अल्कोपाथी व रुद्राक्षाच्या माळा

श्री. देवांना समाजकार्य करायची हौस फार ! समाजकार्य करायची सगळ्यात सोपी पध्दत म्हणजे पत्रकारिता करणे असा त्यांचा दृढ समज झाल्यामुळे ते त्यांचा कॅमेरा गळ्यात अडकवून सगळीकडे मिरवायची हौस पुरवून घेत असतात. त्यासाठी त्यांनी एक बनावट वर्तमानपत्राचा खास बनावट बिल्ला एका बनावट छापखान्यात छापून घेतला आहे. हा बिल्ला आणि त्यांचा कॅमेरा वापरून त्यांनी अनेक सभा, कार्यक्रमाचे वृत्तांत तयार केले व विविध वर्तमानपत्रांना व मासिकांना पाठवले पण छे ! कोळशाच्या खाणीत जोपर्यंत हिरा असतो तोपर्यंत तो कोळसाच असतो हेच खरे. पण त्यांनी नुकताच एका धर्ममार्तंडाच्या सभेचा वृत्तांत लिहिला आणि त्या कोळशाचा हिरा झाला. तो चक्क एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात छापून आला आणि त्यांच्या या वृत्तांतावर वाचकांच्या उड्या पडल्या. प्रतिक्रियांचे तर विचारूच नका. त्यांचा सर्व्हर शेवटी ढपला.

तो हा वृत्तांत –
आम्हाला सोनेरी रंगाचे एक पेय प्राणाहूनही प्रिय. बरोबर ! त्याचे नाव बियर ! आता थोरामोठ्यांचे अनुकरण करावे या आपल्या समाजाच्या अत्यंत वंदनीय अशा नियमाप्रमाणे आम्ही गळ्यात कॅमेर्‍याच्या बरोबर रुद्राक्षाच्या माळा व तोंडात बिअरचे कौतुक अशा अवस्थेत हिंडत असतो हेही खरेच. आमच्या हातातही आम्ही तसल्या माळा घातल्या होत्या पण एका भगव्या झेंड्याखाली उभ्या असलेल्या सज्जन माणसांनी आम्हाला त्या माळांबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या सांगितल्याबरोबर आम्ही त्या काढून त्यांच्या स्वाधीन केल्या. माळ घालणे व हातात माळा घालणे याच्यातला फरक त्या दिवशी आम्हाला चांगल्याच प्रकारे समजावून सांगण्यात आला. असो. त्यांच्या हातापाया पडून आम्ही आमचा कॅमेरा कसाबसा मिळवला आणि आम्हीही त्याच दिवशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली “ आयुष्यात कधीही माळ घालणार नाही. पण एक दिवस हातात माळा घालणार” या आमच्या भीष्मप्रतिज्ञेमुळेच आम्ही त्या सभेचा वृत्तांत लिहू शकलो. आम्ही हातात त्या माळा घालू शकलो का नाही हे आपल्याला यथावकाश कळेलच.
अर्थात भगवा झेंडा दिसला की आम्ही रस्ता बदलायचो, म्हणजे त्या फूटपाथवर भगवा रंग दिसला की आम्ही अलिकडच्या फूटपाथवर ! तोंड चुकवायचो, पण आम्ही धीर सोडला नाही. भगव्या वस्त्रांचे आम्हाला लहानपणापासूनच आकर्षण. या रंगाचे आम्हाला फार म्हणजे फार कौतुक वाटते. देवाने हा रंग जन्माला घालताना सगळ्यात जास्त कष्ट केले आहेत असे आमचे ठाम म्हणणे आहे. नाहीतर धड लाल नाही धड पिवळा नाही, असा रंग आमच्या ओशो सरांना का आवडला असता बरे ? आम्हाला तर त्यांच्या आश्रमाच्या अवतीभवती हिंडायचे पहिल्यापासून वेड ! त्यांनी कायमची समाधी घेतल्यावर त्यांच्या गोर्‍या शिष्या कमी झाल्या तशा आमच्या त्या गल्लीतल्या चकरापण कमीच झाल्या म्हणा. पण अधूनमधून आमचे पाय आपोआपच तिकडे वळतात. त्या दिवशी (मे महिन्यातली रणरणत्या उन्हाची दुपार) आम्ही असेच ग्रॅंडमधून भर उन्हात बाहेर पडलो. तेथे आम्ही दुपारी काय करत होतो हे पुणेकरांना सांगायला नको. कॅमेरा