इब्न बतूत भाग – ७

आम्ही मग ताईझ नावाच्या शहराच्या दिशेने प्रवासाला लागलो. येमेनमधील हे एक अत्यंत सुंदर आणि मोठे शहर आहे. या शहरातील नागरिक स्वत:ला फार शहाणे समजतात वस्तुत: ते फार उध्दट व उर्मट आहेत. पण कुठल्याही देशाच्या राजधानीचे किंवा जेथे सत्तेचे स्थान जेथे आहे तेथील लोक असेच असतात. नंतर केव्हातरी एका छोट्या गावाच्या दुमारखान नावाच्या सुलतानाविषयी तो म्हणतो हा एक किंमतशून्य सुलतान आहे. त्याच्या शहरात लुच्च्यांचा सुळसुळाट आहे. जसा राजा तशी प्रजा दुसरं काय !पण त्याला येमेन आवडले. तेथील हवा त्याला सुवासिक वाटे कारण त्यात जस्मीन, लव्हेंडर, थाईमच्या फुलांचा सुगंध भरुन राहिला होता. गुलाबाची फुले तर त्याच्यावर दवबिंदू असतानाच तोडली जात. स्थानिक समजुतीप्रमाणे अशा फुलांचे अत्तर अंगाला चोपडले तर हमखास संततीप्राप्ती होत असे ते मानत. ज्या विविध प्रकारच्या अत्तरांच्या निर्यातीमुळे अरेबियाच्या भरभराटीस हातभार लागला होता ती अजूनही तयार होत होती.

ओमानी बाजारपेठ त्यावेळी विदेश परदेशच्या मालाने गजबजलेली असे. त्या बाजारपेठेइतका विविध प्रकारचा माल इतर बाजारपेठेत बघायलाही मिळत नसे. त्यामुळे इब्न बतूतने याचे वर्णन सविस्तरपणे केले आहे. इजिप्त, अरेबिया, आफ्रिका, हिंदुस्थान आणि चीन येथील माल ओमानी बाजारपेठेतूनच जायचा. ज्या वस्तूंचा व्यापार केला जायचा त्यातील काही वस्तूंवर नजर टाकली तर हा बाजार सर्व लोकांसाठी कसा होता हे कळून येते. मालदीवमधून मोती, तिबेटमधून औषधे, स्कायथियामधून तलवारी, अंदमानमधून मसाल्याचे पदार्थ, आफ्रिकेमधून लाकूड, बर्मामधून सागवान, सिंधी सुवासिक तेले, हिंदुस्थानमधून तीळ, पर्शियाचे पिस्ते, मोंबासाचे शिसम, लंकेचे हस्तीदंत, शिवाय लोखंड, शिसे, सोने, कापूस, चामडे, हे सगळे होतेच, हे कमी म्हणून विविध प्रदेशातील फळांनीही तेथे हजेरी लावली होती.

इब्न बतूतने मग लाल समुद्र पार करुन सोमालियात पाऊल टाकले. जिबौतीच्या थोडे उत्तरेला झीलानावाच्या ठिकाणी तो पायउतार झाला. त्याच्या दृष्टीने ते एक बाजाराचे गाव होते पण सगळ्यात घाणेरडे, अस्वच्छ आणि सगळीकडे दुर्गंधी पसरलेली असे होते. त्याचे कारण म्हणजे तेथे दुकानदार उन्हात मासे विकत आणि रस्त्यातच उंटाची हत्या करत. पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍याने तो मोंबासाआणि किलवापर्यंत गेला. या प्रदेशात झांज नावाची जमात रहात असे. त्यांचा रंग काळाकुट्ट आहे, तो लिहितो, आणि त्याच्या सर्वांगावर गोंदलेले असते“. झांजीबार हे या प्रदेशाचे नाव यावरुनच पडले असावे. किलवामधे तेथील स्थानिक सुलतान अबू अल्‍ मुजफ्फर हसनहा एक कनवाळू सुलतान होता आणि त्याला त्याच्या गरीबातील गरीब जनतेबरोबर जेवायला, खायला, काहीही वाटत नसे असे त्याने नमूद केले आहे. तो अत्यंत धार्मिक होता आणि सर्व धर्मगुरुंविषयी त्याला आदर असे.

