इब्न बतूत भाग – ३

“शेवटी आम्ही ट्युनिसला पोहोचलो. गावातील बरेचजण आमच्या जथ्याचे स्वागत करायला जमले होते. आमच्यातील प्रत्येकाला कोणी ना कोणी भेटत होते. अलिंगने होत होती. पण माझ्या वाट्याला असे काहीच आले नाही. ते बघून माझे मन इतके उदास झाले की घराची आठवण येऊन माझ्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले. मी तर इथे कोणालाच ओळखत नव्हतो. असे वाटले की ….परत …पण एका यात्रेकरुला बहुतेक माझी दया आली असेल, त्याने जवळ येऊन माझी विचारपूस केली व माझी समजूत काढली. त्यानंतर आम्ही गावात मुक्कामाला पोहोचेपर्यंत त्या कनवाळू माणसाने मला साथ दिली, ते मी ट्युनिसच्या भव्य वाचनालयात मुक्काम करेपर्यंत.” घराची आठवण तीव्रपणे येण्याचा त्याच्या प्रवासी आयुष्यातील हा पहिला आणि शेवटचा प्रसंग. त्या कनवाळू यात्रेकरुने आणि तो जेथे उतरला त्यातील अधिकार्‍यांनी जणूकाही त्याच्या प्रवासाचा शुभारंभच केला म्हणा ना ! इस्लामी जगत्‍ हेच त्याचे आता घर बनले होते, त्या जगात ठिकठिकाणी भेटणारे विद्वान संत, तत्वज्ञानी हेच त्याचे आता नातेवाईक झाले होते. त्यांच्या आपलेपणामुळे तो अगदी भारावून गेला. ट्युनिसमधे त्यांनी एका काफिल्याचे सदस्यत्व घेतले, कारण तो काफिला पुढे अलेक्झांड्रियाला जाणार होता. त्या दरम्यान त्याच्या आयुष्यात दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्यामुळे त्याचा पुढचा प्रवास करायचा विचार पक्काच झाला. तो स्वत:ही याला त्याच्या प्रवासाचे बर्‍यापैकी श्रेय देतो.

मदरसे स्थापन व्हायची सुरुवात इराणमधे समरकंद आणि खारगिर्द येथे ९व्या शतकात झाली. प्रत्येक मदरशात एक छोटी मशीद, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना रहायला खोल्या आणि शिक्षणाचे वर्ग असायचेच. प्रत्येक मदरसा हा हनाफी, शफी किंवा मलिकी ह्या चारपैकी एका परंपरेचे पालन करत होत्या. ज्या ठिकाणी इब्न बतूतने ट्युनिसमधे आसरा घेतला ते महाविद्यालय बहुधा पुस्तके तयार करणार्‍या लोकांच्या सामुहिक वर्गणीतून चालवले जात असाव.

पहिले म्हणजे ……. “माझी गाठ याच सुमारास एका बैरागी अल्‌उद्दीन ह्यांच्याशी पडली. त्यांचा पाहुणचार २/३ दिवस घेतल्यावर एक दिवस ते मला म्हणाले
“एकंदरीत तुला परदेश हिंडण्याची फारच हौस दिसते.”

मी मनापासून उत्तर दिले,

“हो आहे खरं”

पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, त्यावेळी माझा विचार फक्त मक्केला जायचाच होता.

“तसं असेल तर तू माझ्या धाकट्या भावाला, फरिद अलादीन याला हिंदुस्थानात जाऊन भेटले पाहिजेस आणि तू माझ्या इतर दोन भावांनापण भेटू शकतोस. रुक्न अल्‌उद्दीन तर जवळच सिंधमधे असतो आणि बुर्‍हान अल्‌उद्दीनला तू चीनमधे भेटू शकतोस. पण जेव्हा तू त्यांना भेटशील तेव्हा त्यांना माझा सलाम सांगायला विसरु नकोस.”

