कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

ही गोष्ट वाचल्यावर आपल्या न्यायसंस्थेविषयी आणि राज्यसंस्थेविषयी काय भाष्य़ करावे हेच कळत नाही. अर्थात या थोर संस्थेविषयी भाष्य करायची आपली पात्रताही नाही म्हणा. तेव्हा आपण ही कहाणी, एक कहाणी म्हणून वाचूया आणि सोडून देउया हे बरं!

ही गोष्ट आहे एका भारतीय नौदलातील पारशी कमांडरची. त्याचे नाव होते कावस मानेकशॉ नानावटी. हा एक उमदा, अत्यंत देखणा, गोरापान व अत्यंत उच्च दर्जाची नौदलातील कामगिरी असलेला असा अधिकारी. त्याच्या व्यक्तिमत्वात त्याच्या नौदलाच्या नोकरीने अजूनच रुबाबदारपणा उतरला होता. चालण्या बोलण्यात एक प्रकारची आदब व स्त्रियांबरोबरची अत्यंत मार्दव असलेले वागणे त्यामुळे या असल्या देखण्या, गोर्‍यापान सहा फूट उंच असलेल्या तरूणाच्या प्रेमात कोणी सुंदरी पडली नसती तर नवलच. आपले कृष्णमेनन जेव्हा इंग्लंडला भारताचे हाय कमिशनर म्हणून होते तेव्हा त्यांच्या कार्यालयात कावस हा मिलिटरी अटॅची म्हणून होता. त्याचदरम्यान त्याची ओळख सिल्व्हिया नावाच्या एका ब्रिटीश सुंदरीशी झाली आणि त्याचे रुपांतर नेहमीप्रमाणे प्रेमात झाले. लवकरच कावसला परत भारतात यावे लागले आणि त्यांनी अत्यंत साध्या पध्दतीने रजिस्टर मॅरेज करायचा निर्णय घेतला. ते करून ते भारतात आले. कावस स्वत:ला भाग्यवान समजत होता. आणि का समजू नये ? दुसर्‍या महायुध्दातील चांगली कामगिरी – इटली मधील एन्झीयो येथील सैन्य उतरवण्याच्या त्याच्या कामगिरीने मिळणारा बहुमान, जो सगळ्या फौजेतल्या लोकांचा जीव का प्राण असतो, त्यामुळे भारताच्या त्यावेळेच्या सगळ्यात महत्वाच्या नौकेवर सेकंड ऑफिसरची नोकरी, सुंदर बायको, मुंबईत रहायला सुंदर मोठे घर, सरकार दरबारी वजन, अजून काय पाहिजे होते ? नंतर दोन देखणी मुले व एक सुंदर मुलगीही झाली. आणि हे सगळे वयाच्या फक्त ३७ व्या वर्षी. पण २७ एप्रिल १९५९ या दिवशी हे सगळे उलटे पालटे झाले.

कावसला नोकरी निमीत्त बर्‍याच काळ बाहेर रहावे लागे. २७ एप्रिलला तो असाच त्याच्या सुट्टीतला एक चांगला मस्त दिवस होता. पण काहीतरी चुकत होते. त्याने स्सिल्वियाला विचारले “ माझ्यापासून तू आज एवढी दूर दूर का ? काय झाले आहे ?” याचे काही उत्तर मिळाले नाही. दुपारी जेवणानंतर त्याने स्पष्टच आपल्या बायकोला विचारले “माझ्या लक्षात आले आहे, तुझे माझ्यावर पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही. तू दुसर्‍या कोणच्या प्रेमात पडली आहेस का ? प्रेम आहूजाच्या ?”
सिल्व्हियाला याचे उत्तर द्यावेच लागले आणि तिने ते न घाबरता दिले.
“हो मला आता तुझ्याबरोबर राहता येईल असेल असे वाटत नाही. माझे मन प्रेममधे गुंतले आहे.”
“ठीक आहे, झाले, गेले ते विसरून जाऊ” शांतपणे कावसने उत्तर दिले. ना त्याच्या चेहर्‍यावर राग होता ना खेद. फक्त डोळ्यात मात्र उदासी होती.
असं कसं झालं ? या माणसाला राग का आला नाही ? का आला होता, पण त्याने तो आतल्याआत दाबून ठेवला होता आणि पुढे काय करायचे ते शांतपणे ठरवले होते ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
संध्याकाळी मेट्रोमधे सिनेमाचा बेत होता. कावसने जाण्यास नकर दिला पण बायकोला आणि मुलांना सोडायला आणि आणायला त्याची तयारी होती. सिल्वियाला वाटले असणार की साहजिकच आहे. थोडासा राग तर आलेलाच असणार ! कावसने शांतपणे बायको मुलांना मेट्रोवर सोडले त्यांचा निरोप घेतला आणि त्याने प्रेम आहूजाच्या ऑफिसचा रस्ता धरला.

