात असतात, त्यांच्यासाठीसुध्दा हा लेख आहे. आपणही याची अजून फोड करून ठरवू शकता की हा लेख कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही. थोडक्यात ज्याला ज्याला काय योग्य आणि काय अयोग्य, काय चांगले आणि काय वाईट, समाजासाठी काय चांगले आणि काय वाईट याचा त्याच्या त्याच्या कुवतीनुसार विचार करायला वेळ आहे आणि त्यात रस आहे त्यांनी हा लेख पुढे जरूर वाचावा.

मित्रहो पण पुढच्या भागासाठी जरा वेळ द्या…..

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख and tagged , , . Bookmark the permalink.

4 Responses to सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर….. व सरकार.

 1. योगेश म्हणतो आहे:

  काका…पुढच्या भागाची वाट पाहतो आहे 🙂

 2. मनोहर म्हणतो आहे:

  मी गणितात कच्चा आहे याचे कारण गणिती भाषेची लय पकडू शकणारी जाणिवेची तरलता माझ्याकडे नाही. पण म्हणून गणितज्ञ भोंदू ठरत नाहीत. अध्यात्माच्या भाषेबाबतही हाच विचार केला गेला पाहिजे.

  • जयंत म्हणतो आहे:

   मी अध्यात्मात कच्चा नाही कारण त्याचा बर्‍यापैकी अभ्यास मी केलेला आहे आणि म्हणूनच मला भोंदूगिरी ताबडतोब कळते.
   खरंतर आपल्या समाजातील जे धर्माची कास धरतात, अध्यात्माची कास धरतात, अशा धुरिणांचे हे काम आहेत. ते हे काम करत नाहीत म्हणून आमच्या सारख्या सामान्य लोकांना हे काम हाती घ्यावे लागत आहे. याच्यात जर शंकराचार्यांनी लक्ष घातले तर ते काम चुटकीसरशी होण्यासारखे आहे. पण त्यांना कोण सांगणार….. ते सध्याच्या समाजापासून शेकडो कोस दूर आहेत…..
   गणितातली भोंदूगिरीची उदाहरणे दिलीत तर बरे होईल. आणि समजा दिलीत तर त्यांचाही समाचार घ्यावा लागेल.
   🙂
   जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s