बरोबर होताच. गळ्यात आमचा बोगस बिल्ला, व डोळ्यावर गॉगल असा आमचा वेष असल्यामुळे आमची पावले आपोआप ओशोसरांच्या आश्रमाकडे वळली. आम्हाला तेथे प्रवेश नव्हताच त्यामुळे आम्ही तसे डुलत डुलत चाललो होतो. ग्रँड्मधून तसे चालता येत नसेल तर बाहेर पडायला मना आहे. पण आम्हाला काही तो आश्रम सापडत नव्हता. चार चकरा मारल्या पण छे ! ग्रॅंडची कमाल म्हणावी तर तेथे तसे अचाट काही केलेलेच नव्हते. नेहमीप्रमाणे ५/६ च ! पण आज आश्रमाची पाटी नाही, भगव्या कपड्यांची ये जा नाही, चायला काय झालंय काय आज ? नेहमीच्या जागेवर दुसरीच पाटी दिसत होती. हे विचार आमच्या मनात घोळू लागले तेवढ्यात आमचे जमिनीवरचे पाय सुटले आणि आम्ही हवेत उचलले गेलो. त्यानंतर आमचे डोळे बांधण्यात आले. दोन तीन मिनिटांनी आम्हाला एका ठिकाणी आपटण्यात आले. काय बावळट लोक आहेत, आम्हाला सांगितले असते तर आम्ही तसेही आलो असतो की. पण असो. आपटल्या आपटल्या आमच्या तोंडून एक भला मोठा ढेकर बाहेर पडला. तो ऐकताच, आम्हाला सन्मानाने एका चांगल्या बैठकीवर बसवण्यात आले. हा कशाचा चमत्कार असावा हे काही आमच्या त्यावेळी लक्षात आले नाही पण थोड्याच वेळात त्याचाही उलगडा झाला. जडावलेले डोळे उघडून बघितले तर आम्ही एका भल्या मोठ्या मंडपात येऊन पडल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्वरेने आमचा कॅमेरा घेऊन त्या मंडपाचा फेरफटका मारला. जे आम्ही बघितले त्यावरून समाजाच्या उध्दाराची कळकळ किती उच्च स्तरावर पोहोचली आहे याची खात्री पटून आमचा ऊर अभिमानाने भरून आला आणि आमच्या डोळ्यात पाणी दाटून आले.

मंडपाचे अनेक भाग होते. पहिल्याच भागावर मोठी पाटी मोठ्या दिमाखाने झळकली होती.
“ Non-Alcoholic Anonymus “ हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमचा कॅमेरा सरसावून आत शिरलो. एका छोट्या व्यासपीठावर एक अत्याधुनिक माईक आणि त्याच्या मागे महाराजांचे भव्य चित्र लावण्यात आले होते. नुकतेच कोणाचे तरी भाषण संपले होते. तेवढ्यात उद्घोषणा झाली.
“आता आपल्या नीरस आयुष्याचे अनुभव कथन श्री. भालचंद्र विनायक तळीराम उर्फ गुलाब महाराज करतील.”
मागच्या रांगेतून एक भगवा रेशमी झब्बा घातलेला साधारणत: पन्नाशीचा माणूस ऊठला आणि त्या माईकच्या दिशेने जाऊ लागला. अच्छा ! हेच का ते दारूबंदीचे कार्यकर्ते भा वि तळीराम ! त्यांना बघताच तेथे एकच गोंधळ उडाला. साक्षात गुलाब महाराजांना तेथे बघून बर्‍याच लोकांना जागेवरच भोवळ आली आणि त्यांना तत्परतेने स्ट्रेचरवरून हलवण्यात आले. त्यातल्या एका स्वयंसेवकाला मी याबाबतीत विचारल्यावर त्याने अत्यंत अभिमानाने उत्तर दिले “ महाराजांनी आम्हाला तयार रहायला सांगितलेच होते कारण या महासंमेलनात असे अनेक धक्के बसणार याची त्यांना कल्पना आहे. आमच्या प्रथमोपचार केंद्राला आपण जरूर भेट द्या. देश विदेशातील प्रख्यात दारू उद्यओगांच्या डॉक्टरांनी महाराजांच्या प्रेमापोटी येथे हजेरी लावली आहे.” आमच्या उच्च रक्तदाबासाठी याचा काही फुकट उपयोग करू घेता येईल का हा विचार करत आम्ही श्री. गुलाब महाराजांच्या अनुभव कथनाकडे लक्ष देऊ लागलो.