हा प्रेम आहूजा नानावटी कुटुंबाचा मित्र असला पाहिजे. कारण असे म्हणतात कावसची आणि त्याची गेले १५ वर्षे मैत्री होती. त्याची (अहूजाची) बहीणपण या सगळ्यांना ओळखत होती. हा सिंधी तरूण श्रीमंत होता आणि छानछोकीच्या आयुष्याचा शौकिन होता. क्लबमधे रोज संध्याकाळी जाणे तेथे सुंदर पण एकलकोंड्या स्त्रियांना हेरायचे, त्यांच्याशी मैत्री करायची हा त्याचा छंदच होता. अशाच एका संध्याकाळी त्याला सिल्व्हिया क्लबमधे एकटीच उदास बसलेली सापडली आणि त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. प्रकरण फारच पुढे गेले. लग्नाच्या आणाभाकासुध्दा झाल्या. पण नंतर तिच्या लक्षात आले की प्रेम लग्न करायचे टाळतोय. शेवटी असे ठरले की एक महिना प्रेमाची परीक्षा म्हणून भेटायचे नाही. नंतर जर वाटले तर लग्नाचा विचार करायचा. सिल्व्हियाने याला मान्यता दिली. पण तो दिवस काही आला नाही. या प्रेमचे अशा अनेक बायकांशी लफडे होतेच. या कामात तो ड्रगचा पण वापर करायचा असा प्रवाद होता. यात प्रेम आहूजाचे एक चुकले. जेव्हा भारतीय स्त्रियांना तो जाळ्यात ओढायचा तेव्हा त्याला खात्री असायची की त्या बायका काही लगेच घटस्फोट घेऊन त्याच्या मागे लग्नासाठी मागे लागणार नाहीत. शेवटी कंटाळून त्या प्रेमचा नाद सोडून द्यायच्या. पण इथे त्याचे गणित चुकले. सिल्व्हिया ही ब्रिटीश होती. वेगळ्या वातावरणातून आली होती. तिच्या समाजात घटस्फोट ही काही विषेश गोष्ट मानली जात नव्हती. त्यामुळे ती हात धुऊन आहूजाच्या मागे लागली होती की मी घटस्फोट घेते आपण लग्न करू. असो.

२७ एप्रीलला दुपारी बायकामुलांना सोडून कावस जो निघाला तो प्रेम आहूजाच्या ऑफिसमधे पोहोचला. पण जायच्या अगोदर त्याने आर्मरीमधून आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतले आणि एका खाकी रंगाच्या लिफाप्यात ते गुंडाळले. हे अर्थातच भरलेले होते. कावस सरळ प्रेम आहूजाच्या घरी पोहोचला आणि त्याने त्याला हाक मारली.
या वेळी कोण आले, असे म्हणून प्रेम आहूजाने दरवाजा उघडला तर कावस बाहेर उभा. प्रेम आहूजा नुकताच बाथरूम मधून बाहेर आलेला असल्यामुळे त्याच्या कंबरेला टॉवेल गुंडाळलेला होता. कावसने त्याला शांतपणे एकच प्रश्न विचारला
“प्रेम, सिल्वियाशी लग्न करायची तुझी तयारी आहे का ? आणि तिला आणि मुलांना तू सांभाळशील का ?”
हे ऐकल्यावर काहीतरी बोलाचाली झाली असेल माहीत नाही पण त्या ओघात प्रेम आहूजा जे बोलून गेला त्याने त्याचा जीव गेला आणि कावस एक खूनी ठरला. तो बोललाच तसे भयानक.
“मी ज्या ज्या स्त्रियांबरोबर मी झोपलो आहे त्या सगळ्यांबरोबर लग्न करू का ?”.
हे ऐकल्यावर तीन आवाज झाले आणि प्रेम आहुजा रक्ताच्या थारोळ्यात पडला. कावसने शांतपणे ते रिव्हॉल्व्हर त्या लिफाप्यात घातले आणि तो चकचकीत नेपियन सी रोड्च्या पोलीस स्टेशनमधे हजर झाला. मला वाटते त्यांना ताब्यात घेतले ते होते नुकतेच निवृत्त झालेले कमिशनर (तेव्हाचे इन्स्पेक्टर) श्री. लोबो. पुढे प्रेम आहुजाच्या घराच्या तपासणीत सिल्वियाची बरीच प्रेमपत्रे सापडली त्यावरून हे सिध्द झाले की या प्रकरणाची कावससह सगळ्यांना कल्पना होती.

