एकात्म – ३

एकात्म भाग – १
एकात्म भाग – २

हा प्रसंग मी विसरूनही गेलो असणार कारण पुढे कधी त्याचा विषयही निघाला नाही. हा प्रसंग ज्या सुट्टीत घडला ती सुट्टी संपवून आम्ही आमच्या घरी आलो आणि नेहमीप्रमाणे अभ्यासाला लागलो. आजीची गाठभेट तशी पुण्यात होत होतीच. एवढ्या नातेवाइकांमधे कोणाचे तरी लग्न, मुंज असायचीच त्यावेळी सगळे भेटायचेच.

त्यानंतर दोन चार वर्ष ही नेहमीप्रमाणे गेली. दरवर्षी मी आणि आई सुट्टीला आजीकडे जातच होतो. बर्‍याचवेळा मला हा अनुभव यायचा की कोणी यायचे असले की आजी, बरोबर तो कोपर्‍यावरच्या बाजारापाशी आला की सांगायची “जा रे जरा त्याचे सामान घेऊन या”. एक दिवस तर कमालच झाली आजोबा पुण्याला गेले होते आणि संध्याकाळी सहाच्या गाडीने येणार होते. आजोबा पक्के कर्मठ. सिनेमा, सिनेमातील गाणी इत्यादीला ते छ्चोरपणा समजायचे. आता गाण्याच्या भेंड्या कोणाला आवडत नाहीत? त्या दिवशी असेच झाले. आम्ही असेच गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो होतो. वेळेचे कोणालाच भान नव्हते. तेवढ्यात आजीने हाक मारली “ चला रे पोरांनो आवरा लवकर हे आले बघा एस्‍टी स्टॅंडवर… चला आवरा लवकर हातपाय धुवा आणि पर्वचा म्हणायला बसा.” यात कोणाला काही विशेष वाटले नाही पण मला सारखा हाच विचार छळत होता “हिला कळले कसे”.

अशी अनेक वर्षे गेली. आजी आता थकली होती. मीही आता तसा मोठा झालो होतो. चांगले वाईट, खरे खोटे, श्रध्दा अंधश्रध्दा यांच्याती फरक मला थोडा का होईना समजायला लागला होता. असेच एका वर्षी मला एक विचित्र अनुभव आला. एका सुट्टीत मी असाच दुपारी अचानकपणे त्या खोलीत शिरलो तर मला एक मजेदार दृष्य दिसले. ते मी कधीच विसरणार नाही. एका बाजेवर आजी बसली होती, तिच्या पायाशी आई. आजीने आईचे डोळे तिच्या कृश हाताने झाकले होते. आई मांडी घालून बसली होती. तेही मला विचित्रच वाटले. आईला मी असं बसलेलं कधीच बघितलं नव्हतं. खिडकीतून प्रकाश कमीच येत होता म्हणून माझे लक्ष खिडकीकडे गेले तर तेथे एक मोठी घार बसली होती. मी तिच्याकडे बघताच तिने तिच्या तीक्ष्ण नजरेने माझ्या डोळ्याचा ठाव घेतला. मी तिच्या नजरेला नजर देऊच शकलो नाही. त्या दोघींचेही माझ्याकडे लक्ष नव्हते. आजी आईला म्हणत होती “ अगं जरा जास्त प्रयत्न कर. मन एकाग्र करायला शीक. जमेल तुला. सरावाने जमायलाच पाहिजे”. बायकांचे काहीतरी चालले असेल म्हणून मी तेथून काढता पाय घेतला. निघताना माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटली नाही. आईच्या समोर ती तांब्याची पेटी उघडी पडली होती आणि ती पोथी बाहेर काढून ठेवलेली होती. जाता जाता माझ्या कानावर एक वाक्य पडले “ चल उद्या बघू आता. ऊठ आता. पण घाइघाईने नाही. शिकवले तसे. हळूहळू उघड डोळे ! हं बरोबर !”

हे काय चालले आहे हे काही मला उमजेना. कोणाला विचारायचा तर प्रश्नच नव्हता. त्यापेक्षा आजीलाच विचारुया ना, या विचाराने मी दुसर्‍या दिवशी तिला एकटीला गाठायचा प्रयत्न करत होतो. पण सतत कोणी ना कोणी तिच्या अवतीभोवती असायचेच. शेवटी आजी नाही, पण मी आईला गाठलेच. मी तिला काही विचारायच्या आतच तिने मला विचारले, त्याने मी हादरलोच.
“काय रे काल आजीच्या खोलीत दुपारी काय करत होतास तू ?”
“तुम्ही काय करत होतात ते सांग मला आधी” मी चक्रावून म्हटले. पण तेवढ्यात कोणीतरी आले आणि तिची सुटका झाली. माझ्या डोक्यातून काही तो विचार जात नव्हता. मनावर मणामणाचे ओझे असल्यासारखे वाटत होते. माझ्या अत्यंत आवडत्या अशा या दोन स्त्रिया कशात गुंतल्या होत्या ? काय असावे बरं ? काही सुचत नव्हतं. हळूहळू माझ्या उत्सुकतेचे रुपांतर काळजीत होऊ लागले.

