एकात्म – २…


घार हा एक अजब पक्षी आहे हे खरंच ! आमच्या या वाड्याच्या मागे जो बोळ जायचा तो मागच्या दरवाजात उघडायचा. तेथून डावीकडे वळले की चिंचेच्या झाडांची रांग चालू व्हायची ती पार पुढच्या रस्त्याला भिडायची. त्याचे एक आमच्या वाड्याला कुंपणच होते म्हणा की ! त्या कुंपणातले सगळ्यात मोठे झाड हे त्या बाळंतिणीच्या खोलीच्या खिडकीच्या शेजारी होते, अर्थात बाहेरून. पण त्या झाडाच्या फांद्या त्या मोठ्या खिडकीतून अगदी स्पष्ट दिसायच्या. कधी कधी त्या कापायलाही लागायच्या कारण त्या फुटीच्या वेळी फांद्या त्या मोठ्या खिडकीतून जोमाने आत यायचा प्रयत्न करीत असत. लहानपणी हा मागचा दरवाजा आमचा फार लाडका असायचा. याला कारणे बरीच होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ( त्या काळातले ! आता क्रम व त्या क्रमाचे कारणही बदलले आहे) या बाजूला आजोबांच्या व इतर वडीलधार्‍या माणसांपासून सुटका व्हायची. दुसरे म्हणजे, नदी फारच जवळ होती या दरवाजापासून, तिसरे पण तेही काही कमी महत्वाचे नव्हते – चिंचेची झाडे आणि त्यावर संध्याकाळी त्या झाडावर विमानासारख्या उतरणार्‍या घारी.

घारीला उडताना आणि उतरताना बघितले आहे का तुम्ही ? आणि बघितले असेल तर किती जवळून ? उंच दिसणारा काळा ठिपका आपल्याला बर्‍याच वेळ दिसत रहातो, मग थोड्यावेळाने समजते की ती एक घार आहे. थोड्याच वेळात तिचे पंख दिसायला लागतात. ती एकदाच झपकन पंख हलवते आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपल्या तीक्ष्ण नजरने खाली बघते. उतरायला लागल्यावर ती जी लय पकडते त्या लयीत आपण गुंतून जातो. संथपणे कसलाही आवाज न करता ती घिरट्या घालत हळूहळू खाली उतरायला सुरुवात करते तेव्हा आपल्याला तिच्या आकाराची व राजेशाही थाटाची कल्पना येऊ लागते. रंगही स्वभावाप्रमाणे करडा ! भीती वाटणारे डोळे आणि नजर. अर्थात तुम्हाला तिच्या नजरेत नजर मिसळावयाची वेळ नसणारच आली, पण मी सांगतो….. खाली जमिनीला स्पर्श करायच्या एकच क्षण आधी तिचे पाय शरिरापासून सरळ होतात, पंख हळूच थोडेसे वर होतात आणि मग ती मोठ्या डौलाने जमिनीवर उतरते. हे दृष्य पहायला आम्हाला फार आवडायचे. मी तर तासनतास हे भान विसरून बघत बसायचो. मला तर त्या काळात या घारींच्या पाठिवर बसून आकाशात उडतोय अशी स्वप्नेही पडायची. ही जी चिंचेची झाडे होती ना, त्यांना म्हणत घारीची चिंच. याच चिंचांची कोवळी पाने आणि आंबट फुले खातच आम्ही लहानाचे मोठे झालो. या चिंचांवरच्या घारींशी माझी दोस्तीच जमली होती म्हणा ना ! पण अजून एका व्यक्तीची या घारींशी आमच्यापेक्षा जास्त घसट होती…. अर्थात ते पुढे येईलच.

विषय निघालाच आहे म्हणून एक आठवण सांगतो. या उंच उडणार्‍या घारींना चिडवण्याचा हा आमचा दुपारचा एकमेव उद्योग असायचा. त्या फांद्यांच्या थोडेसे बाहेर यायचे स्तब्ध उभे रहायचे आणि पाचोळ्याच्या आड आपला हात लपवून एकच बोट बाहेर काढायचे आणि ते आळीसारखे हालवायचे. लगेचच आकाशात दिसणार्‍या अनेक काळ्या ठिपक्यांपैकी एखादातरी स्पष्ट व्हायला लागायचा आणि थोड्याच वेळात ती घार खाली झेप घ्यायची. एकदा हा खेळ खेळताना आमच्या आजीने आम्हाला पकडले आणि ती रागावून ( फार क्वचितच रागवायची ती ) काय म्हणाली हे मला अजून स्पष्ट आठवतंय.
“अरे नका माझ्या मैत्रिणींना त्रास देऊ ! रागावतील त्या !”
मग माझ्या पाठीत धपाटा घालून ती मला स्वयंपाकघरात घेऊन गेली.