त्यानंतर इब्न बतूत दोफरमार्गे परत अरेबियाला गेला. हे एक ओमानच्या दक्षिण-पश्चिमेच्या किनार्‍यावरचे महत्वाचे बंदर होते. तेथील सुलतान, व्यापार्‍यांनी आपल्याच बंदरात गलबतं लावावीत आणि याच बंदरातून त्यांनी व्यापार करावा यासाठी काय काय क्लृप्त्या वापरायचा त्याबद्दल तो म्हणतो

जेव्हा हिंदुस्थानातून गलबत किनार्‍याजवळ येऊ लागे तेव्हा सुलतानाचे गुलाम संबूकमधून त्या गलबतांच्या मालकाला आणि त्या गलबताच्या अधिकार्‍यांना भेटायला जात. जाताना ते आपल्याबरोबर त्यांच्यासाठी मानाचे कपडेलत्ते घेऊन जात व त्यांना भेट म्हणून देत. त्यानंतर किनार्‍यापासून ते सुलतानाच्या घरापर्यंत त्यांना मिरवणुकीतून नेत. त्यासाठी ३/४ घोड्यांवर ताशे, नगारे इ. ठेवून वाजवत असत. गलबतावरच्या सर्वांचेच तीन सलग रात्री आदरातिथ्य केले जाई….हे सर्व त्यांची सदभावना मिळवण्यासाठी केले जाई. ती एकदा मिळाली की हे व्यापारी ते बंदर सोडून इतरत्र गलबतं लावायला जाणे अवघड असे. हे सर्व प्रयत्न ते प्रामाणिकपणे, आनंदाने, नम्रपणे करतात.

हे मला आपल्या हायवेच्या हॉटेलसारखे वाटते. बसच्या चालकांना इ. ना नाष्टा फुकट !
इब्न बतूतने मग पान खायच्या प्रसिध्द सवयीबद्दल लिहिले आहे.
पान खायला देऊ करणे हे फार मानाचे समजले जात असे. त्यापुढे सोन्याचांदीची भेटही फिकी पडे. ते खायची पध्दत अशी. सुपारी घेऊन त्याचे बारीक तुकडे करायचे आणि तोंडात टाकायचे आणि चावायला लागायचे. मग विड्याचे पान घेऊन त्याला थोडासा चुना लावायचा आणि ते तोंडात टाकायचे आणि त्या सुपारीबरोबर सावकाश चावायचे. या पानामुळे श्र्वास सुवासिक राहतो आणि पचनक्रिया सुधारते.

त्या ओमानी किनार्‍याच्या वरच्या बाजूला तेथील कोळी शार्क पकडून त्याचे मांस वाळवत टाकायचे. बर्‍याच ठिकाणी अजूनही असे करतात पण त्या शार्कच्या पाठीच्या कण्याचा उपयोग ते त्यांच्या झोपड्यांचा मुख्य आधार म्हणून करायचे असे त्याने आश्र्चर्याने नमूद केले आहे. त्या सांगाड्यांना मग उंटाचे कातडे ठोकले जायचे की झाली झोपडी तयार !

क्वाल्हाट नावाच्या गावात त्यांचा भाडोत्री मार्गदर्शकच वाटमार्‍या निघाला. इब्न बतूतने कशीबशी सुटका करुन घेतली आणि तो त्यासाठी गावात इतका फिरला की त्याचे पाय त्याच्या बुटामधे सुजले आणि शेवटी त्यातून रक्त यायला लागले. या येथे इब्न बतूतच्या प्रवासांच्या तारखांमधे बरीच गडबड झालेली दिसते. पण तज्ञांच्या मते तो १३३२ मधे परत मक्केला त्याच्या तिसर्‍या हाज यात्रेला गेला. तो का गेला आणि मक्केला किती वेळ राहिला. याबद्दल तो काहीच लिहीत नाही पण आपल्याला हे माहिती आहे या यात्रेच्या वेळेस त्याने त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला हिंदुस्थानात जाण्याचा !