गुलाब महाराज त्या माईकसमोर कसेबसे उभे राहिले आणि त्यांच्या हातातला माईक खाली पडला. तो उचलण्यासाठी ते खाली वाकले ते उठलेच नाहीत. शेवटी त्यांना उभे करून धरुन ठेवण्यात आले. ते काय बरळत होते ते काही कळत नव्हते, पण जे काही शब्दबोधामृत आमच्यापर्यंत पोहोचले त्यातून आम्हाला खालील अर्थबोध झाला आणि आम्ही भारावून गेलो. ते म्हणाले ’ आत्तापर्यंत आम्हाला जे काही साक्षात्कार झाले त्यात सगळ्यात सुंदर आणि महत्वाचा साक्षात्कार आम्हाला महाराजांचे शिष्यत्व पत्करल्यावर झाला हे कबूल करायला आम्हाला आजिबात लाज वाटत नाही. गेली अनेक वर्षे आम्ही विविध प्रकारचे मद्य आमचे सगळे भक्तगण गेल्यावर गुपचुपपणे आमच्या खोलीत बसून पीत असू. पण महाराजांनी आम्हाला जी दिक्षा दिली त्यामुळे आमचे डोळे क्षणात उघडले व आता आम्ही आमच्या मित्रांच्या व भक्तांच्या संगतीत आनंदाने विविध मद्याचा आस्वाद घेत फिरत असतो. एवढेच काय, शंकर महाराजांचा आदर्श समोर ठेवून आता आम्ही आमची पाद्यपूजा करताना आमच्या भक्तांनी उंची शॅंपेनच वापरावी असा आदेशच काढला आहे. पूर्वी आम्हाला सतत कसली तरी काळजी वाटायची व आमच्या स्वप्नात सतत हडळी यायच्या. आता आमच्या स्वप्नात सुंदर अप्सरा येतात. हा चमत्कार महाराजांमुळेच……” हे एवढे बोलणे होत आहे तेवढ्यात गुलाबू परत खाली कोसळले. ते आता अती आनंदाने बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत हे ओळखून स्वयंसेवकांनी त्यांची तेथून त्वरित उचलबांगडी केली. ते दृष्य तर फारच मजेदार ! एखादी नौका समुद्रात हेलकावे खावी तसे ते चार स्वयंसेवक व त्यांच्या हातात असलेले महाराज हे एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला असे हेलकावे खात चालत होते. मधेच गुलाबूमहाराज किंचाळत होते तर स्वयंसेवक महाराजांचा गजर करत होते. त्यांनी तो दहा फुटी रस्त्याचा समुद्र धडपडत पार केला आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आता पुढचा नंबर कोणाचा अशी उत्सुकता आमच्या मनात होतीच. तेवढ्यात एक मोठा घोळका माईकच्या दिशेने येताना दिसला. त्यांच्या खाकी अर्ध्या चड्ड्या आणि काळ्या टोप्या बघून आम्ही तर हादरलोच. हे येथे, संमेलन उधळायला वगैरे आले आहेत की काय असे वाटून आम्ही पळायच्या बेतात होतो तेवढ्यात त्या घोळक्याला स्वयंसेवकांनी आडवले व त्यांच्यापैकी एकालाच त्या सगळ्यांच्या तर्फे बोलायला सांगितले. थोडीशी हाणामारी होऊन त्यातला जरा वयस्कर वाटणार्‍या शाखाप्रमुखाने तो माईक हातात घेतला “ मल्ल्याबाबा महाराज की जय ! चक दे इंड्या ! असे ओरडत त्याने आपले क्रांतीकारक विचार मांडले.