माझी आजी !
तिच्या आठवणीने माझा जीव अजूनही कळवळतो. आयुष्याच्या शेवटी शेवटी माझ्याकडेच होती ती. शहरात जीव कोंडायचा तिचा. काहीशी अबोल, काळी सावळी, अंगकाठी सडपातळ, सरळ, तरतरीत नाक. पसरट जिवणी, खणखणीत आवाज, स्त्रियांमधे सहजा न आढळणारी उंची, लांबसडक केस, आणि अतिशय भेदक असे समोरच्या माणसाच्या अंतर्मनाचा खोलवर ठाव घेणारे डोळे….. कसा विसरीन मी ते ? हे असेच डोळे मी माझ्या आजीकडून उचललेले आहेत असे आमच्या सर्व नातेवाईकांचे म्हणणे आहे. मला असे वाटत नाही पण … असो. त्या दोन डोळ्यांवरच्या भुवयांच्या बरोबर मधे ठसठशीत गोल गरगरीत कुंकवाचा चंद्र. ती एवढे गोल कुंकू कुंकवामेणाच्या पेटीतल्या आरशात बघून कपाळावर कसे काढे याचे आम्हा सर्व भावंडांना फार आश्चर्य वाटे. तुळशीवृंदावनाच्या अलिकडे हिचेच राज्य असे. आमच्या आजोबांचेही तेथे काही चालत नसे. खरे तर आजोबा आणि आजी, त्या त्या भागात, एकामेकांना घाबरतात असा आमचा त्यावेळी ठाम समज होता. आणि हो, तिची अजून एक न विसरता येणारी गोष्ट म्हणजे तिचे आश्वासक हसू. ती हसली की भल्याभल्या अडचणीत असलेल्यांना धीर यायचा. माणसात गुण आणि अवगुण दोन्हीही असतात असे म्हटले जाते, पण आजही मला तिचा एकही अवगुण आठवत नाही हे मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि मी अर्थातच तिच्या सर्व नातवंडात लाडका होतो. याचे कारण माझे गुण किंवा गोंडसपणा नसून ते माझ्या आईमुळे व त्या घारींमुळे.

आजीचे माहेर म्हणजे एक अत्यंत वेदशास्त्रसंपन्न शास्त्री जोशी यांचे घर. ते त्या काळी एक छोटेसे गुरूकूल चालवायचे. त्या घरातल्या वातावरणात वावरल्यामुळे आजीच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचा डौल, आत्मविश्वास आणि पावित्र्य होते. तिला संस्कृत उत्कृष्ट येते असे. आपल्या आईवडिलांची एकुलती एक कन्या असल्यामुळे ती या घरी येताना तिच्या घरातील अनेक पुस्तके, हस्तलिखिते, पोथ्या इ. इ. घेऊन आली होती. हा सगळा खजिना तिने त्या बाळंतिणीच्या खोलीत जे भले मोठे शेल्फ होते त्यात नीट लावून ठेवले होते. मला तरी ती कधीच तेथे वाचताना दिसली नाही. बिचारीला वेळच मिळायचा नाही. त्या शेल्फला सगळ्यात खाली एक फडताळ होते, त्याला कडी कोयंडा होता आणि एक छोटेसे कुलूपही होते. त्यात काय आहे हे आजी, माझी आई आणि मी यांच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हते. ते आमचे खास राखलेले गुपित होते. काळजी करू नका, मी सांगणार आहे तुम्हाला त्यात काय होते ते….. एकदा मी असाच अचानक त्या खोलीत शिरलो तेव्हा आजी त्या फडताळासमोर बसली होती. बहुदा ती ते आवरत असणार. मी पटकन तिच्या जवळ जाऊन बसलो. त्या कप्प्यात एक पितळेचा चकचकीत डबा, एक कुंकवामेणाची पेटी, एक तांब्याची पेटी आणि काही कपडे होते. डबा बहुदा दागिन्यांचा असावा. कुंकवामेणाची पेटी पाहिली आहे का तुम्ही कधी ?

जुन्या जमान्यात याला फार महत्व असायचे. एक तर त्या काळात बायकांना फार लहानपणीच सासरी जायला लागायचे आणि ही पेटी खास माहेरून आणलेली असायची. त्यात या सासुरवाशीणीच्या सगळ्या भावना गुंतलेल्या असायच्या. पण हे सगळे जाऊदेत. माझी नजर त्या विचित्र दिसणार्‍या तांब्याच्या पेटीत गुंतून पडली नसती तर नवलच. एक तर असली पेटी कोणाकडेच नव्हती, फक्त माझ्या आजीकडेच होती याचा मला त्यावेळी विलक्षण अभिमान वाटला होता. लालसर तांबूस, रंगाची ती पेटी साधारणत: एक मोठ्या दगडी पाटीच्या आकाराची होती.

त्यावर सुंदर म्हणजे अतिशय सुंदर अशी नक्षी काढलेली होती. त्याला पुढे छानसा लहान कडी कोयंडा पण होता. त्या कडी कोयंड्यावरसुध्दा नक्षीकामाची कलाकुसर होती. तांब्याचा रंगात चमक नसेल, पण त्यात मला विस्तवाचा अंश दिसतो. एखादा विझत आलेला विस्तव डोळ्यासमोर आणा. त्याच रंगाचे तांबे. मी पटकन ती पेटी उचलली आणि त्याची कडी काढायचा प्रयत्न केला. आजीने पहिल्यांदा ती माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न केला पण नंतर का कोणास ठाऊक ती पेटी तिने मला घेऊ दिली. मी मोठ्या उत्सुकतेने ती उघडली आणि त्याच्यात डोकावले. आत एक पोथी होती त्याच्या वर तसेच नक्षीकाम केलेले होते. त्या नक्षीच्या चौकटीत काहीतरी लिहिलेले होते. त्या वेळेस मला ते काही समजले नाही.
“ आजी हे काय लिहिले आहे ?” असे म्हणत मी ते पान उलगडले. आतल्या पानावर हाताने रेखाटलेले घारीचे एक मोठे चित्र होते.
“ अरे ही पोथी आहे ! फार जुनी ! आणि ही मला माझ्या आईने दिली आहे.”
“पण हे काय लिहिलंय ?”
“जाऊदेत ! तुला नाही समजणार “
“ सांग तरी !” मी म्हटले.
“एकात्म”…………… ती म्हणाली…

क्रमश:……………

जयंत कुलकर्णी.
एकात्म भाग -३

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

One Response to एकात्म – २…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s