आपल्याला हेही माहीत आहे की हा निर्णय त्याने आर्थिक फायद्यासाठी घेतला असावा. ओमानमधे असताना किंवा मक्का किंवा बगदादमधेही असेल, असे ऐकले होते की तुर्की हिंदुस्थानी वंशाचा दिल्लीचा सुलतान मुहम्मद इब्न तुघलक हा इस्लामचा अभ्यासकांचा पाठीराखा होता आणि त्याचे दारुलइस्लाममधील सर्व तत्वज्ञानी लोकांना त्याच्या दरबारी हजेरी लावण्याचे जाहीर आमंत्रण होते आणि या कुराणाच्या अभ्यासकांचा यथोचित सत्कार करण्यात तो मागेपुढे बघत नसे. त्याच्या पुढच्या प्रवासाचा मूळ हेतू हाच होता. मागे सांगितल्याप्रमाणे तो हिंदुस्थानला सरळमार्गाने जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याला त्या भूमीवर पाय ठेवायला पुढची २ वर्षे लागली.

जर नकाशात बघितले तर हिंदुस्थानात जायला सगळ्यात सोपा मार्ग कोणालाही हाच वाटेल ओमानला परत जाणे आणि त्याच्या एखाद्या बंदरावरुन मान्सूनचे वारे पकडणारे शिडाचे गलबत पकडले की ४० दिवसात हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर पोहोचायचे. पण ज्यावेळी इब्न बतूतने हिंदुस्थानला जाण्याचा विचार पक्का केला त्यावेळी मान्सूनचे वारे वहायला बराच अवकाश होता. आणि त्याला बराच काळ थांबायला लागले असते. पण तसा प्रवास करायची त्याची पध्दत नव्हती.

त्याऐवजी तो परत कैरोला गेला. मेडिटेरीनियन समुद्राच्या पूर्व किनार्‍याला वळसा घालून गाझा आणि हेब्रॉनमधून एका बोटीत बसून तो अनॅटोलियाला गेला. त्या भागात त्याने इतकी पायपीट केली की तेथील अनेक छोट्या छोट्या सुलतानांना तो चांगलाच माहीत झाला. त्या प्रांताची आणि त्यावेळच्या रीतीरिवाजाची माहिती मिळायला रिहाला हे एकच साधन सध्या उपलब्ध आहे. असाच एक रिवाज होता आखी“. याचा अर्थ तुर्की भाषेमधे उदार आणि अरेबिकमधे बंधूअसा होतो. त्यावेळच्या त्या प्रदेशात असलेल्या समाजरचनेत या दोन्ही अर्थाचा उलगडा झालेला दिसेल. इब्न बतूतला या आखींची ओळख लाधीकच्या (आत्ताचे डेनीझ्ली) बाजारात झाली. आम्ही त्या बाजारातून आमच्या घोड्यांवर बसून जात होतो तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या ओट्यांवरुन काही माणसे भराभर उतरली आणि त्यांनी आमच्या घोड्यांचे लगाम धरले…काही दुसर्‍या लोकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरुन त्यांची वादावादी झाली, ती इतकी विकोपाला गेली की त्यातील काही लोकांनी सुरे बाहेर काढले. त्यांची भाषा येत नसल्यामुळे हे सगळे काय चालले आहे हे समजायला काही मार्ग नव्हता. मला तर वाटले हे आता आम्हाला लुटणार. देवाच्या कृपेने तेथे एक अरेबिक येणारा माणूस आला. त्याला मी विचारले या माणसांना आमच्याकडून काय हवंय ? त्याने सांगितले, ते लोक फित्यान आहेत आणि त्या दोन गटांना तुम्ही त्यांच्याकडे रहायला हवे आहे. ते ऐकून आम्हाला त्यांचे आदरयुक्त (भितीयुक्त) आश्चर्य वाटले. शेवटी त्यांनी आमचे दिवस वाटून घेतले.

