एकात्म – ४

पूर्वीचे भाग वाचले नसतील तर खालील लिंक्स वर क्लिक करा
एकात्म भाग – १
एकात्म भाग – २
एकात्म भाग – ३

बहुदा चित्राचा आणि त्या ओळीचा या पोथीच्या लेखकाच्या नावाशी संदर्भ असावा. किती वर्षापूर्वीची असेल ही पोथी? ही मुळ असायची तर शक्यताच नव्हती. मुळ प्रतीची नक्कलच असणार. तीच एवढी जूनी. मी अधीर होऊन पुढचे पान उघडले. हे पान आणि पुढची पाने तर इतक्या आकृत्यांनी भरून गेली होती की बस. जे काही मी वाचले आणि मला समजले त्याचा मतितार्थ खाली देतो अगदी थोडक्यात –
“ माणसाला पहिला उडणारा प्राणी दिसला तो म्हणजे पक्षी. तेव्हापासून माणसाच्या मनात असे आपल्यालाही उडता यायला पाहिजे अशी सुप्त इच्छा दडलेली होतीच. आमच्याही मनात हेच होते. ( आमच्या म्हणजे कोणाच्या याचा उलगडा झाला नाही. पण बहुदा माणसांचा एखादा संघ असावा). शेवटी वादविवादात हा प्रश्न विचारला गेला की कशाला ही पाहिजे ही शक्ती माणसाला ? आता आमचे काम बंद पडते की काय असे वाटू लागले. आम्ही भलतेच निराश झालो. तेवढ्यात ब्र-उ-गु नी याचे खुप विस्ताराने उत्तर दिले. ( हे ब्र-उ-गु म्हणजे भृगू ऋषी तर नव्हे ? अशी एक शंका क्षणभर माझ्या मनात येऊन गेली.) त्यांचे हे उपकार स्मरून हा ग्रंथ त्यांना अर्पण केला आहे. ( अच्छा म्हणजे पहिल्या पानावर होते ते यांचे नाव होते तर.) लेखक कोणीतरी वेगळाच दिसतो आहे.).

अनेक वर्षे या संशोधनावर काम केल्यावर एक मताने असे ठरले की माणसाला उडता येणे शक्य नाही. तेवढ्यात एका स्त्रीने हे आव्हान स्विकारले व एक नवीन कल्पना मांडली. या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायचा तिचा प्रयत्न होता. जर आपल्याला उडता येत नसेल तर ज्यांना उडता येते त्यांचा उपयोग करता येतो का ते बघायला पाहिजे. तिने जी योजना मांडली ती विश्वास ठेवायला कठीण होती. पण आदेशच असा होता की नाही म्हणायचे नाही. प्रयोग करायचा. त्यामुळे प्रयोग करायचा असे ठरले. जी कारणे माणसाला उडता यायला पाहिजे यासाठी दिली गेली होती त्यात पहिले होते – आकाशातून खालचे सर्व दिसू शकते. जर आकाशातून जमिनीवरचे दिसू शकले तर हा प्रश्न सुटणार होता. दोन वर्षे प्रयोग झाल्यावर या स्त्रीने हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे हे आमच्या लक्षात आले. तिने एका घारीच्या आत्म्यात, मेंदूत प्रवेश मिळवला होता आणि ती त्या घारीच्या डोळ्यातून खालचे पाहू शकत होती. ते तिने कसे केले हे या ग्रंथात सविस्तरपणे लिहीले आहे. याचा अभ्यास केला तर ही विद्या मिळवणे सहज शक्य आहे आणि आमच्यापैकी अनेकांनी ही मिळवली आहे.

याचा दुरूपयोग केल्यास त्या माणसाचा निर्वंश होईल व ही विद्या नष्ट होईल. ही विद्या स्त्रीने स्त्रीलाच द्यावी असाही ठराव केला गेला..इ..इ.इ……….”

पुढे बरीचशी भिती दाखवली होती. ते वाचून मला हसू आले.

हे एवढे वाचून माझं डोकं दुखायला लागले. मी तसाच त्या बाजेवर आडवा झालो. जास्त जेवणामुळे की डोळ्यांवरच्या ताणामुळे मी क्षणातच झोपी गेलो. स्वप्नं आठवत नाहीत असं म्हणतात. पण त्या झोपेत पडलेले स्वप्न मला अजूनही आठवते कारण तेच स्वप्न मी पुढच्या आयुष्यात अनेक वेळा पाहिले. तसे ते एकच स्वप्न नव्हते. दोन स्वप्नांची मालिका होती ती. म्हणजे कसं सांगू आता, एक संपले की दुसरे चालू व्हायचे आणि मधेच कुठेतरी दुसरे (उरलेले) स्वप्न जोडले जायचे. या पोथीचा आणि त्या स्वप्नाचा काही संबंध होता का हे मला आजवर समजलेले नाही. पहिल्या स्वप्नात मी एका देवळाच्या प्रांगणात प्रवेश करतोय अशी सुरवात होती. वरती एक छोटेसे देऊळ. इतके छोटे की जेमेतेम एक माणूस मावू शकेल त्या गाभार्‍यात. पण एवढ्या छोट्या देवळाला एवढे विशाल प्रांगण का ? असा प्रश्न मनात येतो ना येतो तोच कुठून तरी भगवे वस्त्रे परिधान केलेले आणि मुंडण केलेले सात आठ भिक्षूक तेथे आले आणि मला म्हणाले “ महाराज हे ते खरे देऊळ नाही. ते खाली आहे. चला आम्ही तुम्हाला दाखवतो. ते पूढे आणि मी मागे अशी आमची मिरवणूक त्या प्रांगणाच्या एका टोकाला पोहोचते. तेथे जवळ जवळ दहा फूट रूंद पायर्‍या जमिनीत जात होत्या. आतून इतका मस्त प्रकाश बाहेर येत होता की मी क्षणभर थबकलो. त्या प्रकाशाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द्च नाहीत. साधरणत: कोजागीरीच्या चंद्राच्या प्रकाशात थोडासा ज्वाळेचा प्रकाश मिळवला तर कसा प्रकाश होईल तसा काहितरी…… पायर्‍या उतरून आत गेल्यावर तेथे खुपच भिक्षूक दिसत होते. त्यांची कशाची लगबग चालली होती कोणास ठाऊक. पण मधेच कसले तरी ग्रंथ पठण चालले होते आणि बरेच वृध्द ते लक्ष देऊन ऐकत होते. तो आवाज, तो प्रकाश माझ्या मनाला भेदून जात होता. तेवढ्यात मी एका अंधार्‍या. बोगद्यात आलो. सगळा अंधार. लांब दुरवर प्रकाशाचा एक कवडसा दिसत होता. मला बोगद्याच्या बाहेरच्या माणसांचे आवाज ऐकू येते होते. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मी त्या बोगद्याच्या भिंतींवर माझ्या हातातला कमंडलू आपटत चाललो होतो, पण व्यर्थ ! काहीच उपयोग होत नव्हता. तेवढ्यात मी परत त्या देवळाच्या वरच्या प्रांगणात अवतिर्ण झालो. काय पण स्वप्न !