त्याकाळी आमच्या गावात वीज नव्हती. रस्त्यावर कंदिलाचे खांब होते. त्यावर रोज संध्याकाळी म्युनसिपालटीचा माणूस सायकलवर अनेक कंदील घेऊन गावात फिरायचा आणि त्या रस्त्यावरच्या खांबावर त्यातील एक कंदील लटकावून जायचा. हे मी लिहितो आहे एवढे साधे आणि सरळ नसायचे. तो माणूस साधारणत: दिवेलागणीच्यावेळी आमच्या इथे पोहोचायचा. मग मुलांच्या गराड्यात हा कार्यक्रम साग्रसंगीत पार पाडला जायचा. आमच्या घरासमोरच एक बकुळीचे मोठे झाड होते आणि त्याला होता एक मस्त मोठा पार. या पारावर त्या बकुळीच्या फुलांचा सडा पडत असे आणि ती फुले गोळा करायला आम्ही लहान असताना धावत असू. याच्यासाठी या खांबावर कंदील असणे फार आवश्यक असायचे. त्या दिवशी अंधार पडायला आला तरी या माणसाचा पत्ताच नव्हता. पारावर मुलांची चुळबुळ वाढत होती. आई त्याच पारावर माझ्या दोन मावशांबरोबर बसली होती. अंधारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. दोन मावशा गप्पा मारत होत्या आणि आई गप्प होती. अर्थात हे काही नवीन नव्हते. ती ही तशी आजीसारखीच अबोल होती. मुले फारच गलका करू लागली तेव्हा आई एकदम म्हणाली “ गप्प बसा रे जरा, मुकादम आलाय मागच्या खांबापर्यंत. सगळी मुले शांत होताएत तोपर्यंत लांबवर खांबावर कंदील चढताना दिसला. मुलांनी एकच गलका केला.

हा अनुभव मला वारंवार यायला लागल्यावर, मी ठरवलं, आता मात्र फारच झालं. याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. पण त्या दिवशी काहीच झाले नाही आणि पहाटे ऊठलो तर माझे वडील काल रात्रीच आले होते मला घेऊन जायला. लगेचच मुक्कामाच्या एसटीने पुण्याला निघायचे होते. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पुण्याच्या एका चांगल्या शाळेत मला प्रवेश मिळणार होता, त्यासाठी त्या शाळेच्या हेडमास्तरांना लगेचच भेटायला जायचे होते. मी आईचा व आजीचा निरोप घेताना पाया पडलो आणि पुटपुटलो “ काळजी घ्या ! काहीतरी करू नका !” आजी नेहमीप्रमाणे हसली आणि मी निश्चिंत झालो.

नंतर नवीन शाळा, मॅट्रीकची परीक्षा, त्यानंतर कॉलेज यामधे कशी वर्ष गेली हे मलाही कळले नाही. हा विषय तर माझ्या डोक्यातून पार गेलाच. पदवीधर झाल्यावर मात्र मी गावाकडे चांगला आठवडा काढायचा हे ठरवूनच गेलो. आजीला भेटायचे होतेच. असाच संध्याकाळच्या वेळेस दिवेलागणीला पोहोचलो. गाव पूर्ण बदललेले होते. मुख्य म्हणजे गावात वीज आली होती. त्याने गावात काय काय फरक पडत होता हे मी सांगायची गरज नाही. ते आपण ताडू शकता. आणि मला त्या बदलाचे काही वाईटही वाटत नाही. बदल हा होणारच. काही तोटे काही फायदे. माझे मन आजीला भेटण्यासाठी अगदी आतूर झाले होते. आजोबांचा मृत्यू मागच्याच वर्षी झाला होता. आणि सगळे मामा मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला स्थलांतरित झाले होते. मग घरात होते कोण ? आजी, आमचा एक जुना नोकर आणि तिच्या त्या जुन्या मैत्रिणी. गेल्या गेल्या आजीच्या गळ्यात पडायचे होते मला लहानपणी पडायचो तसं, पण माझ्या वयाने परवानगी नाही दिली. आजीची तब्येत आता फारच खराब झाली होती. आम्ही तिच्याच खोलीत बसलो होतो. गप्पा मारता मारता रात्र कधी झाली ते कळलेच नाही. जेवणखाण झाल्यावर मी माझ्या मित्रांना भेटायला बाहेर पडलो. सगळे पारावर जमलेच होते. फुलांचा पोटभरून वास घेतला, काही फुले आजीसाठी खिशात भरून घेतली. मला खरंतर घरीच जायचे होते पण नाही झाले शक्य. मनात म्हटले जाऊदेत उद्याच बघू !.