“दक्ष ! नीट द्या लक्ष ! आम्ही लहानपणापासून या पेयांच्या फायद्याविषयी ऐकत आलेलो आहोत. पण आमच्या घरच्यांच्या दबावाखाली आम्ही या थोर आनंदापासून वंचित राहिलो. आमचे तीर्थरूप स्वत:मात्र चोरून या पेयांचा आस्वाद घेत असताना आम्ही अनेकवेळा पाहिले आहे. आता मात्र आम्हाला राहवत नाही म्हणून आम्ही सगळी बंधने तोडून आमच्या आयांना चकवून येथे पळून आलो आहोत. आमचे प्रमुख आम्हाला यापासून आता रोखू शकत नाहीत. आम्ही प्रतिज्ञा करतो की या क्षणापासून आम्ही या बियर क्रांतीत भाग घेत आहोत.” असे त्वेषाने ओरडून त्याने हातातली बाटली संपवली व शुभशकून म्हणून तेथे एक नारळ फोडायला जसा दगड असतो तशाच दगडावर हातातली बाटली फोडली. त्या आवाजाबरोबर आख्या मंडपातून तसे आवाज घुमले आणि महाराजांचा जयजयकार झाला. हे ऐकल्यावर तेथे काही भगिनी होत्या त्या एकदम गाणी गायला लागल्या. त्याची चाल मै छोडके सारी लाज …..की घुंगरू टूट गये या गाण्याशी मिळती जुळती होती. नंतर कळले की ती महाराजांची प्रार्थना होती.
आता पुढे काय असा आमच्या मनात विचार येताच आम्ही “खंड्या निळा प्रिमियम” नावाची बाटली तेथेच ठेवलेल्या एका बादलीतून उचलली व तोंडाला लावली व एका दमात रिकामी करून खाली फोडली. त्याबरोबर दोन चार स्वयंसेवक धावत आले. आता मार पडणार असे वाटून आम्ही खाली बसलो तर त्यांचा प्रमुख म्हणाला “ साहेब लाजू नका. या मंडपात १००० स्वयंसेवकांना फक्त काचा गोळा करायचेच काम दिलेले आहे. त्यातून जे स्वयंसेवक बियर पिऊन पडतील त्यांना उचलायचे काम अजून ५०० जणांना देण्यात आलेले आहे. आपण फक्त जरा बाजूला व्हा !” जाताना त्यांनी न विसरता “सिंग किसर स्ट्रॉंग” ची बाटली आमच्या हातात दिली. ते ऐकून व ती बाटली रिचवून आम्ही परत ताठ मानेने त्या मंडपात वावरू लागलो. आता या मंडपाची शोभायात्रा पुरे असे वाटून आम्ही तेथून निघणार तेवढ्यात आम्हाला तेथे एक फाटका तरूण हातातले कागद फडकावत तीव्र स्वरात वेड लागल्यासारखा ओरडत असलेला दिसला. या सगळ्या गोंधळात तो काय ओरडत होता हे समजणे शक्यही नव्हते म्हणा. अधिक चौकशी केल्यावर त्याला सनातन प्रभातमधून भाड्याने आणलाय असे समजले. हे का ? असे विचारल्यावर आम्हाला फार मजेदार उत्तर मिळाले. या सगळ्या कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून ती बाळाच्या गालावरची तीट आहे असे सांगण्यात आले. या महासंमेलनावरच्या गालावरची ही बाळतीट आम्हाला फारच आवडली. आमची तर या मंडपातून जायची तयारीच नव्हती पण मागून येणार्‍या लोंढ्यामुळे आम्ही आपोआपच पुढे ढकलले गेलो.
या पुढच्या मंडपात तर अतोनात गर्दी उसळलेली दिसली. बर्‍याच कॉट टाकलेल्या दिसल्या. व्वा ! व्वा ! रक्तदानाचा कर्यक्रम दिसतोय. एवढी गर्दी असेल तर भारताची एका दिवसाची रक्ताची गरज भागणार असे समजून आमचा ऊर आभिमानाने भरून आला व मन आदराने दाटून आले. पण थोडे पुढे जातो तर सगळ्या बिछान्यावर तमाम स्त्रीवर्ग पसरलेला होता. हा भेदभाव का व कशासाठी असे आम्ही तावातावाने तेथल्या डॉक्टरांना विचारले तर त्यांनी आमच्याकडे विचित्र नजरेने बघितले. ती नजर बघून आम्ही त्यात विरघळून गेलो. पूर्ण विरघळायच्या आत आपले भांडण पुरे करावे हा पुणेरी विचार करून आम्ही परत एकदा तावातावाने त्यांना विचारले “ रुग्णांना पुरूषांचे रक्त हल्ली चालत नाही की काय ?” त्यावर त्यांनी आमची कीव करत आम्हाला समजुतीने चार गोष्टी सांगितल्या त्या तर फारच धक्कादायक होत्या. त्या कॉटवरून उठणार्‍या एका भगिनीला आम्ही मुलाखात देणार का? असे विचारल्यावर आपले केस उडवत त्या म्हणाल्या “ इश्य ! त्यात काय, देऊ की. चला ग यांची मुलाखत घेऊया !” असे म्हणताच १०-१५ भगिनींनी आम्हाला गराडा घातला. आमच्या मुलाखतीतील काही प्रश्नोतरे आपल्यालाही रोचक वाटतील.