इब्न बतूतने ज्या आखीचे वर्णन केले आहे ते म्हणजे पर्शियातील फित्यान लोक होते. ही एक त्यावेळची तरुणांची संघटना होती. त्यात अनेक प्रकारचे तरुण भरती झाले होते.

एकंदरीत वर्णनावरुन मला तर ते सभ्य गुंड वाटतात. म्हणजे सधन वर्गालाच लुटणार्‍या तरुणांकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन नेहमीच सौम्य असतो, तसेच काहीतरी.

ते स्वत:ला खलीफा अलीचे अनुयायी समजत. त्यांना ओळखायचा सोपा मार्ग म्हणजे त्यांची विजार. जगात अशी विजार, कोणीच घालत नसेल.

माझी टीप : केंब्रीजचा जो इराणचा इतिहास आहे, त्यात या लोकांचे बरोबर वर्णन केले आहे ते खालीलप्रमाणे,

Here evidently there is a mixture of tradition and vocabulary, on the one hand Arabic, on the other Iranin Arab tradition contributed the Fata (plural fityan), meaning a brave, genrous, chivalrous individual. But in all the old Sasaninan cities there were groups of young men (Persian shose community spirit led them to pool their resources in order to achieve the best possible life together, materially and sometime morally. They had a religion, but it does not appear that religion was the factor which united them, and in any case they came from different religious groups. Almost all of them followed professions, but it would not seem, at any rate before the Turco-Mongolian period, that their union was based on a common profession: their co-operation was of other kinds. It so happened that some of them were poets and from ‘ half way through the Middle Ages onwards, the development of certain groups showed a deep appreciation of spiritual values. At the same time certain groups of sufis, now organized into communities, were becoming aware of the example of communal life presented by the fityan/javamardan. Since clearly these were the cirdes more than any others which produced the writers, there came into existence a complete literature which hinged on the spiritual aspect of the futuwwa (literally “the youth”), a name which was given to their moral principle of cohesion, regardless of the fact that these fityan also had other activities of apparently quite a different kind. In fact they freely professed the legitimacy of theft, provided that it was executed with chivalry to the detriment of the rich and for the corporate benefit of the restricted community. Historans and other authors, in describing the fityan during periods of diminished authority, called them by ‘ayyar, aubash, shuttar !,etc. (that is, scoundrels, ragamuffins, outlaws) and alleged that they abandoned themselves to various kinds of disorderly behaviour and imposed their “protection” on merchants and on notables at a price. In the large towns the official police forces and the army garrisons held them more or less in respect ,in other places, however, they themselves constituted the police, often even to the extent of imposing their own candidate as the head of the town. They freqently had as their leader a “rais”, whose position and functions it is difficult to describe precisely, because the term, which simply means a ‘chief, can perhaps be applied in different ways : sometimes it signiies a kind of local mayor, to confront or oppose the political authority of the prince.

अर्थात यात काही चांगले गट असावेत असे वरच्या परिच्छेदावरुन दिसून येते. मोठ्या शहरातूने हे गट तेथील सरकारी अधिकार्‍यांना त्यांच्या कामात गावात कायदा आणि सुव्यवस्था राखायलाही मदत करत.

अनॅटोलिया सोडून इब्न बतूतने मग काळा समुद्र पार केला आणि तो क्रिमीयाला पोहोचला. त्याच्या या प्रवासाने तो समुद्राला कायमचा विटला कसा नाही याचेच आश्चर्य वाटते. त्या प्रवासात त्याचे गलबत एका समुद्री वादळात सापडले. समुद्री वादळ आणि पाऊस हा एक भयंकर प्रकार असतो.

(जे घाटावर राहतात त्यांना त्याची कल्पना नाही येणार. माझे एक ओळखीचे गृहस्थ दाभोळच्या किनार्‍यांवर समुद्रामधे फक्त १ मैल आत, ते मासेमारीला गेले असताना एका छोट्या वादळात सापडले होते, त्याचीच कहाणी अंगावर काटे आणणारी होती.)