थंडीचा मोसम होता. खेडेगावात थंडी आणि भूक या दोन गोष्टी नेहमीच जास्त ! सकाळी उठल्या उठल्या, नोकर चहा घेऊन आला. मी त्याचा आस्वाद घेत चालत चालत मागच्या दरवाजाकडे निघालो. जाताना प्रत्येक खोलीत डोकावत, डोकावत, लहानपणीच्या आठवणींनी हळवा होत होतो. त्या वाड्याच्या प्रत्येक भिंत, कोनाडे, कपाटं, फरशांशी काहीना काहीतरी आठवण निगडीत होती. सगळ्या आठवणींनी मनात का मेंदूत, काय तुम्हाला म्हणायचे आहे ते म्हणा, एवढी गर्दी केली की मी हातातला चहा प्यायचासुध्दा विसरून गेलो. तेवढ्यात सितारामाने हाक मारली आणि मी भानावर आलो. खरे तर मला चिंचांवर जायचे होते, पण म्हटलं उद्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवावे !

“मालक आजीनी बोलावलंय !”
“सांग तिला आलोच” असे म्हणून मी स्वयंपाकघराकडे वळलो. बघितले तर आजी तेथे नव्हती. बाळंतीणीच्या खोलीत असेल म्हणून तिकडे वळलो तर ही त्या बाजेवर निजली होती. अशा सकाळी आजीला असे झोपलेले कधीच बघितले नव्हते. काय बरे नाही की काय हिला ? मनात शंकेची पाल चुकचुकली. पण नशिबाने तसे काही नव्हते. मला बघताच ती उठून बसली. मी पण तेथेच जमिनीवर बसकण मारली.
“सितारामा, जा, जरा याचा चहा गरम करून आण बरं आणि मलाही आण घोटभर.”
त्या खोलीत बसल्यावर माझ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ते शेल्फही तेथेच होते. खिडकीतून चिंचेच्या फांद्या तशाच आत यायचा प्रयत्न करत होत्या, ते फडताळही होते आणि आजी ही होती.
“तू काय विचारणार आहेस मला माहिती आहे” आजी म्हणाली आणि हसली.
“काय ? सांग बरं” मी म्हणालो.
“जा उघड ते फडताळ आणि काढ ती पेटी बाहेर. मी मरायच्या आत तुला सगळं सांगायलाच पाहिजे बाबा ! तुला बहीण नाही ना. मग काय करणार ! ऐक, मी जे सांगणार आहे ते आत्तापर्यंत कुठल्याही पुरूषाला माहीत नाही. तसा नियमच आहे या पोथीचा. “
“म्हणजे ?” मी विचारले.
“मला ही पोथी माझ्या आईने दिली. तिला तिच्या आईने. थोडक्यात काय ही पोथी त्या घरात रहात नाही. आता ही कुठून कुठे आली आहे हे एक ’तोच’ जाणे” ती हात वरच्या दिशेला फेकत म्हणाली. आता तुला नाही बहीण, मग काय करणार ? जर तुला मुलगी झाली, तर तिला तरी देता येईल, म्हणून तुला सांगतेय. आता माझ्या नंतर तुझ्या आईकडे जाणार. पण तुझ्या आईची तब्येत ही अशी. आणि ती काही तुला हे सगळे सांगणार नाही.”
“का नाही सांगणार ? सांगेल की !” मी न समजून म्हणालो.
“तू पडला पक्का नास्तिक आणि असल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा. तुझ्या आईने तर तुझ्याशी या विषयावर बोलायचेसुध्दा नाही असे ठरवूनच टाकले आहे अगदी. देवाला नमस्कार केलेला आम्ही तरी कधी पाहिलेला नाही. हे तर नेहेमीच तुला नावं ठेवायचे. रामरक्षा म्हटली नाहीस म्हणून कितीवेळा मार खाल्ला आहेस, आठवतं आहे ना ?”
“जाऊ दे ग आजी ! माझ्या मनात आता काहीच नाही. त्या त्या वेळेच्या गोष्टी त्या त्या वेळेस ! अग पण माझा विश्वास नसला तरी माझी विचार करायची नेहमीच तयारी असते. तू सांग मला. पण आत्ता नको. तुझी हरकत नसेल तर मी ती अगोदर चाळतो. वाचाविशी वाटली तर वाचेन. वाचली तर बोलूया आपण संध्याकाळी.” मी म्हणालो. मलाही ती पोथी एकट्यालाच चाळायची होती.
“आता बाहेर जाणार असलास तर लवकर ये आज ! जेवायला तुझी आवडीची भाजी केली आहे, वांग्याची”