आम्ही: आज रक्तदान केल्यामुळे आपल्याला बरे वाटत असेल नाही ?
त्या : इश्य ! अहो हे रक्तदान नव्हते काही.
आम्ही (बावळटासारखे): मग ?
त्या: ( तोल सावरत. अरे! रे! सावरला की त्यांनी तोल !) “अहो ज्यांना “त्याचा” वास आवडत नाही ना त्यांना ते शिरेतून द्यायची सोय आहे येथे.”
“त्याचा” म्हणताना त्या अगदी नवर्‍याचे नाव घेताना लाजतात तशा लाजल्या.
आता पुढे “ इकडून शिरेतून जाणे झाले आणि आमचे डोके अगदी हलके झाले बघा” असं ऐकायला मिळणार की काय असे आम्हाला वाटले.
या मंडपात एवढी प्रचंड गर्दी का ? याचा उलगडा आम्हाला आत्ता झाला. त्या सर्व भगिनींना वंदन करून आम्ही कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. आमचा जीव आता तहानेने व्याकूळ झाला होता. पण त्या आख्या जागेत पिण्याच्या पाण्याचा एक थेंब दिसेल तर शप्पत. आता काय करावे … असा विचार करत असतानाच त्या सभामंडपात एकदम शांतता पसरली. प्रत्यक्ष महाराजांचे आगमन होत होते. अहाहा काय ते तेज ! घोड्यांच्या शर्यतीचा मोसम असल्यामुळे त्यांचे आगमन खास घोड्यावरून करण्यात आले होते. तो तगडा पांढराशुभ्र घोडा आणि त्यावर आपले उघडबंब महाराज ! व्वा ! मला अगदी नवरात्रीची आठवण झाली. देवी नाही का वेगवेगळ्या वाहनांवरून येते ! आपल्या धर्माच्या परंपरा जपायची एवढी कळकळ बघून आम्ही अगदी भारावून गेलो. नाहीतर हल्ली कोणाला पडलंय हो एवढे धर्माचं ? तेवढ्यात आकाशवाणी झाली.
“कृपया शक्य झाल्यास शांतता बाळगावी. अर्थात आपले इतर कार्यक्रम चालू ठेवण्यास काहीही हरकत नाही. फक्त थोडेसे लक्ष इकडेही द्यावे. या कार्यक्रमाचा सगळा खर्च युनायटेड दारू लिमिटेडने केला आहे हे कृपया लक्षात ठेवावे.”
ते ऐकताच प्यायलेल्या दारुला जागून बहुतेकांनी आवाज बंद केला. अर्थात बाहेर हाकलले जाण्याची सूप्त भितीही मनात होतीच. सगळ्यांनी पटापट मिळेल त्या जागा व्यापल्या. व्यापल्याच म्हणावे लागेल कारण कोणालाही कसेही बसायची परवानगी नाईलाजाने देण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे महाराजांनी आज एकदम प्रश्नोत्तराचाच कार्यक्रम चालू केला. बहुदा त्यांची झोपलेल्या श्रोत्यांसमोर भाषण करायची मानसिक तयारी नसावी. बर्‍यापैकी शुध्दीवर असणार ते !

श्रोत्यांमधे २००/३०० माईक घेऊन स्वयंसेवक व स्वयंसेविका अडखळत, तोल सावरत फिरत होत्या, मधेच धडपडत होत्या, लोकांना तुडवत होत्या पण कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. प्रश्नोत्तरे अर्थात वाघिणीच्या दुधातून आणि राष्ट्रभाषेत चाललेली होती. दैनिक मद्यरात्रच्या वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ती खास मराठीतून देत आहोत. वाचा फक्त मद्यरात्रीत ! ( हे आम्हाला दूरदर्शनच्या बातम्यावरून सुचलेले आहे.) असो !