जो झोपलो तो एकदम रात्रीच उठलो.
“उठलास का रे ?” आजीने हाक मारली. जेवायचे आहे ना तुला ?
“नको आजी ! दुपारीच एवढे जेवलोय, आता भूकच नाही.”
“बरं नको जेवूस ! सितारामा, जरा दुध दे बरे याला!”
“मालक निरसं देऊ का ? सितारामने विचारले. निरसं धारोष्ण दुधाला कोण नको म्हणणार ?
आजी म्हणाली “ बस ! झोपलास ना दुपारी ? किती वाचलेस ? कळतय का काही ?”
“आजी तुझा विश्वास आहे या सगळ्यावर ? अग जग कुठे चाललय आणि तु कुठे हा उरफाटा प्रवास करती आहेस ? माणूस आता विमानातून उडतोय ! याची काय गरज आता ?”
आजीने फक्त मंद हास्य केले. “दुसर्‍याच्या डोळ्यातून जगाकडे बघण्यात जी मजा आहे ती अनुभवल्याशिवाय कशी कळणार रे तुला ?”
“माझा काही या गोष्टींवर विश्वास नाही. तुला संस्कृत चांगले येते ना ? तुला तरी कळले आहे का ते सगळे ?”
“बाळा, या विश्वातले अजून बरेच प्रश्न सुटायचे आहेत. सुटायचे म्हणजे काय रे ? एखादी गोष्ट का होती आहे हे शोधून काढायचे ? त्या पेक्षा ती कशी होती आहे हे शोधून काढणे मला वाटते जास्त महत्वाचे आहे. तूही या बाबतीत हाच दृष्टीकोन ठेवावास असे मला वाटते. बघ पटते आहे का !”
“हंऽऽऽऽ ! तु तर मला आता शास्त्रच शिकवायला लागलीस की”
“मी काय शिकवणार तुला ? पण तुला गंमत म्हणून सांगते ती पोथी आहे ना, ती सुमेरीयन संस्कृतीमधून इथे आली आहे हे निश्चित. आपल्या संस्कृतीमधे आणि त्यांच्या संस्कृतीमधे इतक्या समान कथा आहेत की तुला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे कशी आली हे मला खरच माहीत नाही. पण आपल्या इथे येऊन एक दोन हजार वर्षं झाली असावीत.”
“हं वाचले मी तसे काहीतरी.” मी म्हणालो आणि आलेला दुधाचा पेला ओठाला लावला.
या पुढचा जो प्रश्न आला त्याने मी उडालोच !
“तुला शिकायची आहे का ही विद्या ? बोल. अट एकच फक्त !. तू ही विद्या कधीही वापरायची नाही. समजा तुला मुलगी झाली तर ही तिला शिकवायची. समजा तुला मुलगी झाली नाही तर आपलं नशीब. आपल्याबरोबरच जाणार ही विद्या. बहुदा तिला शिकवल्यानंतर तुला ती वापरता येणारच नाही. पण सांगता येत नाही. एक वर्ष लागेल.”
असा अंगावर येणारा प्रश्न ऐकून मी गडबडलोच. काय करावे ? हो म्हटले तर मी या गोष्टींवर विश्वास ठेवतो असे होईल. नाही म्हटले तर आजी म्हणणार तू अनुभव घेतला नाहीस, बोलू नकोस.
“आजी, उद्या सांगितले तर चालेल का ?” मी हताश होत विचारले.
“अरे ! चालेल की. पण हे सगळे तुझ्या माझ्यातच राहील याची काळजी घे”
“ठीक आहे. मी उद्या सांगतो तुला. मी बाहेर जाऊन येतो. आता झोप येणारच नाही नाहितरी” मी म्हणालो.
बाहेर पडलो आणि पावले आपोआप नदीकडे वळली. मी वाळूत बसलो आणि मागे वळून बघितले चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. त्याच्या कडेची चिंचेची झाडे स्तब्ध उभी होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी सिगरेट पेटवली आणि वाळूत रेघा मारत विचार करत होतो…………
काय करावं…?……………………………..
क्रमश:…

जयंत कुलकर्णी.
उद्याचा भाग शेवटचा…………
एकात्म भाग – ५

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

One Response to एकात्म – ४

  1. पिंगबॅक एकात्म – ३ | मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s