“बरं” म्हणून मी आवरायला गेलो. सकाळीच मित्रांना भेटलो म्हणजे मग दुपारी पोथी वाचायला मी मोकळा !
आवरून पायात चपला सरकवून बाहेर पडलो. पारावरच गानूंचा आव्या आणि गणपुल्या भेटला,
“चला आज बाजार आहे. मारूया चक्कर तेथे.” मी म्हणालो
“नकोरे ! त्या गर्दीत ! तुझी गर्दीची हौस फिटली नाही वाटतं अजून पुण्यात. चल आज नदी पार करून ढुम्या डोंगरावर जाऊया !”
“ठीक ! चलो !” मी.
रस्त्यात अजून चार पाच जणं आम्हाला सामील झाले. लहानपणी हा कार्यक्रम नेहमीच असायचा. नदीला पाणी कमी असायचे त्या काळात. गावाच्या उरसात या पाण्यातूनच गाड्याची शर्यत लागायची. उरूस संपल्यावर आम्हीही त्या वाळूतून आणि पाण्यातून उर फुटेतोवर धावायचो त्या बैलांसारखे. ते आठवून आम्हाला हसू फुटले आणि आम्ही एकदम त्या वाळूतून धावत सुटलो. ती शर्यत अर्थातच मी जिंकली कारण खेळ, पोहणे इ. भानगडीत माझा हात धरणारा त्या पंचक्रोशीत कोणी नव्हता. गप्पा हाणत, जुन्या आठवणींनी छळून घेत, उन्हं वरती आल्यावर परत फिरलो. गल्लीत पोहोचायच्या अगोदर मागच्या दरवाजाकडे पावले आपोआप वळली.
“ अरे तुमचा तो दरवाजा आता बंद असतो.”
“अच्छा ! ठीक ठीक ! चला पारावरून जाऊ.”
पारावर थोडेसे घुटमळलो आणि एकामेकांचा निरोप घेतला.
“अरे मी आज दुपारी घोडेश्वरला जाईन म्हणतो. आता उद्याच भेटूया ! मी थाप मारली. मला दुपारी कोणी नको होते.
वाड्यात शिरलो तर वांग्याच्या भाजीचा असा वास दरवळत होता की सरळ पानावर जाऊन बसलो. तीन चार भाकर्‍या , मेथीची पाने, कांदे, चटणी, शेतातल्या काकड्या, दही असा मस्त बेत होता. आणि तोसुध्दा आजीने केलेला. आजीने समोर बसून वाढले त्यामुळे जरा जास्तच जेवलो. हातावर पाणी पडल्या पडल्या ती तांब्याची पेटी बाहेर काढली आणि माझ्या खोलीकडे निघालो.
“ अरे ती कुठे घेऊन चालालास? तेथेच वाचना. मी नाही येत तेथे. मी आता जरा पुढच्या खोलीत पडणार आहे. तू बस निवांत वाचत. पण जरा काळजीने. जीर्ण होत आली आहे ती.”
“तुला किती समजणार आहे कोणास ठाऊक” ती पुटपुटली.
त्याकडे दुर्लक्ष करून मी परत त्या खोलीत गेलो आणि ज्या बाजेवर माझा जन्म झाला होता त्यावर मांडी घालून, समोर पेटी ठेवली.
निवांतपणे पेटी उघडली आणि त्या भोकं पडलेल्या मखमली कापडातून ती पोथी बाहेर काढली. माझ्या डोळ्यासमोरून जेव्हा मी ती पहिल्यांदा बाघितली होती तो प्रसंग सर्रकन सरकून गेला.

पोथीचे पहिले पान उलगडले आणि आत हाताने रेखाटलेले एका मोठ्या घारीचे चित्र होते. त्याखाली काहीतरी मजकूर होता. मी तो वाचण्याचा प्रयत्न केला…पण जुन्या मराठीत होते ते. वरती संस्कृत आणि खाली मराठी अशी रचना दिसतेय ! मी मनाशी म्हटले. संस्कृत वाचायचा प्रश्नच नव्हता. पण तसले मराठी मी महानुभाव पंथाच्या काही पोथ्यातून वाचले होते. वेळ लागत होता पण थोडाफार अर्थ लागत होता.
“आकाशात उडायचे काही मार्ग……………………..
खाली कसलेतरी अस्पष्ट चित्र आणि त्याखाली अजून एक ओळ होती…..


खा-अस अस्सि अस बर उ गु एदिन अस
एदिनचा पुरोहित बरऊ…….
क्रमश:

जयंत कुलकर्णी.
एकात्म भाग – ४

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

One Response to एकात्म – ३

  1. पिंगबॅक एकात्म – २… | मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s