महाराज : आपण मागच्यावेळी सोमरस विद्यापीठात संशोधित झालेल्या एका अस्सल भारतीय उपचार पध्द्तीचे काय काय फायदे आहेत हे बघितले. बाळा, ( महाराज एका वृध्दाकडे बोट दाखवून व जबडा फाकून हसत, म्हणाले ) सांगतोस का नाव त्या उपचार पध्दतीचे ?
श्रोता : कोण विसरेल त्याचे नाव ? “अल्कोपाथी” महाराज.
म : बरोबर ! आपण हे ही बघितले की अल्कोपाथीने १० मिनिटात चेहर्‍यावरचे फोड, माईटस्‌ची एलर्जी, १ तासात जखमा, एलोपिसीया, एमियोट्रोफीक लॅटरल सेरोसिस, २ तासात अरिथ्रायटीस, तेवढ्याच वेळात एबडोमिनल एओर्टीक एनिरिझम, एन्थ्रॅक्स, एंजिना, धमन्यातील चरबीचे विघटन, बेल्स पलसी, पाठीचे दुखणे, कॅटॅरॅक्ट, सी.ओ.पी. डी, ३ तासात भाजलेल्या जखमा, हर्पेस, तर एका दिवसात ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, कोलोन कॅन्सर, इत्यादि इत्यादि इत्यादि…. बरे करू शकतो. हे असताना परदेशी कंपन्यांची औषधे वापरून आपण आपला घामाचा पैसा कुठे पाठवतो ऽऽऽऽऽऽऽ…………?
सगळे श्रो. एका सुरात: “परदेशात”
म : याची गरज आहे का ?
स.ग.श्रो.ए.सु : नाहीऽऽऽऽऽऽऽऽऽ.
म. : त्या बाईंना जरा माईक द्या. हं बोला बाई. घाबरू नका. सांगा आपला अनुभव.
बाई : महाराज आपल्या या उपचार पध्द्तीने माझे सगळे आजार बरे केले. मी आता आनंदाने माझे आयुष्य जगत आहे. महाराज ही आपलीच कृपा आहे. बरं याचे साईड इफेक्टही काही नाहीत. फक्त एकच – तो म्हणजे झोप. मला खात्री आहे तोही लवकरच दूर होईल.
म: आणि आपली आपल्या नवर्‍याशी सतत होणारी भांडणेही थांबली असतील.
बाई : इश्य ! असे काय हो महाराज, आता आम्ही दोघेही अल्कोपाथीचे उपचार करतो ना एकामेकांवर !
म: आवरते घेत… मागच्या वेळी आपण अल्कोपाथीतील अनेक औषधांचा वापर बघितला..
श्रो.: महाराज महाराज…..
म. : बोला, बोला. असे पुढे या. बोला…..
श्रो. : महाराज जय हो ! आपल्या कृपेने मी अल्कोपाथीचा दवाखाना काढला आणि मी आता आमच्या क्षेत्रातील सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा वजनदार माणूस आहे. ही आपलीच कृपा. या उपकाराची फेड म्हणून महाराज आपल्या स्कॉटलंड मधल्या जमिनीत मी रग्गड पैसे घातले आहेत.
म( जबडा फाकवत) : धन्यवाद. आपण मला जरा नंतर येऊन भेटा. तर मित्रहो, मैत्रिणींनो ( हे म्हणताना त्यांचा डावा डोळा जरा मिचकावल्यासारखा वाटला मला), सज्जनहो, दुर्जनहो, सर्वांनो, या अती प्राचीन पण दुर्लक्षिलेल्या उपचार पध्दतीचा आपण आज सर्वजण वापर करत आहोत ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे औषध किती घ्यायचे याचे काहीही प्रमाण नाही हे आपल्याला माहिती आहेच. कितीही प्या…..
श्रो : महाराज काही वेळा आम्ही हे औषध दुपारी प्यायला चालू करतो ते रात्री थांबवतो. याने काही अपाय तर नाही ?
म: आपण येथे आहात यातच याचे उत्तर आहे. नाही का ?
(मंडपात हास्याचे फवारे. कशी जिरवली, काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय अशा तर्‍हेचे उद्‌गार.)
श्रो.: महाराज, जय हो. माझे ध्यान करताना गोठलेल्या अस्वलाची आठवण येऊन सारखे चित्त विचलीत होते. मी काय करु ?
म.: बालका, तू ध्यान करताना पिऊ नकोस तर पीत असतानाही ध्यान कर. यातला मुलभूत फरक जाणून घे. यात तुला प्यायची मुभा आहे पण ध्यान करताना विचारशील तर अल्कोपाथीला बंदी आहे. हा सूक्ष्म फरक ज्याच्या लक्षात आला तोच पूर्णत्वाला पोहोचला.