त्यांच्या त्या भविष्यवाणीप्रमाणे भासणार्‍या सांगण्याचे मला फारच आश्चर्य वाटले. पण ती कल्पना माझ्या डोक्यात इतकी पक्की रुजली की मी त्या तिघांना भेटल्याशिवाय राहिलो नाही, हेही खरे आहे. मी त्यांना जेव्हा भेटलो आणि त्यांना त्यांच्या भावाचा सलाम सांगितला तेव्हा त्यांच्याबरोबर मलाही फारच आनंद झाला.”
त्यानंतर थोड्याच दिवसात जेव्हा तो शेख अल्‌ मुर्शिदीचा पाहुणचार घेत होता तेव्हा इब्न बतूतला एक विचित्र स्वप्न पडले.
“मी एका मोठ्या पक्षाच्या पाठीवर होतो आणि तो पक्षी मक्केच्या दिशेने उडत होता. मग तो येमेनला जाऊन पूर्व दिशेला एका काळसर हिरव्या गर्द (वरुन) दिसणार्‍या प्रदेशात उतरला. तेथे त्याने मला उतरवले. दुसर्‍या दिवशी शेखसाहेबांनी त्याचा अर्थ असा लावला
“तू हाजला जाशील. प्रेशिताच्या कबरीचे दर्शन घेऊन तू येमेन, इराक, तुर्कस्तान वगैरे देशातून शेवटी हिंदुस्थानात पोहोचशील. हिंदुस्थानात तुझा मुक्कम बराच काळ होईल आणि तेथे तुला माझा भाऊ हिंदुस्थानी दिलशाद – आम्ही त्याला त्याच नावाने संबोधतो, भेटेल. हा तुला एका मोठ्या संकटातून वाचवेल.”
या थोर पुरुषाचा मी निरोप घेतल्यानंतर मला नेहमीच नशिबाने साथ दिली हे मी कृतज्ञतापूर्वक येथे नमूद करतो.”
दिलशादने भारतात इब्न बतूतचा प्राण खरंच वाचवला. वरच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ लावायचाच म्हटला तर असेच म्हणायला लागेल की मृत्यूच्या दाढेतून त्याची जी अनेकवेळा सुटका झाली ते चांगले नशीबच म्हणायचे नाहीतर मेलेले बरे अशी वाईट अवस्था त्याची अनेकवेळा झाली आहे. कैरोमधे इब्न बतूतला इस्लामी जगताच्या खर्‍या आणि भव्य स्वरुपाची ओळख झाली. ज्या काळात त्याने इजिप्तमधे प्रवेश केला तेव्हा तेथे एका दूरदॄष्टी असलेल्या सुलतानाचे राज्य होते. एक कार्यक्षम नोकरशाही, भक्कम अर्थव्यवस्था, यांचा उत्कृष्ट मेळ असल्यामुळे तेथे शांतता, भरभराट असून सर्व जगात त्याचा दबदबा होता. इजिप्तची एशिया बरोबरच्या व्यापारामधे जवळजवळ मक्तेदारी होती. त्या व्यापारामुळे मामूल्क सुलतानशाहीचा मध्यमवर्ग अत्यंत श्रीमंत होता आणि त्यांचे राहणीमान अत्यंत उच्च दर्जाचे होते. टॅंजिएच्या आपल्या तरुण प्रवाशाचे डोळे त्या सगळ्यामुळे दिपून गेले नसतील तर नवलच. त्याने नमूद केले आहे –

इब्न बतूतने त्याच्या आठवणीमधे हे जे काफिले मक्केला जायचे त्याच्या आकाराबद्दल विशेष काही लिहिलेले आढळत नाही. फक्त एका ठिकाणी त्याचं वर्णन त्याने “प्रचंड” ह्या शब्दाने केलेले आढळते. सौदीअरेबियामधे हे काफिले त्यांच्या चामड्याच्या पखाली पाण्याने भरुन घ्यायचे. तो म्हणतो – प्रत्येक अमीराची स्वत:ची आणि त्यांच्या उंटांची पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असायची. बाकीच्या लोकांना ओऍसिसमधे आपापले पाणी विकत घ्यायला लागायचे. त्याची किंमतपण ठरवून दिलेली असायची. हे काफिले “ताबूक” नंतर मात्र दिवसरात्र प्रवास करुन पुढचा मुक्काम गाठायचे कारण त्या जंगलातून लवकरात लवकर पार पडण्याचे त्यांच्या पुढे एक आव्हानच असायचे.

