इब्न बतूत भाग – ४

दमास्कसमधे त्याचा पहिला मुक्काम हा एका भव्य मशिदीत झाला. ती मशीद आजही त्या काळाची साक्ष देत उभी आहे. ही एक जुम्मा मशीद आहे. तिचे दुसरे प्रसिध्द नाव म्हणजे उमय्याद मशीद. त्याचे वर्णन त्याने फारच सुंदर केले आहे. त्याच्याच शब्दात “जगातील सगळ्यात सुंदर अशी ही मशीद आहे. त्याच्या इतके सुंदर व भव्य बांधकाम फार क्वचित ठिकाणी सापडेल. त्या वास्तूचे सौंदर्य आणि अचूकपणा दोन्हीही अचंबित करणारे आहेत.”

ही इमारत, पूर्वी एक चर्च होते. जेव्हा मुस्लीमांनी दमास्कस जिंकून घेतले, तेव्हा असे सांगतात, त्यांचे दोन सरदार ह्या चर्चमधे शिरले, त्यातील एक, एका दरवाजातून तलवार परजत शिरला आणि त्याच्या मध्यभागी पोहोचला. तर दुसरा तलवार म्यान करुन पूर्वेच्या दरवाजातून त्याच सभामंडपात पोहोचला. तेव्हा त्या सुलतानांनी पूर्वेकडची बाजू ही चर्च म्हणून तशीच ठेवली आणि उर्वरीत चर्चचे मशिदीत रुपांतर केले. काही काळानंतर उमय्यादच्या सुलतानांनी त्या उर्वरीत भागाची पैशाच्या मोबदल्यात मागणी केली. ती नाकारण्यात आल्यावरच ते अर्धे चर्च काबीज करुन त्याचेही मशिदीत रुपांतर करण्यात आले. पण त्याने असंतोष वाढेल म्हणून एका मोठ्या रकमेची ताबडतोब उभारणी करुन ती रक्कम ख्रिश्चनांना देऊन त्यांना एक चांगले कॅथेड्रल बांधण्यास सांगण्यात आले.

मशिदी ह्या प्रार्थनेच्या जागा असतंच पण त्या एक सामाजिक केंद्रही असत. त्यातील सभागृहात त्यावेळचा मुस्लीम समाज प्रार्थनेखेरीज सामाजिक प्रश्नांवर चर्चा करायलाही जमत होता. शुक्रवारच्या नमाजासाठी जेव्हा सारे शहर त्या तेथे लोटे त्यावेळी त्याचे महत्व अजूनच अधोरेखित होई. त्या मशिदीच्या जवळ विद्वान आणि उत्कृष्ट भांडी ह्यांची रेलचेल असायची. त्या मशिदीचे वर्णन करताना इब्न बतूत पुढे म्हणतो “ह्या मशिदीच्या पूर्वेकडील दरवाजाला “जेतं” दरवाजा असे नाव आहे. हा त्याचा सगळ्यात मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा एका मोठ्या, रुंद अशा बोळात उघडतो. तेथे खांबांची रांगच रांग आहे. या बोळाच्या दोन्ही बाजूला खांबांवर पेललेले वर्तुळाकार सज्जे आहेत. यात अनेक दुकाने आहेत आणि येथे उत्कृष्ट कापड मिळते. ह्या सज्जांच्या वरच्या मजल्यावर पुस्तकांची, दागदागिन्यांची, काचेच्या सामानाची दुकाने आहेत. त्याच्या खालच्या चौकात नोटरींची कार्यालये आहेत. केव्हाही गेलात तर तेथे गर्दी असतेच. त्यातच भर पडते ती लग्नं लावणार्‍या उलेमांची. याच बाजाराच्याजवळ मग कागद, शाई, लिहिण्याचे साहित्य विकायची दुकाने आहेत. उजव्या बाजूलाच आपण “जेरुन” दरवाजातून बाहेर पडतो. ह्याचेच दुसरे नाव आहे “तासांचा दरवाजा”. बाहेर पडल्यावर आपण एका मोठ्या कमानीत येतो. या कमानीतच छोट्या कमानी आहेत. त्या सगळ्या कमानींना दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजा दिवसाच्या प्रत्येक तासाचे प्रतिनिधित्व करतो. या दरवाजांना आतून हिरवा आणि बाहेरुन पिवळा रंग दिलेला आहे. एक तास गेला की आत बसलेला माणूस तो दरवाजा उघडून आतली हिरवी बाजू बाहेर करतो.