श्रो.: धन्य हो महाराज धन्य हो. आपली शिकवण मी तन मन धन वारून अंमलात आणीन.
म: ( चुकून बोलून गेले. कारण त्यांनी जिभ चावलेली आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही ) ते लागेलच !
तेवढ्यात त्या महासभेच्या कोपर्‍यात थोडीशी गडबड उडाली. त्याबरोबर बरेच स्वयंसेवक तिकडे धावले.
म: त्यांना अडवू नका. अडवू नका. अल्कोपाथीसमोर सर्व समान आहेत. एका पातळीवर आहेत. मी त्यांच्यात ते माझ्यात आणि “सिंग किसर” सगळ्यांच्यात अशी ही एकात्मता आहे. (हे बोलताना महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले.) बोल, बालका बोल !
श्रो: महाराज मी समस्त आखिल भारतीय अल्कोपाथी क्लबतर्फे आपले आभार मानतो. आपल्यामुळेच आमच्या परमपूज्य बापूंचा चष्मा व काठी भारतात परत आली. आम्ही आता आपले आभार मानण्यासाठी येणार्‍या वर्षात आठवड्यात एकदा सर्व प्रमुख शहरात “बियर मॅरॅथॉन आयोजित करायचा संकल्प सोडला आहे. त्याचे काम आम्ही सगळ्यांनी श्री. मरेश तडमाडी यांना द्यायचे ठरवले आहे. आपली काही हरकत तर नाही ना ? फूल ना फुलाची पाकळी म्हणून याचा स्विकार करावा.
म: सुंदर ! सुंदर ! कल्पना. तडमाडी तर आमचा खास माणूस. ते मधे असल्यास आपली मुक्ती अटळ आहे. असे झाले तर आम्ही छत्रपतींची तलवारही परत आणू. यासाठी मी आपणास सुचना करतो की ही मॅरॅथॉन आठवड्यात दोनदा करावी……
हे ऐकल्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तो थांबेचना. समस्त श्रोतृवर्ग बेफाम होऊन नाचू लागले. व त्याच वेळी भगिनींनी प्रार्थना चालू केली. त्याची चाल….. बरोबर… !
इकडे व्यासपीठावर महाराज ज्या आसनात गेले होते त्या आसनातून त्यांना बाहेर यायला जमेना कारण हे सगळे चालू असताना त्यांचे आचमन चालूच होते. हाताचे कडबोळे आणि त्यात पायांची पुरचुंडी अशा अवस्थेत ते बराच वेळ उभे होते व शेवटी जमिनीवर कोसळले.

आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही जमिनीवर तसे आडवेच झालो होतो. अर्धवट झोपेत आम्ही महाराजांकडे शेवटचे पाहून घेतले, मनोमन त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि एका निर्वात पोकळीत विलीन झालो.”

वृत्तांत समाप्त.

या वृत्तांतानंतर दुसर्‍या दिवशी आम्हाला बंगळूरूहून बोलावणे आले. सोबत विमानाचे तिकीट व एक भली मोठ्ठी पेटी. त्यात काय होते हे जाणकारांनी ओळखले असेलच. या भेटीदरम्यान आमचा सत्कार बियरह्रदयसम्राटांच्या हातून करण्यात आला. खुष होऊन त्यांनी विचारले
“स्वामींनी आपले बरेच कौतुक केले आहे, बोला काय देऊ आपल्याला”
“महाराज आपल्यासारखे हातात रुद्रक्षाच्या माळा घालण्याची परवानगी” आम्ही हजरजबाबीपणे उत्तर दिले.
बराच वेळ शांततेत गेला. साहेबांच्या मनातली उलघाल व तडफड आम्ही समजत होतो. पण आम्ही त्यांच्याच बाण्याचे, हटलो नाही.
एकदाचे त्यांच्या तोंडून ते अमृत बाहेर पडले –
“”तथास्तु !”

या कथेतील सर्व पात्रे, घटना इ. काल्पनिक आहेत. कोणालाही कसलेही कशाशीही केव्हाही साम्य आढ्ळल्यास तो योगायोग समजावा. ही कथा वाचल्यावर हसू न आल्यास लेखक जबाबदार नाही.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s