येथपर्यंत अगदी सिनेमाच्या ष्टोरीप्रमाणे सगळे झाले. आहे की नाही ? या घटनेवर सिनेमाही निघाला त्याचे नाव “ये रास्ते है प्यारके” पण पुढे जे घडले ते फारच भारी होते.

नंतर कावसवरचा खटला ज्युरीसमोर चालवला गेला. ज्युरींची संख्या होती ८. पण बाहेर काही वेगळेच वातावरण होते आणि त्याला कारण होते एक वर्तमानपत्र “ब्लिट्झ”. या वर्तमानपत्राचे मालक व संपादक होते एक पारशी गृहस्त. त्यांचे नाव होते “ श्री. रुसी करंजीया”. हे एक पक्के पारशी गृहस्त होते म्हणजे असे की त्यांच्यात पारशी लोकांचे जे गुण/दुर्गुण आपण बघतो ते सर्व भरले होते. हे कम्युनिस्ट (?) होते. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालायचे ठरवले ….

त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून कावसची एक उमदा, सालस सैन्यातला अधिकारी असे चित्र उभे केले. हा खून नसून आत्मगौरवासाठी केलेली हत्या आहे, यात कावसची काहीही चूक नाही. कोणताही मध्यमवर्गीय माणूस त्याच्या बायकोवर जर कोणीही हात टाकला तर असेच वागेल. हीच आपली संस्कृती आहे. आहूजा हा खलनायक आणि कावस हा हिरो ठरला. सारे जनमत कावसच्या बाजूने वळवण्यात करंजियांना चांगलेच यश आले. ज्या ब्लिट्झची किंमत २५ पसे होती तो आता रजरोसपणे काळ्याबाजारात २ रुपायाला विकला जाऊ लागला. जेथे ही चौकशी चालली होती तेथे दररोज हजारोंच्या संख्येने माणसे जमु लागली, घोषणा देऊ लागली. एवढेच काय पारशी समुदायाने कावसच्या पाठिंब्यासाठी मोठमोठ्या सभा घेतल्या, सह्यांची मोहीम राबवली. हळू हळू न्यायालयाच्या बाहेर या घटनेचा प्रवास हा सिंधी विरूध्द पारशी असा होऊ लागला आणि सरकारला या प्रकरणाची काळजी वाटू लागली. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ज्युरींनी ८ विरूध्द १ या मतांनी कावस निर्दोष आहे असा निर्णय दिला. कावसच्या दुर्दैवाने सेशन कोर्टाच्या न्यायाधिशांवर या सगळ्याचा काही परिणाम झाला नव्हता. त्यांनी ती केस उच्चन्यायालयाकडे सुपूर्त केली.

या न्यायालयात कावसवर खुनाचा खटला चालवला गेला. प्रेम आहूजाच्या बहिणीने तो लढवला. त्यांचे वकील होते सिंधी श्री राम जेठमलाणी आणि कावसचे वकील होते पारशी कार्ल खंडाळावाला. या खटल्यात कावसला खुनासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. हे न्यायाच्या दृष्टीने बरोबरच झाले होते कारण तो थंड डोक्याने केलेला खूनच होता. कावसला शिक्षा भोगायला पाठवून देण्यात आले. काय झाले पुढे ? कावस तुरुंगातच मेला की सुटला ? पण भारत देश परमेश्वरापेक्षाही महान आहे आणि आपले त्यावेळच्या पंतप्रधानांना आपल्या जनतेने देवांचे परमेश्वर मानले होते त्यामुळे काय कसे झाले हे पुढच्या भागात……..
पण त्याच्या अगोदर आपण न्यायालयात कसा वादविवाद झाला हे बघणार आहोत.
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
ज्या माहितीचा वापर केला आहे त्यांचे आभार मानणार आहे. पण फोटो अर्थातच जालावरून साभार.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

4 Responses to कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

  1. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    खुपच ’दिलचस्प’ आहे हे…कावस बद्दल मलाही वाईट वाटतेय…पुढचा भाग येउ द्या लवकर….

  2. zuber bijapure म्हणतो आहे:

    i also

  3. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    रंजक माहिती. खरोखर एखाद्या हिंदी चित्रपटाला साजीशी….चला सिक्वेल का दुसरा पार्ट काय ते येउन्द्या लवकर…वाट पाहतोय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s