“असे म्हटले जाते की कैरोमधे त्यावेळेस १२००० पाणके होते. ते त्यांच्या १२००० उंटांवरुन पाण्याची वाहतूक करायचे. ३०,००० खेचरे भाड्याने घेण्यासाठी उपलब्ध होती. हे तर काहीच नाही. नाईलमधे वरच्या बाजूला ते अलेक्झांड्रियापर्यंत मालाची वाहतूके करायला ३६००० बोटी आणि गलबतं हजर होती. त्यामधून सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक होत होती. कैरोच्या समोरच्या किनार्‍यावर एक स्वर्गीय उद्यान आहे त्याचे नाव “बाग.” या उद्यानात डाळींबाची असंख्य झाडे आहेत आणि ह्या बागेत कैरोतील लोक सहलींसाठी व मौजमजा करायला येतात. कैरोमधे न मोजता येण्याइतके मदरसे होते. त्यातले इस्पितळ तर एवढे मोठ्ठे होते की त्याला मरीस्तान असे नाव होते. “ते इतके सुंदर होते की ते पहायलासुध्दा गर्दी होते.”

पण यात इब्न बतूतला अडकून पडायचे नव्हते. त्याचे ध्येय मक्का हेच होते. नाईलमधे प्रवास करुन त्याने एक पूर्वेकडे जाणारा काफिला पकडला. त्याला आता “अयधाब” जे लाल समुद्राच्या काठी होते तेथे जायचे होते. ते त्यावेळेपासून त्याच्या अत्यंत खारट पाण्यासाठी प्रसिध्द होते. दुर्दैवाने त्याचवेळी तेथील सुलतानाने मामुल्कांच्या विरुध्द बंड पुकारले होते. वाईटातूनही चांगले शोधण्याच्या त्याच्या कलेमुळे त्याने याही संधीचा फायदा करुन घेतला. इब्न बतूत कैरोला परतला आणि त्याने उंटावरुन सिनाईचे वाळवंट पार केले. पॅलेस्टाईन आणि सिरीया पार करुन तो दमास्कसला पोहोचला. तेथून त्याला जे वार्षिक काफिले मक्केला रवाना व्हायचे, त्यात सामील व्हायचे होते. खरं तर कैरोहूनही एक काफिला मक्केसाठी रवाना होणार होता. पण थोड्या दिवसांनी. कैरोमधे बसून दिवस काढण्यापेक्षा इब्न बतूतने प्रवास करायचा ठरवला. त्यासाठी तो रस्ता बराच लांबचा असला तरी.

इब्न बतूतचा प्रवासाचा वेग हा धिमा पण एकसारखा होता. गलबतं साधारणत: सरासरी १५० कि.मी. एका दिवसात प्रवास करायची. कधी कधी जास्तपण करायची पण वार्‍याच्या दिशांवर बरेच काही अवलंबून असायचे. लुटमारीच्या भीतीमुळे जमिनीवरचा प्रवास हा एकत्र म्हणजे काफिल्यातून व्हायचा. सपाट प्रदेशात हा काफिला ६५ कि.मी. चे अंतर सहज तोडायचा. पण डोंगराळ प्रदेशात त्याचा वेग फारच कमी असायचा. तेव्हा एका दिवसाचा प्रवास हे अंतर सापेक्ष असायचे. पण त्या काळात अंतर हे दिवसाच्या प्रवासात सांगण्याची सर्रास पध्दत होती. इब्न बतूत शक्यतो अंतर मैलात सांगतो. हा मैल बहुधा अरबी मैल असावा. म्हणजे आजचे १.९ कि.मी. त्याच्या पुस्तकात अर्थात इतर मोजमापांचा पण उल्लेख आहे. उदा. इजिप्तचे फारसाख (५७६३ मी.) आणि एक फरसाख म्हणजे १२००० इल्स.

पुढचा मुक्काम दमास्कसमधे……….आता तिथेच भेटू.

जयंत कुलकर्णी.
भाग -३ समाप्त.
पुढे चालू………..

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख and tagged , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s