इब्न बतूतच्या लिखाणात अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिले म्हणजे त्याच्या लिखाणात तो इतर प्रवाशांना उपयोगी पडेल अशी बरीच माहिती देतो. उदा. तासांचे दरवाजे हे उद्योगांना वेळेचे भान देत असत. तसेच त्याचे नोटरीच्या कार्यालयाचे वर्णनावरुन हे समजते की त्या काळात शब्दाला लेखी कागदाएवढीच किंमत होती. कुराण संपूर्ण पाठ करायची पध्दत असल्यामुळे पाठांतरावर विश्वास ठेवायचा का नाही ही भीती नव्हती. आपल्याकडेही मला वाटतं हीच परिस्थिती होती, पण बर्‍याच अगोदर. त्याची खाण्यापिण्याची वर्णने तर आपल्याला त्याच काळात घेऊन जातात. त्याने वर्णन केलेले जेवणाचे खमंग सुवास, खरपूस भाजलेल्या मांसांची वर्णने म्हणजे असे वाटते की खरेच तो वास आत्ता येतोय की काय ! त्याच्या वर्णनातून हे सारखे जाणवत राहते की आपण कुठेही रहात असलो तरी दररोजच्या जीवनात आपण सर्व एकमेकांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे अवलंबून असतोच. रिहाला वाचताना या जगातील संस्कृतींमधील आपल्या स्थानाचा विचार आपल्या मनात आल्यावर आपण अगदी विनम्र होऊन जातो. इब्न बतूत आणि आपल्यामधे आता ७०० वर्षे होत आली पण त्याची वर्णने वाचल्यावर ती मधली वर्षे कशी उडून जातात ते कळतही नाही.

दमास्कसमधे इब्न बतूतने वक्फबद्दलही बर्‍याच काही नोंदी केल्या.

“अनेक प्रकाराने देणगीरुपाने जमा झालेल्या संपत्तीचा वापर हा इतक्या प्रकाराने होत असे की कुठल्याही प्रकारच्या अडचणींवर मात करायला कुठल्या ना कुठल्या प्रकारची मदत मिळायचीच. या मदतीचा एकंदरीतच आवाका प्रचंड होता.

कशासाठी मदत मिळत नव्हती ?

जे हाजला जाऊ शकत नव्हते त्यांना देणग्या मिळायच्या. उदा. शारिरीकदॄष्ट्या अपंग असलेले, वयस्कर, त्यातून ते त्यांच्या घरातील धडधाकट सभासदांपैकी कोणालाही हाजला पाठवू शकत होते. गरीब स्त्रियांना त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी देणग्या मिळायच्या. अडकलेल्या प्रवाशांना प्रवासासाठी, तुरुंगातून सुटणार्‍या कैद्यांसाठी देणग्या मिळायच्या. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही देणग्या मिळायच्या. रस्त्याची दुरुस्ती अत्यंत आवश्यक असायची कारण दमास्कसमधील सर्व रस्त्याला दोन्ही बाजूला पादचार्‍यांसाठी चांगले मार्ग बांधले होते. रस्त्याच्या मधून इतर वाहतूक असे.

तो लिहितो –
“एक दिवस मी रस्त्याने चाललो असताना एक माणूस रडत चीनीमातीच्या भांड्याचे तुकडे गोळा करत असताना मला दिसला. ते किंमती भांडे बहुधा त्या नोकराच्या हातातून पडून फुटले असावे. त्याच्याजवळ लगेच माणसे गोळा झाली. त्यांनी त्याला जो सल्ला दिला तो माझ्या अजून लक्षात आहे. तो त्याला म्हणाला “अरे हे सगळे तुकडे नीट गोळा कर आणि भांड्यांसाठी मदत देण्याचे जे केंद्र आहे तेथे जा आणि हे तुकडे त्याला दाखव. बघ काही मदत मिळते का !”
त्याने तो सल्ला मानला. मी त्याच्या मागे जाऊन बघितले, काय होते ते. त्या अधिकार्‍याने त्या नोकराला भांड्याचे तुकडे दाखवायला सांगितेले, ते बघितल्यावर त्याने त्या नोकराला पैसे दिले आणि नवीन भांडे घ्यायला सांगितले. दानधर्म मन:शांती देतात हेच खरं !”

इब्न बतूतच्या लिखाणाकडे चतूर वाचकांनी जर नीट लक्ष दिले तर त्यांना असे आढळून येईल की, त्याने चांगल्या राजवटीचे कौतुक केलेच आहे पण असे दिसून येते की त्याचा असा ठाम विश्वास होता की नुसता चांगला राज्यकारभार असून उपयोग नाही तर राज्यात चांगल्या मुलभूत सोयी जसे चांगले रस्ते, पाणी, आरोग्यसेवा, इ. उपलब्ध असल्या तरच राज्य स्थिर आणि भरभराटीचे होते. एवढेच नव्हे त्याचा असाही विश्वास होता की या झाल्या भौतिक सोयी. पण त्याला नैतिक मुलभूत सोयी पण अभिप्रेत होत्या. ह्यात उलेमा आणि श्रीमंत समाज, ह्यांचे नाते त्याच्या मते महत्वाचे होते. तसेच समाजामधील विद्वानांनी अलूफ न राहता, सरकारी कामात योगदान देणे आणि समाज स्थिर ठेवण्याला मदत करणे यालाही तो मुलभूत नैतिक सुविधा म्हणत असे. सरकार सर्व कारागिरांना, विद्वानांना त्यांची कला समाजासाठी वापरण्यासाठी उत्तेजन देत असे. दानधर्म आणि वक्फ व मदरसांचा परोपकार हे सर्व स्तरावरच्या जनतेला जमेल तेवढी मदत करत असत. हे सगळे आपण उम्माहसाठी करतोय अशीच भावना होती.