तर हे वादळ इतके भयानक होते की सर्वांनी आयुष्याची आशा सोडून दिली आणि ते देवाची अखेरची प्रार्थना करायला बसले. त्यातून वाचून तो काळ्या समुद्राच्या उत्तरेच्या किनार्‍याच्या किपचॅक वंशाच्या मंगोल सुलतानाच्या राज्यात पोहोचला. त्यानंतर क्रिमीयामधे इब्न बतूतने एक चारचाकी घोडागाडी पहिल्यांदा विकत घेतली. उंटांच्या प्रदेशातील इब्न बतूतला त्याचे फारच अप्रूप वाटले. त्याच्या शब्दात

हे एक फारच मजेदार वाहन होते. चाकांवर एक घुमटाच्या आकाराची खोली असते. ती बांबूच्या काड्या आणि चामड्याच्या नवारीने विणून केलेली असते. यात आपल्याला बसता येते, झोपता येते, एवढेच काय, वाचता, लिहितापण येते. यात आपल्या सामानासाठी वेगळी जागा असते. खायच्या सामानासाठी आणि तुमच्या किंमती वस्तूंसाठी कुलूप असलेले छोटे कपाट (बहुतेक ट्रंक) पण असते. मी स्वत: एकदा एक आख्खे गाव यातून जाताना बघितले आहे. चालताना त्यातून धूरसुध्दा निघत होता, म्हणजे ते आतमधे चालताना स्वयंपाकपण करत असणार.त्या माळरानावरच्या लांबच्या प्रवासात त्याला तेथील गावातून, शहरातून विद्वान, प्रवासी, अंगडीया, म्हणून आदरयुक्त मान्यता मिळत गेली. त्यांचा पाहुणचार घेत तो आता बराच श्रीमंत झाला होता. हिंदुकुश पर्वत पार करेपर्यंत त्याच्याकडे बर्‍यापैकी माया व इतके घोडे जमले की त्यातील काही तो भेट देऊ शकत होता. एवढेच काय त्याच्याकडे नोकरचाकर, दासी होत्या आणि त्याने २/३ लग्नेही केली. अशारितीने टॅंजिएचा एक दरिद्री मुलगा आता बर्यागपैकी गब्बर झाला होता आणि अजून होणार होता. जो व्यापारी मार्ग इब्न बतूतने पकडला तो कॅस्पीयन समुद्राच्या उत्तरेकडून जात होता आणि अफगाणिस्तान व इराणमधून जाणार्‍या मार्गापेक्षा कमी रहदारीचा होता. पिवळसर रंगाचे तैलस्फटीक जे दागिने करायला वापरले जात, ते याच मार्गाने बाल्टीक समुद्रातून, मॉस्को-व्होल्गा करुन चीनला जात असत. (त्याच्या पुस्तकात त्याने असाही दावा केला आहे की त्याने व्होल्गातून बल्गार प्रदेशाच्या राजधानीला जायचा पण प्रयत्न केला पण मला ही एक थाप वाटते) पण त्याने ख्रिश्चन कॉस्टनटिनोपालला मोठा प्रवास करुन भेट दिली याबद्दल कोणालाच शंका नाही. हा प्रवास त्याने बायझंटाईनचा सम्राट अन्ड्रोनिकसची राजकन्या बायालून हिच्याबरोबर केला. या राजकन्येचे लग्न राजकीय कारणांसाठी मुस्लीम ओझबेग खान, जो एका सोनेरी टोळीचाप्रमुख होता, त्याच्याशी झाले होते. तो म्हणतो मी जेव्हा तिला माझ्या प्रवासाबद्दल सांगितले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बहुतेक तिला तिच्या माहेरची आठवण येत असावी.

कॉस्टनटिनोपालहून परत त्या डॊंगराळ प्रदेशात परत आल्यावर मात्र त्याने ज्या मार्गाने रेशमाची वाहतूक व्हायची तो मार्ग पकडला आणि त्याने त्या मार्गाचे आणि त्यावरील शहरांचे व्यवस्थित वर्णन केले आहे……

भाग ७ समाप्त.

जयंत कुलकर्णी

पुढे चालू…………….

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s