गुप्त दानधर्म, देणग्या, की ज्यातून फुटक्या भांड्यासाठीही मदत मिळू शकते यावरुन त्यावेळच्या परोपकाराच्या कल्पना आणि त्याला मिळणारा पाठिंबा याची आपल्याला कल्पना येऊ शकते. दमास्कसच्या एकूण १७१ वक्फपैकी १० ला स्वत: सुलतानाचा आधार होता. ११ दरबाराचे अधिकारी चालवायचे, २५ ला व्यापार्‍यांचा उदार आश्रय होता, ४३ तर स्वत: उलेमा चालवायचे आणि ८२ सैन्याचे अधिकारी चालवायचे. बर्‍याचवेळा स्वत: बतूतनेही अडीअडचणीच्यावेळी वक्फचा आधार घेतलेला आहे. जरी त्यावेळी त्याला सरकारदरबारची मदत घ्यायला आवडत असे तरीही.

त्या महिन्याच्या म्हणजे शावलच्या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी इब्न बतूत दमास्कसहून मदिना आणि तेथून मक्केला जायला निघाला. १३५० कि.मी. चा हा मार्ग बराच आतून असा होता. अरेबियन व्दिपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावरुन, ज्याला “हीजाज” असे म्हणत अशा प्रदेशातून हा ४०-५० दिवसाचा प्रवास होता. त्यानंतर वाळवंटसदॄश लालसमुद्राचा किनारा त्या अरेबियन वाळूच्या टेकड्यांना भेटत असे.

इब्न बतूतने मोरोक्कोमधे जास्तीत जास्त १२००० फूटाचा डोंगर बघितला होता. या प्रदेशात मधून मधून देवाने विखरुन टाकल्यासारख्या सुपीक जागा होत्या. त्यांना मरुद्यान म्हणत. (Oasis). इब्न बतूतने या ओऍसिसबद्दल क्रमवार माहिती दिली आहे. त्या सुपीक ओऍसिसमधील लोकांचे जीवन तुलनेने बरे होते. खजूराची असंख्य झाडे, पाण्याखाली भिजणारी जमीन त्यामुळे येथून भाजीपाला, फळे, मक्केला जात असत. धान्य पिकवायला पुरेसे पाणी नसल्यामुळे तेथील शेतकरी खजूर, पीच, जर्दाळू, डाळींबे, अंजिर, संत्री अशी पिके घेत असत. तेथील स्फटीकाइतक्या स्वच्छ हवेत आणि अतितीव्र उन्हात ती वाळून त्या लोकांचे अन्न बनले होते. स्वच्छ हवेची तुलना स्फटीकाशी केलेली आपल्याला प्रथमच आढळली असेल.

जरी हा प्रवास कठीण होता, तरी हरवण्याची भीती अजिबात नव्हती कारण शेकडो वर्षे अनेक काफिल्यांनी हा रस्ता तुडवलेला होता. याखेरीज व्यापारी, सैनिक, नोकर, कवी, शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, उंटांचे व्यापारी, गायक, राजदूत, विणकर, लोहार, भिकारी, गुलामांचे व्यापारी, चोर, लुटारु यांचा हाच मार्ग होता.

हाजचा काफिला ! याच्या आर्थिक उलाढालीची तुलना आजच्या क्रूजशीच करता येईल. एखाद्या हलत्या शहाराप्रमाणे त्याचा कारभार चाले. त्यात तंट्यांचे निवाडे करायला क्वादी असत, प्रार्थनेसाठी इमाम असत, प्रार्थनेला बोलावण्यासाठी अनेक बागी असत तसेच एखादा यात्रेकरु वाटेत मेला तर त्याच्या संपत्तीची मोजदात करायला विशेष अधिकारी आणि कारकून असत. त्यावर्षी इब्न बतूतचा काफिल्याचे संरक्षण करण्याचे काम सिरीयाच्या एका जमातीकडे होते. त्या काफिल्यातीलच एका क्वादीची आणि त्याची चांगलीच दोस्ती झाली, त्याचीही हकीकत त्याने सांगितली आहे.

पुढचा मुक्काम मदिना……

जयंत कुलकर्णी

भाग ४ समाप्त.

पुढे चालू…………………….


Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख and tagged , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s